Tuesday, October 11, 2011

वाळवी

'बॅकप हुकला नि कंप्युटर रुसला'.. म्हणजेच, जेव्हा बॅकप घेतलेला नसतो तेव्हाच नेमकी त्याची गरज भासते अशी 'जंगलातली एक म्हण' या धर्तीची 'आयटीतली एक म्हण' आहे! हा अनुभव घेतल्याशिवाय कोणताही कोडगा प्रथितयश कोडगा म्हणवला जातं नाही. बॅकपचं यंत्र बिघडण्यापासून एक दिवस बॅकप नाही घेतला तर काय होणार आहे? असल्या अनाठायी आत्मविश्वासापर्यंत बॅकप न घेण्याची अनंत कारणं असू असतात! पण महत्वाचा डेटा असलेल्या कंप्युटरने डोळे फिरवायचं कारण मात्र शेअरबाजार कोसळण्याइतकच अनाकलनीय असतं.

'बॅकप मधेच नाही तर रिस्टोअर कुठून होणार?'.. म्हणजेच, बॅकप वरचा डेटा परत जसाच्या तसा रिस्टोअर झाल्याशिवाय बॅकप नीट झाला आहे असं मानू नये.. 'आयटीतली अजून एक म्हण'! हे 'माणूस मेल्याशिवाय विषाची परीक्षा होत नाही' असं म्हंटल्यासारखं वाटेल कदाचित! पण ते तितकंच सत्य आहे. याचा अनुभव ज्या कोडग्याने घेतला असेल तो खरा 'सर्टिफाईड कोडगा'! या म्हणीच्या पुष्ट्यर्थ एक उदाहरणच द्यायला पाहीजे -- पूर्वी एकदा एका बँकेच्या शाखेचा डेटाबेस कोलमडला. ते त्यांना खूप उशीरा समजलं. तोपर्यंत चुकीच्या डेटाबेसचाच बॅकप जुन्या बॅकप टेपांवरती घेऊन घेऊन सर्व बॅकपची वाट लागलेली होती. त्या आधी बँकेने संगणकीकरण यशस्वी झाल्याचं जाहीर करून लेजर लिहीणं बंद केलेलं होतं. अशा भग्नावस्थेतून खातेदारांचा डेटा परत आणायचा म्हणजे भस्मातून उदबत्ती उभी करण्यातला प्रकार!

पण, डेटाचा पूर्ण राडा झालेला होता तरीही ती शाखा मात्र चालू होती. खातेदार रोज येऊन जाऊन त्यांची काम निर्वेधपणे करत होते. हो, बँकेकडे काहीच मार्ग नव्हता कुणाच्या अकाउंटला किती पैसे आहेत ते बघायचा तरीही! जेव्हा बँकेच्या लोकांना ते कशी काय बँक चालवत आहेत ते विचारलं, तेव्हा त्यांचं उत्तर असं होतं.. 'त्याचं काय आहे! कुणी पैसे काढायला आला की आम्ही त्यालाच दरडावून विचारतो.. काय? आहेत का पैसे खात्यात? तो पटकन हो म्हणाला तर देतो आम्ही त्याला पैसे.' ही गोष्ट ऐकल्यापासून बँकेतले लोक उगीचच माझ्यावर भुंकले की मला निष्कारण काळजी वाटते.

त्या शाखेच्या कर्मचार्‍यांसारखाच अगतिकपणाचा अनुभव एकदा मलाही आला. त्याची सुरुवात आमच्या कंपनीचं लग्न एका, अमेरिकन, इन्फर्मेशन सिक्युरिटीच्या क्षेत्रात काम करणार्‍या, कंपनीशी लागण्यापासून झाली. मधुचंद्राच्या काळात एक दिवस आमच्या बॉसने घोषणा केली -- 'पुढचे ३ दिवस त्या कंपनीचे लोक आपल्या सर्वांबरोबर चर्चा करणार आहेत. तेव्हा सगळ्यांनी जरा नीट सुटाबुटात या.'.. बॉसरूपी दैत्याने आज्ञावजा दवंडी पिटून मिटींगची सांगता केली. लग्न झाल्यापासून आमचा दैत्य एकेक अगम्य शब्द शिकून यायला लागला होता.. असल्या मिटींगला तो ऑल हॅन्डस् मिटींग म्हणायला लागला होता. त्यामुळे मला उगीचच 'साथी हाथ बढाना' या गाण्याची आठवण व्हायची.. इतक्या रडक्या चालीमुळे सर्व लोकांमधे हसत खेळत एकजुटीने काम करायची स्फूर्ती कशी काय निर्माण होऊ शकते ते एक त्या निर्मात्याला आणि संगीतकाराला ठावे! बाकी, 'ऑल हॅन्डस्' म्हंटलं तरी त्याचे एकट्याचेच जोरजोरात हातवारे चालायचे.. बाकीचे हॅन्डस् एकमेकांना खाणाखुणा करण्यात नाही तर 'शो' साठी नेलेल्या नोटबुकावर चित्र काढण्यात गुंतलेले असायचे. मिटिंग मधे बसून नोटबुकात काहीतरी खरडणे हे कीर्तन ऐकता ऐकता वाती वळण्याइतकंच सूचक आहे. या धर्तीवर कीर्तनाला 'ऑल हँड्स बॅबलिंग' का नाही म्हणत कुणास ठाऊक!

झालं! दुसरे दिवशी माझा लग्नातला सूट शोधायला बसलो. महत्प्रयासानंतर तो एकमेव जीर्ण सूट बोहारणीला द्यायच्या ढिगार्‍यात सापडला. पाहिल्या पाहिल्या मला एकदम दोन प्रश्न पडले.. या रंगाचा सूट होता आपला? आणि आपण कसे काय इतके बारीक होतो? थोडा फार कसर लागलेला असला तरी थोडी फार कसरत केल्यावर सुटाची कसर तो भरून काढू शकला असता. मधेच प्रश्न आला.. भर गच्च उन्हाळ्यात सूट घालून कसं जायचं? क्षणभर मी थबकलो. तरी नशीब! मी मुंबईत रहात नव्हतो, कारण मुंबईत सूट घालून जाणं म्हणजे रेनकोट घालून पोहण्याइतका विक्षिप्तपणाचा कळस!

तरी ही मी मला त्यात कसबसं कोंबलं.. आरशात पाहिलं, तर दोन गाद्या, भरपूर पांघरुणं आणि उश्या कोंबून, वरून करकचून पट्टा आवळलेला, होल्डॉल दिसला! तो अनसुटेबल सूट घातल्यावर मला मुळीच सुटसुटीत वाटत नव्हतं, पण नाईलाज होता.. त्याकाळी मी सायकलवर जायचो.. त्या दिवशी, आधीच होल्डॉल तशातही सायकलवरी बैसला, अशी केविलवाणी परिस्थिती झाली.. बघणार्‍या कुत्सित नजरांकडे मी दुर्लक्ष केलं तरी कफलिंक्सना तो अपमान सहन झाला नाही.. त्यांनी कुठल्या तरी खड्ड्याचं निमित्त साधून स्वतःची मानखंडना थांबवली. ते माझ्या उशीरा लक्षात आलं. कफल्लिंक अवस्थेत(अशा स्थितिला हा अगदी समर्पक शब्द आहे की नाही?) ऑफिसला जावं लागलं, पण त्यालाही नाईलाज होता. तसाच मिटींग रूम मधे दाखल झालो. पटकन कुणीच ओळखीचं दिसलं नाही.. नेहमी पांढर्‍या शुभ्र कपड्यांमधे दिसणारा, एखाद्या हॉटेलचा वेटर साध्या कपड्यात रस्त्यावर दिसला तर तो ओळखता येतो काय?

मिटींग रूम मधे बरेच होल्डॉल दिसल्यामुळे मला हायसं वाटलं. थोड्या वेळातच दैत्य आणि काही गोरे आले. ते आल्या आल्या सगळे खाडकन् अटेन्शन मधे उभे राहीले.. आता प्रत्येका समोरून मानवंदना स्वीकारत ते पुढे सरकणार अशी भीती मला वाटत असतानाच ते गोरे, चारचौघात, केसात सहज हात फिरविताना विग हातात आल्यासारखे, चांगलेच ओशाळलेले दिसले.. कारण.. ते सगळे जीन आणि टी-शर्ट मधे होते. मग त्यांना बरं वाटावं म्हणून दैत्यानं आपली कंठलंगोटी काढल्यावर सगळ्यांनीच आनंदाने आपापले गळफास काढले. त्या दिवशी दैत्याला शिव्या घालत घरी गेलो आणि दुसरे दिवशी नेहमीच्या कपड्यात मिटींगला आलो. गोरे आधीच येऊन बसले होते.. आम्ही आल्यावर ते खाडकन् अटेन्शन मधे उभे राहीले. त्या दिवशी आमचे विग हातात आले कारण ते सुटाबुटात आलेले होते.

पुढच्या काही महीन्यात मी त्या गोर्‍यांवर चांगलीच छाप पाडली की काय ते मला माहीत नाही. पण त्यांनी मला अमेरिकेला घेऊन जायचं कारस्थान रचलं, आणि लवकरच मी दैत्याला टुकटुक करून अमेरिकेचं विमान धरलं. ('सहार विमानतळावरून बोईंग ७४७ हवेत झेपावलं.. आजुबाजूचे रस्ते, इमारती आणि झाडं हळूहळू लहान होत होत शेवटी दिसेनाशी झाली.. त्यासरशी माझं मन एकदम भूतकाळात झेपावलं', अशी ष्ट्यांडर्ड सुरुवात करून एक अति टुक्कार प्रवासवर्णन पाडायचा मोह मी जड अंतःकरणानं टाळतोय, याची जाणकारांनी नोंद घ्यावी!) मी त्या गोर्‍यांवर का छाप पाडू शकलो असेन याचा मला तिकडे गेल्यावर अंदाज आला. तिकडचे कोडगे आपल्या कुठल्याही प्रश्नाला 'आय डन्नो' म्हणून उडवून लावतात. भारतातले कोडगे माहीत नसलं तरी काहीतरी फेकतातच!

इन्फर्मेशन सिक्युरिटी कंपनी असल्यामुळे तिथे काम करणार्‍यांना 'सिक्युरिटी' नामक बागुलबुवाची भीति वाटण्याचा आणि लोकांना घालण्याचा पगार मिळायचा. आपल्या प्रॉडक्टचा कोड/डेटा चोरीला जाईल किंवा नष्ट होईल ही अशीच एक भीति! येता जाता 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट' सारखे जड जड शब्द किंवा आयपीआर सारखी त्याहून जड संक्षिप्त रूपं फेकली जायची. 'इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट'चं सोडा, भारतात तर आपण घेतलेल्या प्रॉपर्टीचे राईट पण आपल्याकडे आहेत की नाहीत याची खात्री नसते कधी! सुरुवातीला नवीन असल्याने, आणि विशेषत: भारतातून आलेलो असल्यामुळे, मला ही वाटायचं की असेल बुवा यांचा कोड भारी लिहीलेला, सहज समजण्यासारखा आणि व्यवस्थित डॉक्युमेंट केलेला! पण तसं काही नव्हतं. तो कोड तिथे खूप वर्ष काम केलेल्या भल्या भल्यांना सुद्धा समजायचा नाही, मग तो कोड चोरांना समजेल ही भीति माझ्या मते अनाठायी होती. आणि त्यासाठीची सुरक्षा ही एव्हरेस्टवर बुजगावणं लावण्यासारखी होती.

अशा आक्रस्ताळी सुरक्षेच्या ठिकाणी मी एकदा बिनधास्तपणे भरपूर डेटा बदलला. बॉस अर्थातच खवळला. तिकडचा असला म्हणून काय झालं? शेवटी बॉसच तो! इकडचे तिकडचे सगळे बॉस इथून तिथून सारखेच असतात! त्याच्या मते मी तो एखाद्या छोट्या टेस्ट डेटाबेस मधे आधी चालवून बघायला पाहीजे होता. टेस्ट न करता कसलेही बदल करायची पद्धत नाहीये.. पद्धत जास्त महत्वाची! आपण आधी खिरापत खाऊन मग आरती म्हणतो का? नाही. वगैरे! वगैरे! असल्या भाषेत नाही नाही ते बोलला मला! खरं तर चूक काहीच झालेली नव्हती. पण, शेवटी सत्तेपुढे शहाणपण चालत नाही म्हणून मी गप्प बसलो. बॉसने मला इन्फर्मेशन सिक्युरिटी काय असते? ती कशी ठेवायची? तिचं नियोजन कसं करायचं? यावर एक भलं मोठं बाड चघळायला दिलं!

काही दिवसांनी मला एका छोट्या सहा महिन्यांच्या प्रॉजेक्ट वर बसविण्यात आलं. आमच्या ऑफिसात बर्‍याच कंपन्यांचा डेटा होता. त्यातला काही एका कंपनीला उपलब्ध करून द्यायचा होता. आमच्या मोठ्ठ्या डेटाबेस मधून रोज काही डेटा माझ्या डेटाबेस मधे घातला जायचा. आलेला नवीन डेटा, रोज पहाटे, मी त्या कंपनीच्या ऑफिस मधल्या डेटाबेस मधे कॉपी करायचो. दिवसभरात, त्या डेटाबेस मधे त्यांचे लोक बरेच बदल करायचे, ते मी दररोज रात्री माझ्या डेटाबेसला कॉपी करायचो. त्यावरून नंतर आमच्या ऑफिसात काही रिपोर्ट निघायचे.

सहा महीने कुठे कसलाच प्रॉब्लेम आला नाही. प्रोजेक्ट पण संपलं. सगळं दृष्ट लागण्याइतकं सुरळीत झालं होतं. असं झालं की माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकते, डास गुणगुणतो, भुंगा भणभणतो इ. इ. 'सगळं सुरळीत चालणं म्हणजे जगबुडीची नांदी'.. 'आयटीतली अजून एक म्हण'! जो कोड १००% बरोबर वाटतो त्यातच पुढील आयुष्यातली बगमारी लपलेली असते. तरी पण प्रोजेक्ट संपल्यामुळे आता काय झोपणार म्हणून मी पण झोपलो. शेवटी, प्रोजेक्ट गुंडाळायच्या आधी सहज एक शेवटची नजर माझ्या डेटाबेसवर टाकायची दुर्बुद्धी झालीच!

ज्या टेबलात मला भरपूर डेटा सापडायला पाहीजे होता तिथे अगदीच किरकोळ डेटा दिसला. अजगर म्हणून बघायला जावं आणि गोगलगाय निघावी तसं झालं. आयला डेटा गेला कुठे? कुणी तरी उडवला की काय? डेटाबेसच्या सिसिटिव्हीवर (म्हंजे ऑडिट ट्रेलमधे) काही कुणी उडवल्याच्या खुणा नव्हत्या. घशाला कोरड पडली. कानशिलं लाल झाली. बोटं गार पडली. नाकाचा शेंडा गरम झाला. मग मात्र आमच्या डेटाबेस अ‍ॅडमिनिस्ट्रेटरला शरण गेलो. त्यालाही खाडखुड करून काही सापडलं नाही. एव्हाना बॉसला काही तरी गडबड असल्याची कुणकुण लागली. शेवटचा उपाय म्हणून मी त्याला बॅकप वरून पूर्वस्थितीला आणायला सांगितलं. तर बॅकप मधे पण सगळा डेटा नाही. ते ऐकल्यावर मात्र एकजात सगळे हादरले. असल्या कंपनीला डेटा देणं हा चोराला तिजोरी संभाळायला देण्यातला प्रकार वाटला असता लोकांना!

हे थोडं वाळवी लागल्यासारखं झालं होतं.. नुसती नजर टाकून वाळवी लागलेली अजिबात कळत नाही. कपाटात ठेवलेली पुस्तकं अगदी दार उघडलं तरी व्यवस्थित दिसतात. पण एखादं पुस्तक काढलं तरच सर्व पुस्तकातून गेलेला बोगदा दिसतो.

उत्खनन करता करता असा शोध लागला की अ‍ॅडमिनिस्ट्रेटरचाच एक प्रोग्रॅम होता जो माझा डेटाबेस साफ करून त्यात कंपनीच्या डेटाबेस मधला डेटा घालायचा. पण, रोजच्या डेटाला खूप जागा लागायची म्हणून मी दर १५ दिवसांनी, त्या कंपनीच्या ऑफिसातला, झालेल्या कामाचा डेटा साफ करत असे.. असं गृहीत धरून की माझ्या डेटाबेस मधे सगळा डेटा सुरक्षित आहे. जंगलाच्या दर्शनी भागाला धक्का न लावता आतल्या भागात निर्वेधपणे जंगलतोड चालल्यासारखी स्थिती होती. आणि साफ झालेल्या डेटाबेसचा बॅकप हा कोर्‍या कागदाच्या झेरॉक्स इतकाच उपयोगी!

तसा तो जालीम प्रोग्रॅम अ‍ॅडमिनिस्ट्रेटरला कुणी लिहायला सांगितला होता ते त्याला आठवत नव्हतं. पण मला ते समजलंच. आमच्या सिस्टिमची चाचणी चालू असण्याच्या काळात बॉसनंच तो प्रोग्रॅम लिहायला सांगितला होता! चाचणी संपल्यावर तो काढून टाकायला सांगायचं विसरला.

त्या नंतर, ते इन्फर्मेशन सिक्युरिटीचं भलं मोठं बाड चाळल्यासारखं करत मी मुद्दाम बॉस समोरून जात असे!

-- समाप्त --

1 comment:

Anonymous said...

Bhannat.... Ekach number...
pratyek Software Engineer chya aayushyatla ati taapdayak prakaran... an arthatach 90% wela daitya mule zalele...

Mast lihilay...