एका मुलीचं रहस्य!
दुपारी ३ वाजता दारावर टकटक झाली आणि नियतीने दार उघडून एका मध्यमवयीन माणसाला आत घेतलं. 'नमस्कार! मी ठोकताळे साहेबांना भेटायला आलोय.' आपल्या समोर एका अत्यंत सुंदर ६ फुटी उंच सोनेरी केसाच्या स्त्रीला पाहून त्या गृहस्थाचे डोळे चमकले. नियती होतीच तितकी सुंदर.. रेखीव शेलाटा बांधा, गोरीपान अंगकांती, गोड चेहरा, मानेवर रुळणारे सोनेरी केस, कोलगेटच्या जाहिरातीतल्या बाईसारखी शुभ्र व मोत्यासारखी दंतपंक्ती, खुलून दिसणारं नकटं नाक आणि मादक भुरे डोळे. तिनं जीनची निळी पँट आणि वर गुलाबी टीशर्ट घातला होता. 'आपलं नाव?' नियतीने तिच्या गंगुबाई हनगळी आवाजात विचारणा करताच त्याच्या डोळ्यातली चमक मावळली. ते न लक्षात येण्याइतकी नियती आंधळी नव्हती पण त्याची तिला आता सवय झाली होती. तिला स्वतःलाही तिचा आवाज आवडत नसे, पण तिचा नाईलाज होता. 'दीपक इंगवले' 'या! या! मी नियती डोईफोडे, ठोकताळेंची असिस्टंट, बसा ना!' नियतीने उत्तम ठोकताळे समोरच्या एका खुर्चीकडे निर्देश केला. ते ऑफिस एका 1 BHK फ्लॅट मधे थाटलेलं होतं. हॉलमधे पुस्तकांनी भरलेली ४/५ कपाटं होती. टीपॉय आणि स्टडी टेबलवर अनेक पुस...