तेथे पाहिजे जातीचे..
ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! ट्रिंग! सदानं घड्याळात पाहिलं.. सकाळचे १० वाजले होते. 'बायकोचा फोन असणार! श्या! आज काय विसरलं बरं? पण लँडलाईनवर कसा आला?'.. मेंदुला ताण देत सदा पुटपुटला. छातीची धडधड कारच्या २५ किमी वेगाइतकी झाली. त्यानं फोन घेतला. सदा प्रोजेक्ट मॅनेजर असला तरी घरची प्रोजेक्टं मॅनेज करणं म्हणजे मेदुवड्याच्या रेसिपीने बटाटेवडे करण्यातला प्रकार! 'हॅलो! सडॅ स्पेअर आहे का?'.. इंग्रजीतून विचारणा झाली. अमेरिकन उच्चार कळत होते.. स्वर थोडा वैतागलेला वाटत होता. बायकोचा फोन नाहीये म्हंटल्यावर सदाची धडधड कारच्या आयडलिंग इतकी कमी झाली. 'सदा सप्रे बोलतोय!'.. सदाला त्याच्या नावाचा उच्चारकल्लोळ फोन रोजचेच होते. 'अमेरिकेतून इतक्या आडवेळेला कसा फोन आला? कुठे आग लागलीये आता?' या विचारांनी त्याचं इंजिन ४० किमी वेगाने धडधडायला लागलं. 'मी स्टुअर्ट गुडइनफ बोलतोय!' 'आँ! तू कसा काय? विमान चुकलं काय तुझं?'.. सदाला आवाजातला आनंद लपवता नाही आला. धडधड परत आयडलिंग लेव्हलला आली. कुठल्याही प्रोजेक्ट मॅनेजरला खडूस क्लायंट न भेटण्यानं जितका आनंद होतो तितक...