तेथे पाहिजे जातीचे.. भाग-१ इथे वाचा!
तेथे पाहिजे जातीचे.. भाग-२ इथे वाचा!
'अय्या! तुझाssच फोन! दोन सेकंदांपूर्वीच मला वाटलं तुझा फोन येणार आणि आलाच!'.. सदाची बायको चित्कारली.
'का? तुला का असं वाटलं?'
'अरे मला नं हल्ली असे अनुभव येताहेत! अचानक मनात काहीतरी उमटतं आणि ते खरं होतं! स्वामी आकुंचन महाराजांची कृपा, दुसरं काय?'
'आँ! मगाशी काय उमटलं होतं?'
'हेच की तू फोन करून सांगणार की आज आपण जेवायला बाहेर जाऊ या म्हणून!'
'जेवायला बाहेर जाऊ या हे सांगायला मी नाही फोन केला काय! आकुंचन महाराजांना प्रसरण पावायला लावून कृपेचा अजून एक इन्स्टॉलमेंट घे! मी फोन एक प्रश्न विचारण्यासाठी केलाय'
'असं काय करतोस रे? आज अगदी कंटाळा आलाय मला स्वैपाकाचा! जाऊ या नं आपण!'
'बरंss! जाऊ या! इतकं काये त्यात अगदी? एका प्रॉब्लेमनं माझ्या ग्रे-मॅटरचं बाष्पीभवन झालंय! तो ऐक आधी! तो स्टुअर्ट आहे ना? त्याची ताजमहाल ट्रिप आम्ही स्पॉन्सर केली होती. आता तो आमचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणारे लवकरच! तर लगेच राकेशनं त्याची ट्रिप कॅन्सल केली आणि मला म्हणतोय स्टुअर्टला तसं सांग म्हणून! आता त्याला ते कसं सांगू मी?'
'का? मला लग्नाचं विचारताना कचरला होतास का?'
'नाही. तेव्हा तू नकार देणार याची खात्री होती मला! आता आधी देतो म्हंटलंय मग नाही देत कसं म्हणायचं?'
'असं का? परवा नीताच्या नाटकाला कसा नाही येत म्हणालास, ऐनवेळेला?'.. नवर्याला भूतकाळातल्या अंधार्या खिंडीत पकडण्याची कला बायकांच्या डिएनेत गुंफलेली असते. पण १० वर्ष संसाराग्नीत तावून सुलाखून निघाल्यामुळे असल्या प्रश्नांवर 'मौनं सर्वार्थ साधनम' हा सर्वोत्तम उपाय आहे हे सदाला उमजलेलं होतं.
'तुमच्याकडे एखादा आज रिन्युड लायसन्स मिळणार म्हणून आला आणि ते अजून दोन महीने तयार होणार नसल्याचं समजल्यावर प्रचंड कटकट करायला लागला, तर तुम्ही काय करता?'
'साहेबांना भेटा म्हणतो'
'आयला, इथे साहेबाने मलाच सांगितलंय गाय मारायला! ब्लडी बक स्टॉप्स हियर!'.. फोन ठेवून कॉरिडॉर मधून जात असताना अचानक स्टुअर्ट समोर उभा पाहून सदा बराच काळ बाबागाडीत बसल्यासारखा अवघडला. स्टुअर्ट पण अवघडलेला होता. दोघं एकमेकांसमोर थांबले, बघून कसनुसं हसले मग नजर चुकवत उभे राहिले. त्याला पाहून जायंटव्हीलमधे खाली कोसळताना पोटात गोळा येतो तसा सदाला आला. प्रोजेक्ट मॅनेजरच्या कारकिर्दीत त्याच्या पोटात इतक्या वेळेला गोळे येऊन जातात की त्यांची गोळाबेरीज करता करता हातात गोळे येतील!
स्टुअर्ट: 'सॉरी! मला..... फार खेद होतोय.. कॅन्सल केल्याबद्दल!'
सदा: 'हां! हां! म म मला पण... होतोय...त... त... ता...... कॅन्सल केल्याबद्दल.... फार!'.. ताजमहाल हा शब्द तोंडाला फेविकोलसारखा चिकटल्यामुळे बाहेर पडला नाही आणि स्टुअर्टला त वरून ताजमहाल ओळखायला शिकवलेलं नव्हतं.
'पण, गोईंग फॉरवर्ड, मला वाटतं योग्यच निर्णय होता तो! कॅन्सलेशन वॉज इनेव्हिटेबल!'
'अॅब्सोल्युटली! अॅब्सोल्युटली! त्याशिवाय पर्याय नव्हताच'.. सदा १००% सहमत झाल्यामुळे स्टुअर्टला आपण १००% चुकीचं बोललो असं वाटलं.
'सडॅ, तुझा पॉझिटिव्ह अॅप्रोच मला खरंच आवडला. यू रिअली गेव्ह ११०%. या धंद्यातल्या निटी-ग्रिटीज... नट-एन-बोल्ट्स तुला चांगल्या माहीत आहेत. यू गेव्ह युवर बेस्ट शॉट! बट, अॅट द एंड ऑफ द डे, यू कॅन्ट कंट्रोल एव्हरिथिंग, कॅन यू?'
'नो, यू कॅन्ट!.. तुला एक गंमत सांगतो.. मी एकदा मुंबईला गेलो होतो.. कंपनीच्या कामाला. त्या वेळेला मी दुसर्या कंपनीत होतो. त्या कंपनीचं एक ऑफिस होतं अंधेरीला! दर महिन्याला तिकडे जायला लागायचं मिटिंगसाठी. मिटिंग संपली की लोकल पकडून दादरला यायचं.. मग एशियाड पकडून पुण्याला जायचं असं रूटिन ठरलेलं होतं..'.. सदाची असंबद्ध ष्टोरी सुरू झाल्या झाल्या आपल्या मेंदुत कुणी तरी मटकी भिजत घातलीये आणि त्यांना एकदमच कोंब फुटलेत अशी चमत्कारिक संवेदना स्टुअर्टला झाली.
स्टुअर्ट: 'तू पोरांना सांगितलं आहेस की नाही अजून?'.. ष्टोरी कट केल्यामुळे सदानं खेळणं काढून घेतलेल्या मुलासारखा चेहरा केला.
सदा: 'नाही. अजून नाही. आधी तुला सांगावं असा विचार केला'. दरम्यान, तिकडून येणार्या रेवतीला बघून सदाच्या आयडियाच्या गुलाबाला फूल आलं.
स्टुअर्ट: 'मला? मी सांगितलेलं मलाच सांगणार? आणि तेही आधी?'.. स्टुअर्टचा मेंदू कोंबांच्या मेझात गुरफटला.
सदा रेवतीकडे बघत म्हणाला... 'सॉरी रेवती! आपली लंच अपॉईंटमेंट ना? आलोच २ मिन्टात'.. आता रेवतीचा मेंदू गुरफटला.. 'कुठली अपॉईंटमेंट?'
सदा स्टुअर्टला घाईघाईत म्हणाला.. 'बायदवे, तुझं ताजमहाल कॅन्सल केलंय.. मी पळतो.. बाय!'. मग पळत पळत रेवती जवळ गेला आणि कुजबुजला.. 'आत्ता काही बोलू नकोस. माझ्या बरोबर चल नुसती'.. सदानं तिचा हात धरला व जवळपास ओढतच तिला ऑफिसच्या बाहेर घेऊन गेला. ऑफिस बाहेर आल्यावर सदाने तापलेल्या तव्यावर पाणी टाकल्यासारखा आवाज करत सुस्कारा सोडला. तिचा हात सोडून म्हणाला.. 'सॉरी! त्या स्टुअर्ट पासून पळण्यासाठी मी हे नाटक केलं. बोल! कुठे जायचं जेवायला?'
'आँ! जेवायला? आत्ता चार वाजलेत महाराजा! दुपारच्या खाण्याची वेळ झाली माझी!'
'बरं तू दुपारचं खा! मी सकाळचं जेवतो'.. ते जवळच्या उडपीत गेले.
रेवती: 'कशाबद्दल झापत होता क्लायंट तुझा?'
'तो कुठला झापतोय? मीच सुनावले दोन शब्द.. त्याला जरा. पण त्याचं आपलं तेच तेच तेच तेच चाललं होतं, मग म्हंटलं आता पळा!'
'तू क्लायंटला सुनावलंस?'.. रेवतीच्या चेहर्यावरून धरणाच्या दरवाज्यातून उचंबळणार्या पाण्यासारखा आदर ओतप्रोत ओसंडू लागला.
'हो! मग काय तर! आपण नाय ऐकून घेत.. भलतं सलतं.. उगाच!'.. 'अमेरिकेची फॉरेन पॉलिसी आवडली नाही तर ओबामाला सुद्धा सुनवायला कमी नाय करणार' असा एकंदर आविर्भाव!
'बरं झालं. पण त्यामुळे मला तुझ्याकडून एक पार्टी मिळाली'
'हां, पार्टीसाठी क्लायंटची गरज नाही. कधीही माग! बायदवे, आपण एकमेकांना अरे तुरे करायला लागलोय हे तुझ्या लक्षात आलंय का?'
'हो! केव्हाच! आणि खरं सांगायचं तर... तर.. मला..... आवडलं ते.'.. पायाच्या अंगठ्याने फरशीवर रेघोट्या मारायची उबळ, पायातल्या बुटांमुळे, रेवतीने मारली.
'म.. म.. मला पण.'.. दोघांना तरुणाईतल्या नाजुक क्षणांची आठवण होऊन एकमेकांबद्दल अचानक आपुलकी वाटायला लागली.. परंतु दुसर्याच्या मनात नक्की काय आहे ते वय वाढलं तरी न कळल्याने घोड्यानं पेंड खाल्ली!
'तुझी बायकोशी खूप वेळा होते का रे बाचाबाची?'.. रेवतीने सफाईदारपणे रेड सिग्नल जंप केला.
'बायकोशी होते त्याला बाचाबाची कसं म्हणणार? त्याला बाची म्हणता येईल फार फार तर! हा हा हा! तुला माहिती आहे का? बायकांसाठी नवरा हा ७ जन्मांचं गिर्हाईक असतो.'
'साप हा सापच असतो म्हणतात तसं बायको ही शेवटी बायकोच असते, बरं का!'
'हां! पण एक फरक आहे.. सापाला तीच तीच पुंगी वाजवून परत परत झुलवता येतं.'
'कजरारे कजरारे'.. सदाच्या फोनने गळा काढला.. 'बोल बायको'
'मला सांग, तू आत्ता हॉटेलात हादडतोयस का? डबा खायचा सोडून? माझ्या मनात आत्ता तसं उमटलं'
'आँ! छ..छ..छे छे! आकुंचन महाराजांमुळे तुझं मन जास्तच आकुंचन पावतंय.'
'मग ट्रॅफिकचे आवाज कसे येताहेत?'
'हां... ते... अं अं अगं माझी खिडकी उघडी आहे'.
'बरोबर कोण आहे?'
'क क कुणी नाही!'..फोन बंद करून सदाने रेवतीकडे पाहीलं. त्याची नजर चुकवून तिनं हळुवारपणे विचारलं... 'तू.. तू.. बंडल का मारलीस?'
'बंडल? अं? ओss! बंsडल! त्याचं काये! मला ना डब्यातलं गार खाणं म्हणजे लिबलिबित थंडगार गोगलगाय खाल्ल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा ऑफिसातल्या एखाद्या घरच्या जेवणाला मुकणार्या बुभुक्षिताला डबा दिला की बाहेरचं चमचमित कदन्न खाता येतं! तेही तुझ्याबरोबर!'
'ती बंडल नाही रे! बरोबर कुणी नाही म्हणालास ती!'
'नाऊ! यू डोन्ट गेट एनी आयडियाज! ओके?'.. सदा अभ्यासाच्या पुस्तकात नको ते पुस्तक सापडल्यासारखा लाजला.
'ऑफकोर्स नॉट! व्हाय वुड आय गेट एनी आयडियाज?'
'बरं ते जाऊ दे! मला तुझी मदत हवीये. इथल्या सर्व प्रोजेक्टांच्या कोडमधे पेरलेल्या बगांची रोपं तरारून आता त्यांचा एक छान बगीचा झालाय. त्यांचे वेलू गगनावरी गेलेत. म्हणून तर राकेशने आपण क्वालिटीचा वसा घेणार असल्याची दवंडी पिटली आणि तुला घेतलं. तर मला आधी सांग की क्वालिटीने बग जातात का? म्हणजे मला क्वालिटीबद्दल काही माहीत नाही म्हणून विचारतोय.'
'ऑफकोर्स जातात.'
'म्हणजे क्वालिटी गृपकडे घोस्टबस्टरसारखे बगबस्टर लोक असतात का? की त्यांनी क्वालिटीचं डीडीटी मारलं की सगळे बग गायब होतील.. मग धंदा आपोआप वाढेल.. गिर्हाईकं प्रेमाने बोलतील.. राकेश गहिवरून सुट्टी घे म्हणेल.. बायकोचे भांडायचे विषय कमी होतील.. मला पोरीशी चार शब्द बोलायला मिळतील.. एकूण, सर्व पृथ्वीवर शांतता नांदेल.....!'
'हा हा हा! यू आर सो नाईव्ह! ते इतकं सोप्पं नाहीये. आधी सगळ्या बगांचं विश्लेषण करायचं. मग त्यातल्या टॉप २०% कारणांसाठी उपाय योजना केलीस तर ८०% वेळा परत बग येणार नाहीत. यू नो ना?.. द एटी ट्वेंटी रूल?'
'त्यासाठी इतका उपद्व्याप कशाला करायचा? मी आत्ताच सांगतो ८०% बग कशामुळे येतात ते... प्रोग्रॅमरच्या हलगर्जीपणामुळे!'
'तू विश्लेषण केल्यावर आपण जेवायला जाऊ आणि बोलू त्यावर! यू वुड बी सरप्राईज्ड! आत्ता मला अलका बरोबर मिटिंग आहे.. मी निघते.'
लंच करून परत आल्यावर केबिनमधे स्टुअर्टला बसलेला पाहून सदाच्या पोटात शहाण्णव कुळी गोळा आला. त्याला पाहून स्टुअर्ट शांतपणे म्हणाला.. 'कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून वरती तुमच्याकडून ताजमहालची ट्रिप उकळणं मला काही प्रशस्त वाटत नव्हतं. म्हणून मी स्वतःच ते कॅन्सल करा हे सांगायला आलो होतो. बरं झालं तुम्हीच केलं ते! अर्थात, तुम्ही नसतं केलं तर मला खरच प्रोजेक्ट कॅन्सलेशनचा पुनर्विचार करायला लागला असता. असो. मी जातो आता. गुड बाय!'
=========================================================
अभयः 'सर, ते कस्टमरकडून स्पेक्सचं डॉक्युमेंट आलंय त्यात व्हायरस आहे.'
सदा: 'अर्रर्रर्र! कुठं ठेवलंय ते?'
'रंभेवर'.. रंगेल अॅडमिनने ऑफिसातल्या सर्व्हर्सना अप्सरांची नावं दिली होती.
'अरे मग लगेच तिला घटस्फोट नाही का द्यायचा?'
'सर मी केलं तिला नेटवर्क वरून डिसकनेक्ट, लग्गेच!'.. अभयने 'मला थोडी अक्कल आहे' असा चेहरा केला.
'बरं, मग काय प्रॉब्लेम आहे?
'रंभेवरचा अँटिव्हायरस चालत नाहीये. सीडीवर जुनं व्हर्जन आहे.'
'मग नेटवरून लेटेस्ट घे ना.!
'सssssssर! रंभे वरच आपला इंटरनेट सर्व्हर आहे.'
'हम्म! मेनकावर लेटेस्ट कॉपी असेल बघ.'
'मेनकाचा पासवर्ड काय?'
''आल्या नाचत नाचत मेनका रंभा' हाच दोघींचा पासवर्ड आहे.'
=========================================================
सदा: 'संगिता, तुला माहितीच आहे मी या वनॉन-वन मिटिंगा कशासाठी घेतोय ते!'
संगिता: 'नाही सर! का?'
'अगं काय हे? दोन आठवड्यांपूर्वी मी मोठी मेल पाठवली होती त्याबद्दल!'
'हो का?.. असेल. सर... मला ना.. मोठ्ठ्या मेल वाचायला बोअर होतं. सर, पण माहितीये का? आजच्या माझ्या भविष्यात होतं.. महत्वाच्या विषयावर चर्चा कराल म्हणून.. ते खरं झालं'
'असं होय. कुणाचं वाचतेस तू? मी मटा मधलं वाचतो. काल माझा खर्च होईल असं होतं पण घरी जाई पर्यंत काहीच झाला नाही. म्हणून मी मुद्दाम घरात पाऊल ठेवायच्या आधी पोरीसाठी चॉकलेट घेऊन गेलो.'
'मी सकाळ मधलं वाचते!'
'हॅ! त्यातलं रद्दी असतं! काय पण लिहीतात एकेक.. स्त्री-पुरुष यांच्यातल्या अहंकाराच्या ज्वाळा भडकतील.. मनाच्या प्रदूषणाला कोणतंही तथाकथित अँटिबायोटिक लागू पडत नाही.. प्रेमिकांनो, गाठीभेटी घ्याच.. गुरुभ्रमणाचं अंडरकरंट मोठ्या सुखस्वप्नांचं पॅकेज घेऊन येणारे, मात्र, समोर बघून चाला.'
'सर, प्रोजेक्ट कॅन्सल होणारे?'
'आँ! तुला कुणी सांगितलं?'
'अॅडमिनचा समीर म्हणाला.. म्हणून स्टुअर्टची ताजमहाल ट्रिप कॅन्सल केलीये असं पण! सर, प्रोजेक्ट गेल्यावर आमचं काय होणार?'
'हे बघ! अजून नक्की काही नाहीये तसं! त्यानं आत्ता धमकी दिलीय नुसती! बाय द वे, तुला एकंदरीत कंपनीबद्दल काय वाटतं? तुझ्या काही तक्रारी आहेत का? पगाराबद्दल काय मत आहे? तुला काम करायला काय अडचणी येतात? माझ्याबद्दल काय वाटतं? अशा सगळ्या गोष्टींची चर्चा करायलाच ही मिटिंग घेतली आहे. तेव्हा मोकळ्या मनाने सांग!'
'सर! तसं सगळं ठीके!.. पण.. सर.. ती.. ती अकाउंट्सची लोकं भारी त्रास देतात.'
'या, टेल मी अबौटिट! काय त्रास दिला? पगार वेळेवर केला नाही का?'
'नाही सर! डेक्कन पर्यंतचे रिक्षाचे ६०रू दिले नाहीत. म्हणाले ५२ रू च्या वर होत नाहीत. सर, आता मी कशाला जास्त लावू?'
'बरंsss! मी बोलतो अकाउंटशी! अजून काही?'.. संगिता गेल्यावर सदानं अकाउंट्सच्या सायली कुरतडकरला फोन लावला.. 'हॅलो सायली! संगिताचं रिक्षाचे ६०रू बिल का नाकारलं?'
'अहो सर! ही पोरं ना वाट्टेल ती बिलं लावतात! डेक्कनपर्यंत ५२रू च्या वर होत नाहीत हो!'
'असं होय? तुला कसं कळलं?'
'माझ्याकडे दुसर्या एकाचं बिल आहे ना ५२रू चं!'॑.. यापुढे कितीही वाद घातला असता तरी अकाउंट्सकडून ८रू सुटले नसते हे जाणून सदा तडक एचार मॅनेजर प्रिया आगलावेंच्या केबिनात गेला.
'मॅडम! एक प्रॉब्लेम आलाय.'
'बोला!'
'संगिताचं रिक्षाचे ६०रू बिल अकाउंट्सनं नाकारलं कारण डेक्कनपर्यंत ५२रू च्या वर होत नाहीत म्हणे!'
'मग काय चुकलं त्यांचं?'
'काही रिक्षांचे मीटर फास्ट असतात. कधी ट्रॅफिक खूप असतं.. सिग्नल लागतात.. मग काय करणार? केवळ दुसर्या माणसाचं ५२रू झालं म्हणून कसं चालेल? आणि संगिताला ७/८ रू नं काय फरक पडणारे? ती घरची चांगली श्रीमंत आहे. ती एका शॉपिंगला जितके उडवते ना तितका त्या सायलीचा पगार पण नसेल.'
'हम्म्म! बरोबर आहे पण त्यांच्याशी वाद काय घालणार? एस्पेशियली त्यांच्याकडे ५२रू चं बिल आहे म्हंटल्यावर? आपलं.. अकाउंट्स.. तसं.. जरा पेनी वाईज पाउंड फूलिश कॅटेगरीतलं आहे!'.. बाई एकदम कुजबुजत्या आवाजात बोलायला लागल्या.. 'मागे एकदा कॉर्पोरेशन टॅक्स भरायच्या शेवटच्या दिवशी एकाला पाठवला.. ब्रीफकेस मधे कॅश घालून दीड लाख रुपयांच्या वर!.. कारण शेवटच्या दिवशी चेक घेत नाहीत.. तो तिथल्या कँटिनमधे चहा पीत असताना ती ब्रीफकेस कुणीतरी मारली. आता बोल!'
'आधी का नाही भरला चेक?'
'अरे आधी पैसे दिले तर तितक्या दिवसाचं व्याज पडतं ना करंट अकाउंटवर?'
'हं! बरोबर! ठीके... मी सांगतो तिला तसं!'
'मी फार फार तर बोलेन त्यांच्याशी! पण मला वेगळं उत्तर मिळेल असं वाटत नाही.'.. सदा जायला निघणार तितक्यात बाईंनी कुजबुजत्या आवाजात परत सुरुवात केली.. 'हे बघ! संगिता एकंदरीत खूपच पॉप्युलर आहे ना? बरीच मुलं तिच्या मागेपुढे करत असतात.'
'हो अर्थातच! ती सुंदर आहे ना!'
'परवा तू लोकं सोडून जातील असं म्हणत होतास! इफ यू पुट टू एन टू टुगेदर.. यू नो व्हॉट आय मीन?'.. बाईंनी सूचकपणे विचारलं.
'नो! आय डोन्ट!'
'अरे! संगिता एक मॅग्नेट आहे. ती राहिली तर बाकीचे आपोआप चिकटून रहातील.. गॉटिट?'
=========================================================
अभयः 'त्या पासवर्डच्या तालावर मेनका नाचत नाहीये.'
सदा: 'मेनका चालू नसेल'
'सरsssssssss! काय तरीच काय? ती चालूच आहे.'.. गाडी सुरू होत नाही म्हंटल्यावर किल्ली फिरवून पाहिलीस का? असं विचारण्याने अकलेचा जसा पंचनामा होईल तसा अभयचा झाला!
'तू चुकीचा मारत असशील. थांब, मी ट्राय करतो.'.. थोड्या लढाई नंतर पासवर्ड चालत नाही हा साक्षात्कार झाला.. 'आयला, पासवर्ड कुणी बदलला? .. आणि बदलल्यावर मला का नाही सांगितला?'
'मला काय माहित?'
'बरं आता असं कर! अॅडमिनला सांग पासवर्ड रिसेट करायला. आणि मेनकेवरून अॅंटिव्हायरसचं इंजेक्शन घेऊन रंभेला टोच. काय?'
अभय थोड्याच वेळात तोंड वेंगाडत परत आला.. 'सर! अजून प्रॉब्लेम झालाय'
सदा: 'आयला! आता काय झालं?'
'मी तो अँटिव्हायरस टोचल्यावर त्यानं विचारलं.. रिपेअर करू का? त्याला 'हो' म्हंटल्यावर त्यानं ते डॉक्युमेंटच उडवलं.'
'बोंबला! आता मी 'हा हन्त हन्त' म्हणू की 'हा जन्त जन्त'?'
=========================================================
संगिता: 'सर मी येऊ?'
सदा: 'हो हो ये की! काय चाल्लंय? तो प्रोग्रॅम झाला का? काल संपवणार होतीस ना?'
'नाही सर! माझं लॉजिक चालत नाहीये.. ते निखिलला दिलंय बघायला! आणि स्क्रीन डिझाईनमधे जरा इश्यू आहेत.. ते अभय बघतोय!'
'हम्म! बरं मग आता ते कधी होणार?'
'त्यांना विचारून सांगते. सर, तुमच्याइतकं कोणीच मला समजुन घेत नाही.'.. अशी वाक्यं समोरच्याला घोळात घेण्याआधीचं प्रास्ताविक असतं हे सदाला माहीत नव्हतं!
'अगं! ए मॅनेजर गॉट टु डू व्हॉट ए मॅनेजर गॉट टु डू!'.. आपलं कौतुक ऐकणं सदाला काँक्रिटमधे उगवलेल्या गुलाबाइतकं दुर्मिळ होतं.
'सर मला रजा हवी होती.. २ दिवसांची!'
'कशासाठी? तुला माहिती आहे ना?... सध्या जरा टाईट परिस्थिती आहे'
'आत्याच्या दिराच्या मावसभावाच्या मैत्रिणीच्या मुलाचं लग्न आहे.. जळगावात! जवळचं आहे सर'
'रजेबद्दल माझं काय म्हणणं आहे तुला माहिती आहे का संगिता?
खुदी को कर बुलंद इतना, के
हर तहरीर से पहेले,
बॉस बंदे से खुद पुछे,
बता, तुम्हे कितनी रजा चाहीये?
हा हा हा! बरं घे दोन दिवस! पण दोन म्हणजे दोनच दिवस हं! मागच्या वेळेसारखं करू नकोस.'
'नाही सर! तेव्हा माझी ट्रेन चुकलेली!'
'बरं, मग या वेळेला ट्रेन चुकवू नकोस! आणि हे तुझ्या रिक्षाच्या बिलाचे ८रू... उरलेले! अकाउंटशी लढून लढून मिळवले शेवटी! उपनिषदात म्हंटलेलं अगदी सत्य आहे बघ.. सत्यमेव जयते!'
'थँक्यू सर! तुम्ही माझ्यासाठी भांडलात? कित्ती गोsssड!'
'हॅ हॅ! थँक्यू काय त्यात? होणारच नाही म्हणून आपण डोकं धरून बसलं की कधीच होत नाही! म्हणून लढायचं! माझा बाणा असा आहे. तिकीट न घेता लॉटरी लागत नाही!'
काही दिवसांनी सायलीचा सदाला फोन आला....'सर! एक काँप्लिकेशन झालंय!'
'काय?'
'म्हणजे तसं काही विशेष नाही... पण हल्ली संगितासकट सगळेच जण रिक्षाचे ६०रू. लावतात!'
'बघ! तरी मी तेव्हा तुला म्हणत होतो.'.. सदा मनातल्या मनात फुगा फुटल्यासारखा हसला.
'सर पण नाही होत हो ५२रू च्या वर! ठीके! मी ५२च पास करते.'
त्यानंतर दोन दिवसांनी सदानं संगिताला बोलावलं.. 'संगिता! मी काल रिक्षानं डेक्कन पर्यंत गेलो होतो.'
'का? गाडी बंद पडली?'
'नाही! मला बघायचं होतं... किती होतात ते!'
'हो? मग किती झाले?'
'अवघे ४२रू! आता मला सांग तू ६० रू का लावतेस?'
'सर! त्याचं काय आहे! आम्ही सगळे ५२रू लावायचो. कारण कुणी कमी लावले की सायली मॅडम त्या नंतर सगळ्यांना कमीच देतात. त्या दिवशी मी चुकून ६० रू लावले. आणि तुम्ही ते पास करून घेतले. मग मी सगळ्यांना तसं सांगितलं!'
-- भाग -३ समाप्त --
5 comments:
AAWARAA!!!
laich bhaaree rao!!!
झकास as usual.... :D
zakass!! :)
atishay sundar, khuskhushit, halak fulak likhan.
atishay sundar, khuskhushit, halak fulak likhan.
Post a Comment