वाघोभरारी
'संकेत! इकडे ये! हे हीन अभिरुचीचे फोटो उद्या पर्यंत निघाले नाहीत तर मी स्वतः ते काढून जाळून टाकेन!'.. संध्याकाळी घरी आलेल्या शहाणे मास्तरांनी विलायती कपड्यांची होळी करणार्यांच्या आवेषात ठणकावलं. त्यांचा आवाज होताच तसा.. ठणठणीत! त्यांनी वाहतुकीच्या गोंगाटाच्या वरताण सूर लावला की प्रत्येक पोराला ते आपल्याच कानात ओरडताहेत असं वाटायचं! 'हीन अभिरुची काय बाबा? ते सही फोटो आहेत बरं का! एकदम फट्टाक! तुम्हाला नाही समजायचं त्यातलं! सारखी उगीच नावं ठेवता तुम्ही!'.. हा डायलॉग ऐकल्यावर लव-कुशांनी खुद्द वाल्मिकींना रामायण शिकवल्यासारखं मास्तरांना वाटलं. 'तू ही... ही जी अर्ध्या मुर्ध्या कपड्यातल्या बायकांची चित्रं लावली आहेत ना?.. त्याला हीन अभिरुची म्हणतात.. देहाचं हिडिस प्रदर्शन म्हणतात.. सौंदर्याची जाण नाही! कोणीतरी मूर्ख ढुढ्ढाचार्य उठतो.. नग्ननेत सौंदर्य आहे म्हणतो.. झापडं काढून बघायला हवं म्हणतो.. मग तुझ्यासारखे अर्धशिक्षित अपरिपक्व बाजीराव ओढतात त्याची री! त्यापेक्षा जरा स्वतःकडे झापडं काढून बघा! गलिच्छपणाची किळसवाणी जाणीव होईल'.. मास्तर हात नाचवत परत एकदा ठणठणले...