Tuesday, March 10, 2009

अंतिम सsप्राईज!

(टीपः- बरं झालं मी 'ताणलेलं सsप्राईज!' आधी लिहीलं ते. का ते तुम्हाला ह्या 'अनु'दिनीतील निवडक उतार्‍यांवरून कळेल! )

वास पूर्णपणे जायला २ दिवस लागले. च्युईंगम सारखा तो संपतच नव्हता. तोपर्यंत मला वासांसि अजीर्णानि झालं. हल्ली तर मला जळी स्थळी काष्ठी पाषाणी अनुच दिसायला लागली होती... मी संपूर्णपणे अनुरक्त झालो होतो.. अगदी गाडी चालवताना सुद्धा. त्या भानगडीत मी एकदा सिग्नल तोडला. नशिबानं मागून राजेश येत होता. त्यानं फोन करून मला त्याच्या दुकानावर यायला सांगीतलं. दुकानात त्यानं मला जे दाखवलं आणि सांगीतलं ते ऐकून मी मुळापासून हादरलो.. बॉसने टीपी करताना पकडावं तसा. कारण एका ताज्या साप्ताहिक समाचार मधे एका पोटार्थी पापाराझीनं माझा चांगलाच समाचार घेतला होता. ती सनसनाटी बातमी अशी होती -

****************************************************
अमली पदार्थांच्या तस्करीबद्दल एका लफंग्यास अटक:- आमच्या इंग्लंडच्या बातमीदाराकडून

मागच्या आठवड्यात वरकरणी साळसूद दिसणार्‍या एका सराईत ड्रग विक्रेत्यास पोलीसांनी शिताफीने पकडले.


प्रकाश माटे असं नाव सांगणारा हा भामटा रस्त्यावरून चालला असताना एका कुत्र्यानं त्याला धरले. या इसमाच्या सर्वांगाला ड्रगचा विचित्र वास येत होता. हे कुत्रं ड्रगचा वास ओळखण्यात तरबेज आहे असा दावा त्या कुत्र्याची मालकीण केट हडसन यांनी केला. पण आपल्या कुत्र्यानं एका अनोळखी माणसास उगीचच धरले आहे असे समजून केट त्या इसमाला सोडवायला गेल्या तेव्हा त्यांनाही त्या वासाने मळमळायला लागलं.


हा इसम नेहमीच या रस्त्यानं ये-जा करतो असे येथील रहिवाश्यांचं म्हणणं पडलं. त्यानंतर त्या इसमाने एका तरुणीस, तिच्या घरी जाऊन, गुंगीचे औषध देऊन लुटण्याचा प्रयत्न केला. गुंगीच्या औषधामुळे क्षणातच ती तरुणी जमिनीवर कोसळली. तो आवाज ऐकून तिचे वडील धावत आल्याने पुढचा अनर्थ टळला.



तिच्या वडीलांनी तातडीने पोलीसात कळवल्याने पळणार्‍या लफंग्यास पोलीसांनी शिताफीने अटक केली. यामागे एक मोठी टोळी असण्याची शक्यता पोलीसातील काही अधिकार्‍यांनी वर्तवली आहे. पोलीसांनी नागरिकांना सावध रहाण्याचा इशारा दिला आहे. इन्स्पेक्टर जेम्स स्टुअर्ट पुढील तपास करीत आहेत.



****************************************************

आज रस्त्यात काही लोकं माझ्याकडे बोटं दाखवित होते ते यामुळेच तर! काय मिळवलं त्या नराधम पापाराझीनं माझा झेंडा असा 'अटके'पार लावून? .. आणि माझ्या प्रेमप्रकरणाची (प्रकरण? हो आता प्रकरणच म्हणायला पाहीजे) चमचमीत मिसळ करून? त्यात "इसम", "लफंगा", "भामटा" असले राखीव उल्लेख चिकटवलेले! मला अगदी गाढवावरून धिंड काढल्यासारखं वाटलं. पण आत्ता राजेशच्या मनाचा पेस्टकंट्रोल करण्याव्यतिरिक्त काही करू शकत नव्हतो. अजिजीच्या सुरात त्याला म्हंटल "राजेशभाय! मी त्यातला नाही आहे हो! हे सगळं बनावट आहे! मला गुंतवण्याचा पध्दतशीर प्रयत्न आहे हा". परत एकदा ते फोटो नीट पाहीले.. आणि अचानक युवराज काय घेईल असा कॅच पकडला. मी ओरडलो "हे बघा! ही कुत्र्यानं पकडलेल्या माणसाची पँट आणि बेड्या घातलेल्या माणसाची पँट - दोन्ही वेगवेगळ्या आहेत. मला अटक वगैरे काही झालेली नाही. ही गंडवागंडवी आहे". सुदैवाने राजेशला ते पटलं आणि मला हायसं वाटलं.. अगदी पहील्या फटक्यात पेन्सीलला नीट टोक करायला जमल्यासारखं. राजेशने पोलीस स्टेशनला फोन करून जेम्स स्टुअर्टचा शोध घेतला. असा कोणी इन्स्पेक्टर अस्तित्वात नव्हता. हुश्श! मग राजेशने पेपरच्या ऑफिसला फोन करून तक्रार नोंदवली पण पेपरवाल्यांनी त्याला "चौकशी करतो" अशी त्याच साप्ताहिकाची पानं पुसली.

त्यादिवशी एका ज्योतिषाला चॅटवर सगळं सांगीतलं. माझ्या पत्रिकेत बरेचसे ग्रह वेगवेगळ्या घरात फतकल मारून बसले होते.. तर्‍हेवाईक नजरांनी बघत होते.. आपण स्टेशनवर उगीचच इतरांकडे बघतो तसे. त्यातले काही लुकिंग लंडन टॉकिंग टोक्यो पण होते. कुठे बघत होते कुणास ठाऊक! त्यातला पापाराझीचा ग्रह कुठला ते त्याच्या गूढ भाषेमुळे उमजलं नाही. पण काही ग्रह उलटे फिरत होते त्यातलाच एक असावा.

तो: "अरे! कन्या राशीला नुकतीच साडे-साती लागली आहे!" ज्योतीषशास्त्रात स्त्रीला साडे-साती म्हणतात असं वाटून त्यानं नेमक्या गोष्टीवर बोट ठेवल्याचा हर्ष मला झाला.
मी: "हां! हां! तीच तर माझी हृदयदेवता!".
तो: "ती नाही रे बाबा! साडे-सातीमुळं तुला कामाची फळं मिळायला वेळ लागतोय."
मी: "अरे! पण इथं मी न केलेल्या कामाची फळं भोगतोय त्याचं काय?" त्यानं परत काही ग्रहांच्या दूषित 'नजरा'ण्यांचा उल्लेख केला.. ग्रहांना पण मोतिबिंदु सारख्या रोगांपासून मुक्ती नव्हती तर. इथे मला माझ्या पत्रिकेतल्या प्रत्येक घरावर 'बुरी नजरवाले तेरा मुह काला' अशी पाटी लावावीशी वाटली, पण ग्रह भारतातल्या डायवरांसारखेच पाट्या न बघताच चालतात हे कळल्यावर नाईलाज झाला. थोडक्यात त्यांच्या नजरकैदेतून सुटण्याचा काही मार्ग नव्हता.
मी: "पण माझं नि अनुचं जमेल की नाही?"
तो: "ते मी कसं सांगणार? सगळ्या गाठी वरती मारलेल्या असतात."
मी: "पण भगवंतरावांना गाठ मारण्यासाठी माझी दोरीच सापडत नसेल तर?" शंकांचं अगदी उलटं असतं.. त्या दाबल्या तर दुसर्‍या बाजुने बाहेर येतात.
तो: "ते मी बघतो. तू मला तिची जन्म तारीख, वेळ व जन्मगाव सांग फक्त!" हे शक्य नव्हतं. एकवेळ मी बॉसला तो किती चांगला आहे ते सांगू शकलो असतो, पण हे शक्य नव्हतं. तिला काय सांगून ती माहिती मिळवणार होतो मी?
मी: "ते जमणार नाही. त्यापेक्षा त्या ग्रहांच्या दृष्टी आड माझी सृष्टी होईल असं काही नाही का करता येणार?"
तो: "येईल ना! त्यासाठी शांत करावी लागेल."
मी: "शांत? ती कशी करायची?"
तो: "मी करेन ना! त्यासाठी हजार-एक रुपये खर्च येईल". आयला! म्हणजे हे ग्रह दूरवरून माझ्या व्यक्तिगत जीवनात कारण नसताना ढवळाढवळ करणार आणि त्यांची नजर चुकवण्याचा फणस मी खाणार. मी हा खर्च न करण्याचं ठरवलं. हो! थोड्या दिवसांनी ग्रहांची नजर फिरली तर कोण जबाबदार? ग्रहांना शांत करण्यापेक्षा त्याच पैशात माझं पोटतरी शांत होईल.
मी: "मी सांगतो तुला थोड्या दिवसांनी" मी त्याला बळी पडलो नाही.. कारण कुणीतरी म्हंटलच आहे.. काय फसलासी दाखविल्या गाजरा?
तो: "ठीक आहे! पण एक सांगतो. अगदी शेवटच्या क्षणी तुझ्या जीवनात एक स्त्री येणार आहे." शेवटच्या क्षणी म्हणजे? शेवटच्या घटकेला? तेव्हा जीवनात स्त्री आली काय अन् अप्सरा आली काय काही फरक पडणार आहे का? मला काहीच अर्थबोध न झाल्यानं मी दुर्लक्ष केलं.

त्या रात्री साप्ताहिक संगीत कत्तलीला संजयकडे गेलो. वेळेवर गेल्यामुळे सगळ्यांच्या आधी पोचलो होतो. माझ्या तथाकथित अटकेची वार्ता एवढ्यात षटकर्णी झाल्याचं मला माहीत नव्हतं. मी गेल्या गेल्या संजय म्हणाला.
संजय: "ये ये! कधी सुटलास?" मला वाटलं तो ऑफिसमधनं कधी सुटलो ते विचारतोय.
मी: "नेहमीप्रमाणेच"
संजय: "म्हणजे? तुझं नेहमीच जाणं येणं असतं तिथं?" यात त्याला आश्चर्य वाटण्यासारखं काय होतं? आता कांता पण आली.
मी: "म्हणजे काय संजयभाय? पोटाचा प्रश्न आहे हा!"
कांता: "भलती सलती साहसं करु नको रे बाबा! जपून रहा! काळजी घे" म्हणजे कांतानेही मला सिग्नल तोडताना पाहिलं होतं तर.
मी: "हो! हो!"
संजय: "घरचे काय म्हणताहेत?"
मी: "घरचे एकदम मजेत. एकदा चक्कर टाक म्हणताहेत. इकडचा माल मिळाला नाही बरेच दिवसात म्हणाले". 'माल' हा शब्द ऐकल्यावर ते दोघे चमकले. हा माणूस खानदानी गंजेडी आहे आणि आपल्याला त्याचा पत्ता इतके दिवस नव्हता, असं त्यांना नक्की वाटलं असणार!
संजयः "बरं! वकीलाची वगैरे मदत लागली तर मला सांग. माझ्या ओळखीत एक चांगला वकील आहे". वकील? हा कुठल्या ट्रॅकवर आहे? सागर तर अजून आलेला दिसत नाही... ओ हो हो... माझ्या डोक्यात प्रकाश पडला. प्रकाश पडल्याशिवाय दिसत नाही हे खरं बाकी. मग मी पुढचा अर्धा तास त्या दोघांना माझ्या आणि अनुच्या सरळ रेषेला तो पापाराझीचा लंब कसा छेद देतोय हे समजावलं. आता वातावरणात नेहमीचा मोकळेपणा आला. संजय धीर देत म्हणाला "अरे! जब तुम दोनो होंगे राजी तो क्या करेगा पापाराझी?". कांता म्हणाली "भिऊ नकोस!"... त्यापुढे मला "मी तुझ्या पाठीशी आहे!" असं अस्पष्ट ऐकू आलं. पण ती सांगत होती "अनु आमच्या नात्यातलीच आहे. मी तिच्या बापाचा कान पकडून 'हो' म्हणायला लावेन".
"धन्यवाद कांताबेन! पण तिचा बाप 'हो' म्हणाला तर माझी धडगत नाही".. मी लगेच एक फुसका विनोद केला. चला! बरं झालं त्यांना सगळं सांगीतलं ते! निदान तिच्या बापाचं वक्रीभवन कांताचा लोलक सरळ करण्याची शक्यता तरी निर्माण झाली.

कांता आत गेली आणि आमची संगीत झटापट सुरु झाली. शेवटपर्यंत अनु आलीच नाही. मला भेटायला डबा घेऊन तुरुंगात गेली की काय? निराश मनाने मग मी 'सुहानी रात ढल चुकी ना जाने तुम कब आओगी' याची चिरफाड केली. मूळ गाणं बार्शीलाईट स्पीड मधे असून देखील कॅराओकेत ते डेक्कन क्वीनच्या वेगाचं निघालं. वेग पकडता पकडता घायकुतीला आलो.. त्यात पट्टी पण मूळच्यापेक्षा वरची.. त्यामुळे माझं काही बरं-वाईट झालं की काय म्हणून कांता धावत आली.

दुसर्‍या दिवशी ऑफिसला जाताना एक केस पिंजारलेला, डोळे खोल गेलेला, दाढीचे खुंट वाढलेला भीषण इसम माझ्याकडे करंट मागायला आला. मात्र बिडी पेटवता पेटवता इकडे तिकडे बघत हळूच 'माल है क्या' हे विचारल्यावर मला त्याला यथेच्छ बदडावंसं वाटलं.. त्याबद्दल मला नक्की अटक झाली असती हे लक्षात घेऊन त्याच्या कानात मी हळूच 'पोलीस! पोलीस!' ओरडल्यावर तो कुठेही न बघता सुसाट सुटला. या प्रकारानंतर पुढचे काही दिवस मी 'ड्रग स्टोअर' अशी पाटी वाचली तरी, माझा त्याच्याशी काही संबंध नाही हे ठसविण्यासाठी, रस्ता ओलांडून पलीकडे जात असे.

अगतिक मनाने मी अनुला फोन केला. मला पापाराझीनं पछाडलं होतं तसं तिला सर्दीनं. तिला बातमीतला भंपकपणा वाचल्या वाचल्याच कळला होता. तरी पण ती तिच्या झळकलेल्या फोटोवर खूष होती. कुणाला काय तर कुणाला काय. इथं माझ्या चारित्र्यावर 'गर्द' डाग पडले होते आणि ती फोटोवर खूष! पण तिनं परत एका पिक्चरचा प्रस्ताव टाकताच मनातली सगळी जळमटं धुतली गेली.

यावेळेस कुठलाही वास येणार नाही याची काळजी घेत मी तिच्या घरी दाखल झालो. दरम्यान त्या साप्ताहिकाने चुकीची बातमी छापल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मी आनंदात होतो. अनुनेच दार उघडलं. ती परत घरच्याच कपड्यात होती.. कारण पिक्चर तिच्या घरीच डीव्हीडी लावून बघायचा होता.. बोंबला, म्हणजे फॅमिली ड्रामाच की! छान रंगवलेल्या स्वप्नांवर डांबर फेकल्यासारखं वाटलं. पण लक्षात कोण घेतो? जड मनाने एका कोचात बसकण मारली. शेजारी तिचा बाप बसला होता.. आम्ही दोघं एकमेकांकडे बघून परत कोरडे हसलो. कोचाच्या डाव्या बाजुच्या खुर्चीत अनु आणि दुसर्‍या बाजुच्या खुर्चीत तिची आई. पिक्चरपण फॅमिली ड्रामाच निघाला.. डोळ्यातून पाण्याचे पाट नाही वाहिले तर पैसे परत असा! सूंssss! सूंssss! डावीकडून आवाज आला. पाहतो तर अनुचा बांध फुटला होता. थोड्यावेळानं.. फँssss! फँssss! उजवीकडून तिच्या आईनं नाकातून सूर लावला. मला हसू येत होतं.. कसंबसं दाबत होतो. मधेच बापाकडे पाहीलं.. तो गाढ झोपला होता.. बायको मुसमुसत असताना ब्रह्मानंदी टाळी लावू शकणारा थोर पुरुष होता तो.. नंतर तो घोरायलाही लागला. आता ते सूं सूं फँ फँ चं स्टिरीओफोनिक म्युझिक मधेच घुर्रर्र करून सम गाठायला लागलं. अवघ्या तीन तासात दोघींनी खोकंभर पेपर नॅपकिन भिजवले होते. होता होता पिक्चर संपला आणि बाप आपोआप जागा झाला. नंतर तिथेच जेवण झालं. काही म्हणा, पण त्या निमित्ताने माझा त्या घरातला संचार वाढला. मी एकटाच असतो हे कळल्यावर तिची आई मला वारंवार घरी जेवायला बोलावू लागली. काही विशेष केलं असेल तर आठवणीनं ठेऊ लागली. अधून मधून पिक्चर, शॉपिंग इ. इ. मुळे माझी आणि अनुची जवळीक बरीच वाढली. तीन महीन्यात झालेल्या वेगवान वाटचाली मुळे माझे भारतातले मित्र 'आता किती दिवस वाट पहाणार आहेस? विचारून टाक लवकर. नाहीतर म्हातारपणी काठी टेकत टेकत विचारणारेस काय?' म्हणून मागे लागले.

तो मिल्यन डॉलर प्रश्न तिला विचारण्याच्या कल्पनेनंच माझी तंतरली होती. तिच्याबरोबर 'आज मुझे कुछ कहना है' हे गाणं बर्‍याच वेळा म्हणून तिला हिंट दिली.. पण तिला काही कळलं नाही.. किंवा तिनं तसं दाखवलं नाही. शेवटी एकदा आईस्क्रीम खाता खाता, हृदय कुकरच्या शिट्टीसारखं थडथडत असताना, मी विचारलंच. पुढची ३-४ मिनिटं ती काहीच बोलली नाही. भयाण शांतता पसरली. मला कुठून विचारलं असं झालं. मग तिनं बाँब टाकला.
ती: "सॉरी प्रकाश! पण आपलं जमणार नाही असं मला वाटतं." फुस्स्स! कुकरची शिट्टी तिनं अलगद काढल्यावर माझ्या प्रेमाच्या वाफेचं पाणी पाणी झालं.
मी: "का?"
ती: "मी तुला फक्त मित्र मानते. मी त्या दृष्टीनं कधी पाहीलं नाही!" अरे! आता हिच्या दॄष्टीशी पण सामना? आधीच ग्रहांच्या दॄष्टीशी झटापट चालू आहे. पण तिचा निर्णय मान्य करण्याव्यतिरिक्त काय करु शकलो असतो? झालेल्या वेदना प्रयत्नपूर्वक गिळून चेहरा निर्वीकार ठेवित मी म्हणालो.
मी: "ठीक आहे. तुझा निर्णय मला मान्य आहे. निदान आपली मैत्री अशीच ठेवायला तरी काही हरकत नाही ना तुझी?"
ती: "हो! हो! मला तुझी कंपनी आवडते."

तिच्या नकाराच्या सुईनं माझ्या भ्रमाचा फुगा फट्टकन फुटला होता. पुढचे काही दिवस काही सुचलं नाही.. आपण अगदीच टाकाऊ आहोत असं वाटायला लागलं.. म्हणजे मी मनातनं मला टाकाऊच समजतो.. पण असं काही घडलं की आपण जगायला नालायक आहोत, मच्छर आहोत असं पण वाटायला लागतं.

पण नकारामुळे एक बदल झाला. मी तिच्याशी जास्त मोकळेपणाने वागायला लागलो.. पूर्वी मी माझ्या तिच्याबद्दलच्या भावना तिला कळू नयेत असा प्रयत्न करीत असे. ते दडपण गेलं होतं. आता लपविण्यासारखं काहीच नव्हतं. आमचं भटकणं, भेटीगाठी पूर्वीसारखंच चालू होतं. असेच सहा महीने उलटले. इकडे घरचे लग्न कर म्हणून मागे लागले होते. सगळ्या सबबी संपल्यावर होकार दिला.. नाही तरी अनुचा नकारच होता. आलेल्या फोटोंवरून पसंती कळवायचं काम करायला अनु मदत करीत होती. भारतात जाऊन मुली बघितल्या.. त्यातली एक आवडली. तिचं नाव आरती. तिनंही होकार दिला.. विशेष म्हणजे माझ्या एकतर्फी प्रेमाची कहाणी ऐकून देखील तिनं होकार कायम ठेवला.. मग साखरपुडा करूनच परत आलो. आल्यावर अनुला इत्थंभूत माहिती दिली. तिलाही आनंद झाला.

लग्नाला दोन महीने अवकाश होता. असंच मी तिला एकदा पिक्चरचं आमंत्रण दिलं. त्यादिवशी ऑफिसमधील बिनकामाच्या मीटिंगमुळे थोडा उशीरा घरी आलो. मला तिला घ्यायला जायचं होतं. मग घाईघाईत अंघोळ करून निघण्याच्या नादात मोबाईल घरातच विसरलो. कुलूप लावून खाली आल्यावर लक्षात आलं. मी बाईलवेडा नसलो तरी मोबाईलवेडा नक्कीच आहे. पण आता ५ मिनीटात अनु भेटेलच मग कशाला पाहीजे मोबाईल असा विचार करून गाडीकडे निघालो. जाता जाता किल्ली काढली अन् तेवढ्यात ती हातातून सटकून खाली पडली.. सरळ गटाराच्या झाकणातील दांड्यांच्या फटीतून आत जाऊन तिनं गटारसमाधी घेतली. मी वाकून वाकून काही दिसतंय का ते पहायला लागलो. शेजारी बरीच कार्टी खेळत होती. त्यांचा उपद्रव सुरु झाला. एकानं 'तुझी गाडी कुठली' विचारलं. ती मी दाखवल्यावर 'खूप खराब आहे. धुवून देऊ? फक्त ५० पेन्स.' मी नको सांगीतलं. एका पोरानं 'तुला हिरवा शर्ट घातलेला मुलगा सायकलवरून जाताना दिसला का?' विचारलं. दुसर्‍यानं 'मी त्या भींतिमागे लपतोय. कुणी विचारलं तर सांगू नकोस' असं बजावलं. एक पोरगी डोळे मोठे करत म्हणाली 'ती पोरं मला त्रास देताहेत.' तिला मी माझ्याजवळ थांबायला सांगीतलं. मग ती म्हणाली 'पण मला त्यांच्यात खेळायचंय.' आता काय करावं? तेवढ्यात तिचं कुतुहल जागृत झालं. 'तू काय बघतोयस?' एव्हाना माझी सहनशक्ती संपली होती. मी तिला 'मर्मेड बघतोय' म्हणालो. त्यावर तिचे डोळे चांगलेच विस्फारले. तिनंही बघण्याचा प्रयत्न केला. काहीच दिसलं नाही म्हणून शेवटी निघून गेली.

मी झाकण उचलायचा प्रयत्न केला.. ते बाजुच्या फटींमघे माती जाऊन चांगलं जॅम झालं होतं. किल्ली शोधणं भाग होतं. कारण त्या जुडग्यात घराची किल्ली पण होती. घराच्या एजंटकडून दुसरी किल्ली घेणं शक्य नव्हतं.. कारण त्याचं ऑफीस बंद झालं होतं. आता नेसत्या कपड्यानिशी घराबाहेर पडणे किंवा काहीही करून किल्ली काढणे एवढेच पर्याय होते. मी तिथं पडलेली झाडाची छोटी काटकी घेतली.. गुडघे टेकवून आत घालून काही मिळतंय का ते बघायला लागलो. त्या मघाच्या मुलीनं बरीच जत्रा मर्मेड पहायला गोळा करून आणली. सगळ्यांना एकदमच गटारात बघायचं होतं. त्यांच्या उत्साहाचा भर ओसरेपर्यंत मी तिथेच काटकी टेकून गुडघ्यावर बसून राहीलो. नेमका माझ्या ऑफिसमधला सहकारी तिथून जाता जाता मला बघून थांबला.
तो: "हॅलो मेट!" हा माझ्या आडनावाचा उच्चार मुद्दाम असा करतो असा मला खूप दिवस संशय आहे. "यू आरंट अ मुस्लिम, आर यु?" या जडबुध्दीच्या माणसाला मी गुडघे टेकून नमाज पढतोय असं वाटलं की ह्याला ब्रिटीश सेन्स ऑफ ह्युमर म्हणायचं? इंग्रजी बोलणं नेहमीच असं सीमारेषेवरचं असतं त्यामुळे माझी फार कुचंबणा होते.
मी: "यू आर नॉट जोकिंग, आर यू?" मी बदला घेतला. त्याचं नाव जो किंग आहे. ह्या विनोदाचा त्याला प्रचंड कंटाळा आला असणार, तरीही त्यानं हाहा:कार केला.
जो: "व्हॉस्सप मेट?" परत मेट? फुल्या फुल्या.
मी: "नथिंग इज अप! एव्हरिथिंग इज डाऊन! अरे, माझी किल्ली आत पडलीये" अजून एक सीमारेषेवरचा विनोद.
जो: "आपल्याला झाकण उचलायला लागेल. आयॅम अफ्रेड!" तमाम ब्रिटीश लोकं घाबरट असतात. येता जाता आयॅम अफ्रेड, आयॅम अफ्रेड करतात. मग आम्ही दोघांनी जोर लावून ते झाकण कसंबसं उचललं. पूर्ण वाकूनसुध्दा हात शेवटपर्यंत पोचत नव्हता.
जो: "आत उतरायला लागेल. आयॅम अफ्रेड!" झालं! कधीतरी न टरकता बोल की रे!

नंतर मी उघड्या डोळ्यांनी, कुठलही नशापाणी न करता, त्यात प्रवेश करता झालो. आज गटारी अमावास्या असण्याची घनदाट शक्यता होती. गटार मंथन करून एक बाहुली, काही खेळण्यातल्या छोट्या गाड्या, एक फ्रिस्बी, माझी किल्ली मिळवली आणि बाहेर आलो. जोच्या मदतीनं झाकण लावलं. त्याचे आभार मानले. तो जाण्याआधी त्याच्याशी हस्तांदोलन करण्याचा मोह मात्र टाळला.

अचानक अनु दिसली. तिला पाहताच मी तिच्यापासून लांब जात म्हंटल 'घरी ये. मी दार उघडं ठेवतो. आधी मला अंघोळ करायला पाहीजे.' हो. न जाणो. त्या गटारगंधामुळे तिची परत शुध्द हरपायची. धावत धावत घरी गेलो.. गटारगंगा धुऊन बाहेर आलो. अनु माझ्या भावी बायकोचा फोटो निरखत होती. प्रथम तिला माझ्या गटार विहाराचं कारण सांगीतलं. मी तिला घ्यायला न गेल्यामुळे आणि फोनही न उचलल्यामुळे काळजी वाटून ती माझ्या घरी आली, तेव्हा मी गटारात होतो.
ती: "तू खरंच लग्न करणारेस?" म्हणजे काय? गटाराचा नि लग्नाचा काय संबंध?
मी: "छे! छे! मी नुसती तिला घरी घेऊन येणार आहे माझ्याबरोबर सारीपाट खेळायला." मी थट्टेच्या सुरात म्हंटल. असं का विचारतीय? हिला काय माहीत नाही का माझं लग्न होणारेय ते?
ती: "पण तुला खरंच तिच्याशी लग्न करावसं वाटतंय?" मामला गंभीर होत चालला होता.
मी: "तू नाही म्हणालीस. नाहीतर तुझ्याशीच करणार होतो."
ती: "आता मला तुझ्याशी लग्न करायचंय." माझा माझ्या कानांवर विश्वास बसला नाही. गटारात मादक द्रव्य वगैरे असतात का?
मी: "काय? तू गम्मत करतीयस ना?"
ती: "नाही. आता मला तुझ्याशी लग्न करायचंय." ती परत शांतपणे म्हणाली. आता तिच्या डोळ्यात पाणी पण चमकायला लागलं होतं. मी चांगलाच भंजाळलो.
मी: "हम्म! एवढं काय घडलं तुझं मत बदलायला?"
ती: "तुझं लग्न झाल्यावर आपल्या भेटी पूर्वीसारख्या होणार नाहीत. हे मला जाणवलं. आय विल मिस यू! मनात कुठेतरी तुझ्याबद्दल प्रेम होतं ते मला इतके दिवस जाणवलं नव्हतं!" आयला! ही किल्ली काही महीने आधी का नाही पडली?
मी: "अनु! किती उशीरा सांगितलंस. मला थोडा वेळ दे विचार करायला!" मी एवढंच म्हणू शकलो.
ती: "चल! मी आता जाते. तुझ्या निर्णयाची वाट पहाते".

अंतिम सsप्राईज देऊन ती मला एका चक्रव्यूहात टाकून निघून गेली.. ज्याच्यातून बाहेर पडायचा मार्ग मला माहीत नाही. माझ्यापुढे दोनच पर्याय होते. पहीला म्हणजे ठरलेलं लग्न मोडायचं.. जिच्यासाठी इतके दिवस जीव टाकला तिच्याशी लग्न करायचं. पण हे तर धर्मसंकट होतं. आरतीला दिलेला शब्द, तिचा काहीही दोष नसताना, मोडायचा. तिनंही माझ्यावर विश्वास टाकला होता. स्वप्न रंगवली असतील. त्यांचा चुराडा करायचा. नकार मिळाल्यावर कसं वाटतं ते मी अनुभवलं होतंच.. तोच प्रसंग तिच्यावर आणायचा. मला आयुष्यभर टोचणी लागली असती. दुसरा, माझ्या प्रेमाचा गळा घोटून आरतीशी लग्न करायचं. बळ हेचि दुर्बलांना अशी ज्याची ख्याती त्या प्रेमाचाच बळी द्यायचा? दोन्ही पर्याय मला पटत नव्हते.

(तळटीपः रेसीपीच्या शेवटी जसं आवडीप्रमाणे मीठ तिखट घालून घ्या म्हणतात त्याप्रमाणे याही लेखाचा शेवट आपापल्या आवडीप्रमाणे करून घ्यावा!)

-- आता नक्कीच समाप्त --

1 comment:

black_adder said...

ur writing style is awesome, I rally enjot reading it. plz keep continue writing stories/realities like these! UR google bookmarked for me!