ऑक्सफर्डचं विहंगावलोकन!

कालिदासाचं मेघदूत म्हणजे मान्सूनच्या ताज्या ताज्या ढगांच्या दक्षिणोत्तर प्रवासाचं वर्णन आहे म्हणून फार पूर्वी पुण्याच्या एका डॉक्टरांनी ते पडताळून पहायचं ठरवलं. त्यांचं स्वतःचं विमान होतं. मान्सून आल्या आल्या त्यांनी विमानातून ढगांबरोबर प्रवास केला आणि खाली जे काय दिसलं ते मेघदूताशी पडताळून पाहून मेघदूतावर ISI चा शिक्का मारला. हे सगळं मी ऐकल्यावर मला पण ऑक्सफर्डचा मेघदूत व्हायची हु़क्की आली. ऑक्सफर्ड वरून कसं दिसतं ते कुण्या कालिदासाने सांगितलेलं नसल्यामुळे मला स्वतःलाच ते पहाणं व लिहीणं (आणि आता तुम्हाला वाचणं) क्रमप्राप्त झालं. स्वतःचं विमान असण्याची तर सोडाच पण सध्या विमानात बसण्याची देखील ऐपत नसल्यामुळे मला ऊष्ण हवा भारित फुग्याचा आश्रय घ्यावा लागला. फुगेवाल्या कंपनीकडे रीतसर नोंदणी केल्यानंतरचं पहिलं उड्डाण वारा असल्यामुळे रद्द झालं. खरं तर तसा काही फार वेगाचा वारा मला जाणवला नव्हता, एखाद दुसरी झुळुक येत होती इतकंच! तेव्हढा वारा तर पाहीजेच, नाहीतर फुगा एकाच जागी राहील.. असं आपलं माझं मत हो! मग नवीन तारखा ठरवल्या. ते पण उड्डाण रद्द झालं! असं अजून एक दोन वेळेला झाल्यावर एकदाचं ते...