Thursday, October 14, 2010

जिवाची मुंबई

'काल नेहमी प्रमाणे सायकलवरून घरी चाललो होतो.. भरपूर ढग होते.. गच्च अंधार होता.. आणि तेव्हाच एका गल्लीतून एक सायकलवाली भसकन माझ्या समोर आली'.. माझ्या ऑफिसातला एक सहकारी डिसेंबरातल्या एके दिवशी सांगत होता.. 'तिच्या सायकलला दिवा नाही.. डोक्यावर हेल्मेट नाही.. अंगावर फ्ल्युरोसंट जॅकेट नाही.. काहीच नाही.. मी म्हणालो.. माय गॉड! हाऊ इज शी गॉना सर्व्हाइव्ह?'.. हो ना! इकडे सायकल चालवायची असली तरी हेल्मेट लागतं, सायकलला दिवा लागतो शिवाय अंधारात इतरांना तुम्ही दिसावेत म्हणून अंगात फ्ल्युरोसंट जॅकेट लागतं. त्याच्या ष्टोरीवर बाकीचे संमती दर्शक माना डोलावत शेरेबाजी करत होते आणि मला मात्र आपल्याकडचं सायकलिंग आठवत होतं. एकदम मन सुमारे ३०/३५ वर्ष मागे गेलं.. कॉलेज मधल्या काळात.

[टीप :- आता फ्लॅशबॅक चालू होणार आहे. तरी प्रत्येकांने इथे आपल्या आवडी प्रमाणे आपल्याला हवा तसा फ्लॅशबॅक मारून घ्यावा. तुम्हाला काही सुचत नसल्यास पुढील मान्य फ्लॅशबॅक पद्धतीतून निवड करा .. चालू सीन पाण्यावर डचमळून डचमळून एकदम भूतकाळातल्या सीनला खो देण्याची एक पद्धत. दुसरी, भूतकाळातला सीन सरळ ब्लॅक अँड व्हाईट मधे सुरू करण्याची. वाचकांना अशी कस्टमायझेशनची सोय देऊन त्यांना लेखात प्रत्यक्ष सहभागी करून घेणारा हा पहीलाच लेख असावा बहुधा!]

आम्ही नेहमीप्रमाणे कॉलेजच्या कट्ट्यावर चकाट्या पिटत बसलो होतो. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी जाम बोअर होत होतं.. कशातच मजा राहिली नव्हती.. लेक्चरना दांड्या मारून पिक्चरला जाणे.. दुसर्‍या कॉलेजच्या लेक्चरांना बसणे.. कॉलेजला सरळ यायच्या ऐवजी व्हाया गुत्ता येणे.. सगळ्या सगळ्याचा घनघोर कंटाळा आलेला होता.. अगदी, सुंदर मुलगी दिसल्यावर केसांची झुलपं ठीक करायला देखील हात उठत नव्हता.

आणि, अचानक, कसलीही पूर्वकल्पना न देता मक्यानं 'आपण सगळ्यांनी मुंबईला जायचं का?' असा बाँब टाकला. बाँब नाहीतर काय? कारण, आमच्या पॉकेटमनीच्या पैशात आम्ही फार फार तर हडपसर पर्यंत जाऊन आलो असतो. त्या काळी आमचा पॉकेटमनी आठवड्याला तीन किंवा चार रुपये इतका घसघशीत असायचा. 'लागतोय कशाला पॉकेटमनी?' हा समस्त आईबापांचा युक्तिवाद! 'बाहेरचं खायला? शीss! कळकट्टं हॉटेलातलं ते त्याच त्याच तेलात तळलेलं खाणं? छे! त्यापेक्षा पोराने डबा घेऊन जावा!'. तेव्हा चहा फक्त १५ पैशाला मिळायचा हो, पण आम्हाला बिड्या प्यायलाही पैसे लागायचे.. अर्थात, ते कळालं असतं तर मी कुठल्या तरी गॅरेजवर गाड्या पुसत बसलो असतो.

या पार्श्वभूमिवर, ट्रेनच्या तिकीटाचे आणि मुंबईत हिंडण्याफिरण्याचे पैसे घरी मागितले असते तर पैसे सोडाच वर हक्काचा पॉकेटमनी पण बंद झाला असता.. शिवाय, कुचकटपणे 'हॅ! मुंबईत काय जायचंय? पाहिली नाही का कधी आपण? त्यापेक्षा अभ्यास करा जरा! मागच्या परीक्षेत किती मार्क पडलेत ते माहिती आहे ना?' असली मुक्ताफळं ऐकायला मिळाली असती. 'परीक्षेतले मार्क' हे समस्त आईबापांच सुदर्शन चक्र! त्यांनी ते तोंडातून भिरकावलं की सपशेल शरणागती पत्करल्या शिवाय गत्यंतर नसायचं.

तरीही गंमत म्हणून आमचे खर्चाचे हिशेब सुरू झाल्यावर मक्याने खरा बाँब टाकला.. याच्या मानाने मागचा लवंगी बाँब होता.. 'अरे गाढवान्नो! ट्रेनने नाही, सायकलने जायचंय'. सायकलने मुंबई? माणसानं पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवण्या इतकीच ही आयडिया जगावेगळी होती. इथे जवळपास जायला सायकल ठीक आहे, पण मुंबई? जरा विचार केल्यावर ती कल्पना थ्रिलिंग वाटली मात्र!

बाकी मक्याच्या कल्पना नेहमी चित्तथरारक आणि उत्स्फुर्त असायच्या. त्याच्यामुळे पुण्याच्या आसपासच्या गावांना आमच्या सायकलवार्‍या झाल्या होत्या. लोणावळ्याला तर तीन चार वेळा जाणं झालं होतं. एकदा तर संध्याकाळी ६ वाजता आम्ही अचानक निघालो आणि शिवापूरला सायकलवर जाऊन रात्री ११ वाजता परत आलो होतो. पण सायकलने मुंबईला एका दिवसात काही जाऊन येणं शक्य नव्हतं, शिवाय पैसे पण लागले असतेच. मग घरी काय बंडला मारायच्या? मुंबईत कुठं रहायचं? पैसे कसे जमवायचे? कोण कोण येणार? असल्या अनंत प्रश्नांचा उहापोह सुरू झाला.

हो नाही करता करता ५ जण तयार झाले. मी, दिल्या, मक्या, उल्हास आणि सतीश. जायला किती वेळ लागेल याचा काहीच अंदाज नव्हता. लोणावळ्याला जायला चार साडे चार तास लागायचे इतकाच अनुभव होता. शांतपणे सायकल चालविली तर वेग तासाला सुमारे १५/१६ किमी पडतो. त्यावेळी पनवेल ते चेंबूर खाडी पुला वरून जाणारा रस्ता नुकताच तयार झाला होता. त्या पुलाचं उदघाटन नेहमी प्रमाणे रखडलेलं होतं पण वाहनांची ये जा सुरू झाली आहे असं ऐकून होतो. तसंच त्या पुलावरून जायला टोल भरावा लागतो हे समजलं होतं आणि सायकलला किती टोल पडेल त्याची माहिती कुणालाच नव्हती. एक दिवस जायला, एक यायला आणि एक दिवस तिथे रहायला असा ३ दिवसांचा प्लॅन झाला. उल्हासची बहीण दादरला रहायची तिच्याकडे रहायचं ठरलं.

मुंबईला सायकलने सोडाच पण ट्रेनने जायला सुद्धा घरून परवानगी मिळाली नसती म्हणून घरी 'सिंहगडावर जाणार आहोत.. तिथे एका मित्राच्या शेतावर रात्री राहून दुसरे दिवशी परत येऊ' अशी बंडल ठोकली. फक्त उल्हासच्या घरी आम्ही मुंबईला जाणार आहोत हे माहीत होतं. पैशासाठी वेगवेगळ्या पुड्या सोडल्या! मला पुस्तकं घ्यावी लागणार होती, मक्याला केमिस्ट्री प्रॅक्टिकल करण्यासाठी डिपॉझिट भरावं लागणार होतं, दिल्याला कॉलेजच्या एका कार्यक्रमाची वर्गणी भरायला लागणार होती. सावधगिरी म्हणून प्रत्येकानं इतरांनी घरी काय बंडला मारल्या आहेत ते लक्षात ठेवलं होतं!

ठरल्या दिवशी पहाटे ६ ला निघालो. एकाच दिवसाचे कपडे घेऊ शकत असल्यामुळे प्रत्येकाच्या खांद्याला एकच शबनम पिशवी होती! त्याकाळात शबनम पिशवीची क्रेझ होती.. बॅकपॅक सारखी उच्चभ्रू लोकांची वस्तू फारशी कुणाला माहीत नव्हती.. आणि शबनम बॅकपॅकेसारखी पाठीवर टाकता यायची. थोडं खाणं बरोबर घेतलं होतं.. पुरी भाजी, शिरा असलं काही तरी.. कामशेतला चहा/बिड्या प्यायला थांबलो तेव्हाच ते संपलं.

नेहमी होणार्‍या अपघातांमुळे पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ बर्‍यापैकी कुप्रसिद्ध होता. सतत येणार्‍या जाणार्‍या ट्रक आणि गाड्यांमुळे सायकली पॅरलल चालवणं म्हणजे गंगेच पाणी वर्तमानपत्राने अडवायला गेल्यासारखं झालं असतं. सायकली एका पाठोपाठ एक अशाच चालवत होतो तरीही मागून येणार्‍या गाड्यांना त्यांचा त्रास व्हायचाच.. समोरून गाडी येत असेल तर जास्तच. कित्येक वेळा ट्रकवाले आम्हाला ओव्हरटेक केल्यावर मुद्दाम आमच्या जवळून आत येऊन रस्त्यावरून खाली उतरवून द्यायचे.. बाजुच्या जमिनीपासून रस्ता एक दीड इंच उंच असल्यामुळे सायकल डांबरी भागावर ठेवायची कसरत केल्यास कपाळमोक्ष होण्याची शक्यताच जास्त होती. तीच कथा सायकल परत डांबरी रस्त्यावर घेताना! त्यामुळे ट्रकने झाँसा दिला रे दिला की लगोलग त्याच्या ड्रायव्हर/क्लीनरचा मुक्तपणे कुळोद्धार व्हायचा.

मक्याच्या सायकलचा फक्त मागचा ब्रेक लागायचा.. पुढचा ब्रेक अस्तित्वात नव्हता.. फक्त हँडल जवळची दांडी होती.. मक्या ती गोल गोल फिरवत उगाचच एखाद्याला ओव्हरटेक करायचा आणि वर 'टॉप गिअर टाकलाय रे' म्हणून खिजवायचा. मग दुसरा खुन्नसने त्याला ओव्हरटेक करायचा. पण कामशेत नंतर मक्याची सायकल पंक्चर झाली आणि त्याच्या चेहर्‍यातली हवा गेली. परत कामशेतला मागे जाण्याचं धैर्य कुणात नब्हतं. मग एकाने मक्याला डबलसीट घेतलं आणि दुसर्‍याने त्याची सायकल डबल कॅरी केली. ते दमले की दुसर्‍या दोन जणांची पाळी! मधे मधे ट्रकवाले नको इतकी जवळीक दाखवत होतेच. असं करत करत वरात पार लोणावळ्या पर्यंत आल्यावर एक सायकलचं दुकान दिसलं आणि आम्ही कपडे न काढता 'युरेका! युरेका' म्हणून ओरडलो. सायकलवाल्यानं मख्खपणे टायर ट्यूबचा राडा झाल्याचं सांगीतलं. दोन्ही नवीन टाकून मग खंडाळा गाठे पर्यंत बारा साडे-बारा झाले आणि कुणाला तरी बिअर बार दिसला.. भूकही लागली होतीच.. एकेक बिअर आणि जेवण रिचवून दीड दोनच्या सुमारास गाडी उताराला लागली.

घाटातून अशक्य बुंगाट वेगाने सायकली सुटल्या.. ते इवलेसे ब्रेक वेगावर नियंत्रण आणण्यासाठी अपुरे पडत होते.. आमच्या हातात फार काही नव्हतं, आम्ही उतारपतित होतो.. एखाद्या ब्लॅकहोलच्या तळाकडे जसे काही प्रचंड वेगाने खेचले जात होतो.. मधे येणार्‍या सगळ्या गाड्यांना कधी डावी तर कधी उजवी घालत आमच्या सायकली एखाद्या उल्के सारख्या खोपोलीत येऊन धडकल्या. हा रोलरकोस्टरचा पहीला वहीला अनुभव! सायकली थांबवून ब्रेक बघायला गेलो तर रबर जळल्याचा वास आला.. ते चांगले चटका बसण्या इतके गरम लागत होते आणि त्यावरचं रबर वितळलं होतं. मक्या त्या भीषण उतारावरून एकाच ब्रेकवर कसा उतरला त्याचं त्याला माहिती.. फक्त उतरताना तो येडा टॉप गिअर टाकत ट्रकांना ओव्हरटेक करीत होता.

ब्रेकांच डॅमेज विशेष नाहीये हे पाहील्यावर आगेकूच सुरू झाली.. खोपोली मागे पडलं आणि टँशsss!.. या वेळेला दिल्याच्या चाकाने राम म्हंटलं. पण आता आम्ही अनुभवी होतो. परत डबल कॅरी डबल सीट करत करत संध्याकाळच्या सुमारास पनवेल गाठलं. तिथे टायर ट्यूब बदले पर्यंत सगळ्यांच्या चहा बिड्या मारून झाल्या. पनवेल सोडून खाडी पुलाचा रस्ता शोधेपर्यंत चक्क अंधार पडला. बॅटरी आणण्याची अक्कल कुणीच दाखवली नव्हती आणि आता अकलेचा प्रकाश पाडण्याला पर्याय नव्हता. रस्ता नवीन असल्यामुळे आणि पूर्ण तयार झाला नसल्यामुळे तिकडे फारशी वर्दळ नव्हती, शिवाय कडेला बर्‍यापैकी खड्डे होते. मागून गाडी आली तर तिच्या प्रकाशात थोडा रस्ता तरी दिसायचा पण पुढून आली तर सायकलवर आंधळी कोशिंबीर खेळायला लागायचं.

थोड्या वेळाने पूर्ण चंद्र आला आणि त्यातल्या त्यात थोडं दिसायला लागलं. अजूनही आम्ही एका मागून एक असेच चाललो होतो. पुढच्याच्या मागून बिनबोभाट जायचं हा नियम असल्यामुळे पुढचा खड्ड्यातून गेला की मागून आणखी ४ जण त्याच खड्ड्यातून तसेच यंत्रवत जायचे. सगळ्यात पुढे सतीश अभिनव पद्धतीने सायकल हाणत होता.. हाताची दोन्ही कोपरं हँडलवर ठेवली होती आणि हनुवटीला तळव्यांचा आधार दिला होता.. सर्किटपणाचा कळस नुसता!.. केवळ हँडल हाताने धरायचा कंटाळा आला म्हणून! लवकरच, एका मोठ्याशा खड्ड्याने जादू दाखवली आणि सतीशचा एक दात भूमिगत झाला.

इतका वेळ चाललेलं सायकलिंग आता आपले रंग दाखवायला लागलं होतं. कधी एकदाचे पोचतोय असं झालं होतं. शरीरातला घाम संपत आला होता. अंगावर धुळीची असंख्य पुटं चढली होती. आमच्या पायांना सतत पेडल मारायची सवय झाली होती. चालताना विचित्र वाटायचं कारण पेडल मारल्यासारखी पावलं पडायची. तहान कायम लागलेली असायची आणि पाण्याची बाटली कुणाकडेही नव्हती.

आणि, एकदाचा तो खाडी पुलाचा टोल बूथ आला. बूथवरच्या माणसाकडे 'सायकलला किती टोल?' अशी पृच्छा करताच त्यानं स्वतःला चिमटा काढून तो झोपेत नसल्याची खात्री केली नि टोलच्या रेट कार्डावर नजर फिरवली. या पुलावरून कधी कुणी सायकलवाला जाईल अशी अपेक्षा सरकारला नसावी कारण सायकलचा रेट नव्हता. 'कुठून आलात?' त्यानं आम्हाला जाता जाता विचारलं. 'पुण्याहून' हे उत्तर ऐकताच तो स्वप्नात असल्याबद्दल त्याची खात्रीच झाली असणार.

पुलावर दिवे होते पण ते खाडी दाखवायला असमर्थ होते. लांबलचक पूल पार करून चेंबुरात शिरलो. उल्हासचं लहानपण दादर मधे गेलेलं होतं. त्यामुळे चेंबूर पुढे कसं जायचं हे उल्हासला माहीती असेल या समजुतीला धक्का बसला. एका दुकानात विचारून प्रवास सुरू झाला. दिव्यांचा लखलखाट, खूप गाड्या/बसेस आणि मोठे रस्ते पाहून 'आता पोचलोच की आपण' याचा आनंद झाला होता. त्यात, बाजुनी जाणार्‍या बस मधल्या प्रवाशांनी ओरडून आणि हात हलवून चिअरिंग सुरू केल्यावर आमचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला. सगळे हिरीरीने सायकल मारायला लागले.. मक्याच्या गिअर टाकण्याला ऊत आला. प्रचंड चिअरिंग चाललय आणि आम्ही एखादी मोठी रेस जिंकत असल्यासारखे सायकली हाणतोय हे दृश्य आजही मनात ताजं आहे. सायकल नामक यंत्र त्यांनी कधी पाहिलं नव्हतं की काय कुणास ठाऊक. माझं इतकं चांगलं स्वागत मुंबईच्या लोकांनी त्या नंतर कधीही केलं नाही.

उल्हासचं अजूनही मधेच उतरून रस्ते विचारणं चालू होतं आणि आमचं चिडवणं पण! 'इतकी वर्ष मुंबईत शिकायला ठेवलं पण साधे रस्ते पण माहीत नाहीत तुला?' असली हेटाळणी एकीकडे चालू होती. पण दुसरीकडे 'आयला, अजून किती जायचय?' हा विचार पिंगा घालायला लागला होता. उल्हास सोडता आमच्या पैकी कुणालाच मुंबईच्या आकाराची कल्पना नव्हती हे खरं! शेवटी उल्ह्याला ओळखीची खूण दिसली एकदाची आणि आम्ही थोड्याच वेळात त्याच्या बहिणीच्या दारात उभे राहीलो. रात्रीचे सुमारे साडे-नऊ दहा झाले होते.

घरात अंधार दिसत होता. झोपले की काय सगळे? बेल दाबल्यावर कुणीच दार उघडलं नाही. परत एकदा बेल दाबून घरात कुणी नाही याची खात्री केली. उल्ह्याने शेजारच्या घरात चौकशी केल्यावर बहीण आणि तिचा नवरा सिनेमाला गेल्याचं कळलं. किल्ली त्यांच्याकडे नव्हती. परत एकदा उल्ह्याला 'फोन करून का नाही सांगीतलस?' म्हणून भोसडण्यात आलं. पण ते येई पर्यंत काय करायचं? मग उल्ह्यानंच दादर चौपाटीवर टीपी करायची आयडिया टाकली. सायकली तिथेच ठेवून पेडल मारत मारत चौपाटीवर आलो. मस्त गार वारं वहात होतं, आकाशात चंद्र तारे शायनिंग करत होते, लाटांनी खर्ज लावला होता आणि आम्ही प्रवासाच्या आठवणीत दंग झालो.

कुणीतरी कशाने तरी मला ढोसत होतं.. 'कॉलेजला जायचं नाहीये, आई!'.. मी बरळलो.. तरी ढोसणं चालूच होतं.. काय त्रास आहे च्यायला!.. वैतागून डोळे किलकिले करून पाहीलं तर एक पोलीस लाठीने ढोसत होता.. आयला पोलीस घरी येऊन का ढोसतोय? पूर्ण जाग आल्यावर आम्ही चौपाटीवर असल्याचा साक्षात्कार झाला.. रात्री १० नंतर चौपाटीवर बसायची परवानगी नसते, कोजागिरी आहे म्हणून आज १२ पर्यंत होती.. तो पोलीस सांगत होता.. अरेच्च्या! म्हणजे आज कोजागिरी होती? किती वाजले होते कुणास ठाऊक!.. आमच्या पैकी फक्त उल्ह्याकडे घड्याळ होतं. रात्रीचा १ वाजला होता. अर्धवट झोपेत पेडल मारत घरी गेलो.. नशीबानं बहीण आलेली होती. तिला अर्थातच आम्ही येणार असल्याची काहीच कल्पना नव्हती. जुजबी ओळख परेड होताच क्षणाचाही विलंब न लावता सगळे मेल्यासारखे झोपले.

सकाळी उशीराच जाग आली तेव्हा घरी फक्त बहीण होती, नवरा कामावर गेला होता. पाय आहेत की नाहीत याचा नक्की अंदाज येत नव्हता. काबाडकष्ट करून सकाळचे कार्यक्रम उरकले नि बिड्या फुकायला बाहेर पडलो. 'आपण घरी फोन करायला पाहीजे'.. कुणाला तरी अचानकपणे समंजसपणाची भरती आली. फोन फक्त माझ्या आणि मक्याच्या घरीच होता. घरच्यांना इतर घरी सांगायला पाठवायचं ठरवलं. उल्ह्याच्या घरी माहितीच होतं. बाबा घरी असण्याची शक्यता नसल्यामुळे हीच वेळ फोन करायला योग्य होती. पब्लिक फोनवरून फोन लावल्यावर अपेक्षेप्रमाणे आईने उचलला.
'आई! मी आज घरी येत नाहीये'
'बरं! का रे पण? अजून एक दिवस शेतावर घालवणार आहात का?'
'अं अं अं हो! नाही! मी शेतावर नाहीये'
'आँ? शेतावर नाहीयेस? मग कुठे आहेस तू?'.. आवाजातून रागाची छटा जाणवायला लागली होती.. पण खरं काय ते सांगणं भाग होतं.
'मुंबईत!'.. त्यानंतर तिकडे काय घडलं ते माहीत नाही.. सिनेमात जसं हातातून ट्रे पडून सगळ्या कपबशा खळकन फुटताना दाखवतात तसं काहीसं झालं असावं! नंतर मक्याच्या घरच्याही फुटल्या. बहुधा, नजिकच्या भविष्य काळात आमची टाळकी फुटण्याची ती नांदी असावी.

रात्री पायांना चांगलं तेल रगडून झोपलो.. दुसरे दिवशी परतीचा प्रवास सुरू केला. पाय दुखत असल्यामुळे प्रवास निवांतपणे रमत गमत चालला होता. घाट लागल्यावर मात्र बोंबाबोंब झाली. पेडलवर पूर्ण उभं राहीलं तरीही चाक एक मिलीमीटर पण पुढे जात नव्हतं.. असला भयानक चढ! कात्रजपेक्षाही भीषण! सायकलवर कात्रजचा चढ पुण्याच्या बाजूने देखील व्यवस्थित चढता येतो. मात्र खंडाळ्याच्या घाटाने पार वाट लावली.. ट्रकच्या साखळ्या धरून जायचा प्रयत्न केला जरा.. पण डावीकडे खोल दरी, उजवीकडे रँव रँवणारा ट्रक आणि मधे सायकल जेमतेम मावेल अशी रस्त्याची चिंचोळी पट्टी हे दृश्य एक दोनदा अनुभवल्यावर सगळा माज उतरला. सगळे हातात सायकल धरून मुकाटपणे चालायला लागले. बराच वेळ चालल्यावर शेवटी खंडाळा आलं. यापुढील प्रवास वेगाने होतो कारण खंडाळ्यापासून थेट पुण्यापर्यंत सतत थोडा थोडा उतार आहे. त्यामुळे परतीचा वेग आपोआपच वाढून तासाला सुमारे २०/२१ किमी पडतो.

रात्री ९ वाजता घरी ठेपलो. भीत भीत घरात पाऊल ठेवलं. 'पायात गोळे बिळे नाही आले का रे?'.. घरच्यांनी विशेषतः बाबांनी प्रेमाने चौकशी केल्यावर सगळं टेन्शन गेलं. 'तेल लावून चोळ पाय चांगले'.. 'गरम पाण्यात पाय बुडवून ठेव'.. मधेच एक प्रेमळ दटावणी आली.. 'अरे पण सांगून गेला असतास तर आम्ही काही नाही म्हंटलं नसतं!'.. त्यात काही तथ्य नव्हतं हे आम्हा दोघांनाही चांगलं माहीत होतं. दुतर्फा प्रेम ओसंडत असताना बाबांनी एकदम 'कुठली पुस्तकं घेतलीस ती दाखव बघू!' म्हणून ६.३ रिश्टर स्केलचा धक्का दिला आणि माझा चेहरा सूळी जाणार्‍या माणसासारखा झाला.

'तुला काय वाटतंय चिमण?' माझा हरवलेला चेहरा पाहून ऑफिसातला सहकारी पुसता झाला आणि मी भानावर आलो.
'अं अं, वि वेअर लकी'.. आता भंजाळायची पाळी त्याची होती.

तळटीपः

या सायकलवारीच्या उत्तुंग यशामुळे आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत नाशिकला जायचं ठरवलं. तो सायकल प्रवास थोडक्यात पुढे देतोय...

या खेपेला एकही बंडल मारली नाही. कारण, आपला पोरगा काही तरी करू शकतो असा विश्वास कधी नव्हे ते घरच्यांना वाटत असेल असा विश्वास आम्हाला वाटला. परीक्षेचा रिझल्ट लागलेला नव्हता म्हणूनच परवानगी मिळाली. मक्या, मी आणि दिल्या असे तिघेच तयार झाले. पहाटे निघालो. त्या दिवशी मला थोडं बरं वाटत नव्हतं, तोंड पण आलेलं होतं. तरीही निघालो. मागच्या वारी पासून म्हणावा असा काही बोध घेतला नव्हता. म्हणजे बॅटरी किंवा पाण्याची बाटली असं काहीही या ही वेळेला बरोबर नव्हतं. सतत डावीकडून उजवीकडे आडवा वारा वहात असल्यामुळे सायकल रस्त्यामधे ढकलली जात होती. सायकल चालवणं अवघड जात होतं. तिच्या मुसक्या बांधून परत परत तिला कडेला आणावं लागत होतं.

चार साडे-चार तास सायकल मारल्यावर मंचर आलं. तिथल्या एस.टी. स्टँडवरच्या कँटीनमधे एक थेंब चाखला तरी १००० व्होल्टचा दणका देणारं पाव-शॅंपल ऑर्डर केलं. मला ते खाणं शक्यच नव्हतं.. इथेच माझा धीर खचला. मी कुठेही काहीही खाऊ शकेन असं वाटत नव्हतं. मी फक्त चहा बिडी मारली आणि परतीचा निर्णय घेतला. मक्या आणि दिल्यानं पुढे जायचं ठरवलं. मी एकटा नंतरचे चार तास सायकल मारत घरी परतलो. ते दोघे त्या दिवशी नाशिकला पोचू शकले नाहीत हे नंतर कळालं. वाटेत एका गावातल्या देवळात रात्रीचे झोपले आणि दुसरे दिवशी पोचले. येताना सायकली बसवर टाकून आले.


====== समाप्त======

12 comments:

Unknown said...

jabardast. Masta lihila aahe tumhi. Ani baryach divasatun assal pune vachayla milala tyacha anand hi jhala. Tumcha baki ek khara ki he gore lok asle helmet, jacket vagaire ghalun cycle chalavnyatli sagli maja ghalavtat. Aslya bul-bulit paddhatine cycle malahi chalavta yet nahi. Pan tumcha anubhav mhanje kaay sangayche.. mastach. Tyavar BUNGAT vagaire Puneri shabdanchi phodni. Masta maja ali. Dhanyavad.

हेरंब said...

लय म्हणजे लय भारी !! आमच्याही जीवाची मुंबई झाली लेख वाचून :)

Prasad Kulkarni said...

फ़ारच छान लिहीले आहे :-) अगदी वाचतांना मी पण तुमच्या सोबात होतो असे वाटतेय.

मंदार जोशी said...

सुंदर लिहीलं आहेस. 'उतारपतीत' ही उपमा आवडली. :)
फ्लॅशबॅक तंत्राचाही सुंदर वापर केला आहेस.

विशाल विजय कुलकर्णी said...

भन्नाट रे चिमणा ;) जबराच आहे.

Aniket said...

Mast re mitra, lay bhari livla aahes, jam aawadla lekh

Anonymous said...

सालं पुण्याला जायला पाहिजे एकदा सायकल वरून...
एखादी सायकल कम फोटो टूर काढायची का हो ब्लॉगरलोग?

DR. KARANJEKAR AYURVED said...

pharach chaan lekh. jivachi mumbai zali.

स्मिता पटवर्धन said...

mast , tumachi tyaa velachi jivaachi mumbai sahi sahi dolyasamor aali kuthal hi flash back tantra n vaprta

Mugdha said...

काबाडकष्ट करून सकाळचे कार्यक्रम उरकले नि बिड्या फुकायला बाहेर पडलो....
hahahahha...faaaaaar bhari :)

संकेत आपटे said...

भन्नाट लेख. लय आवड्या. :-)

Anonymous said...

khupch sundar,mast lihilay