क्रिकेटचे पाळणाघर
लॉर्ड्स क्रिकेट मैदान ही क्रिकेटची पंढरी आहे हे सर्वश्रुतच आहे. दर वर्षी हजारो पर्यटक भक्तिभावाने फक्त हे मैदान बघायला येतात. त्यात भारतीय लोकांची संख्या सगळ्यात जास्त आहे हे तिथे काम करणार्या माणसानेच मला सांगितलं. अर्थात भारतीयांचे एकूण क्रिकेट वेड बघता यात नवल वाटण्यासारखं काही नाही म्हणा! मी पण त्यातलाच एक! पण क्रिकेटचं अति वेड असलं तरी क्रिकेटच्या एकूण इतिहासाबद्दल मी तरी अनभिज्ञ आहे. उदाहरणार्थ, क्रिकेटचा जन्म कुठे झाला? मी याचं उत्तर बेधडकपणे लॉर्ड्स असं दिलं असतं. हा प्रश्न मला कधीही पडला नाही आणि मला ही कधी कुणी विचारला नाही. याचा अर्थ इतरांना पण तो पडला असण्याची शक्यता नाही. कुठलेही नस्ते प्रश्न न पडणं आणि पडले तरी त्यावर खोलात जाऊन विचार न करणं हा माझा स्थायीभाव आहे. तर, क्रिकेटचा जन्म कुठे झाला हे नक्की कुणालाच माहिती नाही. पण इतकं माहिती आहे की क्रिकेट शेकडो वर्षांपासून दक्षिण इंग्लंडमधे खेळलं जात होतं. तेथे सोळाव्या शतकामधे क्रिकेट खेळलं गेल्याचे संदर्भ आहेत. क्रिकेटचा जन्म कुठे झाला हे नक्की माहिती नसलं तरी क्रिकेटचं पाळणाघर कुठे होतं ते नक्की माहिती आह...