शॅकल्टनची अफाट साहस कथा
शॅकल्टनचे हरवलेले एंड्युरंस जहाज 107 वर्षानंतर सापडले (चित्र-5) ही नुकतीच आलेली बातमी वाचली आणि माझ्या मनात घर करून राहिलेल्या त्याच्या अचाट साहसकथेला परत उजाळा मिळाला. सुमारे 40/45 वर्षांपूर्वी रीडर्स डायजेस्ट मधे ती वाचली होती तेव्हापासून अर्नेस्ट शॅकल्टन हे नाव आणि त्याचं साहस माझ्या कायमचं लक्षात राहिलं आहे. तसं पाहिलं तर अनेक साहसवीरांनी केलेल्या अनेक मोहिमांसारखीच त्याची पण एक मोहीम! अनेक संकटं, धोके व साहसांनी भरलेली!आणि ती यशस्वी पण नाही झाली. मग असं काय विशेष होतं त्यात? ते जाणण्यासाठी त्या मोहिमेची नीट माहिती सांगितली पाहिजे मग मला त्यातलं काय नक्की भावलं ते सांगता येईल. तो काळ दोन्ही धृवांवर प्रथम कोण पाय ठेवतो या जीवघेण्या स्पर्धेचा होता. त्यासाठी अनेक देशांच्या मोहिमा झाल्या. शॅकल्टनने रॉबर्ट स्कॉटच्या दक्षिण धृवाच्या शोध मोहिमेत (1901-04) भाग घेतला होता. ती त्याची पहिली मोहीम, पण त्याला ती प्रकृतीने साथ न दिल्यामुळे अर्धवट सोडावी लागली. स्कॉट दक्षिणेला 82 अंशापर्यंत जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर शॅकल्टनने केलेल्या मोहिमेत ((1907-09) तो 88 अंशापर्यंत पोचला, दक्षिण धृवाप...