जिवाची मुंबई
'काल नेहमी प्रमाणे सायकलवरून घरी चाललो होतो.. भरपूर ढग होते.. गच्च अंधार होता.. आणि तेव्हाच एका गल्लीतून एक सायकलवाली भसकन माझ्या समोर आली'.. माझ्या ऑफिसातला एक सहकारी डिसेंबरातल्या एके दिवशी सांगत होता.. 'तिच्या सायकलला दिवा नाही.. डोक्यावर हेल्मेट नाही.. अंगावर फ्ल्युरोसंट जॅकेट नाही.. काहीच नाही.. मी म्हणालो.. माय गॉड! हाऊ इज शी गॉना सर्व्हाइव्ह?'.. हो ना! इकडे सायकल चालवायची असली तरी हेल्मेट लागतं, सायकलला दिवा लागतो शिवाय अंधारात इतरांना तुम्ही दिसावेत म्हणून अंगात फ्ल्युरोसंट जॅकेट लागतं. त्याच्या ष्टोरीवर बाकीचे संमती दर्शक माना डोलावत शेरेबाजी करत होते आणि मला मात्र आपल्याकडचं सायकलिंग आठवत होतं. एकदम मन सुमारे ३०/३५ वर्ष मागे गेलं.. कॉलेज मधल्या काळात. [टीप :- आता फ्लॅशबॅक चालू होणार आहे. तरी प्रत्येकांने इथे आपल्या आवडी प्रमाणे आपल्याला हवा तसा फ्लॅशबॅक मारून घ्यावा. तुम्हाला काही सुचत नसल्यास पुढील मान्य फ्लॅशबॅक पद्धतीतून निवड करा .. चालू सीन पाण्यावर डचमळून डचमळून एकदम भूतकाळातल्या सीनला खो देण्याची एक पद्धत. दुसरी, भूतकाळातला सीन सरळ ब्लॅक अँड व्हाईट मध...