Tuesday, June 1, 2010

एका जाज्वल्य उपक्रमाबाबत

"काही नाही. निदान महाराष्ट्रात तरी सगळं शिक्षण मराठीतूनच द्यायला पाहीजे. तरच मराठी जगेल. नाही तर पाली, संस्कृत सारखी मराठी पण नामशेष होईल." दिल्यानं साप्ताहिक सभेत आणलेला नवीन प्राणी.. उत्तम बापट.. मुठी आपटून आपटून पोटतिडिकेनं बोलत होता. त्याच्या वाक्यावाक्यातून मराठीचा जाज्वल्य अभिमान मायक्रोवेव्हमधल्या पॉपकॉर्न सारखा उसळत होता. त्याच्या युवराजसिंगी धडाक्यामुळे माझ्यातही पोटतिडिक निर्माण झाली.. पण तिच्या उत्पत्तिचं मूळ भुकेमधे होतं हे नंतर उमजलं. मी हळूच मक्या आणि दिल्याकडे पाहिलं. ते बिअर पिऊन थंडावले होते, तिकडे उत्तम उत्तम (उत्तमोत्तम म्हणावे का?) पेटला होता. मला त्याचं म्हणणं पटत होतं.. तसं मला कुणीही काहीही जरा ठासून सांगीतलं की पटतंच.

मी: "खरय तुझं. आपण तरी काय करणार?".. मी काही तरी गुळमुळीत बोललो.

उत्तमः "अरे काय करणार म्हणजे? काय नाही करू शकणार?".. जोरात मूठ आपटून तो आणखी उसळला.. याला आता मूठ आपट बापटच म्हणायला पाहीजे.. तत्काळ मी भलतंच बोलल्याची जाणीव झाली.. मी नर्व्हसपणे इकडे तिकडे पाहीलं. थंडावलेले मक्या, दिल्या मदतीला यायची शक्यता नव्हती.

उत्तमः "आपणच करून ठेवलं आहे हे सगळं. आपणच आपली पोरं इंग्रजी शाळेत घातलीयत. ही मध्यमवर्गीय मानसिकता आहे.. कळप प्रवृत्ती आहे.. सगळे शिक्षणतज्ज्ञ सांगून दमलेत.. मातृभाषेतून शिकलेलं जास्त चांगलं कळतं. पण आम्हाला कळतंच नाही ते.".. बाप रे! माझा घसा मुठा नदी इतका कोरडा पडला.. कारण मी माझ्या पोराला इंग्रजी शाळेतच शिकवलाय.. याला कळालं तर मला त्याच्या जाज्वल्य अभिमानाच्या भट्टीत, मक्याच्या कणसासारखा भाजून, वरती तूप मीठ लावून खाईल. तेवढ्यात दिल्या जागा झाला. मला जरा हायसं वाटलं. उत्तमची फिल्डिंग मला एकट्यालाच करावी लागणार नव्हती.

दिल्या: "आपण मराठीसाठी काही तरी करायला पाहीजे.. तिचे पांग फेडायला पाहीजेत.. काय करता येईल त्याचा विचार करा."

मक्या: "आपण शक्य तितक्या जणांशी मराठीतून बोलायचं.".. हे दोघे का थंडावले होते? या माझ्या अज्ञानाच्या अंधारावर मागच्या टीव्हीनं एक तिरीप टाकली. त्यावरची आयपीएलची एक मॅच नुकतीच संपली होती. त्यातल्या आनंदीबाला चुंबनं फेकित परत चालल्या होत्या. अधुन मधून मंदिरा एकदोन माजी क्रिकेटपटूंना काही तरी सांगताना दाखवत होते. तेही तन्मयतेने ऐकत होते. ती बहुधा नजाकतभरा ग्लान्स कसा करावा ते सांगत असावी. तेव्हढ्यात उत्तम किंचाळला.

उत्तमः "बासssss! आपण क्रिकेटची कॉमेंट्री मराठवळूया. आता आयपीएल मधे पुणं पण असणार. तेव्हा पुण्याचा काही वेगळेपणा दिसायला नको का? पुणं महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. तेव्हा आपणच दिशा दाखवली पाहीजे. आणि शिवाय मराठी वापरावरचा एकूण दबावही वाढत चाललाय."

मी: "काय करू या? मराठु.. ळू.. ळूया? वळू पहाता पहाता गळू आल्यासारखं वाटलं मला."

उत्तमः "मराठवळणे. म्हणजे मराठीत भाषांतर/रुपांतर करणे. मी केलेला शब्द आहे तो.".. उत्तम अभिमानाने म्हणाला.. त्याच्या चेहर्‍यावर स्वतःच्या बागेतली झाडं दाखवणार्‍यांच्या चेहर्‍यावरचे भाव होते.. "म्हणजे आपण क्रिकेटची मराठीतून कॉमेंट्री करायची."

दिल्या: "अरे पण पूर्वी बाळ ज पंडित सारखे लोक करायचे ना मराठीत कॉमेंट्री! आपण काय वेगळे दिवे लावणार त्यात?".

उत्तमः "हो! पण त्यातले बरेचसे शब्द इंग्रजीच असायचे. क्षेत्ररक्षणाच्या सगळ्या जागांना कुठे आहेत मराठी शब्द? सांग बरं स्लिपला किंवा कव्हरला काय म्हणशील?"

मक्या: "गुड आयडिया! चला आपण शब्द तयार करूया. आधी काय फिल्डिंगवाले घ्यायचे का?"

उत्तमः "ठीक आहे. फिल्डिंग दोन बाजूंमधे विभागलेली असते.. ऑन आणि ऑफ.. त्यांना काय म्हणू या?"

मी: "चालू आणि बंद".. सगळ्यांनी तिरस्काराने माझ्याकडे पाहीलं.

दिल्या: "चालू आणि बंद काय आरेsss? तो दिवा आहे काय?"

मी: "बरं मग दुसरे सुचव.".. त्यावर खूप डोकं खाजवून देखील दुसरे शब्द मिळाले नाहीत. मग नवीन मिळेपर्यंत तेच ठेवायचे ठरले.. आणि बघता बघता खूप शब्द तयार झाले.

ऑफ साईडच्या जागा
-----------------
स्लिप - घसरडं किंवा निसरडं. फर्स्ट स्लिप म्हणजे पहिलं निसरडं.
थर्ड मॅन - तिर्‍हाईत.
पॉईन्ट - बिंदू. सिली पॉईन्ट - मूढ बिंदू. बॅकवर्ड पॉईन्ट - मागासबिंदू किंवा प्रतिगामी बिंदू
गली - घळ. डीप गली - खोल घळ.
कव्हर - आवरण. डीप कव्हर - खोल आवरण. एक्स्ट्रा कव्हर - अवांतर आवरण.
मिड ऑफ - अर्ध बंद. लाँग ऑफ - दूर बंद. सिली मिड ऑफ - मूढार्ध बंद.
स्विपर - झाडूवाला.

ऑन साईडच्या जागा किंवा लेग साईडच्या जागा
--------------------------------------
शॉर्ट लेग - आखूड पद. फॉरवर्ड शॉर्ट लेग - पुरोगामी आखूड पद. लाँग लेग - लंबूटांग किंवा लंब पद.
स्क्वेअर लेग - चौरस पद.
मिड विकेट - अर्धी दांडी.
मिड ऑन - अर्ध चालू. सिली मिड ऑन - मूढार्ध चालू. लाँग ऑन - लांब चालू.
काऊ कॉर्नर - गायनाका.
लेग स्लिप - पद निसरडं.
शॉर्ट फाईन लेग - आखूड सुपद.

बाद व्हायचे शब्द
-------------
क्लीन बोल्ड - याला त्रिफळाचित असा शब्द आहे, परंतु त्याचा त्रिफळाचूर्णाशी घनिष्ट संबंध वाटल्यामुळे तो आम्हाला तितकासा आवडला नाही. दांडीगुल हा पर्यायी शब्द सुचविला आहे.
हँडलिंग द बॉल - हस्तचित
टाईम्ड आउट - वेळचित
हिट विकेट - स्वचित
ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड - अडथळाचित

अवांतर धावांचे शब्द
----------------
नो बॉल - नचेंडू
बाय - पोटधाव. बाय-इलेक्शनला पोट-निवडणूक म्हणतात म्हणून.
लेगबाय - पद-पोटधाव.
वाईड - रुंदधाव

क्रिकेट मधील फटके
----------------
ड्राईव्ह - तडका, तडकावणे क्रियापदावरून बनवलेला शब्द.
लेग ग्लान्स - पद नजर
फ्लिक - झटका
पुल - हिसका
फॉरवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक - पुरोगामी संरक्षक फटका /टोला
बॅकवर्ड डिफेन्सिव्ह स्ट्रोक - प्रतिगामी संरक्षक फटका /टोला
स्क्वेअर कट - चौरस काप. अपर कट - वरचा काप. लेट कट - निवांत काप
हूक - आकडा

गोलंदाजीचे प्रकार
--------------
ऑफ स्पिन - बंद फिरकी
लेग स्पिन - पद फिरकी
स्विंग बोलिंग - झोकदार गोलंदाजी
इन स्विंगर - अंतर्झोकी
आउट स्विंगर - बहिर्झोकी

इतर शब्द
--------
बॅट - धोपटणं. यावरून बॅट्समनला धोपट्या असा एक शब्द केला. पण तो द्रविडसारख्याला लागू होत नसल्यामुळे काढून टाकला.
बेल - दांडिका, विट्टी
ओव्हरथ्रो - अतिफेक
डेड बॉल - मृत चेंडू
टायमिंग - समयोचित
टायमर - समयदर्दी
मिसटाईम्ड शॉट - समयभंगी फटका
नाईटवॉचमन - निशानिरीक्षक / निशाचर
ओपनर - उघड्या / प्रारंभक
फिल्डर - क्षेत्ररक्षक / अडव्या
फिल्डिंग - क्षेत्ररक्षण / नाकेबंदी
फुलटॉस - बिनटप्पी
यॉर्कर - पदटप्पी
बाउन्सर - कपाळमोक्षी
बॅटिंग क्रीज - फलक्षेत्र
मास्टर ब्लास्टर - महा-रट्टाळ फलंदाज

प्रत्येक शब्दासाठी खूप वादविवाद झाले. ते सगळे काही मी इथे देत बसत नाही. हे ऐकायला कसं वाटतंय हे पहाण्यासाठी लगेच एक कोरडी धाव (ड्राय रन) घेतली.. म्हणजे काही शब्दांचा वाक्यात उपयोग करून पाहीला.. ती वाक्यं......

'वीस षटकी विश्वचषक स्पर्धेत युवराजने महा-रट्टाळ फलंदाजी केली. त्याने एका षटकात ६ सज्जड रट्टे मारल्यामुळे ब्रॉड हा गोलंदाज एकदम चिंचोळा झाला.'

'सचिनने त्याची अशी नाकेबंदी केली आहे. यष्ट्यांच्या मागे रायडू, पहिल्या निसरड्यात सचिन आहे. हरभजन तिर्‍हाईत आहे, मागासबिंदूत तिवारी, आवरणात धवन, पोलार्ड अर्धा बंद, सतीश अर्धा चालू, ड्युमिनी अर्धी दांडी, चौरस पायावर मलिंगा आणि सुपदावर फर्नांडो.'

'झहीरचा पहिला चेंडू.. कपाळमोक्षी.. द्रविडच्या कानाजवळून घोंगावत गेला.. द्रविडने आकडा मारायचा प्रयत्न केला.. पण चेंडू आणि धुपाटण्याची गाठभेट झाली नाही आणि तो सरळ रायडूच्या हातात गेला.. धाव नाही.. द्रविड आकडा लावायचा सावली सराव करतोय.. झहीर गोलंदाजीच्या खुणेकडे चाललाय.. दरम्यान चेंडू निसरड्याकडून मागासबिंदू, आवरण असा प्रवास करीत अर्ध्या बंद जागेपर्यंत आला.'

'शोएब अख्तरच्या चेंडूला जोरदार वरचा काप मारून सचिननं त्याला तिर्‍हाईताच्या डोक्यावरून सरळ मैदानाबाहेर धाडला.'

'सचिन आणि सेहवाग हे दोन उघडे आता फलंदाजीला येताहेत.'

'युवराज हा एक उत्तम समयदर्दी फलंदाज आहे, पण दीपिका प्रकरणामुळे सध्या त्याला वेगळ्याच दर्दने पछाडले आहे.'

'तो आखूड टप्प्याचा चेंडू सेहवागने डोळ्यासमोरची माशी हाकलावी इतक्या सहजतेने गायनाक्या पलीकडे झटकला.'

एकंदरीत अशी वाक्यं ऐकताना, झणझणीत फोडणी दिल्यासारखी, एक वेगळीच मजा येत होती. याचा जनमानसांवरील परिणाम अजमावण्यासाठी अशाच प्रकारची एक छोटी कॉमेंट्री मराठीतून करून आम्ही एका वृध्द क्रिकेटप्रेमींना ऐकवली.. त्यावर त्यांनी आम्हाला एव्हढंच सुनावलं.. 'अरे यापेक्षा काही देवाचं वगैरे म्हणत जा'.

====== समाप्त======