Thursday, October 24, 2019

प्रेमा तुझा गंज कसा?

'हॅलो! कोण बोलतंय?'.. राजेशनं आवाज बदलून बबिताचा फोन घेतला.
'हॅलो! मी बबिता बोलतेय! राजेशला फोन द्या जरा!'
'सॉरी मॅडम! पण राजेश सर प्रचंड कामात आहेत. काही मेसेज आहे का? ते नंतर फोन करतील'.. बबिताला राजेशकडच्या या नवीन असिस्टंटने थोडं संभ्रमात टाकलं खरं पण लगेचच तिची पेटली.
'राजेsssssश! यू ब्लडी प्रिक! हौ कुड यू?'
'हाsssssय बब्बड!' .. राजेशनं आवाजात खोटं खोटं मार्दव आणलं. 
'अरे हाय काय म्हणतोस? स्टुपिड!!'.. बबिताचा चढलेला सूर राजेशला अपेक्षितच होता.
'हाय नाहीतर काय बाय म्हणू?'.. विनोद करून ताण सैल करायच्या प्रयत्नाला यश मिळालं नाही.
'तू माझ्या पेंटिंगच्या एक्झिबिशनला यायचं प्रॉमिस केलं होतंस! मी सकाळी तुला रिमाईंड केलं होतं. तरिही यू लेट मी डाउन! का? का?'.. बबिता सात्विक संतापाने बोलत होती त्यात तिला मागून एका बाईचा आवाज ऐकू आला व ती दचकली.  म्हणजे तिला मिळालेले रिपोर्ट खरे होते तर!
'आयॅम सॉरी गं बब्बड! पण मला प्रचंड काम आहे इथे! अक्षरशः चहा घ्यायला पण वेळ नाही गं! आणि मला कुठं काय कळतंय त्यातलं?'.. राजेश काकुळतिच्या सुरात म्हणाला.
'मग तू मला तुझ्या कविता का पाठवतोस मला समजत नाहीत तरी? शेम ऑन यू! सेल्फ सेंटर्ड हिपोक्रिट! सगळं मी, माझं, माझ्यासाठी! बाकीचे सगळे लाईक डर्ट!'
'अगं खरंच काही कळत नाही! मागच्या वेळेस तू काढलेलं ते चित्र मला अजून आठवतंय.. दोन चौकोन, त्यांच्या मधून जाणार्‍या दोन आडव्या आणि चार उभ्या रेघा! इकडे तिकडे वर्तुळं आणि चित्रविचित्र शेप! याचा काय अर्थ लावणार, सांग ना?'
'अरे ते पेंटिंग बघून मनात ज्या फिलिंग येतात तो त्याचा अर्थ! मागे पण सांगितलंय तुला मी हे!'
'मला तसली चित्रं बघितल्यावर फाडून फेकून द्यायचं फिलिंग येतं!'.. राजेश चुकून खरं ते बकला.
'......यू आर सोssss मीन! खूप इन्सल्ट ऐकून घेतले मी!'
'ओह! सॉरी बब्बड मला अगदी तसं म्हणायचं नव्हतं हं!'
'दॅट्स इनफ! डोंट ट्राय टॉकिंग टु मी! एव्हर! लूझर!!'.. फोन कट झाला.

------***-----------***---------

'हो! हो! उद्या काही स्टंटचं शूटिंग आहे तर मग ये उद्या. तिथे बोलू पुढच्या प्रोजेक्टबद्दल. ओके?'.. नमिता फोनवर कुणाशी तरी बोलत असताना तिला बबिता आलेली दिसली. तिला हातानेच बसण्याची खूण करत तिनं बोलणं चालू ठेवलं.
'......'
'उद्या सकाळी 8 वाजता. आणि हे बघ! डोंट बी लेट हं मागच्यासारखा, ओके?'
'काय कशी आहेस तू बबडे?'.. मोबाईल ठेवून हसत नमितानं विचारलं.
'डोंट स्माईल हं नमडे! आयॅम मॅड अ‍ॅट यू!'
'का?'.. नमिता गंभीर झाली.
'अगं का काय, का? तू येणार होतीस एक्झिबिशनला!'
'येस! येस! माझ्या पर्फेक्ट लक्षात होतं पण राजेश केम विथ मूव्ही टिकिट्स अगदी 11थ अवर, युनो?'
'व्हॉट? राजेश आणि तू? ओ माय गॉड! नो वंडर!'.. बबितानं डोकं गच्च पकडलं.
'हो, मी आणि राजेश! आणखी कुणा बरोबर जाणार मी?'.. नमिताचं निरागस स्पष्टीकरण ऐकून बबिताचा संयम सुटला.
'म्हणजे? संदीपचं काय झालं?'..
'ओ! तो! मी डंप केलं त्याला हेहेहे!'
'व्हॉट? व्हाय?'
'एक नंबर कॉवर्ड गं तो! बॉडी चांगली मस्त, सिक्सपॅक एन ऑल पण फुल्टू कॉवर्ड. युनो?'
'ए! पण हाऊ डिड युनो?'
'हा हा हा हा! अगं मी ड्रामा केला, युनो! माझ्या एका स्टंटमनलाच माझी पर्स चोरायला सांगितलं. आणि युनो संदीप? गॉट शिट स्केअर्ड! हाहाहा! संदीप स्टॅमर करायला लागला, युनो? हाहाहा! सो फनी! समहाऊ त्याला 'ए! ए! ए! क् क् क्या कर रहा है बे?' म्हणाला तर त्यानं सुरा दाखवला. ओमायगॉड! सो फनी! मी हसणं दाबत होते, युनो, ट्राईंग टु लुक स्केअर्ड एन ऑल! पण सुरा बघितल्यावर संदीप जे घाबरून पळत सुटला ते बघून आय जस्ट कोलॅप्स्ड लाफिंग! हा हा हा हा! तेव्हा राजेश तिथे आला आणि त्यानं त्याच्याशी थोडी मारामारी तरी केली. पर्स घेऊन ही रॅन अवे पण ती मला परत मिळणार होतीच. बट राजेश शोड करेज!'..
'नमे! तू माझा बॉयफ्रेंड स्टील केल्याचं मलाच सांगते आहेस, किती शेमलेस गं तू? आपण दोघी फ्रेंड्स आहोत.. लाईक फॉर एजेस!! तरी पण तू डिच केलंस मला आणि हर्ट केलंस!!!!'.. बबितानं वैतागून टेबलवर डोकं आपटलं.
'ऑ! तुझा बॉयफ्रेंड? ओssss येस, तो पण राजेशंच आहे नाही का! हॅ! हॅ! तो नाही! अगदीच सिसी गं तो! अंधारात एकटा जायला टरकतो तो! ए, सॉरी हं कंफ्युजन बद्दल! माझा राजेश चांगला 6 फुटी उंच आणि एकदम शेपमधे आहे.'
'थँक गॉड! आयॅम सो रिलिव्हड!'
'ए! तुला खरंच वाटलं?'
'अगं मला ना राजेशबद्दल खूप डाउट्स आहेत सध्या! तो चेंज झालाय, युनो? सारखा बिझी आहे म्हणतो, मला अव्हॉइड करतो. काल एक्झिबिशनला पण आला नाही प्रॉमिस करून सुद्धा! मेबी हि इज सिइंग समवन! काय करावं कळत नाहीये गं मला!'.. बबिता अगतिक झाली.
'डंप हिम!'
'डंप हिम? जस्ट लाईक दॅट? नाही गं, तसा चांगला आहे तो! काय मस्त डोळे आहेत त्याचे. व्हेरी एक्सप्रेसिव्ह!'
'तुला रिअली रिअली वाटतंय का की हि इज सिइंग समवन?'
'हो! त्याला फोन केला ना की कधी कधी मागून गर्ली व्हॉईस ऐकू येतो, युनो? माझ्या काही फ्रेंड्सनी पण कन्फर्म केलं तसं!'
'बबडे! माझ्या एखाद्या स्टंटमनला सोडू का त्याच्यावर? सुरा दाखवून खरी खरी माहिती काढून आणेल तो!'
'ओ! नो! नो! नो! तुला राजेश माहिती नाही. त्याच्या घरात ना, खूप हिड्न कॅमेरे आहेत. त्यातलं रेकॉर्डिंग पोलिसांकडे गेलं तर यू वुड बी लाईक प्रिझनमधे'
'मग काय करणारेस तू?'
'काय करावं? डोंट नो! ट्रुथ समजण्यासाठी मी त्याच्या बेडमधला ढेकूण पण व्हायला तयार आहे बघ!' 
'हिड्न कॅमेरा? मायक्रोफोन?'
'त्याला ते ठेवताना कळेल गं! काहीतरी असं पाहिजे की तो सस्पेक्ट नाही करणार, युनो.'
'हम्म्म्म्म! एखादी सेक्रेटरी पाठवली त्याच्याकडे तर?'
'पण अगं तो आहे फार फिनिकी. जराशी मिस्टेक झाली ना तरीही तो तिचं लाईफ मिझरेबल करेल.'
'हाँ! आयडिया! आपण एक ह्युमन लाईक रोबॉट पाठवू या का?'
'नमडेsss! पर्फेक्ट! तो पक्का टेक्नोक्रॅट आहे. त्याला आवडेल एखादा रोबॉट! पण तो मिळेल कुठे?'
'अगं! संदीपची कंपनी बनवते रोबॉट! त्याला हवेच असतात गिनिपिग्ज! मी बोलते त्याच्याशी! तू राजेशला पटव, ओके?'
'पण तू त्याला डंपलायस ना? तो का हेल्प करेल आपल्याला?'
'अगं त्याला अजून होप्स आहेत हा हा हा!'
ओके! मी बोलते राजेशची!'

------***-----------***---------

'डिलिव्हरी साहेब! इथे सही करा.'.. दारातल्या डिलिव्हरी मॅनने पुढे केलेल्या कागदावर न बघता राजेशनं सही केली. त्यानं सुमारे तीन फुटी बाहुली हातात देताच, राजेश चमनचिडीसारखा उडाला आणि वैतागून म्हणाला.. 'हे काय?'
'तुमची डिलिव्हरी साहेब!'.. त्यानं पुढे केलेल्या डिलिव्हरी चलानकडे राजेशनं डोळे फाडफाडून बघितलं. त्यावर त्याचंच नाव आणि पत्ता होता.
'हे कसं शक्य आहे? असली बाहुली मी ऑर्डर करेन असं वाटतं का तुला?'
'साहेब! ते मी कसं सांगणार? कुणाचं काय तर कुणाचं काय!'.. तो डोळे मिचकावत मिष्किलपणे म्हणाला. राजेशनं तणतणत दार आपटलं व लगेच रहस्यभेद करायला बसला. अ‍ॅमेझॉन वर त्याच्याच अकाउंट मधे ८ दिवसांपुर्वी सकाळी ६:१७ वाजता तीन फुटी रॅपुंझेल बाहुलीची ऑर्डर सोडल्याचं तर दिसत होतं. 'सकाळी ६:१७? कसं शक्य आहे? आपण तर उठतच नाही इतक्या पहाटे! ऑर्डर दिली कुणी.. आयलाssss! अकाउंट हॅक झालं की काय?'... राजेशसारख्या डेटा सिक्युरिटी संबंधीची कामं घेणार्‍या व्यावसायिकाला स्वतःचं अकाउंट हॅक होणं हे पोलिसाला त्याचं पाकीट मारलं जाण्याइतकं लांच्छनास्पद होतं. राजेश डोकं टेबलावर आपटायला जातोय न जातोय तोच त्याचं लक्ष पेपरातल्या फोटोकडे गेलं. तो त्याच बाहुलीचा होता. कुतुहल जागृत होऊन त्यानं ती बातमी वाचली आणि त्याला जे समजलं ते विलक्षण होतं. याच बाहुलीच्या खूप ऑर्डरी अ‍ॅमेझॉनला आल्या होत्या. कारण एक छोटी मुलगी! ती अलेक्सा बरोबर गप्पा मारता मारता म्हणाली.. 'अलेक्सा, मला तीन फुटी रॅपुंझेल आण'. अलेक्सानं तत्काळ अ‍ॅमेझॉनला ऑर्डर सोडली. डिलीव्हरी आल्यावर तिच्या आईला नक्की काय भानगड झालीये ते समजलं. मग ही हकीकत एका बातमीदाराने टीव्हीवर सकाळी ६ च्या बातम्यांमधे 'अलेक्सा, मला तीन फुटी रॅपुंझेल आण' या वाक्यासकट सांगितली. त्यामुळे ज्या ज्या घरांमधे ते चॅनल चालू होतं त्या त्या घरातल्या अलेक्सांनी पण भराभर तीच ऑर्डर सोडली. आपल्या अलेक्साला कुठून झटका आला ते रहस्य उलगडल्यावर भडकलेला राजेश स्वत:शीच हसला आणि फ्रीज मधल्या बर्फाइतका थंड झाला. ती बाहुली अ‍ॅमेझॉनला परत करण्यासाठी तो फोन लावणारच होता पण तेव्हढ्यात त्याला ती वैतागलेल्या बबिताला देऊन तिला शांत करायची कल्पना सुचून त्याचा चेहरा खुलला. बबिता राजेशची पाचवी गर्लफ्रेन्ड! गर्लफ्रेन्ड टिकवणं तर लग्नाची बायको टिकविण्यापेक्षा कठीण!! आता ही अनायासे मिळालेली बाहुली तिला भेट देऊन तह करण्याची चालून आलेली चांगली संधी राजेश कसा सोडणार? तडकाफडकी राजेशनं अ‍ॅमेझॉन मधली क्रेडिट कार्डची माहिती काढून टाकली आणि गुरकावला.. 'अ‍लेक्सा!'

'हेलो राजेश!'... आपण काही गोंधळ केला आहे किंवा काय हे अर्थातच तिच्या गावी पण नव्हतं. तिचं गाव कुठलं हाही एक मूलभूत प्रश्न आहे म्हणा!
'तुला काहीही अक्कल नाही. तू काय गोंधळ केलाहेस ते समजलंय का तुला?'
'सॉरी! तू काय बोलतो आहेस ते मला समजलं नाही.'
'जाऊ दे! तुझी पर्चेसिंग पॉवर मी काढून घेतली आहे. आता तुझ्यापेक्षा सिरीला जास्त कामं सांगणार आहे मी!'
अलेक्सा काहीच बोलली नाही पण राजेशला ती 'त्या सिरीला? म्हणजे माझ्या सवतीला?' असं काहीतरी असुयेनं म्हंटल्याचा भास झाला. त्यानं तिकडे दुर्लक्ष केलं कारण बबिताला आणखी न भडकवता जेवणाचं आमत्रण कसं द्यावं ही मोठी विवंचना होती त्याच्यापुढे! फोन करण्याचं धाडस नसल्यामुळे त्यानं सिरीला तिला इमेल करायला सांगितलं.

------***-----------***---------

'राजेश, तुला एक इमेल आली आहे'... आयपॅड निद्रिस्त सिरी जागी झाली.
'हम्म! कुणाची आहे?'.. राजेश तंद्रीत म्हणाला.
'दादाभाई दुधबाटलीवाला फ्रॉम हॉट स्कॅन सिक्युरिटी सर्व्हिसेस!'
'च्यायला! त्याला काय धाड भरलीये आत्ता? चांगला झोपलो होतो.'... रात्रीच्या जागरणामुळे राजेश पेंगुळलेल्या आवाजात म्हणाला.
'माफ कर! मला तू काय म्हणतो आहेस ते समजलं नाही!'.. सिरीचा थंड प्रतिसाद.
'कंप्लीट अंधार आहे तुझा सिरी! मेल वाचून दाखव बरं!'
'हे तू काय म्हणतोयस राजेश? तुझं डोकं ठिकाणावर आहे का?'
'हाऊ डेअर यू से दॅट, सिरी?'.. राजेश डोळे वटारून आयपॅडकडे पहात ओरडला.
'माफ कर! मला तू काय म्हणतो आहेस ते समजलं नाही!'.. सिरीचा परत एक थंड प्रतिसाद.
'सिरी, तू काय म्हणालीस?'
'माफ कर! मला तू काय म्हणतो आहेस ते समजलं नाही!'.. सिरीचा परत एक थंड आवाज! कधीच चढ्या स्वरात न बोलणारा आवाज स्त्रीचा कसा असू शकतो?
'काय थंड आहेस गं तू? डोकं फ्रिज मधे ठेवलेलं असतं काय सारखं? त्याच्या आधीssss काय म्हणालीस ते सांग!'
'मी ती इमेल वाचून दाखवली. परत वाचू?'.. सिरीचा तोच भावनाशून्य स्वर!
'नक्कोssss! मी त्याला नक्की काय इमेल पाठविली होती, ती वाच!'.. राजेश डोकं गच्च धरून ओरडला.

अचानक सुरू झालेल्या घुंईsssssss आवाजामुळे सिरी काय म्हणाली ते त्याला समजलं नाही. त्यानं वैतागून आवाजाकडे बघितलं तर त्याचा झाडू मारणारा रोबॉट जागा झाला होता. राजेश एक नंबरचा टेक्नोक्रॅट माणूस! मित्रांमधे टेक्नोक्रॅक म्हणून प्रसिद्ध होता! नवीन आयफोन लाँच व्हायच्या आदल्या दिवसापासून तासनतास रांगेत उभं रहाणार्‍या अनेक येड्यांपैकी हा पण एक! सगळ्या अत्याधुनिक हायटेक गोष्टींचा संग्रह करणे, त्याबद्दल वाचणे आणि त्यावर बढाया मारण्याची फार हौस होती त्याला! एकदा तर ड्रायव्हरलेस कार पण ट्रायलसाठी आणली होती त्यानं! पण सर्व लॉजिकला व नियमांना फाटा देऊन चालणार्‍या भारतातल्या ट्रॅफिक पुढे ती अगतिक होईल हे त्याच्या लक्षात नाही आलं. पहिल्यांदा बाहेर काढल्यावर पहिल्याच चौकात सर्व बाजूंनी येणार्‍या वाहनांमुळे ती जी थिजली ती त्याला स्वतःलाच घरी चालवत आणायला लागली.. हजार वेगवेगळ्या वॉर्निंगा ऐकत.
'हा आत्ता कसा सुरू झाला? त्याला बंद कर बरं आधी!'.. राजेशनं सिरीला फर्मान सोडलं.
'ओके राजेश, शटिंग डाउन झाडू रोबॉट! तो दुपारी २ वाजता काम सुरू करतो.'
'कुणी ठरवली मला न विचारता? सकाळी ८ ची असायला पाहीजे.'
'तू काल दुपारी २ ठरवलीस'
'मी? शक्यच नाही. मला दुपारी त्याची कटकट नको असते. काल धूळ फार वाटली म्हणून त्याला झाडायला सांग असं सांगितलं मी तुला'
'हो, पण त्या नंतर मी तुला विचारलं हीच वेळ रोजच्या सफाईची ठेवू का, तर त्याला तू हो म्हणालास.' .. पुराव्या दाखल सिरीनं कालचं संभाषण ऐकवलं.
'हायला! तू हे सगळं रेकॉर्ड करून कुठे ठेवतेस?'.. आपल्या मेंदू मधे बॅड सेक्टर निर्माण होऊन इतका मेमरी लॉस झालाय हे पाहून राजेश चपापला.
'क्लाऊड मधे'
'ओ माय गॉड! मग तो क्लॉऊड विरघळला की माझ्या डेटाच्या धारा लागतील ना गांवभर!'
'घाबरू नकोस! सगळा डेटा एन्क्रिप्टेड आहे.'
'बरं! बरं! एन्क्रिप्शनचं कौतुक मला नको सांगूस! मी तेव्हा चुकून हो म्हणालो होतो. आता परत सकाळी ८ ची वेळ करून टाक.'
'ओके राजेश, झाडू रोबॉट सेट फॉर ८ ए एम!'
'हां! आता ती नवीन इमेल वाच.'
'देअर आर नो न्यु इमेल्स!'
'कंप्लीट अंधार आहे तुझा सिरी! ती मघाचीच मेल परत वाचून दाखव बरं!'
'हे तू काय म्हणतोयस राजेश? तुझं डोकं ठिकाणावर आहे का?'
'ती नाही, हरे राम! दादाभाईला मी काय इमेल पाठविली होती ती!'
'हेल्लो बब्बू! या रविवारी लंच टाईमला फ्री आहेस का?'
'बोंबला! बबिताची इमेल चुकून दादाभाईला गेली वाट्टं! श्याssss!'..गर्लफ्रेंडशी भांडण झालं की पीसीमधे व्हायरस शिरल्यासारखी राजेशची अवस्था होते. कामात मुळीच लक्ष लागत नाही. भलत्याच फायली उडवणे, एकाची इमेल भलत्यालाच पाठवणे, महत्वाची कागदपत्रं हरवणे, कामात अनंत चुका करणे इ. इ. अनेक नसतीअरिष्टं तो निर्माण करून ठेवतो. पण पीसीला जसं व्हायरसाचं गांभीर्य समजत नाही तसंच राजेशचं होतं.
'सिरी, ती इमेल तुला चुकून पाठवली गेली अशी दादाभाईला एक इमेल पाठव!'
'ओके राजेश! डन!'
'आणि हेल्लो बब्बू! या रविवारी लंच टाईमला फ्री आहेस का? ही इमेल बबिताला परत पाठव'
'ओके राजेश! डन!'
------***-----------***---------

'राजेश, तुला एक इमेल आली आहे'... सिरी रेकॉर्ड केलेल्या रेल्वेच्या निवेदना सारख्या थंड एकसुरी आवाजात बरळली.
'अरे वा! बब्बूची असेल. वाच वाच'.. राजेश प्रफुल्लित झाला.
'हे तू काय म्हणतोयस राजेश? तुझं डोकं ठिकाणावर आहे का?'
'आँ! असं बब्बू म्हणाली?'
'नाही. दादाभाई दुधबाटलीवाला फ्रॉम हॉट स्कॅन सिक्युरिटी सर्व्हिसेस!'
'च्यामारी! परत तोच? आता काय झालं त्याला? मघाशी तू त्याला सॉरीची इमेल पाठवलीस ना?'.. राजेशला कसलीच टोटल लागेना.
'हो!'
'मग त्यावर त्याचं परत हेच उत्तर?'
'नाही.'
'मग माझ्या कुठल्या इमेलचं हे उत्तर आहे?'
'हेल्लो बब्बू! या रविवारी लंच टाईमला फ्री आहेस का?'
'हायला! ही परत त्याला कशी गेली? मी बब्बूला पाठवायला सांगितली होती ना?'.. राजेश चडफडला.
'हो'.. सिरी निर्विकारपणे उत्तरली.
'अगं मग त्याला कसं गेलं? बब्बूचा इमेल अ‍ॅड्रेस सांग बरं!'
'दादाभाई.दुधबाटलीवाला@हॉटस्कॅनसिक्युरिटी.कॉम'
'तरीच! सगळ्या बब्बूच्या इमेला त्याला जातायत. बब्बूचा इमेल अ‍ॅड्रेस बबिता@जीमेल.कॉम असा बदल आता'.. राजेशनं जोरात टेबलावर डोकं आपटलं. 'आणि दादाभाईला परत एकदा सॉरी म्हण. आणि बब्बूला ती इमेल पाठव.'
'ओके राजेश! अ‍ॅड्रेस चेंज्ड टू बबिटा@जीमेल.कॉम!'
'बबिटा? टा? हे तिनं ऐकलं तर टांग तोडेल ती तुझी! हॅ! तुम्हा अमेरिकनांना आमचे उच्चार शिकवणं हे उंदराला भुंकायला शिकविण्याइतकं दुरापास्त आहे!'
'माफ कर! मला तू काय म्हणतो आहेस ते समजलं नाही!'.. सिरीच्या थंड प्रतिसादाकडे त्यानं दुर्लक्ष केलं.
'राजेश, तुला एक इमेल आली आहे'... सिरी सुमारे २० मिनिटांनी परत जागी झाली.
'अरे वा! आता नक्की बब्बूची असेल. वाच वाच'.. राजेश खुलला.
'राजेश, तू एव्हढ्यातल्या एव्हढ्यात दोन वेळा चुकीची इमेल पाठवलीस ज्या दुसर्‍या लोकांना जाणं अपेक्षित होतं हे तू स्वतःच कबूल केलं आहेस. अशा प्रकारे बेशिस्त आणि बेजबाबदारपणे काम करणार्‍या माणसाला आमच्या कंपनीच्या डेटा सिक्युरिटीचं काम देणं आम्हाला धोकादायक वाटतं. तेव्हा आम्ही तुझ्याबरोबरचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करू इच्छितो. कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे आम्ही एक महिन्याची नोटीस देणं अपेक्षित आहे. ही इमेल ती नोटीस आहे याची नोंद घ्यावी.'

सिरीनं ती इमेल वाचल्यावर राजेशनं जोरात टेबलावर मूठ आपटली, त्यामुळे टेबलावरच्या सिरीला भुकंपाचा धक्का बसला.
'धिसिज ऑल युवर फॉल्ट, सिरी! तू काय आणि ती अलेक्सा काय! दोघी सपशेल बिनडोक आहात! मला आता कुणी तरी डोक्यानं बरा असलेला शोधायला पाहीजे.'..  मग राजेशने एक सुस्कारा सोडून कॉन्ट्रॅक्टचा विचार बळंच दूर ढकलला तसा बबिताचा विचार पुढे आला. शेवटी धीर करून त्यानं तिला फोन लावला आणि नाक घासत सतरा वेळा माफी मागत एक लंचची डेट मागितली. तिलाही तेच हवं होतं पण ते सरळपणे सांगेल ती स्त्री कुठली? रुसल्याचं प्रचंड नाटक करीत, राजेशला बरीच रदबदली करायला लावत तिनं शेवटी खूप उपकार केल्यासारखं करून ते मान्य केलं.
------***-----------***---------

राजेशनं एका फाईव्ह स्टार हॉटेलात जेवायचा बेत आखला होता. बबिता मुद्दाम अत्यंत आकर्षक वेशभूषा व केशभूषा करून आली होती. पण राजेशच्या ते मुळीच लक्षात आलं नाही, त्यामुळे ती खट्टू झाली. जेवण झाल्यावर राजेशनं एक कागद तिच्याकडे सरकवला. खरं तर ते 'डाव मांडून भांडून मोडू नको' याचं विडंबन होतं. पण इंग्रजी माध्यमात शिकलेल्या बबिताला विडंबन प्रकरण माहीत नसल्यामुळे तोही त्याला कविताच म्हणायचा.
'बब्बू! माझी ही नवीन कविता तुला नक्की आवडेल बघ.'

सदा घालून पाडून बोलू नको
वात आणू नको, वात आणू नको!

घासली आजची सर्व भांडी जरी
आदळली पुढे तीच माझ्या तरी
भिंग लावून तू डाग शोधू नको, शोधू नको
वात आणू नको

हक्काचा हमाल तूच केला मला
कौतुकाने सदा भार मी वाहिला
मॉलोमॉली मजसी तू पिदवु नको, पिदवु नको
वात आणू नको!

ठेवणे मनी एक नि वेगळे बोलणे
माझ्या भाळी नित्य भंजाळणे
उमजे ना मजला म्हणुनि  भडकू नको, भडकू नको
वात आणू नको!

बबितानं ते वाचलं पण तिला त्यातली गंमत समजली नाही. कारण तिला मराठी गाण्यांचा गंध नव्हता! राजेश एक 'सिरीयल विडंबनकार' असल्यामुळे सतत विडंबनज्वरानं फणफणलेला असायचा! पण तसं हे निरुपद्रवी विडंबन, बबिताला वाटलं, तिलाच उद्देशून केलंय! वाक्यांचा सरळ अर्थ घेईल तर ती स्त्री कुठली? रसग्रहण करणार्‍याला जसे कवीच्या मनात असलेले नसलेले सर्व अर्थ दिसतात तसंच स्त्रीचं पण आहे. मग काय? झाली खडाजंगी!

'मला मिनिंग नाही समजलं पण इतकं समजलं की मीच नेहमी भांडण करते. आणि यू आर लाईक अगदी साळसूद डिसेंट बॉय! अ‍ॅन्ड यु हॅव टु पुटप विथ मी! आय वंडर, का मी अ‍ॅग्री केलं इथं यायचं?'.. बबिता ब्लड बॉईल झालं.
'हो! हो! हो! बब्बू!'... राजेश तिची 5000 ची माळ थांबविण्यासाठी उद्गारला.
'डोंट कॉल मी बब्बू!'.. ती फणकारली.
'बरं! नाही कॉलत! पण ते तुला उद्देशून नाहीये बाई! ते मराठीतलं एक फेमस गाणं आहे त्याचा अर्थ मी जरा बदललाय. ओके?'
'उगाच फेका मारू नकोस. इतका ब्लाईंड आहेस तू!! माझा न्यू ड्रेस पण तुला दिसला नाही अजून!'.. अच्छा! तर खरं कारण हे होतं तर! बाईच्या वंशाला गेल्याशिवाय तिच्या डोकं नामक हार्डवेअरचं विश्लेषण करणं शक्य नाही याची जाणीव राजेशला झाली.
'ऑ! नवीन?? असा होता ना तुझा एक?' .. काही कारण नसताना राजेश तिच्या वॉर्डरोबबद्दलचं आपलं ज्ञान पाजळायला गेला. आवडला नाही तरी मुकाटपणे ड्रेसचं कौतुक करण्याचं शहाणपण यायला एखाद्या स्त्रीच्या दीर्घ सहवासाची गरज होती.. 
'नाही रे बाबा! तुला भलत्याच कुठल्या तरी पोरीचा आठवतोय नक्की!'
'माझ्याकडे तू सोडून कुणाकडेही बघायला वेळ पण नाही!'
'खरं?'
'अगदी तुझी शप्पथ!'
'ओके! फर्गिव्हन!'
'थांब मी तुझ्यासाठी खास एक प्रेझेंट आणलंय ते घेऊन येतो. मग कळी खुलेल तुझी!'.. राजेश बाहेर जाऊन ती रॅपुंझेल घेऊन आला.
'टडाsssss!'.. बाहुली बघितल्यावर ती खूष होऊन आनंदाने चित्कारेल या अपेक्षेने त्यानं तिच्या हातात दिली.
'ही तू माझ्यासाठी घेतलीस?'.. तिनं अगदी थंडपणे विचारलं.
'हो! म्हणजे काय? तुझ्यासाठी नाहीतर काय माझ्यासाठी?'.. तिच्या थंडपणामुळे तो निराश झाला.
'अगदी खरं?'
'अगदी तुझी शप्पथ!'
'लायर! कधी तरी खरं बोल की रे! व्हाय? व्हाय? डु यु हॅव टु लाय? यु आर सोssss नाईव्ह!'
'अगं! आई शप्पत मी तुझ्यासाठी घेतली आहे ही!'.. मनातल्या मनात 'आयला! हिला कसं समजलं हे?' असा विचार करीत राजेश बरळला. एखाद्याचं डोकं हॅक करून त्यातले विचार बघायची टेक्नॉलॉजी असती तर ती राजेशने काय वाट्टेल ते करून मिळवली असती.
'राजेश! प्लीज! तुला वाटते तितकी डंब नाहीये रे मी! मी पण ती न्यूज ऐकलीये. आय नो अलेक्सा बॉट धिस सेम थिंग सगळीकडे, ओके?'
'सॉरी! सॉरी! सॉरी! सॉरी! बब्बू! काय सांगू अगं! मला तुला काहीही करून खूष करायचं होतं!'
'हम्म्म! मग एक्झिबिशनला यायचं होतंस! नुसते एक्स्क्युजेस दे तू!'
'अगं! मला सिरीयसली खूप काम होतं नेमकं! आयॅम रिअली सॉरी!'
'काम! काम! काम! कामपिसाट आहेस तू!'
'कामपिसाट? बब्बू, तू चुकीचा शब्द वापरते आहेस इथे! त्याचा तुला वाटतोय तो अर्थ होत नाही.'.. राजेशला घाम फुटला.
'आय डोंट केअर व्हॉट इट मीन्स! तुला समजलंय, व्हॉट आय मीन! दॅट्स इनफ!'
'हो! मला समजलंय तुला काय म्हणायचंय ते. पण कामाचं काय करू मी? सोडुन देऊ? बिझनेस मधे असं कसं चालेल?'
'वर्क स्मार्टर! तुला असिस्टंटची नीड आहे. युनो?'
'हॅ! ते सगळे माठ असतात, तुला माहितीच आहे मला किती त्रास झाला आहे त्याचा पूर्वी!'
'ट्राय अ रोबॉट देन!'
'आँ! रोबॉट? तो कुठे मिळणारे मला भारतात?'
'अरे! तुला वाटतं तितकी इंडिया बॅकवर्ड नाहीय1. नमीताचा मित्र संदीप मेक्स देम, युनो? कालच ती मला सांगत होती. तो देतो रोबॉट टेस्टिंगसाठी पण फिडबॅक द्यावा लागेल नंतर!'
'ओ! आय सी! वंडरफुल, आय नो संदीप! माझ्यात वर्गात होता. तेव्हा माझी प्रॅक्टिकल्स कॉपी करायचा, आता रोबॉट कुणाचे कॉपी करतो कुणास ठाऊक! हा! हा! हा! पण देऊ की फिडबॅक त्याला, त्यात काय!! सांग त्याला माझ्याकडे पाठव म्हणून! थॅन्क्यु बब्बू!'

------***-----------***---------

बेल वाजल्यावर राजेशने दार उघडलं.  समोर एका अति सुंदर तरुणीला पाहून तो अचंबित झाला. तिच्या रंगरूपाला कुठेही नाव ठेवायला जागा नव्हती. पण तिच्या दिसण्यातलं आणि हालचालीतलं वेगळेपण जाणवत होतं. त्याच्याकडे रोखलेले भुर्‍या रंगाचे डोळे थोडे निर्जीव वाटत होते व तिची हालचाल होताना मोटरचा घुंई आवाजही स्पष्टपणे ऐकू येत होता. तिची काया तांबूस रंगाची आणि मेटॅलिक वाटत होती. तिनं एक कार्गो पॅन्ट व दोन खिशांचा शर्ट घातलेला होता. वर केसाचा भला मोठा अंबाडा होता. त्याला काय बोलावं ते सुचेना.. तितक्यात तिनेच खास हॉकिंग सदृश एकसुरी आवाजात प्रश्न केला.. 'राजेश ठिगळे इथेच रहातात ना?'. राजेशला ते बोलणं प्रत्येक शब्दाला बाजा फुंकल्यासारखं वाटलं.
'हो! हो! हो! इथेच! इथेच! मीच राजेश ठिगळे आणि आपण?'.. तो मेटॅलिक आवाज ऐकून राजेशला आपण सर्वसामान्य स्त्रीशी बोलत नसून एका रोबॉटशी बोलत आहोत याची जाणीव झाली. पण उत्तर द्यायला जरा उशीर झाला तर तिचा टाईम आऊट होईल या भीतिने तो तत्परतेनं म्हणाला.
'मी प्रेमा! संदीप रोबॉटिक्स प्रायव्हेट लिमिटेड मधून आले आहे.'
'ओह! येस! येस! येस! तो म्हणाला होता पाठविणार आहे म्हणून.. या ना या, आत या!'.. दार धरून राजेश उभा राहिला आणि प्रेमा क्रॅव क्रॅव आवाज करत यांत्रिकपणे पाय पुढे टाकत आत आली व कोचावर बसली.
'डु यू अ‍ॅक्सेप्ट कुकीज?'.. नुकत्याच घरात आलेला तिर्‍हाईत असा काही प्रश्न विचारेल अशी अपेक्षा नसल्याने राजेशनं नुसताच आ वासला. 
'....'.. तो भंजाळलेला पाहून तिनं नवीन Cookie Law प्रमाणे असा प्रश्न सर्व युजरना विचारणं भाग असल्याचं सांगितल्यावर त्याच्या डोक्यात प्रकाश पडला.
'ओह! दोज कुकीज! येस! येस! आय डू अ‍ॅक्सेप्ट! कशा आहात आपण?'.. कुकीच्या गोंधळामुळे आलेलं हसू दाबत तो म्हणाला.
'मी व्यवस्थित चालू आहे!'.. प्रेमाने निर्विकारपणे उत्तर दिलं.
'आँ!'.. राजेश थक्क झाला. एखादी स्त्री इतक्या प्रांजलपणे असं काही एखाद्या तिर्‍हाईताला सांगू शकेल हे त्याला झेपलं नाही. पण लगेचच तिला काय म्हणायचंय ते त्याला उमजलं. वासलेला आ मिटुन तो म्हणाला.. 'पण प्रेमाबाई! तुम्ही काही रोबॉट असाल असं वाटत नाही बुवा!'
'मला प्रेमा म्हणा! मला आदरार्थी बहुवचनात बोलायचं ट्रेनिंग दिलेलं नाही. तेव्हा एकेरीच ठीक राहील.'.. प्रेमाचा बाजा वाजला.
'हं! बर! प्रेमा! काय छान नाव आहे. प्रेमा! प्रेमा, तुझा रंग कसा?'.. अचानक राजेशला नाटकाचं नाव आठवलं.
'तांबडा! माझं शरीर ह्युमनलाईक दिसावं म्हणून प्लॅस्टिक मधे कॉपर घातलं आहे.'
'ओह! मला तो रंग म्हणायचा नव्हता, प्रेमा!'
'पण तू विचारलंस की प्रेमा तुझा रंग कसा?'
'असो! ते विसरून जा! मला सांग तू चालताना तो क्रॅव क्रॅव आवाज का येतो म्हणे?'
'माझे जॉइंट्स सगळे मेटॅलिक आहेत. त्यांच्या फ्रिक्शन मुळे होतो तो आवाज!'
'पण मग तो नेहमी येत रहाणार?'
'तो कमी करायला ऑईल घालावं लागतं. असं!'.. असं म्हणून प्रेमानं खिशातून मोबिल ऑईलची बाटली काढून घटाघटा ऑईल प्यायलं व नंतर तोंडाला लागलेलं पुसलं, ते पाहून राजेशच्या पोटात ढवळून आलं.
'फॅन्टॅस्टिक!'... प्रेमानं त्याला थोडं चालून दाखवलं आणि आवाज कमी झाल्याचं बघून तो अवाक् झाला.
'त्यानं गंज पण लागत नाही.'.. प्रेमानं पुरवणी दिली.
'म्हणजे तुला रोज असं विचारायला हरकत नाही.. प्रेमा, तुझा गंज कसा? हा! हा! हा! हा!'.. राजेशला त्याचा विनोद फारच आवडला.
'मला समजलं नाही!'.. प्रेमा निर्विकारपणे म्हणाली.
'तुला नाहीच समजणार! रोबॉटची विनोदबुद्धी असून असून किती असणार?'.. राजेशचा विखारी खडुसपणा जागा झाला.
'मी रोबॉट नाही, अ‍ॅन्ड्रॉईड आहे! माझं काम काय असणार आहे ते मला सांग!'.. तिनं एक जळजळीत कटाक्ष टाकल्यामुळे राजेश दचकला व विचारात पडला.
'बरं, इकडे ये सांगतो तुला!'.. प्रेमा त्याच्या जवळ गेली. एका खिशातून वायर काढून तिचा प्लग तिनं एका सॉकेटमधे घालून बटण चालू केलं.
'दिवसातून किती वेळा चार्जिंग करायला लागतं तुझं?'
'दोन वेळा'
'बरं, या फाईल मधे माझ्या सगळ्या क्लायंटची लिस्ट आहे. यातच त्यांचे कॉन्ट्रॅक्ट डिटेल्स आहेत, त्या वरून त्याना इंव्हॉईस कधी पाठवायचा ते तुला कळेल.'.. त्यानं स्क्रीन वरची एक फाईल दाखवली.
'कुठे आहे ही फाईल?'.. प्रेमाने विचारल्यावर राजेशने एक्सप्लोअरर उघडून भराभर डिरेक्टर्‍या बदलत तिला फाईल कुठे आहे ते बोटानं दाखवलं.
'सी कोलन बॅकस्लॅश क्लायंट्स बॅकस्लॅश कॉन्ट्रॅक्ट्स अ‍ॅन्ड स्टफ बॅकस्लॅश 2019 बॅकस्लॅश जुलै बॅकस्लॅश करंट क्लायंट्स डॉट डॉकेक्स'.. प्रत्येक डिरेक्टरीवर बोट ठेवत ती वाचत असताना तिच्या हाताचा स्पर्श त्याला झाला. राजेशच्या आधी लक्षात आलं नाही की तो स्पर्श गरम होता पण थोड्या वेळानं त्याची ट्युब लागली.
'तुझा हात गरम कसा?'.. तिचा हात धरून तिच्याकडे संशयानं पहात तो म्हणाला. प्रेमानं त्याच्या डोळ्यात थंड नजरेने पाहिलं, मग 'काय मूर्खासारखे प्रश्न विचारतो हा' असा हावभाव करीत म्हणाली..
'आत्ता चार्जिंग चालू आहे.'
'अरे हो! खरंच की!'.. राजेश ओशाळला पण त्याचा संशय तिळभरही कमी झाला नव्हता. प्रेमाच्याही ते लक्षात आलं.. शांतपणे तिनं खिशातून एक नोजप्लायर काढला. दोन्ही हात मागे नेऊन ओढण्याची अ‍ॅक्शन करत अंबाड्यातून हळू हळू एक सर्किट बोर्ड काढला.
'हा माझा मदरबोर्ड!'.. प्रेमानं त्याला लांबूनच बोर्ड दाखविला. मदरबोर्ड काढल्यामुळे तिची विलक्षण तडफड होऊ लागली. तिच्या पापण्या कमालिच्या वेगाने उघडमिट करायला लागल्या, शरीर थरथरायला लागलं. राजेशला असं वाटायला लागलं की ती कुठल्याही क्षणी कोसळणार. त्यात त्याला बोर्डाला चिकटलेलं थोडं लाल रंगाचं मांस दिसल्यामुळे कससंच झालं.
'परत बसव, बसव ते लवकर!'.. राजेशनं घाबरून प्रेमाला सांगितलं.
'आता मी तुला हात कापून आतली मेटॅलिक रचना दाखविते'.. प्रेमानं सर्किट बसवलं व खिशातून एक मोठ्ठा चाकू काढून हातावर धरताच राजेशच्या डोळ्यासमोर टर्मिनेटर मधलं ते दृश्य तरळलं आणि तो थरथरत ओरडला.. 'नको! नको! आय बिलिव्ह यू! माझी खात्री पटली आहे आता!'
'ठीक आहे! मग पुढची कामं सांग!'.. प्रेमाने चाकू म्यान केला.
'आज नको आता! उद्या सांगतो!'.. तिच्याकडे बघताना राजेशच्या डोळ्यासमोर फक्त ते मांसच तरंगत होतं.
'बरं! माझी खोली कुठली ते दाखव!'
'खोली? तुला काय करायचीये खोली?'
'झोपायला, कपडे बदलायला व मेकप करायला'
'आँ! तुला हे सगळं लागतं?'
'होय! मी साधा रोबॉट नाही, अ‍ॅन्ड्रॉईड आहे!'
'बरं! बरं! ती समोरची खोली वापर!'.. ती खोलीत गेल्यावर राजेश पुटपुटला ..'रोबॉट सारखा रोबॉट पण नखरे किती?'
'राजेश! तिथले कॅमेरे काढून ठेव! नो स्पायिंग!'.. प्रेमानं खोलीत जाऊन पहाणी करून बाहेर आल्यावर ठणकावलं.

------***-----------***---------
'ए नमे! संदीपला रोबॉटकडून काही इन्फो मिळाली का?'.. बबितानं अधीरपणे विचारलं.
'अगं, आत्ताशी कुठे एकच वीक झालाय त्यामुळे फार काही इन्फो नाहीये.'
'एकच वीक? चार वीक व्हायला हवे होते की!'
'अगं, हो! पण संदीपचे सगळे रोबॉट बाहेर होते, स्पेअर नव्हता.'
'ओह! जो काही इन्फो आहे तो दे मग'
'तो सकाळ पासून रात्री ८ ८ वाजेपर्यंत कामात असतो. सारखा कंप्युटरवर बसलेला असतो.. सतत इमेल व फोन! ते मोस्टली कस्टमरांचे असतात. त्यांच्या बरोबर तो बर्‍याच वेळेला बाहेर मिटिंगला जातो, तिकडेच जेवून येतो.'
'हम्म्म! त्यांच्यापैकीच कुणीतरी एक असणार म्हणजे!'
'बाकी अजून एक क्युरीयस गोष्ट समजली.'
'त्याच्या गॅजेटांबद्दल?'
'नो! नो! तो कधी कधी त्याच्या बेडरूम मधे जातो आणि आतून दार लावून घेतो.'
'मग त्यात काय क्युरीयस?'
'अगं, ऐक ना! थोड्या वेळाने आतून आवाज ऐकायला येतात.'
'आवाज? घोरण्याचे असणार! तो फार घोरतो!'
'त्याचा आणि एका बाईचा'
'व्हॉssssट? नक्की बाईचा? '
'हो! ते काय बोलतात ते क्लिअर नसतं म्हणे. पण कधी भांडणाचे आवाज येतात. कधी प्रेमाचे, लाईक.. एकदा तो म्हणाला की मला सोडून जाऊ नकोस!'
'ओ माय गॉड! धिसिजिट! आय न्यू! आय न्यू! आता मला भेटलंच पाहिजे त्याला!'.. बबिताने टेबलावर हात आपटला.
'बबडे! थांब जरा! मी आधी खात्री करते मग जा तू!
------***-----------***---------

'हॅलो संदीप! हां, मी राजेश बोलतोय! कसा आहेस?'.. राजेशनं प्रेमाला समजू नये म्हणून मुद्दाम घराच्या बाहेर पडून संदीपला फोन लावला.
'मी मजेत आहे रे! तुझं कसं काय?'
'मी पण मजेत!'
'गुड! गुड! प्रेमा काय म्हणतेय?'
'हां! अरे मी त्या बद्दलच फोन केला होता.'
'असं होय! बरं झालं तूच फोन केलास ते!! मी करणारच होतो फोन तुला, फिडबॅकबद्दल! मग कशी वाटली तुला प्रेमा?'
'अरे! काय मस्त बनवली आहे राव तुम्ही!! वा! प्रश्नच नाही! अगदी स्त्री सारखी दिसते आणि वाटते रे! फक्त जवळून नीट बघितलं किंवा बोलणं ऐकलं तरच कळू शकतं!'
'थॅन्क यू! थॅन्क यू! वी ट्राय!'
'ती रोबॉट आहे ते समजलं होतं तरी मला बघायचं होतं की ती खरोखरीचा रोबॉट आहे की फेक आहे! म्हणून तिची परीक्षा घ्यायला मी तिला आमच्या घरासमोरचा रस्ता क्रॉस करायला सांगितलं. तुला माहितीच आहे की त्या रस्त्यावर नेहमी किती गर्दी असते ते. मला बघायचं होतं की तिला ते कितपत जमतंय ते!'
'मग?'.. संदीपनं काळजीच्या सुरात विचारलं.
'अरे! फेक असती तर फटक्यात रस्ता क्रॉस करून गेली असती. मी गच्चीतून बघत होतो. तिनं दहा-बारा वेळा जायचा प्रयत्न केला.. प्रत्येक वेळी एक दोन पावलं पुढं टाकायची आणि परत मागे यायची. शेवटी जमलं नाही म्हणून सांगायला घरी परत आली. आयॅम इम्प्रेस्ड! ग्रेट जॉब संदीप!'
'थॅन्क यू! थॅन्क यू! अरे तिला 8 मिनिटाचा टाईम आऊट आहे! त्या वेळात सांगितलेली गोष्ट करायला नाही जमली तर ती नाद सोडून देईल.... पण... तू नक्की फक्त कौतुक करायला फोन केलेला नाहीस, बरोबर? हा! हा! हा!'
'बरोब्बर! हा! हा! हा! अरे मला तुला सांगायचं होतं की ती चुका फार करते रे! परवा तिनं इन्‌व्हॉईस पाठवले क्लायंट्‌सना पण एकाचा दुसर्‍याला, दुसर्‍याचा तिसर्‍याला.. असे! मी नक्की काय सांगितलंय ते नीट लक्षात ठेवत नाही बहुतेक!'
'अरे बापरे!'
'आणि मी तिला बोललो तर ती रुसली चक्क! आयला म्हंटलं रोबॉट कधीपासनं रुसायला वगैरे लागले? ऑं?'
'ओह! अरे हो! तुला सांगायचं राहिलंच शेवटी! हे मॉडर्न रोबॉट आर मोअर ह्युमन लाईक, युनो? म्हणजे ते जास्त माणसासारखे वागतात. रुसतील चिडतील वगैरे वगैरे! त्यात सुद्धा स्त्री रोबॉट जास्त स्त्री सुलभ वागेल आणि पुरुष रोबॉट पुरुषासारखा!'
'तरीच! म्हणजे रोबॉटच्या नावाखाली एक मनुष्यप्राणीच पाठवलास की रे तू! मला बिनचूक काम करून हवंय, ते असल्या रोबॉटांकडून कसं होणार?'
'तसं नाही! हे लक्षात घे की त्यांना बेसिक गोष्टी सोडता इतर काहीही शिकवलेलं नाही. तेव्हा तू तिच्या बरोबर बसून प्रत्येक गोष्ट तिला करून दाखव. मग तिला करायला सांग. तिच्या काय चुका होतात त्या समजावून सांग.   त्यांचं शिकणं हे त्यांना मिळणार्‍या अनुभवातून/प्रोत्साहनातून होतं. कुत्र्याला कसं शिकवतात ते माहिती आहे ना?'
'हो, ते माहिती आहे! कुत्रा आपल्याला हवाय तसा वागला की त्याला त्याच्या आवडीचं खायला द्यायचं असतं. बरोबर? पण या रोबॉटला काय देणार खायला? ऑं?'
'हांsss! तसं होय! रोबॉट काही खात पीत नाहीत तेव्हा तुझा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण खायला द्यायच्या ऐवजी त्यांना प्रेमाने वागवलं तरी पुरतं.'
'हं! म्हणजे नक्की काय करायचं?'
'अरे! असं काय करतोस? बरंच काही करता येतं. तिचं कौतुक कर. बाकी तुझं आणि कौतुकाचं वाकडं आहे ते जगजाहीर आहे म्हणा! हा! हा! हा! असो! तिला शाबासकी दे! तिचा हात हातात घेऊन थोपट! तिला जवळ घे, मुका घे!'
'रोबॉटला मिठीत घेऊन मुका? काय बोलतोस काय तू? उद्या मला एखाद्या पुतळ्याशी लग्न करायला सांगशील! कुणी पाहिलं तर मला येरवड्यात तातडीनं भरती करतील! त्यापेक्षा तू तिला परत घेऊन जा!'
'त्यापेक्षा मी सांगतो ते ऐक! तू दोन आठवडे मी सांगितलंय तसं वाग तिच्याशी! फरक नाही पडला किंवा तुझं समाधान नाही झालं तर मी घेऊन जाईन, ओके?'
'ओके!'.. राजेशला तशी ती आवडत असली तरी एकदम मिठी मारणं हे एक मोठं धर्मसंकट वाटत होतं त्याला, रोबॉट असला म्हणून काय झालं?

------***-----------***---------

फोन झाल्यावर राजेश विमनस्क अवस्थेत घरी परत आला. प्रेमाचं कौतुक कसं आणि कशाबद्दल करायचं याचं मोठ्ठं दडपण त्याच्या मनावर होतं. किल्लीनं दार उघडून आल्यावर आत प्रेमा कोचावर हातात काही कागद घेऊन बसलेली दिसली. राजेश आल्यावर तिनं त्याच्याकडे पाहिलं पण राजेशनं नजर चुकविली. त्याचं वागणं नेहमी सारखं नाहीये हे तिला लगेच समजलं.
'तू नेहमी सारखा वाटत नाही आहेस! काही मालफंक्शन झालंय का तुझं?'..
'अं! नाही नाही! इट हॅज बिन ए लाँग डे!'
'निगेटिव्ह! अ डे कॅनॉट बी लाँगर दॅन 24 अवर्स!'.. प्रेमानं तिला भरवलेलं ज्ञान फेकलं.
'करेक्ट! करेक्ट! तू.. तू.. खूप हुशार आहेस, प्रेमा!'.. राजेशनं तिची टिंगल करायची ऊर्मी दाबून तिचं चक्क कौतुक केलं. वरती शाबासकी पण दिली.
'थॅन्क्स! धिस मीन्स ए लॉट टु मी!'.. तिनेच त्याचा हात धरला. मग राजेशची भीड चेपली आणि त्यानं दुसर्‍या हातानं तो थोपटला.
'सॉरी! मी तुझ्यावर इतकं चिडायला नको होतं. मी तुला नीट समजावून सांगितलं नाही, ती माझी चूक झाली. आता मी तुला मला काय अपेक्षित आहे ते नीट समजावून सांगतो!'.. राजेशनं तिच्या डोळ्यात पाहिलं तर चक्क त्याला ते प्रेमळ भासले. मग राजेशनं काही डॉक्युमेंट्स छापायला देऊन तिला प्रिंटाऊट्स आणायला सांगितलं.
'एरर 404, प्रिंटर नॉट फाउंड!'.. दोन मिनिटातच प्रेमा हात हलवित परत आल्याचं पाहून नेहमीच्या सवयीनं राजेश काहीतरी खडूसपणे बोलणार होता. पण लगेच त्यानं स्वतःला सावरलं व तिचा हात धरून तिला तो घेऊन गेला आणि प्रिंटर कुठे आहे ते दाखविलं. खुद्द राजेशचा स्वतःच्या वागण्यावर विश्वास बसत नव्हता. नंतर तिच्या बरोबर बसून त्यानं इन्‌व्हॉईस कसा तयार करायचा आणि कुणाला पाठवायचा ते सविस्तर दाखवून तिला करायला सांगितलं. आणि काय आश्चर्य! तिनं ते काम पहिल्या फटक्यात कुठलीही शंका न विचारता अगदी बिनचूकपणे केलं.
'ग्रेट जॉब प्रेमा! वेल डन यू!'.. राजेशनं आनंदाच्या भरात तिला मिठी मारून तिचा मुका घेतला.
'थँक्यू राजेश!'.. तिला मिठी व मुक्यात काही वावगं वाटलं नाही. त्यानंतर याच पद्धतीने ती इतर कामं झटपट शिकली व करू लागली. लवकरच राजेशचं तिच्यावाचून पान हलेना. एके दिवशी तिला दादाभाई दुधबाटलीवाला कडून आलेली नोटीस दिसली. तिला माहिती होतं की दादाभाई कडेही संदीपकडचाच एक रोबॉट आहे. तिनं त्या रोबॉटला पटवून ती नोटीस रद्द करायला लावल्यावर तर राजेश तिच्या प्रेमातच पडला. येता जाता तिचं कौतुक करणे, प्रत्येकासमोर तिची स्तुती करणे अशा गोष्टिंना ऊत आला. एकदा तर त्यानं 'त्या फुलांच्या गंधकोषी' चं विडंबन करून प्रेमाला वाचायला दिलं. विडंबनावरच्या बबिताच्या प्रतिक्रिया माहिती असल्यामुळे त्याला प्रेमाकडून फारशी अपेक्षा नव्हती, त्यातून ती पडली एक रोबॉट!

त्या किबोर्डच्या अंतरंगी सांग तू आहेस का?
त्या पिसीच्या मेमरीचा एक तू बाईट का?
त्या प्रोग्रॅमच्या मर्मस्थानी झुलविणारा बग का?
जात माउसच्या गतीने सांग तू आहेस का?

कंप्युटरच्या अंतरीचा प्राण तू आहेस का ?
व्हायरसाच्या तांडवाचे घोर ते तू रूप का ?
इमेलातुन वर्षणारा तू स्पॅमांचा मेघ का?
स्क्रीन वरती नाचणारे तू एररचे रूप का?

'हा! हा! हा! काय मस्त विडंबन केलं आहेस तू! वा! फारच छान!'.. राजेश तिला विडंबन म्हणजे काय असतं ते माहिती आहे हे पाहून जास्तच सुखावला.
'तुला माहिती आहे हे कशाचं विडंबन आहे ते?'..
'हो!'.. प्रेमानं पटकन युट्युबवर 'त्या फुलांच्या गंधकोषी' लावलं.
राजेशला एकदम प्रेमाचा उमाळा आला. तिला मिठीत घेऊन तिचा मुका घेत 'प्रेमा! प्रेमा! आय लव्ह यू!' म्हणत असतानाच बबिता दार उघडून आत आली. समोरचं दृश्य पाहून तिचा तिच्या डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसेना. ती फक्त 'राजेsssssssश! आय न्यू! आय न्यू!' इतकंच किंचाळू शकली.
'बब्बड तू? तू आत्ता इथं? आणि व्हॉट यु न्यू?'.. राजेश तिला बघून गारद झालाच होता पण नंतर आपण काय करत होतो ते जाणवून चांगलाच हादरला.
'हेच की, यु वेअर सिईंग समवन! तू मला सांगितलं असतंस तर मी स्व:तहून गेले असते निघून! ब्लडी हार्टलेस!'
'बब्बड! बब्बड! आयॅम नॉट सिईंग एनीवन! प्लीज ट्रस्ट मी!'.. राजेश अगतिकपणे म्हणाला.
'ट्रस्ट यू? आहाहाहा! अरे तू माझ्या डोळ्यासमोर या टवळीला किस करत होतास की रे!'
'अगं ती काही टवळी बिवळी नाही काय! ती माझी नवीन असिस्टंट आहे, संदीप कडून आलेली.'
'ऑं! ही ... ही... हा.. हा.. रोबॉट आहे? आणि तू रोबॉटला किस करत होतास? ओ माय गॉड! व्हॉट इज दिस वर्ल्ड कमिंग टु?'.. तिचा तोल सुटला, ती हताशपणे मटकन् खुर्चीत बसली.
'तू बबिता असणार! मी प्रेमा! नमस्कार!'... प्रेमानं बाजा फुंकत स्वत:ची ओळख करून दिली. तिच्या चेहर्‍यावर अपराधीपणाची कसलीच भावना नव्हती. तिच्या रोबॉटिक मनाला इतका आरडाओरडा करण्यासारखं काय घडलंय ते समजत नव्हतं. बबितानं तिच्याकडे साफ दुर्लक्ष केलं, तिचे डोळे राजेशवर रोखलेले होते.
'हो, म्हणजे नाही! मी रोबॉटचा मुका घेत होतो. पण त्याला कारण आहे.'
'हॉ! काय कारण असणारे?. प्रेमात पडलायस तू तिच्या! तू तिला आय लव्ह यू म्हणालास ते पण मी ऐकलं या कानांनी! आणि मला कधीही किस करून नाही म्हणालास तसं!'
'हो, म्हणजे नाही! म्हणालो मी तिला पण ते खरं नव्हतं काही!'.. राजेश वैतागला पण त्याच क्षणी त्याला तिच्याबद्दल प्रेमभावना आहे तेही जाणवलं.
'म्हणजे? तू मला खोटं खोटं सांगितलंस? कसला अनरिलायेबल आहेस तू!'.. प्रेमाची अनपेक्षित सरबत्ती ऐकून तो डोकं धरून खाली बसला.
'यु आर रियली वियर्ड! ही टवळी आणि ती बेडरुम गर्ल .. चांगला एंजॉय करतोयस तू!'
'ऑं? बेडरुम गर्ल? ही कोण? मला नाही समजलं.'
'आता बरं समजेल. आय नो तू बेडरुमचं दार लावून एका गर्लशी गुलुगुलू गप्पा मारत असतोस ते!'.. बबिता फणकार्‍यानं म्हणाली.
'बेडरुम मधे? माझ्या? आयला!'.. राजेश चांगलाच संभ्रमात पडला... 'ओहो! हां हां! ते! पण तुला कसं समजलं?'.. आता त्याचा संशय जागा झाला.
'एका बर्डने सांगितलं. पण ते खरं आहे की नाही?'.. बबितानं टाळाटाळ केली.
'हो, म्हणजे नाही! तो बर्ड कोण ते सांग आधी'
'मी सांगितलं!'.. प्रेमाने थंडपणे कबुली दिल्यावर राजेश हादरला.
'प्रेमा तू? माझ्यावर स्पायिंग केलंस? का? कधी? केव्हा? कशासाठी?'.. टेबलावर डोकं आपटत राजेश बरळला.
'तशी मला इंस्ट्रक्शन दिलेली होती.'.. प्रेमानं खरं ते सांगितलं.
'व्हॉट? इंस्ट्रक्शन? कुणी? तो हरामखोर संदीप असणार नक्की. ही नेव्हर लाइक्ड मी! कशासाठी? माझी बिझनेस सिक्रेट्स चोरायला? पण ते तुझ्यापर्यंत कसं पोचलं, बब्बड? आयॅम कंफ्युज्ड!'
'मी सांगत होते तिला'.. अचानक नमिता आणि संदीपनं ड्रॅमॅटिक एंट्री घेतली.
'नमे, तू काय करते आहेस इथे? हे..... बिटविन मी आणि राजेश आहे!'.. बबिता त्यांना पाहून आश्चर्यचकित झाली.
'बबडे, आय न्यू तू इथे येणार ते. मी तुला सांगितलं होतं वेट करायला, तरी तू ऐकणार नाहीस हे माहितीच होतं मला. म्हणूनच मी इथे आले तुला शोधत, पण मी लेट झाले'
'नमे, अगं मी इथे पर्फेक्ट टाईमला आले. कॉट राजेश किसिंग तो रोबॉट, यु नो? रेड हॅंडेड!'.. बबिता दुःख मिश्रीत विजयानं म्हणाली.
'तसं करायला मी राजेशला सांगितलं होतं. तसं केल्यावर आमचे रोबॉट लवकर शिकतात म्हणून!'.. संदीप खाली मान घालून म्हणाला.
'म्हणजे? तो राजेशचा फॉल्ट नव्हता? आयॅम ग्लॅड! पण व्हॉट अबाऊट द बेडरुम गर्ल? अं?'.. बबिता त्या गर्लचा छडा लावल्याशिवाय थांबणं शक्यच नव्हतं.
मग मात्र राजेशचा तोल सुटला. तरातरा आत जाऊन त्यानं एक कॅसेट्सनं भरलेलं खोकं आणून तिच्या समोर आदळलं.. 'बेडरुम गर्ल! बेडरुम गर्ल! ही घे तुझी बेडरुम गर्ल! मघापासनं टकळी चाललीये तुझी! या माझ्या आईच्या आणि माझ्या बोलण्याच्या कॅसेट आहेत. मी लहान असताना कॅन्सरनं गेली ती, त्या वेळच्या! त्या आता मी एमपी3 ला कंव्हर्ट करतोय. हॅपी नाउ?'.. राजेशचे डोळे भरून आले. खोलीतलं वातावरण चांगलच तंग झालं.
'राजेश! आयॅम रिअली रिअली सॉरी! हा सगळा माझा फॉल्ट आहे. मी नमिताला सांगितलं हे करायला. पण मला खरंच असं वाटलं की आयॅम लुझिंग यू!'.. आता बबिताच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं त्याच्या जवळ जाऊन त्याचा हात हातात घेतला.
'म्हणजे हा सगळा बनाव होता तर! तुम्ही तिघांनी मिळून केलेला. बबिता, तू माझी फार फार निराशा केली आहेस.'.. राजेशनं तिचा रागाने हात झटकला.
'राजेश ठिगळे कोण आहे?'.. अचानक एक पोलीस इंस्पेक्टर, तीन हवालदार आणि एका तरुण माणसाने प्रवेश केला.
'मी राजेश ठिगळे!'.. हे आणखी काय नवीन संकट अशा विस्मयाने राजेश पुढे झाला. दादाभाईनं काही नवीन गेम टाकली की काय असा एक विचार त्याच्या डोक्यात तरळला.
'तुमच्यावर पल्लवी इनामदार यांना त्यांच्या मनाविरुद्ध घरात डांबून त्यांच्यावर बळजबरी करण्याचा आरोप आहे?'
'राजेश sssss! तू? हे काय ऐकतेय मी?'.. बबितानं परत तोफ डागली.
'बबिता! यू जस्ट शटप, ओके? इंस्पेक्टर, कोण या पल्लवी इनामदार? मी त्यांना ओळखतही नाही आणि पाहिलेलं नाही!'.. राजेश अगतिकपणे म्हणाला. त्याला पोलिसी खाक्या काय असतो ते ऐकून माहिती असल्यामुळे तो चांगलाच टरकलेला होता. त्यातही बबितालाही तो तिचा उल्लेख बब्बड असा करत नाहीये हे लक्षात येऊन दुःख झालं.
'अरे भोसडिच्या! तुझ्या शेजारी उभी आहे ना रे ती! सरळ माहिती नाही म्हणतो साsssला!'.. त्या तरुण माणसाचं पित्त खवळलं.
'ऑं! ही तर प्रेमा! आणि ही तर रोबॉट आहे. प्रेमा, सांग त्याना जरा!'.. राजेश परत गोंधळला.
'हो इंस्पेक्टर! ती एक रोबॉट आहे.'.. बबितानंही पुस्ती जोडली.
'रोबॉट काय रोबॉट! काहीही गंडवता काय? ही माझी होणारी बायको आहे.. पल्लवी इनामदार.. पल्लवी, तू सांग ना, गप्प का आहेस?'.. प्रेमानं एकदा नमिताकडे पाहीलं.
'हो! मी पल्लवी इनामदार आहे. मी या विलासची होणारी बायको आहे. आणि राजेशनी काही मला माझ्या इच्छेविरुद्ध इथे डांबलेलं नाही!'.. राजेशनं सुटकेचा निश्वास टाकला.
'म्हणजे तू रोबॉट नाहीस? माय गॉड!'.. राजेश इतका हबकलेला होता की बबिता एक चेटकीण आहे असं सांगितलं असतं तरीही त्यानं विश्वास ठेवला असता.
'नाही ती रोबॉट नाही! तिला सिनेमात काम हवं होतं म्हणून ती माझ्याकडे आली होती. त्याच सुमारास बबिता आणि मी मिळून संदीपकडचा रोबॉट राजेशकडे पाठवायचा प्लॅन करत होतो. पण संदीपकडे रोबॉट अव्हेलेबल नव्हता. तेव्हा पल्लवीला, तिचे स्किल टेस्टिंग करायला म्हणून, रोबॉट बनवायची आयडिया मला आली. ती मी अर्थातच बबिताला सांगितली नाही कारण तिनं नकार दिला असता. सॉरी बबडे!'.. नमितानं गौप्यस्फोट केला.
'मला पण ती आयडिया बेहद आवडली. कारण, मला खूप दिवसांपासून राजेशची जिरवायची होती. कॉलेजपासनं तो फक्त त्यालाच टेक्नॉलॉजीतलं जास्त समजतं असा भाव खात आलाय आणि इतरांना तुच्छ लेखत आलाय. काय राजेश? माझ्या रोबॉट बद्दल तुझा फिडबॅक काय?'.. संदीपनं कुत्सितपणे विचारलं.
'थांब लेका! तुझ्या बॅकवर लाथांचा चांगला फीड देतो! तुला फिडबॅक हवा काय?'.. राजेश वरकरणी हसत होता पण आतून चांगलाच खजील झाला होता.
'पल्लवी! तू एक्सलंट काम केलंस. आयॅम रिअली इम्प्रेस्ड! नंतर माझ्याकडे ये, वी विल टॉक अबौट वर्क!'.. नमितानं मात्र तत्काळ तिला फिडबॅक दिला.
'राजेश! अगेन आयॅम रिअली रिअली सॉरी रे!'.. बबितानं परत एकदा माफी मागितली. राजेशलाही तिचं आपल्यावर खरं प्रेम आहे हे जाणवलं.
'बब्बड! मी पण तुझ्याशी नीट वागलो नाही कधी! आयॅम सॉरी टू! पण या रोबॉट प्रकरणामुळे मला दुसर्‍याशी कसं वागावं हे थोडं समजलं आहे.'.. राजेश बबिताच्या जवळ गेला आणि तिला चक्क मिठी मारली, मुका घेतला आणि म्हणाला.. 'आय लव्ह यू, बब्बड!'.

== समाप्त ==

Thursday, November 15, 2018

इकडंच ... तिकडंच!

इंग्लंडच्या राजाराणीच्या स्वागताप्रित्यर्थ गेटवे ऑफ इंडिया बांधला तसा सहार विमानतळ तमाम आयटीच्या लोकांच्या परदेशगमनाप्रित्यर्थ गेट आउट ऑफ इंडिया म्हणून बांधलाय की काय अशी शंका येण्याइतपत बाहेर जाणार्‍यांची संख्या वाढायला लागलेली होती. 'तो' काळ म्हणजे बिल गेट्स घरोदारी डेस्कटॉप असण्याची स्वप्न बघत होता तो काळ, भारतातून बाहेर जाताना फक्त ५०० डॉलर नेता यायचे तो काळ, विमानात/ऑफिसात बिनधास्तपणे सिगरेटी पिता यायच्या तो काळ, परदेशी जाणार्‍यांकडे आदराने बघायचा काळ, नंबर लावल्यावर फोन / गॅस मिळायला ४/५ वर्ष लागायची तो काळ!!

त्या काळी भाड्याने प्रोग्रॅमर परदेशी पाठवून पैसे कमविणे हा झटपट श्रीमंत होण्याचा एक मार्ग होता. आमची कंपनी पण त्यात घुसायच्या प्रयत्नात होती. पण प्रोग्रॅमर ट्रॅफिकिंग मधे बर्‍याच कंपन्यांनी आधी पासून जम बसविलेला असल्यामुळे घुसणं अवघड होतं. आमचे सीव्ही पॉलिश करून पाठवले जायचे. कुणाचाही सीव्ही वाचला तरी सारखाच वाटायचा.. आम्ही सगळेच टीम प्लेयर, हार्ड वर्किंग, गुड कम्युनिकेशन स्किल्स असलेले उत्कृष्ट प्रोग्रॅमर होतो. त्यामुळे कुणाला घ्यावं हा प्रश्न सगळ्यांनाच पडत असणार. म्हणुनच एका अमेरिकन कंपनीनं आमचा 'सी' प्रोग्रॅमिंग वर टेलिफोन इंटरव्ह्यू घ्यायचं ठरवलं. ज्याचा इंटरव्ह्यू असेल त्यानंच फक्त खोलीत असणं त्यांना अपेक्षित होतं पण प्रत्यक्षात आम्ही सगळेच खोलीत होतो. फोन लावल्यावर बॉस त्यांच्याशी थोडं बोलला मग पहिल्या कँडिडेटला बोलवून आणतो म्हणाला. मग थोडा वेळ फोन नुसताच धरून त्यानं कँडिडेट आत आला असं सागितलं. नंतर मी बाहेर जातो असं खोटं सांगून तो तिथेच बसून राहीला. इंटरव्ह्यूला कंपनीतला एक चांगला 'सी' येणारा पण होता, त्याचं नाव चंदू! प्रश्न विचारला की तो त्याचं उत्तर कागदावर लिहायचा आणि कँडिडेट वाजपेयी स्टाईल पॉज घेत घेत वाचून दाखवायचा. अशी आम्ही सगळ्यांनी एक्सपर्ट सारखी उत्तरं दिली. चंद्याचा इंटरव्ह्यू चालू असताना मला शिंक आली. ती मी खूप दाबली आणि बाकीच्यांनी हसू दाबलं तरी आमच्या बनावाचा बल्ल्या झालाच. त्यांनी कुणालाच घेतलं नाही. चंद्यानं माझ्यावर डूख धरला. नंतर तो दुसर्‍या कंपनीतून अमेरिकेत गेला.

एका जर्मन कंपनीला त्यांचे 'सी' मधे लिहीलेले प्रोग्रॅम एका प्रकारच्या कंप्युटरवरून दुसर्‍या प्रकारच्या कंप्युटरवर हलविण्यासाठी माणसं हवी होती. प्रोग्रॅमिंगचं काम हे नखांसारखं आहे. कायम वाढतच असतं. त्यामुळेच जगातली प्रोग्रॅमिंगची कामं कधी संपणं शक्य नाहीत. बॉसने कोटेशन देण्याअगोदर एक प्राथमिक अभ्यास करायचं पिल्लू सोडलं. दोन माणसांनी तिकडं जायचं त्यांच्या एका छोट्या प्रोग्रॅमचा आणि कंप्युटरांचा अभ्यास करून परत यायचं. गंमत म्हणजे त्यांनाही ते पटलं. चंद्या गेलेला असल्यामुळे जाणार्‍यात माझी वर्णी लागली. फक्त  १० दिवसांसाठीच जायचं होतं तरी काय झालं? पुण्याच्या बाहेर फारसं न पडलेल्या मला ते प्रकरण 'जायंट स्टेप फॉर अ मॅन काईंड' इतकं गंभीर होतं! माझ्यासारख्या गरीब मध्यमवर्गातल्या न्यूनगंड भारित पोरामधे आत्मविश्वास हा पुण्याच्या वाहतुक शिस्ती इतका दुर्मिळ! त्यातल्या त्यात जमेची गोष्ट म्हणजे माझ्या बुडत्या आत्मविश्वासाला बरोबर असणार्‍या सहकार्‍याच्या काडीचा आधार असणार होता.. त्याचं आडनाव दांडगे पण अंगापिडाने अगदीच खिडुक! तसा मीही खिडुकच होतो पण माझं नाव दांडगे नव्हतं इतकंच! आपल्याकडे विसंगत नावं ठेवण्याची पद्धत खूप जुनी असली पाहीजे नाहीतर 'नाव सोनुबाई.....' सारख्या म्हणी आल्या नसत्या.

विमानतळ नवीन, विमान प्रवास नवीन, देश नवीन, भाषा नवीन आणि माणसं नवीन... इतक्या सगळ्या नाविन्य पूर्ण गोष्टींच्या विचारांची गर्दी होऊन डोक्याची चेरापुंजी झाली. त्यातल्या त्यात एप्रिल मधे जायचं असल्यामुळे थंडीची भीति नव्हती इतकंच. तिकडे जायचंय म्हणून परवडत नसतानाही एखादा सूट घ्यावा काय या विचाराला 'हॅ! १० दिवसांसाठी कशाला हवाय?' अशा कोकणस्थी खोडरबरानं पुसलं. नाईलाजाने मग जवळचे त्यातल्या त्यात बरे कपडे आणि बाबांचे दोन जुने कोट कोंबले! बाबा स्थूल असल्यामुळे मी तो कोट घालून आलो की बुजगावणं चालत आल्यासारखं वाटायचं. अशा जाम्यानिम्यात चार्ली चॅप्लीननं मला पाहीलं असतं तर तो अंगाला राख फासून हिमालयात तपश्चर्येला बसला असता! माझं साहेबी पोशाखाचं ज्ञान कोटावर बूटच हवेत या पलिकडे नव्हतं म्हणून बूट मात्र घेतले. कोटावर चप्पल घालणं रेनकोटावर शर्ट घालण्याइतकं विसंगत वाटायचं मला! शाळेत १५ ऑगस्ट/२६ जानेवारी सारख्या सणांना पांढरं पॉलिश फासून घालायच्या कॅनवासच्या बुटां पलिकडे माझं बौटिक ज्ञान नव्हतं. त्यामुळे परत आल्यावर वापरता येतील असे कॅज्युअल बूट घेऊन आलो. एक नवी सुटकेस ही घेतली कारण आमच्या घरात होल्डॉल आणि ट्रंका सोडता सामान भरण्यायोग्य काही नव्हतं. होल्डॉल आणि ट्रंक घेऊन विमानतळावर जाणं म्हणजे सोवळं नेसून पळी पंचपात्र घेऊन चिकन आणायला जाणं हो! होल्डॉल आणि ट्रंक घेऊन बावळटासारखा चेकिनला उभा राहीलो असतो तर मला तिथल्या बाईनं तिकीट बिकीट न बघता सरळ यष्टी ष्ट्यांडवर पाठवलं असतं.

थोडं फार जर्मन समजावं व बोलता यावं म्हणून कंपनीनं जर्मनच्या क्रॅश कोर्सचा घाट घातला. क्रॅश कोर्सने कुणालाही कोणताही विषय शिकविता येतो असा सर्व कंपन्यांचा समज आहे. डिग्रीत जे मिळत नाही ते क्रॅश कोर्स कसं देणार? विमान चालविण्याचा क्रॅश कोर्स विमान क्रॅश करण्याचा कोर्स होणार नाही का? या बाबत क्रॅश कोर्स विकणार्‍यांच्या मार्केटिंगचं कौतुक करायला पाहीजे मात्र! उद्या ते '८ दिवसात घडाघड वेद म्हणायला शिका' अशी जाहिरात करून कोर्स काढतील आणि त्याला अनेक रेडे येतील. असो, माझ्या खिशातली कॅश जाणार नसल्यामुळे मी तक्रार केली नाही. दरम्यान, आमच्या फ्यॅमिलीतला मी पहिलाच परदेशी जाणारा असल्यामुळे नातेवाईकांनी माझं केळवण करायचा चंग बांधला. हो! चक्क केळवण! एका नातेवाईकानं माझं केळवण करून जाहिरात केल्यावर बाकीच्यांना पण ऊत आला. पिअर प्रेशर, दुसरं काय?

मधेच कुणी तरी पासपोर्ट वर 'Emigration check not required' असा शिक्का पाहीजे असं पिल्लू सोडून जोडीला आपल्या अमक्या तमक्याला तो शिक्का नसल्यामुळे कसं विमानतळावरून परत यावं लागलं याचं तिखटमीठ लावून वर्णन केलं. तेव्हा immigration आणि emigration यातला फरक समजण्या इतका अनुभव गाठीशी नव्हता! शिवाय दोन्हींचे उच्चार सारखेच असल्यामुळे एक अमेरिकन स्पेलिंग असणार याची खात्रीच होती मला! आमच्या दोघांच्या पासपोर्टांवर तो शिक्का नव्हता. लोकांनी एजंटाकडे द्यायचा सल्ला दिला. एकंदरित लोकांची एजंटावर मदार फार! नशीब ते स्वत:च्या लग्नाला एजंटाला उभा करत नाहीत. पण आम्ही बाणेदारपणे स्वतःच ते करायचं ठरवलं आणि झक मारत पहाटेच्या गाडीनं मुंबई गाठली, कारण ते ऑफिस १२ वाजेपर्यंतच अर्ज घ्यायचं. रीतसर विविध रांगांमधे उभे राहून एकदाचा तो फॉर्म भरला. ८ दिवसांच्या आत पासपोर्ट घरी आल्यावर मला काही लोकांनी त्यांच्या पासपोर्ट संबंधीची कामं करून देण्याबद्दल विचारणा केली.

वेगवेगळ्या आघाड्यांवर लढता लढता अखेरीस जायचा दिवस आला. रात्री दीडच विमान होतं. एशियाडनं मुंबईला जायला तेव्हा कितीही वेळ लागू शकायचा कारण रस्त्यालाही पदर असू शकतात हे कुणाच्या गावी नव्हतं आणि मोठे रस्ते बांधण्यातसुद्धा पैसे खाता येतात हे ज्ञान मंत्र्यांना झालेलं नव्हतं. त्यामुळे इंद्रायणीने दादरला उतरून टॅक्सीनं विमानतळ गाठला. पुढे नक्की काय करायचं ते माहीत नव्हतं. एस्टी आणि रेल्वेच्या प्रवासाचा अनुभव कुचकामी होता. आत जायला एअरलाईनींच्या नावानुसार गेटं होती. प्रत्येक गेटावर पोलीस तिकीट आणि पासपोर्ट बघून आत सोडत होते. भलत्याच गेटनं आत गेलो तर भलत्याच प्लॅटफॉर्मला लागू ही भीती होती. मग विमानतळा बाहेर थांबलेल्या अनंत लोकांकडे तुच्छतेची नजर टाकून एअर इंडियाच्या गेटातून रुबाबात आत गेलो. आत गेल्यावर समजलं की कुठल्याही गेटानं आत आलो असतो तरी काहीही फरक पडला नसता. आत बर्‍याच जणांकडे सामानांची बोचकी दिसल्यावर माझ्या होल्डॉलकडे बघून कुणी नाकं मुरडली नसती. करोनी देशाटन, चातुर्य येतं ते हेच असावं!

विमानतळावरची प्रत्येक गोष्ट चातुर्यात भर टाकत होती. त्या काळात कॅमेरा, दागिने इ. ड्युटीचुंबक गोष्टी (लॅपटॉप जन्मले नव्हते) भारता बाहेर न्यायच्या असतील व येताना परत घेऊन यायच्या असतील तर कस्टम मधे जाहीर करावं लागायचं. नाही तर येताना ड्युटी किंवा लाच द्यावी लागायची. जाहीर केल्यावर एक पावती मिळायची ती परत येताना कस्टम मधे दाखवायची की झालं! माझ्याकडे नातेवाईकाकडून मोठ्या मिनतवारीने आणलेला एक जुनापाना कामचलाऊ कॅमेरा होता. तो मी मोठ्या हुशारीने जाहीर करायला गेल्यावर तिथल्या कारकुनाने त्यावर ओझरती नजर फेकून 'काही गरज नाही' असं सांगितलं. मला अर्थातच तो त्यांचा लाच उकळायचा डाव वाटला. आता कॅमेरा जाहीर करून घेण्यासाठी लाच द्यावी की काय या संभ्रमात असताना त्यानं कॅमेरा खूप जुना आहे येताना कुणी विचारणार नाही अशी ग्वाही दिल्यावर मी तिथं घुटमळणं सोडून दिलं.

मग मी टॉयलेटच्या तपासणीला गेलो. कारण 'A station is known by the toilet it keeps' असं मला वाटतं. मनाची पूर्ण तयाची करून आत पाऊल ठेवलं आणि थक्क झालो. तो पर्यंत भारताच्या कुठल्याही स्टेशनवर इतकं स्वच्छ टॉयलेट मी पाहीलेलं नव्हतं. घाण वास नाही, काही तुंबलेलं नाही, चालू स्थितीतले नळ, सुस्थितीतले पाईप, कुठे जळमटं धूळ कळकटपणा नाही हे पाहिल्यावर मला विमानतळाबद्दल वाटायला लागलेला आदर नंतर फ्रँकफर्टचं टॉयलेट पाहिल्यावर 'प्रगतीला वाव आहे' मधे बदलला. मी बाहेर आल्या नंतर भारलेल्या नजरेनं माझी निरीक्षणं चालू ठेवली तेव्हा दांडगे टॉयलेटला गेला. परदेशी बायकांचे कपडे तर तोकडेपणाचा कळस होते, अगदी पायातले मोजेसुद्धा तोकडे? नाहीतर आमची हेलन! कॅबेरेतही स्किनकलरचे का होईना पण अंगभर कपडे घालायची हो! बिनधास्तपणे सिगरेटी फुंकणार्‍या व दारू पिणार्‍या बायका फक्त सिनेमातच नसतात हे मौलिक ज्ञान तेव्हाचच!

जागोजागी लावलेल्या फलकांवर कुठलं विमान कधी आणि कुठल्या गेटवरून उडणार ते पाहून मी थक्क झालो. एस्टी स्टँड सारखं 'सव्वा ११ची मुंबई कोल्हापूर मुतारीच्या बाजूला उभी आहे. प्रवाशांनी लाभ घ्यावा!' हे निवेदन ११ वाजून २० मिनिटांनी करून प्रवाशांची दाणादाण करायची भानगड इथे नव्हती. आमची एअर इंडियाची फ्लाईट ४० मिनिटं उशीरा उडणार होती. एअर इंडियानं मात्र त्यांच्या 'या' कामगिरीत अजूनही सातत्य राखलं आहे मात्र! 
'मामानं टॉयलेट मधे २० डॉलर मागितले'.. दांडगे परत येऊन म्हणाला.
'आँ! कशाबद्दल?'.. दांडगेनं खांदे उडवले.
'तू दिलेस?'
'हो!'
'का?'.. परत दांडगेनं खांदे उडवले.
'अरे! नाही द्यायचे!'.. हा माझ्या आत्मविश्वासाचा बुडबुडा! त्याच्या ऐवजी मी असतो तर मीही मुकाटपणे दिले असते. मी मात्र विमान सुटेपर्यंत टॉयलेट मधे न जायचा निर्णय घेतला. उरलेला वेळ दुकानातल्या वस्तूंच्या डॉलर मधल्या अचाट किमती बघून आ वासून डोळे विस्फारण्यात गेला. डॉलर मोजून चहा कॉफी पिणार्‍यांचा आदर करीत गेटावरून विमानाच्या अद्भुत दुनियेत आलो. अगदी काळाची टेप फास्ट फॉरवर्ड करून पाहीलेल्या जगाइतकं अद्भुत! नेहमी बसायची नाहीतर पाठ टेकायची फळी निघालेली शिटं बघायची सवय झालेल्या मला सगळी स्वच्छ, रंग न उडालेली व न डगमगणारी शिटं पाहून कससंच झालं. विमानातलं टॉयलेट तर अफलातून! एव्हढ्याश्या जागेत आवश्यक सर्व गोष्टी इतक्या खुबीने आणि चपखलपणे बसविणार्‍या डिझायनरचं कौतुक वाटलं! विमानाच्या तिकीटात सिनेमे, दारू आणि खाणं समाविष्ट असणं ही तर सुखाची परिसीमा!

फ्रँकफर्टला विमान उतरल्यावर आम्हाला अजून एका विमानातून पुढचा प्रवास करायचा होता. ते विमान सुटायला तीन तास अवकाश होता. इतर लोक त्यांच्या बॅगा बेल्ट वरून उचलत होते. 'आपलं सामान दुसर्‍या विमानात ते हलवतील' असं म्हणत तिकडे जाणार्‍या दांडगेला मी रोखलं. आमच्या विमानाचं गेट लागायचं असल्यामुळे आम्ही एका बेंचवर टाईमपास करत बसलो. अर्ध्या तासा नंतर दांडगेला राहवलं नाही, तो मला हट्टाने बॅगांच्या बेल्टपाशी घेऊन गेला. तिथे एका कोपर्‍यात आमच्या बॅगा दीनवाण्या नजरेनं उभ्या असलेल्या सापडल्या. हेच जर सध्याच्या काळात घडलं असतं तर अख्खा विमानतळ खाली करून आम्हाला दहशतवादी म्हणून आत टाकलं असतं. पुढचं विमान एकदम चिमणं होतं. जेमतेम १४ सिटं. १  X १ अशी सिटांची रचना! बसल्या जागेवरून आम्हाला पायलट आणि त्यांचे स्क्रीन दिसत होते. हवाईसुंदरी वगैरे भानगड नाही. विमान उडाल्यावर एका पायलटनेच सँडविच व पेयं असलेली एक टोपली मागे ढकलली. सेल्फ सर्व्हिस! त्यावर बाकीचे प्रवासी तुटून पडले तरी चारचौघात हावरटासारखं घ्यायचं नाही ही शिकवण असल्यामुळे मी उगीचच थोडंस घेतल्यासारखं केलं. 

ते विमान उतरलं तो विमानतळही छोटाच होता. विमानातून उतरायला एक शिडी लावली. मी खाली उतरायला शिडीवर उभा राहीलो आणि अति गारव्यामुळे पोटरीत गोळा आला. मला उतरणं मुश्कील झालं. एप्रिल मधे किती थंडी असून असून असणारे असा विचार करून कुठलेही गरम कपडे न घेता मी बिनधास्तपणे आलो होतो. कुणाला माहिती होतं यांची एप्रिलची थंडी पुण्याच्या डिसेंबरतल्या पेक्षा जास्त असते ते? पुण्याच्या गारव्याला थंडी म्हणणं म्हणजे शॉवरला मुसळधार पाऊस म्हणण्यासारखं आहे. मनातल्या मनात बापुजींना नमस्कार केला व पाय चोळत चोळत कसाबसा खाली उतरलो. न्यायल्या आलेल्या गाडीतून हॉटेलवर जाताना हिरव्या झाडीनं गच्च भरलेल्या टेकड्या पाहिल्यावर वाटलं आपल्याकडे 'रिकाम'टेकड्यांचं प्रस्थ जास्त आहे. हिरव्या रंगाच्या किती त्या छटा! वा! गाडीचा स्पीडोमीटर अधून मधून मी पहात होतो. विमानतळावरून बाहेर पडताना तिचा वेग ६० किमी होता तो हायवे लागल्यावर  २०० किमीच्या पलिकडे गेलेला पाहून मी त्याहून जास्त वेगाने देवाचा धावा करायला लागलो. डेक्कन क्वीनपेक्षा जोरात जाणारी गाडी असू शकते हे तेव्हा माझ्या गावीही नव्हतं.

रात्री जेवायला जाण्यासाठी खोलीच्या बाहेर पाऊल ठेवलं आणि एकदम लॉबीतले दिवे लागले. कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवली आहे की काय असं वाटून मी दचकलो. नंतर लक्षात आलं की ते लॉबीत हालचाल झाली की आपोआप लागणारे होते. हॉटेलातल्या १/२ लोकांना इंग्रजी येत होतं म्हणून हॉटेलातच खायचं ठरवलं. पण ते दर वेळेला हजर असण्याची गॅरंटी नव्हती. इकडचे वेटर आणि वेटरिणी आपण टेबलावर बसल्यावर हसतमुखानं स्वत:ची ओळख करून देतात व पहिल्यांदा काय पिणार म्हणून विचारतात. आमच्याकडचे वेटर कंटाळलेल्या चेहर्‍यानं आपण टेबलावर बसल्या बसल्या कळकट बोटं बुचकळलेला पाण्याचा ग्लास आणि मेन्यू समोर आपटतात. अमृततुल्यात तर 'फडका मार रे बारक्या!' असा मालकानं आवाज दिल्याशिवाय टेबल पण पुसायची तसदी घेतली जात नाही. इकडे आल्यावर पहिल्यांदा समजलं की दारू किंवा ज्यूस या जेवणाबरोबर प्यायच्या गोष्टी आहेत. दोन तीन दिवस करून बिअर बरोबर जेवलो. पण पाणी ते पाणीच! मग मात्र सरळ पाणी मागितलं. त्यामुळे पाणी ही पण प्यायची गोष्ट असते ते वेटरला पहिल्यांदा समजलं. हॉटेलातला मेन्यू वाचण्याचा घोळ नको म्हणून आम्ही ज्या हॉटेलात रहात होतो तिथल्याच रेस्टॉरंट मधे खायचो.. कारण, तिथे दोन्ही भाषेतले मेन्यू होते.. पण, इंग्रजी मेन्यू मधे फक्त चार पाचच नावं होती. जर्मन मेन्यू मधे ढीगभर होती. काही दिवस इंग्रजी मेन्यू खाऊन कंटाळल्यावर मी जर्मन मेन्यूतलं खाण्याचा धाडशी निर्णय घेतला. उच्चार करण्याची बोंबच असल्यामुळे मी वेट्रेस आल्यावर जर्मन मेन्यूवर एका ठिकाणी बोट ठेवून आत्मविश्वासाने ऑर्डर ठोकली. जे आलं ती स्वीट डिश होती. ते गिळून झाल्यावर मेनूच्या दुसर्‍या भागात बोट ठेवलं. जे आलं तो मेन कोर्स होता. पण स्वीट डिशनंतर मेन कोर्स खाणारा म्हणून आजुबाजूच्या गिर्‍हाईकांची फुकटची करमणूक मात्र केली.

दांडगे पक्का शाकाहारी होता. त्याला कंपनी म्हणून १/२ दिवस सॅलड नामक पालापाचोळा खाल्ला. 'त्या' काळी शाकाहारी जेवण असू शकतं याची त्यांना कल्पना नव्हती आणि बाहेर शाकाहारी मिळायचा वांधा असतो याची आम्हाला! रिसेप्शन मधे एका टोपलीत फळं ठेवलेली असायची. मला आधी तो डेकोरेशनचा प्रकार वाटला. भुकेलेल्या दांडगेनं न राहवून एकदा रिसेप्शनिस्टला विचारल्यावर फळं घेण्यासाठीच ठेवली आहेत हे समजलं. असं काही दांडगेच करू जाणे! माझं काही तिला विचारायचं धाडस झालं नसतं. आणखी काही दिवस सॅलड खाल्लं तर मी बकरीसारखा बँ बँ करायला लागेन अशी भीती वाटल्यामुळे मी सर्रास चिकन वगैरे मागवायला लागलो तो पर्यंत त्याची मशरूम आमलेट पर्यंत प्रगती झाली. आणखी दोन दिवसानंतर त्याची विकेट पडली व तो ही बिनधास्त चिकन मागवायला लागला.

दुसर्‍या दिवशी त्यांच्या ऑफिसात गेलो. कुठं ते भलं मोठ्ठं ऑफिस व प्रचंड कार पार्क आणि कुठं ते आमचं एका तिमजली बिल्डिंग मधल्या बारक्या फ्लॅट मधलं! काही तुलनाच नाही. कार्ड सरकवून ऑफिसची दारं उघडायची आयडिया तर भन्नाट! आमच्या पुण्याच्या ऑफिसच्या किल्ल्या २/३ लोकांकडेच असायच्या. त्यातला एक जण येईपर्यंत झक मारत बाहेर उभं रहायला लागायचं. तिथे आम्हाला एक खोली मिळाली, त्यात आम्हाला लागणारं सगळं होतं. आठवडाभर इथे बसून त्यांच्या कोडवर डोकं आपटायचं होतं! कोड बघून मात्र तोंडाला फेस आला. आधीच दुसर्‍याचा कोड वाचणं ही शिक्षा असते. मला तर मी लिहीलेलाच कोड काही दिवसांनी समजत नाही. आणि त्यात जर्मन मधे कॉमेंट व व्हेरिएबलची नावं असलेला कोड म्हणजे तर काळ्या पाण्याची शिक्षा! अर्थात कोड दुसर्‍या कंप्युटरवर नेण्यासाठी सगळा समजण्याची गरज नव्हती. जो कोड दुसर्‍या कंप्युटरवर जसाच्या तसा चालणार नाही तोच फक्त समजण्याशी मतलब होता. सुदैवाने मला त्यांच्या कोडमधे काही चुका दिसल्या. अशा चुका चंद्या माझ्या कोड मधून नेहमी काढायचा. म्हणतात ना दुसर्‍याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं इ. इ.? पण त्या चुकांमुळे मला त्यांच्यात आणि माझ्या कुवती मधे एक प्रचंड दरी आहे असं जे वाटत होतं ते कमी झालं. हे जाणवलं की सगळे कोडगे एका माळेचे मणी!

दरम्यान जर्मन ऑफिस मधल्या एकानं, फ्रेडीनं, नवीन गाडी घेतली म्हणून सगळ्यांना पार्टी द्यायचं ठरवलं. त्याकाळी भारतात घरी गाडी असणं म्हणजे अति श्रीमंतीचं लक्षण! खाजगी गाडीत बसण्याचा अनुभव नाहीच त्यामुळे! तो आम्हाला स्वतःच्या गाडीतून पार्टीला घेऊन जाण्यासाठी आला. आम्ही दोघेही मागे बसायला लागल्यावर त्यानं मला पुढे बसायला सांगितलं. त्या पार्टीत एक बाई तिच्या फॅमिली बद्दल सांगत होती. ती आणि तो कसे शाळेत बरोबर होते पण तेव्हा कसं त्यांना एकमेकांबद्दल प्रेम वाटत नव्हते. मग एका पार्टीत कसे भेटले, आता किती मुलं आहेत इ. इ. मी मधेच नाक खुपसलं.. मग लग्न केव्हा झालं? तर ती एकदम दचकली आणि माझ्याकडे 'लग्न म्हणजे काय असतं?' अशा चेहर्‍यानं बघत मान या कानापासून त्या कानापर्यंत हलवत म्हणाली... 'नोssssss! वुई आरन्ट मॅरीड!' बों ब ला! बाकी परदेशी गेल्यावर सांस्कृतिक धक्के आणि शिष्टाचारौत्पाताला ऊतच येतो! पार्टी नंतर परत हॉटेलवर जाण्यासाठी कंपनीची गाडी आली होती. फ्रेडी पण टाटा करायला आला. मी पुढे बसायला निघालो तर त्यानं मला मागे बसायची खूण केली. मी खलास! त्याला विचारल्यावर तो म्हणाला 'अरे गाडी शोफर चालवणार असेल तर मागे नाहीतर पुढे!

आम्ही संध्याकाळी गावात चक्कर मारीत असू. तिथली दुकानं तिथले भाव असं बघत फिरायचो. न्हाव्याच्या दुकानातले भाव बघून वाटलं इथला न्हावी केस आणि खिसा एकदमच कापतो की काय? क्रॅश कोर्सनं मला एक दोन जर्मन वाक्यं पढवली होती. त्यातलं एक म्हणजे 'मला जर्मन बोलता येत नाही' हे होतं. लहानपणी आपण कसं मुंगूस दिसल्यावर 'मुंगसा! मुंगसा! तोंड दाखव नाही तर तुला रामाची शप्पथ आहे' असलं काहीतरी म्हणायचो तसं मी ते ठेवणीतलं वाक्य कुणी जर्मन मुंगूस अंगावर आलं की फेकायचो. एकदा धीर करून एका दुकानात काय आहे ते बघायला गेलो तर तिथली बाई जर्मन भाषेत फाडफाड काहीतरी बरळली. मी 'मला जर्मन बोलता येत नाही' हे घाईघाईनं तिच्यावर फेकलं. आता ती तोडक्या मोडक्या इंग्रजीत बोलेल अशी माझी अपेक्षा होती.. पण तिने ती मगाचीच जर्मन वाक्यं डेक्कन क्वीनच्या स्पीड ऐवजी बार्शी लाईटच्या स्पीडनं टाकली. मी बधीर! मग उगीचच मान हलवून समजल्यासारखं 'या! या! डान्क! डान्क!' असं म्हणत तिथून सटकलो.

परतीच्या प्रवासासाठी भल्या पहाटे उठून गाडीनं विमानतळाकडे निघालो. येताना दिसलेले हिरवे कंच डोंगर जाताना धुक्याचा मफलर मानेभोवती गुंडाळून एकटक समोर बघत बसलेल्या म्हातार्‍यासारखे दिसत होते. परतीच्या प्रवासात चेकिनसुंदरीनं एका सरदारजीचं जास्तीचं सामान आमच्या नावावर घ्यायची विनंती केली ते सोडता विशेष काही घडलं नाही. मुंबईत उतरल्या उतरल्या तो विशिष्ट दर्प नाकात शिरताच मला अगदी तुरुंगवासातून सुटका झाल्यासारखं मोकळं मोकळं वाटलं. मार्केटिंग मॅनेजरनं आम्हाला सापडलेल्या चुकांचं भांडवल करून प्रोजेक्ट मिळवल्याचं सांगितलं तेव्हा माझ्या अंगावर जे मूठभर मांस चढलं ते अजून उतरलेलं नाहीये!

== समाप्त ==

Monday, October 29, 2018

आर्किमिडीजचा स्क्रू!

आर्किमिडीजचं नाव घेतलं की बहुतेकांना त्याचा शोध नक्की काय होता ते भले सांगता येणार नाही पण तो नग्नावस्थेत युरेका! युरेका! (खरा उच्चार युरिका आहे म्हणे) ओरडत रस्त्यातून पळाला होता हे डोळ्यासमोर नक्की येईल! पाठ्यपुस्तकं रंजक करण्यासाठी ज्या गोष्टी घालतात नेमक्या त्याच जन्मभर लक्षात रहातात. असो! आर्किमिडीजने बरीच उपयुक्त यंत्रं बनविली त्यातलंच एक आर्किमिडीजचा स्क्रू आहे!

आर्किमिडीजचा स्क्रूचा वापर करून पाणी वर खेचता येतं! आर्किमिडीजचा स्क्रू हा एक मोठ्या आकाराचा स्क्रूच आहे. त्याचं एक टोक पाण्यात बुडवून तो फिरविला की पाणी त्या स्क्रुच्या आट्यातून वर वर येतं. चित्र-१ मधे पाणी वर चढविण्यासाठी एक मुलगा पायाने तो स्क्रू फिरवतो आहे.

आर्किमिडीजचा स्क्रू: एक बागेतलं खेळणं

चित्र-१: आर्किमिडीजचा स्क्रू कसा चालतो ते समजण्यासाठी केलेलं फॉलकर्क या स्कॉटलंड मधील गावातल्या एका बागेतलं खेळणं.

या उलट पाणी स्क्रू मधून सोडलं की स्क्रू फिरायला लागतो. या तत्वाचा वापर केला आहे वीजनिर्मितीसाठी! अशा पद्धतीच्या उलट सुलट क्रिया प्रक्रिया तंत्रज्ञानात इतरत्र पण वापरल्या गेल्या आहेत. उदा. तारेच्या भेंडोळ्याने चुंबकीय क्षेत्र छेदलं की तारेत वीजप्रवाह निर्माण होतो. याचा उपयोग जनित्राने वीजनिर्मिती करण्यासाठी केला जातो. तसंच तारेतून वीजप्रवाह सोडला तर तिच्या भोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जवळचा चुंबक खेचला किंवा ढकलला जातो. इलेक्ट्रिक मोटर या तत्वावर चालते.

आर्किमिडीजचा स्क्रू वापरून वीज निर्मिती

चित्र-२: आर्किमिडीजचा स्क्रू नदीतल्या बांधावर बसवून वीज निर्मिती कशी करता येते त्याची आकृती!


आर्किमिडीजचा स्क्रू पद्धतीच्या वीजनिर्मितीचे अ‍ॅनिमेशन

वीजनिर्मिती साठी स्क्रू फिरवायला पाण्याला फक्त पुरेसा दाब हवा! बांधाची उंची सुमारे १ मीटर ते १० मीटर या मधे आणि पाण्याच्या प्रवाहाचा वेग सेकंदाला सुमारे ०.०१ मीटर क्युब ते सेकंदाला १० मीटर क्युब या मधे असला की झालं. इंग्लंड मधील बर्‍याच नद्यांमधे जागोजागी बांध आधीपासून आहेत. पूर्वी बांधात अडविलेल्या पाण्याच्या जोरावर गिरण्या चालवीत असत. आता त्या बंद पडल्या असल्या तरी बांध तसेच आहेत.

ऑक्सफर्ड मधे गेल्या तीन वर्षात थेम्स नदीवरील दोन बांधांवर या तत्वावर वीजनिर्मिती सुरू झाली आहे. त्यातला पहिला प्रकल्प ऑक्सफर्ड मधील ऑस्नी गावात २०१५ मे मधे सुरू झाला. त्या प्रकल्पाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचे बहुतांश भागिदार हे ऑस्नी गावातले रहिवासीच आहेत. दुसरा प्रकल्प ऑक्सफर्ड मधील सॅन्डफर्ड गावात २०१७ मधे सुरू झाला. तो ही रहिवाशांच्या भागिदारीतून उभारलेला आहे. सॅन्डफर्ड येथील बांधाची उंची ७ मीटर इतकी आहे. यातून प्रति वर्षी १.६ मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होऊ शकते. सॅन्डफर्ड मधे एका शेजारी एक असे तीन स्क्रू बसविलेले आहेत. चित्र-३ पहा. 

सॅन्डफर्ड येथील तीन स्क्रू

सॅन्डफर्ड येथील तीन स्क्रू

चित्र-३: सॅन्डफर्ड मधे बसविलेले तीन आर्किमिडीजचे स्क्रू
प्रत्येक स्क्रू महाकाय आहे. एकेका स्क्रूचं वजन २२ टन आहे. चित्र-४ पहा.

महाकाय स्क्रू

चित्र-४: सॅन्डफर्ड मधील एका आर्किमिडीजचा स्क्रू चा आकार

आर्किमिडीजचा स्क्रूचा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे तो प्रवाहाच्या दिशेने जाणार्‍या माशांना कुठल्याही प्रकारचा अडथळा करीत नाही. वरील व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे मासे स्क्रू मधील पाण्या बरोबर सहजपणे वहात वहात जाऊ शकतात. प्रवाहाच्या उलट दिशेने जाणार्‍या माशांसाठी सर्व धरणांच्या बाजूला एक खास पाण्याचा प्रवाह ठेवलेला असतो त्याला फिश लॅडर म्हणतात. दर वर्षी उन्हाळ्यामधे सालमन मासे समुद्रातून नद्यांमधे प्रजननासाठी येतात. त्यांना काय खुजली असते काय माहिती! पण ते बारक्या सारक्या अडथळ्यांना न जुमानता प्रवाहाच्या विरुद्ध जातात. खालील व्हिडिओत ते छोट्या छोट्या धबधब्यांवरून सरळ उड्या मारत जाताना दिसतील.


तसंच अतिवृष्टी मुळे नदी जवळच्या रस्त्यावरून पाणी वहात असेल तर ते रस्ता ओलांडायलाही कचरत नाहीत.


माशांना धरणाच्या बाजूने वर जायला रस्ता आहे हे कसं समजतं ते देवाला ठाऊक! पण त्यांना तो सापडतो हे मात्र खरं आहे. हे सर्व उपाय एका विशिष्ट आकारापर्यंतच्या माशांसाठी ठीक आहेत म्हणा! अगदी मोठ्या आकाराचे मासे नदीच्या खाडीत फार फार तर येतात पुढे जात नाहीत. सप्टेंबर २०१८च्या शेवटी एक बेलुगा जातीचा देवमासा लंडन मधे थेम्स नदीत ४/५ दिवस घुटमळत होता. अर्थातच तो चुकला होता.

-- समाप्त --

Tuesday, October 23, 2018

ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या....

'दिवाळीचा काय प्लॅन आहे रे बंड्या?'.. अष्टपुत्रेंनी आठव्यांदा विचारल्यावर बंड्या 'पुण्याला जायचा विचार आहे' असं गुळमुळीतपणे पुटपुटला. त्याला कारण तसंच होतं. अष्टपुत्रेंना विषय मिळायचा अवकाश की ते त्यावर तासनतास ब्रेथलेस गाण्यासारखे बोलू शकायचे. पण त्यांना टाळता येणं शक्य नव्हतं. कारण त्याच्या गावात मराठी टाळकी कमी असल्यामुळे कुठल्याही समारंभात तीच तीच पुनःपुन्हा भेटायची. इंग्लंडातली मराठी मंडळी चक्क एकमेकांना धरून असतात हे समजलं तर अखिल महाराष्ट्रातले कट्टर मराठी झीट येऊन पडतील. असो! पण बंड्याच्या चावीमुळे लंडन पुणे प्रवासावरचा त्यांचा हातखंडा एकपात्री प्रयोग सुरू झाला!

'मी सांगतो तुला बंड्या! सकाळच्या विमानाने अजिबात जाऊ नकोस.'
'क क का? तिकीट स्वस्त आहे!'.. बंड्याचा चेहरा पडला.
'अरे असं किती स्वस्त असणारे? फार तर फार १५ पौंड! पण कटकट बघ किती होते. सकाळी ९ च्या आसपास विमान असतं म्हणजे ७ च्या सुमारास हिथ्रोवर पोचायला हवं! इथून हिथ्रोला जायला दीड तास तरी लागतोच लागतो. म्हणजे साडे पाचला निघायला हवं! त्यासाठी ४/४:३० ला उठायचं म्हणजे किती कटकट! इतकं करून मधे कुठे ट्रॅफिक जॅम होत नाही ना याची धाकधुक! विमान पोचतं रात्री ११ च्या सुमारास! मग टॅक्सी घेऊन पुण्याला पोचेपर्यंत पहाटेचे ३ तरी वाजतातच. आपण गेल्यावर सगळे उठतात. मग चहा पाणी आणि प्रत्येक जण आपली उलटतपासणी करेपर्यंत सकाळ होते. म्हणजे झोपेचं भजं!'
'पण माझा आदल्या रात्री तिथे जवळच्या हॉटेलात रहायचा प्लॅन आहे'.. बंड्या आपल्यालाही विचार करता येतो याची चुणुक दाखवायला गेला आणि ये रे बैला करून बसला.
'आयला! तू १५ पौंड वाचवायला १०० पौंडाच्या हॉटेलात रहाणार? देशस्थ शोभतोस अगदी! हा हा हा! अर्थात मी ते पण करून बसलोय म्हणा! त्याची पण गंमत सांगतो तुला!'.. अजून जेवायला वेळ होता तो पर्यंत आख्यानातुन सुटका नव्हती.......

मी एक स्वस्तातलं हॉटेल घेतलं होतं ज्यांची हिथ्रोवर न्यायची आणायची फुकट सेवा होती. स्वस्त म्हणजे तरी ७० पौंड बरं का? मग इथून थेट हिथ्रोची बस घेऊन महाशय आदल्या दिवशी संध्याकाळी हिथ्रोच्या फलाटावर दाखल झाले. तिथून हॉटेलला गाडी पाठविण्यासाठी फोन लावला. अष्टपुत्रेंनी कानापाशी मूठ नेली.
'तू कुठे आहेस?'.. रिसेप्शनिस्ट म्हणाला.
'टर्मिनल ४ वर, अरायव्हल पाशी'
'ठीके. मी गाडी पाठवतो. गाडीचा नंबर आहे.. एक्स एल ५२ व्ही आर वाय. तू असं कर. टेक अ लिफ्ट अँड गो टू डिपार्चर गेट जी अ‍ॅज इन गॅरी'
'ओके.' तो गाडी कुठे पाठवतोय ते ऐकता ऐकता गाडीचा नंबर विसरलो. त्यांना काय सांगायचं ते तोंडपाठ असतं, ते वाघ पाठीमागे लागल्यासारखे एका दमात सगळं सांगतात, आपण त्याच दमात विसरतो.
लिफ्ट घेऊन डिपार्चर मधे आलो. ते शिंचं गेट जी काही सापडेना. इकडे तिकडे केल्यावर शेवटी तिथल्या एका कामगाराला विचारलं..
'अरे भाऊ! इथे गेट जी कुठे आहे?'
'गेट जी? असं काही नसतं. इथल्या गेटांना नंबर आहेत. एक दोन तीन असे'
म्हंटलं हा रिसेप्शनिस्ट पुरूष असूनही असं कसं भलतंच सांगतो? बाई असती तर समजू शकलो असतो मी! बायका तोंडाला येईल ते बोलतात. जिथं उजवीकडे वळायला हवं असतं तिथं खुशाल डावीकडे वळ म्हणतात.

'मी ऐकतेय हांssssss!... आतून सौंचा आवाज आल्यावर अष्टपुत्रेंनी मिष्किल हसत डोळा मारला आणि मानेनेच 'पाहिलंस?' असं विचारलं.
'मग?'.. बंड्याला त्यांचं आख्यान लवकर संपण्यात जास्त रस होता.
'मग काय? परत फोन.'.. परत कानापाशी मूठ!
'अरे बाबा! मी तो मगाच्चाच टर्मिनल ४ वाला. इथे गेट जी असं काही नाहीये रे!'
'अहो! मी गेट जी नाही म्हणालो. तुला गेट ऐवजी चुकून दुसरं काही वाटू नये म्हणून मी पहिलं अक्षर सांगितलं. जी!'.. त्या रिसेप्शनिस्टला मनातल्या मनात मी निवडक शेलक्या शिव्या हासडल्या.
'ओके. मग मी काय करू आता?'
'तू आत्ता कुठे आहेस?'
'डिपार्चर'
'लेट्स डू धिस केअरफुली नाऊ! तू अरायव्हला जा. तिथून लिफ्टने डिपार्चरला ये. मग गेट मधून बाहेर पड. तिथे बरेच बसस्टॉप दिसतील तिथे थांब'
अरे माठ्या! मी डिपार्चरलाच आहे. असं जोरात ओरडून सांगावसं वाटलं मला. म्हंटलं हा रिसेपशनिस्ट आहे की गणितज्ज्ञ?

'गणितज्ज्ञ?'... बंड्याला आपल्या क्रिकेटपटुंसारखी त्याच त्याच चुका करून आउट व्हायची सवय आहे. त्याच्या प्रश्नामुळे एक उप-आख्यान सुरू झालं.
अरे! तुला माहिती आहे का? कुठल्याही नवीन प्रश्नाचं रुपांतर ज्याचं उत्तर माहिती आहे अशा प्रश्नात करण्यामधे गणितज्ज्ञांचा हातखंडा असतो. समजा एका गणितज्ज्ञाला असा प्रश्न टाकला... तुला एक पातेलं, चहा, साखर, गॅस, दूध, पाणी इ. सगळं दिलेलं आहे. तर तू चहा कसा करशील? तर तो सांगेल.. पातेल्यात चहा, साखर पाणी घालून गॅस पेटवून त्यावर ते उकळायला ठेवेन. उकळल्यावर त्यात दूध घालून अजून एक उकळी आणेन. मग कपात चहा गाळून घेईन... मग त्याला जरा वेगळा प्रश्न टाकला.. समजा आता तुला पेटवलेल्या गॅसवर पातेलं ठेवून दिलेलं आहे. पातेल्यात चहा साखर पाणी घातलेलं आहे. तर आता चहा कसा करशील?
तर तो काय म्हणेल? पातेलं गॅसवरून उतरवेन. त्यातलं सगळं पाणी फेकून देईन. म्हणजे मग या प्रश्नाचं रुपांतर पहिल्या प्रश्नात होईल ज्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे. आता बोल! हा हा हा हा हा!.. अष्टपुत्रे बेदम हसले व बंड्या कसंनुसं हसला.

'काय सांगत होतो मी?'.. अष्टेकरांनी गेट हरवल्यासारखा चेहरा केला.
'चहा कसा करायचा'
हां!.. मग एकदाचा हॉटेलवर पोचलो. स्वस्तातलं हॉटेल घेतल्यामुळे रुममधे टॉयलेट/बाथरूम नव्हतं. होतं फक्त बेसिन! पहाटे उठून जायचं असल्यामुळे रात्रीच अंघोळ उरकण्याचं ठरवलं. माझ्या मजल्यावर कुठेही बाथरूम नव्हती. शोधाशोध केल्यावर ती वरच्या मजल्यावर सापडली. कुणीतरी गेलेलं होतं. म्हणजे समजलं का? जवळपास १५ खोल्यांमधे एकच बाथरूम होती. परत खोलीत गेलो. दोन-चार वेळा वरखाली केल्यावर एकदाची ती बाथरूम रिकामी सापडली आणि अंघोळ उरकली.
सकाळी उठून तयार होऊन विमानतळावर नेणार्‍या गाडीसाठी रिसेप्शन मधे आलो. मी धरून ७ लोक तिथे होते. गाडीत ड्रायव्हर सोडून ७ च शिटं होती. पण एका  जोडप्याकडे भला मोठा लांबडा सर्फिंग बोर्ड होता. तो दोन रांगेतल्या दोन माणसांच्या मानांमधून पार डिकीपासून ड्रायव्हर पर्यंत पसरला. गाडीच्या प्रत्येक वळणाबरोबर बोर्ड गालाशी नको तितकी सलगी करत होता. मला 'सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना गाल-ए-कातिल में है?' असं ताठ मानेनं म्हणावसं वाटलं. एकदाचं सर्फर लोकांचं टर्मिनल आलं आणि ते बोर्डासकट गुल्ल्याड झाले आणि मी यथावकाश टर्मिनल स्थित झालो.

घुssssssर्रsssssssss! एव्हाना बंड्यानंही झोपेचं टर्मिनल गाठलेलं होतं.

------***-----------***---------

बंड्यानं अष्टपुत्रेंच्या सल्ल्यापेक्षा नंतरच्या आख्यानांना घाबरून रात्रीच्या विमानाचं तिकीट काढलं. ट्रॅफिक जॅममुळे अर्धा तास उशीरा विमानतळावर पोचला. विमानतळ कसला? प्रवासीतळच म्हणायला पाहिजे खरं तर! आता बंड्या पण इथे तळ ठोकून बसणार नव्हता का?.. विमान धक्क्याला लागेपर्यंत? विमानतळ म्हणतात तसं बसतळ किंवा रेल्वेतळ का नाही म्हणत? किंवा उलट विमानस्थानक का नाही?

चेकिन झाल्यावर सुरक्षा तपासणीच्या भल्या मोठ्या रांगेत उभं राहून एकदाचा तो सुरक्षा अधिकार्‍यापाशी पोचला. त्याच्याकडे फक्त एक खांद्यावरची बॅग होती. बंड्याला सुरक्षा तपासणीत कधीच सुरक्षित वाटायचं नाही. बॅग क्ष किरणातून गेल्यावर तिथल्या बाईला काही तरी संशय आला. तिनं त्याची बॅग उघडून काही कपडे, चॉकलेटं आणि काही छोटी खेळणी बाहेर काढली. सुरक्षा तपासणी ही आमच्या खाजगी आयुष्यावरील लज्जास्पद अतिक्रमण आहे असं काही म्हणता येत नाही दुर्दैवाने! तिनं शेव्हिंग फोम उचलून कचर्‍यात टाकला. बंड्यानं प्रश्नार्थक मुद्रा करताच तिनं तडफदारपणे '१०० एमएलच्या वरती न्यायला परवानगी नाही. लिहीलंय सर्व ठिकाणी!' असं 'काय गावठी लोक प्रवास करतात हल्ली' अशा अर्थानं मान वेळावत ठणकावलं. बंड्यानं 'अहो! पण त्यात काही फार शिल्लक नाहीये' असं काकुळतीने सांगितल्यावर तिनं विजयी मुद्रेनं तो डबा कचर्‍यातून बाहेर काढला त्या शेव्हिंग फोमच्या डब्यावर २०० एमएल लिहीलेलं दाखवलं आणि परत शेव्हिंग फोमम् समर्पयामि केला. मग तिनं त्यातल्या एका खेळण्याचं प्लॅस्टिक पॅकिंग फोडून एक चिमुकला स्क्रू-ड्रायव्हर काढून 'शार्प ऑब्जेक्ट्स नॉट अलाउड' म्हणत स्क्रू-ड्रायव्हरम् समर्पयामि केला. बंड्यानं तिलाच उचलून सुरक्षा नारिम् समर्पयामि करायची ऊर्मी कशीबशी दाबली.

शेवटी बंड्यानं एकदाचं विमानातल्या शिटावर बूड टेकवलं. शेजारची दोन शिटं रिकामी होती. बंड्यानं ती तशीच रिकामी ठेवण्याबद्दल देवाचा धावा केला पण आज देवाचा मूड बरोबर नव्हता. थोड्याच वेळात तिथे एक बाई आणि तिची सुमारे ३ वर्षाची मुलगी स्थानापन्न झाल्या. त्याचं पाय पसरून झोपायचं स्वप्न विरलं. बंड्यानं इकडे तिकडे आणखी कुठे रिकामी शिटं आहेत का ते पाहीलं. पण छे! सामान्यांचा विमान प्रवास म्हणजे इकॉनॉमी क्लास नामक खुराड्यात एक कोंबडी होऊन अंग चोरून तासनतास बसणं! इथे फक्त डोळ्यांची उघडझाप व श्वासोश्वास या दोनच गोष्टी शेजारच्याला धक्का न लागता करता येतात. विमान धावपट्टीकडे कूच करेपर्यंत हवाईसुंदरीने कवायत केल्यासारखे हातवारे करत संकट समयीचे उद्योग समजावले. एअरहोस्टेसला हवाईसुंदरी हा शब्द कुणा गाढवानं केला? त्याच न्यायानं नर्सिणीला दवाईसुंदरी का नाही केला? किंवा रिसेप्शनिस्ट बाईला स्वागतसुंदरी? विमान झेपावल्यानंतर बंड्या घाईघाईने व्हिडिओ कडे झेपावला. पण तो काही केल्या चालू होईना. बंड्यानं हवाईसुंदरीकडे तक्रार करताच 'सर, मी सांगते हं त्यांना' असं कृत्रिम स्मितासकट कृत्रिम मार्दवपूर्ण आवाजात ऐकायला मिळालं.

बंड्यानं नाईलाजाने डोळे मिटले.. आणि चक्क त्याला झोप लागली. थोड्या वेळानं आपण गर्दीतून चाललो आहोत आणि खांद्याला धक्के बसताहेत असं वाटलं. एव्हढ्यात आपण डेक्कनला पण पोचलो की काय या विचाराने जाग आली.. तर एक हवाईसुंदर त्याला हलवून 'वुड यु लाईक डिनर, सर?' असं घोगर्‍या आवाजात विचारत होता. हवाईसुंदर कसला हवाईटपोरी वाटत होता तो! च्यायला शांतपणे झोपू पण देत नाहीत लेकाचे! बंड्यानं तिरसटून 'काय आहे खायला?' विचारल्यावर 'फक्त चिकन आणि लँब इतकंच शिल्लक आहे, सर!' असं कृत्रिम स्मितासकट कृत्रिम मार्दवपूर्ण आवाजात ऐकायला मिळालं. शुद्ध शाकाहार्‍याने चुकून बोंबील खाल्ल्यासारखा त्याचा चेहरा झाला. आधी सांगून सुद्धा व्हेज कसं शिल्लक नसतं? बरीच कडकड केल्यावर हवाईसुंदर मागे गुप्त झाला आणि जादु केल्या सारखा एक व्हेज जेवण घेऊन हजर झाला. 'आता कसं काय व्हेज मिळालं रे तुला?' म्हणून बंड्यानं अजून चिडचिड केली. जेवण चालू असताना त्याला शेजारची बाई तिच्या मुलीला लाडानं मराठीत म्हणाली.. 'आता एका मुलीला पुण्याला कोण कोण भेटणारे?' आणि तिनं भोकाड पसरलं. त्या बाईनं कसं बसं करून तिला शांत केलं. बंड्या परत झोपायच्या तयारीत असताना ती बाई काहीही कारण नसताना मुलीला म्हणाली.. 'आता तिकडे गेल्यावर मराठीत बोलायचं बरं का सगळ्यांशी!'.. आणि तिनं परत भोकाड पसरलं. अर्धा तास भँ झाल्यावर ती थकून झोपली तर त्या बाईनं तिला 'चॉकलेट हवं का?' असं विचारून तिला रडवलं. बंड्यानं मोठ्या कष्टानं 'माता न तू वैरिणी' म्हणायचं टाळलं. त्या पोरीला बंड्यात कंसाचा चेहरा दिसायचा की काय कुणास ठाउक! कारण बंड्यानं तिच्याकडे नुसतं पाहिलं तरी ती जीव धोक्यात असल्यासारखी किंचाळायची. अशा परिस्थितीत बंड्याला त्याच्या बॉसची 'ती' बढाई आठवली नसती तरच नवल होतं. बॉसच्या आयुष्यात काहीही बरं घडलं की ती बढाईच असली पाहीजे अशी तमाम पोरांची खात्रीच असते. बॉस पुण्याहून मुंबईला विमानाने निघाला होता तेव्हा त्याच्या शेजारी एक सुंदर स्त्री बसायला आली. बॉसकडे बघून नर्व्हस हसली. मग विमान जसं धावपट्टीवर धावायला लागलं तसं तिनं त्याचा हात घट्ट धरला तो विमान खूप वर गेल्यावर परत नर्व्हस हसून हात सोडला. विमान उतरायच्या वेळेला तीच कथा! शेवटी न राहवून तिला बॉसनं विचारलं 'एकट्या प्रवास करताय म्हणून इतकं टेन्शन आलं का?'
'मी एकटी नाहीये, नवरा बरोबर आहे'
'आँ! जवळ जवळची शिटं नाही मिळाली का मग?'
'नाही नाही! तो विमान चालवतोय'.. यावर बॉस अवाक झाला.

रडण्या किंचाळण्याच्या पार्श्वभूमिवर कधी तरी मुंबईच्या कळकट इमारती दिसायला लागल्या आणि धुरकट हवेत विमान एकदाचं उतरलं. बाहेर पडल्यावर त्यानं एक पुण्याची टॅक्सी पकडली. टॅक्सी म्हणजे एक टेम्पो होता. दुपारी १२ च्या रणरणत्या उन्हात त्या टेम्पोची भट्टी झाली होती. बंड्याला कधी एकदाची गाडी सुरू होतेय असं झालं होतं. पण टॅक्सीवाला गाडी भरल्याशिवाय थोडाच सोडणार होता? ५ मिनिटांनी त्याच्या शेजारची बाई तिची मुलगी आणि एक माणूस गाडीत चढले आणि बंड्यानं मनातल्या मनात कपाळाला हात लावला. ती बंड्याकडे बघून हसल्यावर तो माहिती होतं तरी उगीचच म्हणाला..'तुम्ही पण पुण्याला चाललाय?'
'हो! हा माझा दीर, मला न्यायला आलाय.'
बंड्याचे आणि त्याचे नमस्कार चमत्कार झाले आणि एकदाचा तो टेम्पो सुरू झाला. मुंबईच्या प्रचंड गर्दीतून बाहेर पडेपर्यंत टेम्पो वेग पकडणं शक्य नव्हतं. आणि गर्दीमुळे ड्रायव्हरचा 'अडला हरी बिप बिप करी' झाला होता. गाडीची शिटं ढिल्ली होती. ब्रेक मारला की थोडी पुढे सरकायची आणि अ‍ॅक्सिलरेट केल्यावर मागे! त्यामुळे बंड्याची जड बुडाची बाहुली झाली होती. थोड्या वेळाने गाडीचा एसी चालत नसल्याची घामट जाणीव झाली. ड्रायव्हर म्हणाला थोडा धीर धरा पण धीर घामाच्या प्रत्येक थेंबाने सुटत गेला. कुणी तरी ड्रायव्हरला म्हणालं .. 'अहो हा एसी आहे की फॅन?'..
'साहेब! गाडीला जरा मौसम पकडू द्या मग समदं ठीक व्हईल.'.. गाडी गर्दीत कसला मौसम पकडणार? अर्धा तास झाला तरी गाडी विमानतळापासून फारशी दूर गेलेली नव्हती.

'व्हाय इज द एसी नॉट वर्किंग? डोन्ट ब्लफ मी हांss! खर खर सांग! दोन दोन गाड्या आहेत माझ्याकडे!'.. त्या बाईनं तिच्या फर्ड्या इंग्रजी मराठीत ड्रायव्हरला झापला. त्या बिचार्‍या ड्रायव्हरला काय इंग्लिश कळणार होतं?
मग ती बंड्याला म्हणाली.. 'आपण त्यांना फोन करून सांगू या. ते पाठवतील दुसरी गाडी. आपण एवढे पैसे मोजलेत!'
'बरं बघा प्रयत्न करून!'.. बंड्या नाईलाजाने म्हणाला. तिनं ऑफिसला फोन लावला मग ते ड्रायव्हरशी बोलले. ड्रायव्हरने त्यांना तेच सांगितलं. त्यांनी त्याला गाडीवर पाणी मारायचा सल्ला दिल्याचं त्यानं आम्हाला सांगितलं. पण त्या बाईला वाटलं एसीत पाणी नाहीये आणि ती बंड्याला म्हणाली.. 'बघा हं! आता एक एक बाहेर यायला लागलंय! आता म्हणतोय एसीत पाणी नाही.' बंड्याला हसू आवरेना. एसीच्या पाण्याबद्दल ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं.

ड्रायव्हरनं चेंबुरला एका गॅरेजपाशी गाडी थांबवून टपावर पाणी मारलं पण त्याचाही काही उपयोग झाला नाही. एसीतच प्रॉब्लेम आहे हे तिला एकदाचं समजल्यावर ती ड्रायव्हरला म्हणाली.. 'अरे तो एसीच चालत नाहीये! आमचे काही तुझ्यावर पर्सनल ग्रजेस नाहीयेत. एसी चालत नाही हे मान्य कर.'.. ड्रायव्हरने वाशीपाशी ते मान्य केलं. मग तिनं परत फोन करून तक्रार केली आणि त्यांनी गाडी पाठवायचं मान्य केलं. बंड्यानं सुटकेचा निश्वास टाकला. तो पर्यंत गाडी खोपोलीच्या रेस्टॉरंटाला लागली होती. तब्बल अर्धा तास थांबल्यावर पुढची गाडी आली. दुसरी गाडी येईपर्यंत निघायचं नाही असं ड्रायव्हरला सांगण्यात आलं होतं. तिचा दीर सगळ्यांकडे सहानुभूतिपूर्वक पहात होता. एकदाची ती गाडी आली. पण गाडीत जास्त जागा नसल्यामुळे फक्त ती, तिची मुलगी आणि दीर इतकेच लोक गेले. बाकीचे झक्कत त्या खटार्‍यातून निघाले. बरोबरच आहे म्हणा, रडक्या मुलांचेच लाड जास्त होतात! त्यातल्या त्यात सुखाची गोष्ट म्हणजे घाट चढता चढता हवा थंङ होत गेली आणि बंड्याला थोडी झोप मिळाली.

'काय कसा झाला प्रवास?'.. बंड्या घरी पोचल्यावर बाबांनी विचारलं.
'अहो बाबा! काही विचारू नका! काय वैताग आलाय म्हणून सांगू? बाप रे!'... असं म्हणत बंड्या उत्साहाने सांगायला लागला आणि थोड्याच वेळात....

घुssssssर्रsssssssss! बाबांनी झोपेचं टर्मिनल गाठलं आणि बंड्याला जाणवलं की त्याचा ही अष्टपुत्रे झालेला आहे.
म्हणतात ना... ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला!

-- समाप्त --

Thursday, August 2, 2018

इये स्वर्गाचिये नगरी!

या लेखाच्या पार्श्वभूमीसाठी वाचा:  'वादळ'

पहाटेच्या अंधुक प्रकाशात रस्त्यावर पडलेला गुंड्या उठला. त्याला त्याची रमोना थोड्या अंतरावर आडवी झालेली दिसली.. तिची चाकं अजून फिरत होती. इकडे तिकडे पाहिल्यावर बैलावर बसलेला व  पांढरे स्वच्छ कपडे परिधान केलेला एक माणूस दिसला.. तो साक्षात यमदूत होता.. पण बिचार्‍या गुंड्याला तो अंधुक प्रकाशात, कंदील न घेता बैल घेऊन जाणारा एक सामान्य माणूस वाटला. याच्या बैलाला धडकून आपण पडलो असं समजून गुंड्या भांडण्याच्या पवित्र्यात त्याच्यापाशी गेला. पण त्याचा तेजःपुंज चेहरा आणि चेहर्‍यावरचे सौम्य भाव पाहून थबकला. गुंड्याच्या मनातला गोंधळ जाणून यमदूत उद्गारला "भो वेंकट! तुझा या भूतलावरील कार्यभाग उरकला आहे. तस्मात् तू माझ्यासह प्रस्थान ठेव.".. संस्कृतप्रचुर भाषेची सवय नसल्यामुळे गुंड्याची बंद खोलीत सापडलेल्या चिमणीसारखी अवस्था झाली. 

"अँ! कौनसी भाषा में बोला तू? तू जो भी बोला ना, सब बंपर गया! मेरेसे मराठीमे नहीं तो हिंदीमे बात कर!"..भंजाळलेला गुंड्या बरळला.

"भो वेंकट! ..."

"अरे यार! तू बार बार भो भो मत कर! कुत्ते जैसा लगता है! और पहिले ये बता तू है कौन!"

यमदूताने 'भो'काड पसरण्यासाठी केलेला ओठांचा चंबू मुश्किलीने बंद केला व म्हणाला "मी यमदूत आहे."

"हा हा हा! सुभे सुभे पीके आया क्या रे? एक तो मेरेको ढुश्शी मारके गिराया, उपरसे खुदको यमदूत बोलता है?".. गुंड्याची जाम चिडचिड झाली. यमदूताला या सगळ्या शिव्याशापांची अर्थातच प्रचंड सवय असणार. स्थितप्रज्ञपणे त्याच्या रमोनाकडे आणि नंतर निश्चेष्ट शरीराकडे बोट दाखवत तो वदला "तू या चमत्कारिक वाहनावरून मार्ग क्रमित असताना एका दुर्घटनेमुळे गतप्राण झालास. हा बघ तुझा निश्चेष्ट देह!".

गुंड्याला एकीकडे आपला मृत्यू झाला आहे हे पटत होतं तर दुसरीकडे आपण जिवंत आहोत असं पण वाटत होतं. त्याच्या डोक्याची पार सापशिडी झाली होती! शेवटी बाजूला जमलेल्यांपैकी कुणालाच ते दोघे दिसत नाहीयेत याची नोंद होऊन गुंड्या वरमला - "यानेके तू सचमुचका यमदूत है क्या? हां! बचपनमें कहानीमें सुना था! माफ करना यमदूतभाय! पहचाननेमे गलती हो गई!".. त्याला यमदूतभाय संबोधून गुंड्यानं त्याचा पार टपोरी गुंड केला.

यमदूत असला म्हणून काय झालं? गाडीवरची टीका गुंड्या खपवून घेणं शक्य नव्हतं. खुद्द यमाला आपल्या रेड्याबद्दल एवढा अभिमान नसेल तेवढा गुंड्याला त्याच्या गाडीबद्दल होता - "अबे ए! इसको चमत्कारिक क्यूं बोला तुम? बैठ मेरे पीछे और मै तेरेको असली चमत्कार दिखाता है!" सामान्य लोकांना विख्यात व्यक्तिंच्या सर्व गोष्टींबद्दल जसं फालतू कुतुहल असतं तसलं कुतुहल यमदूताला त्या चिमुकल्या यंत्राबद्दल निर्माण झालं होतं.. त्याच्या आडदांड बैलापुढे एव्हढस्सं दिसणारं ते यंत्र दोन माणसांना सोडा पण स्वतःचं वजन तरी ओढेल की नाही ही शंका त्याला होती. पण कुतुहलाला मोल नसतं! तो त्याच्या मागे जेमतेम वीतभर जागेवर कसाबसा बसलाच. गुंड्यानं त्याच्या नेहमीच्या ष्टाईलीत एक-दोन जीवघेणे लॅप मारताच मृत्युगोलात मोटरसायकल हाणणार्‍या एखाद्या बेडर माणसाच्या मागे बसलेल्या सामान्य माणसासारखी त्या यमदूताची अवस्था झाली.. त्याला जणू स्वर्गच दिसला! घाईघाईने यमदूताने ते भयंकर लॅप आवरते घेण्याची विनंती केली.."भो वेंकट! तुझे या अजब वाहनावरचे नैपुण्य पाहून मी स्तिमित झालो आहे. कृपया प्रवास खंडित कर." गुंड्याने एक झोकदार वळण घेऊन बैलाशेजारी भसकन गाडी थांबवली.. बैलाने बावचळून त्यांच्यावर शिंगं रोखली. यमदूताने त्याला चुचकारून शांत करताच ते बैलावर आरूढ झाले. नंतर यमदूताने सुपरमॅनच्या थाटात पुढे झुकून एक हात वर केला.. आणि ते सुसाट स्वर्गाकडे निघाले.

स्वर्गातील एका घरासमोर गुंड्याला उतरवून यमदूताने त्याला घरात जायला सांगीतलं आणि तो बैल पार्क करायला गेला. घरावर 'यमसदन' अशी पाटी होती. दार खटखटवल्यावर एक अतिसुंदर स्त्री बाहेर आली.. समोर गुंड्याला बघून ती चित्कारली - "तू रे कोण मेल्या?". गुंड्या उत्तराची जुळवाजुळव करेपर्यंत आतून हातात लेखणी, पुस्तक तसेच कोंबडा व दंड धारण केलेला, काळ्याकुट्ट वर्णाचा चार हात असलेला एक इसम बाहेर आला. तो खुद्द यम होता. गुंड्याकडे एक नजर टाकून त्यानं शून्यात नजर लावली. तो बहुतेक एका वहीतील पाने चाळत असावा. कारण वही अदृश्य होती फक्त यमाचे हात व बोटं वही चाळण्यासारखे फिरत होते. मग त्याने खुलासा केला - "हा वेंकट असणार! हा नुकताच मेला आहे".. मग गुंड्याला म्हणाला - "भो वेंकट! मी यम! आणि ही यमी". यमानेही भो केल्यामुळे स्वर्गातले समस्त लोक 'भो'चक आहेत अशी गुंड्याची खात्री झाली. "तुम लोगोंसे मिलकर बहुत खुशी हुई!".. गुंड्याने असं म्हणताच यम आणि यमी दोघांनाही धक्का बसला कारण त्यांना भेटल्यावर खुशी होणारा पहिलाच मानव त्यांना भेटला होता. मग गुंड्या पुढे झुकून यमाच्या कानात कुजबुजला.. 'तुम्हारी पत्नी बहुतही सुंदर है!"... "भो वेंकट! ही माझी भार्या नाही भगिनी आहे".. यमाने अगतिकपणे सांगितलं. आपलं काहीतरी सॉलिड चुकलंय इतपत गुंड्याला समजलं पण नक्की काय चुकलंय ते नाही कारण त्याला भार्या आणि भगिनी हे दोन्ही शब्द त्याच्या डोक्यावरून गेले.

नंतर स्वर्गाच्या रितीप्रमाणे गुंड्याला प्रथम प्राथमिक आगमन केंद्रात हजर होऊन स्वर्गात आल्याची नोंद करायची होती. तिथे त्याची प्राथमिक चौकशी होऊन एक टोकन मिळणार होतं. त्यावरून त्यानं कधी चित्रगुप्तापुढे पापपुण्याच्या हिशेबासाठी हजर व्हायचं ते ठरणार होतं. तिथे गुंड्यानं स्वर्गात रहायचं की नरकात सडायचं त्याचा निर्णय होणार होता. यमाने सांगीतल्याप्रमाणे गुंड्या त्या केंद्राच्या आवारात दाखल झाला. पण केंद्रात खूप बॅकलॉग असल्यामुळे तिथे हीSS गर्दी होती.. पृथ्वीवरील लोकसंख्या वाढल्यामुळे मरणारेही वाढले होते.. त्याचा परिणाम स्वर्गातल्या प्रत्येक डिपार्टमेंटवरील ताण वाढण्यात झाला होता. पूर्वी व्हिसाच्या कार्यालयात काम केलेल्यांना हाताशी धरून यम कसंबसं भागवत होता. आता सरकारी कामांच्या पद्धती आयुष्यभर कोळून प्यायलेली मंडळी स्वर्गात आल्यामुळे सुधारू शकतात का? छे! त्यांनी त्यांच्या सरावाच्या पद्धती चोखपणे राबविल्या होत्या. त्यामुळे आधी एक अ‍ॅप्लिकेशन फॉर्म भरणं आवश्यक होतं. त्यात नाव गाव पत्ता, जन्म/मृत्यू तारखा, तुम्ही केलेल्या पापपुण्यांची यादी इ. गोष्टी होत्या! फॉर्म सोबत ३ फोटो मागे सही करून लावायचे, जन्म व मृत्यूची ओरिजिनल सर्टिफिकिटं व एकेक झेरॉक्स कॉपी आणि मागील ३ वर्षांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स जोडायचे होते! कळस म्हणजे सगळ्या व्हिसा फॉर्म वर शेवटी असतो तसा एक ष्ट्यांडर्ड प्रश्न पण होता.. या पूर्वी कधी अ‍ॅप्लिकेशन केला होता का? तेव्हा व्हिसा मिळाला होता की नव्हता?

महत्प्रयासाने रांगेचा शेवट शोधून गुंड्या उभा राहीला. रांगेत कित्येक एजंट आत्मे जवळ येऊन 'टोकन लवकर हवंय का? अ‍ॅफेडेविट करायचं आहे का?' अशी चौकशी करून जात होते. बराच वेळ होऊनही रांग फारशी सरकली नव्हती कारण पुढे आत्मे घुसत होते आणि वादावादी चालू होती. उद्विग्न चेहर्‍याने परत जाणार्‍या काही आत्म्यांना विचारल्यावर एकंदर प्रकरण गंभीर आहे असं गुंड्याच्या लक्षात आलं. ते आत्मे रांगेतल्या लोकांना वैतागून सांगत होते.. 'काही उपयोग नाही उभं राहून! ही माझी चौथी खेप आहे. दर वेळेला सांगतात दोन दिवसांनी या म्हणून! हरामखोर साले!'. शेवटी गुंड्याने कंटाळून एका एजंटाला हात केला. त्याचं नाव राजू पण तो स्वतःला राजू गाईड म्हणायचा. तो देवानंदचा फॅन होता. त्याची मान तिरकी ठेऊन बोलण्याची लकब तर हुबेहूब देवानंदसारखी होती!.. मनुष्य जन्मात आर्टीओपाशी एजंटगिरी करायचा आणि फावल्या वेळात गाईडचं काम! स्वर्गात नवीन नवीन आलेल्या आत्म्यांना त्यांच्या निवासाचा ठोस निर्णय होईपर्यंत अमृताचे पेग फुकट असतात. त्यातले दोन पेग हा राजू गाईडचा मोबदला ठरला. राजू गाईड त्याला बाजूच्या एका गल्लीतून घेऊन निघाला असताना रस्त्यात काहीजण रथांची दुरुस्ती करताना दिसले. राजू गाईडच्या माहितीनुसार ते रथ पाताळात हकालपट्टी होणार्‍या लोकांसाठी होते. त्यांची दुरुस्ती करणार्‍यांना पाताळयंत्री म्हणायचे!'. एवढ्यात बाजूने एक लावण्यवती, पायातल्या पैंजणांचा मंजुळ नाद करीत विहरत गेली. त्यावर गुंड्याचा लगेच - 'ये छम्मकछल्लो कौन है?' असा प्रश्न आला. अस्थायी बोलणं हा त्याचा स्थायीभाव होताच म्हणा! राजू गाईडने विव्हळून उद्गारला.."अबे ये छम्मकछल्लो नही है! ये मेनका है, मेनका!". गुंड्याने प्रत्यक्ष मेनकेला एक सामान्य आयटम गर्ल केल्यानं मधुबालेला राखी सावंत म्हंटल्या इतकं दु:ख झालं त्याला!

राजू गाईडनं ज्या कारकुनाच्या ऑफिसापाशी आणलं होतं तिथे इतर एजंटांनी आणलेल्या आत्म्यांमुळे बर्‍यापैकी रांग होती. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्याचा नंबर लागला. गुंड्या त्या कारकुनापुढे हाजिर होताच त्याचं पूर्ण नाव विचारण्यात आलं. गुंड्यानं "वेंकट रामन" सांगताच कारकून दचकला.
"आँ! तू कसा काय मेलास?".. कारकून त्याच्या वहीची पानं उलटसुलट करीत पुसता झाला.
"अ‍ॅक्सिडेंट हो गया, साब!"
"तसं नाही. तुझं नाव आमच्या यादीत नाहीये.".. कारकून वहीत शोधता शोधता म्हणाला.
"नाहीये? कोई लिखनेको भूल गया होगा! अभी लिख डालो!" गुंड्याचं अण्णालिसिस सुरू झालं.
"अरे बाबा! तू मरायलाच नको होतं. वेंकट प्रभाकर या नावाचा माणूस येणं अपेक्षित होतं.".. कारकुनाने दिलगिरी दाखविली.
"अच्छा! अच्छा! तो तुम लोग भलतेच आदमीको उठा लाये क्या? ठीक है! कोई वांधा नही! अब मुझे वापिस भेज दो!"
"अरे बाबा! आम्हाला तशी पावर नाय! तुला आता सुप्रीम कोर्टात जावं लागेल, तिथं निर्णय होईल! नेक्स्ट!". . गुंड्याकडे दुर्लक्ष करून कारकून ओरडला.

सुप्रीम कोर्टात म्हणजे खुद्द चित्रगुप्तापुढे उभं रहायचं होतं. त्याच्या कोर्टात भारतातल्या न्यायालयातलीच माणसं भरली होती. साहजिकच कुठलाही निकाल लवकर लागत नव्हता. नुसत्या पुढच्या तारखा मिळायच्या.. 'कोर्टाची पायरी चढू नये' असा इशारा स्वर्गात सुध्दा दिला जायचा तो त्यामुळेच! पण राजू गाईडच्या कॉन्टॅक्ट्समुळे आणखी दोन अमृत पेगांच्या मोबदल्यात गुंड्याची सुनावणी काही महिन्यातच झाली. निकालाच्या वकीली भाषेचा साधा अर्थ असा होता की त्याला परत पाठवणं शक्य नव्हतं कारण गुंड्याच्या वस्त्राचं म्हणजे शरीराचं तोपर्यंत दहन झालेलं होतं. स्वर्गात येऊन थोडाच वेळ झाल्यासारखं जरी वाटलं तरी पृथ्वीवर बरीच वर्षं उलटून गेलेली असतात. जर चूक लगेच लक्षात आली असती तर ताबडतोब शरीरात प्राण फुंकता आले असते. आणि त्या व्यक्तिला नुसता मृत्यू सदृश अनुभव येऊन गेल्यासारखं वाटलं असतं. तरीही ८४ लक्ष योनीतून न फिरविता लगेच मनुष्य जन्मात पाठवण्याचं आश्वासन मिळालं. पण अशाच पद्धतीने असंख्य चुकीची माणसं स्वर्गात आलेली असल्यामुळे परत जायची रांगही मोठ्ठी होती. नंबर लागायला वेळ लागणार होता. तो पर्यंत त्याला ट्रॅन्झिट व्हिसावर स्वर्गामधे निर्वासित छावणीत रहायची परवानगी उदार मनाने दिली गेली.

आता गुंड्याला काय वेळच वेळ होता. त्यानं व राजू गाईडनं जवळच्या अमृत पबकडे मोर्चा वळविला. जाता जाता नारदाची भेट झाली. नारदानं "नारायण! नारायण!" म्हणत तंबोरा वर करीत अभिवादन केलं. गुंड्याला असल्या अभिवादनाची सवय नव्हती, तो गोंधळला. गुंड्यानं प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहीलं. नारदानं परत "नारायण! नारायण!" चा जप केला. मग मात्र न राहवून गुंड्या त्याला म्हणाला "अरे यार! एक बार नाम बोलनेसे समझता है मेरेको! दो दो बार क्यूं बोलता है?". "ही कुठली यवनी भाषा?".. नारद संभ्रमात पडला. शिवाय त्याच्या तंबोर्‍यात बसवलेल्या गुगल ट्रान्सलेटरने 'एकदा माझ्या नावाचा अर्थ समजला की! आपण दोनदा बोलता का?' अशा केलेल्या भयाण भाषांतरामुळे त्याच्या मेंदूचा चाप निघाला. शेवटी राजू गाईडच्या मदतीमुळे त्याला खरा प्रश्न समजल्यावर तो उत्तरला.. 'वत्सा! तुजप्रत कल्याण असो! नारायण माझं नाव नाही. ते तर प्रत्यक्ष भगवंताचं नाव! माझं नाव नारद! तू कोण? नवीन दिसतोस". मग गुंड्याची सविस्तर कहाणी राजू गाईडच्या मदतीने पबमधे ऐकल्यावर नारदाने काही आतल्या गोटातल्या गोष्टी सांगितल्या. त्याचा सारांश असा:

नारदाला गुंड्यासारख्या केसेस खूप होऊन गेल्या आहेत हे माहीती होतं. त्यानं त्या संबंधात पूर्वी एकदा सरळ ब्रह्माला काडी लावली होती. समस्येचं गांभीर्य लक्षात येताच ब्रह्माला ब्रह्मांड आठवलं होतं म्हणे. त्यानं ताबडतोब इंद्राला योग्य ती कार्यवाही करायला सांगीतलं. इतर सिनिअर देवांबरोबर चर्चा करून इंद्राने सभा बोलावून असं भाषण ठोकलं.. "सर्व स्वर्गवासी देवदेवतांनो! नुकत्याच ज्या काही घटना उजेडात आल्या आहेत त्या सर्व देवसमाजाला मान खाली घालायला लावणार्‍या आहेत. कित्येक चुकीची माणसं स्वर्गात आणली गेली आणि भलभलते आत्मे पृथ्वीवर जन्म घेण्यासाठी पाठवण्यात आले. हे असंच चालू राहिलं तर आपल्यात आणि माणसात काय फरक राहिला? देवांचं देवपण शिल्लक रहाणार नाही. आपली विश्वासार्हता कमी होईल! देव आणि आत्मे बरोबरीने काम करतात. कारण कामाचा ताण वाढायला लागल्यामुळे आपण आत्म्यांची मदत घेऊ लागलो. पण त्याचबरोबर कामातली सुसूत्रता कमी झाली आहे. टीमवर्कचा अभाव दिसायला लागला आहे. टु अर इज स्पिरिट हे जरी असलं तरी या चुका कमी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पृथ्वीवर देखील अशा प्रकारच्या समस्या झाल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल केला. एच आर व क्वालिटी प्रणाली असलेली सर्वसमावेशक नवीन कार्यपद्धती अवलंबिली. आपणही तोच मार्ग चोखाळणार आहोत. लवकरच आपण हे सगळं मूळ पदाला आणू असा मला दृढ विश्वास आहे. त्याचबरोबर इतकी युगं मानवांना ज्ञान देणार्‍या आपल्यासारख्यांना हे मानवांकडून शिकावं लागतं आहे याची खंत पण वाटते आहे."

या भाषणानंतर अनेक कन्सल्टटांच्या मदतीने काम सुरू झालं. प्रथम जन्ममरणाच्या फेर्‍यांची प्रोसेस लिहीली ती अशी :- एखाद्याचा काळ आणि वेळ दोन्ही आले की त्याच्या मृत्यूचं चित्रगुप्ताच्या सहीचं फर्मान सुटतं. ते फर्मान यमाकडे जातं. यम त्याच्या टीमपैकी एकाला त्याचं पालन करायला सांगतो. तो त्या माणसाचा आत्मा घेऊन स्वर्गात येतो व यमाकडे आत्मा आणि फर्मान सुपूर्त करतो. नंतर चित्रगुप्ताच्या दरबारी त्या आत्म्याच्या पापपुण्याचा हिशेब होऊन तो स्वर्गात रहाणार की नरकात याचा निर्णय होतो. तो आत्मा जिकडे जाणार असेल तिथे त्याचं इंडक्शन होतं. पुनर्जन्माची वेळ येईपर्यंत ते आत्मे दिलेल्या जागी रहातात. ज्यांना मोक्ष मिळतो त्यांना स्वर्गाचं ग्रीनकार्ड मिळतं. या चक्रामधे आत्मा अमर असल्यामुळे प्रत्येक आत्म्याला एक युनिक नंबर देण्याची कल्पना आली. आणि आत्म्यांच्या ट्रॅकिंगसाठी डेडझिला नामक प्रणाली उभी करायचं ठरलं. त्यात आत्म्याचं लाईफ सायकल असं असणार होतं.. आत्मा एका शरीरात फुंकला की 'जन्म' होतो. लाईफ सायकल मधील जन्म ही एक स्थिती आहे. मृत्यू ही स्थिती नाही तर आत्म्याला शरीर विरहीत करायची प्रक्रिया आहे. आत्म्याचा युनिक नंबर आत्म्यावर बारकोडमधे गोंदवला तर नुसत्या बारकोड स्कॅनरने नक्की कोणता आत्मा स्वर्गात यायला हवा ते समजणं सहज शक्य होतं. अर्थात हा प्रकल्प एका झटक्यात पूर्ण होण्यासारखा नव्हता. जसजसे आत्मे स्वर्गात येतील तसतसं गोंदवण्याचं काम करायला लागणार होतं. पण आत्म्यावर गोंदवायचं कसं यावर मतभेद झाल्यामुळे तो बोंबलला.

दुसरीकडे चुकीचे आत्मे येण्याची काय कारणं असतील ती शोधण्यासाठी आत्म्याला स्वर्गात आणल्यावरती लगेच एक फॉर्म भरायचं ठरलं. त्यात माणूस मारताना आलेल्या अडचणी नोंदवायचं ठरवलं. त्याचं अ‍ॅनॅलिसिस केल्यावर जी कारणं समजली ती सगळ्यांना आधीपासूनच माहिती होती.
1. भारतातले पत्ते सापडत नाहीत.
2. काहींची खरी नावं वेगळी असतात. उदा. किशोरकुमार किंवा मधुबाला. पण चित्रगुप्ताच्या चोपडीत पाळण्यातल्या नावानं एंट्र्या असतात.
3. जुनी घरं/वाडे पाडून तिथे टोलेजंग इमारती झालेल्या असतात. पण चित्रगुप्ताच्या चोपडीत जुनेच पत्ते असतात.
४. यमदूत नीट नावं वाचत नाहीत.

सर्व कारणांवर सखोल चर्चा होऊन काही मार्ग सुचविण्यात आले. पहिल्या कारणासाठी पोस्टमनांच्या आत्म्यांची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांना देखील त्यांच्या नेहमीच्या भागातले पत्ते सोडता इतर पत्ते सापडत नाहीत असं निष्पन्न झालं. बाकी कारणांसाठी सगळ्यांना काही ट्रेनिंग कोर्सेस करायचं ठरलं पण अखिल स्वर्गीय देवदेवता कामगार संघटनेनं 'कामाचा ताण वाढतो' अशा सबबी खाली संप करून ते हाणून पाडलं. या सगळ्या प्रकारातून नेहमी पृथ्वीवर होतं तेच स्वर्गात झालं. धेडगुजरी प्रणाल्या वापरणं सुरू झालं.

असे अनेक दिवस सरले. दरम्यान स्वर्गविहार ट्रॅव्हल कंपनीच्या तर्फे गुंड्याचा सर्व स्वर्ग फिरून झाला आणि त्याचा परतीचा नंबर लागला. ते ऐकताच गुंड्या ओरडला..'चिमण! मै आ रहा हूं!' ती आरोळी ऐकताच मी खाडकन उठून बसलो. मग लक्षात आलं की तो आल्याच्या अनंत स्वप्नांपैकी ते एक होतं. पहाटेचं नसल्यामुळे खरं पण होणार नव्हतं.

-- समाप्त --

Monday, June 25, 2018

स्वप्नांवरती बोलू काही!

स्वप्नांच्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे. म्हणजे मला रोज तर्‍हेतर्‍हेची स्वप्न पडतात अशा अर्थाने हो! आणखी कुठल्या कुठल्या बाबतीत मी तर्‍हेवाईक आहे ते माझे हितचिंतक सांगतीलच. खरं म्हंटलं तर स्वप्न पडणं यात काही विशेष नाही कारण स्वप्नं सगळ्यांनाच पडतात. प्रत्येकाला रोज साधारणपणे ५ स्वप्नं पडतात आणि प्रत्येक स्वप्न सुमारे १५ ते ४० मिनिटं चालतं असं म्हणतात. काही लोकांना आपल्या बायकोने नक्की काय आणायला सांगितलं होतं हे जसं आठवत नाही तशी स्वप्नं पण नंतर आठवत नाहीत इतकंच! मग मी का स्वप्नांबद्दल बोलतोय? कारण माझी बौद्धिक क्षमता बघता मला फक्त स्वप्नांसारख्या हलक्याफुलक्या विषयांवरच त्यातल्या त्यात बोलायला जमतं. मी आयुष्यासारख्या जड गंभीर आणि किचकट विषयावर बोलू शकत नाही. शिवाय, मला असं जाणवलं की हल्ली मी स्वप्नांबद्दल बोलतच नाही. पूर्वी मला स्वप्न पडलं की मी सकाळी सकाळी बायकोला मार्टिन ल्युथर किंगच्या आवेषात 'I had a dream!' असं सांगायचो आणि ती तितक्याच थंडपणे 'हां, ती कालची भांडी घे धुवून!' असं सांगून माझ्या स्वप्नसृष्टीला सत्यतेची कल्हई लावायची. शिवाय मला असं वाटतं की बरेच लोकही त्याबद्दल बोलायच्या फंदात पडत नाहीत किंवा बोलायचं टाळतात. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या इकडचा मेसेज तिकडे फॉरवर्ड करण्याच्या जमान्यात आपली स्वप्नं खरडून दुसर्‍याला कळवायला कुणाला वेळ आहे? विचार करा, इतके मेसेजेस फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वरून आपल्यावर आदळतात त्यातले किती स्वप्नांबद्दल असतात? आपल्या स्वप्नांबद्दल प्रत्येकाने बोलायला हवं कारण स्वप्नं आपल्याला बनवतात.. दोन्ही अर्थांनी!

माझ्या दृष्टीने स्वप्नं म्हणजे सुप्त मनाने जागरुक मनाशी केलेली भंकस असली तरी स्वप्नांची गंमत वेगळीच आहे. आपलं स्वप्न हे एक डिझायनर स्वप्न असतं, आपण आपल्यासाठी बनवलेलं आणि फक्त आपणच अनुभवलेलं! आपलं अंतर्मन आपल्याच मनाच्या वळचणीत दडलेल्या कुठल्याशा सुप्त भावनांवर आधारित एक कथा, पटकथा संवाद झटपट तयार करून व त्यातल्या भूमिका वठवून आपल्या मनःपटलावर साकारतं हे मला फार थक्क करतं. स्वप्न निर्मिती पासून अनुभूति पर्यंतच्या सर्व भूमिका आपलं मन बजावतं. ज्या कुणाला आपण सर्जनशील नसल्याची खंत आहे त्यांनी याची जरूर नोंद घ्यावी!

कधी तरी कुठे तरी काही तरी पाहिलेलं, वाचलेलं किंवा ऐकलेलं तसंच आपल्या व लोकांच्या वर्तणुकीतलं काही तरी भावलेलं खुपलेलं आदि गोष्टींचं प्रतिबिंब स्वप्नात असतं. पण ही प्रतिबिंबं रूपकात्मक व अमूर्त स्वरुपाची असतात. बर्‍याच वेळेला तर ती दुर्बोध असतात, मोर्स कोडमधे हवामानाचा अंदाज ऐकावा इतकी! त्यामुळे त्यांचा सहजपणे अर्थ लागेलच असं काही सांगता येत नाही. स्वप्नांचा अर्थ नीट उलगडून सांगायला आपलं अंतर्मन काही हिंदी पिक्चरच्या ष्टोरी लेखकाची टोपी घालून बसलेलं नसतं. आपली स्वप्नं डिझायनर स्वप्नं असली तरी काही ठराविक स्वप्नं बहुतेकांना पडतात. उदा. आपल्याला एकंदरितच कमी आत्मविश्वास असेल किंवा आपल्या भवितव्याबद्दल शंका असतील तर परीक्षेत नापास झाल्याचं स्वप्न किंवा उद्या परीक्षा आहे आणि आपली काहीच तयारी नाही झालेली अशी स्वप्नं हमखास पडतात. आपण खोल खोल पडत चाललो आहोत हे अजून एक ष्ट्यांडर्ड स्वप्न! त्यातून असुरक्षितता किंवा एखाद्या गोष्टीबद्दल सतत वाटणारी चिंता प्रतीत होते म्हणतात.

असुरक्षितते वरून आठवलं. लहानपणी मला नेहमी काही सिंह रात्रीचे आमच्या घराभोवती फिरताहेत आणि घरात घुसायचा प्रयत्न करताहेत असं स्वप्न पडायचं. माझी जाम तंतरायची आणि मी घरभर फिरत सगळ्या दारं खिडक्या बंद आहेत ना ते पुनःपुन्हा बघायचो आणि घामेघूम होऊन थरथरत जागा व्हायचो. अर्थात हे स्वप्न पडायला एक कारण होतं. माझ्या लहानपणी आम्ही पेशवेपार्क जवळ रहायला आलो. त्या आधी चिमण्या कावळे कबुतरं कुत्री आदि सर्वत्र दिसणार्‍या सर्वसामान्य प्राण्यांच्या आवाजी दुनियेचं एकदम सिंहांच्या गर्जना त्यावर माकडांचं जिवाच्या आकांताने ओरडणं, मोरांचं म्यावणं, कोल्हेकुई अशा आफ्रिकेतल्या जंगलातल्या तंबूसदृश दुनियेत परिवर्तन झालं. त्या भीतिचा सुप्त परिणाम स्वप्न पडण्यात झाला असणार. 'मी ड्रग्ज घेत नाही कारण माझी स्वप्नं माझा पुरेसा थरकाप करतात' असं मॉरिट्स एस्कर हा मुद्रणकार म्हणायचा त्यात खूपच तथ्य आहे. मला रोज जंगली श्वापदांचे आवाज ऐकायला येतात हे मी गिरगावात आयुष्य घालवलेल्या एखाद्याला सांगितलं असतं तर त्यानं ताबडतोब वेड्याच्या इस्पितळाला कळवलं असतं. लोकलचा खडखडाट आणि बसचा धडधडाट या पलिकडे आवाज-विश्व न पसरलेल्या मुंबईकरांकडुन अजून काय अपेक्षा करणार? पण लहानपणीच त्या डरकाळ्या ऐकण्याचा सराव झाल्यामुळे माझी एक मानसिक तयारी झाली आहे असं आता मला वाटतं. आता एखाद्या सिंहाने खरंच माझ्या समोर येऊन गर्जना केली तर मला विशेष वाटणार नाही कदाचित!

मनी वसे ते स्वप्नी दिसत असलं तरी स्वप्नी दिसे ते सत्यात उतरे असं पण कधी कधी होतं! डॉ. शेन मॅक्कॉरिस्टिन हा बर्‍याच विषयांवर संशोधन करतो त्यातला एक विषय स्वप्न आहे. त्याला असं सापडलं की पूर्वी इंग्लंड मधील लोक पोलिसांना किंवा वार्ताहरांना त्यांना पडलेल्या विचित्र/चमत्कारिक स्वप्नांबद्दल सांगत असत. इतकंच नाही तर पोलीसही ती माहिती गंभीरपणे घेऊन त्याचा तपास करत असत. हार्ट्लपूल मधे १८६६ साली मिसेस क्लिंटनला (बिल क्लिंटनची कोणी नसावी) एका स्थानिक कामगाराने १५ पौंड किमतीची दोन घड्याळं चोरली असल्याचं स्वप्न पडलं. पोलिसांनी त्याचा तपास करून त्याला मँचेस्टर मधे पकडलं. १८९६ साली विल्यम वॉल्टर्स हा खाण कामगार तो जिथे काम करायचा तिथे अपघात झाल्याचं स्वप्न पडल्यामुळे दिवसभर पबमधे बसून राहीला.

असली भविष्यदर्शी स्वप्नं पडायला मी काही द्रष्टा नाही. पण माझ्या एका मित्राला पडत असत त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्याचं नाव अरुण! आम्ही तेव्हा बीएस्सीला होतो. कुठल्यातरी सेमिस्टरच्या परीक्षेत अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आलजिब्रा विषयात मला ४० पैकी १६ पडल्याचं कॉलेजमधे समजलं. १६ मार्क म्हणजे काठावर पास! मला धक्का बसला. काठावर पास झाल्यामुळे नाही कारण त्याची मला सवय होती! पण तो पेपर चांगला जाऊनही कमी मार्क पडल्याचा होता. माझं आणि अरुणचं त्यावर बोलणं झालं. दुसर्‍या दिवशी अरुण मला म्हणाला की मला ३६ मार्क मिळाल्याचं स्वप्न त्याला पडलं. मी अर्थातच ते थट्टेवारी नेलं. पण त्याची काही स्वप्नं खरी झाली असल्याचा त्यानं दावा केला. काही दिवसांनी मार्कलिस्ट आल्यावर त्यावर खरंच ३६ चा आकडा पाहून मला दुसरा धक्का बसला. झालं असं होतं की काही कारणाने विद्यापीठातून मार्कलिस्ट पाठवायला वेळ लागणार होता म्हणून कॉलेजने कर्मचारी पाठवून निकाल हाताने कॉपी करून आणवला होता. कॉपी करताना अर्थातच चूक झाली होती.

मी विद्यापिठात चकाट्या पिटत असतानाची गोष्ट आहे. आमच्या विभागातली काही मुलंमुली आणि २ प्रोफेसर खंडाळ्याला एक दिवसाच्या ट्रिपला सकाळी सकाळी ६ च्या सुमारास गेले होते. एक प्रोफेसर एका डोंगरावर नेहमीचा रस्ता सोडून दुसर्‍या जवळच्या पण अवघड रस्त्याने जायला निघाले. त्यांनी वर जाऊन पुढे नीट रस्ता आहे का हे बघून इतरांना सांगायचं ठरलं होतं. काही वेळ झाला तरी त्यांचा आवाज न आल्याने खालून मुलांनी आवाज दिला. उत्तराऐवजी त्या दुर्देवी प्रोफेसरांचा देह घसरत खाली आला आणि मुलांच्या डोक्यावरून आणखी खाली दरीत पडला. मदतीला खाली जाईपर्यंत त्यांचा मृत्यु झाला होता. ही बातमी दुपारी १२ वाजेपर्यंत आम्हाला समजली आणि सर्व विद्यापिठात शोककळा पसरली. एक मुलगी मात्र ओक्साबोक्षी रडत होती. कारण तिला आदल्या रात्री त्या प्रोफेसरांना ट्रिपवर अपघात होईल असं स्वप्न पङलं होतं. त्यामुळे ती सकाळी लवकर विद्यापीठात त्या प्रोफेसरांना जाऊ नका हे सांगायला आली होती. पण तो पर्यंत उशीर झाला होता.

भविष्यदर्शी स्वप्नं हे भलतंच अगम्या व गूढ प्रकरण आहे. असली स्वप्नं पडण्या मागची कारणमीमांसा आत्ता तरी सर्व शास्त्रांच्या पलिकडची आहे. पण सर्जनशील स्वप्नं ही तितकी अचंबित करीत नाहीत. कारण आपल्याच अंतर्मनाच्या चोरकप्प्यात त्या विषयाशी निगडित काहीतरी घोळत असतं आणि त्याचा शेवट स्वप्नात होतो. माझ्या कामाशी निगडित काही कठीण समस्या मला भेडसावत असली तर ती सोडविण्यासाठी मला स्वप्नांमधे क्लू मिळाले आहेत! आचार्य अत्रेंनी 'घराबाहेर' नाटक त्यांच्या स्वप्नात घडलं व दुसर्‍या दिवशी त्यांनी ते फक्त लिहीण्याचं काम केलं असा उल्लेख 'मी कसा झालो' मधे केल्याचा मला आठवतंय. त्यांनी तिथे असंही म्हटलं आहे की वर्तमानपत्रात त्या संदर्भात वाचलेली एक बातमी त्यांच्या डोक्यात दिवसभर घोळत होती. बीटल्सच्या पॉल मॅकार्टनीला Yesterday हे गाणं स्वप्नात झालं असं त्याचंच म्हणणं आहे पण त्याच्या डोक्यात काय घोळत होतं त्या बद्दल मला काही सापडलं नाही अजून.

काही लोकं स्वप्नांच्या मागे पळतात, काही स्वप्नांपासून तर माझ्यासारखे काही स्वप्नांमधे पळतात. मला सांगली मिरज या ट्रेनची बर्‍याच वेळेला स्वप्नं पडायची कारण माझ्या लहानपणी मी सांगलीत काही वर्षं काढली आहेत आणि मला त्या रेल्वेचं अप्रूप होतं. तर माझ्या एका स्वप्नात मी सांगलीच्या दिशेची ट्रेन पकडायला चाललो होतो आणि ट्रेन सुटली. मी ती पकडायला धावतोय धावतोय पण जमत नव्हतं. मग अचानक एका डब्याच्या दारातून खुद्द अमिताभ बच्चनने मला 'अरे पळ पळ लवकर पळ!' असं चिअरिंग केलं. इथेच मला जाग आली आणि त्यामुळे ट्रेन मिळून अमिताभशी गप्पागोष्टी झाल्या की नाहीत ते माहीत नाही. मी तेव्हा या स्वप्नाबद्दल कुणाला सांगितलं नाही कारण परवीनबाबी (सुलताना नाही) व रेखा असल्या सुपरहॉट नट्या स्वप्नात येण्याऐवजी अमिताभ स्वप्नात येतो म्हंटल्यावर माझी इतकी टिंगल झाली असती की त्याची वेगळी स्वप्नं पडली असती.

मला एकदा बंगलोरला जायचं असतं. माझ्या बरोबर एक मुलगा आणि एक मुलगी असतात. ते दोघेही माझ्या ओळखीचे नसावेत. त्यांची नावं लक्षात येत नसतात पण चेहरे उगीचच खूप ओळखीचे वाटत असतात. कधी कधी रेल्वे स्टेशन किंवा विमानतळावर काही अनोळखी माणसं उगीचच आपल्याला चिकटतात ना, त्यातले ते असावेत. हे अर्थातच माझं पोस्ट स्वप्न अ‍ॅनॅलिसिस! तर आम्ही तिघे पुण्याच्या विमानतळावर असतो. विमानतळावर खूप गर्दी असते. आम्हाला नक्की कुठल्या गेटकडे जायचं आहे ते कळत नसतं. आता पुण्याच्या विमानतळावर इतकी गेटं आली कुठुन? पण स्वप्नाच्या दुनियेत तर्कशास्त्राला फारसा वाव नसतो. कुठेही आमच्या विमानाच्या गेटबद्दल माहिती सापडत नाही.

मग त्या गर्दीत भटकता भटकता माझी आणि त्यांची चुकामुक होते. विमानतळाचा सीन अधुनमधुन रेल्वे स्टेशन सारखा वाटत असतो. स्टेशनवर जसे जिने वर खाली करून प्लॅटफॉर्मवर जावं लागतं तसं इथेही करावं लागत होतं. असाच मी एका जिन्यावरून खाली उतरत असताना मला टीसीसारखा कुणी तरी, ज्याला स्टेशनवर काय चाल्लंय याची बित्तंबातमी असते असा, पळताना दिसतो. त्याला मी पळत पळत जाऊन गेटाबद्दल विचारतो. तो पळता पळता अक्षरशः एका बोळाकडे बोट दाखवितो. मी त्या बोळात घुसतो आणि थेट एका रनवे वर येतो. मला माझं विमान टेकॉफ साठी पळायला लागलेलं दिसतं. आता ते माझंच विमान आहे हे मला कशावरून समजलं ते विचारू नका. मी विमानाच्या मागे पळायला लागतो. तेव्हढ्यात तो मघाचा टीसी वायरलेस वरून काही तरी बोलताना दिसतो. मग थोड्या वेळाने ते विमान पळायचं थांबतं आणि रनवेवर चक्क यू-टर्न घ्यायला लागतं. मी हाशहुश करत तिथे पोचतो. विमान यू-टर्न घेतंय म्हणून आतले लोक खाली उतरलेले असतात. गंमत म्हणजे कुणाच्याही चेहर्‍यावर कसलाही वैताग त्रास दिसत नसतो. सगळे हसत खेळत उभे असतात. त्यात मी माझे सोबती शोधून काढतो. त्यातली ती मुलगी आता एका मोटरसायकलला किका मारत असते आणि ती काही सुरू होत नसते. इथे स्वप्न संपतं आणि माझी पळापळही!

मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात पण माझ्या बाबतीत मनी नसे ते स्वप्नी दिसे असं पण थोडंसं आहे. मी एके काळी ऑक्सफर्डला रोज कामासाठी ५० मैलांवरून जात येत असे. पण हे स्वप्न मी ऑक्सफर्डला रहायला लागल्यावर पडलेलं आहे. माझी बायको गाडी घेऊन जाणार असते म्हणून मी रेल्वेनं ऑफिसला जायचं ठरवतो. मी एक तर गाडीने जायचो किंवा बसने त्यामुळे ट्रेनने जायचं कसं काय ठरवलं ते एक कोडंच आहे. मी स्टेशनवर जातो तिथे प्रचंड गर्दी असते. तिथे २ काउंटर असतात. रांगेत उभा राहून एका काउंटरला पोचल्यावर तिकीटाचे पैसे हवाली करतो. गंमत म्हणजे माझ्याकडे ३ बॅगा असतात त्यामुळे स्वप्नात ३ कशा आल्या ते मला माहीत नाही. नेहमी मी एक छोटी बॅग घेऊन ऑफिसला जातो. स्टेशनावर सर्व भारतीय लोकच दिसतात. मी काउंटरपासून दूर गेल्यावर माझ्या लक्षात येतं की मी तिकीट घ्यायचं विसरलोय. मग मी परत काउंटरला जातो. मला आता हे आठवत नाही की मगाशी मी कुठल्या काउंटरवर गेलो होतो.

एक ट्रेन गेल्यामुळे गर्दी ओसरलेली असते. मी त्या काउंटरच्या आत डोकावतो. एक क्लार्क झोपायची तयारी करत असतो. मी त्याला माझ्याकडून पैसे घेतल्याचं आठवतंय का ते विचारतो. तो नाही म्हणतो. मग मी दुसर्‍याला विचारतो, त्याला आठवत असतं. तो मला कुठे जायचं आहे ते विचारतो. मी ऑक्सफर्डचं नाव घेतल्यावर तो मला कुठे गाडी बदलायची आहे ते माहिती आहे का विचारतो. मला त्या स्टेशनचं नाव काही आठवत नाही. त्याला ही ते आठवत नसतं. तो कुणाला तरी फोन करून माहिती काढायला जातो तर फोन चालू नसतो. मी माझ्या बायकोला फोन करून माहिती काढायचं ठरवतो. मी फोन बूथ वर जाऊन फोनसाठी एका बॅगेतून चिल्लर काढायला लागतो.

मी चिल्लर काढत असताना एक माणूस माझ्या बॅगेतले पैसे चोरायचा प्रयत्न करतो. माझ्या ते लक्षात येताच माझी त्याच्याशी मारामारी होऊन मी माझे पैसे परत मिळवतो. पण हे करता करता माझी दुसरी बॅग चोरीला गेल्याचं लक्षात येतं. सुदैवाने त्यात काही मौल्यवान नसतं. मग प्रथम मी बायकोला घरी फोन करायचं ठरवतो. पण ती घरात नसेल हे लक्षात आल्यावर तिच्या ऑफिसात करायचा ठरवतो. पण मला तिच्या ऑफिसचा नंबरच आठवत नाही. पहिले ४ आणि शेवटचे ३ आकडे आठवतात पण मधले ३ जाम आठवत नाहीत. शेवटी मी तिला मोबाईल वरून फोन करायचं ठरवतो पण मला मोबाईल वरचं नीट वाचता येत नसतं. मी वाचायचा प्रयत्न करता करता भलतीच कुठली तरी बटणं दाबली जातात आणि काही तरी स्क्रीन रेसोल्युशन इ. सेटिंगचा मेन्यु दिसायला लागतो. मला काही त्या सेटिंगमधून बाहेर पडता येत नाही आणि तिकडे बॅटरी संपत आलेली असते. मी घाईघाईने काही तरी दाबत फोन नंबरांच्या यादीकडे येतो पण विविध प्रकारचे मेन्यु येत जात रहातात. असं करता करता ती बॅटरी आणि स्वप्न एकदमच संपतं. मला वाटतं कधी तरी मला साध्या साध्या गोष्टी न जमल्याची खंत किंवा त्याची बोच या स्वप्नामागचं कारण असावं. पुढे काय होणार ते प्रत्यक्ष पडद्यावर पहा अशी पाटी स्वप्नात कधी येत नसल्यामुळे गुमान आपली उत्सुकता दाबायची आणि पुढल्या स्वप्नाची वाट बघायची इतकंच आपल्याला करता येतं!

 स्वप्नात आपण कुणाच्या नकळत, काही काळ का होईना, वेड्यासारखं मनसोक्त वागू शकतो असं कुणी तरी म्हंटलेलं असलं तरी स्वप्नं आपल्याशी हितगुज करत असतात. ते हितगुज वरकरणी तर्कसुसंगत वाटलं नाही तरी मला फार चित्तवेधक आणि मनोरंजक वाटतं.

-- समाप्त --