फुकटचे सल्ले!
शाळा कॉलेजात असताना अनेकांनी येता-जाता मला "सरळ" वळण लावण्याच्या नावाखाली केलेल्या फुकटच्या उपदेशांनी माझं पित्तं फार खवळायचं! कधी (म्हणजे बर्याचवेळेला) मी मारलेल्या बंडला उघडकीस आल्या तर 'खोटं बोलू नकोस, खोटं बोलल्यानं पाप लागतं'. कधी रविवारी सकाळी जरा उशीरा पर्यंत लोळलो तर लगेच 'उठा आता, नुस्ते लोळत पडू नका. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती आरोग्य लाभे! समजलेत काय चिमणराव?' अशी हजामत! असलं काही सतत ऐकल्यावर कुठल्याही कुणाचंही डोकं फिरेल, मग माझ्यासारख्या टीनेजराची काय कथा? बरं, याबद्दल कुणाकडे तणतण केली तर 'तू मोठ्यांचा आदर करायला पाहिजेस, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागायला शिकलं पाहिजेस' हे वरती! पण जसजसं माझं वय वाढत गेलं आणि आयुष्य अनेक अनुभवांनी समृद्ध होत गेलं तसतसं त्यातलं बरचसं तितकंस बरोबर नव्हतं हेही लक्षात आलं. आणि आता वयाची साठी ओलांडल्यावर कुठल्याही मोठ्या माणसाची तमा न बाळगता मी इतकं नक्की म्हणू शकतो की .. कधीही खोटं न बोललेली व्यक्ती अस्तित्वात नाही. थोडं फार खोटं बोलल्याशिवाय या जगात कुणीही कसं काय जगू शकेल? प्रत्येकावर काहीना ...