एक वेळ विद्युतमंडळ झटका कधी देईल ते सांगता येतं पण राजेरजवाड्यांना केव्हा काय करायचा झटका येईल ते नाही. आता हेच पहा ना, त्या वेस्टमिन्स्टर अॅबीत केटचं आणि विल्यमचं साग्रसंगीत लग्न झालं.. सॉरी विवाह झाला, पुलंच्या म्हणण्याप्रमाणे आलतू फालतू लोकात लग्न होतात, उच्चभ्रूंमधे विवाह होतात. ते बघायला कोट्यवधी लोक नटुन थटुन टिव्ही समोर बसले होते म्हणे! आता एकदा तो विवाह झाल्यावर परत भारतीय पद्धतीने कशाला करायला पाहीजे? पण राणीच्या उतारी वर हुकूम कोण टाकणार? तिच्या अवती भोवती फिरकायची खुद्द प्रिन्स फिलिपची पण छाती नाही!
प्रिन्स फिलिप कोण म्हणून विचारताय? इंग्लंडात असं विचारणं हे पंढरपुरात विठोबा कोण विचारण्यासारखं आहे. हा प्रिन्स फिलिप म्हणजे ड्युक ऑफ एडिंबरा म्हणजे राणीचा सख्खा नवरा! पण मग तो प्रिन्स कसा? किंग का नाही? कारण, इंग्रंजांची संबोधनं कुणाच्याही आकलन शक्तीच्या कमाल मर्यादे बाहेरची असतात!
अत्यंत व्यग्र दिनचर्येमुळे आणि सततच्या प्रलोभनांमुळे लग्नासारखी क्षुल्लक गोष्ट राजेरजवाडे सहज विसरू शकतात या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. मग विल्यम किंवा केट भलतं सलतं काही तरी करून बसले तर राणीला तोंड दाखवायला एकतरी दरबार शिल्लक राहील का? म्हणून दोन वेळा लग्न केल्यास त्यांच्या मनात एकमेकांबद्दलच्या प्रेम भावनेचं ठिबक सिंचन होईल व बाँडिंग वाढीस लागेल अशी शक्यता राणीला वाटली असावी.
तसंही हल्ली इकडे भारतीय पद्धतीनं लग्न करायचं फॅडच व्हायला लागलंय म्हणा! भारतीय पद्धतीने लग्न केलं तर म्हणे लग्न जन्मोजन्मी टिकतं. डोंबल त्यांचं! जमाना बदललाय हल्ली! हल्ली 'दर वर्षी वेगळा पती दे' असं वडाला साकडं घालणार्यांचं प्रमाण वाढलंय! पण डायानाचं ते तसं झाल्यापासून राणी शँपेन सुद्धा फुंकून पिते असं आमचे भिंतीचे कान सांगतात.
आधी अरुण नायर आणि लिझ हर्ली यांनी भारतीय पद्धतीने लग्न केलं (त्यांच आता मोडलंय म्हणा).. नंतर केटी पेरी आणि रसेल ब्रँडने री ओढली.. नाही! नाही! मोडण्याची नाही! लग्नाची म्हणतोय मी! जे जे काही तथाकथित वलयांकित लोकं करतात ते ते आपण नाही केलं तर आपलं वलय लयास जाईल अशी सार्थ भीती राणीला पडली असणार, दुसरं काय?
तर या अभूतपूर्व विवाह सोहळ्याचा हा बैठा वृत्तांत आहे!
भारतीय लग्नपद्धती बद्दल इंग्लंडात अंधार असल्यामुळे लग्नाच्या प्रोजेक्टचं मॅनेजमेंट आऊटसोर्स करायचं ठरलं. तसं भारताबद्दल प्रचंड अज्ञान आहे म्हणा! भारतात प्रचंड गरिबी आहे हे त्यातलंच एक! कारण भारतातली गरिबी दिसते, इकडची दिसत नाही!.. इकडचे गरीब करदात्यांनी दिलेल्या घरात, करदात्यांनीच दिलेल्या भत्त्यावर नोकरी न करता आनंदाने रहातात.. इतकाच काय तो फरक!
प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून नारायण पेक्षा कोण योग्य माणूस सापडणार? पण आऊटसोर्सिंग मुळे केंटरबरीचे आर्चबिशप आणि इतर मान्यवर पाद्र्यांनी संप केला.. त्यांना अनुल्लेखाने मारण्यात आलं. 'दर्जाचा विचारही न करता सर्व काही भारतीय लोकांकडून स्वस्तात करून घ्यायची प्रथा बोकाळत चालली आहे. या निमित्ताने भारतीय लग्नपद्धती शिकण्याची आमची एक अमूल्य संधी हिरावली गेली आहे आणि ही बाब अत्यंत चिंताजनक आणि शरमेची आहे.'.. असे खेदजनक सूर त्यांनी काढले.
हे लग्न मुंबईत करायचा घाट घातल्यावर वसंतसेनेपासून शिवसेने पर्यंत सर्वांच्या हातात कोलीत मिळालं. बिहार्यांचा प्रश्न ऐरणीवर नसल्यापासून त्यांनाही बरेच दिवसात जाळपोळ करायला काही स्फोटक मिळालेलं नव्हतं. त्यांचं लग्न इथे लावण्यातून आपली गुलामी वृत्ती अजूनही कशी दिसून येते आहे हा त्यांचा मुख्य मुद्दा होता. पण अर्थमंत्र्यांना त्यातून मेडिकल टूरिझम सारखी मॅरेज टूरिझम ही इंडस्ट्री खुणावत होती. त्यावर सेनेने त्यांची नेहमीची 'खणकर' भूमिका घेऊन सहार विमानतळाची धावपट्टी खणायची धमकी दिली. शेवटी राणीनेच माघार घेतली आणि लग्न बकिंगहॅम पॅलेस मधेच करायचं ठरवलं. साहजिकच, अर्थमंत्र्यांच्या संधीची चिंधी झाली.
मग प्रश्न आला पुरोहित निवडीचा! तशी जाहिरात झळकल्यावर विहिंपने 'प्राण गेला तरी गोमांस खाणार्या पापी लोकांचं कुणी पौरोहित्य करणार नाही' अशी भूमिका घेतल्यामुळे बर्याच गुरुजींची इच्छा असून केवळ समाज काय म्हणेल या भीती पोटी माघार घ्यावी लागली. भटजी मिळण्याची मारामार झाल्यामुळे नारायणाने त्याच्याच एका मित्राला, सतीशला, ते काम दिले. घरी नियमित होणारी त्याची पूजा वगळता त्याचा पूजेशी असा संबंध आलेला नव्हता. मग त्याला भारतात काही दिवसाच्या क्रॅश कोर्सला पाठवलं. गेल्या गेल्या कार क्रॅश करून त्यानं सुरुवात केली.. उरलेला वेळ हॉस्पिटलमधे पाय वर करून रामरक्षेसारखे थोडे फार संस्कृत श्लोक पाठ करण्यात घालवल्यावर लगेचच तो एक्स्पर्ट भटजी म्हणून दाखल झाला. आयटीत नेहमी असंच चालत असल्यामुळे कुणालाच त्यात वावगं वाटलं नाही. पण आपली हुशारी दाखवली नाही तर तो नारायण कसला? त्यानं एका भटजीला आपला सल्लागार नेमून विहिंपच्या फतव्यातून व्यवस्थित पळवाट काढली.
यथावकाश पत्रिका जमते आहे की नाही ते पहायचा दिवस ठरला, त्याबद्दल सतीशला माहिती नव्हतं. जेव्हा समजलं तेव्हा तो बायको बरोबर शॉपिंग करत होता. अशा संभाषण दर्या नेहमीच्याच असल्याने त्यालाही काही आश्चर्य वाटलं नाही. मग तसाच घाईघाईत बायकोला घेऊन राजवाड्यावर दाखल झाला. सल्लागार परस्पर आला. टाईट जीनची प्यांट आणि स्लिव्हलेस टॉप घालून बायको आली होती. तिच्या वजनापेक्षा अंगावर घातलेले पौंड जास्त होते. वास्तविक, खांदे उघडे टाकून किंवा डोक्यावर हॅट न घालता राणी समोर जायचं नसतं! आणि गुडघे थोडे वाकवून आणि झगा हातांनी किंचितसा उचलून राणीला अभिवादन करायचं असतं. तिनं काय पकडलं आणि काय उचललं तिचं तिला माहिती! राणीला हसू आवरलं नाही पण शाही शिष्टाचार अंगी भिनलेले असल्याने तिने ते हसू मंद स्मितामधे बदलले.
मागे मिशेल ओबामा सुद्धा उघड्या खांद्यांनी राणीला भेटली होती. त्यावर कुणीतरी भोचक प्रश्न विचारलाच 'How could she meet the queen with bare arms?' त्यावर त्याला असं मार्मिक उत्तर मिळालं 'Because, americans are allowed to bear arms'. थोडक्यात काय, तर लोकांनी असा रीतिरिवाजांचा आणि परंपरांचा केलेला खुर्दा राणीला, बिचारीला, चालवून घ्यावा लागतो! कारण शेवटी एका खालसा राज्याची ती नाममात्र राणी! बाकी इंग्रजांवर, त्यांनी फक्त भारतातच तनखा बहाद्दर राजे केले, असा पक्षपाती आरोप करता येणार नाही म्हणा!
पत्रिका जमवायला बसले खरे पण दोघांच्या पत्रिकेचाच पत्ता नव्हता. पत्रिका करायची म्हणजे पंचांग हवे. नक्की कशासाठी आपण घाईघाईत निघालो आहोत ते न समजल्यामुळे सल्लागार काहीच न घेता आला होता. 'हे पंचांग'.. नारायणाने काखोटीला मारलेल्या लॅपटॉप वर एक पंचांग काढून दिले. हल्लीच्या जगात गुगलगाय झाल्याशिवाय पंचांग पण हाताला लागत नाही. त्यामुळेच, 'प्राचीन संस्कारांचा आणि अर्वाचीन तंत्रज्ञानाचा वैभवशाही मिलाफ' अशा शब्दात वर्तमानपत्रांनी या विवाहाचा उदोउदो केला.
पत्रिका करता करता मुलाचा राक्षसगण निघाल्यामुळे बाका प्रसंग उभा राहीला. इतक्या मोठ्या राज्याच्या राजपुत्राचा राक्षसगण? राजघराण्याला देवासमान मानणार्या जनतेला काय वाटेल? आणि ते सांगायचं कसं? त्यात मुलीचा मनुष्यगण निघाल्याने गणाचे गुण जुळेनात. शेवटी न डगमगता नारायणाने बेधडकपणे ३६ गुण जुळल्याचं सांगितलं. खरं तर हाडवैरासाठी राखीव असलेला हा आकडा नेमका पत्रिका पूर्ण जुळलेली आहे हे दाखवायला कसा काय वापरतात कोण जाणे! सल्लागाराने ११ जुलैच्या सोमवारी सकाळी १०:२३चा मुहूर्त काढून अजून एका राष्ट्रीय सुट्टीची सोय केली.
आधी एकदा लग्न झालेलं असल्यामुळे साखरपुडा बायपास झाला. लग्न झालेल्यांच परत लग्न लावताना काही वेगळे मंत्र/विधी असतात की नसतात यावर काही भटजींमधे एका ऑनलाईन फोरमवर घणाघाती चर्चा चालू होती.. विशेषत: सोडलग्न करायची गरज आहे का यावर! त्याची परिणती नेहमी प्रमाणे एकमेकांची उणीदुणी काढण्यात आणि एकमेकांना शेलक्या शिव्या देण्यात झाल्यामुळे नारायणाने नेहमीचेच विधी करायचं ठरवलं.
मुलीकडची लग्नाची पत्रिका अशी ठरली -
||सद्गुरू श्री पोप प्रसन्न आणि श्री श्री आनंदमयी मेरी माँ प्रसन्न||
आमचे येथे जीझस कृपेकरून आमची जेष्ठ कन्या चि. सौ. कां. कॅथरिन हिचा विवाह राजपुत्र विल्यम (हिज हायनेस प्रिन्स ऑफ वेल्स श्री. चार्लस विंडसर आणि कै. प्रिन्सेस डायाना यांचे जेष्ठ चिरंजीव) याच्याशी दिनांक ११ जुलै, २०११ सकाळी १०:२३ वाजता बकिंगहॅम पॅलेस येथे करणेचे योजिले आहे. कार्य सिद्धिस नेणेस जीझस समर्थ आहेच. तरी आपण विवाहास अगत्य येणेचे करावे.
प्रीतिभोजन दुपारी १ ते ३.
कृपया विल्यम आणि केटच्या लग्नाच्या भेटवस्तू या संकेत स्थळावर लिहीलेल्या भेटवस्तूपैकीच गोष्टी भेट म्हणून द्याव्यात.
-- खालती मिडलटन फॅमिलीतल्या बर्याच जणांच्या नावांबरोबर 'आमच्या केटी ताईच्या लग्नाला यायचं हं!'.. असे एका शेंबड्या बंटीबाबा मिडलटनाचे चिमखडे बोल पण होते.
पत्रिका छापून आल्यावर नीट वाचून बघायला बजावायचं नारायण विसरला नाही.
भेटवस्तूंच्या यादीत मिक्सर मायक्रोवेव्ह असल्या गृहोपयोगी वस्तू पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात होते. 'राजपुत्र झाला म्हणून काय झालं? शेवटी केटला स्वयंपाकीणच बनवणार का?' या भाषेत काही स्त्री मुक्तांचा संताप मुक्त झाला. शिवाय, राजघराण्यातल्या लोकांना असल्या वस्तूंची गरज कधी पासून पडायला लागली? असा पण सूर होता. त्यांच्याकडच्या गृहोपयोगी वस्तू जगावेगळ्या असतात व त्यांना शेफ किंवा बटलर अशी काहीशी नावं असतात. त्यांच्यात बागेतलं तण कुणी काढायचं यावर तणतण होऊन ताणतणाव निर्माण होत नाहीत. त्यासाठी माळी नावाचं उपकरण असतं!
सावकाश गाडी केटच्या पोशाखाकडे वळाली.
'एलिझाबेथ इमॅन्युएलला सांगू या कपडे डिझाईन करायला'.. एका पोक्त पण मनाने तरुण असलेल्या बाईंनी आपले विचार मांडले.
'तिला नको. माझं ऐका, त्या पेक्षा अॅलेक्झांडर मॅक्वीनला सांगू. आता तो जिवंत नाही पण त्याच्याकडची डिझायनर भारी आहे एकदम!'.. नारायणाचं ठाम मत.
'पण डायानाचे तिच्याचकडे केले होते म्हणे!'
'हो! ते ८१ साली! तेव्हा तिचं आणि डेव्हिडचं लग्न नव्या कापडासारखं घट्ट होतं. ९० साली ते विरल्यावर तिचा डेव्हिडशी आणि कलेशी एकदमच घटस्फोट झाला'.. हे ऐकल्यावर लहान थोर समस्त स्त्री वर्गात नारायणाबद्दल अपार आदर निर्माण झाला.. वास्तविक असलं ज्ञान नारायणाला त्याच्याच सौ कडून बर्याच पैशांच्या मोबदल्यात वेळोवेळी मिळालेलं होतं.
'बघ बाबा! राणीची अशी काहीशी इच्छा होती म्हणे!'
'तिला काय समजतंय म्हातारीला? आणि त्याला केटचे कपडे सुटसुटीत बनवायला सांगा! मागच्या लग्नासारखा १०० फुटी लांब झगा नकोय म्हणावं! लग्नात होम वगैरे असणार आहे, त्यात जाऊन पेटला तर भर लग्नात सती जायची वेळ यायची!'.. भलभलत्या रिस्कांचा विचार प्रोजेक्ट मॅनेजर नाही करणार तर कोण?
बकिंगहॅमच्या हिरवळीवर भरजरी कापडं लावून शाही शामियाना उभारला. आत मधे मोठ मोठाली झुंबरं टांगलेली होती. सबंध पाऊल रुतेल असला गुबगुबीत गालिचा पसरलेला आणि मुख्य प्रवेशद्वारापासून स्टेज पर्यंत रेड कार्पेट अंथरलेलं, सर्वत्र उंची अत्तर फवारलेलं, एकीकडे चंदनाचं स्टेज, मांडी घालण्याची सवय नसल्यानं स्टेजवर एका हस्तिदंती टेबलावर होमाची सोय, भोवती बसण्यासाठी रत्नजडित आसनं असा सगळा थाट! जिकडे पहावं तिकडे निव्वळ वैभव टांगलेलं, पसरलेलं, ल्यायलेलं, फवारलेलं किंवा लपेटलेलं होतं. अस्वलाला केसांचा आणि मोराला मोरपिसांचा काय तोटा? तसंच!
पण आफ्रिकेतला दुष्काळ लक्षात घेऊन नारायणाने अक्षतांसाठी तांदूळा ऐवजी सोन्याचा वर्ख लावलेल्या थर्मोकोलच्या खास अक्षता बनवायला सांगितल्या व अक्षतांसाठी लागणारा तांदूळ आफ्रिकेत वाटपासाठी पाठवला. त्यातून मूठभर लोकांना मूठभर भात मिळाला. आपल्या आनंदामधे गरिबांसाठी दयेचा एक कोपरा ठेवणार्या राजघराण्याच्या औदार्याचं तोंड फाटे पर्यंत कौतुक झालं. कृतज्ञते दाखल राणीने नंतर नारायणाला 'सर'की बहाल केली.
काही लोकांमधे लग्नात गोंधळ घालायला गोंधळी बोलावण्याची प्रथा आहे. त्यांना लग्नातला अंगभूत गोंधळ कमी वाटतो की काय कुणास ठाऊक! म्हणजे कोकणस्थांनी बोलावलं तर ठीक आहे एक वेळ, पण देशस्थांनी सुद्धा? मात्र सिक्युरिटीचा गोंधळ होईल म्हणून शाही गोंधळ रद्द करण्यात आला.
हा विवाह सोहळा टीव्हीवर जिवंत दाखवणार असल्याचं ऐकल्यावर सल्लागार भटजी घाबरला.. विहिंपच्या कार्यकर्त्यांनी टीव्ही पाहिला तर त्याला सहकुटुंब जिवंत ठेवणार नाहीत म्हणून तो घरीच थांबला. घरून व्हॉईस चॅट वापरून तो सगळे मंत्र म्हणणार होता. राज घराण्यातल्या लोकांसमोर सोवळं नेसून कसं जायचं (शिवाय इंग्लंडातली थंडी) म्हणून सतीश सुटाबुटात आला होता. विधी चालू असताना त्याचा टाय मधे मधे होमाकडे झेपावत होता. मग केटने दिलेल्या केसातल्या आकड्याने त्याने तो शर्टाला अडकवला.
प्रिन्स चार्लस स्कॉटलंडचा ट्रॅडिशनल ड्रेस म्हणजे लाल काळ्या चौकटीचा स्कर्ट आणि वर एक जॅकेट घालून आला होता. शामियान्यापायी हिरवळीवरच्या काही किड्यांची घरंदारं उध्वस्त झाल्या कारणाने त्यांनी प्रिन्सशी अंमळ जास्तच सलगी दाखवली. त्यामुळे प्रिन्स मधेच राजवाड्यात जाऊन सुटाबुटात आला.
सावत्र मुलाचं लग्न म्हणून कॅमिला चांगलीच नटून थटून आली होती. ओठांना लिपस्टिक, खुरांना नेल पॉलिश व गालाला रूज चोपडून डोक्यावर फॅन्सी हॅट ठेवल्यावर एखादी गाय जशी दिसेल तशी ती दिसत होती.
राणी आणि प्रिन्स फिलिप त्यांच्या नेहमीच्या उंची पोशाखात होते.
प्रिन्सेस बिअॅट्रिसने हॅट घातली आहे की डिश अँटेना लावली आहे यावर मतभेद होते. इतर स्त्रिया ऑक्टोपस, जेली फिश, शिंपला, किंवा घरटं इत्यादी गोष्टीं सारख्या दिसणार्या वैशिष्ट्यपूर्ण हॅटा घालून आल्या होत्या.
विवाहविधी पहाटे पासूनच सुरू झालेले होते. पाहुणे मंडळी हळूहळू उगवत होती. लवकरच उपस्थितांच्या लक्षात आलं की भारतीय लग्नात वधू वर आणि त्यांचे आईबाप एका कोपर्यात काहीतरी विधीत सतत गुंतलेले असतात. ते लक्षपूर्वक पहाणे हे पाहुण्यांवर बंधनकारक नसते. त्यामुळे त्यांनी खुर्च्या हव्या तशा फिरवून आपापली गटबाजी प्रस्थापित करून गप्पा हाणायला सुरुवात केली.
त्यातलं हे निवडक शाही गॉसिप!
'या विल्यमच्या भोवती हजार जणी फिरतात म्हणे! सांगत नाही पण तो कधी कुणाला!'
'तशा वडाच्या झाडाभोवती पण लाख जणी फिरतात. झाड सांगतं काय कधी?'
'दोघे एकाच कॉलेजात शिकत होते म्हणे!'
'हो नाहीतर काय! एकत्रच रहात होते की आणि!'
'त्यानं म्हणे केटला एका फ्याशन शो मधे झिरझिरीत कपड्यात पाहीलं आणि पाघळला! आम्हाला काय घालता येत नाहीत का तसले कपडे?'
'बिच्चारी डायाना! आज कित्ती आनंदात असली असती!'
'चार्लसनेच मारलीन म्हणतात तिला! काय पाहीलंन त्या कॅमिलात कोण जाणे!'
'विल्यमनं तसं काय नाय केलंन म्हणजे मिळवली!'
'डायानाने पोरांना अगदी मध्यमवर्गीय वळण लावलंन हो! मॅक्डोनल्डस मधे घेऊन जायची ती त्यांना!'
'मॅक्डोनल्डस? हे काय असतं?'
'डायाना पण काय अगदी सोज्वळ वगैरे नव्हती हां! ती पण फिरली नंतर बर्याच जणांबरोबर!'
'काय भिकेचे डोहाळे लागलेत विल्यमला! तोलामोलाच्या मुलीशी तरी लग्न करायचं!'
'बाप तसा मुलगा!'
'हा विल्यम त्या एअरफोर्सच्या किरकोळ पगारात कसा काय रहात असेल? ड्रायक्लिनिंगचा तरी खर्च निघत असेल का त्यातून?'
मुहूर्ताची वेळ जवळ आली तशी नारायणाने माईक उचलून सूचनांचा भडिमार केला.. 'हे पहा, मंगलाष्टकं म्हणणार्यांनी आधीच स्टेजवर या, नाहीतर मुहूर्ताची वेळ आली, तरी मंगलाष्टकं सुरूच राहतात. लग्न लागल्यावर वधू-वरांना कपडे बदलण्यासाठी अर्धा तास तरी लागेल, तेव्हा आधीच त्यांना भेटण्यासाठी रांगा लावू नयेत. जेवणाची तयारी असली, तर तोपर्यंत जेवून घ्यायला हरकत नाही. तिसरी महत्त्वाची सूचना अशी आहे की, आजकाल लग्न लागल्यावर वधू-वरांना उचलून घेण्याची एक नवीच प्रथा पडत चालली आहे. मागे एका लग्नात वजन न पेलल्याने वधू पडली. त्यातून अनर्थ होण्याची भीती असते. तेव्हा असा प्रकार कुणी करू नये. सर्वांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्याने मुद्दामहून या सूचना करतो आहे.'
सतीशने आणि नारायणाने अंतरपाट धरला. सल्लागार भटजीने व्हॉईस चॅटवरून मंगलाष्टकं सुरू केली. अधून मधून नेट कनेक्शन बोंबलत होतं त्यामुळे नारायणाने सतीशला मंगलाष्टकं म्हणायला सांगितल्यावर त्याची ततपप झाली.
'अरे शार्दुलविक्रीडित वृत्तातलं काहीही म्हण.'.. नारायणाने आपलं ज्ञान पाजळलं. एसेसीत ऑप्शनला टाकलेलं ते वृत्त अचानक असं खिंडीत पकडेल याची सतीशला मुळीच कल्पना नव्हती. मग नारायणाने त्याला मंगलाष्टकांच्या चालीवर 'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक' म्हणून दाखवलं आणि त्याच पद्धतीने श्लोक म्हणायची सूचना केली. सल्लागाराची मंगलाष्टकं शॉर्ट वेव्ह रेडियो स्टेशनसारखी वर खाली होत होती त्यामुळे प्रेक्षकांना दोन दोन मंगलाष्टकांचा आनंद मिळाला.
गंगा सिंधु सरस्वती ..... विजयते रामं रमेशंभजे!
रामेणाभिहता निशाचरचमू ..... गोदावरी नर्मदा!
मग मात्र नारायणाने मोबाईल काढून (एका हाताने अंतरपाट धरलेला होताच) सल्लागाराला फोन लावला.
'अरे कुठलं भिकार ब्रॉडबँड घेऊन ठेवलं आहेस रे? त्यापेक्षा डायल-अप वापरून ये बरं!'
'ब्रॉडबँड'कुठलं? माझ्याकडे साधं रबरबँड पण नाहीये. मी डायल-अपच वापरतोय'.. ही जोक मारायची वेळ होती का?
शेवटी बाकीची मंगलाष्टकं फोनवर म्हंटली, तसं आधीच का नाही केलं कोण जाणे! सगळ्या गोष्टी उगीचच कटिंग एज टेक्नॉलॉजीने करण्याचा अट्टाहास म्हणजे शेजारी बसलेल्याशी बोलायला फेसबुक वापरण्यातला प्रकार! यथावकाश 'तदेव लग्नं... शुभमंगल सावधान' वगैरे झाल्यावर तुतार्या, सनई चौघडा असल्या बर्याच वाद्यांनी कल्ला केला. एव्हांना सर्व पाहुण्यांना अक्षतांचा खरा उपयोग समजला होता. त्यांच्यातल्या त्यांच्यात विविध आकाराच्या हॅटांमधे अक्षता फेकून गोल मारायची साईड स्पर्धा लग्न होऊन गेल्यानंतरही चालू होती.
सप्तपदी चालू असताना काही अल्लड तरुणींनी विल्यमच्या चपला पळवल्या. अशा वेळेला काय करायचं असतं ते माहिती नसल्यामुळे विल्यमने त्याच्या सेक्रेटरीला सांगून दुसरा जोड मागवला. मग नारायणाने त्यातली गंमत सांगितल्यावर विल्यमने प्रत्येक तरुणीला हाईड पार्कमधे फिरवून आणण्याचे वचन दिले.. अर्थातच, केटच्या डोक्यातून येणार्या धुराकडे दुर्लक्ष करून.. आणि एक छदामही न देता चपला परत मिळवल्या.
केटने वेगवेगळ्या प्रसंगी घेतलेले उखाणे
बकिंगहॅमच्या कोनाड्यात उभी मेरी माता
विल्याचं नाव घेते माझा नंबर पयला
लाडू करंज्यांनी भरला आहे रुखवत
विल्यमरावांनी घेतला किस सर्वांच्या देखत
बकिंगहॅम पॅलेसची सिक्युरिटी झेड
विल्यमरावांना लागलंय विमानांचं वेड!
शेवटी बकिंगहॅम पॅलेसात उंबरठ्यावरचं माप लाथाडून केट जाणार होती. पण इकडे उंबरठ्यांची फ्याशन नाहीये हे नारायणाने आधीच ओळखून चंदनाचा एक खास उंबरठा तयार करून घेतला होता. परत एकदा संभाषणाच्या खाईमुळे केटला माप पायाने लवंडायचे माहीत नव्हते. त्यात उंबरठ्याची सवय नसल्यामुळे केट उंबरठ्याला अडखळून पडली.. उंबरठा आणि मापासकट डाईव्ह मारून केटचा गृहप्रवेश झाला.. आणि ते आनंदाने नांदू लागले!
-- समाप्त --
6 comments:
Hawaaaadd aahe ekdum
Mastach...
बकिंगहॅम पॅलेसची सिक्युरिटी झेड
विल्यमरावांना लागलंय विमानांचं वेड!
EK NUMBER!! I am followoing you from very long time now, each and every post from you has been read by me, but this POST WAS AWESOME
specially the UKHANA.
Please continue -Amol
bhannat post aahe!!!! ukhane mastach hote!!! ekdum zakkkaasss!!! facebook var share karaychi permission denar ka plzz!! :)
ekdum zakkass post!! ukhane mastt aahet!!
स्रर्वांना धन्यवाद!
@अनुपमा, जरूर शेअर कर फेसबुकवर! मला आनंदच आहे त्याबद्दल!
Post a Comment