माझा लेखन प्रपंच!
माझे वडील सरकारी B.Ed. कॉलेजचे प्राचार्य असल्यामुळे दर एक-दोन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे महाराष्ट्रातील काही खेडेगाव-वजा-शहरात माझं बालपण जास्त गेलं. मी बारा भानगडी केलेल्या नसल्या तरी बारा गावचं पाणी जरूर प्यालेला माणूस आहे! पुण्याच्या बाहेरच्या शाळा विशेषत: मराठवाड्यातल्या प्रचंड विनोदी होत्या. मराठवाडा तेव्हा मागासलेला होता त्यामुळे त्यांचा दर्जा पुण्यातल्या शाळांच्या खूप खाली आणि अभ्यासक्रम सुद्धा एक वर्ष अलिकडचा होता. नववी मधे पुण्यातल्या शाळेत आल्यावर मला समजलं की मला कुठल्याच विषयातलं काहीच समजत नाही आहे. पुण्यात आठवीतच संस्कृत विषय सुरू झाला होता आणि रामरक्षेतल्या थोड्या फार श्लोकांपलीकडे काही माहीत नव्हतं. गणितात सगळे प्रमेय व रायडर्स नामक अगम्य भाषा बोलायचे. आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा मी खचलो. मला कुठलीच शाळा कधीच न आवडायला ते एक कारण झालं. कुठल्याही विषयाची गोडी लागली नाही, मराठीची देखील! माझा एक नंबरचा शत्रू म्हणजे कुठल्याही भाषेचं व्याकरण! 'हत्ती मेला आहे'.. व्याकरणाने चालवून दाखवा सारखे प्रश्न डोक्यात तिडिक आणायचे. निबंध झेपले नाहीत. त्यामुळे मला कुठल्याही भ...