आधुनिक कुटुंब!
बीबीसी वर आलेला हा एक सत्य घटनांवर आधारित लेख आहे. भविष्यात काय प्रकारची कुटुंब व्यवस्था असू शकेल याची थोडी कल्पना या लेखामुळे येते. युके बाहेर कदाचित तो न दिसण्याची शक्यता आहे म्हणून त्याचा सारांश इथे देतोय. ही कहाणी जेसिका शेअर नामक अमेरिकेतील मिडवेस्ट भागात रहाणार्या एका स्त्रीची आहे. तिचे दुसर्या एका स्त्री बरोबर लेस्बियन संबंध असताना त्या दोघिंनी मुलं होऊ देण्याचा निर्णय घेतला. त्याही पुढे जाऊन दोघींनी 4 मुलं होऊ देण्याचं ठरवलं व त्यांची नावं काय असतील तेही ठरवलं. लेखात दुसर्या स्त्रीचं नाव दिलेलं नसल्यामुळे आपण तिला रिटा म्हणू. कृत्रिम गर्भधारणेसाठी कुणाचं तरी वीर्य मिळवणं गरजेचं होतं. रिटानं तिच्या बहिणीच्या नवर्याचं नाव सुचवलं. जेसिका तेव्हा विद्यापीठात शिकत होती. शिकता शिकता तिने 'गे व लेस्बियन यांचे कायदेशीर हक्क' अशा एका विषयाचाही अभ्यास केला. त्यातून तिला असं समजलं की वीर्य कुणाचं आहे हे माहिती असेल तर त्याचा पुढे त्रास होऊ शकतो. जर पुढे मागे जन्मदात्या स्त्रीचं निधन झालं तर मुलांचा ताबा त्या माणसाकडे जाऊ शकतो. असे निर्णय पूर्वी न्यायालयात झालेले आहेत. तसं झ...