तीन पैशाचा तमाशा!
१९७८ मधे पुलंचा तीन पैशाचा तमाशा मी प्रथम पाहिला आणि त्यानं मला झपाटलं. फक्त माझीच नाही तर तेव्हाच्या सर्व तरुण वर्गाची हीच अवस्था होती! सुमारे १०/१२ वेळा तो तमाशा मी पाहिला असेन. तो ब्रेख्टच्या थ्री पेनी ऑपेराचं स्वैर रुपांतर आहे असं कळल्यावर मूळ ऑपेरा बघणं अपरिहार्यच होतं. तमाशा बघताना असं कुठेही जाणवत नाही की आपण हे रुपांतर बघत आहोत इतकं पुलंनी ते रुपांतर चपखल आहे, आपलंसं करून टाकलं आहे. त्यामुळेच मूळ नाटकात नक्की काय होतं आणि पुलंनी रुपांतर करताना कुठे आणि कसे बदल केले हे समजून घेण्यात मला स्वारस्य होतं. पण ते नाटक बघण्याचा योग बरीच वर्ष काही आला नाही. शेवटी २०१६ सप्टेंबरमधे लंडन मधील रॉयल नॅशनल थिएटर ते सादर करणार असल्याचं समजल्यावर ती संधी दवडणं शक्यच नव्हतं. शिवाय ते नाटक बघायला लंडनला जाण्याची पण गरज नव्हती कारण त्याचं थेट प्रक्षेपण जगभरच्या २००० चित्रपटगृहांमधे होणार होतं. त्यामुळे मला ते तब्बल ३८/३९ वर्षांनी का होईना इथे ऑक्सफर्डच्या एका चित्रपटगृहामधे विनासायास बघायला मिळालं. सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे हा तमाशा १९७८ मधे प्रथम आला आणि मला वाटतं ४/५ वर्षानंतर बंद देखील पडल...