कुणी मला सांगीतलं की "मी माझं नाव लिहीतो 'खरे' पण म्हणतो 'खोटे'", तर मी म्हणेन खर्याची दुनिया नाही राहिली राव! हो, मग दुसरं काय म्हणणार? उच्चार जर 'खोटे' करायचाय तर 'खरे' लिहायचंच कशाला? 'खोटे' च लिहीना लेका! हे असं मला तरी वाटतं, तुम्हालाही तसंच वाटेल कदाचित! कारण, आपल्या देवनागरी लिपीत अक्षराप्रमाणे आणि अक्षराला लावलेल्या काना, मात्रा वेलांटी इ. इ. प्रमाणे नेमका उच्चार सूचित होतो. काही शब्दं हुलकावणी देऊन जातात, नाही असं नाही.. उदा. तज्ञ हा शब्द तज्ज्ञ असा लिहीला जातो, तर सिंह चा उच्चार सिंव्ह असा होतो... पण बहुतांशी उच्चार नीट करायला जमतात.
देवनागरी लिपीत अक्षरांचे उच्चार जमले की बहुतेक शब्दांचे उच्चार जमतात.. अर्थात, थोड्या गोच्या वगळता. मराठीतल्या 'च' चा उच्चार काही शब्दांमधे 'च्य' असा होतो, उदा. चप्पल.. उच्चार च्यप्पल न करता चप्पल असा केला तर चांगलं गाणं ऐकताना मधेच जबरी खरखर आल्यासारखं वाटतं. 'ज' चं पण तसंच आहे. 'लक्ष्य' चित्रपटात अमिताभने एका मराठी माणसाची भूमिका केली आहे.. कॅप्टन दामले त्याचं नाव.. त्यात एकदा तो एक मराठी म्हण म्हणतो.. कुठली ते आता आठवत नाही.. त्यात तो नको तिथे 'च' चा उच्चार 'च्य' असा करून तिडिक आणतो. 'चुकार चंदूने चरखा चालवता चालवता चारोळीयुक्त चमचम चोरून चाखली' हे वाक्य 'च्युकार चंदूने च्यरखा च्यालवता च्यालवता च्यारोळीयुक्त च्यमच्यम च्योरून च्याखली' असं वाचणार्याच्या असतील नसतील त्या सर्व पिढ्यांचा उध्दार करावासा वाटेल की नाही? तसंच. अशी घोडचूक अमिताभसारख्या नटानं केल्याबद्दल त्याला योग्य शासन काय करावे याचा मी बरेच दिवस विचार करीत होतो. पण परवा कुणी तरी हा प्रश्न परस्पर सोडवला.. क्वालालंपूर विमानतळावर त्याने अमिताभला शाहरुख खान अशी हाक मारून योग्य ती जागा दाखवली.
अक्षरांच्या उच्चारां इतकच महत्व शब्दांतल्या अक्षरांवरील आघाताला (अॅक्सेंट) आहे! शब्दांच्या अक्षरांवरील आघातात थोडा जरी बदल केला तरी कीर्तनाला जाऊन रॅप संगीत ऐकल्यासारखं होतं. उदाहरणार्थ, निवडणूक हा शब्द म्हणताना आपण तो निवड-णूक असा तोडतो. याचे निव-डणूक असे तुकडे केले किंवा कणकवलीचे तुकडे कणक-वली असे केले तर तो शब्द पटकन कळतच नाही. तसंच 'याला काही अर्थ आहे का?' या वाक्यातल्या 'अर्थ' या शब्दाचा उच्चार इंग्रजी Earth ( अsर्थ् ) सारखा केला तर कानाची आग मस्तकात जाते.
मी उच्चारग्रस्त व्हायला माझ्या आयुष्यात आलेले बहुतेक सगळे कारणीभूत आहेत.. जास्त करून मास्तर आणि मित्रमंडळी. एकीकडे, मराठी हिंदी सारख्या विषयांचे मास्तर स्पष्ट उच्चार करा म्हणून डोकंफोड करायचे. आणि इंग्रजी मधे, शब्दोच्चाराबद्दल 'स्पष्ट न बोललेलेच बरे' असा सूर असायचा. कधी इंग्रजी शब्दातल्या अक्षरांचे उच्चार करायचे नसतात तर कधी नसलेल्या अक्षरांचे उच्चार करायचे असतात. हे गौडबंगाल मला अजूनही कळालेलं नाही. त्यामुळे काही अक्षरांचे उच्चार नको तेव्हा केल्या / न केल्याने मी लोकांची खूप करमणूक केली आहे. इंग्रजीत R चा उच्चार न करायची एक प्रथा आहे. काय अघोरी प्रथा आहे! मराठीत नाही आहे ते किती बरं आहे ना? नाही तर 'नदीला पूss आला' म्हणावं लागलं असतं.
मराठी शाळेत इंग्रजी शिकण्याचा प्रमुख तोटा बरोबर उच्चार ऐकायला न मिळणे हा एक आहे. J चा उच्चार ज्ये करायचा असतो हे कळण्यासाठी मला बरीच उमेदीची वर्ष खर्च करायला लागली. Deaf चा उच्चार डेफ, डीफ नाही.. त्याचा उच्चार Leaf सारखा करायचा नसतो.. Oven चा आव्हन, Computer चा कंप्युटर, Sarah चा सेरा आणि Diana चा डायाना अशा अनेक उच्चारांची मौलिक भर माझ्या हितचिंतकानी कॉलेजात आणि नंतरच्या आयुष्यात घातली.
मात्र अमेरिकेत पाऊल ठेवल्यावर माझ्या बर्याच उच्चारांचं पानिपत झालं. अमेरिकन लोकं O चा उच्चार बर्याच शब्दात 'आ' असा करतात.. उदा. Project चा प्राजेक्ट व Honest चा आनेस्ट. तसंच ते 'I' चा उच्चार काही शब्दात 'इ' ऐवजी 'आय' करतात.. उदा. Vitamin चा व्हायटामिन किंवा Carolina चा कॅरोलायना. आपल्याकडच्या सुनीता (Sunita) या नावाचा उच्चार अमेरिकेत सनायटा होण्याची खूप शक्यता आहे. ज्या शब्दांचा शेवट tory ने होतो अशा काही शब्दांच्या अमेरिकन उच्चारात शेवटी टोरी येतो, उदा. Observatory आब्झर्व्हेटोरी, Inventory इन्व्हेटोरी. पण Laboratory चा उच्चार लॅब्रेटोरी कसा काय होतो ते ब्लडी अमेरिकनच जाणे! अजून काही उल्लेखनीय अमेरिकन उच्चार असे आहेत.. Niagara नायाग्गरा, Z चा झी, Connecticut कनेटिकट, Newark नुवर्क, Illinois इलिनॉय, Mature मॅटुअर, Tuition ट्युईशन, Coupon क्युपॉन.
अमेरिकेत असताना Schedule ला शेड्युल ऐवजी स्केड्युल म्हणायचं वळण जिभेला महत्प्रयासानं लावलं होतं. आता इंग्लंडात आल्यावर ते वळण परत सरळ करायचा आटोकाट प्रयत्न चाललाय. एकदा, Garage या शब्दाचा नेमका उच्चार काय हे माहीत नसल्यामुळे मी नेटवरच्या एका स्थळाची मदत घेऊन तो ऐकला. त्यानं मला गराज असा उच्चार सांगीतला. नंतर माझ्या गाडीचा इन्श्युरन्स काढायच्या वेळेला मला 'रात्री गाडी कुठे ठेवणार?' हा प्रश्न टाकताच, मी ऐटीने 'गराज' असं सांगीतलं. त्यावर २/३ मिनीटं विचार करून त्यांनं मला 'म्हणजे गॅरेज का?' असा प्रतिप्रश्न करताच माझा बँड वाजला. तिकडे त्याच्या चेहर्यावरचे 'न जाने कहाँ कहाँसे चले आते हैं' असे भाव मला फोन मधून स्पष्ट दिसले.
इंग्लंडमधेही मला सर्व सामान्य तर्काला तोंडघशी पाडणारे खूप उच्चार ऐकायला मिळाले. Edinburgh हे वाचल्यावर मी त्याचा पीटसबर्ग सारखा एडिन्बर्ग असा उच्चार केला. त्याचा खरा उच्चार एडिन्बरा ऐकल्यावर मात्र कानात 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' चे सूर घुमायला लागले. Gloucester, Bicester, Leicester, Worcester या गावांचे उच्चार अनुक्रमे ग्लोस्टर, बिस्टर, लेस्टर, वूस्टर असे होतात. त्यांच्या स्पेलिंग मधल्या ce या अक्षरांना उच्चारात काडीची किंमत नाही. पण Cirencester याचा उच्चार मात्र सायरनसेस्टर असा व्यवस्थित स्पेलिंगप्रमाणे होतो. 'H' चा उच्चार काही लोक 'हेच्य' असा करतात. हा उच्चार मी ऑस्ट्रेलियन आणि काही तमिळ लोकांकडूनही ऐकला आहे. Norwich चा नॉर्विच नसून नॉरिच, Greenwich ग्रिनिच आणि Derby चा डर्बी नसून डार्बी आहे. Plymouth Portsmouth चे उच्चार प्रथम दर्शनी प्लायमाउथ पोर्टस्माउथ असे वाटतील, प्रत्यक्षात ते प्लिमथ पोर्टस्मथ असे होतात. काही उल्लेखनीय उच्चार - Magdalen मॉडलेन, Tortoise टॉटस, Caius कीज.
शब्दांच्या शेवटी ham येत असेल तर त्याचा हंबरल्यासारखा 'हम' असा उच्चार होतो. उदा. Birmingham बर्मिंगहम, Fareham फेर्हम. याच नियमाने Cheltenham चा चेल्टन्हम असा व्हायला पाहीजे. निदान, माय फेअर लेडी मधे रेक्स हॅरिसन तरी तसा करतो. पण त्याचा सर्रास चॉल्टन्हम असा थोडा विचित्र उच्चार होतो. जॉर्ज बर्नार्ड शॉला असले उच्चार ऐकून किती हताश व्हायला झालं असेल याची आता मला थोडी फार कल्पना यायला लागली आहे. इंग्लंड मधे उत्तरेला न्यू कॅसल गावाच्या आजुबाजूला इंग्रजी या नावाखाली जे काही उच्चारतात ते इथल्या भल्याभल्यांना देखील पहिल्या फटक्यात कळत नाही. त्या उच्चार पध्दतीला जॉर्डी म्हणतात. त्यात dead डेडे, cow कू, house हूस, strong स्ट्रांग, out ऊट असे भयानक उच्चार होतात. याच्याही उत्तरेकडचे स्कॉटिश लोकांचे काही उच्चार असे आहेत.. Earth एर्थ, Pound पौंड, Time टैम.
रोमन लिपी बर्याच युरोपियन भाषेतले लिखाण करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे या लिपीतल्या काही अक्षरांचा उच्चार भाषेप्रमाणे वेगवेगळा होतो. माझ्या मते 'J' हे अक्षर सगळ्यात जास्त प्रदूषित आहे. त्याचा स्पॅनिश भाषेत 'ह' असा उच्चार होतो. उदा. San Jose सॅन होजे, Jalapeno हालापेनो, Natasja नताशा. जर्मन भाषेत 'J' चा उच्चार 'य' असा होतो. उदा. Ja या, Jung युंग, Jogurt योगर्ट. एका भाषेत, बहुतेक स्विडीश, भाषेत 'J' चा उच्चार 'इ' असा होतो. उदा. Fjord फिओर्ड, Bjorn बिऑन. तसंच 'V' चा उच्चार जर्मन भाषेत काही वेळा 'फ' असा होतो. उदा. Volkswagon फोक्सवॅगन, Von Neumann फोन नॉयमन.
इंग्रजी भाषेत इतर भाषांमधले भरपूर शब्द घुसले आहेत आणि त्यांचा जमेल तसा उच्चार केला जातो. Avatar या चित्रपटाच्या नावाचा अॅवॅटार असा प्रचंड विनोदी उच्चार केला जातो. Memoir मेम्वा, Paris पारी, Artois आर्ट्वा, envelope आन्व्हलोप, Peugeot पेजो, Renault रेनो, Louis लुई असे काही फ्रेंच शब्दांचे उच्चार आहेत. यांचे भलतेच इंग्रजी उच्चार ऐकून फ्रेंचांचीही बहुधा करमणूक होत असेल, कारण माय फेअर लेडी च्या 'व्हाय कान्ट द इंग्लिश लर्न टू स्पीक' या गाण्यात म्हंटल्याप्रमाणे ते कडवे उच्चारवादी लोक आहेत..
Why can't the English
Teach their children how to speak
Norwegians learn Norwegian
The Greeks are taught their Greek
In France every Frenchman
Knows his language from A to Zed
The French don't care what they do actually
As long as they pronounce it properly
इतकी वर्ष इतका शब्दच्छळ करून, ऐसे उच्चार मेळवून मी एवढंच तात्पर्य माझ्यापुरतं काढलंय की कुणीही उच्चाराबद्दल काही सांगीतलं तर फारसं मनावर घ्यायचं नाही.
(टीप :- हा सर्व लेख ऐकीव माहितीवर आधारित आहे. )
====== समाप्त======
मी माझ्याशीच वेळोवेळी केलेली भंकस म्हणजेच हे चर्हाट! आता फक्त माझ्याशीच का? कारण सोप्प आहे. फारसं कुणी माझी भंकस ऐकून घ्यायला तयार नसतं.
Monday, April 26, 2010
Sunday, January 17, 2010
अवकाश वेध
ऑक्सफर्डच्या हिस्टरी ऑफ सायन्स म्युझियम मधे अॅस्ट्रोलेब (Astrolabe) या एका जुन्या बहुपयोगी उपकरणाबद्दलची माहिती ऐकण्याचा योग नुकताच आला. ते यंत्र पूर्वी त्या म्युझियममधे पाहिलेलं होतं पण त्याचा वापर तेव्हा कसा करायचे ते समजलं नव्हतं. त्यामुळे ते भाषण ऐकायला उत्सुकतेने गेलो.
अॅस्ट्रोलेब हे वेळ बघण्यासाठी तसेच आकाशातील ग्रह व तारे यांच्या जागा शोधण्यासाठी वापरलं जायचं. ते ८ व्या शतकात मुस्लिम देशामधे वापरायचे. तिथून १२ व्या शतकात ते युरोपात आले. भाषणात ते यंत्र दाखवून ते कसं वापरायचं याचं व्यवस्थित प्रात्यक्षिक दिलं. त्या दिवसापासून यावर एक लेख लिहायला पाहीजे असं डोक्यात घोळत होतं. पण प्रत्यक्ष हातात यंत्र न घेता आणि तुम्ही समोर नसताना तुम्हाला ते कसं सांगावं याचा विचार चालू होता आणि अधिक माहितीसाठी गुगल करणंही चलू होतं. इंटरनेट हे एक मोठं रद्दीच दुकान आहे, त्यात काहीही सापडतं किंवा कधी कधी काहीच नाही. सुदैवाने माझ्या हाती एक खजिनाच हाताला लागला. हा लेख त्या मिळालेल्या खजिन्याबद्दल आहे.
अॅस्ट्रोलेबचा इतिहास इथे आहे.
या व्हिडिओत अॅस्ट्रोलेबने वेळ कशी बघायची याचं प्रात्यक्षिक दिसेल.
अॅस्ट्रोलेब सारखा चालणारा कंप्युटर प्रोग्रॅम एका स्थळावर मिळाला. तो जुन्या काळच्या डॉसवर चालणारा आहे. त्याच्या प्रोग्रॅमरच्या म्हणण्या प्रमाणे तो विंडोजवर पण चालतो. माझ्या पीसीवर तो प्रोग्रॅम चालवल्यावर माझ्याकडच्या विंडोजने मोठ्ठा आ वासला, तो रिसेट केल्यावरच बंद झाला. मग आणखी शोधाशोधी केल्यावर बरेच वेगवेगळे प्रोग्रॅम सापडले. त्यातले काही अॅस्ट्रोलेब सारखे चालणारे आहेत तर काही नाही. त्यातले काही फुकट आहेत तर काही नाही. मी या लेखात एका फुकट प्रोग्रॅमचा दुवा आणि तो कसा चालवायचा याची थोडी फार माहिती दिलेली आहे. पण सगळेच आकाशाचा वेध घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. हे प्रोग्रॅम तुम्ही सागितलेल्या शहरावरचे आकाश दाखवतात.. तुमच्या शहराचे अक्षांश व रेखांश त्यात सुरुवातीला घातल्यावर. नासाने १५ जानेवारीच्या सूर्यग्रहणाचा मार्ग दाखविण्यासाठी गुगलचा नकाशा वापरून एक स्थळ बनवले आहे. हा नकाशा झूम करून आपल्या शहरावर टिचकी मारली तर अक्षांश रेखांश कळतील. या स्थळावरून आपल्याला पाहीजे त्या शहराचे अक्षांश व रेखांश मिळवता येतील.
एक मुद्दाम नमूद करण्यासाठी गोष्ट म्हणजे या प्रोग्रॅममधे आपल्याला पाहिजे ती तारीख आणि वेळ घालता येते. त्या वेळेची आकाशातली ग्रह तार्यांची स्थिती कळते. मग आपल्याला हवी तशी वेळ मागे पुढे करून ती स्थिती कशी बदलतेय ते प्रत्यक्ष बघता येते, थोडक्यात अॅनिमेशन करता येते. अॅनिमेशन बघण्यासाठी मी नुकतंच झालेलं १५ जानेवारी २०१० चं सूर्यग्रहण त्यावर पाहीलं. आधी मी प्रोग्रॅममधे ऑक्सफर्ड हे शहर घातलं होतं. पण अॅनिमेशन मधे ग्रहण दिसेना, चंद्र नुसताच सूर्याच्या बाजूने जात होता. मग लक्षात आलं की ते ग्रहण इंग्लंडमधे दिसणारच नव्हतं. नंतर रामेश्वरचे अक्षांश रेखांश घातल्यावर दिसलं. कुठल्याही जागेचे अक्षांश रेखांश घालून तिथलं आकाश घरबसल्या बघता येणं हा या प्रोग्रॅमचा अजून एक मोठा फायदा आहे.
इथे 'हेलो नॉर्दर्न स्काय' हा प्रोग्रॅम मिळेल. याचं नावं जरी 'हेलो नॉर्दर्न स्काय' असलं तरी दक्षिण गोलार्धातील शहरांसाठी सुध्दा हा प्रोग्रॅम चालतो (मी चालवून नाही बघितला अजून). याची दोन व्हर्जन्स आहेत. सुरुवातीला त्यातलं Small basic package HNSKY230.exe हे घेऊन Install करा. प्रोग्रॅम सुरू करून प्रथम File->Settings मधे जाऊन तुम्हाला हव्या त्या शहराचे अक्षांश रेखांश व टाईमझोन घाला.
माझं खगोलशास्त्राचं ज्ञान यथातथाच असल्यामुळे, या प्रोग्रॅममधे वापरलेल्या संज्ञा आणि प्रोग्रॅममधून काय आणि कसं दिसतं ते समजून घेण्यात बराच वेळ गेला. तुमचा कदाचित तेवढा वेळ जाणार नाही. तरीही माहिती नसणार्या वाचकांचा वेळ जाऊ नये म्हणून मी काही माहिती खाली दिली आहे ती उपयोगी पडेल असं वाटतं.
हा प्रोग्रॅम सेलेस्टियल स्फिअर (वैश्विक गोल) दाखवतो. वैश्विक गोल म्हणजे पृथ्वी भोवती गृहित धरलेला, प्रचंड आकाराचा एक गोल. याचा आणि पृथ्वीचा मध्यबिंदू एकच असतो. या संबंधीच्या काही संज्ञा खालील आकृतीवरून समजतील. आपलं शहर उत्तरेला जेवढं जास्त तेवढा धृव तारा आकाशात जास्त उंच (लॅटिट्युड) दिसतो. पृथ्वीचा मध्यबिंदू आणि पृथ्वीचा उत्तर धृव यातून काढलेली सरळ रेषा वैश्विक गोलाला जिथे छेदते तो नॉर्थ सेलेस्टियल पोल (वैश्विक उत्तर धृव). अशीच व्याख्या वैश्विक दक्षिण धृवाची करता येते. या गोलाचेही विषुववृत्त असते त्याला सेलेस्टियल इक्वेटर (वैश्विक विषुववृत्त) म्हणतात. पृथ्वीचं विषुववृत्त सर्व बाजूंनी वाढवले तर ते वैश्विक गोलाला जिथे मिळेल ते. पृथ्वीचा मध्यबिंदू आणि आपलं डोकं यातून काढलेली सरळ रेषा वैश्विक गोलाला जिथे छेदते तो बिंदू म्हणजे झेनिथ! आपल्या शहराच्या जमिनीला स्पर्श करून जाणारे वर्तुळ सर्व बाजुंनी वाढवले तर ते वैश्विक गोलाला जिथे मिळेल ते वर्तुळ म्हणजे क्षितीज. क्षितीजाच्या वर असलेले ग्रह तारे आपल्याला दिसू शकतात, खालचे नाही.
आता असं समजा की पृथ्वीचा मध्यबिंदू आणि कुठलाही तारा यातून काढलेली सरळ रेषा वैश्विक गोलाला जिथे छेदते त्या बिंदूला तो तारा चिकटवलेला आहे. अशारीतिने सर्व ग्रह तारे चिकटवल्यावर तो गोल जसा दिसेल तसा गोल आपल्याला प्रोग्रॅममधून दिसतो. आपण गोलाकडे गोलाच्या बाहेरून पहात असतो. पृथ्वी स्वतः भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे जसजशी फिरते तसतसा हा गोल पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतोय असं भासतं. वैश्विक उत्तर धृव, झेनिथ, वैश्विक दक्षिण धृव या मधून जाणारे वर्तुळ म्हणजे मेरिडियन. घराच्या गच्चीत दक्षिणोत्तर दोरी बांधा, ही दोरी मेरिडियनला समांतर असेल. आता दोरीखाली डोकं उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे करून रात्रीच्या वेळी आकाशाकडे बघत पडा. तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना दिसतील.
इक्लिप्टिक (Ecliptic) म्हणजे सूर्याचा वैश्विक गोलावरचा मार्ग. प्रोग्रॅममधे हा मार्ग तपकिरी रंगाच्या तुटक रेषेने दाखवला आहे. चंद्र आणि इतर ग्रह या रेषेच्या जवळपासच दिसतील, कारण पृथ्वीसकट सर्व ग्रह जवळपास एकाच पातळीत सूर्याभोवती फिरतात. वैश्विक गोलावर चिकटवलेल्या तार्यांच्या अक्षांश रेखांशाला डेक्लिनेशन (Declination) आणि राइट असेन्शन (Right Ascension) म्हणतात. प्रोग्रॅममधे हे आकडे डाव्या बाजूच्या वरच्या कोपर्यात दिसतात. या प्रोग्रॅमचा एक स्क्रीनशॉट खाली दिला आहे.

स्क्रीनशॉट मधे क्षितीज मातकट रंगाच्या ठळक रेषेने दाखवलं आहे. क्षितिजावर SE, S, SW अशी अक्षरं दिसतील. याचा अर्थ आत्ता स्क्रीनवर दक्षिणेकडचं आकाश दिसत आहे. जर कर्सर स्क्रीनच्या अगदी उजवीकडच्या, डावीकडच्या, वरच्या किंवा खालच्या बाजूकडे नेला तर एक बाण दिसेल. तिथे क्लिक केलं तर त्याबाजूचं आकाश स्क्रीनवर दिसेल. ज्या तुटक रेषेच्या आजुबाजुला चंद्र, गुरू आणि युरेनस दिसत आहेत ती रेषा म्हणजे इक्लिप्टिक.
सुरुवातीला Screen मेन्यूमधील Altitude grid, Constellations, Orthographic Projection हे सेट करा. Objects मेन्यूमधील Name all stars, stars, planets हे सेट करा. यामुळे स्क्रीनवर जरा कमी गर्दी दिसेल. Date मेन्यूमधील Enter date, time वापरून पाहिजे ती तारीख, वेळ निश्चित करता येईल. त्यानंतर F3, F4 दाबून मिनिटं मागे पुढे, F5, F6 दाबून तास मागे पुढे किंवा F7, F8 दाबून दिवस मागे पुढे करता येईल. यातली कुठलेही बटण सतत दाबून धरले तर अॅनिमेशन दिसेल. नंतर कधीही Date मेन्यूमधील Now वापरून चालू वेळ परत आणता येईल. त्याच मेन्यूमधील Follow System Time वापरलं तर घड्याळ जसजसं पुढे जाईल तसतशा ग्रह, तार्यांच्या नवनवीन जागा स्क्रीनवर दिसतील.
स्क्रीनवरच्या कुठल्याही ग्रह तार्यावर क्लिक केलं तर त्या वस्तूचं नाव आणि डेक्लिनेशन आणि राइट असेन्शन दिसेल. नंतर Ctrl + Alt + L दाबलं तर ती वस्तू लॉक होते. म्हणजे अॅनिमेशन मधे ती सतत स्क्रीनवर रहाते नाहीतर दिसेनाशी होण्याची शक्यता असते.
या सूचनांच्यामुळे हा प्रोग्रॅम वापरणे सुलभ होईल अशी आशा आहे. अवकाश वेधाचा आनंद लुटा.
हा प्रोग्रॅम हान क्लाइन या डच माणसानं बरीच वर्ष घालून लिहीला आहे. तो एक हौशी खगोल अभ्यासू आहे. हा प्रोग्रॅम लिहून तो फुकट इतरांना उपलब्ध करून दिल्याबद्दल त्याचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे. इतकच नाही तर तुम्ही त्याला काही अडचणी आल्यास मेल टाकून प्रश्न विचारू शकता. त्याचा मेल आयडी आहे - han.k@hnsky.org. प्रोग्रॅम आवडला तर त्याला आभाराचा संदेश जमलं तर पाठवा.
हा प्रोग्रॅम एक उत्कृष्ट शैक्षणिक साधन आहे. याचा वापर करून अवकाशाचा अभ्यास करा. आपल्या ओळखीच्या सर्वांना हा जरूर द्या, दाखवा, शिकवा. मी अजून हा प्रोग्रॅम पूर्णपणे वापरायला शिकलेलो नाही, परंतु जेव्हा काही नवीन इंटरेस्टिंग गोष्टी कळतील तेव्हा मी याच लेखात त्या टाकेन.
== समाप्त ==
जाता जाता --
आकाशात काही ग्रह कधी कधी उलटे फिरताना दिसतात. वास्तविक सर्वच ग्रह सूर्याभोवती घड्याळाच्या काट्याच्या विरुध्द दिशेने फिरतात. पण पृथ्वीवरून पहाताना काही ग्रह मधेच उलटे जाताना दिसतात. असं का होतं याच या अॅनिमेशन मुळे व्यवस्थित कळेल. वक्री मंगळ

Sunday, December 27, 2009
गोट्याचा घोळ
"... सीआयडी मागे लागलाय".. घरातून बाहेर पडता पडता मला गोट्याचं बोलणं अर्धवट ऐकू आलं. तो शेजारच्या दीपाशी बोलत होता. गोट्या म्हणजे आमचं एकुलतं एक कार्ट. गोट्याचे कारनामे हळूच कान देऊन ऐकायला मला आवडलं असतं, खरं तर.. पण कामाला जाणं भाग होतं.. अनिच्छेनेच मी निघालो. मला नेहमी भरपूर काम असतं.. डोकं वर काढायलाही फुरसत नसते.. पण दिवसभर 'आयला! ह्या गोट्यानं काय घोळ घातला?' या प्रश्नानं मला, चपलेला चिकटलेल्या च्युईंगम सारखं छळलं. मग बँकेतून दिल्याला फोन करून सीआयडी ऑफिसातून काही माहिती मिळतेय का ते पहायला सांगीतलं. त्याला काही फारशी माहिती मिळाली नाही. सीआयडीचे लोक काळाबाजार करणारे, तस्करी करणारे नाही तर अतिरेकी लोकांच्या मागावर असतात अशी एक मोघम माहिती मिळाली. विमनस्क अवस्थेत संध्याकाळी घरी आल्यावर सरीताला झालेला प्रकार सांगीतला.
सरीता: "अय्या खरंच सीआयडी मागे लागलाय? मला बघायचाय खराखुरा सीआयडी कसा दिसतो ते.".. हिचा बालिशपणा कधी उफाळून येईल त्याचा काही नेम नसतो.
मी: "सीआयडी म्हणजे काय गणपतीची आरास आहे का बघायला? दारावर विकायला येणार्या माणसांसारखी अगदी सामान्य दिसणारी माणसं असतात ती. मुद्दामच तशी माणसं घेतात ते. मी सुध्दा त्यांच्यापुढे हिरोसारखा वाटेन तुला. त्यापेक्षा गोट्याकडे बघ. त्यानं काही तरी जबरी घोळ घातलाय. आधीच लग्न ठरत नाहीये त्याचं.. त्यात आता हे. तुला काही त्याच्यात बदल जाणवलाय का एवढ्यात?"
सरीता: "अंsss हो! थोडा विचित्र वागतो हल्ली."
मी: "हां म्हणजे हल्ली जास्त तिरसटासारखा करतो... नेहमी खोलीचं दार बंद करून बसतो... आपण खोलीत गेलो की चिडचिड करतो न् लगेच लॅपटॉप बंद करतो.. हेच ना? मला वाटतं, त्याला त्याचं लग्न ठरत नाही याचं जास्त टेन्शन आलंय, त्यामुळे असेल. त्याच्या बरोबरीच्या सगळ्यांची लग्न झाली की आता."
सरीता: "ते असेल रे! पण त्याहून थोडा जास्त विचित्र."
मी: "म्हणजे?"
सरीता: "हल्ली तो मधुनच मुलीसारखा बोलतो."
मी: "काssssss य? मुलीsssssssssssssss?" मी जोरात ओरडलो. आधीच माझा आवाज ठणठणीत.. त्यातून मी ओरडलो की संपलंच. माझा ठणाणा ऐकून दीपा धावत आली.
दीपा: "काय झालं अंकल?" अंकल? हल्लीच्या पोरांना कुणी तरी काका म्हणायला शिकवा हो! सगळ्या शब्दांना मराठीत शब्द नाहीत असं का वाटतं यांना?
त्याक्षणी दीपाला समोर बघायची माझी मानसिक तयारी मुळीच नव्हती.. मला काय झालं तेही तिला मुळीच सांगायचं नव्हतं. गोट्या मुलीसारखा बोलतो ही काय तिला सांगायची गोष्ट आहे? पण खरंच सांगीतलं असतं तर तिची काय प्रतिक्रिया आली असती? 'अय्या! कित्ती गोssड!' असं काहीतरी निरर्थक बोलून नवीन मैत्रीण मिळाल्याचा आनंद व्यक्त केला असता तिनं कदाचित! या नवीन पीढीचं काही सांगता येत नाही.
मी: "काही नाही. काही नाही. हिला मुलगी... आपलं.. एक उंदीर दिसला." मला तिचा वीक पॉईन्ट माहिती होता.
सरीता: "काहीही काय बोलतोस? कुठाय उंदीर? आपण तर..." बाप रे! माझ्या डोळ्यांच्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करून गेम टाकणार आता ही.
मी: "हो! हो! आपणच तर त्याला या दारावरून त्या वायर वरून त्या दाराकडे जाताना पाहीलं ना!" मी बरेचसे अतिरंजित हातवारे करत बोलल्यावर तिच्या डोक्यात थोडा प्रकाश पडल्यासारखा वाटला. तेवढ्यात दीपाच्या बापानं तिला हाक मारली.. "दीपा! काही विशेष झालेलं नाही.. तू जा आता.. त्या उंदराला काय हवं नको ते मी बघतो." दीपाची पीडा 'बाssय' म्हणून गेल्या गेल्या मी सरीताला जाब विचारायला लागलो..
मी: "काय गं? तुला माझ्या खाणाखुणा कळत नाहीत का? तोंड उघडण्यापूर्वी बघावं एकदा माझ्या चेहर्याकडे!"
सरीता: "काय राहीलंय तुझ्या चेहर्यात बघण्यासारखं?" माझ्यासमोरून एक कवटी खालच्या दोन हाडांच्या फुली सकट तरंगत गेली. पाहिलंत ना! कुठला विषय कुठे नेला ते तिनं? हेच मी तिला बोललो असतो तर तडक माहेरी निघून गेली असती.. असो. विषय कवटीवरून हलवणं भाग होतं..
मी: "बरं ते जाऊ दे! गोट्या काय मुलीसारखा वागतो?"
सरीता: "अरे तो मधेच मुलीसारखा बोलतो.. मग लगेच चूक सुधारतो. परवा मी त्याला चहा प्यायला बोलावलं तर आधी म्हणाला 'आले! आले!'. मग लगेच म्हणाला 'आलो! आलो!'. असं बर्याच वेळेला झालंय हल्ली.. मला सांगायचंच होतं तुला."
मी: "मग तो काय साडी घालायची वाट बघत होतीस? आधी का नाही सांगीतलंस?"
सरीता: "अरे पण माझी खात्री व्हायला हवी ना आधी!"
मी: "हे सगळं तुझ्या मुळे झालंय. तूच लहानपणी त्याचा उल्लेख मुलीसारखा करायचीस.. 'उठली का माझी छकुली?' असं काहीतरी!"
सरीता: "आणि तू पण त्याला मुलींचे कपडे आणायचास!"
मी: "ते मी एकदाच आणले होते, तेही तुझ्यासाठी." चूक लपविण्याचा माझा आटोकाट प्रयत्न!
सरीता: "माझ्यासाठी? लहान मुलीचे कपडे?"
मी: "हो! तू लहान मुलीसारखी वागतेस म्हणून." माझ्या कवटीचा माफक बदला घेण्यात यशस्वी झालो.
सरीता: "हेच ते नेहमीच तुझं! अंगावर उलटलं की एक फालतू जोक करायचा."
मी: "बरं ते जाऊ दे. इथं पोराला आयडेंटिटी क्रायसिस झालाय आणि तू भांडत बसली आहेस. त्याला कुठल्या पोरीनं झपाटलं असेल का?"
सरीता: "आयडेंटिटी क्रायसिस नाही त्याला जेंडर क्रायसिस म्हण. प्रेमात पडल्यावर असं होतं का पुरुषांना?"
मी: "मी कुठे प्रेमात पडल्यावर म्हणालो? आणि बापाचं झालेलं माकड पहाता तो प्रेमात पडेल असं वाटत नाही कधी. मला म्हणायचं होतं की कुठल्या स्त्रीलिंगी भुतानं झपाटलं असेल का त्याला?"
सरीता: "स्त्रीलिंगी भूत नाही रे म्हणत.. हडळ म्हणतात." अख्ख्या जीवनात समस्त मास्तर वर्गानं काढल्या नसतील एवढ्या माझ्या चुका तिनं आत्तापर्यंत काढल्या आहेत.
मी: "बाकीच्या पुरुषांच माहीत नाही. पण तुझ्या प्रेमात पडल्यावर मला नेहमी पायाचे अंगठे धरायला लावलेल्या विद्यार्थ्यासारखं वाटायचं. असो. तू त्याच्यावर बारीक लक्ष ठेव. मी बघतो काय करायचं ते."
मी गोट्याच्या पाळतीवर रहायचं मनोमन ठरवलं. दुसर्या दिवशी गोट्या कुणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं की गोट्या आणि फोनवरचा किंवा फोनवरची लक्ष्मी रोडवरच्या महालक्ष्मी रेस्टॉरंट पाशी भेटणार आहेत. गोट्या गेल्यावर, त्याला संशय येऊ नये म्हणून, तब्बल ५ मिनीटांनी निघालो. मला ते रेस्टॉरंट नक्की कुठे आहे ते माहीत नव्हतं.. पण म्हंटलं ते शोधायला असा किती वेळ लागणार? लक्ष्मी रोडच्या एका टोकापासून सुरुवात करून दुसर्या टोकापर्यंत आलो.. रेस्टॉरंट सापडलं नाही.. मग एका दुकानात विचारलं.. त्याला माहीत नव्हतं.. परत पहिल्या टोकापासून शोधत आलो.. तरीही दिसलं नाही म्हणून अजून एका दुकानात विचारलं आणि पुणेरी झटका बसला.. 'अहो! मगाशी तुम्ही मलाच विचारून गेलात. मी तेव्हाच तुम्हाला माहीत नाही म्हणून सांगीतलं. सक्काळी सक्काळी लावली काय?' ते शेवटचं वाक्य फक्त पुणेरीच म्हणू शकतात. माझा चेहरा दोन वेगळे बूट घालून ऑफिसला गेल्या सारखा झाला.. त्याला कसंबसं सॉरी म्हंटलं आणि त्या दुकानाचा नाव पत्ता लिहून घेतला.. हो! नाहीतर परत त्याच्याचकडे जायचो चुकून.. या भानगडीत त्या रेस्टॉरंटचं नाव मी विसरलो.. मग लोकांना कडकलक्ष्मी पासून महामाया पर्यंतची सर्व वैविध्यपूर्ण नावं विचारून मी बरीच स्कूटरपीट करून घेतली.. काही लोकं काय बदमाश असतात.. मुद्दाम चुकीचा पत्ता सांगतात. दोन तासानंतर आता काय करावं असा विचार करीत मी उभा होतो तेव्हा अचानक ते समोर दिसलं.. तोपर्यंत फारच उशीर झाला होता.
यापुढे गोट्याचा जवळूनच पाठलाग करायचा असं ठरवलं.. त्यानं मला ओळखू नये म्हणून मिशी लावली.. गोलमाल पिक्चर स्टाईल.. मग काय.. गोट्या निघाल्यावर लगेच त्याच्या मागे निघालो.. एका ठिकाणी गोट्या थांबला.. ५ मिनिटांनी तिथे एक फाटका माणूस आला.. गोट्यानं त्याला एक पुडकं दिलं.. त्यानं गोट्याला पैसे दिले.. आयला! गोट्या गर्द वगैरे विकतो की काय? नो वंडर, सीआयडी त्याच्या मागावर आहे.. मग गोट्या निघाला आणि त्याच्या ऑफिसात गेला.. मी स्कूटर लांब लावून चालत ऑफिसपाशी गेलो.. ऑफिसातून तो संध्याकाळ शिवाय निघणार नाही हे लक्षात येताच मी तिथून निघणार, तेवढ्यात खांद्यावर कुणीतरी हात ठेवला.. वरती 'बाबा! तुम्ही काय करताय इथे?' असे शब्द आले.. मागे वळून पाहीलं तर खुद्द गोट्याच होता.. बोंबला! हा माझ्या नकळत ऑफिसच्या बाहेर कसा आला? कोण कोणावर पाळत ठेऊन आहे नक्की? पण त्याला ओळख दाखवून चालणार नव्हतं.. ती गोलमाल मोमेंट होती.. आता उत्तम अभिनयच मला तारु शकणार होता.. तशी मी कॉलेजात अभिनयाची उत्तेजनार्थ बक्षीसं मिळवली होती म्हणा.. ते आठवून जरा आत्मविश्वास आला.. मग एकदम वळलो.. त्याला शांतपणे आपादमस्तक न्याहाळलं.. मग थंड कोरड्या आवाजात आणि आवाज थोडा बदलून मी म्हंटलं -
मी: "तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मिस्टर. मी तुमचा बाप नाही."
गोट्या: "काहीतरी काय बोलताय बाबा! मी गोट्या! तुमचा मुलगा! तुमच्या डोक्याला मार वगैरे लागलाय का? काहीच कसं आठवत नाहीये तुम्हाला?"
मी: "सॉरी! मला मुलगा नाहीये".. मग त्याच्याकडे थोडं निरखून पाहिल्यासारखं करत मी पुढचा बाँब टाकला.. "तुम्ही... अंss.. तू चिमणचा मुलगा का? चिमण माझा जुळा भाऊ! विनायक माझं नाव! मी लहानपणी घरातून पळून गेलो होतो म्हणून बाबानी माझ्याशी संबंध तोडले आणि सगळ्यांना तोडायला लावले. कसा आहे चिमण?"
एव्हाना गोट्या पुरता भंजाळल्यासारखा वाटत होता.. माझ्याकडे अविश्वसनीय नजरेने बघत होता.. मी मनातल्या मनात मला अजून एक उत्तेजनार्थ बक्षीस देऊन टाकलं.
गोट्या: "अंss! बाबा ठीक आहेत. तुम्ही घरी या ना रात्री."
मी: "छान! सांग त्याला मी भेटलो होतो म्हणून." मग शून्यात बघत एक खोल उसासा टाकत मी पुढे म्हणालो.. "काही गोष्टी परत जुळवता येत नाहीत, गोट्या! चल! मला आता जायला पाहीजे. आनंद वाटला तुला भेटून." गोट्याला बोलायची काही संधी न देता मी तिथून फुटलो.
संध्याकाळी घरी आल्यावर गोट्या आणि सरीताचं बोलणं ऐकलं - "आई! बाबांच्या डोक्यावर परिणाम झालाय."
सरीता: "त्याच्या नाही तुझ्याच झालाय".. वा! वा! बायको असावी तर अशी.
गोट्या: "अगं आई! खरंच झालाय. आज मला ऑफिस बाहेर भेटले होते. ओळखच दाखवली नाही. वरती मी बाबांचा जुळा भाऊ आहे असं म्हणत होते."
सरीता: "जुळा भाऊ? मला कसं माहीत नाही त्याबद्दल".. इथं मी नाट्यमय एंट्री घेतली.. आवाज अगदी नेहमीसारखा ठेवला..
मी: "कुणाचा जुळा भाऊ?"
सरीता: "हा सांगत होता तुला जुळा भाऊ आहे म्हणून. त्याला भेटला होता म्हणे." ते ऐकताच मी अजून एक उत्कृष्ट अभिनयाचा नमुना पेश केला.. गोट्याचे खांदे पकडून गदागदा हलवले आणि आनंदातिरेकाने म्हंटलं - "कोण विनायक? विन्या भेटला होता तुला?". उत्तरादाखल गोट्या खो खो हसत सुटला. माझ्या अभिनयाची ही किंमत? बर्याच वेळाने हसणं कसंबसं थांबवून म्हणाला - "तो माणूस गेल्यावर मी वॉचमनला त्याच्या गाडीचा नंबर लिहून आणायला सांगीतला." मला नासकं अंड अंगावर बसल्यासारखं झालं.. प्रचंड चिडचिड झाली.. कानातून धूर यायचा बाकी होता फक्त.. माझ्या अभिनयाचं बेअरिंग पडून इतस्ततः बॉल बेअरिंग सारखं घरंगळायला लागलं. तिकडे सरीताची उत्सुकता शिगेस पोचली.
सरीता: "मग?"
गोट्या: "मग काय? तो आपल्याच गाडीचा नंबर होता."
सरीता: "असं कसं झालं?" गोट्यानं कपाळावर हात मारला.
गोट्या: "अगं आई! तो माणूस बाबाच होता. मला उगाच जुळ्याच्या बंडला मारल्या त्यांनी. बाबा! काय अँक्टिंग मारता पण! निदान कपडे तरी वेगळे घालायचे ना!" मी मला दिलेलं उत्तेजनार्थ बक्षीस चडफडत रद्द केलं आणि वैतागून खिशातली मिशी कचर्यात टाकली.
सरीता: "का रे तू असं केलंस?" यावर मी जुळ्याच्या भूमिकेतून डिटेक्टिव्हच्या भूमिकेत शिरलो.
मी: "गोट्या! तू काही विकण्याचा धंदा करतोयस काय?"
गोट्या: "छे!"
मी: "मी आजच तुला एका माणसाला एक पुडकं देताना पाहीलंय."
गोट्या: "ओ! ते होय! तो माझ्या ऑफिसमधल्या एकानं त्याच्यासाठी परदेशातून आणलेला पर्फ्यूम होता." .. मी आता डिटेक्टिव्हच्या भूमिकेत पार आत पर्यंत गेलो होतो.
मी: "अच्छा! तू एकाने दुसर्यासाठी आणलेला पर्फ्यूम फक्त देण्याचं काम केलंस तर! पण तू एक छोटीशी चूक केलीस. त्याच्याकडून पैसे घेतलेस. ते का?"
गोट्या: "कमाल आहे बाबा? अहो ते पर्फ्यूमचे पैसे होते. ते ऑफिसमधल्या कलीगला द्यायचे आहेत." .. मी त्याला एवढ्यावरच सोडला तर मी कसला डिटेक्टिव्ह? माझी केस वॉटरटाईट होती.
मी: "गोट्या! कुणीतरी तुझ्या मागे लागलंय.. बरोबर ना?" गोळी बरोबर बसली.. गोट्या लगेच वरमला.
गोट्या: "अं अं अं हो! पण तुम्हाला कसं कळलं?" मी लगेच विजयी हास्य केलं. पुढे जाऊन गोट्याच्या छातीवर बोट आपटत म्हणालो "हॅ हॅ हॅ! हमारे जासूस चारो तरफ फैले हुए हैं!"
सरीता: "हो रे गोट्या? कोण मागं लागलंय तुझ्या? आणि कशाला?"
गोट्या: "हरे राम! आता मला सांगावच लागणार सगळं. अगं आई! मी मायबोली नावाच्या साईटवर रजिस्टर झालोय."
सरीता: "ते काय असतं? वधूवर सूचक मंडळ आहे का?"
गोट्या: "नाही गं!"
सरीता: "मग वधूवर मेळाव्याचं ठिकाण आहे का?"
गोट्या: "अगं नाही गं! थांब मी तुला दाखवतोच.".. गोट्याला मायबोलीची अब्रू नुकसानी पहावेना.. २ मिनिटानी गोट्या आतून त्याचा लॅपटॉप घेऊन उगवला. "ही ती साईट. इथे वेगवेगळ्या देशातले मराठी बोलणारे लोक असतात. काही गप्पा मारतात. काही कविता/लेख लिहीतात."
सरीता: "मग हे 'गजरा', 'खट्याळ' काय आहे? अशी त्यांची नावं आहेत?"
गोट्या: "अगं ही त्यांची खरी नावं नाहीयेत काही. टोपण नावं आहेत. त्याला आयडी म्हणतात."
सरीता: "बरं बरं! तुझा आयडी काय आहे?"
गोट्या: "सदाखुळी"
सरीता: "शीsss! असला कसला आयडी? आणि हा तर मुलीचा वाटतोय."
गोट्या: "हो मुद्दाम मी मुलीचं नाव घेतलंय."
सरीता: "का?"
गोट्या: "म्हणजे मग जास्त संशय न येता इतर मुलीं बरोबर ओळख वाढवता येईल की नाही? मला या जेट-सेट युगात थेट-नेट प्रेम करायचंय."
सरीता: "अच्छा! तरीच तू हल्ली मुलीसारखा बोलतोस.. बोलतेस.. मग तू काय करतेस... करतोस?" जेंडर क्रायसिसची लागण सरीतालाही झाली आता.
गोट्या: "मी कविता करतो.. जास्त करून विडंबनं."
सरीता: "तू कविता करतेस... करतोस?" यावर पायाच्या अंगठ्यानं जमिनीवर रेघा काढल्यासारखं करत गोट्यानं अंग घुसळलं. कसं होणार या गोट्याचं देव जाणे. "अरे वा! दाखव बघू तुझं एखादं विडंबन." गोट्यानं एक पान उघडून वाचायला दिलं.. सरीतानं ते मोठ्यांदा वाचलं....
'शब्दा वाचुन कळले सारे, शब्दांच्या पलिकडले' चे विडंबन
चपले वाचुन खुपले सारे, चपलेच्या पलिकडले
प्रथम तिला काढियले आणिक रुतू नये ते रुतले
टोच नवी पायास मिळाली
खोच नवी अन् बोच निराळी
त्या दिवशी का प्रथमच माझे खूर सांग कळवळले
आठवते देवाच्या द्वारी
पादत्राण लांबवले रात्री
खट्याळ तुझिया हास्याने मम दु:ख अजुनि फळफळले
सरीता: "मस्त आहे रे गोट्या! पण या सगळ्याचा आणि तुझ्या मागे कुणी लागण्याचा संबंध काय?".. गोट्यानं त्याच्या विचारपुशीचं पान वाचायला दिलं.. "हे बघ! टकलूहैवान नावाच्या आयडीनं मला काय काय लिहीलं आहे ते वाच!"
तिनं मोठ्यांदा वाचलं..
'तुझ्याकडे प्रचंड प्रतिभा आहे. तुला न विचारताच अगं तुगं करतोय चालेल ना?'
'काय धमाल विडंबन करतेस गं तू? अगदी हहपुवा!'
.....
.....
.....
'मला तुझ्याशी ओळख वाढवायला आवडेल. आपण कुठेतरी भेटु या का?'
.....
.....
'तुझ्या गळा माझ्या गळा' च्या चालीवर माझं पण एक विडंबन
सदाखुळे सदाखुळे
मी भरकटलो तुझ्यामुळे'
.....
'तुला भेटल्या शिवाय मला करमणार नाही. मला फोन कर - ५२३२२ ७८५६४'
सरीता: "पण तुझ्या मागे सीआयडी लागला होता ना?"
गोट्या: "सीआयडी? कुणी सांगीतलं?"
सरीता: "अरे तू दीपाला तुझ्या मागे सीआयडी लागलाय म्हणून सांगीतलंस ना? बाबानं ऐकलं ते."
गोट्या: "बाबांना काहीही ऐकू येतं. परवा तू त्यांना गवार आणायला सांगीतलीस तर ते मटार नाही का घेऊन आले? तसंच. मी तिला एक आयडी मागे लागलाय म्हणून सांगीतलं फक्त." .. आता सरीताला हसू आवरेना.. माझा डिटेक्टिव्ह पार भुईसपाट झाला होता.
सरीता: "कान आहेत का भोकं आहेत रे तुझी? मी आता या टकलूहैवानाला फोन करून फैलावर घेते चांगला. तुझ्यामुळे भरकटतोय काय?" .. तिनं फोन लावला.. जे मला मुळीच अपेक्षित नव्हतं.. कारण माझा, ऑफिसनं नुकताच मला दिलेला मोबाईल वाजला.. माझं बिंग फुटलं.. आणि ती किंचाळली
सरीता: "म्हणजे तू टकलूहैवान? चिमण! ही काय भानगड आहे?"
मी: "कसली भानगड? अगं हा गोट्या आपला कायदेशीर मुलगा आहे! भानगड नाहीये काही."
सरीता: "तू परत फालतू जोक मारून वेळ मारून नेऊ नकोस. माझ्या नकळत तू पोरीबाळींच्या मागे फिरतोयस, खरं ना?"
मी: "हे बघ! पोरीबाळींच्या मागे फिरायचं असेल तर तुला सांगून कसं फिरणार? तुझ्या नकळतच फिरणार ना? आणि तुला जे वाटतंय ते मुळीच खरं नाहीये. मी गोट्यासाठी मुली शोधत होतो. माझ्यासाठी नाही काय." .. पुढं बरच पानिपत झालं.. शेवटी एका तहावर सुटका झाली.. डिटेक्टिव्हचा आता एक पराजित योध्दा झाला होता. मी मायबोलीवर कधीही जायचं नाही, तिचं अखंड मांडलिकत्व पत्करायचं, तिला वर्षातून २५ साड्या व ४ सोन्याचे दागिने नजराणा द्यायचा.. या बोलीवर मोठ्या मनानं, तिनं माहेरी जायचं रद्द केलं.
काही दिवसांनी गोट्यानं मला आणि सरीताला त्याच्या थेट-नेट प्रेमाचा गौप्यस्फोट केला. त्याचं मायबोलीवरच्या पिपाणी नावाच्या आयडीशी जमलं होतं. ती पिपाणी दुसरी तिसरी कुणी नसून आमच्याच शेजारी वाजणारी दीपा निघाली.
मी: "कसला मठ्ठ आहेस तू? लहानपणापासून तिला ओळखतोस, तरी तुला कळलं नाही?"
गोट्या: "अहो बाबा! प्रेम आंधळं असतं ना?"
सरीता: "अगदी बापावर गेलाय. त्याला तरी कुठे कळलं होतं?"
म्हणतात ना.. काखेत कळसा अन् नेटला वळसा.
-- समाप्त --
(तळटीपः टकलूहैवान हा आयडी विकावू आहे. इच्छुकांनी माझ्याशी संपर्क करावा. आयडी सोबत पासवर्ड फुकट मिळेल.)

Tuesday, December 1, 2009
नुस्ता स.दे.
"एखाद्या अनोळखी माणसाला मी दिलेलं गाणं गुणगुणताना ऐकणं यापेक्षा इतर कशानही मला जास्त आनंद होत नाही. एकदा कलकत्त्या पासून सुमारे २० मैल लांबच्या एका तलावात, एकदा मी गळ टाकून बसलो होतो. मासे पकडत बसणे हा माझा एक छंद आहे. त्यादिवशी माझं नशीब चांगलं नव्हतं.. कारण दिवसभर बसून एकही मासा मिळाला नाही. निराश होऊन मी निघणार एवढ्यात एका १० वर्षाच्या पोराने तलावात सूर मारला.. आणि तो 'तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले' हे माझं बाझी तलं गाणं गाऊ लागला. त्याला याची कल्पनाही नसणार की हे गाणं देणारा माणूस पलिकडच्या तीरावर गळ टाकून बसलाय! तो माझ्या आयुष्यातला मला मिळालेला सगळ्यात मोठा मासा आहे.
असंच एकदा मी बांद्रा स्टेशनवर मालाडला जाण्यासाठी उभा होतो. जवळंच काही कामगार कुदळ फावड्यांच्या हालचालींच्या ठेक्यावर माझं शबनम चित्रपटातलं गाणं गात होते. ते ऐकता ऐकता मी इतका गुंग झालो की ती लोकल कधी आली अन् गेली ते मला कळलंच नाही."
हे खुद्द सचिनदेव बर्मन याचं भाष्य आहे! काही लोक त्याला एसडी बर्मन म्हणतात तर काही दादा बर्मन.. माझ्या लेखी तो 'नुस्ता सदे' आहे.. कारण त्याचं गाणं आवडलं की मी फक्त 'वाss! नुस्ता सदे!' एवढंच म्हणू शकतो.
पिया तोसे नैना लागे रे (गाईड), तेरे नैना तलाश (तलाश), सुन मेरे बंधू रे (बंदिनी), दिवाना मस्ताना हुआ दिल (बंबईका बाबू), जाने वो कैसे लोग थे जिनके (प्यासा), वक्तने किया क्या हँसी सितम (कागजके फूल), फुलोंकी रंगसे दिलकी कलमसे (प्रेमपुजारी), हम बेखुदीमें तुमको पुकारे (काला पानी), जलते हैं जिसके लिए (सुजाता), छोड दो आँचल जमाना क्या कहेगा (पेईंग गेस्ट)... अशी कितीतरी त्याची गाणी.. यातलं एक जरी ऐकलं तरी दिवसभर ते मनात घोळत रहातं.. मधेच एखादा संगीताचा तुकडा आठवतो नाहीतर एखादी ओळ आणि नकळत दाद दिली जाते.. 'वाss! नुस्ता सदे!'
लोकांच्या तोंडात पटकन बसणारी अविस्मरणीय गाणी बनवायला त्याला कसं काय जमायचं यामागे एक किस्सा आहे. १९४४ साली शशधर मुखर्जीच्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी सदे कलकत्त्याहून मुंबईला आला. रोज दुपारी जेवणानंतर मुखर्जीच्या खोलीत पेटी नेऊन नवीन रचना ऐकवणे हा त्याचा कार्यक्रम होता. मुखर्जी धुन ऐकता ऐकता डोळे मिटायचा आणि थोड्या वेळाने चक्क घोरायला लागायचा. त्याचं घोरणं हे गाणं न आवडल्याचा संकेत होता. हे प्रकरण २ महिने चाललं. मग मात्र सदेच्या सहनशक्तीचा अंत व्हायची वेळ आली.. रोज मुखर्जीला अंगाईगीत गाऊन झोपवण्यासाठी आपण मुंबईला आलो आहोत काय? असा विचार घोळू लागला.. शेवटी, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून सदे एक दिवस त्याच्या खोलीत पेटी घेऊन गाऊ लागला.. नेहमीप्रमाणे त्यानं डोळे मिटले.. आता काय? त्या घोरण्याच्या कातिल सुरांची वाट पहायची, गाशा गुंडाळायचा आणि घरी जायचं.. अचानक मुखर्जीनं डोळे उघडले आणि म्हणाला 'तू हे गाण रेकॉर्ड करून घे. सगळ्या वादकांना बोलव आणि रेकॉर्ड कर." सदेला कळेना की इतक्या सगळ्या गाण्यातून त्यानं हेच गाणं का निवडलं? त्याचं उत्तर त्याला त्याच रात्री मिळालं.. रेकॉर्डिंग संपवून बाहेर येताना सदेनं डोअरकीपरला तेच गाणं गुणगुणताना ऐकलं.. तो नुसता गुणगुणत नव्हता तर बरोबर म्हणत होता. गाणं सर्वस्पर्शी असलं पाहीजे.. ऐकणारा उभ्या भारतात कुठेही रहाणारा असला तरी त्याला ते गाणं भावलं पाहीजे.. हे सगळं स्वतःच्या शैलीशी तडजोड न करता करायचं या मुखर्जीच्या कानमंत्रामुळेच सदेनं पुढची ३० वर्ष हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली.
सोप्पी पण कर्णमधुर चाल.. आम जनतेला आपलिशी वाटेल अशी, तरीही बाळबोध नाही.. जोडीला कमितकमी वाद्यांची समर्पक साथ.. गाण्यातले भाव आणि वातावरण उंचावणारी.. लोकसंगीताचा भरपूर वापर.. हे सदेच्या शैलीचं व्यवच्छेदक लक्षण.
गमतीची गोष्ट अशी आहे की, सदे बंगालमधे गायक म्हणून प्रसिध्द आहे तर बंगालबाहेर संगीतकार म्हणून. सदेनं फार कमी गाणी हिंदी चित्रपटात गायली.. 'माझं गाणं चित्रपटात कुणाच्याही तोंडी असता कामा नये' अशी त्याची एक अट असायची.. त्याचा आवाज कुणालाही साजेसा नव्हता हे एक कारण असेल कदाचित!.. पण सदेचं गाणं बॅकग्राउंडला असलं तर चित्रपटात मस्त वातावरण निर्मिती करून जातं. आठवा गाईडमधलं 'वहाँ कौन है तेरा'. सदेचा आवाज फार चांगला आहे असं काही मी म्हणणार नाही.. मलाही त्याचा आवाज सुरुवातीला आवडत नसे.. त्याचा आवाज बिअरसारखा आहे.. प्रथम कडू लागल्यामुळे नकोशी वाटते.. नंतर पिऊन पिऊन चटक लागते आणि नशा चढते. त्याचं गाणं आतून येतं.. पाण्याच्या प्रवाहाला असते तशी ओढ आहे त्याच्या आवाजात.. 'मेरे साजन है उस पार' मधे किती आर्जवी होतो त्याचा स्वर!
त्याच्या गाण्याच्या शैलीला भटियाली ढंग म्हणतात.. भटियाली म्हणजे बंगालचं कोळीगीत.. गाताना कुठे थोडासा कंप, कुठे एखादा तुटक सूर तर कुठे थोडासा चिरका आवाज हे भटियाली ढंगाचं वैशिष्ट्य! 'सफल होगी तेरी आराधना' हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.. सुरुवातीच्या 'बनेगी आशा एक दिन तेरी ये निराशा' या ओळीतला 'आशा' शब्द कसा म्हंटलाय ते ऐका. ही शैली त्यानं फकीर, बैरागी, पीर, भिकारी किंवा घरातले नोकर अशासारख्यांची अनेक गाणी ऐकून आत्मसात केली. त्यांची गाणी ऐकूनच तो बहुश्रुत झाला असं म्हणायला पाहीजे. 'इतकी वर्ष मी गाणी दिली तरी तो लोकगीतांचा साठा अजून संपलेला नाही' असं एकदा सदे म्हणाला होता.
सदेची काही बंगाली गाणी मला इथे सापडली: - 'सदेनं गायलेली बंगाली गाणी.' यातली काही गाणी नंतर हिंदीत आली. ती मूळ गाणी ऐकताना सदेची स्वतःची खास शैली जाणवते.. भाषा समजत नसली तरी मी ती परत परत ऐकून 'वाss! नुस्ता सदे!' करत राहीलो.
१. बार्ने गंधे छंदे - फुलोंकी रंगसे दिलकी कलमसे (किशोर, प्रेम पुजारी)
२. मानो दिलोना बधु - जाने क्या तूने कही (गीतादत्त, प्यासा)
३. घुम भुलेशी - हम बेखुदीमें तुमको (रफी, काला पानी)
४. कांदिबोना फागुन गेले - अबके ना सावन बरसे (लता, किनारा) हे पंचमने दिलेलं गाणं.
त्याचा जन्म (१ ऑक्टोबर १९०६) जरी त्रिपुरेच्या एका राजघराण्यात झाला होता तरी त्याच्या वडिलांनी त्याच्या सामान्य लोकांबरोबरच्या मैत्रीला कधीच आक्षेप घेतला नाही. वडिलांच्या सतार वादनामुळे त्याला संगीताची गोडी लागली ती कायमचीच! १९२४ मधे बीए झाल्यावर एमए करायच्या ऐवजी त्यानं संगीताचं शिक्षण घेणं सुरू केलं. के. सी. डे (मन्ना डे चे काका) सारख्या काही बड्या लोकांकडे तो शिकला. १९३० साली वडील गेल्यावर सदेचा फार मोठा आधार गेला. तो स्वतः उत्तम तबला आणि बासरी वाजवायचा. त्याच्या बहुतेक गाण्यात बासरी कुठेतरी हजेरी लावून जाते त्याच हे एक कारण असेल. १९३२ साली त्याची पहिली गाण्याची रेकॉर्ड बंगालमधे तुफान लोकप्रिय झाली. १९३८ साली मीरा नावाच्या गायिकेशी त्याचा विवाह झाला आणि १९३९ मधे राहुलदेव उर्फ पंचम चा जन्म झाला. मीरा राजघराण्यातील नसल्याने लग्नाला घरून खूप विरोध झाला. शिवाय राजघराण्याच्या लौकिकाला त्याच्या पेशामुळे बट्टा लागतो असा आरोप सतत व्हायचा. या सगळ्याचं पर्यवसान घराण्याचे संबंध तोडण्यात झालं. आज हे राजघराण सदेमुळं ओळखलं जातं.
१९४४ पर्यंत त्याची अनेक बंगाली गाणी गाजली. त्यानंतर त्यानं मुंबईत पाऊल ठेवलं. सुरुवातीच्या दोन तीन चित्रपटातली गाणी चांगली झाली तरी लोकांच्या मनात म्हणावा तेव्हढा तो ठसला नव्हता. याच कारणामुळे त्यानं कलकत्त्याला परत जायचा निर्णय घेतला. अशोककुमारने 'मशाल चित्रपटाला संगीत दे आणि मग काहीही कर' अशी गळ घातल्यावर त्यानं थोडं थांबायचं ठरवलं. मशालला अभूतपूर्व यश मिळालं आणि त्यानंतर त्याच्या मृत्युपर्यंत (३१ ऑक्टोबर १९७५) त्यानं अनेक अविस्मरणीय हिंदी गाणी दिली.
एक राजपुत्र असूनही त्याचं वागणं बोलणं अगदी साधं होतं.. त्यात माज किंवा ऐट नव्हती.. धोतर कुडता आणि अंगावर एक शाल असा साधा वेष असायचा.. कुडत्याला असलेली सोन्याची बटणं हीच त्यातल्या त्यात राजघराण्याची खूण! कधी हट्टीपणा करणारा तर कधी लहान मुलासारखा वागणारा सदे कायम संगीतात बुडालेला असायचा. बरीच गाणी त्याला मासे पकडताना नाहीतर चालत फिरताना सुचलेली आहेत. त्याचं संगीत त्यामुळेच इतकं उत्स्फुर्त वाटतं. गाणं चांगलं झालं की खूष होऊन गायकाला किंवा गायिकेला तो त्याचं खास पान बक्षीस म्हणून द्यायचा.
कुठल्या गायकाचा आवाज कुठल्या गाण्याला चांगला वाटेल याबद्दल त्याचे स्वतःचे आडाखे होते.. पडद्यावर कुठला हिरो ते गाणार आहे ही बाब त्याच्या दृष्टीने दुय्यम असायची.. म्हणूनच देव आनंदला किशोर, रफी किंवा हेमंतकुमार यांनी आवाज दिला आहे.. तसंच अमिताभलाही रफी, किशोर आणि मनहर यांचा आवाज अभिमान मधे आहे. गाण्यात वाद्यांपेक्षा तो गायकाचा आवाज आणि गाणं कसं गायला पाहीजे यावर जास्त भर द्यायचा. 'छोड दो आँचल' मधला 'हाs' किंवा 'रात अकेली है' मधली कुजबुजत्या स्वरात होणारी सुरुवात हा खास सदे टच.
देव आनंदचं नवकेतन सदेशिवाय दुसर्या कुणालाही संगीतकार म्हणून घेत नसे. सदे आजारी होता म्हणून देव आनंदनं गाईड काही महीने पुढे ढकलला.. इतरानी बराच पाठपुरावा केला तरीही. आणि सदेनंही उत्कृष्ठ संगीत देऊन त्याचा विश्वास सार्थ ठरवला.. पण दुर्देवाने गाईडला संगीताचं फिल्मफेअर नाही मिळालं. आनंदबंधू आणि सदे चांगलं संगीत होण्यासाठी किती झगडायचे याचा एक किस्सा आहे.. गाईडसाठी रफीचं एक गाणं रेकॉर्ड झालं.. गाणं ऐकल्यावर देव आणि गोल्डी यांना ते मुळीच आवडलं नाही.. त्यानी सदेला फोन करून तसं सांगीतलं.. सदेनं तेच गाणं त्या प्रसंगाला योग्य आहे म्हणून फोन ठेऊन दिला.. अर्ध्या तासाने सदेनं फोन करून सांगीतलं की "तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. मी उद्या सकाळी येतो आणि नवीन धुन ऐकवतो." सकाळी सदेनं येऊन 'दिन ढल जाए' ची धुन ऐकवताच दोघे खूष झाले. ताबडतोब शैलेंद्रला बोलावलं आणि त्यानं ५ मिनिटात त्या गाण्याचा मुखडा लिहीला. आधी चाल मग गीत ही प्रथा सदेनंच सुरू केली. ती फक्त प्यासासाठी मोडली कारण त्यात शब्दांना जास्त महत्व आहे हे त्याला मनोमन पटलं म्हणून.

सदे वर्षाला ४/५ चित्रपटापेक्षा जास्त काम क्वचितच अंगावर घ्यायचा.. तेही चित्रपटाची कथा ऐकल्यावर आपण याला न्याय देऊ शकू असं सदेला वाटलं तर! 'हरे रामा हरे कृष्णा चित्रपटाचं संगीत मला जमणार नाही, त्यापेक्षा पंचम चांगलं संगीत देईल' असं सदेनं देव आनंदला निक्षून सांगीतलं. तरीही देवने 'ठीक आहे, पंचमला संगीत देऊ दे. पण तू मुख्य संगीतकार रहा' अशी तडजोड सुचवली. त्यालाही सदेनं ठाम नकार दिल्यावर देवचा नाईलाज झाला. पण जेवढं काम सदे अंगावर घ्यायचा ते मात्र मन लावून करायचा.. गाईड च्या चित्रीकरणासाठी सगळे जयपूरला जायची वेळ झाली तरी सदेचं गाणं तयार नव्हतं.. 'तू माझ्यावर विश्वास ठेव. मी असं गाणं पाठवेन जे सगळ्या जगाच्या लक्षात राहील.' असं सदेनं देवला पटवलं. थोड्याच दिवसानंतर त्यानं 'आज फिर जीनेकी तमन्ना है' पाठवलं. या गोष्टीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली त्यावेळेला चित्रपट होता 'ज्युवेल थीफ' आणि गाणं होतं 'होठोंपे ऐसी बात'!
गाण्यातल्या तालवाद्याला एखाद्या तंतुवाद्याची साथ देऊन तालाचा नाद वाढवायचा ही एक सदेची खासियत! 'सुन मेरे बंधु', 'मेरी दुनिया है माँ (तलाश)' यात तालवाद्या बरोबर एक तंतुवाद्य सतत वाजलेलं ऐकू येईल. कधी गाण्याची चाल त्यातल्या तालाबरोबर अशी मस्त झुलते की त्याबरोबर आपण पण झुलायला लागतो.. 'खायी है रे हमने कसम (तलाश)', 'खोया खोया चाँद' मधील कडव्याची चाल, 'दीवाना मस्ताना हुआ दिल' मधील कडव्याची चाल, 'मोरा गोरा अंग लैले', 'तेरे नैना तलाश', 'फुलोंकी रंगसे', 'लिखा है तेरी आँखोमे' अशी काही उदाहरणं आहेत त्याची.
सदेच्या बहुतेक गाण्यात थोडीच वाद्य वाजतात पण उत्तम वातावरण निर्मिती करतात. 'दिल पुकारे' चं सुरुवातीचं संगीत आपल्याला घरातून उचलून थेट डोंगरदर्यात घेऊन जातं. गाईड मधलं 'पिया तोसे' हा त्याला अपवाद म्हणावा लागेल. खमाज मधे बांधलेल्या या गाण्यात विविध प्रकारची वाद्य कुठेही कर्कशपणा न जाणवता अचूक परिणाम साधलाय. हे गाणं तब्बल ८ मिनीटाचं आहे.. पण सीडीवर विकत मिळणारं गाणं निम्मच आहे.. 'मूळ ८ मिनिटांचं गाणं.'
सदे गेल्यावर किशोरने एक खास रेडिओ प्रोग्रॅम करून त्याला श्रध्दांजली वाहिली. त्यात त्याच्या काही गमती जमती सांगीतल्या त्याची नक्कल करत.. ते किस्से मी मुद्दामच या लेखात लिहीले नाहीत. ते किशोरच्या तोंडून ऐकण्यातच जास्त मजा आहे.. त्याच्या प्रोग्रॅमचा काही भाग इथे ऐकायला मिळेल:- 'किशोरची श्रध्दांजली.'
दाद असो वा श्रध्दांजली मी फक्त 'वाss! नुस्ता सदे!' पेक्षा जास्त काही बोलू शकत नाही.
-- समाप्त --
(टीपः या लेखासाठी स्मिता गद्रे पटवर्धन यांची बहुमोल मदत झाली आहे.)

Monday, October 19, 2009
एका परंपरेचा अस्त
ज्यानी कुणी आपल्या वाढत्या वयातली महत्वाची वर्षं पुणे विद्यापीठात काढली (घालवली आहेत असं मी म्हणणार नाही) आहेत त्यानं विद्यापीठातल्या 'अनिकेत' कँटिनबद्दल ऐकलं नसेल तर तो एकतर ठार बहिरा असला पाहीजे किंवा त्याला स्मृतिभ्रंश तरी झाला असला पाहीजे. कारण ते नुसतं कँटिन नव्हतं.. ती एक मास्तर विरहित शिक्षण संस्था होती.. हल्ली HR ची लोकं, त्यांच्या नोकर्या जस्टिफाय करायला, कसले कसले सॉफ्ट स्किलचे ट्रेनिंग प्रोग्रॅम घेऊन बिचार्या कर्मचार्यांचा जीव नकोसा करतात ते सगळं ट्रेनिंग इथे नकळत होऊन जायचं.
तिथले पदार्थ फार चविष्ट होते अशातला काही भाग नव्हता, पण स्वस्त मात्र होते. खरं आकर्षण तिथल्या वातावरणाचं होतं. भारत क्रिकेटची मॅच जिंकत असेल तर मैदानावर जसं वातावरण असतं तसं वातावरण कायम! पीढीजात सुतकी चेहर्यावर देखील स्मित झळकवण्याची क्षमता त्या वातावरणात होती. परीक्षेत नापास झाल्याचा वैताग, मास्तरनं झापल्यानं आलेली कटुता, बापाशी झालेल्या भांडणाचं वैषम्य, प्रेमभंगाचं दु:ख, आपल्याला आयुष्यात काही करायला जमणार नाही ही भीति.. असल्या मन पोखरणार्या विचारांचा निचरा करण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे अनिकेत!
विद्यापीठातल्या सगळ्या वाटा अनिकेतमधून जातात असं लोक गमतीनं म्हणायचे. लेक्चरला जायच्या आधी व नंतर, ग्रंथालयात जाण्याआधी मानसिक तयारी करण्यासाठी आणि जाऊन आल्यावर मेंदुवरचा ताण हलका करण्यासाठी, फी भरायला जाण्याआधी आणि नंतर असं कुठेही जायचं असलं तरीही व्हाया कँटिन जायची पध्दत होती. कँटिन हा एक भोज्या होता.. त्याला हात लावल्याशिवाय कुठल्याही कामाला मुहूर्त लागत नसे. हे ठसवायला त्या वेळी केलेलं 'पाऊले चालती पंढरीची वाट' याचं केलेलं विडंबन थोडं फार आठवतंय -
पाऊले चालती कँटिनची वाट
सर्व अभ्यासाला मारुनिया चाट
पाऊले चालती कँटिनची वाट
माझ्यासारख्या बर्याच रिकामटेकड्यांचा प्रवास अर्थात् कँटिनमधेच संपायचा. सकाळी विद्यापीठात दमून भागून आल्यावर आम्ही कँटिनला जे ठिय्या मारायचो ते संध्याकाळी कँटिन बंद होईपर्यंत! हां, कधी मधी परीक्षा देणे किंवा फी भरणे अशा फुटकळ कामाला नाईलाजास्तव बाहेर पडायचो, नाही असं नाही! ज्यानी कुणी कँटिनचं 'अनिकेत' नाव ठेवलं तो फार मोठा द्रष्टा असला पाहीजे कारण ती उपाधी आम्हाला १००% लागू होती. तिथल्या हॉलमधे असलेल्या कॅरम आणि टीटी या खेळात आम्हाला विशेष रस होता. तसे तिथे बुध्दिबळ खेळणारेही होते पण माझ्यासारखी जड बुध्दिची माणसं त्याच्या वाटेला अजिबात जायची नाहीत. आणि टीटी पेक्षाही आमची कॅरमला जास्त पसंती होती कारण कॅरम चहा-बिडी मारत निवांतपणे, शरीर न झिजवता, खेळता यायचा.
सुरवातीचे काही महीने इतर रथि-महारथिंचा खेळ बघून तोंडात बोटं घालण्यात गेला. हळूहळू आमचाही गेम सुधारला आणि विद्यापीठातली कॅरमची विवक्षित भाषा व नियम अवगत झाले. नियम थोडे वेगळे होते. सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे सोंगटी (विद्यापीठाच्या भाषेत गोटी) जर आपल्या स्ट्रायकर ठेवायच्या रेषांना चिकटली असेल किंवा त्यापेक्षा खाली असेल (म्हणजे बेसमधे असेल) तर तिला सरळ मारता यायचं नाही.. रिबाउंड मारूनच घ्यायची. या नियमामुळे प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कौशल्य कमी असलं तरी थोडी फार झुंज देता यायची.. त्यांच्या बेसमधे गोट्या घालून. दुसर्यांच्या गोट्यांना सरळ मारून त्यांच्या बेसमधे घालता नाही यायचं.. एकतर रिबाउंड मारून घालायच्या किंवा कुठेतरी आपल्याही गोटीला धक्का लागेल असं बघायचं.
काही शॉट्सना अभिनव नावं होती. पार्टनरच्या बेसमधल्या गोटीला बोर्डाच्या डाव्या किंवा उजव्या कडेवर स्ट्रायकर आपटून मारलं तर तो 'झाडू' शॉट! 'पंच मारणे' म्हणजे कडेला चिकटलेल्या गोटीला एक झापड मारून तशीच चिकटलेल्या अवस्थेत भोकात घालवणे. 'डबलशॉट' मधे आपली गोटी घेता घेता स्ट्रायकरने दुसर्याची गोटी त्याच्या बेसमधे घालायची किंवा आपली एखादी गोटी सोप्पी करायची.. हा एक बहुपयोगी शॉट होता पण फार लोकांना तो जमायचा नाही.. ज्यांना जमायचा त्यांची पत कॅरमच्या बाजारात वरची असायची. 'स्लाईड' शॉटमधे एखाद्या गोटीचा घसरगुंडीसारखा उपयोग करून स्ट्रायकर तिच्यावरून घसरवायचा आणि दुसरी गोटी घ्यायची.
काही जण आपली गोटी भोकापाशी गस्तीला बसवून दुसर्याला बूच लावण्यात वाकबगार होते.. त्यांना बुचर म्हंटलं जायचं. तसेच काही जण ती बूचं बाजुला करून आपली गोटी घेण्यात पटाईत होते.. त्यांना डिबुचर म्हणायचो. बूच बाजुला करणे शक्य नसेल तेव्हा ती गोटी 'तोडली' जायची.. म्हणजे तिला जोरात ताड्या मारून बोर्डावरून उडवली जायची किंवा आयुष्यातून उठवली जायची.. गोटीच्या त्या प्रवासाचं गोईंग बाय बोईंग असं मार्मिक वर्णन केलं जायचं. प्रत्येक गेम मधे पावडर टाकायची जबाबदारी एक खेळाडू घ्यायचा.. तो पावडरमॅन. खेळाडूच्या डाव्या आणि उजव्या बाजुला बसलेल्यांचा बेस म्हणजे 'समास' हा भाग. समासातली गोटी घ्यायची वेळ आली की तो सामासिक प्रॉब्लेम व्हायचा. जर कुणाला गोटी घ्यायला जमत नसेल आणि तो नुसता भोकाच्या अवतीभवती फिरवत असेल तर त्याला 'घुमायून' अशी पदवी मिळायची.
झुंज द्यायचं दुसरं महत्वाचं शस्त्र म्हणजे हल्लीच्या भाषेतलं स्लेजिंग.. आम्ही त्याला मानसिक खच्चीकरण म्हणायचो. हा प्रकार हरभजन - सायमंडस् यांच्यामुळे आत्ता आत्ता लोकांना कळाला.. आम्ही तो फार पूर्वीच आत्मसात केला होता.. आमचं त्यातलं प्राविण्य स्टीव वॉला समजलं असतं तर त्यानं अख्खी ऑस्ट्रेलियाची टीम आमच्याकडे ट्रेनिंगला पाठवली असती. अर्थात् आमच्या स्लेजिंगमधे शिव्यागाळी किंवा हीन दर्जाचं बोलणं नसायचं.. ते पूर्णपणे विनोदी असायचं आणि अगदी मोक्याच्या वेळेस म्हंटलं जायचं.. जेणेकरून प्रतिस्पर्धी हसता हसता गोटी फुकायचा.
खच्चीकरणासाठी प्रत्येकाच्या खेळायच्या शैलीचा अभ्यास कामाला येतो. उदा. रंग्या गोट्या जोरात मारतो. नेम चांगला असेल तर गोट्या जातात नाही तर तितक्याच वेगाने परत येतात. त्याचा नेम सहसा चुकत नाही पण त्याच्या मनात शंका निर्माण केली की संधी असते. तो क्वीन किंवा कव्हर अशी महत्वाची गोटी घेत असेल तेव्हा 'हळू मार रे रंगा' ही ओळ 'एक हंसका जोडा' या चालीत सुरू व्हायची. त्यापुढची ओळ 'हळु मार रंगाs आs आs' ही 'सख्या चला बागामधी रंग खेळू चला' यातल्या 'रंग खेळू चलाs आs आs' या कोरसासारखी तारस्वरात ओरडली जायची.. की लगेच ती शंका त्याला भेडसवायची.
बंड्या नेहमी अस्वस्थ असतो.. शांतपणे आपली खेळी यायची वाट बघत नाही.. कधी भकाभका बिडी ओढेल तर कधी गटागटा चहा ढोसेल नाहीतर कधी जरूर नसताना पावडर टाकेल. त्याचे डोळे एका जागी स्थिर नसतात.. सतत इकडे तिकडे हलत असतात. खेळी आली की तो पटपट खेळून मोकळा होतो.. जास्त टीपी करत नाही आणि इतरांनी केलेला त्याला आवडतही नाही. अर्थातच तो जेव्हा खेळायला बसतो तेव्हा तोच पावडरमॅन असतो. विवक्षित वेळेला बंड्याच्या अलिकडला उगीचच जास्त टीपी करेल.. कुठली गोटी घ्यायची यावर पार्टनरबरोबर खूप विचारविनिमय करेल. मग 'अरे, काय बुध्दिबळं खेळताय की कॅरम?' असा सवाल बंड्याकडून आला की समजायचं - लोहा गरम है, हाथोडा मार दो.
हातातून स्ट्रायकर सुटताना दिल्या कमरेपासून मागे झुकतो.. हे रिकॉईल मुळे होतं असा विद्यापीठातील काही शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्यांच्या मते स्ट्रायकर सोडायला त्याला फार जोर लावायला लागतो. स्ट्रायकर सोडणे आणि मागे झुकणे या हालचाली सहज एकसंध झाल्या तर गोटी जाते नाहीतर हुकते. वजन उचलायच्या वेळेस कामगार मंडळी जसा 'हुप्पा हुंय्या' असा आवाज करतात तसाच स्ट्रायकर सोडायच्या वेळेस केला की इप्सित साध्य व्हायचं.
मोक्याच्या वेळेला गोटी फुकायला लावण्यासाठी विनोदाचा सढळ तोंडाने वापर व्हायचा. कुणी क्वीनला नेम लावायला लागला की 'कशाला राणीच्या मागे जवानी बरबाद करतोस?' असा फंडू सवाल यायचा. तरीही क्वीन घेतली आणि कव्हर थोडं जरी अवघड असलं तर लगेच 'बारावी झालास. आता पुढे काय?'. कुणी पटपट गोट्या घ्यायला लागलाच तर 'अरे, पार्टनरला थोड्या ठेव!' असा अनाहूत सल्ला मिळायचा किंवा 'सोप्या गोट्या घेऊन भाव खातोय रे' असा विलंबित आक्रोश व्हायचा... जर कधी त्याला बूच लावायचा आग्रह झाला तर 'त्याला बूच लावणं म्हंजे रिकाम्या बाटलीला बूच लावण्यासारखं आहे' असं म्हणून झिडकारला जायचा. एखाद्याला चुकून गोटी गेली तर 'मटका लागला रे' म्हणून बाकीचे विव्हळायचे, पण तो मटकेवाला 'अरे हा शॉट अॅडव्हान्स कॅरम व्हॉल्यूम ४ मधे आहे' असं समर्थन करायचा.
सगळ्यात बाका प्रसंग म्हणजे प्रतिस्पर्धी जिंकायला आले आहेत.. शेवटची गोटी घ्यायची राहिली आहे.. ती घ्यायला नेम लावलेला आहे.. एव्हढ्यात हरणारे दोघे एकदम उठून 'जन गण मन अधिनायक जय हे' हे समारोपाचं गाणं चालू करतात.. मग कसली गोटी जातेय?
असो. असे अनेक किस्से, घटना डोळ्यासमोरून गेल्या त्यावेळेला मी अनिकेत मधे खूप वर्षांनंतर उभा होतो आणि अजूनही तसंच आहे का ते शोधत होतो. दुर्दैवाने अनिकेत मधलं 'ते' वातावरण आता नामशेष झालं आहे. आता कॅरम आणि टीटी खेळायच्या जागी एक दुकान थाटले आहे आणि खेळायला पर्यायी जागा पण दिलेली नाही असं ऐकून आहे. थोडक्यात, एका महान परंपरेचा अंत झालाय.

Saturday, July 4, 2009
रिसेशन - एक काथ्याकूट
(टीपः या लेखातील पात्रे 'ठरविले अनंते' या लेखातून उचलली आहेत. तो लेख माझाच असल्यामुळे लेखकाची पूर्वपरवानगी घेण्याची गरज वाटली नाही. किंबहुना, लोकांनी तो लेख वाचावा या निर्मळ हेतुनेच हा प्रपंच केला आहे.)
"अरे चिमण्या, आजकाल सगळं ग्लोबल झालंय. तिकडे खुट्ट झालं की इकडे पटापट दारं लावतात. तिकडे माशी शिंकली की इकडे लोकं सर्दीची औषधं घेतात. इकडच्या बिळात अल कायदा सरपटला तर तिकडचे लोक काठ्या घेऊन मारायला निघतात. इतकंच काय, साधं वॉर्मिंग पण ग्लोबल झालंय तर!".. 'रिसेशन ग्लोबल आहे की नाही' या माझ्या भाबड्या प्रश्नावर दिल्यानं आख्यान लावलं होतं. आमची साप्ताहिक सभा भरली होती. मी, सरिता, दिल्या आणि कल्पना एवढेच उपस्थित होते.. मक्या आणि माया अजून उगवले नव्हते. मला अजूनही कल्पनाच्या डोळ्यांकडे पहायचं डेरिंग होत नाही. काहीतरी बोलायचं म्हणून मी दिल्याला चावी मारली होती अन् माझ्या कर्माची फळं भोगत होतो. कल्पना तन्मयतेनं दिल्याचं बोलणं ऐकत होती.. दिल्याच्या गाढ्या नॉलेजवरचा विश्वास उडण्या एवढे दिवस त्यांच्या लग्नाला झाले नव्हते, त्याचं हे लक्षण. सरिता सुध्दा मन लावून त्याचं बोलणं ऐकत होती. लग्न मुरल्यानंतर, नवर्यापेक्षा त्याचे मित्रच जास्त समंजस आणि हुशार आहेत, असं बायकांना वाटायला लागतं, त्याचं हे लक्षण.
दिल्या: "आता हेच बघ ना. तिकडच्या मार्केटनं राम म्हंटल्यावर इकडच्या मार्केटनं लक्ष्मण म्हंटलं. अरे, माझा धंदा सुध्दा २ टक्क्यावर आला तर!"
"दो टकेके आदमीका धंदा कितना होगा?".. दिल्याच्या मागून आवाज आला. दिल्यानं वैतागून बघितलं.. मक्याची नाट्यमय एंट्री झाली. त्याच्या मागून मायाने प्रवेश घेताच 'अय्या! किती छान ड्रेस आहे. कुठे घेतलास?" असले ठराविक बायकी चित्कार झाले. एकमेकींच्या कपड्यांचं नेहमीचं कौतुक चालू असताना आम्ही मक्याची दारु ऑर्डर करण्याचं महत्वाचं काम उरकलं.
मक्या: "यार! ट्रिपला जाऊ या कुठेतरी. लेट्स चिलाउट फॉ सम टाईम." जरा कुठे स्थिरस्थावर होतोय तोच मक्याचा अमेरिकन भडिमार सुरु झाला. पण त्याच्याकडून आलेली ट्रिपची मागणी चांगलीच अनपेक्षित होती. कारण आत्तापर्यंत कधीही त्याला आमच्या बरोबर ट्रिपला यायला जमलं नव्हतं.. आज काय क्लायंटचा कॉल, उद्या प्रोजेक्टची डेडलाईन तर परवा अमेरिकेची वारी असल्या नाना शेंड्या त्यानं आम्हाला लावल्या होत्या. त्यामुळे हे असलं प्रपोजल म्हणजे मुंग्या आणि मेरु पर्वत यातली बाब होती.
मी: "मक्या! तुला क्लायंटची भाजी आणणं किंवा त्याच्या पोरांना शाळेत सोडणं यातलं एकही काम कसं नाहीये रे? तुला ट्रिप कशी काय सुचतेय?"
मक्या: "अरे बाबांनो! आयॅम फायर्ड! माझी नोकरी गेली. काल माझा शेवटचा दिवस होता". हे म्हणताच वातावरण थोडं तंग झालं. ते लक्षात येताच तो पुढे म्हणाला - "ट्रिपच्या निमित्ताने आमचा तिसरा हनीमून तरी होईल". यावर मायाने लगेच भुवया उंचावत यक्ष प्रश्न केला - "म्हंजे? दुसरा कधी झाला?".
"नशीब! मला वाटलं तू म्हणतेयस 'पहिला कधी झाला?'" सरिताच्या खडूस बोलण्यावर मायाची आणि तिची टाळाटाळी (म्हणजे टाळ्यांची देवाण घेवाण) झाली.
मी: "अरे! काय चाल्लंय काय? दिल्याचा धंदा बसला. तुझी नोकरी गेली. आता माझी कधी जातेय एवढंच बघायचं".
मक्या: "तुझी कसली जातेय? तुझी जिव्हाळ्याची बँक आहे. माझ्या क्लायंटची दिवाळ्याची होती. इट वेंट डाऊन द ड्रेन.. सो वेंट द क्लायंट. तो गेल्यावर माझी गरज संपली आणि कंपनीनं मला नारळ, पुष्पगुच्छ देऊन सांगितलं 'या आता!'".. क्लायंट गेला तरी मक्याचं अमेरिकन काही डाऊन द ड्रेन जाण्याची चिन्हं नव्हती.
दिल्या: "मला कळत नाहीये की तुझी गरज नाही हे कळायला त्यांना इतकी वर्ष का लागली?".. दिल्यानं २ टक्क्याचा सूड उगवला.
कल्पना: "दिलीप! अरे तू काहीही काय बोलतोस?" कल्पनाच्या चेहर्यावर 'ह्या दिल्याला कुठे न्यायची सोय नाही' असे भाव होते.. तिला अजून आमच्या अतिरेकी खडूस पणाची सवय झाली नव्हती.. मायानं तिच्या कानात कुजबुज करून 'सगळं ठीकठाक आहे' असं समजावलं असावं.. कारण तिच्या चेहर्यावर परत 'दिल्या ग्रेट आहे' असे भाव उगवले.
सरिता: "चला बरं झालं. मायाला डबा द्यायला नको आता. बाय द वे, तू त्याला डब्यात रोज काय द्यायचीस?"
मक्या: "धम्मक लाडू". मायानं त्याच्या डोक्यावर एक टप्पल दिली त्यामुळे तोंडाकडे जात असलेल्या बिअरच्या ग्लासावर त्याचे दात आपटले. परिणामी त्याच्या शर्टानं बिअरचा घोट घेतला.
मी: "शाब्बास! म्हंजे नोकरी गेली म्हणून तू ट्रिपा काढणार! चलन फुगवटा जास्त झालाय वाटतं?" .. आमच्या भाषेत खिशात जास्त पैसे असण्याला चलन फुगवटा होणे म्हणतात.
मक्या: "छे! छे! उलट चलन दुखवटा आहे. सगळी गुंतवणूक सपाट झालीये.. लाखाचे बारा हजार झाले म्हणतात तसं.. थँक्स टू दिल्या!".
दिल्या: "ए भाऊ! माझा काही दोष नाही हां! संपूर्ण मार्केट झोपलं त्याला मी काय करणार?".. नेमकं दुखर्या भागावर बोट ठेवल्यामुळे दिल्या पिसाळला.
मी: "तरी मी तुला सांगत होतो.. बँकेत पैसे ठेव म्हणून.. पण तुला जास्त हाव सुटली"
सरिता: "त्यापेक्षा तू ४-५ वर्षांपूर्वी दुकान घेऊन मायाला दवाखाना तरी काढून द्यायला पाहीजे होतास. म्हंजे आत्तापर्यंत तिचा चांगला जम बसला असता"
मक्या: "जम कसला बसला असता? धंदा बसला असता. अगं! तिचं एकही औषधं मला लागू पडत नाही, मग इतरांची काय कथा?"
माया: "माझी औषधं फक्त माणसांसाठी असतात". मक्याला घरचा आहेर मिळाला.
दिल्या: "दवाखाना नसता चालला तर अंडी तरी विकायला ठेवता आली असती."
मक्या: "काहीही काय? अंडी काय विकायची? मला नाही कुणाची अंडी पिल्ली बाहेर काढायला आवडत."
दिल्या: "तुला अंडी विकणं एवढं कमीपणाचं वाटत असेल तर एक आयडिया आहे. एक पाटी लावायची - 'येथे अंडी मिळतील'. खालती दुसरी पाटी लावायची - 'अंडी संपली आहेत' आणि खाली पेपर वाचत बसायचं."
कल्पना: "दिलीप, तू असले सल्ले देतोस लोकांना? आणि तरी तुझ्याकडे लोक येतात?" कल्पनाने चिंताग्रस्त चेहर्यानं विचारलं. दिल्याच्या ज्ञानाबद्दल तिच्या मनात अनेक शंकांची जळमटं निर्माण झाल्यासारखं वाटलं.
मक्या: "येतात म्हणण्यापेक्षा यायचे म्हंटलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल"
दिल्या: "अंडी विकण्याचं काही झंझट नाही ना पण! ते फक्त निमित्त! शिवाय प्रॉपर्टीचे भाव काही न करता आपोआप वाढतातच" कल्पनाला परत आपल्या नवर्याबद्दल थोडा आदर वाटायला लागला, पण एकूण परिस्थिती आणि त्यावरील चर्चा तिला अयोग्य वाटत होती.
कल्पना: "इथं त्याची नोकरी गेलीय, त्याची काळजी करायची सोडून तुम्ही त्याची टिंगल करताय. तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे की नाही? उलट्या काळजाचे आहात अगदी!".
मी: "उलट्या काळजाचे असलो तरी आम्हाला काळीज नक्की आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. राहिली नोकरीची बाब.. ती त्याला मिळेलच. आत्तापर्यंत २५ वेळा तरी नोकरी बदलली असेल त्यानं. दर वेळेला विचारलं की वेगळ्याच कंपनीचं नाव सांगायचा तो."
मक्या: "आता रिसेशन मधे कुठली नोकरी मिळणारेय लवकर? शिवाय माझं वयही झालंय जास्त"
दिल्या: "अगं पण आम्ही विनोद करून त्याच्या मनावरचा ताण हलका करायचं बघतोय" दिल्याची सारवासारवी.
मक्या: "माझ्या मनाला फक्त मायाच ताण देऊ शकते". अजून एका टपलीने शर्टाला घोट मिळाला. "आज बिअर माझ्या नशिबात दिसत नाहीये. मगापासून माझ्या घशाची आणि बिअरची गाठभेट काही होत नाहीये".
दिल्या: "मक्या पण तू धीर सोडू नकोस. पॉझिटिव्ह रहा. माझंच बघ ना. धंदा कमी झाला म्हणून मी आता पुस्तक लिहायला घेतलंय".
मी: "हरे राम! मित्राला पडत्या काळात आर्थिक मदत म्हणून ते आम्हाला आता विकत घ्यायला लागणार!"
माया: "अरे वा! नाव काय पुस्तकाचं?"
मी: "शेअरबाजारात कसे पडावे?". योग्य परिणामासाठी मी पडण्याचा अभिनय केला.
दिल्या: "अजून ठरवलं नाहीये. प्रकाशक पण शोधला नाहीये अजून"
मक्या: "मी छापतो तुझं पुस्तक"
मी: "धन्य आहे तुझी! डायरेक्ट रद्दी छापणारा पहिला प्रकाशक म्हणून इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल तुझी"
मक्या: "माझी आयडिया अशी आहे. एक दुकान घेऊन वर पाटी लावायची 'माया प्रकाशन' आणि दिल्याचं पुस्तक विकायला ठेवायचं. पुस्तक फारसं खपणार नाहीच म्हणून दुकानाच्या मागे रद्दीच दुकान उघडायचं.. 'माया रद्दी डेपो'. पुस्तकं खपेनाशी झाली की हळुहळू मागे नेऊन रद्दीत काढायची"
सरिता: "ए! तू त्यापेक्षा कॉलेजात शिकवत का नाहीस? तुला एवढा अनुभव आहे आणि त्यांना चांगले शिक्षक मिळत नाहीत. तेवढंच पोरांच कल्याण होईल"
मक्या: "काय डोंबल शिकवणार? आणि पोरांना कुठं शिकायचं असतं? माझ्या सहकार्याचा अनुभव सांगतो. त्याला शिकवण्याची फार खाज होती म्हणून एका कॉलेजात शिकवायला गेला. एक आठवडा शिकवल्यावर त्यानं एक महत्वाचा होमवर्क दिला. तो केल्याशिवाय पुढंच समजलंच नसतं म्हणून त्यानं वर्गात सांगितलं की होमवर्क केल्याशिवाय पुढंच शिकवणार नाही. एवढं सांगूनही, त्यापुढचे काही आठवडे कुणीच होमवर्क केलं नाही, म्हणून त्यानं शेवटी कॉलेजला रामराम ठोकला, तो कायमचाच"
मी: "दिल्या! बघं. होमवर्क बद्दल कोण बोलतंय? यावर मला मक्याचा किस्सा सांगायलाच पाहीजे. शाळेत असताना आम्हाला एक निबंध लिहून आणायला सांगितला होता. मी आणि दिल्यानं लिहीला होता. मक्यानं नव्हता लिहीला. मास्तरनं प्रत्येकाला आपापला निबंध वाचून दाखवायला सांगितला. मी पहिल्या बाकावर बसायचो आणि मक्या न् दिल्या शेजारी शेजारी, शेवटच्या बाकावर. दिल्याचाच निबंध परत लगेच वाचला असता तर मास्तरला कळलं असतं म्हणून माझा वाचून झाल्यावर मक्यानं माझी वही मागून घेतली मास्तरच्या नकळत. त्याचा नंबर आल्यावर धडाधडा वाचायला सुरुवात केली. मास्तरला काहीच कळलं नाही. पण पोरं फिदीफिदी हसायला लागली म्हणून मास्तरनं 'काय हसताय?' म्हणून विचारलं. कुणीतरी चुगली केली आणि मक्याला फटके बसले"
मक्या: "मी विसरलो होतो. पण बर्याच जणांनी लिहीला होता ना? तेव्हा तुमचे कुठलेही उपाय मला मंजूर नाहीत. मी आता काही दिवस लॉटर्या लावायचा विचार करतोय"
दिल्या: "लॉटरी ही अशी गोष्ट आहे की जी आपण सोडून सगळ्यांना लागते. यावर मला 'काटा रुते कुणाला' चं एक विडंबन माहिती आहे".
पैसा मिळे कुणाला, आक्रंदतात कोणी
मज लॉटरी न लागे, हा दैवयोग आहे
सांगु कशी कुणाला कळ आतल्या जिवाची
चिरदाह चणचणीचा मज शाप हाच आहे
पैसा कमवु पहातो रुजतो अनर्थ तेथे
हे वेड लॉटरीचे विपरीत होत आहे
हा खेळ वंचना की काहीच आकळेना
तिकिटे ही साचवूनि मी रिक्तहस्त आहे
गडगडाटी हास्याने साप्ताहिक सभेची सांगता झाली.

Monday, May 25, 2009
हे बगचि माझे विश्व
मी प्रोग्रॅमर नामक पामराला कोडगा म्हणतो. एकतर तो कुणाच्याही आकलन शक्ती बाहेरचा कोड पाडून स्वतःला आणि दुसर्याला कोड्यात टाकतो म्हणून, आणि ऑफिसात बारक्या सारक्या चुकांवरून बॉसच्या शिव्या खाऊन खाऊन, वेळेवर घरी न गेल्यामुळे घरच्यांची मुक्ताफळं झेलून झेलून, क्लाएंटनं येता जाता केलेला अपमान सहन करून करून तो मनाची एक विशिष्ट अवस्था गाठतो - अर्थात् त्याचा 'कोडगा' होतो.
येता जाता चुका काढणे, सदैव किरकिर करणे, चांगल्या कामाचं चुकूनही कौतुक न करणे, आपल्या चुका दुसर्याच्या माथी मारणे, पगारवाढीच्या काळात हटकून तोंडघशी पाडणे अशी कुठल्याही बॉसची काही ठळक स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. माझा बॉस, वैद्य, याला अपवाद नव्हता. त्याचं वागणं बोलणं चालणं पाहून आणि वैद्य नावाशी मस्त यमक जुळतं म्हणून आम्ही त्याला दैत्य म्हणायचो. आमच्या ग्रुपमधे दहा-बारा कोडगे होते. गुलामांवर नजर ठेवणार्या रोमन मुजोरड्याप्रमाणे तो अधून मधून राऊंडवर यायचा. तो येतोय असं दिसलं की सगळीकडे एकदम शांतता पसरायची. काम करतोय हे ठसवण्यासाठी जिवाच्या आकांताने कीबोर्ड बडवला जायचा. काही धाडसी कोडगे शेवटच्या क्षणापर्यंत मायबोलीवर टीपी करत असत... अगदी शेवटी ऑल्ट-टॅब ने स्क्रीन बदलत असत. पण त्याची घारी सारखी नजर तो सूक्ष्म बदलही पकडायची. कधी कधी एखादा इरसाल कोडगा साळसूद चेहर्याने एखादी निरर्थक शंका विचारून मधेच त्याचा एन्कॉउन्टर करत असे. मग त्याचं उत्तर खोट्या खोट्या गांभिर्यानं ऐकणं, आजुबाजुच्या खसखशी मुळे, त्याला अवघड जात असे.
आमचा ग्रुप बँकांसाठी एक पॅकेज तयार करण्यात गुंतला होता. म्हणजे आम्हीच बराचसा गुंता केला होता आणि आम्हीच त्यात अडकलो होतो. आमचं पॅकेज नीटसं तयार नव्हतं तरीही एका सहकारी बँकेनं त्यांच्या काही ब्रँचमधे वापरायचा, वेड्या महंमदाला शोभेल असा, निर्णय घेतला. पॅकेज नीट चालतंय ना हे पहाण्यासाठी पहिले काही महीने मॅन्युअल सिस्टम आणि आमचं पॅकेज बरोबरीनं (पॅरलल रन) चालवायचं ठरवलं. पॅकेज कधीच त्यांच्या अपेक्षेप्रमाणे चाललं नाही. आमची कंपनी छोटी होती त्यामुळे टेस्टिंग सारखी ऐश आम्हाला परवडायची नाही. घोळ झाला की आम्ही दणादण कोड बदलून बँकेत टाकायचो आणि नवीन घोळ करायचो. हे करता करता माझ्यासकट सर्व कोडग्यांचा स्वतःवरचा विश्वास उडाला. आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या चुका करु शकतो हे स्वतःबद्दलचे कटु सत्य त्यामागे होते. कधी कधी वाटतं की बहिणाबाई आमच्या ग्रुपमध्ये असत्या तर त्यांनी या आधुनिक जगात प्रोग्रॅम दळता दळता अशा काही ओव्या रचल्या असत्या -
अरे प्रोग्रॅम प्रोग्रॅम, झाला कधी म्हणू नये
कागदांच्या ढिगार्याला स्पेक्स कधी म्हणू नये
अरे प्रोग्रॅम प्रोग्रॅम, नुस्ता बगांचा बाजार
बग एक मारताना, नवे जन्मति हजार
ती बँक सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ६ या वेळात सुरु असायची. त्यावेळात हमखास बँकेतून फोन यायचा. तेव्हा काही कोडगे आपण त्या गावचेच नाही असा चेहरा करायचे. पण पोचलेले कोडगे आज काय नवीन घोळ झाला अशी पृच्छा स्थितप्रज्ञ चेहर्याने करायचे. एकदा असाच फोन वाजला आणि दैत्यानं तो घेतला. फोन झाल्यावर धाप धाप पावलं टाकत माझ्याकडे आला. स्वरयंत्राच्या सर्व तारा गंजल्यावरच येऊ शकेल अशा त्याच्या विशिष्ट आवाजात गरजला -
दैत्यः 'चिमण! कोडमधे काय बदल केलास तू?'
मी: 'मी खूप बदल केलेत, त्यातला कुठला?'
दैत्यः 'अकाउंटचं स्टेटमेंट चुकतंय. कुठल्याही अकाउंटचं मागितलं तरी एकाच अकाउंटचं येतंय.'
मी: 'हां! हां! तो! मी नवीन क्वेरी घातलीय'
दैत्यः 'अरे काय हे! तुला कुणी सांगीतलं ती बदलायला?'
मी: 'तुम्हीच म्हणता ना चेंज इज इन्-एव्हिटेबल म्हणून! माझी क्वेरी स्लो आहे म्हणून तुम्हीच बदलायला सांगीतली.' मी विनाकारण त्याला उचकवला.
दैत्यः 'हां! हां! माहीतीये! माहीतीये! मला कोड दाखव तुझा. तू नक्की काहीतरी शेण खाल्लयंस'
माझा कोड पाहिल्यावर हिरोला आपल्या जाळ्यात पकडणार्या व्हिलनसारखा त्याला आनंद झाला. मी त्याची क्वेरी जशीच्या तशी वापरली होती.. त्यानं ती कशी चालते ते दाखविण्यासाठी त्यात एक अकाउंट नंबर घातला होता तो तसाच ठेऊन!
दैत्यः 'बघिटलास! अजिबात डोकं वापरत नाहीस. आहे तस्सं घालून मोकळा'. 'बघिटलास' हा त्याचा आवडता शब्द होता. स्वतःवर खूष असला की वापरायचा तो नेहमी.
मी: 'हम्म! तो कॉपी पेस्ट केल्यावर बदलायचा राहीला.' कॉपी पेस्ट केल्यावर आवश्यक ते बदल न करणं हा माझा ष्ट्यँडर्ड घोळ! त्याचं मूळ परीक्षेत केलेल्या कॉप्यांमधे असावं.
दैत्यः 'आता लगेच बँकेत जाऊन कोड बदल'
मी: 'हो! चहा पिऊन लगेच जातो'
दैत्यः 'आत्ताच्या आत्ता जा! तिथं आग लागलीये अन् तुला चहा सुचतोय. एक दिवस चहा नाही प्यायलास तर मरणार नाहीस तू'.
दैत्याचा फ्यूज उडाला आणि मी आजुबाजुच्या फिसफिशीकडे दुर्लक्ष करत सटकलो. आम्ही जन्माचे हाडवैरी असल्यासारखे हा दैत्य आमच्या अंगावर येतो. पोरींच्या चुका मात्र त्यांच्याशी गोड बोलून सांगतो. पोरी मात्र 'सर! तुमच्यामुळे खूप शिकायला मिळतं मला!' असा गूळ लावून त्याला घोळात घ्यायच्या.
तिकडे जाऊन आवश्यक तो बदल केला. एका ठिकाणच्या अनावश्यक कोडमुळे प्रोग्रॅम विनाकारण स्लो चालेल असं लक्षात आल्यावर जाता जाता अजून एक बदल केला. आपल्याला हे कळलं म्हणून मनातल्या मनात स्वतःची पाठ थोपटली. मग लोकांची स्टेटमेंट नीट यायला लागली आहेत हे पाहून परत गेलो.
दोन दिवसांनी बँकेतून आमच्याच एका कोडग्याचा फोन आला. दबक्या आवाजात त्यानं सांगीतलं की एका तारखेनंतरची कुणाचीच ट्रॅन्झॅक्शन्स दिसत नाहीयेत. ती तारीख मी बदल केलेल्या दिवसाचीच होती. प्रोग्रॅम जोरात पळवायचा उपद्व्याप माझ्याच अंगाशी आला काय? कुणालाही काहीही न सांगता मी बँकेत दाखल झालो.. सगळं नीट बघितलं.. माझ्या बदलाचाच तो प्रताप होता.. जुना कोडच बरोबर होता.. एका टेबलात सगळी ट्रॅन्झॅक्शन्स जायला पाहीजे होती ती गेलीच नव्हती. घाई घाईनं परत जुना कोड टाकला. त्या दिवशी रात्री उशीरा पर्यंत बँकेत बसून सगळं सरळ केलं आणि घरी गेलो.
दैत्याला हे लफडं कुठून तरी कळालंच. दुसर्या दिवशी दैत्यानं कडक शब्दात सगळ्यांसमोर माझी हजेरी घेतली. वरती अजून एक चूक झाली तर नोकरीवरून काढायची धमकी दिली. मी बग गिळून गप्प बसलो. एवढा पाणउतारा झाल्यावर त्यावर दारु हाच एकमेव उतारा होता. संध्याकाळी त्याचा अवलंब केला.
असेच काही महीने गेले. दरम्यान त्याच बँकेच्या सातार्याच्या शाखेचं काम सुरु झालं. एका कोडग्याला तिथलं काम संपेपर्यंत बसविण्यात आलं. तेव्हा एकदा दैत्य दोन कागद नाचवत माझ्याकडे आला नि ओरडला -
दैत्यः 'हे, हे काय आहे?'
मी: 'अकाउंटचं व्याज काढलेलं दिसतंय' मी कागदांकडे पाहीलं मग त्याच्याकडे निर्व्याज चेहर्याने पहात म्हंटलं.
दैत्य: 'बघिटलास! यालाच मी म्हणतो डोकं न वापरणं. ह्या कागदावर एका अकाउंटचं हाताने काढलेलं व्याज आहे. ह्या दुसर्या कागदावर त्याच अकाउंटचं आपल्या प्रोग्रॅममधून काढलेलं व्याज आहे. नीट बघ.' त्यानं दोन्ही कागद आवेशाने माझ्या टेबलावर आपटले.
मी: 'दोन्हीत फरक आहे. कसा काय?'
दैत्यः 'शाब्बास! ते तू मलाच विचार. तू काय काय गोंधळ घातलेत ते मला काय माहीत?'
मी: 'पण मी तर तुम्ही दिलेलंच लॉजिक घातलंय.' बँकेच्या व्यवहाराची माहिती घेण्याचं काम दैत्यानं स्वतःच्या अंगावर घेतलं होतं. अर्थात् त्याला तेवढंच जालीम कारण होतं. पूर्वी एकदा माहिती घ्यायला गेलो असताना 'अकाउंटला क्रेडिट करायचं म्हणजे प्लस करायचं की मायनस?' असा मूलभूत प्रश्न विचारून मी सगळ्यांची दाणादाण उडवली होती. त्यानंतर बँकेनं 'जरा अकाउंटिंग समजणारी माणसं पाठवा' अशी दैत्याची कान उघाडणी केल्यावर त्यानं ते काम कुणालाच द्यायचं धाडस केलं नाही.
दैत्यः 'अरे मी तुला ढीग लॉजिक देईन. बहिर्याला मोबाईल देऊन काही उपयोग आहे का? तसं आहे ते. शेवटी तू त्याची तुझ्या पध्दतीने वाट लावणारच ना? ते काही नाही. आज याचा छडा लावल्या शिवाय घरी जायचं नाही.'
आता थुका लावून सगळं बघण्या शिवाय पर्याय नव्हता. काय करणार? दिवस वाईट होते. नोकरी गेली तर दुसरी मिळण्याची शक्यताच नव्हती. आधीच रिसेशन, तशातही दैत्य कोपला अशी अवस्था! प्रथम मला मी जादुने गायब केलेल्या ट्रॅन्झॅक्शन्सची शंका आली. पण सगळी जागच्या जागी होती. मग मी हाताने व्याज काढलं.. ते प्रोग्रॅमनी काढलेल्या व्याजाशी जुळलं. माझा विश्वासच बसला नाही.. दैत्यानं बोलून बोलून माझं मानसिक खच्चीकरण केल्याचा दुष्परिणाम!.. मी परत एकदा काढलं.. तरी ते जुळलं. चला! तुका म्हणे त्यातल्या त्यात! निदान माझं कोडिंग तरी चुकलं नव्हतं! आता असलाच घोळ तर दैत्याच्या लॉजिकमधेच असणार.
दुसर्या दिवशी मी एक बग कसा सोडवायचा ते एकाला दाखवीत होतो तेवढ्यात दैत्य तिथे आला. त्यानं थोडा वेळ आमचं बोलणं ऐकलं आणि तडक आपल्या खोलीत गेला. थोड्या वेळानं त्यानं मला बोलावलं आणि व्याजाच्या गोंधळाबद्दल विचारलं. मी त्याला माझा कोड कसा बरोबर आहे ते पटवलं. मग आम्ही बॅंकेच्या माणसांशी चर्चा करायला गेलो. सगळं ऐकून घेतल्यावर तिथला एक कारकून म्हणाला 'व्याज काढायची पध्दत बरोबर आहे. आम्ही असंच व्याज काढतो. पण काही काही ग्राहक आम्हाला फार त्रास देतात. त्यांना आम्ही थोडे जास्त व्याज लावतो. तेही कधी चेक करत नाहीत. केलंच तर आम्ही फक्त तेवढंच दुरुस्त करतो'.
परत जाताना दैत्य मला खुशीत येऊन म्हणाला 'बघिटलास! माझं लॉजिक बरोबर होतं'. मला मात्र तो तावडीतून सुटल्याचं दु:ख झालं.
दुसर्या दिवशी ऑफिसात गेल्या गेल्या दैत्यानं मला बोलावून सांगीतलं.
दैत्यः 'आत्ताच्या आत्ता घरी परत जा'. मी हादरलो. कायतरी नवीन घोळ झाला असणार आणि त्यानं मला डच्चू दिला असणार.
मी: 'का? काय झालं?'
दैत्यः 'घरी जा! बॅग भर आणि पहील्या गाडीनं सातार्याला जा.'
मी: 'एवढा मोठा काय प्रॉब्लेम आला?'
दैत्यः 'अरे काल रात्री ३ वाजता सातार्याहून फोन आला. तिथं नवीन अकाउंट ओपन होत नाहीये'
मी: 'असं कसं झालं एकदम? त्यानं काही तरी बदल केला का?'
दैत्यः 'हो. मी त्याला एक बदल करायला सांगीतला.'
मी: 'कुठला?'
दैत्यः 'तो तू काल सांगत होतास ना.. एका बग बद्दल.. तो.'
मी: 'काय काय बदल सांगीतला?'. त्यावर दैत्यानं मला सविस्तर सगळं सांगीतलं. ते ऐकल्यावर त्यानं अर्धवटच बदल करायला सांगीतल्याचं मला समजलं. मग मी त्याला उरलेला बदल सांगीतला. त्यानं सातार्याला फोन करून लगेच तसा बदल करायला सांगीतला. त्यानंतर खाती व्यवस्थित उघडायला लागली. मला कृतकृत्य झालं. मी त्याला 'बघिटलास!' असं म्हणणारच होतो पण बॉस इज ऑलवेज राईट म्हणून सोडून दिलं.

Subscribe to:
Posts (Atom)