एका जाज्वल्य उपक्रमाबाबत
"काही नाही. निदान महाराष्ट्रात तरी सगळं शिक्षण मराठीतूनच द्यायला पाहीजे. तरच मराठी जगेल. नाही तर पाली, संस्कृत सारखी मराठी पण नामशेष होईल." दिल्यानं साप्ताहिक सभेत आणलेला नवीन प्राणी.. उत्तम बापट.. मुठी आपटून आपटून पोटतिडिकेनं बोलत होता. त्याच्या वाक्यावाक्यातून मराठीचा जाज्वल्य अभिमान मायक्रोवेव्हमधल्या पॉपकॉर्न सारखा उसळत होता. त्याच्या युवराजसिंगी धडाक्यामुळे माझ्यातही पोटतिडिक निर्माण झाली.. पण तिच्या उत्पत्तिचं मूळ भुकेमधे होतं हे नंतर उमजलं. मी हळूच मक्या आणि दिल्याकडे पाहिलं. ते बिअर पिऊन थंडावले होते, तिकडे उत्तम उत्तम (उत्तमोत्तम म्हणावे का?) पेटला होता. मला त्याचं म्हणणं पटत होतं.. तसं मला कुणीही काहीही जरा ठासून सांगीतलं की पटतंच. मी: "खरय तुझं. आपण तरी काय करणार?".. मी काही तरी गुळमुळीत बोललो. उत्तमः "अरे काय करणार म्हणजे? काय नाही करू शकणार?".. जोरात मूठ आपटून तो आणखी उसळला.. याला आता मूठ आपट बापटच म्हणायला पाहीजे.. तत्काळ मी भलतंच बोलल्याची जाणीव झाली.. मी नर्व्हसपणे इकडे तिकडे पाहीलं. थंडावलेले मक्या, दिल्या मदतीला यायची शक्यता नव्हती. ...