सरकार राज
सरकारी कार्यालयाचे अनंत झटके खाल्ल्यामुळे कार्यालय या शब्दाची कार्य + आलय अशी फोड कुणा गाढवानं केली हा प्रश्न मक्या मला नेहमी विचारतो. त्याच्या मते त्याची फोड खरी 'कार्य जिथे लयास जाते ते ठिकाण' अशी सार्थ व्हायला हवी होती.. शाळांमधलं शिक्षण कालबाह्य आहे ते असं! मक्याचं आणि सरकारी कार्यालयांचं काहीतरी वाकडं आहे हे मात्र नक्की! त्यानं सरकारी कार्यालयाच्या जितक्या वार्या केल्या तितक्या पंढरीच्या केल्या असत्या तर प्रत्यक्ष विठोबा 'कर कटेवरी' अवस्थेत त्याच्या घरात येऊन खाटेवर उभा राहीला असता. संत महात्म्यांना कधी सरकारचा बडगा बघायला मिळाला नसावा नाही तर त्यांनी 'जन्म मरणाचे फेरे परवडले पण सरकारी हापिसाचे नको!' असा टाहो फोडला असता. लग्नानंतरचे झटके खायच्या आधी मक्याला आणि त्याच्या होणार्या बायकोला (मायाला) रजिस्टर्ड लग्न करण्याचा झटका आला. वास्तविक, त्यांचं लग्न हे दोन्हीकडचं पहीलं आणि शेवटचं होतं तरीही ते दोघे 'काहीतरी नवेच करा' या मानसिकतेचे बळी असल्यामुळे त्यांच्या हट्टापायी कुणाचंच काहीही चाललं नाही! मग काय? मी आणि मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसात लग्ना...