कोडग्यांची शाळा
'तुमच्या वेळेला कंप्युटर होता?'.. नव्या युगातल्या एका सळसळत्या रक्ताच्या अजाण कोडग्याने (प्रोग्रॅमरने) आश्चर्याने मला हा प्रश्न चॅट करताना विचारल्यावर हे नेट दुभंगून त्याला पोटात घेईल तर बरं असं वाटलं. हा शेंबड्या किती बोलतो? माझ्या लग्नाला जितकी वर्ष झालीयेत तेव्हढं याचं वय पण नाही. आणि हा त्या कालातल्या पुण्याच्या आयटीतल्या स्थानाबद्दल हे उद्गार काढतो? क्षणभर, गुहेतून बाहेर पडून वल्कलं संभाळत लकडी पुलापाशी शिकारीला जाण्याची दृश्यं तरळून गेली. पण क्षणभरच, मग विचार केला.. हल्लीचे लोक एखादी माहिती गुगलून नाही मिळाली तर ती अस्तित्वातच नव्हती असं सर्रास समजतात. नशीबानं, या बालकानं त्याचं अज्ञान माझ्यासमोर उघड केलं. अजून माझ्यासारखे, पुण्यातल्या आयटी रेव्होल्युशनचा पाया रचणारे, जुन्या पीढीतले कोडगे जिवंत आहेत. त्या काळी सुवर्णाक्षरांनी लिहीलेला आणि आत्ताच काळाच्या पडद्याआड चाललेला तो इतिहास आम्ही पुनरुज्जीवित करू शकतो. नाही केला तर पुढे याचं पण अयोध्या प्रकरण होऊ शकेल. तस्मात्, हा लेख तमाम कोडग्यांच्या डोक्यातली अज्ञानाची जळमटं व्हॅक्यूमने खेचून तिथे योग्य इतिहासाची लागवड करण्यासाठ...