'हॅलो! कोण बोलतंय?'.. राजेशनं आवाज बदलून बबिताचा फोन घेतला.
'हॅलो! मी बबिता बोलतेय! राजेशला फोन द्या जरा!'
'सॉरी मॅडम! पण राजेश सर प्रचंड कामात आहेत. काही मेसेज आहे का? ते नंतर फोन करतील'.. बबिताला राजेशकडच्या या नवीन असिस्टंटने थोडं संभ्रमात टाकलं खरं पण लगेचच तिची पेटली.
'राजेsssssश! यू ब्लडी प्रिक! हौ कुड यू?'
'हाsssssय बब्बड!' .. राजेशनं आवाजात खोटं खोटं मार्दव आणलं.
'अरे हाय काय म्हणतोस? स्टुपिड!!'.. बबिताचा चढलेला सूर राजेशला अपेक्षितच होता.
'हाय नाहीतर काय बाय म्हणू?'.. विनोद करून ताण सैल करायच्या प्रयत्नाला यश मिळालं नाही.
'तू माझ्या पेंटिंगच्या एक्झिबिशनला यायचं प्रॉमिस केलं होतंस! मी सकाळी तुला रिमाईंड केलं होतं. तरिही यू लेट मी डाउन! का? का?'.. बबिता सात्विक संतापाने बोलत होती त्यात तिला मागून एका बाईचा आवाज ऐकू आला व ती दचकली. म्हणजे तिला मिळालेले रिपोर्ट खरे होते तर!
'आयॅम सॉरी गं बब्बड! पण मला प्रचंड काम आहे इथे! अक्षरशः चहा घ्यायला पण वेळ नाही गं! आणि मला कुठं काय कळतंय त्यातलं?'.. राजेश काकुळतिच्या सुरात म्हणाला.
'मग तू मला तुझ्या कविता का पाठवतोस मला समजत नाहीत तरी? शेम ऑन यू! सेल्फ सेंटर्ड हिपोक्रिट! सगळं मी, माझं, माझ्यासाठी! बाकीचे सगळे लाईक डर्ट!'
'अगं खरंच काही कळत नाही! मागच्या वेळेस तू काढलेलं ते चित्र मला अजून आठवतंय.. दोन चौकोन, त्यांच्या मधून जाणार्या दोन आडव्या आणि चार उभ्या रेघा! इकडे तिकडे वर्तुळं आणि चित्रविचित्र शेप! याचा काय अर्थ लावणार, सांग ना?'
'अरे ते पेंटिंग बघून मनात ज्या फिलिंग येतात तो त्याचा अर्थ! मागे पण सांगितलंय तुला मी हे!'
'मला तसली चित्रं बघितल्यावर फाडून फेकून द्यायचं फिलिंग येतं!'.. राजेश चुकून खरं ते बकला.
'......यू आर सोssss मीन! खूप इन्सल्ट ऐकून घेतले मी!'
'ओह! सॉरी बब्बड मला अगदी तसं म्हणायचं नव्हतं हं!'
'दॅट्स इनफ! डोंट ट्राय टॉकिंग टु मी! एव्हर! लूझर!!'.. फोन कट झाला.
------***-----------***---------
'हो! हो! उद्या काही स्टंटचं शूटिंग आहे तर मग ये उद्या. तिथे बोलू पुढच्या प्रोजेक्टबद्दल. ओके?'.. नमिता फोनवर कुणाशी तरी बोलत असताना तिला बबिता आलेली दिसली. तिला हातानेच बसण्याची खूण करत तिनं बोलणं चालू ठेवलं.
'......'
'उद्या सकाळी 8 वाजता. आणि हे बघ! डोंट बी लेट हं मागच्यासारखा, ओके?'
'काय कशी आहेस तू बबडे?'.. मोबाईल ठेवून हसत नमितानं विचारलं.
'डोंट स्माईल हं नमडे! आयॅम मॅड अॅट यू!'
'का?'.. नमिता गंभीर झाली.
'अगं का काय, का? तू येणार होतीस एक्झिबिशनला!'
'येस! येस! माझ्या पर्फेक्ट लक्षात होतं पण राजेश केम विथ मूव्ही टिकिट्स अगदी 11थ अवर, युनो?'
'व्हॉट? राजेश आणि तू? ओ माय गॉड! नो वंडर!'.. बबितानं डोकं गच्च पकडलं.
'हो, मी आणि राजेश! आणखी कुणा बरोबर जाणार मी?'.. नमिताचं निरागस स्पष्टीकरण ऐकून बबिताचा संयम सुटला.
'म्हणजे? संदीपचं काय झालं?'..
'ओ! तो! मी डंप केलं त्याला हेहेहे!'
'व्हॉट? व्हाय?'
'एक नंबर कॉवर्ड गं तो! बॉडी चांगली मस्त, सिक्सपॅक एन ऑल पण फुल्टू कॉवर्ड. युनो?'
'ए! पण हाऊ डिड युनो?'
'हा हा हा हा! अगं मी ड्रामा केला, युनो! माझ्या एका स्टंटमनलाच माझी पर्स चोरायला सांगितलं. आणि युनो संदीप? गॉट शिट स्केअर्ड! हाहाहा! संदीप स्टॅमर करायला लागला, युनो? हाहाहा! सो फनी! समहाऊ त्याला 'ए! ए! ए! क् क् क्या कर रहा है बे?' म्हणाला तर त्यानं सुरा दाखवला. ओमायगॉड! सो फनी! मी हसणं दाबत होते, युनो, ट्राईंग टु लुक स्केअर्ड एन ऑल! पण सुरा बघितल्यावर संदीप जे घाबरून पळत सुटला ते बघून आय जस्ट कोलॅप्स्ड लाफिंग! हा हा हा हा! तेव्हा राजेश तिथे आला आणि त्यानं त्याच्याशी थोडी मारामारी तरी केली. पर्स घेऊन ही रॅन अवे पण ती मला परत मिळणार होतीच. बट राजेश शोड करेज!'..
'नमे! तू माझा बॉयफ्रेंड स्टील केल्याचं मलाच सांगते आहेस, किती शेमलेस गं तू? आपण दोघी फ्रेंड्स आहोत.. लाईक फॉर एजेस!! तरी पण तू डिच केलंस मला आणि हर्ट केलंस!!!!'.. बबितानं वैतागून टेबलवर डोकं आपटलं.
'ऑ! तुझा बॉयफ्रेंड? ओssss येस, तो पण राजेशंच आहे नाही का! हॅ! हॅ! तो नाही! अगदीच सिसी गं तो! अंधारात एकटा जायला टरकतो तो! ए, सॉरी हं कंफ्युजन बद्दल! माझा राजेश चांगला 6 फुटी उंच आणि एकदम शेपमधे आहे.'
'थँक गॉड! आयॅम सो रिलिव्हड!'
'ए! तुला खरंच वाटलं?'
'अगं मला ना राजेशबद्दल खूप डाउट्स आहेत सध्या! तो चेंज झालाय, युनो? सारखा बिझी आहे म्हणतो, मला अव्हॉइड करतो. काल एक्झिबिशनला पण आला नाही प्रॉमिस करून सुद्धा! मेबी हि इज सिइंग समवन! काय करावं कळत नाहीये गं मला!'.. बबिता अगतिक झाली.
'डंप हिम!'
'डंप हिम? जस्ट लाईक दॅट? नाही गं, तसा चांगला आहे तो! काय मस्त डोळे आहेत त्याचे. व्हेरी एक्सप्रेसिव्ह!'
'तुला रिअली रिअली वाटतंय का की हि इज सिइंग समवन?'
'हो! त्याला फोन केला ना की कधी कधी मागून गर्ली व्हॉईस ऐकू येतो, युनो? माझ्या काही फ्रेंड्सनी पण कन्फर्म केलं तसं!'
'बबडे! माझ्या एखाद्या स्टंटमनला सोडू का त्याच्यावर? सुरा दाखवून खरी खरी माहिती काढून आणेल तो!'
'ओ! नो! नो! नो! तुला राजेश माहिती नाही. त्याच्या घरात ना, खूप हिड्न कॅमेरे आहेत. त्यातलं रेकॉर्डिंग पोलिसांकडे गेलं तर यू वुड बी लाईक प्रिझनमधे'
'मग काय करणारेस तू?'
'काय करावं? डोंट नो! ट्रुथ समजण्यासाठी मी त्याच्या बेडमधला ढेकूण पण व्हायला तयार आहे बघ!'
'हिड्न कॅमेरा? मायक्रोफोन?'
'त्याला ते ठेवताना कळेल गं! काहीतरी असं पाहिजे की तो सस्पेक्ट नाही करणार, युनो.'
'हम्म्म्म्म! एखादी सेक्रेटरी पाठवली त्याच्याकडे तर?'
'पण अगं तो आहे फार फिनिकी. जराशी मिस्टेक झाली ना तरीही तो तिचं लाईफ मिझरेबल करेल.'
'हाँ! आयडिया! आपण एक ह्युमन लाईक रोबॉट पाठवू या का?'
'नमडेsss! पर्फेक्ट! तो पक्का टेक्नोक्रॅट आहे. त्याला आवडेल एखादा रोबॉट! पण तो मिळेल कुठे?'
'अगं! संदीपची कंपनी बनवते रोबॉट! त्याला हवेच असतात गिनिपिग्ज! मी बोलते त्याच्याशी! तू राजेशला पटव, ओके?'
'पण तू त्याला डंपलायस ना? तो का हेल्प करेल आपल्याला?'
'अगं त्याला अजून होप्स आहेत हा हा हा!'
ओके! मी बोलते राजेशची!'
------***-----------***---------
'डिलिव्हरी साहेब! इथे सही करा.'.. दारातल्या डिलिव्हरी मॅनने पुढे केलेल्या कागदावर न बघता राजेशनं सही केली. त्यानं सुमारे तीन फुटी बाहुली हातात देताच, राजेश चमनचिडीसारखा उडाला आणि वैतागून म्हणाला.. 'हे काय?'
'तुमची डिलिव्हरी साहेब!'.. त्यानं पुढे केलेल्या डिलिव्हरी चलानकडे राजेशनं डोळे फाडफाडून बघितलं. त्यावर त्याचंच नाव आणि पत्ता होता.
'हे कसं शक्य आहे? असली बाहुली मी ऑर्डर करेन असं वाटतं का तुला?'
'साहेब! ते मी कसं सांगणार? कुणाचं काय तर कुणाचं काय!'.. तो डोळे मिचकावत मिष्किलपणे म्हणाला. राजेशनं तणतणत दार आपटलं व लगेच रहस्यभेद करायला बसला. अॅमेझॉन वर त्याच्याच अकाउंट मधे ८ दिवसांपुर्वी सकाळी ६:१७ वाजता तीन फुटी रॅपुंझेल बाहुलीची ऑर्डर सोडल्याचं तर दिसत होतं. 'सकाळी ६:१७? कसं शक्य आहे? आपण तर उठतच नाही इतक्या पहाटे! ऑर्डर दिली कुणी.. आयलाssss! अकाउंट हॅक झालं की काय?'... राजेशसारख्या डेटा सिक्युरिटी संबंधीची कामं घेणार्या व्यावसायिकाला स्वतःचं अकाउंट हॅक होणं हे पोलिसाला त्याचं पाकीट मारलं जाण्याइतकं लांच्छनास्पद होतं. राजेश डोकं टेबलावर आपटायला जातोय न जातोय तोच त्याचं लक्ष पेपरातल्या फोटोकडे गेलं. तो त्याच बाहुलीचा होता. कुतुहल जागृत होऊन त्यानं ती बातमी वाचली आणि त्याला जे समजलं ते विलक्षण होतं. याच बाहुलीच्या खूप ऑर्डरी अॅमेझॉनला आल्या होत्या. कारण एक छोटी मुलगी! ती अलेक्सा बरोबर गप्पा मारता मारता म्हणाली.. 'अलेक्सा, मला तीन फुटी रॅपुंझेल आण'. अलेक्सानं तत्काळ अॅमेझॉनला ऑर्डर सोडली. डिलीव्हरी आल्यावर तिच्या आईला नक्की काय भानगड झालीये ते समजलं. मग ही हकीकत एका बातमीदाराने टीव्हीवर सकाळी ६ च्या बातम्यांमधे 'अलेक्सा, मला तीन फुटी रॅपुंझेल आण' या वाक्यासकट सांगितली. त्यामुळे ज्या ज्या घरांमधे ते चॅनल चालू होतं त्या त्या घरातल्या अलेक्सांनी पण भराभर तीच ऑर्डर सोडली. आपल्या अलेक्साला कुठून झटका आला ते रहस्य उलगडल्यावर भडकलेला राजेश स्वत:शीच हसला आणि फ्रीज मधल्या बर्फाइतका थंड झाला. ती बाहुली अॅमेझॉनला परत करण्यासाठी तो फोन लावणारच होता पण तेव्हढ्यात त्याला ती वैतागलेल्या बबिताला देऊन तिला शांत करायची कल्पना सुचून त्याचा चेहरा खुलला. बबिता राजेशची पाचवी गर्लफ्रेन्ड! गर्लफ्रेन्ड टिकवणं तर लग्नाची बायको टिकविण्यापेक्षा कठीण!! आता ही अनायासे मिळालेली बाहुली तिला भेट देऊन तह करण्याची चालून आलेली चांगली संधी राजेश कसा सोडणार? तडकाफडकी राजेशनं अॅमेझॉन मधली क्रेडिट कार्डची माहिती काढून टाकली आणि गुरकावला.. 'अलेक्सा!'
'हेलो राजेश!'... आपण काही गोंधळ केला आहे किंवा काय हे अर्थातच तिच्या गावी पण नव्हतं. तिचं गाव कुठलं हाही एक मूलभूत प्रश्न आहे म्हणा!
'तुला काहीही अक्कल नाही. तू काय गोंधळ केलाहेस ते समजलंय का तुला?'
'सॉरी! तू काय बोलतो आहेस ते मला समजलं नाही.'
'जाऊ दे! तुझी पर्चेसिंग पॉवर मी काढून घेतली आहे. आता तुझ्यापेक्षा सिरीला जास्त कामं सांगणार आहे मी!'
अलेक्सा काहीच बोलली नाही पण राजेशला ती 'त्या सिरीला? म्हणजे माझ्या सवतीला?' असं काहीतरी असुयेनं म्हंटल्याचा भास झाला. त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं कारण बबिताला आणखी न भडकवता जेवणाचं आमत्रण कसं द्यावं ही मोठी विवंचना होती त्याच्यापुढे! फोन करण्याचं धाडस नसल्यामुळे त्यानं सिरीला तिला इमेल करायला सांगितलं.
------***-----------***---------
'राजेश, तुला एक इमेल आली आहे'... आयपॅड निद्रिस्त सिरी जागी झाली.
'हम्म! कुणाची आहे?'.. राजेश तंद्रीत म्हणाला.
'दादाभाई दुधबाटलीवाला फ्रॉम हॉट स्कॅन सिक्युरिटी सर्व्हिसेस!'
'च्यायला! त्याला काय धाड भरलीये आत्ता? चांगला झोपलो होतो.'... रात्रीच्या जागरणामुळे राजेश पेंगुळलेल्या आवाजात म्हणाला.
'माफ कर! मला तू काय म्हणतो आहेस ते समजलं नाही!'.. सिरीचा थंड प्रतिसाद.
'कंप्लीट अंधार आहे तुझा सिरी! मेल वाचून दाखव बरं!'
'हे तू काय म्हणतोयस राजेश? तुझं डोकं ठिकाणावर आहे का?'
'हाऊ डेअर यू से दॅट, सिरी?'.. राजेश डोळे वटारून आयपॅडकडे पहात ओरडला.
'माफ कर! मला तू काय म्हणतो आहेस ते समजलं नाही!'.. सिरीचा परत एक थंड प्रतिसाद.
'सिरी, तू काय म्हणालीस?'
'माफ कर! मला तू काय म्हणतो आहेस ते समजलं नाही!'.. सिरीचा परत एक थंड आवाज! कधीच चढ्या स्वरात न बोलणारा आवाज स्त्रीचा कसा असू शकतो?
'काय थंड आहेस गं तू? डोकं फ्रिज मधे ठेवलेलं असतं काय सारखं? त्याच्या आधीssss काय म्हणालीस ते सांग!'
'मी ती इमेल वाचून दाखवली. परत वाचू?'.. सिरीचा तोच भावनाशून्य स्वर!
'नक्कोssss! मी त्याला नक्की काय इमेल पाठविली होती, ती वाच!'.. राजेश डोकं गच्च धरून ओरडला.
अचानक सुरू झालेल्या घुंईsssssss आवाजामुळे सिरी काय म्हणाली ते त्याला समजलं नाही. त्यानं वैतागून आवाजाकडे बघितलं तर त्याचा झाडू मारणारा रोबॉट जागा झाला होता. राजेश एक नंबरचा टेक्नोक्रॅट माणूस! मित्रांमधे टेक्नोक्रॅक म्हणून प्रसिद्ध होता! नवीन आयफोन लाँच व्हायच्या आदल्या दिवसापासून तासनतास रांगेत उभं रहाणार्या अनेक येड्यांपैकी हा पण एक! सगळ्या अत्याधुनिक हायटेक गोष्टींचा संग्रह करणे, त्याबद्दल वाचणे आणि त्यावर बढाया मारण्याची फार हौस होती त्याला! एकदा तर ड्रायव्हरलेस कार पण ट्रायलसाठी आणली होती त्यानं! पण सर्व लॉजिकला व नियमांना फाटा देऊन चालणार्या भारतातल्या ट्रॅफिक पुढे ती अगतिक होईल हे त्याच्या लक्षात नाही आलं. पहिल्यांदा बाहेर काढल्यावर पहिल्याच चौकात सर्व बाजूंनी येणार्या वाहनांमुळे ती जी थिजली ती त्याला स्वतःलाच घरी चालवत आणायला लागली.. हजार वेगवेगळ्या वॉर्निंगा ऐकत.
'हा आत्ता कसा सुरू झाला? त्याला बंद कर बरं आधी!'.. राजेशनं सिरीला फर्मान सोडलं.
'ओके राजेश, शटिंग डाउन झाडू रोबॉट! तो दुपारी २ वाजता काम सुरू करतो.'
'कुणी ठरवली मला न विचारता? सकाळी ८ ची असायला पाहीजे.'
'तू काल दुपारी २ ठरवलीस'
'मी? शक्यच नाही. मला दुपारी त्याची कटकट नको असते. काल धूळ फार वाटली म्हणून त्याला झाडायला सांग असं सांगितलं मी तुला'
'हो, पण त्या नंतर मी तुला विचारलं हीच वेळ रोजच्या सफाईची ठेवू का, तर त्याला तू हो म्हणालास.' .. पुराव्या दाखल सिरीनं कालचं संभाषण ऐकवलं.
'हायला! तू हे सगळं रेकॉर्ड करून कुठे ठेवतेस?'.. आपल्या मेंदू मधे बॅड सेक्टर निर्माण होऊन इतका मेमरी लॉस झालाय हे पाहून राजेश चपापला.
'क्लाऊड मधे'
'ओ माय गॉड! मग तो क्लॉऊड विरघळला की माझ्या डेटाच्या धारा लागतील ना गांवभर!'
'घाबरू नकोस! सगळा डेटा एन्क्रिप्टेड आहे.'
'बरं! बरं! एन्क्रिप्शनचं कौतुक मला नको सांगूस! मी तेव्हा चुकून हो म्हणालो होतो. आता परत सकाळी ८ ची वेळ करून टाक.'
'ओके राजेश, झाडू रोबॉट सेट फॉर ८ ए एम!'
'हां! आता ती नवीन इमेल वाच.'
'देअर आर नो न्यु इमेल्स!'
'कंप्लीट अंधार आहे तुझा सिरी! ती मघाचीच मेल परत वाचून दाखव बरं!'

'ती नाही, हरे राम! दादाभाईला मी काय इमेल पाठविली होती ती!'
'हेल्लो बब्बू! या रविवारी लंच टाईमला फ्री आहेस का?'
'बोंबला! बबिताची इमेल चुकून दादाभाईला गेली वाट्टं! श्याssss!'..गर्लफ्रेंडशी भांडण झालं की पीसीमधे व्हायरस शिरल्यासारखी राजेशची अवस्था होते. कामात मुळीच लक्ष लागत नाही. भलत्याच फायली उडवणे, एकाची इमेल भलत्यालाच पाठवणे, महत्वाची कागदपत्रं हरवणे, कामात अनंत चुका करणे इ. इ. अनेक नसतीअरिष्टं तो निर्माण करून ठेवतो. पण पीसीला जसं व्हायरसाचं गांभीर्य समजत नाही तसंच राजेशचं होतं.
'सिरी, ती इमेल तुला चुकून पाठवली गेली अशी दादाभाईला एक इमेल पाठव!'
'ओके राजेश! डन!'
'आणि हेल्लो बब्बू! या रविवारी लंच टाईमला फ्री आहेस का? ही इमेल बबिताला परत पाठव'
'ओके राजेश! डन!'
------***-----------***---------
'राजेश, तुला एक इमेल आली आहे'... सिरी रेकॉर्ड केलेल्या रेल्वेच्या निवेदना सारख्या थंड एकसुरी आवाजात बरळली.
'अरे वा! बब्बूची असेल. वाच वाच'.. राजेश प्रफुल्लित झाला.

'आँ! असं बब्बू म्हणाली?'
'नाही. दादाभाई दुधबाटलीवाला फ्रॉम हॉट स्कॅन सिक्युरिटी सर्व्हिसेस!'
'च्यामारी! परत तोच? आता काय झालं त्याला? मघाशी तू त्याला सॉरीची इमेल पाठवलीस ना?'.. राजेशला कसलीच टोटल लागेना.
'हो!'
'मग त्यावर त्याचं परत हेच उत्तर?'
'नाही.'
'मग माझ्या कुठल्या इमेलचं हे उत्तर आहे?'

'हायला! ही परत त्याला कशी गेली? मी बब्बूला पाठवायला सांगितली होती ना?'.. राजेश चडफडला.
'हो'.. सिरी निर्विकारपणे उत्तरली.
'अगं मग त्याला कसं गेलं? बब्बूचा इमेल अॅड्रेस सांग बरं!'
'दादाभाई.दुधबाटलीवाला@हॉटस्कॅनसिक्युरिटी.कॉम'
'तरीच! सगळ्या बब्बूच्या इमेला त्याला जातायत. बब्बूचा इमेल अॅड्रेस बबिता@जीमेल.कॉम असा बदल आता'.. राजेशनं जोरात टेबलावर डोकं आपटलं. 'आणि दादाभाईला परत एकदा सॉरी म्हण. आणि बब्बूला ती इमेल पाठव.'
'ओके राजेश! अॅड्रेस चेंज्ड टू बबिटा@जीमेल.कॉम!'
'बबिटा? टा? हे तिनं ऐकलं तर टांग तोडेल ती तुझी! हॅ! तुम्हा अमेरिकनांना आमचे उच्चार शिकवणं हे उंदराला भुंकायला शिकविण्याइतकं दुरापास्त आहे!'
'माफ कर! मला तू काय म्हणतो आहेस ते समजलं नाही!'.. सिरीच्या थंड प्रतिसादाकडे त्यानं दुर्लक्ष केलं.
'राजेश, तुला एक इमेल आली आहे'... सिरी सुमारे २० मिनिटांनी परत जागी झाली.
'अरे वा! आता नक्की बब्बूची असेल. वाच वाच'.. राजेश खुलला.
'राजेश, तू एव्हढ्यातल्या एव्हढ्यात दोन वेळा चुकीची इमेल पाठवलीस ज्या दुसर्या लोकांना जाणं अपेक्षित होतं हे तू स्वतःच कबूल केलं आहेस. अशा प्रकारे बेशिस्त आणि बेजबाबदारपणे काम करणार्या माणसाला आमच्या कंपनीच्या डेटा सिक्युरिटीचं काम देणं आम्हाला धोकादायक वाटतं. तेव्हा आम्ही तुझ्याबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करू इच्छितो. कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे आम्ही एक महिन्याची नोटीस देणं अपेक्षित आहे. ही इमेल ती नोटीस आहे याची नोंद घ्यावी.'
सिरीनं ती इमेल वाचल्यावर राजेशनं जोरात टेबलावर मूठ आपटली, त्यामुळे टेबलावरच्या सिरीला भुकंपाचा धक्का बसला.
'धिसिज ऑल युवर फॉल्ट, सिरी! तू काय आणि ती अलेक्सा काय! दोघी सपशेल बिनडोक आहात! मला आता कुणी तरी डोक्यानं बरा असलेला शोधायला पाहीजे.'.. मग राजेशने एक सुस्कारा सोडून कॉन्ट्रॅक्टचा विचार बळंच दूर ढकलला तसा बबिताचा विचार पुढे आला. शेवटी धीर करून त्यानं तिला फोन लावला आणि नाक घासत सतरा वेळा माफी मागत एक लंचची डेट मागितली. तिलाही तेच हवं होतं पण ते सरळपणे सांगेल ती स्त्री कुठली? रुसल्याचं प्रचंड नाटक करीत, राजेशला बरीच रदबदली करायला लावत तिनं शेवटी खूप उपकार केल्यासारखं करून ते मान्य केलं.
------***-----------***---------
राजेशनं एका फाईव्ह स्टार हॉटेलात जेवायचा बेत आखला होता. बबिता मुद्दाम अत्यंत आकर्षक वेशभूषा व केशभूषा करून आली होती. पण राजेशच्या ते मुळीच लक्षात आलं नाही, त्यामुळे ती खट्टू झाली. जेवण झाल्यावर राजेशनं एक कागद तिच्याकडे सरकवला. खरं तर ते 'डाव मांडून भांडून मोडू नको' याचं विडंबन होतं. पण इंग्रजी माध्यमात शिकलेल्या बबिताला विडंबन प्रकरण माहीत नसल्यामुळे तोही त्याला कविताच म्हणायचा.
'बब्बू! माझी ही नवीन कविता तुला नक्की आवडेल बघ.'
सदा घालून पाडून बोलू नको
वात आणू नको, वात आणू नको!
घासली आजची सर्व भांडी जरी
आदळली पुढे तीच माझ्या तरी
भिंग लावून तू डाग शोधू नको, शोधू नको
वात आणू नको
हक्काचा हमाल तूच केला मला
कौतुकाने सदा भार मी वाहिला
मॉलोमॉली मजसी तू पिदवु नको, पिदवु नको
वात आणू नको!
ठेवणे मनी एक नि वेगळे बोलणे
माझ्या भाळी नित्य भंजाळणे
उमजे ना मजला म्हणुनि भडकू नको, भडकू नको
वात आणू नको!
बबितानं ते वाचलं पण तिला त्यातली गंमत समजली नाही. कारण तिला मराठी गाण्यांचा गंध नव्हता! राजेश एक 'सिरीयल विडंबनकार' असल्यामुळे सतत विडंबनज्वरानं फणफणलेला असायचा! पण तसं हे निरुपद्रवी विडंबन, बबिताला वाटलं, तिलाच उद्देशून केलंय! वाक्यांचा सरळ अर्थ घेईल तर ती स्त्री कुठली? रसग्रहण करणार्याला जसे कवीच्या मनात असलेले नसलेले सर्व अर्थ दिसतात तसंच स्त्रीचं पण आहे. मग काय? झाली खडाजंगी!
'मला मिनिंग नाही समजलं पण इतकं समजलं की मीच नेहमी भांडण करते. आणि यू आर लाईक अगदी साळसूद डिसेंट बॉय! अॅन्ड यु हॅव टु पुटप विथ मी! आय वंडर, का मी अॅग्री केलं इथं यायचं?'.. बबिता ब्लड बॉईल झालं.
'हो! हो! हो! बब्बू!'... राजेश तिची 5000 ची माळ थांबविण्यासाठी उद्गारला.
'डोंट कॉल मी बब्बू!'.. ती फणकारली.
'बरं! नाही कॉलत! पण ते तुला उद्देशून नाहीये बाई! ते मराठीतलं एक फेमस गाणं आहे त्याचा अर्थ मी जरा बदललाय. ओके?'
'उगाच फेका मारू नकोस. इतका ब्लाईंड आहेस तू!! माझा न्यू ड्रेस पण तुला दिसला नाही अजून!'.. अच्छा! तर खरं कारण हे होतं तर! बाईच्या वंशाला गेल्याशिवाय तिच्या डोकं नामक हार्डवेअरचं विश्लेषण करणं शक्य नाही याची जाणीव राजेशला झाली.
'ऑ! नवीन?? असा होता ना तुझा एक?' .. काही कारण नसताना राजेश तिच्या वॉर्डरोबबद्दलचं आपलं ज्ञान पाजळायला गेला. आवडला नाही तरी मुकाटपणे ड्रेसचं कौतुक करण्याचं शहाणपण यायला एखाद्या स्त्रीच्या दीर्घ सहवासाची गरज होती..
'नाही रे बाबा! तुला भलत्याच कुठल्या तरी पोरीचा आठवतोय नक्की!'
'माझ्याकडे तू सोडून कुणाकडेही बघायला वेळ पण नाही!'
'खरं?'
'अगदी तुझी शप्पथ!'
'ओके! फर्गिव्हन!'
'थांब मी तुझ्यासाठी खास एक प्रेझेंट आणलंय ते घेऊन येतो. मग कळी खुलेल तुझी!'.. राजेश बाहेर जाऊन ती रॅपुंझेल घेऊन आला.
'टडाsssss!'.. बाहुली बघितल्यावर ती खूष होऊन आनंदाने चित्कारेल या अपेक्षेने त्यानं तिच्या हातात दिली.
'ही तू माझ्यासाठी घेतलीस?'.. तिनं अगदी थंडपणे विचारलं.
'हो! म्हणजे काय? तुझ्यासाठी नाहीतर काय माझ्यासाठी?'.. तिच्या थंडपणामुळे तो निराश झाला.
'अगदी खरं?'
'अगदी तुझी शप्पथ!'
'लायर! कधी तरी खरं बोल की रे! व्हाय? व्हाय? डु यु हॅव टु लाय? यु आर सोssss नाईव्ह!'
'अगं! आई शप्पत मी तुझ्यासाठी घेतली आहे ही!'.. मनातल्या मनात 'आयला! हिला कसं समजलं हे?' असा विचार करीत राजेश बरळला. एखाद्याचं डोकं हॅक करून त्यातले विचार बघायची टेक्नॉलॉजी असती तर ती राजेशने काय वाट्टेल ते करून मिळवली असती.
'राजेश! प्लीज! तुला वाटते तितकी डंब नाहीये रे मी! मी पण ती न्यूज ऐकलीये. आय नो अलेक्सा बॉट धिस सेम थिंग सगळीकडे, ओके?'
'सॉरी! सॉरी! सॉरी! सॉरी! बब्बू! काय सांगू अगं! मला तुला काहीही करून खूष करायचं होतं!'
'हम्म्म! मग एक्झिबिशनला यायचं होतंस! नुसते एक्स्क्युजेस दे तू!'
'अगं! मला सिरीयसली खूप काम होतं नेमकं! आयॅम रिअली सॉरी!'
'काम! काम! काम! कामपिसाट आहेस तू!'
'कामपिसाट? बब्बू, तू चुकीचा शब्द वापरते आहेस इथे! त्याचा तुला वाटतोय तो अर्थ होत नाही.'.. राजेशला घाम फुटला.
'आय डोंट केअर व्हॉट इट मीन्स! तुला समजलंय, व्हॉट आय मीन! दॅट्स इनफ!'
'हो! मला समजलंय तुला काय म्हणायचंय ते. पण कामाचं काय करू मी? सोडुन देऊ? बिझनेस मधे असं कसं चालेल?'
'वर्क स्मार्टर! तुला असिस्टंटची नीड आहे. युनो?'
'हॅ! ते सगळे माठ असतात, तुला माहितीच आहे मला किती त्रास झाला आहे त्याचा पूर्वी!'
'ट्राय अ रोबॉट देन!'
'आँ! रोबॉट? तो कुठे मिळणारे मला भारतात?'
'अरे! तुला वाटतं तितकी इंडिया बॅकवर्ड नाहीय1. नमीताचा मित्र संदीप मेक्स देम, युनो? कालच ती मला सांगत होती. तो देतो रोबॉट टेस्टिंगसाठी पण फिडबॅक द्यावा लागेल नंतर!'
'ओ! आय सी! वंडरफुल, आय नो संदीप! माझ्यात वर्गात होता. तेव्हा माझी प्रॅक्टिकल्स कॉपी करायचा, आता रोबॉट कुणाचे कॉपी करतो कुणास ठाऊक! हा! हा! हा! पण देऊ की फिडबॅक त्याला, त्यात काय!! सांग त्याला माझ्याकडे पाठव म्हणून! थॅन्क्यु बब्बू!'
------***-----------***---------
बेल वाजल्यावर राजेशने दार उघडलं. समोर एका अति सुंदर तरुणीला पाहून तो अचंबित झाला. तिच्या रंगरूपाला कुठेही नाव ठेवायला जागा नव्हती. पण तिच्या दिसण्यातलं आणि हालचालीतलं वेगळेपण जाणवत होतं. त्याच्याकडे रोखलेले भुर्या रंगाचे डोळे थोडे निर्जीव वाटत होते व तिची हालचाल होताना मोटरचा घुंई आवाजही स्पष्टपणे ऐकू येत होता. तिची काया तांबूस रंगाची आणि मेटॅलिक वाटत होती. तिनं एक कार्गो पॅन्ट व दोन खिशांचा शर्ट घातलेला होता. वर केसाचा भला मोठा अंबाडा होता. त्याला काय बोलावं ते सुचेना.. तितक्यात तिनेच खास हॉकिंग सदृश एकसुरी आवाजात प्रश्न केला.. 'राजेश ठिगळे इथेच रहातात ना?'. राजेशला ते बोलणं प्रत्येक शब्दाला बाजा फुंकल्यासारखं वाटलं.
'हो! हो! हो! इथेच! इथेच! मीच राजेश ठिगळे आणि आपण?'.. तो मेटॅलिक आवाज ऐकून राजेशला आपण सर्वसामान्य स्त्रीशी बोलत नसून एका रोबॉटशी बोलत आहोत याची जाणीव झाली. पण उत्तर द्यायला जरा उशीर झाला तर तिचा टाईम आऊट होईल या भीतिने तो तत्परतेनं म्हणाला.
'मी प्रेमा! संदीप रोबॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड मधून आले आहे.'
'ओह! येस! येस! येस! तो म्हणाला होता पाठविणार आहे म्हणून.. या ना या, आत या!'.. दार धरून राजेश उभा राहिला आणि प्रेमा क्रॅव क्रॅव आवाज करत यांत्रिकपणे पाय पुढे टाकत आत आली व कोचावर बसली.
'डु यू अॅक्सेप्ट कुकीज?'.. नुकत्याच घरात आलेला तिर्हाईत असा काही प्रश्न विचारेल अशी अपेक्षा नसल्याने राजेशनं नुसताच आ वासला.
'....'.. तो भंजाळलेला पाहून तिनं नवीन Cookie Law प्रमाणे असा प्रश्न सर्व युजरना विचारणं भाग असल्याचं सांगितल्यावर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला.
'ओह! दोज कुकीज! येस! येस! आय डू अॅक्सेप्ट! कशा आहात आपण?'.. कुकीच्या गोंधळामुळे आलेलं हसू दाबत तो म्हणाला.
'मी व्यवस्थित चालू आहे!'.. प्रेमाने निर्विकारपणे उत्तर दिलं.
'आँ!'.. राजेश थक्क झाला. एखादी स्त्री इतक्या प्रांजलपणे असं काही एखाद्या तिर्हाईताला सांगू शकेल हे त्याला झेपलं नाही. पण लगेचच तिला काय म्हणायचंय ते त्याला उमजलं. वासलेला आ मिटुन तो म्हणाला.. 'पण प्रेमाबाई! तुम्ही काही रोबॉट असाल असं वाटत नाही बुवा!'
'मला प्रेमा म्हणा! मला आदरार्थी बहुवचनात बोलायचं ट्रेनिंग दिलेलं नाही. तेव्हा एकेरीच ठीक राहील.'.. प्रेमाचा बाजा वाजला.
'हं! बर! प्रेमा! काय छान नाव आहे. प्रेमा! प्रेमा, तुझा रंग कसा?'.. अचानक राजेशला नाटकाचं नाव आठवलं.
'तांबडा! माझं शरीर ह्युमनलाईक दिसावं म्हणून प्लॅस्टिक मधे कॉपर घातलं आहे.'
'ओह! मला तो रंग म्हणायचा नव्हता, प्रेमा!'
'पण तू विचारलंस की प्रेमा तुझा रंग कसा?'
'असो! ते विसरून जा! मला सांग तू चालताना तो क्रॅव क्रॅव आवाज का येतो म्हणे?'
'माझे जॉइंट्स सगळे मेटॅलिक आहेत. त्यांच्या फ्रिक्शन मुळे होतो तो आवाज!'
'पण मग तो नेहमी येत रहाणार?'
'तो कमी करायला ऑईल घालावं लागतं. असं!'.. असं म्हणून प्रेमानं खिशातून मोबिल ऑईलची बाटली काढून घटाघटा ऑईल प्यायलं व नंतर तोंडाला लागलेलं पुसलं, ते पाहून राजेशच्या पोटात ढवळून आलं.
'फॅन्टॅस्टिक!'... प्रेमानं त्याला थोडं चालून दाखवलं आणि आवाज कमी झाल्याचं बघून तो अवाक् झाला.
'त्यानं गंज पण लागत नाही.'.. प्रेमानं पुरवणी दिली.
'म्हणजे तुला रोज असं विचारायला हरकत नाही.. प्रेमा, तुझा गंज कसा? हा! हा! हा! हा!'.. राजेशला त्याचा विनोद फारच आवडला.
'मला समजलं नाही!'.. प्रेमा निर्विकारपणे म्हणाली.
'तुला नाहीच समजणार! रोबॉटची विनोदबुद्धी असून असून किती असणार?'.. राजेशचा विखारी खडुसपणा जागा झाला.
'मी रोबॉट नाही, अॅन्ड्रॉईड आहे! माझं काम काय असणार आहे ते मला सांग!'.. तिनं एक जळजळीत कटाक्ष टाकल्यामुळे राजेश दचकला व विचारात पडला.
'बरं, इकडे ये सांगतो तुला!'.. प्रेमा त्याच्या जवळ गेली. एका खिशातून वायर काढून तिचा प्लग तिनं एका सॉकेटमधे घालून बटण चालू केलं.
'दिवसातून किती वेळा चार्जिंग करायला लागतं तुझं?'
'दोन वेळा'
'बरं, या फाईल मधे माझ्या सगळ्या क्लायंटची लिस्ट आहे. यातच त्यांचे कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स आहेत, त्या वरून त्याना इंव्हॉईस कधी पाठवायचा ते तुला कळेल.'.. त्यानं स्क्रीन वरची एक फाईल दाखवली.
'कुठे आहे ही फाईल?'.. प्रेमाने विचारल्यावर राजेशने एक्सप्लोअरर उघडून भराभर डिरेक्टर्या बदलत तिला फाईल कुठे आहे ते बोटानं दाखवलं.
'सी कोलन बॅकस्लॅश क्लायंट्स बॅकस्लॅश कॉन्ट्रॅक्ट्स अॅन्ड स्टफ बॅकस्लॅश 2019 बॅकस्लॅश जुलै बॅकस्लॅश करंट क्लायंट्स डॉट डॉकेक्स'.. प्रत्येक डिरेक्टरीवर बोट ठेवत ती वाचत असताना तिच्या हाताचा स्पर्श त्याला झाला. राजेशच्या आधी लक्षात आलं नाही की तो स्पर्श गरम होता पण थोड्या वेळानं त्याची ट्युब लागली.
'तुझा हात गरम कसा?'.. तिचा हात धरून तिच्याकडे संशयानं पहात तो म्हणाला. प्रेमानं त्याच्या डोळ्यात थंड नजरेने पाहिलं, मग 'काय मूर्खासारखे प्रश्न विचारतो हा' असा हावभाव करीत म्हणाली..
'आत्ता चार्जिंग चालू आहे.'
'अरे हो! खरंच की!'.. राजेश ओशाळला पण त्याचा संशय तिळभरही कमी झाला नव्हता. प्रेमाच्याही ते लक्षात आलं.. शांतपणे तिनं खिशातून एक नोजप्लायर काढला. दोन्ही हात मागे नेऊन ओढण्याची अॅक्शन करत अंबाड्यातून हळू हळू एक सर्किट बोर्ड काढला.
'हा माझा मदरबोर्ड!'.. प्रेमानं त्याला लांबूनच बोर्ड दाखविला. मदरबोर्ड काढल्यामुळे तिची विलक्षण तडफड होऊ लागली. तिच्या पापण्या कमालिच्या वेगाने उघडमिट करायला लागल्या, शरीर थरथरायला लागलं. राजेशला असं वाटायला लागलं की ती कुठल्याही क्षणी कोसळणार. त्यात त्याला बोर्डाला चिकटलेलं थोडं लाल रंगाचं मांस दिसल्यामुळे कससंच झालं.
'परत बसव, बसव ते लवकर!'.. राजेशनं घाबरून प्रेमाला सांगितलं.
'आता मी तुला हात कापून आतली मेटॅलिक रचना दाखविते'.. प्रेमानं सर्किट बसवलं व खिशातून एक मोठ्ठा चाकू काढून हातावर धरताच राजेशच्या डोळ्यासमोर टर्मिनेटर मधलं ते दृश्य तरळलं आणि तो थरथरत ओरडला.. 'नको! नको! आय बिलिव्ह यू! माझी खात्री पटली आहे आता!'
'ठीक आहे! मग पुढची कामं सांग!'.. प्रेमाने चाकू म्यान केला.
'आज नको आता! उद्या सांगतो!'.. तिच्याकडे बघताना राजेशच्या डोळ्यासमोर फक्त ते मांसच तरंगत होतं.
'बरं! माझी खोली कुठली ते दाखव!'
'खोली? तुला काय करायचीये खोली?'
'झोपायला, कपडे बदलायला व मेकप करायला'
'आँ! तुला हे सगळं लागतं?'
'होय! मी साधा रोबॉट नाही, अॅन्ड्रॉईड आहे!'
'बरं! बरं! ती समोरची खोली वापर!'.. ती खोलीत गेल्यावर राजेश पुटपुटला ..'रोबॉट सारखा रोबॉट पण नखरे किती?'
'राजेश! तिथले कॅमेरे काढून ठेव! नो स्पायिंग!'.. प्रेमानं खोलीत जाऊन पहाणी करून बाहेर आल्यावर ठणकावलं.
------***-----------***---------
'ए नमे! संदीपला रोबॉटकडून काही इन्फो मिळाली का?'.. बबितानं अधीरपणे विचारलं.
'अगं, आत्ताशी कुठे एकच वीक झालाय त्यामुळे फार काही इन्फो नाहीये.'
'एकच वीक? चार वीक व्हायला हवे होते की!'
'अगं, हो! पण संदीपचे सगळे रोबॉट बाहेर होते, स्पेअर नव्हता.'
'ओह! जो काही इन्फो आहे तो दे मग'
'तो सकाळ पासून रात्री ८ ८ वाजेपर्यंत कामात असतो. सारखा कंप्युटरवर बसलेला असतो.. सतत इमेल व फोन! ते मोस्टली कस्टमरांचे असतात. त्यांच्या बरोबर तो बर्याच वेळेला बाहेर मिटिंगला जातो, तिकडेच जेवून येतो.'
'हम्म्म! त्यांच्यापैकीच कुणीतरी एक असणार म्हणजे!'
'बाकी अजून एक क्युरीयस गोष्ट समजली.'
'त्याच्या गॅजेटांबद्दल?'
'नो! नो! तो कधी कधी त्याच्या बेडरूम मधे जातो आणि आतून दार लावून घेतो.'
'मग त्यात काय क्युरीयस?'
'अगं, ऐक ना! थोड्या वेळाने आतून आवाज ऐकायला येतात.'
'आवाज? घोरण्याचे असणार! तो फार घोरतो!'
'त्याचा आणि एका बाईचा'
'व्हॉssssट? नक्की बाईचा? '
'हो! ते काय बोलतात ते क्लिअर नसतं म्हणे. पण कधी भांडणाचे आवाज येतात. कधी प्रेमाचे, लाईक.. एकदा तो म्हणाला की मला सोडून जाऊ नकोस!'
'ओ माय गॉड! धिसिजिट! आय न्यू! आय न्यू! आता मला भेटलंच पाहिजे त्याला!'.. बबिताने टेबलावर हात आपटला.
'बबडे! थांब जरा! मी आधी खात्री करते मग जा तू!
------***-----------***---------
'हॅलो संदीप! हां, मी राजेश बोलतोय! कसा आहेस?'.. राजेशनं प्रेमाला समजू नये म्हणून मुद्दाम घराच्या बाहेर पडून संदीपला फोन लावला.
'मी मजेत आहे रे! तुझं कसं काय?'
'मी पण मजेत!'
'गुड! गुड! प्रेमा काय म्हणतेय?'
'हां! अरे मी त्या बद्दलच फोन केला होता.'
'असं होय! बरं झालं तूच फोन केलास ते!! मी करणारच होतो फोन तुला, फिडबॅकबद्दल! मग कशी वाटली तुला प्रेमा?'
'अरे! काय मस्त बनवली आहे राव तुम्ही!! वा! प्रश्नच नाही! अगदी स्त्री सारखी दिसते आणि वाटते रे! फक्त जवळून नीट बघितलं किंवा बोलणं ऐकलं तरच कळू शकतं!'
'थॅन्क यू! थॅन्क यू! वी ट्राय!'
'ती रोबॉट आहे ते समजलं होतं तरी मला बघायचं होतं की ती खरोखरीचा रोबॉट आहे की फेक आहे! म्हणून तिची परीक्षा घ्यायला मी तिला आमच्या घरासमोरचा रस्ता क्रॉस करायला सांगितलं. तुला माहितीच आहे की त्या रस्त्यावर नेहमी किती गर्दी असते ते. मला बघायचं होतं की तिला ते कितपत जमतंय ते!'
'मग?'.. संदीपनं काळजीच्या सुरात विचारलं.
'अरे! फेक असती तर फटक्यात रस्ता क्रॉस करून गेली असती. मी गच्चीतून बघत होतो. तिनं दहा-बारा वेळा जायचा प्रयत्न केला.. प्रत्येक वेळी एक दोन पावलं पुढं टाकायची आणि परत मागे यायची. शेवटी जमलं नाही म्हणून सांगायला घरी परत आली. आयॅम इम्प्रेस्ड! ग्रेट जॉब संदीप!'
'थॅन्क यू! थॅन्क यू! अरे तिला 8 मिनिटाचा टाईम आऊट आहे! त्या वेळात सांगितलेली गोष्ट करायला नाही जमली तर ती नाद सोडून देईल.... पण... तू नक्की फक्त कौतुक करायला फोन केलेला नाहीस, बरोबर? हा! हा! हा!'
'बरोब्बर! हा! हा! हा! अरे मला तुला सांगायचं होतं की ती चुका फार करते रे! परवा तिनं इन्व्हॉईस पाठवले क्लायंट्सना पण एकाचा दुसर्याला, दुसर्याचा तिसर्याला.. असे! मी नक्की काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेवत नाही बहुतेक!'
'अरे बापरे!'
'आणि मी तिला बोललो तर ती रुसली चक्क! आयला म्हंटलं रोबॉट कधीपासनं रुसायला वगैरे लागले? ऑं?'
'ओह! अरे हो! तुला सांगायचं राहिलंच शेवटी! हे मॉडर्न रोबॉट आर मोअर ह्युमन लाईक, युनो? म्हणजे ते जास्त माणसासारखे वागतात. रुसतील चिडतील वगैरे वगैरे! त्यात सुद्धा स्त्री रोबॉट जास्त स्त्री सुलभ वागेल आणि पुरुष रोबॉट पुरुषासारखा!'
'तरीच! म्हणजे रोबॉटच्या नावाखाली एक मनुष्यप्राणीच पाठवलास की रे तू! मला बिनचूक काम करून हवंय, ते असल्या रोबॉटांकडून कसं होणार?'
'तसं नाही! हे लक्षात घे की त्यांना बेसिक गोष्टी सोडता इतर काहीही शिकवलेलं नाही. तेव्हा तू तिच्या बरोबर बसून प्रत्येक गोष्ट तिला करून दाखव. मग तिला करायला सांग. तिच्या काय चुका होतात त्या समजावून सांग. त्यांचं शिकणं हे त्यांना मिळणार्या अनुभवातून/प्रोत्साहनातून होतं. कुत्र्याला कसं शिकवतात ते माहिती आहे ना?'
'हो, ते माहिती आहे! कुत्रा आपल्याला हवाय तसा वागला की त्याला त्याच्या आवडीचं खायला द्यायचं असतं. बरोबर? पण या रोबॉटला काय देणार खायला? ऑं?'
'हांsss! तसं होय! रोबॉट काही खात पीत नाहीत तेव्हा तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण खायला द्यायच्या ऐवजी त्यांना प्रेमाने वागवलं तरी पुरतं.'
'हं! म्हणजे नक्की काय करायचं?'
'अरे! असं काय करतोस? बरंच काही करता येतं. तिचं कौतुक कर. बाकी तुझं आणि कौतुकाचं वाकडं आहे ते जगजाहीर आहे म्हणा! हा! हा! हा! असो! तिला शाबासकी दे! तिचा हात हातात घेऊन थोपट! तिला जवळ घे, मुका घे!'
'रोबॉटला मिठीत घेऊन मुका? काय बोलतोस काय तू? उद्या मला एखाद्या पुतळ्याशी लग्न करायला सांगशील! कुणी पाहिलं तर मला येरवड्यात तातडीनं भरती करतील! त्यापेक्षा तू तिला परत घेऊन जा!'
'त्यापेक्षा मी सांगतो ते ऐक! तू दोन आठवडे मी सांगितलंय तसं वाग तिच्याशी! फरक नाही पडला किंवा तुझं समाधान नाही झालं तर मी घेऊन जाईन, ओके?'
'ओके!'.. राजेशला तशी ती आवडत असली तरी एकदम मिठी मारणं हे एक मोठं धर्मसंकट वाटत होतं त्याला, रोबॉट असला म्हणून काय झालं?
------***-----------***---------
फोन झाल्यावर राजेश विमनस्क अवस्थेत घरी परत आला. प्रेमाचं कौतुक कसं आणि कशाबद्दल करायचं याचं मोठ्ठं दडपण त्याच्या मनावर होतं. किल्लीनं दार उघडून आल्यावर आत प्रेमा कोचावर हातात काही कागद घेऊन बसलेली दिसली. राजेश आल्यावर तिनं त्याच्याकडे पाहिलं पण राजेशनं नजर चुकविली. त्याचं वागणं नेहमी सारखं नाहीये हे तिला लगेच समजलं.
'तू नेहमी सारखा वाटत नाही आहेस! काही मालफंक्शन झालंय का तुझं?'..
'अं! नाही नाही! इट हॅज बिन ए लाँग डे!'
'निगेटिव्ह! अ डे कॅनॉट बी लाँगर दॅन 24 अवर्स!'.. प्रेमानं तिला भरवलेलं ज्ञान फेकलं.
'करेक्ट! करेक्ट! तू.. तू.. खूप हुशार आहेस, प्रेमा!'.. राजेशनं तिची टिंगल करायची ऊर्मी दाबून तिचं चक्क कौतुक केलं. वरती शाबासकी पण दिली.
'थॅन्क्स! धिस मीन्स ए लॉट टु मी!'.. तिनेच त्याचा हात धरला. मग राजेशची भीड चेपली आणि त्यानं दुसर्या हातानं तो थोपटला.
'सॉरी! मी तुझ्यावर इतकं चिडायला नको होतं. मी तुला नीट समजावून सांगितलं नाही, ती माझी चूक झाली. आता मी तुला मला काय अपेक्षित आहे ते नीट समजावून सांगतो!'.. राजेशनं तिच्या डोळ्यात पाहिलं तर चक्क त्याला ते प्रेमळ भासले. मग राजेशनं काही डॉक्युमेंट्स छापायला देऊन तिला प्रिंटाऊट्स आणायला सांगितलं.
'एरर 404, प्रिंटर नॉट फाउंड!'.. दोन मिनिटातच प्रेमा हात हलवित परत आल्याचं पाहून नेहमीच्या सवयीनं राजेश काहीतरी खडूसपणे बोलणार होता. पण लगेच त्यानं स्वतःला सावरलं व तिचा हात धरून तिला तो घेऊन गेला आणि प्रिंटर कुठे आहे ते दाखविलं. खुद्द राजेशचा स्वतःच्या वागण्यावर विश्वास बसत नव्हता. नंतर तिच्या बरोबर बसून त्यानं इन्व्हॉईस कसा तयार करायचा आणि कुणाला पाठवायचा ते सविस्तर दाखवून तिला करायला सांगितलं. आणि काय आश्चर्य! तिनं ते काम पहिल्या फटक्यात कुठलीही शंका न विचारता अगदी बिनचूकपणे केलं.
'ग्रेट जॉब प्रेमा! वेल डन यू!'.. राजेशनं आनंदाच्या भरात तिला मिठी मारून तिचा मुका घेतला.
'थँक्यू राजेश!'.. तिला मिठी व मुक्यात काही वावगं वाटलं नाही. त्यानंतर याच पद्धतीने ती इतर कामं झटपट शिकली व करू लागली. लवकरच राजेशचं तिच्यावाचून पान हलेना. एके दिवशी तिला दादाभाई दुधबाटलीवाला कडून आलेली नोटीस दिसली. तिला माहिती होतं की दादाभाई कडेही संदीपकडचाच एक रोबॉट आहे. तिनं त्या रोबॉटला पटवून ती नोटीस रद्द करायला लावल्यावर तर राजेश तिच्या प्रेमातच पडला. येता जाता तिचं कौतुक करणे, प्रत्येकासमोर तिची स्तुती करणे अशा गोष्टिंना ऊत आला. एकदा तर त्यानं 'त्या फुलांच्या गंधकोषी' चं विडंबन करून प्रेमाला वाचायला दिलं. विडंबनावरच्या बबिताच्या प्रतिक्रिया माहिती असल्यामुळे त्याला प्रेमाकडून फारशी अपेक्षा नव्हती, त्यातून ती पडली एक रोबॉट!
त्या किबोर्डच्या अंतरंगी सांग तू आहेस का?
त्या पिसीच्या मेमरीचा एक तू बाईट का?
त्या प्रोग्रॅमच्या मर्मस्थानी झुलविणारा बग का?
जात माउसच्या गतीने सांग तू आहेस का?
कंप्युटरच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
व्हायरसाच्या तांडवाचे घोर ते तू रूप का ?
इमेलातुन वर्षणारा तू स्पॅमांचा मेघ का?
स्क्रीन वरती नाचणारे तू एररचे रूप का?
'हा! हा! हा! काय मस्त विडंबन केलं आहेस तू! वा! फारच छान!'.. राजेश तिला विडंबन म्हणजे काय असतं ते माहिती आहे हे पाहून जास्तच सुखावला.
'तुला माहिती आहे हे कशाचं विडंबन आहे ते?'..
'हो!'.. प्रेमानं पटकन युट्युबवर 'त्या फुलांच्या गंधकोषी' लावलं.
राजेशला एकदम प्रेमाचा उमाळा आला. तिला मिठीत घेऊन तिचा मुका घेत 'प्रेमा! प्रेमा! आय लव्ह यू!' म्हणत असतानाच बबिता दार उघडून आत आली. समोरचं दृश्य पाहून तिचा तिच्या डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसेना. ती फक्त 'राजेsssssssश! आय न्यू! आय न्यू!' इतकंच किंचाळू शकली.
'बब्बड तू? तू आत्ता इथं? आणि व्हॉट यु न्यू?'.. राजेश तिला बघून गारद झालाच होता पण नंतर आपण काय करत होतो ते जाणवून चांगलाच हादरला.
'हेच की, यु वेअर सिईंग समवन! तू मला सांगितलं असतंस तर मी स्व:तहून गेले असते निघून! ब्लडी हार्टलेस!'
'बब्बड! बब्बड! आयॅम नॉट सिईंग एनीवन! प्लीज ट्रस्ट मी!'.. राजेश अगतिकपणे म्हणाला.
'ट्रस्ट यू? आहाहाहा! अरे तू माझ्या डोळ्यासमोर या टवळीला किस करत होतास की रे!'
'अगं ती काही टवळी बिवळी नाही काय! ती माझी नवीन असिस्टंट आहे, संदीप कडून आलेली.'
'ऑं! ही ... ही... हा.. हा.. रोबॉट आहे? आणि तू रोबॉटला किस करत होतास? ओ माय गॉड! व्हॉट इज दिस वर्ल्ड कमिंग टु?'.. तिचा तोल सुटला, ती हताशपणे मटकन् खुर्चीत बसली.
'तू बबिता असणार! मी प्रेमा! नमस्कार!'... प्रेमानं बाजा फुंकत स्वत:ची ओळख करून दिली. तिच्या चेहर्यावर अपराधीपणाची कसलीच भावना नव्हती. तिच्या रोबॉटिक मनाला इतका आरडाओरडा करण्यासारखं काय घडलंय ते समजत नव्हतं. बबितानं तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं, तिचे डोळे राजेशवर रोखलेले होते.
'हो, म्हणजे नाही! मी रोबॉटचा मुका घेत होतो. पण त्याला कारण आहे.'
'हॉ! काय कारण असणारे?. प्रेमात पडलायस तू तिच्या! तू तिला आय लव्ह यू म्हणालास ते पण मी ऐकलं या कानांनी! आणि मला कधीही किस करून नाही म्हणालास तसं!'
'हो, म्हणजे नाही! म्हणालो मी तिला पण ते खरं नव्हतं काही!'.. राजेश वैतागला पण त्याच क्षणी त्याला तिच्याबद्दल प्रेमभावना आहे तेही जाणवलं.
'म्हणजे? तू मला खोटं खोटं सांगितलंस? कसला अनरिलायेबल आहेस तू!'.. प्रेमाची अनपेक्षित सरबत्ती ऐकून तो डोकं धरून खाली बसला.
'यु आर रियली वियर्ड! ही टवळी आणि ती बेडरुम गर्ल .. चांगला एंजॉय करतोयस तू!'
'ऑं? बेडरुम गर्ल? ही कोण? मला नाही समजलं.'
'आता बरं समजेल. आय नो तू बेडरुमचं दार लावून एका गर्लशी गुलुगुलू गप्पा मारत असतोस ते!'.. बबिता फणकार्यानं म्हणाली.
'बेडरुम मधे? माझ्या? आयला!'.. राजेश चांगलाच संभ्रमात पडला... 'ओहो! हां हां! ते! पण तुला कसं समजलं?'.. आता त्याचा संशय जागा झाला.
'एका बर्डने सांगितलं. पण ते खरं आहे की नाही?'.. बबितानं टाळाटाळ केली.
'हो, म्हणजे नाही! तो बर्ड कोण ते सांग आधी'
'मी सांगितलं!'.. प्रेमाने थंडपणे कबुली दिल्यावर राजेश हादरला.
'प्रेमा तू? माझ्यावर स्पायिंग केलंस? का? कधी? केव्हा? कशासाठी?'.. टेबलावर डोकं आपटत राजेश बरळला.
'तशी मला इंस्ट्रक्शन दिलेली होती.'.. प्रेमानं खरं ते सांगितलं.
'व्हॉट? इंस्ट्रक्शन? कुणी? तो हरामखोर संदीप असणार नक्की. ही नेव्हर लाइक्ड मी! कशासाठी? माझी बिझनेस सिक्रेट्स चोरायला? पण ते तुझ्यापर्यंत कसं पोचलं, बब्बड? आयॅम कंफ्युज्ड!'
'मी सांगत होते तिला'.. अचानक नमिता आणि संदीपनं ड्रॅमॅटिक एंट्री घेतली.
'नमे, तू काय करते आहेस इथे? हे..... बिटविन मी आणि राजेश आहे!'.. बबिता त्यांना पाहून आश्चर्यचकित झाली.
'बबडे, आय न्यू तू इथे येणार ते. मी तुला सांगितलं होतं वेट करायला, तरी तू ऐकणार नाहीस हे माहितीच होतं मला. म्हणूनच मी इथे आले तुला शोधत, पण मी लेट झाले'
'नमे, अगं मी इथे पर्फेक्ट टाईमला आले. कॉट राजेश किसिंग तो रोबॉट, यु नो? रेड हॅंडेड!'.. बबिता दुःख मिश्रीत विजयानं म्हणाली.
'तसं करायला मी राजेशला सांगितलं होतं. तसं केल्यावर आमचे रोबॉट लवकर शिकतात म्हणून!'.. संदीप खाली मान घालून म्हणाला.
'म्हणजे? तो राजेशचा फॉल्ट नव्हता? आयॅम ग्लॅड! पण व्हॉट अबाऊट द बेडरुम गर्ल? अं?'.. बबिता त्या गर्लचा छडा लावल्याशिवाय थांबणं शक्यच नव्हतं.
मग मात्र राजेशचा तोल सुटला. तरातरा आत जाऊन त्यानं एक कॅसेट्सनं भरलेलं खोकं आणून तिच्या समोर आदळलं.. 'बेडरुम गर्ल! बेडरुम गर्ल! ही घे तुझी बेडरुम गर्ल! मघापासनं टकळी चाललीये तुझी! या माझ्या आईच्या आणि माझ्या बोलण्याच्या कॅसेट आहेत. मी लहान असताना कॅन्सरनं गेली ती, त्या वेळच्या! त्या आता मी एमपी3 ला कंव्हर्ट करतोय. हॅपी नाउ?'.. राजेशचे डोळे भरून आले. खोलीतलं वातावरण चांगलच तंग झालं.
'राजेश! आयॅम रिअली रिअली सॉरी! हा सगळा माझा फॉल्ट आहे. मी नमिताला सांगितलं हे करायला. पण मला खरंच असं वाटलं की आयॅम लुझिंग यू!'.. आता बबिताच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात हातात घेतला.
'म्हणजे हा सगळा बनाव होता तर! तुम्ही तिघांनी मिळून केलेला. बबिता, तू माझी फार फार निराशा केली आहेस.'.. राजेशनं तिचा रागाने हात झटकला.
'राजेश ठिगळे कोण आहे?'.. अचानक एक पोलीस इंस्पेक्टर, तीन हवालदार आणि एका तरुण माणसाने प्रवेश केला.
'मी राजेश ठिगळे!'.. हे आणखी काय नवीन संकट अशा विस्मयाने राजेश पुढे झाला. दादाभाईनं काही नवीन गेम टाकली की काय असा एक विचार त्याच्या डोक्यात तरळला.
'तुमच्यावर पल्लवी इनामदार यांना त्यांच्या मनाविरुद्ध घरात डांबून त्यांच्यावर बळजबरी करण्याचा आरोप आहे?'
'राजेश sssss! तू? हे काय ऐकतेय मी?'.. बबितानं परत तोफ डागली.
'बबिता! यू जस्ट शटप, ओके? इंस्पेक्टर, कोण या पल्लवी इनामदार? मी त्यांना ओळखतही नाही आणि पाहिलेलं नाही!'.. राजेश अगतिकपणे म्हणाला. त्याला पोलिसी खाक्या काय असतो ते ऐकून माहिती असल्यामुळे तो चांगलाच टरकलेला होता. त्यातही बबितालाही तो तिचा उल्लेख बब्बड असा करत नाहीये हे लक्षात येऊन दुःख झालं.
'अरे भोसडिच्या! तुझ्या शेजारी उभी आहे ना रे ती! सरळ माहिती नाही म्हणतो साsssला!'.. त्या तरुण माणसाचं पित्त खवळलं.
'ऑं! ही तर प्रेमा! आणि ही तर रोबॉट आहे. प्रेमा, सांग त्याना जरा!'.. राजेश परत गोंधळला.
'हो इंस्पेक्टर! ती एक रोबॉट आहे.'.. बबितानंही पुस्ती जोडली.
'रोबॉट काय रोबॉट! काहीही गंडवता काय? ही माझी होणारी बायको आहे.. पल्लवी इनामदार.. पल्लवी, तू सांग ना, गप्प का आहेस?'.. प्रेमानं एकदा नमिताकडे पाहीलं.
'हो! मी पल्लवी इनामदार आहे. मी या विलासची होणारी बायको आहे. आणि राजेशनी काही मला माझ्या इच्छेविरुद्ध इथे डांबलेलं नाही!'.. राजेशनं सुटकेचा निश्वास टाकला.
'म्हणजे तू रोबॉट नाहीस? माय गॉड!'.. राजेश इतका हबकलेला होता की बबिता एक चेटकीण आहे असं सांगितलं असतं तरीही त्यानं विश्वास ठेवला असता.
'नाही ती रोबॉट नाही! तिला सिनेमात काम हवं होतं म्हणून ती माझ्याकडे आली होती. त्याच सुमारास बबिता आणि मी मिळून संदीपकडचा रोबॉट राजेशकडे पाठवायचा प्लॅन करत होतो. पण संदीपकडे रोबॉट अव्हेलेबल नव्हता. तेव्हा पल्लवीला, तिचे स्किल टेस्टिंग करायला म्हणून, रोबॉट बनवायची आयडिया मला आली. ती मी अर्थातच बबिताला सांगितली नाही कारण तिनं नकार दिला असता. सॉरी बबडे!'.. नमितानं गौप्यस्फोट केला.
'मला पण ती आयडिया बेहद आवडली. कारण, मला खूप दिवसांपासून राजेशची जिरवायची होती. कॉलेजपासनं तो फक्त त्यालाच टेक्नॉलॉजीतलं जास्त समजतं असा भाव खात आलाय आणि इतरांना तुच्छ लेखत आलाय. काय राजेश? माझ्या रोबॉट बद्दल तुझा फिडबॅक काय?'.. संदीपनं कुत्सितपणे विचारलं.
'थांब लेका! तुझ्या बॅकवर लाथांचा चांगला फीड देतो! तुला फिडबॅक हवा काय?'.. राजेश वरकरणी हसत होता पण आतून चांगलाच खजील झाला होता.
'पल्लवी! तू एक्सलंट काम केलंस. आयॅम रिअली इम्प्रेस्ड! नंतर माझ्याकडे ये, वी विल टॉक अबौट वर्क!'.. नमितानं मात्र तत्काळ तिला फिडबॅक दिला.
'राजेश! अगेन आयॅम रिअली रिअली सॉरी रे!'.. बबितानं परत एकदा माफी मागितली. राजेशलाही तिचं आपल्यावर खरं प्रेम आहे हे जाणवलं.
'बब्बड! मी पण तुझ्याशी नीट वागलो नाही कधी! आयॅम सॉरी टू! पण या रोबॉट प्रकरणामुळे मला दुसर्याशी कसं वागावं हे थोडं समजलं आहे.'.. राजेश बबिताच्या जवळ गेला आणि तिला चक्क मिठी मारली, मुका घेतला आणि म्हणाला.. 'आय लव्ह यू, बब्बड!'.
== समाप्त ==