Posts

Showing posts from 2012

ऑक्सफर्डचं विहंगावलोकन!

Image
कालिदासाचं मेघदूत म्हणजे मान्सूनच्या ताज्या ताज्या ढगांच्या दक्षिणोत्तर प्रवासाचं वर्णन आहे म्हणून फार पूर्वी पुण्याच्या एका डॉक्टरांनी ते पडताळून पहायचं ठरवलं. त्यांचं स्वतःचं विमान होतं. मान्सून आल्या आल्या त्यांनी विमानातून ढगांबरोबर प्रवास केला आणि खाली जे काय दिसलं ते मेघदूताशी पडताळून पाहून मेघदूतावर ISI चा शिक्का मारला. हे सगळं मी ऐकल्यावर मला पण ऑक्सफर्डचा मेघदूत व्हायची हु़क्की आली. ऑक्सफर्ड वरून कसं दिसतं ते कुण्या कालिदासाने सांगितलेलं नसल्यामुळे मला स्वतःलाच ते पहाणं व लिहीणं (आणि आता तुम्हाला वाचणं) क्रमप्राप्त झालं. स्वतःचं विमान असण्याची तर सोडाच पण सध्या विमानात बसण्याची देखील ऐपत नसल्यामुळे मला ऊष्ण हवा भारित फुग्याचा आश्रय घ्यावा लागला. फुगेवाल्या कंपनीकडे रीतसर नोंदणी केल्यानंतरचं पहिलं उड्डाण वारा असल्यामुळे रद्द झालं. खरं तर तसा काही फार वेगाचा वारा मला जाणवला नव्हता, एखाद दुसरी झुळुक येत होती इतकंच! तेव्हढा वारा तर पाहीजेच, नाहीतर फुगा एकाच जागी राहील.. असं आपलं माझं मत हो! मग नवीन तारखा ठरवल्या. ते पण उड्डाण रद्द झालं! असं अजून एक दोन वेळेला झाल्यावर एकदाचं ते...

ऑक्सफर्डचा फेरफटका

Image
जगातल्या अग्रेसर विद्यापीठांमधे ऑक्सफर्डची गणना होते हे पुण्यातल्या वाहतुकीला शिस्त नाही इतकं सर्वश्रुत आहे. गाढ्या विचारवंतांचा आणि संशोधकांचा सुळसुळाट असलेलं, ८०० वर्षांपेक्षा जुनं, ऑक्सफर्ड विद्यापीठ आत्तापर्यंत ५० च्या वर नोबेल पारितोषिकांचं धनी आहे. जुनी कॉलेजं व जुन्या वास्तू अजूनही टिकून आहेत. नुसत्या टिकूनच नाहीत तर वापरात पण आहेत. याचं एक कारण शासकीय प्रयत्न व अनुदान आणि दुसरं हिटलर! हे कारण एखादं काम न झाल्याचा दोष वक्री शनीला देण्याइतका हास्यास्पद वाटेल पण दुसर्‍या महायुद्धात ऑक्सफर्डवर बाँब टाकायचे नाहीत असा हिटलरचा हुकूम होता. कारण त्याला इंग्लंड जिंकल्यावर ऑक्सफर्ड आपली राजधानी करायची होती. ऑक्सफर्डबद्दल बरंच लिहीलं गेलंय व बर्‍याच कॅमेर्‍यात ते पकडलंय! एक प्रतिष्ठित विद्यापीठ असलेलं शहर, कार निर्मितीच्या कारखान्याचं शहर आणि आता बायोटेक्नॉलॉजी मधील आघाडीचं शहर अशी विविध ओळख असली तरी ऑक्सफर्डची लोकसंख्या फार काही प्रचंड नाही, जेमतेम दोन लाख! आपल्याकडचं एखादं वडगाव बुद्रुक सुद्धा सहज त्याच्या तोंडात मारेल. पण प्रतिवर्षी जितके पर्यटक (९० लाख) इथे येऊन जातात तितके आपल्या ता...

हा खेळ आकड्यांचा!

(सदर लेख जत्रा २०११ दिवाळी अंकात, 'विद्यापिठातील संशोधनाची ऐशीतैशी' या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला होता) एका फुटकळ शहरात फुटकळ विद्यार्थ्यांसाठी फुटकळ लोकांनी चालवलेलं ज्ञानपिपासू नावाचं एक फुटकळ विद्यापीठ होतं. डोंगरावरचे भूखंड स्वस्त असतात म्हणून की काय हे पण डोंगरावरतीच वसलेलं होतं. टेकड्यांवर पूर्वी देवळं दिसायची तशी हल्ली विद्यापिठं दिसायला लागली आहेत! श्री. फुटाणे त्याचे एका वर्षापासूनचे शिळे कुलगुरू! कुलगुरू होण्यापूर्वी फुटाणे परीक्षा विभागाचे मुख्य होते. 'परीक्षा विभागातील कार्यक्षम आणि सशक्त अधिकारी' असा टिळा घेऊन कुलगुरू निवासात रहायला आल्या आल्या ते कैलासवासी झाले.. केवळ कुलगुरू निवासाचं नाव 'कैलास' होतं म्हणून! कार्यक्षम वगैरे ठीक होतं पण ते सशक्त प्रकरण काय असेल ते कुणालाच झेपलं नाही. इतर विद्यापीठात चालतं तसचं कुठल्या न कुठल्या आकडेवारीच्या मागे सतत धावण्याचं काम इथेही चालायचं! किती मुलं पदवी परीक्षेला बसली? का बसली? किती पास झाली? किती मागासवर्गीय होती? किती पहिल्या वर्गात पास झाली? वर्गात न बसता किती पास झाली? किती विद्यार्थ्यांनी पदवीसाठी प्...

इंग्लंड मधील भत्ताचारी लोक!

न्यूटन, स्टिफन हॉकिंग, बेअर्ड, ग्रॅहॅम बेल, मॅक्सवेल, डार्विन या सारख्या शास्त्रज्ञांचा, शॅकल्टन, कॅप्टन कुक सारख्या धाडशी माणसांचा व चॅप्लिन, ज्युली अँड्र्यूज सारख्या अभिनेत्यांचा इंग्लंड हा देश असल्यामुळे मला इंग्लंड मधे यायच्या आधी आणि आल्यानंतर काही दिवस इथल्या प्रत्येक माणसाबद्दल प्रचंड आदर वगैरे वाटायचा. इथले सर्व लोक प्रचंड हुशार, कामसू व प्रामाणिक असतील हा गैरसमज त्यातूनच झालेला! नंतर ऑफिसातल्या लोकांचं वर्तन, पेपरातल्या बातम्या, टाटांनी मारलेली चपराक पहाता इतकं समजलं की मोजके लोक सोडता बाकीचे कामाच्या नावाखाली टाईमपासच करीत असतात. तसं हे विशेष नाही कारण जगात सगळीकडे साधारण अशीच परिस्थिती आहे. मग विशेष काय आहे? विशेष आहे तो एक ऐतखाऊ कामचुकार समाज! या समाजातले लोक पिढ्यान पिढ्या काम न करता, आयुष्यभर शिट्ट्या मारत आरामात फिरतात. ते सगळे लोक म्युन्सिपाल्टीने दिलेल्या घरात रहातात. अशी घरं पुरविण्याचा म्युन्सिपाल्टींचा खर्च वर्षाला सुमारे २१ बिल्यन पौंड (१६८ हजार कोटी रुपये (१)) आहे. एक सहा मुलांची अविवाहीत आई महिन्याला सुमारे साडेपाच लाख रुपये भाड्याच्या व सुमारे १६ कोटी रुपया...

वाघोभरारी

'संकेत! इकडे ये! हे हीन अभिरुचीचे फोटो उद्या पर्यंत निघाले नाहीत तर मी स्वतः ते काढून जाळून टाकेन!'.. संध्याकाळी घरी आलेल्या शहाणे मास्तरांनी विलायती कपड्यांची होळी करणार्‍यांच्या आवेषात ठणकावलं. त्यांचा आवाज होताच तसा.. ठणठणीत! त्यांनी वाहतुकीच्या गोंगाटाच्या वरताण सूर लावला की प्रत्येक पोराला ते आपल्याच कानात ओरडताहेत असं वाटायचं! 'हीन अभिरुची काय बाबा? ते सही फोटो आहेत बरं का! एकदम फट्टाक! तुम्हाला नाही समजायचं त्यातलं! सारखी उगीच नावं ठेवता तुम्ही!'.. हा डायलॉग ऐकल्यावर लव-कुशांनी खुद्द वाल्मिकींना रामायण शिकवल्यासारखं मास्तरांना वाटलं. 'तू ही... ही जी अर्ध्या मुर्ध्या कपड्यातल्या बायकांची चित्रं लावली आहेत ना?.. त्याला हीन अभिरुची म्हणतात.. देहाचं हिडिस प्रदर्शन म्हणतात.. सौंदर्याची जाण नाही! कोणीतरी मूर्ख ढुढ्ढाचार्य उठतो.. नग्ननेत सौंदर्य आहे म्हणतो.. झापडं काढून बघायला हवं म्हणतो.. मग तुझ्यासारखे अर्धशिक्षित अपरिपक्व बाजीराव ओढतात त्याची री! त्यापेक्षा जरा स्वतःकडे झापडं काढून बघा! गलिच्छपणाची किळसवाणी जाणीव होईल'.. मास्तर हात नाचवत परत एकदा ठणठणले...

एक खगोलशास्त्रीय दुर्मिळ घटना!

Image
(टीप - या लेखाचा सहलेखक मायबोली वरील खगोलशास्त्रज्ञ आशिष (आश्चिग) आहे. त्यामुळे काही प्रश्न असल्यास त्याला विचारा.) वेगवेगळ्या व्यवसायात वेगवेगळे धोके असतात. खगोलशास्त्राचा धोका उल्कापाताने मरण्याचा नसतो (उल्कापाताने कोणीही मेले असल्याची नोंद नाही), अघटीत गोष्टींच्या (म्हणजेच अ-घडु शकणाऱ्या गोष्टींच्या) इ-मेल उत्पाताचा असतो. 'पळा-पळा, सारे ग्रह रांगेत उभे आहेत', 'पहा-पहा, एका महीन्यात पाच-पाच शूक्रवार, शनिवार, सूर्यवार' वगैरे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या (आणि) दुर्मीळ गोष्टींकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होते. अशीच एक अति-दुर्मीळ आणि खगोलशास्त्राकरता ऐतिहासीक महत्व असलेली घटना येत्या ५-६ जूनला होऊ घातली आहे. तुमच्या-आमच्याच नाही, तर सध्या हयात असलेल्या सर्वांकरताच पृथ्वीवरून शुक्राची ही सुर्याबरोबर होणारी युती पहायचा शेवटचा योग आहे. चंद्रांचे पृथ्वीभोवती फिरण्याचे आणि पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याचे प्रतल एक नसल्याने दर महिन्याला युती होत नाही. त्याचप्रमाणे शुक्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या पातळीशी करत असलेल्या ३.४ अंशांच्या कोनामुळे शुक्र, पृथ्वी आणि सूर्य जरी जवळ जवळ एका र...