हा खेळ आकड्यांचा!
(सदर लेख जत्रा २०११ दिवाळी अंकात, 'विद्यापिठातील संशोधनाची ऐशीतैशी' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला होता) एका फुटकळ शहरात फुटकळ विद्यार्थ्यांसाठी फुटकळ लोकांनी चालवलेलं ज्ञानपिपासू नावाचं एक फुटकळ विद्यापीठ होतं. डोंगरावरचे भूखंड स्वस्त असतात म्हणून की काय हे पण डोंगरावरतीच वसलेलं होतं. टेकड्यांवर पूर्वी देवळं दिसायची तशी हल्ली विद्यापिठं दिसायला लागली आहेत! श्री. फुटाणे त्याचे एका वर्षापासूनचे शिळे कुलगुरू! कुलगुरू होण्यापूर्वी फुटाणे परीक्षा विभागाचे मुख्य होते. 'परीक्षा विभागातील कार्यक्षम आणि सशक्त अधिकारी' असा टिळा घेऊन कुलगुरू निवासात रहायला आल्या आल्या ते कैलासवासी झाले.. केवळ कुलगुरू निवासाचं नाव 'कैलास' होतं म्हणून! कार्यक्षम वगैरे ठीक होतं पण ते सशक्त प्रकरण काय असेल ते कुणालाच झेपलं नाही. इतर विद्यापीठात चालतं तसचं कुठल्या न कुठल्या आकडेवारीच्या मागे सतत धावण्याचं काम इथेही चालायचं! किती मुलं पदवी परीक्षेला बसली? का बसली? किती पास झाली? किती मागासवर्गीय होती? किती पहिल्या वर्गात पास झाली? वर्गात न बसता किती पास झाली? किती विद्यार्थ्यांनी पदवीसाठी प्...