इकडंच ... तिकडंच!
इंग्लंडच्या राजाराणीच्या स्वागताप्रित्यर्थ गेटवे ऑफ इंडिया बांधला तसा सहार विमानतळ तमाम आयटीच्या लोकांच्या परदेशगमनाप्रित्यर्थ गेट आउट ऑफ इंडिया म्हणून बांधलाय की काय अशी शंका येण्याइतपत बाहेर जाणार्यांची संख्या वाढायला लागलेली होती. 'तो' काळ म्हणजे बिल गेट्स घरोदारी डेस्कटॉप असण्याची स्वप्न बघत होता तो काळ, भारतातून बाहेर जाताना फक्त ५०० डॉलर नेता यायचे तो काळ, विमानात/ऑफिसात बिनधास्तपणे सिगरेटी पिता यायच्या तो काळ, परदेशी जाणार्यांकडे आदराने बघायचा काळ, नंबर लावल्यावर फोन / गॅस मिळायला ४/५ वर्ष लागायची तो काळ!! त्या काळी भाड्याने प्रोग्रॅमर परदेशी पाठवून पैसे कमविणे हा झटपट श्रीमंत होण्याचा एक मार्ग होता. आमची कंपनी पण त्यात घुसायच्या प्रयत्नात होती. पण प्रोग्रॅमर ट्रॅफिकिंग मधे बर्याच कंपन्यांनी आधी पासून जम बसविलेला असल्यामुळे घुसणं अवघड होतं. आमचे सीव्ही पॉलिश करून पाठवले जायचे. कुणाचाही सीव्ही वाचला तरी सारखाच वाटायचा.. आम्ही सगळेच टीम प्लेयर, हार्ड वर्किंग, गुड कम्युनिकेशन स्किल्स असलेले उत्कृष्ट प्रोग्रॅमर होतो. त्यामुळे कुणाला घ्यावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असणा...