यू कान्ट बी सीरियस!
"अरे वा चिमण! काय योगायोग आहे! बरं झालं तू दिसलास, मी तुझ्याकडेच यायला निघाले होते. " .. मी टीरुम मधे चहा करीत असताना आमच्या एचार बाईनं, रेचेलनं, माझी तंद्री भंग केली! ती नक्कीच जवळपास मी येण्याची वाट पहात दबा धरून बसली असणार. कारण, तिच्या ऑफिसकडून माझ्या ऑफिसकडे येण्याच्या कुठल्याही सोयिस्कर वाटेवर टीरुम नाही हे ओळखायला शेरलॉक होम्स असण्याची गरज नव्हती. मी या एचारी धूर्त कोल्ह्यांना चांगला ओळखून आहे. योगायोग कसला डोंबलाचा? ती तिथेच दबा धरून बसली असणार सावज पकडायला! सहज भेटल्यासारखं दाखवून कामाचं बोलायचं हे इतक्या वर्षांच्या माझ्या कारकीर्दीत अनेक एचारांशी पंगा घेतलेल्याला लगेच समजतं. "तू या कंपनीचा आधारस्तंभ आहेस. तू इथला एक सर्वोत्तम टीम मेंबर आहेस." असं हरभर्याच्या झाडावर चढवून नंतर "पण....." म्हणून काही तरी कामातली खोडी दाखवून जमिनीवर आणायचं तंत्र मला नवीन नाही. बाकी, इतकी वर्षं केलेल्या खर्डेघाशीला कारकीर्द म्हणणं हातभट्टीला स्कॉच म्हणण्यासारखं आहे थोडं! "तुझ्या कामाचं खूप कौतुक ऐकलं परवा मिटिंगमधे".. तिनं अपेक्षित सूतोवाच केलं. "हो ...