Monday, November 14, 2011

गोट्याची शाळा

गोट्याचा शाळेतला प्रवेश त्याच्या या जगातल्या प्रवेशापेक्षा क्लेशकारक निघाला. सुरुवातच मुळी कुठल्या माध्यमातल्या शाळेत घालायचं इथून झाली.. मराठी की इंग्रजी? माझ्या वेळेला इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्या तरी तिथे मराठी मुलांना घेत नाहीत असा समज असावा. त्यामुळे, 'कुठलं माध्यम?' सारखे कूट प्रश्न कुणालाही पडले नाहीत.

पूर्वी मी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरसकट कॉन्व्हेन्ट स्कूल म्हणायचो.. कॉन्व्हेन्ट स्कूल म्हणजे मुलींची शाळा असते असं ज्ञानमौक्तिक माझ्या अकलेचं मंथन करून एकाने काढल्यावर मी कॉन्व्हेन्टला सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणू लागलो. कोंबडा झाकला तरी सूर्य उगवायचा रहात नाही तसं माझं इंग्रजीचं अज्ञान कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी प्रतिष्ठेची लक्तरं उधळल्याशिवाय रहात नाहीत ती अशी!

त्यामुळेच, गोट्याला इंग्रजी शाळेत घालायचा मी गंभीरपणे विचार करत होतो.. म्हणजे मला मराठीचा अभिमान आहे, नाही असं नाही. मराठीचा अभिमान वाटण्याचं मुख्य कारण ती एकमेव भाषा लिहीताना व बोलताना मला अगदी घरात वावरल्यासारखं वाटतं हे असावं! कुठलाही न्यूनगंड नाही की टेन्शन! या उलट इंग्रजीचं! समोर कुणी इंग्रजी बोलायला लागला की माझी सपशेल शरणागती!.. अगदी होल्डिंग ग्रास इन टूथ! आता माझी परिस्थिती थोडी सुधारली असली तरी तेव्हा साधे साधे प्रश्न माझी भंबेरी उडवायला पुरेसे होते. 'व्हॉट इज युवर सरनेम?'.. हा वरकरणी बाळबोध प्रश्न माझ्या मनात माझ्या सरांच नाव विचारलं आहे की माझं नाव हा संदेह निर्माण करायचा. किंवा.. 'हाऊ ओल्ड आर यू?'.. असं कुणी विचारलं की मला रागाने 'मी म्हातारा नाहीये' असं म्हणावसं वाटायचं.

कॉलेजात असताना, मास्तर वर्गात येऊन बकाबका इंग्रजी बकले की मला पिंजर्‍यात सापडलेल्या उंदरासारखं वाटायचं. सायन्सचा एक मास्तर चांगला होता.. मराठी माध्यमातल्या पोरांची कुचंबणा तो ओळखून होता. सुरुवातीलाच त्यानं वर्गात जाहीर केलं की - 'जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला सांगा मी ते मराठीत परत सांगेन'. एकदा तो नेहमी प्रमाणे हातवारे करून फिजिक्स शिकवत होता.. 'इफ यू हिट धिस पार्टिकल (पार्टिकल म्हणजे एका हाताची मूठ) हॅविंग मास एम विथ फोर्स एफ (फोर्स म्हणजे दुसर्‍या हाताची झापड) इन धिस डिरेक्शन देन इट विल अ‍ॅक्सिलरेट अँड गो इन धिस डिरेक्शन (इथे मूठ एका दिशेला हेलपाटत जाताना) विथ मोमेंटम पी अँड व्हेलॉसिटी व्ही (इथे माझी भंजाळलेली मुद्रा)'. ते काही मला समजेना.. कारण पार्टिकल, मोमेंटम असे सगळेच घणाघाती शब्द.. कधीही न ऐकलेले!.. त्या पार्टिकल मोशनमुळे मला मोशनलेस इमोशन की इमोशनलेस मोशन की काहीतरी झालं! मग मी धाडस करून त्याला मराठीत सांगायला सांगितलं. त्यावर.. 'या पार्टिकलला, ज्याचं मास एम आहे (परत मूठ), त्याला या डिरेक्शन मधून एफ फोर्सने हिट केला (परत झापड) तर तो अ‍ॅक्सिलरेट होईल आणि या डिरेक्शन मधे (परत मूठ हेलपाटताना) मोमेंटम पी अँड व्हेलॉसिटी व्हीने जाईल (परत माझी भंजाळलेली मुद्रा). समजलं?'. आहे का कुणाची बिशाद नाही समजलं म्हणायची? 'म्हणशील? म्हणशील परत मराठीत सांगा म्हणून?'.. असं म्हणून स्वतःच्या कानाखाली जोरात वाजवावीशी वाटली.

मग मी पुस्तकं वाचून एकलव्यासारखा आपला आपण अभ्यास करायचा ठरवला. पहिल्या पॅरातच अडलेला मोमेंटम शब्द पॉकेट डिक्शनरीत न सापडल्यामुळे 'वद जाऊ कुणाला शरण' अशी अवस्था झाली! एकलव्याचं बरं होतं, त्याला नुसतीच बाण मारायची प्रॅक्टीस करायची होती. त्याचं काय इतकं कौतुक करतात लोकं? कॉलेजात आम्ही पण बाण मारायला शिकलो होतो गुरु किंवा पुतळ्याशिवाय! त्यात काय विशेष? पुतळ्याकडून सोडा पण त्यानं आमच्या हाडामांसाच्या मास्तरांकडून थोडं फिजिक्स जरी शिकून दाखवलं असतं ना, तरी मी मानलं असतं त्याला!

मी आणि सरिता, आम्ही दोघेही मराठी माध्यमातले! त्यामुळे कल मराठीकडे जास्त होता. पण माझं मत फिरायला आमचा भाजीवाला कारणीभूत ठरला. तो स्वतः चौथी पर्यंत शिकलेला असल्यामुळे त्याच्या पोराला सर्व शाळांनी वाळीत टाकलं होतं. तरीही, त्या पठ्ठ्याने, इकडे तिकडे वशिलेबाजी करून एका शाळेत प्रवेश मिळवलाच. त्या नंतर त्यानं आम्हाला अभिमानाने सांगितलं की आता माझा पोरगा शिकून इंग्रजीत भाजी विकणार! त्याची 'व्हिजन' योग्यच होती म्हणा.. काही दिवसात 'कोथिंबीर कशी दिली?' च्या ऐवजी 'कॉरिअंडरचं प्राईस काय?' असली धेडगुजरी पृच्छा करणारी गिर्‍हाईकं वाढणार! इंग्रजी ही बिझनेसची भाषा आहे हा भाजीवाल्याने दिलेला दृष्टांत आणि लहानपणापासून इंग्रजीशी झालेल्या झटापटीचे व्रण यामुळे मी, सरिता नको नको म्हणत असताना, गोट्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलाच.

याचा अर्थ मी 'त्या' विशिष्ट वर्गातला.. बोलणार एक पण करणार भलतंच या वर्गातला.. माणुस आहे असा नाहीये. मातृभाषेतून शिकवलेलं जास्त समजतं वगैरे म्हणणारा पण आपल्या पोराला इंग्रजी शाळेत घालणारा.. लाच घेणार्‍यांना आणि देणार्‍यांना तुरुंगात टाकलं पाहीजे म्हणून फेसबुकावरच्या मोहीमेत उत्साहाने सामील होणारा पण पोलिसांनं पकडलं तर लगेच वाटाघाटींना बसणारा.. शाळांनी देणग्या घेऊ नयेत म्हणून तावातावाने भांडणारा पण आपल्या पोरासाठी मागतील तितके पैसे गपगुमान देणारा.. भारतीयांचा स्विस बँकेतला काळा पैसा जप्त करावा म्हणून ठणाणा करणारा पण स्टँप ड्युटी कमी पडावी म्हणून स्वतःच्या घराची किंमत कमी दाखवणारा.. असो. 'मातृभाषेतून शिकवावं' चा पुरस्कार करणार्‍यांना माझा एक बावळट सवाल आहे.. गुजराथीशी लग्न केलेला कानडी माणूस पुण्यात रहात असेल आणि घरी हिंदीत बोलत असेल तर त्यानं आपली पोरं कुठल्या माध्यमात घालावीत?

माध्यमाचा अडथळा पार केल्यावर मग शाळांचे फॉर्म मिळविण्यासाठी रांगा लावणे, नंतर फॉर्म भरण्यासाठी रांगा लावणे, मग इंटरव्ह्यूसाठी पोराला क्लासेस लावणे आणि त्यातून येणारे ताणतणाव, चिडचिड, रडारड व दडपण झेलणे इ. इ. अडथळ्यातून गेल्यावर, मला नाही वाटत गोट्या मोठा झाल्यावर 'लहानपण देगा देवा!' असं चुकून कधी म्हणेल म्हणून!

शाळेत फक्त मुलांनाच नाही तर पालकांना पण इंग्रजी बोलण्याची सक्ती होती. त्यातून मुलांना इंग्रजी बोलण्याची सवय व्हावी वगैरे उच्च हेतू असेल, पण आमची पंचाईत झाली त्याचं काय? मला तर बाकीच्या सर्व अडथळ्यांपेक्षा हा अडथळा जीवघेणा वाटला. शाळेत कधी मधी पेरेंट टीचर मिटिंगला जायची वेळ आली की सरिता मलाच पुढे करायची. कारण मलाच इंग्रजी शाळेत घालायची हौस होती ना? मग त्याच्या गृहपाठापासून ते मिटिंगांपर्यंत सर्व मीच निस्तरायला पाहीजे होतं! त्या मिटिंगांमधलं इतर पालकांचं इंग्रजी ऐकूनच अगाथा ख्रिस्तीनं 'मर्डर, शी रोट' लिहीलं की काय कुणास ठाऊक! एका आईला 'माझी Parent's Representative व्हायला काही हरकत नाही' हे म्हणायचं होतं तर ती म्हणाली.. 'I dont have mind to become parent's representative'. एका आईने, आपल्या सोन्याची, केलेली ही कौतुक मिश्रित तक्रार.. 'Teacher, he is like straight thread at school but he is like ghost at home'. इंग्रजी बोलण्याची प्रॅक्टीस करण्यासाठी या बायका घरी 'पानं वाढली आहेत' चं भाषांतर, 'लिव्हज हॅव ग्रोन' असं करत असतील काय? माझी ही परिस्थिती फार काही वेगळी नव्हती. कधी कधी ऑन्टीच्या प्रश्नांना उत्तरं देता देता मला 'नाईन केम टू माय नोज' म्हणावसं वाटायचं ! तरी बरेचदा मी 'झाकलं थोबाड सव्वा लाखाचं' हा मंत्र वापरून निभावून न्यायचो.

त्या नंतरचा अडथळा म्हणजे त्याचा गृहपाठ! गृहपाठाचे प्रश्न त्याच्या बरोबर सोडवताना माझ्याच तोंडाला फेस यायचा. एक दिवस..

'बाबा, एक सम सॉल्व कर ना'

'हं.. सांग!'.. क्रिकेट वर्ल्ड कप मधे फिक्सिंग झालं होतं की नव्हतं या वरची रसभरित चर्चा मोठ्या मुश्किलीनं बाजूला ठेवीत मी!

'२६ इन्टू १५ किती?'

'ही काय सम आहे? हा तर गुणाकार आहे'

'गुणाकार म्हणजे?'.. असले मराठी शब्द कानावर पडले की गोट्याच्या डोक्याची घसरगुंडी होते हे वेगळं सांगायला नकोच.

'आरे, मल्टिप्लिकेशन'

'आमच्या ऑन्टी याला सम म्हणतात'.. गोट्याच्या शाळेत टीचरला ऑन्टी म्हणण्याचा दंडक आहे. आमच्या मास्तरणींना आम्हाला 'मावशी, काकू किंवा आत्याबाई' म्हणायला सांगितलं असतं तर त्यांना काय वाटलं असतं कोण जाणे!

'बरं! मग सांग. पाच सख किती?'

'म्हणजे?'.. बोंबला! त्यांच्या भाषेत पाढे कसे म्हणतात बरं?..... हां!..

'फाईव्ह सिक्सा?'.. आमच्या पाढ्यांना कशी एक मस्त लय होती. यांच्या टेबल्सना ती मुळीच नाही.

'थर्टी'

'गुड! मग इथे झिरो लिही आणि आता हातचे आले तीन'

'हातचे? म्हणजे?'.. गोट्याची परत विकेट. त्या बरोबर माझी पण विकेट! हातच्याला काय म्हणतात ते कोणा लेकाला माहिती? नंतर गोट्याशी झालेल्या बौद्धिक चर्चेतून 'हातचा' म्हणजे 'कॅरी' हे निष्पन्न झालं आणि एकदाचं ते सम सुटलं! असाच एकदा, त्रैराशिक म्हणजे काय हे सांगताना, मी उणलो (नॉन-प्लस झालो) होतो.

'ऑस्सम!'.. गोट्यानं प्रशस्ती पत्रक दिलं. सुमारे ३ फूट उंचीचा इसम मला एक सम घालतो आणि सुटल्यावर ऑस्सम म्हणतो या सम, अल्ला कसम, मति गुंगवणारं काय असेल?

उत्तरापर्यंत पोचण्याआधी दुसर्‍याचं नक्की म्हणणं काय आहे ते दोन्ही पार्ट्यांना आपापल्या भाषेतून समजून घेण्याची झटापट नेहमीच करावी लागायची. त्यात, त्यानं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मला येत नाही हे नंतर लक्षात आलं की आणखीनच चिडचिड! एकदा त्याच्या 'बाबा! चंद्र म्हणजे प्लॅनेट असतो का?'.. या सरळसोट प्रश्नाचं, माझं अज्ञान लपविण्यासाठी, मला असं तिरसट उत्तर द्यावसं वाटलं होतं... 'चंद्र हा ग्रह आहे असा काही लोकांचा ग्रह आहे. चंद्र हे नाम ही आहे आणि संज्ञा पण! शनीच्या चंद्रांना जशी नावं आहेत तशी पृथ्वीच्या चंद्राला नसल्यामुळे त्याची आणि आपली फार कुचंबणा होते. जसा शनीचा एक चंद्र टायटन तसा पृथ्वीचा चंद्र हा आपला नेहमीचा चंद्र असं म्हंटलं जातं. नशीब पृथ्वीची बाब तशी नाहीये. नाहीतर पृथ्वी ही चंद्राची पृथ्वी आहे किंवा शनी ही टायटनची पृथ्वी आहे असं म्हणावं लागलं असतं.'

गोट्याला फक्त गणितातल्या समांचा त्रास व्हायचा असं नाही. तर, त्याला आणि पर्यायाने मला प्रत्येक विषयात नेहमी काही तरी वेगळे प्रश्न पडायचे.

'बाबा! सॅटर्नच्या रिंग्ज म्हणजे काय असतं?'

'शनिची कडी? त्याबद्दल काय पाहीजे?'.. प्रश्न मराठीत भाषांतरित केल्यामुळे गोट्याला अनंत प्रश्न पडतात.

'शनी म्हणजे?'

'सॅटर्न!'

'ओह! मग त्याच्या रिंग्जबद्दल माहिती पाहीजे आहे. रिंग्ज म्हणजे कडी का? ती दाराला असते तशी?'

'ती कडी नाही रे! कडी म्हणजे कडंचं अनेकवचन!'

'म्हणजे?'

'प्लुरल! कडं म्हणजे रिंग, कडी म्हणजे अनेक रिंगा'.. त्याच्या प्रश्नांची उत्तरं सहसा त्याच्या पुस्तकात नसतात. ती गुगल करावी लागतात. एकाचं उत्तर काढून देई पर्यंत त्याचे पुढचे प्रश्न तयार असतात.. 'बाबा! सॅटर्नच्या सारखी इतर प्लॅनेटना रिंग असते का?'.. मी गारद.. 'आयला! मला कधी असले प्रश्न पडले नव्हते. अजूनही पडत नाहीत आणि याला कसे काय पडतात?'. याचं उत्तर मात्र गुगल करून नक्की सापडलं नसतं!

'बाबा! गे म्हणजे काय?'.. गोट्याच्या निरागस प्रश्नानं एकदा मी शेपटीवर पाय पडल्यासारखा ताडकन उडालो होतो.. रावण पिठलं रेटून माझा कुंभकर्ण झाला होता तरीही! माझ्या पायाखालची टाईल सरकली. आयला! कुठल्याही गोष्टीकडे मोकळ्या मनाने पोरांना बघता यावं म्हणून हल्ली पोरांना शाळेपासूनच 'हे' 'हे' 'असलं' शिकवतात? गोट्या पूर्वी, पुढे चाललेल्या ट्रकांवरचं वाड्मय वाचून, असले अस्वस्थ करणारे प्रश्न टाकायचा तेव्हा मी बंडला मारून वेळ मारून न्यायचो! आता काय बंडल मारावी बरं? मी मनातल्या मनात उत्तराची जुळवाजुळव करू लागलो.. गे प्रकाराचं समर्थन करताना लोकं नेहमी ते पशुपक्षात पण असतं म्हणून ते नैसर्गिक आहे अशी काहीतरी बनावट विधानं करतात ते माहिती होतं.. काही पशुंना शिंग असतात किंवा पक्ष्यांना पंख असतात आणि ते आपल्याला नसतात.. ते का नाही अनैसर्गिक देव जाणे! त्यामुळे मी तसलं काही त्याला सांगणार नव्हतो. विचार करायला अजून थोडा वेळ मिळावा म्हणून मी सहजच त्याला विचारलं.. 'कुठे आला तुला हा शब्द? दाखव बघू!'.. त्याच्या एका धड्यातली 'a bird's gay spring song' अशी ओळ वाचून माझा जीव खरोखर भांड्यात पडला. ते तसं न विचारताच मी त्याला काहीबाही सांगितलं असतं तर त्याच्या डोक्याचं काय भजं झालं असतं कुणास ठाऊक!

एकदा ऑन्टीने गोट्याचा, बर्‍याच लाल वर्तुळांनी माखलेला, मराठीचा पेपर वर 'मराठीकडे लक्ष देणं आवश्यक आहे' असा शेरा मारून घरी पाठवला. त्याच्या पेपरातली/निबंधातली निवडक वाक्यं, त्यातली रक्तबंबाळ वाक्यं कुठली ते सांगायला नकोच --

निभंध - माझा आवडता पक्षी - मोर
मोर आपला राष्ट्रिय पक्षी आहे. त्याचा पिसारा फारच कलरफुल अणि attractive असतो. त्याचा पिसारा खुप लांब असल्याने तो उडु शकत नाही. त्याचा पिसारा सुन्दर असला तरी त्याचे पाय ugly असतात. peahen ला पिसारा नसतो. मोर हां कार्तिकेय आणि सरस्वतीचे vehicle आहे. पुण्याजवळ मोरांचे reserve forest आहे तिथे खुप मोर बघायला मिळतात.

विरुद्धार्थी शब्द
---------------
मित्र x मैत्रींण
गाय x म्हैस
धीट x coward

लिंग बदला
------------
भाऊ x भैण
गाय x ऑक्स
मोर x मोरीण (कारण लांडोर आठवत नव्हतं, मागे निबंधात पिहेन लिहिल्यामुळे ऑन्टीने झापलं होतं)

समानार्थी शब्द
----------------
बहीण - बगीनी
भाऊ - बंदू
आनंद - happy

त्याने पेपरात काही शब्द असे लिहीलेले होते - बकशीस (बक्षीस), धरीतरी (धरित्री), एकोणशंभर ( ९९ ).

मुख्य म्हणजे गोट्यानेही तो पेपर, न घाबरता, मला वाचायला दिला. असले शेरे घरी दाखवायची माझ्यावर वेळ यायची तेव्हा माझी जाम टारटूर होत असे! माझ्या प्रगती(?) संबंधीच्या ज्या पत्रांवर घरच्यांच्या सहीची आवश्यकता नसायची ती पत्रं मी घरी दाखवायच्या भानगडीतच पडायचो नाही. उगीच नसते शेरे दाखवून अवलक्षण कशाला करून घ्या?

याचाच अर्थ असा की गोट्याला अजून शाळकडू मिळालेलं नव्हतं! बाळकडू म्हणजे पाळण्यात मिळालेलं ज्ञान असं म्हणतात, तसं शाळकडू म्हणजे शाळेत मिळालेलं ज्ञान म्हणायला पाहीजे! उदा. होमवर्क केलेला नसताना मास्तरला कसं फसवावं, किंवा दोन दोन प्रगतीपुस्तकं (एक घरात दाखवायला व एक शाळेत दाखवायला) बाळगून दोन्ही पार्ट्या कशा खूष ठेवाव्या.. वगैरे वगैरे!. अर्थातच, गोट्याने ते पत्र दाखवल्याचा मला आनंद झाला पण चॅप्टरगिरी करायला तो अजून शिकला नाही म्हणून थोडं दु:खही झालं!

पण त्याचं मराठी, आम्ही घरी मराठी बोलत असूनही, इतकं कच्चं का? त्याचं मूळ त्याच्या सुरवातीच्या मराठीच्या पुस्तकात तर नसेल? 'काळानुरुप बदल हवेत' या सध्याच्या विचारसरणीच्या प्रभावामुळे मला असं वाटलं होतं की त्यांच्या मराठीच्या पुस्तकात 'कमल नमन कर' ऐवजी 'कमल गुगल कर' अशी काही वाक्यं घुसडली आहेत की काय! पण नशिबाने प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. बरंचसं विचारकुंथन केल्यावर जे माझं इंग्रजीचं झालं तेच त्याचं मराठीचं होणार हे लक्षात आलं.

तो पेपर वाचल्यावर 'तरी मी तुला सांगत होते..' चा पाढा लावला नसता तर ती सरिता कुठली? पण शेवटी तिला ही पोराचं कसं होणार ही चिंता लागलीच.. मग काही तरी थातुर मातुर सांगून मी तिचं सांत्वन करायचा एक दुबळा प्रयत्न केला... अगं! सगळं ठीक होईल! मला पण शाळेत कुठं काय येत होतं? पण आता ठीक चाललंय ना?

डोंच्यु वरी, वरचे वरी
असेल माझा हरी
तर देईल खाटल्यावरी!

-- समाप्त --

15 comments:

Anonymous said...

त्याने पेपरात काही शब्द असे लिहीलेले होते - धरीतरी (धरित्री)
----
गोट्यानी बहिणाबाईंच्या कवितांचा दांडगा अभ्यास केलेला दिसतोय.

गाय विरुद्‌धार्थी -- ऑक्स
------
ऑक्स चालेल, पण 'गे' सुद्‌धा चालायला हरकत नसावी. गाय नेहमीच इतकी व्याकुळ दिसते, 'गे'-च्या अगदी चपखल विरुद्‌ध. गे गाये, अधीमधी गे असत ज़ा की बाये.

मजेदार लेख.

- नानिवडेकर

Anonymous said...

i am a big fan of your writing. i always wait for new post on this blog. very witty and great skill of writing.

M. D. Ramteke said...

Great post sir,
Waiting for next one.

Kedar Methe said...

आमची म्हणजे ज्यांनी संपूर्ण शिक्षण मराठी मधून घेतले आहे, त्यांची college मध्ये व पुढील आयुष्यात होणारी गंमत मस्त लिहिली आहे ....जबबराट....
मला तर माझाच चेहरा पुढे दिसत होता..:D
आणि गोट्याचे शाळेतले किस्से ...तर लाजवाब...

aditya said...

अप्रतिम लेख. बरेच दिवसात असलं काही वाचायला मिळालं नव्हतं.

मराठीचं अज्ञान लपवायचा असफल-लाजीरवाणा-इत्यादी प्रयत्न न करता एक प्रश्न - गाय चा विरुद्धअर्थी शब्द काय आहे?
बाकी लिंग बदल मध्ये ससा नाही हे बघून आनंद झाला :D

गुरुदत्त said...

सर्वांना धन्यवाद!

>> गाय चा विरुद्धअर्थी शब्द काय आहे?
ऑन्टीनी बैल हे उत्तर दिलं. :)

Unknown said...

Ek number Sir!
Khupach Chhan lihalay

--Vinayak

Nikhil Joshi said...

Mast post
mi tumachi blog bookmark keliye
best asatat

अपर्णा said...

याचा अर्थ मी 'त्या' विशिष्ट वर्गातला.. बोलणार एक पण करणार भलतंच या वर्गातला.. माणुस आहे असा नाहीये. मातृभाषेतून शिकवलेलं जास्त समजतं वगैरे म्हणणारा पण आपल्या पोराला इंग्रजी शाळेत घालणारा.. लाच घेणार्‍यांना आणि देणार्‍यांना तुरुंगात टाकलं पाहीजे म्हणून फेसबुकावरच्या मोहीमेत उत्साहाने सामील होणारा पण पोलिसांनं पकडलं तर लगेच वाटाघाटींना बसणारा.. शाळांनी देणग्या घेऊ नयेत म्हणून तावातावाने भांडणारा पण आपल्या पोरासाठी मागतील तितके पैसे गपगुमान देणारा.. भारतीयांचा स्विस बँकेतला काळा पैसा जप्त करावा म्हणून ठणाणा करणारा पण स्टँप ड्युटी कमी पडावी म्हणून स्वतःच्या घराची किंमत कमी दाखवणारा.. असो. 'मातृभाषेतून शिकवावं' चा पुरस्कार करणार्‍यांना माझा एक बावळट सवाल आहे.. गुजराथीशी लग्न केलेला कानडी माणूस पुण्यात रहात असेल आणि घरी हिंदीत बोलत असेल तर त्यानं आपली पोरं कुठल्या माध्यमात घालावीत?


हे सर्वोच्च आहे...

मस्त मस्त मस्त पोस्ट....

स्मिता पटवर्धन said...

mast dhammal lihilay

swarada said...

jabardast mast

Anupama said...

mastt lekh!!

Unknown said...

मस्त मस्त

Anonymous said...

khupch mast post. sagalech kisse bhannat ani majeshir

namrata said...

very nice article..i am also confused between Marathi n English medium