सायकलगाथा
इंग्लंड आणि युरोपात फिरताना इतक्या विविध प्रकारच्या सायकली पहायला मिळतात की मति गुंग होते! इतक्या कल्पक आणि वैविध्यपूर्ण रचना पाहून नेहमीच असा विचार येतो की या लोकांना हे असलं काही सुचतच कसं? इतकी सर्जनशीलता आली कुठुन? त्याचं कारण म्हणजे भारतात मी फक्त तीनच प्रकारच्या सायकली पाहिल्या. एक आपली नेहमीची लेडिज/जेन्ट्स सायकल व त्यांचं लहान मुलांसाठीचं छोटं रूप. दुसरी लहान मुलांची तिचाकी आणि तिसरी खूप वर्षांनंतर आलेली गिअरची. खलास! माझं चहुकडून झापडं लावलेलं बंदिस्त डोकं! कधी वेगळा विचार करायची सवयच नाही लावली तर काय होणार दुसरं? केला असता तर किर्लोस्करांनंतर मराठी उद्योजकांमधे माझं नाव नसतं का घेतलं? असो. पण गुगल करण्याइतकी अक्कल असल्यामुळे सायकलीची उत्क्रांती कशी झाली हे बघायला मांडी ठोकली. हे संशोधन करताना पहिला धक्का बसला तो जगातल्या सगळ्यात पहिल्या सायकलीचं चित्र बघून! (पहा चित्र १ मधील १८१८ तली सायकल. १८१८ साल पेशवाईच्या अस्तामुळे माझ्या मनात फिट्टं बसलंय. एखाद्या कालखंडात भारतात आणि परदेशात काय चाललं होतं हे बघायला गंमत वाटते. उदा. ज्या काळात शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याचा पाय...