Posts

Showing posts from 2018

इकडंच ... तिकडंच!

इंग्लंडच्या राजाराणीच्या स्वागताप्रित्यर्थ गेटवे ऑफ इंडिया बांधला तसा सहार विमानतळ तमाम आयटीच्या लोकांच्या परदेशगमनाप्रित्यर्थ गेट आउट ऑफ इंडिया म्हणून बांधलाय की काय अशी शंका येण्याइतपत बाहेर जाणार्‍यांची संख्या वाढायला लागलेली होती. 'तो' काळ म्हणजे बिल गेट्स घरोदारी डेस्कटॉप असण्याची स्वप्न बघत होता तो काळ, भारतातून बाहेर जाताना फक्त ५०० डॉलर नेता यायचे तो काळ, विमानात/ऑफिसात बिनधास्तपणे सिगरेटी पिता यायच्या तो काळ, परदेशी जाणार्‍यांकडे आदराने बघायचा काळ, नंबर लावल्यावर फोन / गॅस मिळायला ४/५ वर्ष लागायची तो काळ!! त्या काळी भाड्याने प्रोग्रॅमर परदेशी पाठवून पैसे कमविणे हा झटपट श्रीमंत होण्याचा एक मार्ग होता. आमची कंपनी पण त्यात घुसायच्या प्रयत्नात होती. पण प्रोग्रॅमर ट्रॅफिकिंग मधे बर्‍याच कंपन्यांनी आधी पासून जम बसविलेला असल्यामुळे घुसणं अवघड होतं. आमचे सीव्ही पॉलिश करून पाठवले जायचे. कुणाचाही सीव्ही वाचला तरी सारखाच वाटायचा.. आम्ही सगळेच टीम प्लेयर, हार्ड वर्किंग, गुड कम्युनिकेशन स्किल्स असलेले उत्कृष्ट प्रोग्रॅमर होतो. त्यामुळे कुणाला घ्यावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असणा...

आर्किमिडीजचा स्क्रू!

Image
आर्किमिडीजचं नाव घेतलं की बहुतेकांना त्याचा शोध नक्की काय होता ते भले सांगता येणार नाही पण तो नग्नावस्थेत युरेका! युरेका! (खरा उच्चार युरिका आहे म्हणे) ओरडत रस्त्यातून पळाला होता हे डोळ्यासमोर नक्की येईल! पाठ्यपुस्तकं रंजक करण्यासाठी ज्या गोष्टी घालतात नेमक्या त्याच जन्मभर लक्षात रहातात. असो! आर्किमिडीजने बरीच उपयुक्त यंत्रं बनविली त्यातलंच एक आर्किमिडीजचा स्क्रू आहे! आर्किमिडीजचा स्क्रूचा वापर करून पाणी वर खेचता येतं! आर्किमिडीजचा स्क्रू हा एक मोठ्या आकाराचा स्क्रूच आहे. त्याचं एक टोक पाण्यात बुडवून तो फिरविला की पाणी त्या स्क्रुच्या आट्यातून वर वर येतं. चित्र-१ मधे पाणी वर चढविण्यासाठी एक मुलगा पायाने तो स्क्रू फिरवतो आहे. चित्र-१: आर्किमिडीजचा स्क्रू कसा चालतो ते समजण्यासाठी केलेलं फॉलकर्क या स्कॉटलंड मधील गावातल्या एका बागेतलं खेळणं. या उलट पाणी स्क्रू मधून सोडलं की स्क्रू फिरायला लागतो. या तत्वाचा वापर केला आहे वीजनिर्मितीसाठी! अशा पद्धतीच्या उलट सुलट क्रिया प्रक्रिया तंत्रज्ञानात इतरत्र पण वापरल्या गेल्या आहेत. उदा. तारेच्या भेंडोळ्याने चुंबकीय क्षेत्र छेदलं की तारेत ...

ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या....

'दिवाळीचा काय प्लॅन आहे रे बंड्या?'.. अष्टपुत्रेंनी आठव्यांदा विचारल्यावर बंड्या 'पुण्याला जायचा विचार आहे' असं गुळमुळीतपणे पुटपुटला. त्याला कारण तसंच होतं. अष्टपुत्रेंना विषय मिळायचा अवकाश की ते त्यावर तासनतास ब्रेथलेस गाण्यासारखे बोलू शकायचे. पण त्यांना टाळता येणं शक्य नव्हतं. कारण त्याच्या गावात मराठी टाळकी कमी असल्यामुळे कुठल्याही समारंभात तीच तीच पुनःपुन्हा भेटायची. इंग्लंडातली मराठी मंडळी चक्क एकमेकांना धरून असतात हे समजलं तर अखिल महाराष्ट्रातले कट्टर मराठी झीट येऊन पडतील. असो! पण बंड्याच्या चावीमुळे लंडन पुणे प्रवासावरचा त्यांचा हातखंडा एकपात्री प्रयोग सुरू झाला! 'मी सांगतो तुला बंड्या! सकाळच्या विमानाने अजिबात जाऊ नकोस.' 'क क का? तिकीट स्वस्त आहे!'.. बंड्याचा चेहरा पडला. 'अरे असं किती स्वस्त असणारे? फार तर फार १५ पौंड! पण कटकट बघ किती होते. सकाळी ९ च्या आसपास विमान असतं म्हणजे ७ च्या सुमारास हिथ्रोवर पोचायला हवं! इथून हिथ्रोला जायला दीड तास तरी लागतोच लागतो. म्हणजे साडे पाचला निघायला हवं! त्यासाठी ४/४:३० ला उठायचं म्हणजे किती कटकट! इतकं ...

इये स्वर्गाचिये नगरी!

या लेखाच्या पार्श्वभूमीसाठी वाचा:  'वादळ' पहाटेच्या अंधुक प्रकाशात रस्त्यावर पडलेला गुंड्या उठला. त्याला त्याची रमोना थोड्या अंतरावर आडवी झालेली दिसली.. तिची चाकं अजून फिरत होती. इकडे तिकडे पाहिल्यावर बैलावर बसलेला व  पांढरे स्वच्छ कपडे परिधान केलेला एक माणूस दिसला.. तो साक्षात यमदूत होता.. पण बिचार्‍या गुंड्याला तो अंधुक प्रकाशात, कंदील न घेता बैल घेऊन जाणारा एक सामान्य माणूस वाटला. याच्या बैलाला धडकून आपण पडलो असं समजून गुंड्या भांडण्याच्या पवित्र्यात त्याच्यापाशी गेला. पण त्याचा तेजःपुंज चेहरा आणि चेहर्‍यावरचे सौम्य भाव पाहून थबकला. गुंड्याच्या मनातला गोंधळ जाणून यमदूत उद्गारला "भो वेंकट! तुझा या भूतलावरील कार्यभाग उरकला आहे. तस्मात् तू माझ्यासह प्रस्थान ठेव.".. संस्कृतप्रचुर भाषेची सवय नसल्यामुळे गुंड्याची बंद खोलीत सापडलेल्या चिमणीसारखी अवस्था झाली.  "अँ! कौनसी भाषा में बोला तू? तू जो भी बोला ना, सब बंपर गया! मेरेसे मराठीमे नहीं तो हिंदीमे बात कर!"..भंजाळलेला गुंड्या बरळला. "भो वेंकट! ..." "अरे यार! तू बार बार भो भो मत कर! कुत्ते...

स्वप्नांवरती बोलू काही!

स्वप्नांच्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे. म्हणजे मला रोज तर्‍हेतर्‍हेची स्वप्न पडतात अशा अर्थाने हो! आणखी कुठल्या कुठल्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे ते माझे हितचिंतक सांगतीलच. खरं म्हंटलं तर स्वप्न पडणं यात काही विशेष नाही कारण स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. प्रत्येकाला रोज साधारणपणे ५ स्वप्नं पडतात आणि प्रत्येक स्वप्न सुमारे १५ ते ४० मिनिटं चालतं असं म्हणतात. काही लोकांना आपल्या बायकोने नक्की काय आणायला सांगितलं होतं हे जसं आठवत नाही तशी स्वप्नं पण नंतर आठवत नाहीत इतकंच! मग मी का स्वप्नांबद्दल बोलतोय? कारण माझी बौद्धिक क्षमता बघता मला फक्त स्वप्नांसारख्या हलक्याफुलक्या विषयांवरच त्यातल्या त्यात बोलायला जमतं. मी आयुष्यासारख्या जड गंभीर आणि किचकट विषयावर बोलू शकत नाही. शिवाय, मला असं जाणवलं की हल्ली मी स्वप्नांबद्दल बोलतच नाही. पूर्वी मला स्वप्न पडलं की मी सकाळी सकाळी बायकोला मार्टिन ल्युथर किंगच्या आवेषात 'I had a dream!' असं सांगायचो आणि ती तितक्याच थंडपणे 'हां, ती कालची भांडी घे धुवून!' असं सांगून माझ्या स्वप्नसृष्टीला सत्यतेची कल्हई लावायची. शिवाय मला असं वाटतं की बरेच लोकही ...

एका मुलीचं रहस्य!

दुपारी ३ वाजता दारावर टकटक झाली आणि नियतीने दार उघडून एका मध्यमवयीन माणसाला आत घेतलं. 'नमस्कार! मी ठोकताळे साहेबांना भेटायला आलोय.' आपल्या समोर एका अत्यंत सुंदर ६ फुटी उंच सोनेरी केसाच्या स्त्रीला पाहून त्या गृहस्थाचे डोळे चमकले. नियती होतीच तितकी सुंदर.. रेखीव शेलाटा बांधा, गोरीपान अंगकांती, गोड चेहरा, मानेवर रुळणारे सोनेरी केस, कोलगेटच्या जाहिरातीतल्या बाईसारखी शुभ्र व मोत्यासारखी दंतपंक्ती, खुलून दिसणारं नकटं नाक आणि मादक भुरे डोळे. तिनं जीनची निळी पँट आणि वर गुलाबी टीशर्ट घातला होता. 'आपलं नाव?' नियतीने तिच्या गंगुबाई हनगळी आवाजात विचारणा करताच त्याच्या डोळ्यातली चमक मावळली. ते न लक्षात येण्याइतकी नियती आंधळी नव्हती पण त्याची तिला आता सवय झाली होती. तिला स्वतःलाही तिचा आवाज आवडत नसे, पण  तिचा नाईलाज होता. 'दीपक इंगवले' 'या! या! मी नियती डोईफोडे, ठोकताळेंची असिस्टंट, बसा ना!' नियतीने उत्तम ठोकताळे समोरच्या एका खुर्चीकडे निर्देश केला. ते ऑफिस एका 1 BHK फ्लॅट मधे थाटलेलं होतं. हॉलमधे पुस्तकांनी भरलेली ४/५ कपाटं होती. टीपॉय आणि स्टडी टेबलवर अनेक पुस...