स्वप्नांवरती बोलू काही!
स्वप्नांच्या बाबतीत मी तर्हेवाईक आहे. म्हणजे मला रोज तर्हेतर्हेची स्वप्न पडतात अशा अर्थाने हो! आणखी कुठल्या कुठल्या बाबतीत मी तर्हेवाईक आहे ते माझे हितचिंतक सांगतीलच. खरं म्हंटलं तर स्वप्न पडणं यात काही विशेष नाही कारण स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. प्रत्येकाला रोज साधारणपणे ५ स्वप्नं पडतात आणि प्रत्येक स्वप्न सुमारे १५ ते ४० मिनिटं चालतं असं म्हणतात. काही लोकांना आपल्या बायकोने नक्की काय आणायला सांगितलं होतं हे जसं आठवत नाही तशी स्वप्नं पण नंतर आठवत नाहीत इतकंच! मग मी का स्वप्नांबद्दल बोलतोय? कारण माझी बौद्धिक क्षमता बघता मला फक्त स्वप्नांसारख्या हलक्याफुलक्या विषयांवरच त्यातल्या त्यात बोलायला जमतं. मी आयुष्यासारख्या जड गंभीर आणि किचकट विषयावर बोलू शकत नाही. शिवाय, मला असं जाणवलं की हल्ली मी स्वप्नांबद्दल बोलतच नाही. पूर्वी मला स्वप्न पडलं की मी सकाळी सकाळी बायकोला मार्टिन ल्युथर किंगच्या आवेषात 'I had a dream!' असं सांगायचो आणि ती तितक्याच थंडपणे 'हां, ती कालची भांडी घे धुवून!' असं सांगून माझ्या स्वप्नसृष्टीला सत्यतेची कल्हई लावायची. शिवाय मला असं वाटतं की बरेच लोकही ...