शाही शुभमंगल!
एक वेळ विद्युतमंडळ झटका कधी देईल ते सांगता येतं पण राजेरजवाड्यांना केव्हा काय करायचा झटका येईल ते नाही. आता हेच पहा ना, त्या वेस्टमिन्स्टर अॅबीत केटचं आणि विल्यमचं साग्रसंगीत लग्न झालं.. सॉरी विवाह झाला, पुलंच्या म्हणण्याप्रमाणे आलतू फालतू लोकात लग्न होतात, उच्चभ्रूंमधे विवाह होतात. ते बघायला कोट्यवधी लोक नटुन थटुन टिव्ही समोर बसले होते म्हणे! आता एकदा तो विवाह झाल्यावर परत भारतीय पद्धतीने कशाला करायला पाहीजे? पण राणीच्या उतारी वर हुकूम कोण टाकणार? तिच्या अवती भोवती फिरकायची खुद्द प्रिन्स फिलिपची पण छाती नाही!   प्रिन्स फिलिप कोण म्हणून विचारताय? इंग्लंडात असं विचारणं हे पंढरपुरात विठोबा कोण विचारण्यासारखं आहे. हा प्रिन्स फिलिप म्हणजे ड्युक ऑफ एडिंबरा म्हणजे राणीचा सख्खा नवरा! पण मग तो प्रिन्स कसा? किंग का नाही? कारण, इंग्रंजांची संबोधनं कुणाच्याही आकलन शक्तीच्या कमाल मर्यादे बाहेरची असतात!    अत्यंत व्यग्र दिनचर्येमुळे आणि सततच्या प्रलोभनांमुळे लग्नासारखी क्षुल्लक गोष्ट राजेरजवाडे सहज विसरू शकतात या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. मग विल्यम किंवा केट भलतं सलतं काही तरी करून बसले तर राणील...