असं कधी तुमच्या आयुष्यात घडलं आहे का?...
दिवस रात्र खपून, घाम गाळून बनवलेल्या व तळहाताच्या फोडासारखा जपलेल्या आणि सर्व चाचण्यातून पार पडलेल्या तुमच्या प्रोग्रॅमचा आज दाखवण्याचा कार्यक्रम आहे. क्लायंटची माणसं मुलीला चालून दाखवायला सांगत आहेत.. माफ करा.. उत्सुकतेने प्रोग्रॅमची वैशिष्ट्ये पहात आहेत, तुमच्या ऑफिसची मंडळी त्यांच्या चेहर्यांवरचे हावभाव टिपत आहेत. तुम्ही डेमो देत उभे आहात. स्वतःचं टेन्शन घालवायला, तुम्ही मधे मधे फालतू विनोद करताय, त्याला लोक फिसफिसून दाद देताहेत. तुम्हाला कृतकृत्य होतंय. तुमच्या कर्तृत्वाचा आलेख जिराफासारखा उंच उंच जाताना दिसतोय.
........ आणि......... ठॅप!!
तुम्ही उत्साहाने दाखवत असलेलं काहीतरी झोपतं.. एक अपरिचित बग डेमो खातो. तुम्ही अगतिकपणे खाटखूट करता, इतर लोकही काहीतरी प्रयत्न केल्याचं दाखवतात पण तुमच्या लाडक्याने डोळे पांढरे केलेले असतात. तुमचा चेहरा पहिल्यांदाच मुंबईच्या लोकलच्या गर्दीत सापडल्या सारखा कावरा बावरा होतो.. बेडकासारखी बुबुळं बाहेर येतात.. तुमच्या ऑफिसातल्या हितचिंतकांना(?) त्याचा मनातून आनंद झालेला असतो. मघाशी तुमच्या विनोदांना हसणारे लोक आता तुम्हालाच हसायला लागलेले असतात. क्लायंटच्या मनात 'थोडं टेस्टिंग करायला काय होतं यांना?' पासून 'यांना उगीचच कॉन्ट्रॅक्ट दिलं' पर्यंत अनेक सुविचार येऊन जातात. आता तुमच्या कर्तृत्वाच्या जिराफाचं सापशिडीवरून सुर्रकन खाली घसरून पार झुरळ झालेलं असतं. यंदा तुमची कमी पगारवाढीवर बोळवण होणार असते. कारण, अप्रेझलच्या वेळेस तुमच्या बॉसच्या डोक्यात फक्त डेमो बोंबलला इतकंच रहाणार असतं.. वाईट गोष्टी काळ्या दगडावरती कोरल्या जातात आणि चांगल्या गोष्टी वाळूवर! थोडक्यात, तुम्ही त्या महाभयानक डेमो इफेक्टचे बळी झालेले असता!
माझी डेमो इफेक्टची व्याख्या अशी आहे... डेमो किंवा प्रदर्शन नामक अवस्थेत, ज्या गोष्टीचे प्रदर्शन होत असते, त्या, एरवी नीट वागणार्या गोष्टीला, धाड भरते आणि ती भंजाळल्यासारखी करते. यातील वस्तू निर्जीव किंवा सजीव असू शकते.
असं कधी तुमच्या आयुष्यात घडलं नसेल हे शक्यच नाही. कारण डेमो इज लाईक अॅन अॅक्सिडेंट वेटिंग टू हॅपन! त्यामुळे मी काही म्हणी केल्या आहेत.. नेहमी चालतो वाघावाणी, डेमोला पडतो मुडद्यावाणी! काळ आला होता पण डेमो आला नव्हता!
असं काय आहे डेमो मधे ज्यामुळे निर्जीव वस्तूंना पण जीव द्यावासा वाटतो? तसं बघायला गेलं तर ही अगदी नेहमीची गोष्ट आहे.. खिडकीत कावळ्याने काव काव करण्याइतकी! पण तसं का होतं हे मात्र 'कुत्र्याचं शेपूट वाकडं का?', 'लॉटरी नेहमी दुसर्यालाच का लागते?', 'पाहुणा येणार असल्याचं कावळ्याला कसं कळतं?', 'बसच्या शेवटच्या स्टॉपला फुलस्टॉप का म्हणत नाहीत?', 'पक्ष्यांना जेवणात अळी मिळाली नाही तर त्यांची अळी मिळी गुपचिळी होते का?', 'भविष्य वाईट असेल तर हॉरोस्कोपला हॉररस्कोप का नाही म्हणत?' अशा अनंत प्रश्नांइतकं गूढ व अनाकलनीय आहे.
'जर काही चुकण्यासारखं असेल तर ते नक्कीच चुकेल!' असं मर्फी म्हणतो खरा! पण ते विधान तसं मल्लिका शेरावतच्या कपड्यांइतकंच अपुरं आहे.. कारण असं का होतं त्याबद्दल तो पाण्यावर पडलेल्या तेलाइतका अलिप्त आहे! असं होण्याचं खरं कारण... ते तत्वचि वेगळे!
मर्फीच्या नियमाचा फायदा एकच.. तो असा की काहीही बिघडलं, चालेनासं झालं की क्षमा याचनेऐवजी तो नियम निर्लज्जपणे पुढे करता येतो.
तुम्ही रक्ताचं पाणी करून बनवलेला प्रोग्रॅमच नाही तर तुमच्या रक्ताचा गोळा देखील तुम्हाला तोंडघशी पाडतो. पाहुण्यांना आपल्या पोराचे चिमखडे बोल ऐकवायचे म्हणून आपल्या लहानग्याला कौतुकाने म्हणावं.. 'बंड्या, काऊ म्हण, काऊ!' किंवा 'बंडू, नाक कुठाय नाक?' आणि बंड्यानं, आपला बाबा काय लहान मुलासारखं करतोय असा चेहरा करून, दुसरीकडे बोट दाखवून, भलतेच चित्कार करावेत हा अनुभव सगळ्यांनाच असेलच!
हा डेमो इफेक्ट फक्त आपल्या सारख्या सामान्यांनाच गारद करतो असं नाही. भल्या भल्या कंपन्या, मोठे मोठे लोक पण त्याच्या कचाट्यातून सुटत नाहीत.. डेमोके हाथ लंबे होते हैं! खुद्द बिल गेट्सला एकदा त्यानं जादू दाखवली होती. विंडोज ९८ मधल्या प्लग-एन-प्ले या नवीन वैशिष्ट्याचा डेमो द्यायला बिल उभा राहीला आणि विंडोजने एक अभद्र एरर मारली. त्या वेळी समोरचा निळा स्क्रीन बघून त्याचा चेहरा काळा पडला होता. पण तो प्रसंगावधान राखून 'म्हणूनच आम्ही हे अजून विक्रीला काढलं नाही' असं म्हणाला. मला असा हजरजबाबीपणा जमला असता तर मी पण बिल गेट्स सारखा मोठा झालो असतो.. असो!
याचं भांडवल मायक्रोसॉफ्ट द्वेष्टे न करतील तरच नवल! मायक्रोसॉफ्टच्या नशिबाने त्यांना उदंड द्वेष्टे पण भेटले आहेत कारण जितकी यशस्विता जास्त तितकेच द्वेष्टे पण! त्या नंतर असा एक विनोद खूप फिरला होता..
You know which Microsoft product won't suck?
The Microsoft Vacuum Cleaner
होंडा कंपनी रोबॉट पण बनवते ही माहिती भारतातील भ्रष्टाचार तळागाळात रुतलेला आहे याच्या इतकी तळागाळात रुतलेली नसेल कदाचित! त्यांनी बनवलेल्या रोबॉटच्या डेमोत त्यांचा रोबॉट खरोखरच झोपला.
इतकंच काय पण डेमो इफेक्टच्या तडाख्यामुळे बकिंगहॅम पॅलेसचा रखवालदार सुद्धा पडू शकतो!
काय असेल ते असो पण कधीही न दिसलेले बग नेमके डेमोच्या वेळेसच कसे उसळी मारून बाहेर येतात त्याचं तत्वचि वेगळे! कदाचित बगांना पण स्वतःच प्रदर्शन करून लक्ष वेधून घ्यावसं वाटत असेल. म्हणून तर मी म्हणतो की चटकन सापडणारे चिल्लर बग काय कुणीही करतो पण कधीही न दिसणारे पण डेमोला बरोबर चारीमुंड्या चीत करणारे बग करणं फार थोड्या जणांनाच जमतं. डेमोच्या वेळेला फक्त डेमोवाला प्रोग्रॅमच झोपेल असं काही नाही.. इलेक्ट्रिसिटी, LCD प्रोजेक्टर, लॅपटॉप, नेटवर्क, डेटाबेस सर्व्हर इ. इ. जे जे काही झोपू शकतं ते झोपतं!
मी ताजा ताजा अमेरिकेत गेलो होतो तेव्हा सायबेस डेटाबेस सर्व्हर मला नवीन होता. म्हणून तिथल्या एका फारशा वापरात नसलेल्या सर्व्हरशी खेळत होतो. सर्व्हरची कुठली कमांड काय करते ते पहाण्यासाठी हेल्प आणि पुढे ती कमांड असं टाईप करायला लागायचं. पण सर्व्हरला कुठल्या कमांड चालतात ते माहीत नव्हतं म्हणून मी सगळ्या कमांडची यादी मिळवण्यासाठी 'हेल्प हेल्प' असं टाईप केलं... आणि... ढप्प्प्प! तो सर्व्हरच पडला. लगेच एका कोपर्यात गलका झाला, बॉस बोंबलायला लागला. मला वाटलंच तो गलका माझ्याच पराक्रमामुळे झाला असणार, पण नक्की काय झालंय ते समजत नव्हतं. मी घाबरून तिथून लॉग ऑऊट झालो आणि त्या गावचाच नाही असा चेहरा केला. नंतर मला समजलं की बॉस ज्याचा डेमो देत होता त्या प्रोग्रॅमच्या सायबेस सर्व्हरलाच मी चाट घातली होती. खरा दोष माझा नव्हताच! सायबेस मधला बग नेमका डेमोच्या वेळेसच अनवधानाने माझ्याकडून बाहेर यावा यात माझी काय चूक? कावळा बसायला आणि फांदी मोडायला म्हणतात तसं झालं!
एकदा मी लिहीलेल्या प्रोग्रॅमचा डेमो एक जण देत होता. त्या प्रोग्रॅमला सत्राशे साठ इतर प्रोग्रॅम कडून डेटा यायचा. ते सर्व मी न लिहीलेले प्रोग्रॅम होते. डेमोच्या दिवशी नेमका त्यातला एक प्रोग्रॅम बंद होता. म्हणून मी त्या प्रोग्रॅमकडून डेटा घेणारा प्रोग्रॅम पण बंद करून ठेवला होता. मी डेमो देणार्याला आधीच तसं सांगितलं होतं. डेमो सुरू झाल्यावर थोड्या वेळाने तो प्रोग्रॅम पण सुरू झाला. मी म्हंटलं, चला! थोडा डेटा लोड करू या. तो केला. अधून मधून तो करत होतो. पण माझ्या हे लक्षात येत नव्हतं की प्रत्येक वेळेला मागच्या वेळी केलेला डेटा परत परत लोड होत होता. डेमो बघणार्यांना काय वाटलं असेल ते सांगायला नकोच.
असाच रिव्हर्स डेमो इफेक्ट पण असतो.. म्हणजे काही तरी बिघडलंय म्हणून त्यातल्या तज्ज्ञाला बोलावून आणावं आणि आपल्यावर गेम पडावी.. आपली गाडी सुरू होत नाही म्हणून मेकॅनिकला घेऊन यावं आणि त्यानं किल्ली फिरवताच गाडी सुरू व्हावी! तुझा प्रोग्रॅम चालत नाही म्हणून एका कोडग्याला बोलावून आणावं आणि त्याच्या समोर तो सुरळीत चालावा!
असं होतं हे माहिती आहे. पण का होतं? ते अनाकलनीय आहे कारण... ते तत्वचि वेगळे.
पूर्वी अशी खूप सारी मूलभूत तत्वं प्रसिद्ध होती, आता फारशी आठवत नाहीयेत! त्यातली काही..
कावळा काळा, हागतो पांढरा
तो काय दहीभात खातो?
नव्हे नव्हे ते तत्वचि वेगळे!
कोकीळा येते, गोड गाते
ती काय क्लासला जाते?
नव्हे नव्हे ते तत्वचि वेगळे!
=== समाप्त ===