ऑक्सब्रिज म्हणजे ऑक्सफर्ड आणि केंब्रिज ही दोन्ही विद्यापीठं! हा शब्द जेव्हा दोन्ही विद्यापीठांबद्दल एकदम बोलायचं असतं तेव्हाच वापरतात. दोन्ही शहरांबद्दल एकत्रित पणे बोलण्यासाठी हा शब्द वापरत नाहीत. तसं केम्सफर्ड असाही एक शब्द पण होऊ शकला असता म्हणा पण ऑक्सब्रिज प्रचलित झाला. इंग्रजीत दोन तीन शब्दातली अक्षरं एकत्र करून एक वेगळा सुटसुटीत शब्द बर्याच वेळेला करतात. उदाहरणार्थ ब्रेक्झिट!
ऑक्सब्रिजला चांगला 800 वर्षांपेक्षा मोठा इतिहास आहे, त्यामुळे तिथेल्या सुरस आणि चमत्कारिक कथा व प्रथांना रुजायलाही बराच अवधी मिळालेला आहे. ऑक्सफर्डच्या नागरिकांना मानहानीकारक अशी एक प्रथा 500 वर्ष चालू होती. दर वर्षी १० फेब्रुवारीला महापौर आणि ६१ मान्यवर नागरिकांना सेंट मेरीज चर्चपर्यंत शोकयात्रा काढून चॅन्सेलराची क्षमायाचना करण्याची व काही पैसे दंड देण्याची एक प्रथा होती. तिचा उल्लेख माझ्या 'ऑक्सफर्डचा फेरफटका' या लेखात आलेला असल्यामुळे इथे परत सांगत नाही. इतर काही कथा व प्रथांबद्दल इथे सांगतो.
इकडच्या विद्यापीठांमधे नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापिठाचं अधिकृत सदस्यत्व घ्यावं लागतं. या साठी जो समारंभ होतो त्याला मॅट्रिक्युलेशन म्हणतात. मॅट्रिक्युलेशनचा हा अर्थ मला तरी नव्यानेच समजला. हा समारंभ पहिल्या टर्मच्या सुरुवातीलाच व्हावा लागतो. मिकेलमस (ऑक्टोबर ते डिसेंबर), हिलरी( जानेवारी ते मार्च ) व ट्रिनिटी( एप्रिल ते जून ) अशी ऑक्सफर्ड मधील टर्मची नावं आहेत. तर मिकेलमस (ऑक्टोबर ते डिसेंबर), लेंट( जानेवारी ते मार्च ) व ईस्टर( एप्रिल ते जून ) अशी केंब्रिज मधील टर्मची नावं आहेत. जर मिकेलमस टर्म अर्धी उलटून जाईपर्यंत जर विद्यार्थ्याने मॅट्रिक्युलेशन केलं नाही तर कॉलेज विद्यार्थ्याला तिथे रहाण्याची परवानगी नाकारू शकतं. या समारंभासाठी गडद पॅंट किंवा स्कर्ट व मोजे, काळे बूट, पांढर्या रंगाचा शर्ट किंवा ब्लाऊज, गडद कोट आणि पांढरा किंवा काळा बो टाय, किंवा काळा लांब टाय घातला जातो. या सगळ्यावरती एक गाऊन पण घालायचा असतो. हा गाऊन संध्याकाळच्या कॉलेजच्या जेवणाच्या वेळी (आठवा हॅरी पॉटर सिनेमातले जेवणाचे प्रसंग.. त्याचं शुटिंग ऑक्सफर्डच्या कॉलेजात झालंय.), परिक्षेच्या वेळी, पदवीदान समारंभाच्या वेळी घालायचा असतो..... या ठिकाणी गडद म्हणजे गडद भुर्या किंवा गडद निळ्या किंवा गडद काळ्या रंगाचा कपडा!
ऑक्सफर्डच्या ऑल सोल्स कॉलेज मधील ही एक मजेशीर प्रथा! दर 100 वर्षांनी, बहुतेकदा 14 जानेवारीलाच, कॉलेज मधे एक जंगी मेजवानी झाल्यावर रात्री सगळे फेलो (म्हणजे वरिष्ठ व मान्यवर संशोधक) हातात मशाली घेऊन एक शोधयात्रा कॉलेजच्या आवारात काढतात. या शोधयात्रेचं उद्दिष्ट एका कपोलकल्पित मॅलार्डचा शोध घेऊन त्याची शिकार करणं हे असतं. मॅलार्ड ही बदकाची एक जात आहे (चित्र-1 पहा).
चित्र-1: नर व मादी मॅलार्ड
या जातीच्या नर बदकाचं डोकं मोरपंखी असतं आणि गळ्याभोवती पांढरी पट्टी असते. या शोधयात्रेचं नेतृत्व करणारा लॉर्ड मॅलार्ड यात्रेच्या सुरवातीला एका खुर्चीत बसलेला असतो व ती खुर्ची काही फेलो वाहतात. लॉर्ड मॅलार्ड हे कॉलेजचं एक पद आहे जे भूषवणारा कॉलेजचाच एक प्राध्यापक असतो. त्याच्याही पुढे एक फेलो एका दांडीला बांधलेल्या बदकाला घेऊन चालतो. हे सगळे फेलो मॅलार्डचं गाणं म्हणत आवारात फिरतात. सुरवातीला जिवंत मॅलार्ड दांडीला बांधला जात असे. 1901 मधे मेलेला मॅलार्ड घेतला तर 2001 मधे लाकडी मॅलार्ड घेतला गेला. पुढची शोधयात्रा 2101 मधे होईल.
तर ही विचित्र प्रथा 1437 साली जेव्हा ऑल सोल्स कॉलेजचा पाया खणण्याचं काम चालू होतं तेव्हा सुरू झाली. एका दंतकथेप्रमाणे कॉलेजचा संस्थापक, हेंरी क्लिचेल आर्चबिशप ऑफ कॅंटरबरी, हा कुठली जागा कॉलेजला योग्य ठरेल या विचारात असताना त्याला एक स्वप्न पडलं. स्वप्नात असं दिसलं की त्यानं हाय स्ट्रीट येथे सेंट मेरीज चर्चच्या जवळ पाया खणला तर त्याला जमिनी खालच्या गटारात बंदिस्त झालेलं एक गुबगुबीत गलेलठ्ठ मॅलार्ड मिळेल. त्यानं स्वप्नात दिसलेल्या जागेवर खणलं तर त्याला झटापटीचा व पंखाच्या फडफडण्याचा भयानक आवाज ऐकू आला. त्यानं काही प्रार्थना म्हणून खड्ड्यात हात घातला आणि एका भल्या मोठ्या मॅलार्डला बाहेर काढलं तर ते उडून गेलं. नंतर कॉलेजच्या फेलोंनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं व खाल्लं. दुसर्या एका दंतकथेप्रमाणे असं स्वप्न सहाव्या हेंरी राजाला पडलं होतं. पुढे मॅलार्ड हेच कॉलेजचं बोधचिन्ह झालं.
ऑल सोल्स कॉलेज मधे फक्त पदव्युत्तर शिक्षणासाठीच प्रवेश मिळू शकतो. प्रवेश मिळवण्यासाठी एका अत्यंत अवघड परीक्षेतून पार व्हावं लागतं. त्यामुळेच इथे प्रवेश मिळवणं फार मानाचं मानलं जातं. प्रवेश मिळालेल्यांना काहीही शिकवलं जात नाही, त्यांच्यावर कुठलंही संशोधन करायचं बंधन नसतं. विद्यार्थी त्याला वाटेल ते शिकण्यास मोकळा असतो. असे अति बुद्धिमान विद्यार्थी अशी काही विचित्र गोष्ट करतात याची जास्त गंमत वाटते.
ऑक्सफर्ड मधल्या काही कॉलेजांमधे कासवं पाळायची प्रथा आहे. कॉर्पस क्रिस्ती कॉलेजमधे कधीही कमितकमी एक तरी जिवंत कासव मॅस्कॉट म्हणून असतेच असते. पाळलेल्या कासवांची देखभाल करण्यासाठी 'कासवाचा राखणदार' असं एक पद देखील आहे. त्या पदासाठी एक निवडणूक पण होते. दर वर्षी एक कासवोत्सव होतो त्यात कॉर्पस क्रिस्ती कॉलेजची कासवं, इतर कॉलेजची कासवं तसंच ऑक्सफर्ड गावातल्या रहिवाश्यांची कासवं यांच्यात एक संथ शर्यत होते. बॅलिओल कॉलेजच्या लोकांना देखील त्यांच्या कासवांबद्दल अपार प्रेम आहे. त्यांच रोझा नावाचं कासव कॉलेज मधे 43 वर्ष होतं आणि ते अनेक शर्यती जिंकलं. त्याचं नाव रोझा लक्झेम्बर्ग या एका जर्मन मार्क्सवादी बाईच्या नावावरून ठेवलेलं होतं. बॅलिओल कॉलेजच्या कासवांची देखभाल करणारा 'कॉम्रेड कासव' असतो. रोझा 2004 च्या वसंत ऋतुमधे गायब झाली.
शेरवेल नदीच्या तीरावर मॉडलिन कॉलेज आहे. याच्या Magdalen College या स्पेलिंग वरून त्याचा उच्चार मॉडलिन कॉलेज असा कुणीही शुद्धितला माणूस करू शकेल असं मला वाटत नाही. दर वर्षी एक मेला सकाळी 6 वाजता या कॉलेजचा कॉयर कॉलेजच्या मनोर्यावरून एक भक्तिगीत (हिम) म्हणतो. हा मनोरा लंडन ऑक्सफर्ड या हमरस्त्याला लागून आहे. हा रस्ता मॉडलिन पुलावरून ऑक्सफर्ड गावात येतो. 500 वर्षांपासून चालत आलेल्या या प्रथेची प्रत्यक्ष अनुभूति घेण्यासाठी रस्त्यावर व पुलावर लोकांची प्रचंड गर्दी होते. त्या नंतर लोक उत्स्फुर्तपणे गाणी बजावणी व नाच (मुख्यत्वे मॉरिस नृत्य )चालू करतात. काही वर्षांपूर्वी विद्यार्थी पुलावरून नदीत उड्या मारायचे. पण नदीचे पाणी कधी कधी उथळ असू शकते त्यामुळे एका वर्षी एक विद्यार्थी दगावला व इतर वर्षी काही जबर जखमी झाल्यामुळे ती प्रथा बंद झाली.
ऑक्सब्रिजच्या बहुतेक सर्व कॉलेजचं बांधकाम साधारणपणे अनेक चौकोनात असतं. चौकोनाच्या चारी बाजूंवर बिल्डिंग व मधे मोकळी जागा. त्या चौकोनाच्या चारी बाजूने चालायचा रस्ता व मधे अत्यंत सुबकपणे राखलेली मखमली हिरवळ असते. या चौकोनाला क्वाड (Quad) म्हणतात. सामान्य विद्यार्थ्यांना त्या हिरवळीवरून चालायला बंदी असते. ऑक्सफर्ड मधे फक्त प्राध्यापकांना त्या वरून जाता येतं. केंब्रिज मधे तुम्ही हिरवळीवरून जाऊ शकता जर तुम्ही फेलो असाल तर किंवा जर तुम्ही फेलोशी बोलत असाल तर किंवा जर तुम्ही बदक असाल तर!
इंग्लंड मधे ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी रात्री 2 वाजता घड्याळ एक तास मागे जाते. मार्चच्या शेवटच्या रविवारी रात्री 1 वाजता ते एक तास पुढे जाते. हे सगळं थंडीच्या दिवसात जास्तित जास्त उजेड मिळावा यासाठी केलं आहे. पण 1968 पासून घड्याळ मागे-पुढे न करण्याचा एक प्रयोग केला होता तो 1971 मधे थांबवला. त्या प्रीत्यर्थ मर्टन कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी एक 'टाईम सेरेमनी' सुरू केला. या समारंभासाठी विद्यार्थी त्यांचे फॉर्मल कपडे घालून ऑक्टोबरच्या शेवटच्या रविवारी रात्री 2 वाजल्यापासून एकमेकांच्या हातात हात घालून क्वाड भोवती उलटे चालतात. स्पेस-टाईम कॉंटिनमची इंटिग्रिटी राखण्यासाठी हे केलं जातं असं म्हंटलं जातं.
1960 च्या दशकात युरोप व अमेरिकेत या न त्या कारणाने विद्यापिठांचा निषेध करण्याचं व आपल्या मागण्या पुढे करण्याचं प्रमाण वाढलं होतं त्याचे पडसाद इंग्लंड मधेही उमटले. वॉधम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही 1968 मधे काही मागण्या कॉलेज वॉर्डनला सादर केल्या. त्यावर त्यांना कुठलीही तडजोड नको होती. वॉर्डन व कॉलेजच्या फेलोंनी त्यांना दिलेलं हे उत्तर अनेक वृत्तपत्रात छापलं गेलं तसंच अनेक भाषणातही उद्धृत केलं गेलं. ते मूळ इंग्रजी मधूनच वाचण्यात जास्त गंमत आहे.
Dear Gentlemen: We note your threat to take what you call 'direct action' unless your demands are immediately met. We feel it is only sporting to remind you that our governing body includes three experts in chemical warfare, two ex-commandos skilled with dynamite and torturing prisoners, four qualified marksmen in both small arms and rifles, two ex-artillerymen, one holder of the Victoria Cross, four karate experts and a chaplain. The governing body has authorized me to tell you that we look forward with confidence to what you call a 'confrontation,' and I may say, with anticipation.
या पत्रानंतर विद्यार्थ्यांनी मागण्या बिनशर्त मागे घेतल्या हे वेगळं सांगायला नकोच.
एके काळी कॉलेजचे दरवाजे रात्री बंद होत असत. असल्या किरकोळ अडथळ्याला जुमानतील तर ते विद्यार्थी कसले? ते तरिही बाहेर फिरत असत आणि रात्री भिंतीवर चढून कॉलेजात येत असत. वॉधम कॉलेजच्या भिंतीवरून चढून येणं अवघड होतं पण विद्यार्थ्यांना एक रस्ता माहिती होता तो वॉर्डनच्या घरातून येणारा होता. एका रात्री एक विद्यार्थी जेव्हा आत आला त्याच वेळेला वॉर्डन त्या खोलीत आला. विद्यार्थी घाईघाईने सोफ्याच्या मागे लपला. वॉर्डनने एक पुस्तक घेऊन वाचण्यात बराच वेळ घालवला. वाचन झाल्या नंतर वॉर्डन उठताना म्हणाला.. 'जाण्या आधी तो दिवा तेव्हढा बंद करून जा हं!'
केंब्रिजच्या कॉर्पस ख्रिस्ती कॉलेज मधे अनेक भुतांचं वास्तव्य आहे असं म्हणतात. त्यातलं एक हेंरी बट्स याचं आहे. तो पूर्वी कॉर्पस ख्रिस्ती कॉलेज मधेच शिकला व नंतर कॉलेजचा मास्टर (म्हणजे प्रिंसिपॉल) झाला. एक एप्रिल 1632 रोजी त्यानं गळफास लावून आत्महत्या केली. त्याचं भूत अधुन मधून दिसतं. 1904 मधे तीन विद्यार्थ्यांनी ते भूत घालवायचा अयशस्वी प्रयत्न केला. 1967 साली त्याचा अर्धाच देह कॉरिडॉर मधे फिरताना दिसला.
आणखी दोन भुतं एलिझाबेथ स्पेंसर आणि तिच्या प्रेमीची आहेत. हे दोघेही 1667 मधे मेले. एलिझाबेथ त्या वेळच्या कॉलेजच्या मास्टरची मुलगी होती. तेव्हा कॉलेजच्या आवारात मास्टरची बायको व मुलगी या दोनच स्त्रिया होत्या. कॉलेज मुलिंना शिकायला परवानगी देत नसे तेव्हा. जेम्स बेट्स नावाचा एक विद्यार्थी तिच्या प्रेमात पडला. ते दोघे बर्याच वेळेला एकत्र चहा घेत असत. एकदा ते चहा घेत असताना बापाचा आवाज ऐकू आल्यामुळे तिने घाईघाईनं जेम्सला कपड्याच्या कपाटात बंद केलं. नंतर ती थोडा वेळ बाहेर गेली. ते कपाट फक्त बाहेरून उघडणारं असल्यामुळे तो आत गुदमरून मेला. ते तिच्या मनाला इतकं लागलं की तिनं त्याच दिवशी छपरावरून खाली उडी मारून आत्महत्या केली. त्यांची भुतं ख्रिसमस ईव्हला चालतात. 1930 मधे त्या काळच्या सर विल स्पेंस नामक मास्टरने 'जो कुणी भुतांच्या अफवा पसरवेल त्याची हकालपट्टी केली जाईल' असा सज्जड दम दिल्यामुळे भूतदर्शन कमी झालं.
होमर्टन कॉलेज मधे मॅट्रिक्युलेशनच्या जेवणानंतर नवीन विद्यार्थ्यांना दोन रांगात उभं रहायला सांगतात आणि त्यांना होमर्टनच्या शिंगातून वाईन प्यायला लावतात. होमर्टन शिंग हे एक आफ्रिकेतल्या गाईचं शिंग आहे, त्याच्या काही भागावर चांदीचं नक्षीकाम आहे. वाईन पिताना ते एकमेकांशी अॅंग्लो-सॅक्सन भाषेत ओरडून बोलतात. त्यातला एक वाक्प्रचार म्हणजे आपल्याकडे भेटल्यावर जसं 'रामराम' म्हणतात तसं त्या भाषेत "Wassail!" म्हणतात तर उत्तरादाखल "Frith and Freondship sae th'y'" म्हणजे 'peace and friendship be with you' म्हटलं जातं. हल्ली विद्यार्थी टेबलवर समोरासमोर बसतात व त्यांच्या स्वतःच्या ग्लासमधून वाईन पितात. कारण त्या शिंगातून वाईन प्यायल्यामुळे बरेच विद्यार्थी एकदम आजारी पडायला लागल्यामुळे ती प्रथा बंद झाली. या आजाराला 'फ्रेशर्स फ्लू' म्हंटलं जातं.
केंब्रिजचं ट्रिनिटी कॉलेज (ऑक्सफर्ड मधे पण याच नावाचं कॉलेज आहे) हे न्युटन व रामानुजन सारख्या थोर गणितज्ज्ञांनी गाजवलेलं कॉलेज आहे. इथे मॅट्रिक्युलेशनच्या जेवणानंतर विद्यार्थी एक 'ग्रेट कोर्ट रन' नामक शर्यत खेळतात. ग्रेट कोर्ट हा कॉलेजचा सगळ्यात मोठा क्वाड, याच्या सर्व बाजुंची बेरीज सुमारे 367 मिटर्स भरते. बाराचे ठोके पडायला सुरुवात झाली रे झाली की पळायला लागायचं आणि शेवटचा ठोका पडायच्या आत पूर्ण 367 मीटर पळायचं अशी ही शर्यत आहे. सगळे ठोके पडायला सुमारे 43 सेकंद लागतात.
दर वर्षी जूनच्या एका रविवारी ट्रिनिटी कॉलेजचा कॉयर बरोबर दुपारी 12 वाजता एक छोटी संगीत मैफिल सुरू करतो. अर्धा कॉयर मुख्य दरवाजाच्या वरच्या मनोर्यावर तर उरलेला अर्धा घड्याळाच्या मनोर्यावरून गातात. दोन्ही मनोर्यातलं अंतर 60 मिटर आहे त्यामुळे ऐकणार्याला एक वेगळाच अनुभव मिळतो. अर्धी अधिक मैफिल संपते न संपते तोच केंब्रिज विद्यापीठाचा ब्रास बॅंड कॅम नदीच्या पलिकडील क्वीन्स कॉलेजच्या मनोर्यावरून मैफिलीत भाग घेतो. त्याच दिवशी नंतर ट्रिनिटी कॉलेजचा कॉयर अजून एक मैफिल सादर करतो. पण ही कॅम नदीतल्या कंदिलांनी सजवलेल्या अनेक पंटावरून होते. पंट ही एक प्रकारची होडीच असते जी नावाडी एक लांबलचक बांबू पाण्याच्या तळाशी रोवून ढकलतो. हा कॉयर माड्रिगल गाणी म्हणतो.
ट्रिनिटी कॉलेज 1546 मधे आठव्या हेंरी राजाने स्थापन केलं. कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर त्याचा हातात राजदंड घेतलेला पुतळा आहे. खूप वर्षांपूर्वी काही खोडसाळ विद्यार्थ्यांनी तो राजदंड काढून तिथे खुर्चीचा पाय ठेवला, तो अजूनही तसाच आहे. 1980 मधे काही विद्यार्थ्यांनी तो पाय काढून तिथे सायकलचा पंप ठेवला पण कॉलेजने परत तिथे दुसरा पाय आणून बसवला. विद्यार्थ्यांचा अजून एक गमतीशीर खेळ म्हणजे एखादी सायकल झाडाच्या फांद्यामधे उंच टांगून ठेवणे हा आहे. हिवाळ्यात जेव्हा पानं झडतात तेव्हा ती दिसायला लागते. मग कॉलेज ती काढून टाकते. विद्यार्थी अजून एक सायकल जमेल तेव्हा टांगतात.
-- समाप्त --

1 comment:
chhaan lihilay... vachayla interest yetoy...
Post a Comment