भूतचुंबक
बंड्या वाघ माझा शाळासोबती! आम्ही शाळेत असताना त्याला साप चावला होता. त्याचं असं झालं.. त्याच्या घरात आई-वडील कुणी नव्हतं.. तो एकटाच खेळत होता.. मधेच त्याला काहीतरी बांधायला दोरीची आवश्यकता भासली.. म्हणून तो घरात आला.. तर आतल्या दरवाज्यावरच एक, त्याला हवी होती तशी, दोरी लोंबकळताना दिसली.. क्षणाचाही वेळ न घालवता त्यानं ती धरली आणि ओढली.. त्याच्या दुर्दैवाने तो विषारी साप होता.. सापानं त्याचं काम चोख बजावलं.. त्यावर बंड्याला काय करावं ते सुचेना.. आईला शोधून काढून दवाखान्यात जाई पर्यंत थोडा उशीर झाला.. म्हणजे बंड्याला दवाखान्यातच अॅडमिट करावं लागलं.. थोडे आधी उपचार झाले असते तर लगेच घरी जाता आलं असतं इतकंच.. अपघात असल्यामुळे ती एक पोलीस केस पण झाली. बंड्या वाचला खरा पण घरच्यांच्या आणि आमच्या तोंडचं पाणी पळवलं त्यानं! दुसरे दिवशी एका भुक्कड पेपरात चक्क बंड्याच्या मृत्यूची वार्ता छापून आली.. जिचा त्याच्या घरच्यांना काहीच पत्ता नव्हता.. लगेच शाळेला सुट्टी देण्यात आली.. धक्का बसलेल्या अवस्थेत वर्गातली काही मुलं आणि एक दोन मास्तर सुतकी चेहर्याने त्याच्या घरी गेले.. घरी फक्त वडील होते त्याचे...