Posts

वाघोभरारी

'संकेत! इकडे ये! हे हीन अभिरुचीचे फोटो उद्या पर्यंत निघाले नाहीत तर मी स्वतः ते काढून जाळून टाकेन!'.. संध्याकाळी घरी आलेल्या शहाणे मास्तरांनी विलायती कपड्यांची होळी करणार्‍यांच्या आवेषात ठणकावलं. त्यांचा आवाज होताच तसा.. ठणठणीत! त्यांनी वाहतुकीच्या गोंगाटाच्या वरताण सूर लावला की प्रत्येक पोराला ते आपल्याच कानात ओरडताहेत असं वाटायचं! 'हीन अभिरुची काय बाबा? ते सही फोटो आहेत बरं का! एकदम फट्टाक! तुम्हाला नाही समजायचं त्यातलं! सारखी उगीच नावं ठेवता तुम्ही!'.. हा डायलॉग ऐकल्यावर लव-कुशांनी खुद्द वाल्मिकींना रामायण शिकवल्यासारखं मास्तरांना वाटलं. 'तू ही... ही जी अर्ध्या मुर्ध्या कपड्यातल्या बायकांची चित्रं लावली आहेत ना?.. त्याला हीन अभिरुची म्हणतात.. देहाचं हिडिस प्रदर्शन म्हणतात.. सौंदर्याची जाण नाही! कोणीतरी मूर्ख ढुढ्ढाचार्य उठतो.. नग्ननेत सौंदर्य आहे म्हणतो.. झापडं काढून बघायला हवं म्हणतो.. मग तुझ्यासारखे अर्धशिक्षित अपरिपक्व बाजीराव ओढतात त्याची री! त्यापेक्षा जरा स्वतःकडे झापडं काढून बघा! गलिच्छपणाची किळसवाणी जाणीव होईल'.. मास्तर हात नाचवत परत एकदा ठणठणले...

एक खगोलशास्त्रीय दुर्मिळ घटना!

Image
(टीप - या लेखाचा सहलेखक मायबोली वरील खगोलशास्त्रज्ञ आशिष (आश्चिग) आहे. त्यामुळे काही प्रश्न असल्यास त्याला विचारा.) वेगवेगळ्या व्यवसायात वेगवेगळे धोके असतात. खगोलशास्त्राचा धोका उल्कापाताने मरण्याचा नसतो (उल्कापाताने कोणीही मेले असल्याची नोंद नाही), अघटीत गोष्टींच्या (म्हणजेच अ-घडु शकणाऱ्या गोष्टींच्या) इ-मेल उत्पाताचा असतो. 'पळा-पळा, सारे ग्रह रांगेत उभे आहेत', 'पहा-पहा, एका महीन्यात पाच-पाच शूक्रवार, शनिवार, सूर्यवार' वगैरे. त्यामुळे खऱ्याखुऱ्या (आणि) दुर्मीळ गोष्टींकडे मात्र सपशेल दुर्लक्ष होते. अशीच एक अति-दुर्मीळ आणि खगोलशास्त्राकरता ऐतिहासीक महत्व असलेली घटना येत्या ५-६ जूनला होऊ घातली आहे. तुमच्या-आमच्याच नाही, तर सध्या हयात असलेल्या सर्वांकरताच पृथ्वीवरून शुक्राची ही सुर्याबरोबर होणारी युती पहायचा शेवटचा योग आहे. चंद्रांचे पृथ्वीभोवती फिरण्याचे आणि पृथ्वीचे सूर्याभोवती फिरण्याचे प्रतल एक नसल्याने दर महिन्याला युती होत नाही. त्याचप्रमाणे शुक्राची कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या पातळीशी करत असलेल्या ३.४ अंशांच्या कोनामुळे शुक्र, पृथ्वी आणि सूर्य जरी जवळ जवळ एका र...

नव्हे नव्हे ते तत्वचि वेगळे!

Image
असं कधी तुमच्या आयुष्यात घडलं आहे का?... दिवस रात्र खपून, घाम गाळून बनवलेल्या व तळहाताच्या फोडासारखा जपलेल्या आणि सर्व चाचण्यातून पार पडलेल्या तुमच्या प्रोग्रॅमचा आज दाखवण्याचा कार्यक्रम आहे. क्लायंटची माणसं मुलीला चालून दाखवायला सांगत आहेत.. माफ करा.. उत्सुकतेने प्रोग्रॅमची वैशिष्ट्ये पहात आहेत, तुमच्या ऑफिसची मंडळी त्यांच्या चेहर्‍यांवरचे हावभाव टिपत आहेत. तुम्ही डेमो देत उभे आहात. स्वतःचं टेन्शन घालवायला, तुम्ही मधे मधे फालतू विनोद करताय, त्याला लोक फिसफिसून दाद देताहेत. तुम्हाला कृतकृत्य होतंय. तुमच्या कर्तृत्वाचा आलेख जिराफासारखा उंच उंच जाताना दिसतोय. ........ आणि......... ठॅप!! तुम्ही उत्साहाने दाखवत असलेलं काहीतरी झोपतं.. एक अपरिचित बग डेमो खातो. तुम्ही अगतिकपणे खाटखूट करता, इतर लोकही काहीतरी प्रयत्न केल्याचं दाखवतात पण तुमच्या लाडक्याने डोळे पांढरे केलेले असतात. तुमचा चेहरा पहिल्यांदाच मुंबईच्या लोकलच्या गर्दीत सापडल्या सारखा कावरा बावरा होतो.. बेडकासारखी बुबुळं बाहेर येतात.. तुमच्या ऑफिसातल्या हितचिंतकांना(?) त्याचा मनातून आनंद झालेला असतो. मघाशी तुमच्या विनोदांना हसणार...

अचानक सापडलेला संगीतकार..

Image
टिव्हीवर लागलेला क्लिंट ईस्टवूड आणि शर्ले मॅक्लेनचा 'टू म्युल्स फॉर सिस्टर सेरा' पहात असताना माझं लक्ष एका गोष्टीनं वेधून घेतलं. शर्लेनं नाही हो.. त्यातल्या टायटल म्युझिकनं! सुरवातीला एक क्लॅरनेट किंवा फ्लूट एक शांत धुन वाजवून थोडंस गूढ वातावरण निर्माण करतं. मग एक तंतुवाद्य साधी सरळ सोप्पी सुरावट चालू करतं.. कापूस पिंजताना जसे आवाज होतात साधारणपणे तसे सूर ऐकू येतात.. हाच त्या पूर्ण संगीताचा पाया! मग इतर चित्रविचित्र आवाज करणारी वाद्य हजेरी लावतात. तंतुवाद्याच्या पार्श्वभूमीवर परत क्लॅरनेट किंवा फ्लूट आणखी सुंदर सुरावटी फेकतं आणि एक अवीट गोडीचं, परत परत ऐकावसं वाटणारं असाधारण संगीत ऐकायला मिळतं! ते इथे ऐका ते ऐकल्यावर माझं पूर्ण पिक्चर मधलं लक्ष उडालं. परत तेच म्युझिक कधी येतंय त्याचीच वाट आतुरतेने माझे कान बघत राहीले. नशीबाने ते म्युझिक पिक्चर भर अधून मधून ऐकायला मिळालं. खर तर मला संगीतातलं खालच्या 'सा' पासून वरच्या 'सा' पर्यंतच काहीही कळत नाही. संगीतातली माझी गती 'सा'धारणच! मला हिमेश रेशमिया पासून कुमार गंधर्वांपर्यंत सगळे सारखेच! संगीतात कुणी ...

वैद्यकीय चाचणीचा बकरा

'तुला मधुमेह झाला आहे' असं डॉक्टरनं वरकरणी चिंताक्रांत चेहरा करून मला सांगितलं तेव्हा मी त्याच्या समोर खुर्चीत बसलो होतो. किंवा डॉक्टर माझ्या समोरच्या खुर्चीत बसला होता असं म्हंटलं तरी ते वावगं ठरणार नाही. तेव्हा मधुमेहासारखा उच्चभ्रूंची मक्तेदारी असलेला रोग झाल्याबद्दल मला सूक्ष्म अभिमान वाटला होता.. कुणाला कशाचा अभिमान वाटेल काही सांगता येत नाही.. पूर्वी पुलंनी हिंदुजा हॉस्पिटल मधे असताना 'गर्वसे कहो हम हिंदुजामें हैं!' असं म्हंटलं होतं म्हणे! 'साखरेचं खाणार त्याला देव देणार' हे लहानपणापासून खूप वेळा ऐकलं होतं पण देव नक्की काय देणार ते ज्ञान डॉक्टरच्या समोरच्या खुर्चीत मिळालं.. बुद्धाला बोधीवृक्षाखाली मिळालं होतं, मला खुर्चीवर मिळालं इतकाच काय तो फरक! पण म्हणून मला मिळालेलं ज्ञान कमअस्सल नव्हतं. सगळ्याच नव्या आणि ताज्या गोष्टींप्रमाणे मधुमेहाचं देखील सुरुवातीला मला अप्रूप आणि कौतुक होतं.. आणि रोजचा बराचसा वेळ त्याबद्दल उलटसुलट वाचण्यात व ऐकण्यात जायचा.. मधुमेहींनी 'मधु मागसी माझ्या सख्या परि मधु घटचि रिकामे' सारखी गाणी गुणगुणायची नसतात हे ही तेव्हा...

दुसरे महायुद्ध : ऑपरेशन मिंसमीट

मधे बीबीसी वर दुसर्‍या महायुद्धातल्या ऑपरेशन मिंसमीटबद्दल एक अफलातून माहितीपट दाखविला. ऑपरेशन मिंसमीट हे जर्मन सैन्याला गंडविण्यासाठी ब्रिटिशांनी रचलेल्या एका सापळ्याचं नाव होतं.. ती एक अफलातून गंडवागंडवी होती ज्यामुळे हजारो प्राण पुढे वाचले. त्या माहितीपटात ऐकलेली आणि विकीपीडिया सारख्या सायटींवरून उचलेली ही माहिती आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश हेर खात्यातल्या काही सुपिक टाळक्यांनी व्यवस्थित नियोजन करून एक भेदी पुडी सोडली. ती इतकी बेमालूम होती की तिच्या वावटळीत खुद्द हिटलर गुंडाळला गेला. आणि सर्वात विशेष म्हणजे त्या पुडीचा नायक होता एक मृत देह.. एक प्रेत! (१). १९४२ च्या शेवटी शेवटी दोस्त राष्ट्रांनी उघडलेली मोरोक्को, अल्जिरिया, पोर्तुगाल व ट्युनिशिया येथील आघाडी यशस्वी होऊ घातली होती. युद्धाची पुढील पायरी म्हणून भूमध्य समुद्राच्या उत्तर भागात मुसंडी मारायचा विचार चालू होता. उत्तर आफ्रिकेतून एक तर इटलीतून किंवा ग्रीसमधून हल्ला चढविला तर पलिकडून येणार्‍या रशियाच्या सैन्यामुळे जर्मन कोंडित सापडणं शक्य होतं. त्यात पण सिसिलीचा (इटली) ताबा मिळविला तर दोस्तांच्या नौदलाला भूमध्...

गोट्याची शाळा

गोट्याचा शाळेतला प्रवेश त्याच्या या जगातल्या प्रवेशापेक्षा क्लेशकारक निघाला. सुरुवातच मुळी कुठल्या माध्यमातल्या शाळेत घालायचं इथून झाली.. मराठी की इंग्रजी? माझ्या वेळेला इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्या तरी तिथे मराठी मुलांना घेत नाहीत असा समज असावा. त्यामुळे, 'कुठलं माध्यम?' सारखे कूट प्रश्न कुणालाही पडले नाहीत. पूर्वी मी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना सरसकट कॉन्व्हेन्ट स्कूल म्हणायचो.. कॉन्व्हेन्ट स्कूल म्हणजे मुलींची शाळा असते असं ज्ञानमौक्तिक माझ्या अकलेचं मंथन करून एकाने काढल्यावर मी कॉन्व्हेन्टला सुद्धा इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणू लागलो. कोंबडा झाकला तरी सूर्य उगवायचा रहात नाही तसं माझं इंग्रजीचं अज्ञान कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी प्रतिष्ठेची लक्तरं उधळल्याशिवाय रहात नाहीत ती अशी! त्यामुळेच, गोट्याला इंग्रजी शाळेत घालायचा मी गंभीरपणे विचार करत होतो.. म्हणजे मला मराठीचा अभिमान आहे, नाही असं नाही. मराठीचा अभिमान वाटण्याचं मुख्य कारण ती एकमेव भाषा लिहीताना व बोलताना मला अगदी घरात वावरल्यासारखं वाटतं हे असावं! कुठलाही न्यूनगंड नाही की टेन्शन! या उलट इंग्रजीचं! समोर कुणी ...