Tuesday, April 14, 2009

भेजा फ्राय!

"नमस्कार, ब्रिटीश टेलिकॉमवर आपलं स्वागत आहे. कृपया पुढील पर्याय कान देऊन ऐका आणि योग्य तो पर्याय निवडा", फोनवरून धमकीवजा सूचना आली. मी घर बदलतोय हे मला बी.टी.ला सांगायचं होतं. त्याचं काय आहे.. आम्हाला अधूनमधून घर बदलल्याशिवाय चैन पडत नाही. वर्षानुवर्ष एकाच घरात काय रहायचं? शीss!.. एकाच गावात रहात असलो तरी काय झालं? काहीतरी नवेच करा ही त्या मागची प्रेरणा, हल्लीच्या भाषेत - ड्रायव्हिंग फोर्स!

पर्यायांचं पाल्हाळ लागलं, मी कान दिलेलाच होता, फक्त पर्याय निवडणं बाकी होतं.
"तुम्हाला नवीन टेलिफोन कनेक्शन घ्यायचं असल्यास १ दाबा."
"तुम्हाला नवीन बीटी ब्रॉडबँड हवे असल्यास २ दाबा."
"तुमच्या बीटी ब्रॉडबँडबद्दल काही विचारायचे असल्यास ३ दाबा."
"तुम्हाला टेलिफोनच्या बिलाबद्दल काही शंका असल्यास ४ दाबा."
"तुमचा टेलिफोन बिघडला असल्यास ५ दाबा."
"वरील पैकी काहीच करायचे नसल्यास ६ दाबा", मी ६ चं बटण दाबलं.

"बीटीच्या नवीन ऑफर्सबद्दल माहिती हवी असल्यास १ दाबा"
"बीटीच्या कस्टमर सर्व्हेमधे भाग घ्यायचा असल्यास २ दाबा"
"टेलिफोन कनेक्शन बंद करायचं असल्यास ३ दाबा"
"वरील पैकी काहीच करायचे नसल्यास ४ दाबा". जसं आपण गल्लीतल्या भँक भँक करणार्‍या कुत्र्याकडे थोडा वेळ बघतो अन मग दुर्लक्ष करतो, तसं माझं झालं.. त्यामुळे मला शेवटचा पर्याय "वरील पैकी काहीच करायचे नसल्यास फोन ठेऊन द्या" असा वाटला.. फोन ठेवणारच होतो तेवढ्यात मला ते मूळ वाक्य लख्खं दिसलं आणि मी ४ चं बटण दाबलं. परत भली मोठी भँक भँक झाली.. बरेचसे पर्याय उलथे पालथे करत एकदाचा घर बदलण्याच्या पर्यायाला पोचलो. मग "तुमचा कॉल आम्हाला महत्वाचा आहे. सध्या आमची सर्व माणसं कामात गढलेली आहेत. कृपया प्रतीक्षा करा."... ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ..."तुमचा कॉल आम्हाला महत्वाचा आहे. सध्या आमची सर्व माणसं कामात गढलेली आहेत. कृपया प्रतीक्षा करा."... ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ढॅणटॅण ... असं भलं मोठ्ठं लूप सुरु झालं, ते चांगलं २० मिनिटं चाललं. त्यानंतर एका कामात गढलेल्या बाईला टीपी करायचा मूड आला आणि केवळ कीव येऊन तिनं माझा कॉल घेतला.

"गुडमॉर्निंग. मा नेमिजॅना, हौकॅना हेल्प्यूs?" अनेक शब्दांच्या अनेक संध्या (संधीचं अनेकवचन) करून वाक्य फेकल्यामुळे तिचं नाव समजून घेण्याची संधी मला मिळाली नाही.
"गुडमॉर्निंग! मी घर हलवतोय. मला टेलिफोन पण हलवायचा आहे, नवीन जागी." फार लांबड लावली तर ती फोन ठेऊन देईल या काळजीनं मी पटकन मुद्द्याचं बोललो.
"तुमचा टेलिफोन नंबर काय?"
"०१८६५ ३४४ २३२"
"तुमचं नाव काय?"
"चिंतामण गोखले"
"तुमचा पत्ता काय?"
"१८, ऑक्सफर्ड स्ट्रीट, ऑक्सफर्ड, ओएक्स १, ४एमडी"
"४एनपी?"
"नाही, नाही. एम अ‍ॅज इन मेरी, डी अ‍ॅज इन डेव्हिड", फोनवर कुणालाच पहिल्या फटक्यात माझा पोस्टकोड कळत नाही, त्यामुळे मेरी व डेव्हिडशी नाळ जोडणे हा सवयीचा भाग होऊन गेला आहे.
"तुमचा अकाउंट नंबर?"
"२३२४४३५६"
"थँक्यू मि. गॉखाल. तुमचा नवीन पत्ता सांगा"
"२५, लंडन रोड, ऑक्सफर्ड, ओएक्स २, ४एनपी"
"४एमडी?"
"नाही, नाही. एन अ‍ॅज इन नॅन्सी, पी अ‍ॅज इन पीटर"
"मघाशी तुम्ही ४एमडी सांगीतलंत?", लहानपणी ही नर्सच्या हातातून डोक्यावर पडली होती का? काय हा ग्रेड वन मठ्ठपणा? कसाबसा राग गिळून मी विनोद केला.. "हा! हा! दॅट वॉज व्हेरी फनी, सुझॅना! तो माझ्या जुन्या पत्त्याचा पोस्टकोड आहे. मी परत त्याच घरात नाही चाललो. हा! हा!". अशावेळेला पलिकडच्या बाईचं नाव घेतलं की तिला बरं वाटतं आणि ती थोडी जास्त मदतोत्सुक होते असा माझा अनुभव आहे.
"ओ! आsसी! पण माझं नाव सुझॅना नाही, अ‍ॅना आहे", बोंबला.. माझ्या भरवशाच्या अनुभवाने पडक्या चेहर्‍याला जन्म दिला.. तिला तो दिसत नाहीये ते किती छान!
"ओ! अ‍ॅम सो सॉरी, अ‍ॅना", कसंबसं अपेक्षाभंगाचं दु:ख दाबलं.
"इट्स ओके! तुम्ही कधी पासून तिकडच्या घरी जाणार?", ते तिनं असं काही विचारलं की माझ्या मनात 'निघाले आज तिकडच्या घरी' चे सूर नांदु लागले.
"७ फेब्रुवारी पासून! तिथे बीटीची लाईन उपलब्ध आहे का? नसेल तर मला त्यासाठी लागणारे १२०पौंड भरायचे नाहीत". इंग्लंडमधे असलो म्हणून काय झालं? कोकणस्थी बाणा थोडाच सोडणार होतो मी!
"लेम्मी चेक दॅट!" थोडा वेळ टाईपण्याचा आवाज आला. "ओके! मि. गॉखाल, सॉरी टु कीप यू वेटिंग! तिथे बीटीची लाईन उपलब्ध आहे. तुम्हाला कसलाही खर्च येणार नाही. तुमचा फोन ९ फेब्रुवारीला सकाळी चालू होईल, तुमचा टेलिफोन नंबर आहे तोच राहील. आत्ता आमची सिस्टिम डाऊन आहे, सुरु झाली की तुमची ऑर्डर काढते. आणखी काही सेवा हवी आहे का?".
"नाही. नाही. सध्या एवढं पुरे आहे. थँक्यू! बाय!" हुश्श करून फोन ठेऊन दिला. एक काम झाल्यानं जरा बरं वाटलं!

माझ्या घरातलं एओएलचं ब्रॉडबँड बीटीच्या लाईनवर चालतं. म्हणून, एकदा बीटी सुरु झालं की एओएलला फोन करून ते हलवायचा प्रपंच करायचं ठरवलं होतं. यथावकाश नवीन घरात गेलो. ९ तारखेला सकाळी फोन सुरु झाला का ते बघितलं. त्याच्यात कसलीही धुगधुगी नव्हती. घरात आणखी एक फोनचं सॉकेट आहे का ते पाहिलं. ते नव्हतंच. आता परत बीटीला फोन करणं आलं.. मला टेंशन आलं.. इंग्लंडमधे असल्या कामाचे फोन फुकट नसतात.. मोबाईलवरून फोन लावला.. पैसे जास्त पडणार होते.. पण काही इलाज नव्हता.. मनाचा हिय्या करून फोन लावला. अनंत पर्यायातून मार्ग काढत, मेंदुला झिणझिण्या आणणारं ढॅणटॅण ढॅणटॅण संगीत ऐकल्यावर एकदाचा बाईचा आवाज कानावर पडला.
"गुडमॉर्निंग. मा नेमिझेलन, हौकॅना हेल्प्यूs?", या बाईचं नाव काय असावं? एक गूढ प्रश्न.. यावेळेला मी भलतं सलतं नाव घेऊन घोळ घालणार नव्हतो. परत एकदा माझी उलटतपासणी झाली आणि तिनं बाँब टाकला.
"मि. गोक्-हेल तुमचा फोन ११ तारखेला सुरु होईल."
"का? मला तर ९ तारखेला सकाळीच सुरु होईल म्हणून सांगीतलं होतं"
"हो का! मला तर इथं तशी काहीच नोंद दिसत नाहीये! मी आता परत ऑर्डर काढते", म्हणजे अ‍ॅना ऑर्डर काढायची विसरली होती तर.. किंवा अ‍ॅनाची सुझॅना केल्याबद्दल तिनं मला कॉल सेंटर पुरस्कृत शिक्षा दिली होती.
"ठीक आहे. थँक्यू! बाय!" वैतागून फोन ठेऊन दिला. आयुष्यात माणसाला इतर भोग कमी पडतात असं वाटून आकाशातल्या बापानं हा कॉल सेंटरचा भोग आपल्या मागे लावला असेल का?

११ तारखेलाही फोन सुरु न झाल्यानं माझा धीर खचला.. आता काय झालं असेल?.. परत ढॅणटॅढॅणच्या तालावर वाजत गाजत दाखल झालो.
"गुडमॉर्निंग. मा नेमिज्कॅथी, हौकॅना हेल्प्यूs?". सगळ्या खानदानाची चौकशी झाल्यावर माझ्या समस्येला वाचा फोडली.
"मि. गॉखाले, आमच्याकडे सगळा सेटप झाला आहे. तुमच्या इथे दोन फोनची सॉकेट्स आहेत का?", हिनं तर मला इटालियनच करून टाकला.
"मला तरी नाही दिसली"
"तुमच्या सॉकेटवर बीटी लिहीलेलं आहे का?"
"नाही गं बाई! त्यावर सॉकेट असं पण लिहीलेलं नाही", वैताग वाक्यावाक्यातून कारंजासारखा थुई थुई उडायला लागला.
"मग मी इंजिनिअरला तुमच्या घरी भेट द्यायला सांगते"
"नको. नको. त्याचा खर्च मला परवडणार नाही"
"एकूण खर्च, लाईन दुरुस्त करायचे १२० पौंड अधिक इंजिनिअरचे तासाला १०० पौंड, इतकाच होईल फक्त". फक्त दोन-तीनशे पौंडाचा फणस? मला राणीचा नातू वगैरे समजते की काय ही?
"हे बघ. मी फोन इकडे हलवायच्या आधी मला काही खर्च पडणार नाही याची खात्री केली होती. आता कसला खर्च पडेल म्हणून सांगतेस? मला नको तुमचा फोन. मला ऑर्डर कॅन्सल करायचीय आता"
"आता कॅन्सल करायची असेल तर १२ महिन्यांचं फोनचं भाडं भरावं लागेल, १३२पौंड फक्त"
"काय? का नाही कॅन्सल होणार?"
"मी काही करु शकत नाही त्याबाबतीत. आमची सिस्टम तुम्हाला १२ महिन्याचं भाडं भरल्याशिवाय कॅन्सल करु देत नाहीये"
"मला तुझ्या बॉसशी बोलायचंय"
"ठीक आहे. थँक्यू फॉकॉलिंग बीटी". त्याच्यावर मी आभार न मानताच फोन ठेवला, ठेवता ठेवता तिच्या ७ पिढ्या कॉल सेंटरवर जातील असा जळजळीत शाप दिला.


बराचवेळ ढॅणटॅढॅणचा मारा सहन केल्यावर एकजण 'काय शिंची कटकट आहे' थाटात उगवला, निदान मला तरी तसं वाटलं.
"गुडमॉर्निंग. मा नेमिज्पिटर, हौकॅना हेल्प्यूs?". ही फोनवरची भुतं आपली नावं का सांगतात? मला काय घेणं आहे ह्याच नाव पीटर आहे, की ज्युपीटर आहे, की रिपीटर आहे त्याच्याशी? उसन्या उत्साहाने त्यानं मला ते नेहमीचे प्रश्न विचारले. या रेटनं माझं नाव, गाव पत्ता अख्ख्या बीटीला माहीत होणार असा रंग दिसायला लागला होता. मला फोन कॅन्सल करायचा आहे असं त्याला स्वच्छ सांगीतलं.
"ओह! तुम्ही सोडून जाताय याचं फार दु:ख आहे आम्हाला. तुम्हाला १३२ पौंड भरायला लागतील". हा काय न्याव? तुम्हाला फार दु:ख आहे ते मला १३२ पौंडाचा दांडु लावून हलकं करायचं काय रे टोणग्या तुला? आँ!
"हे बघ! मी तो फोन वापरला नाही. त्याचे पैसे मी भरणार नाही", माझ्या अंगात लो. टिळक संचारले.
"सॉरी मि. गोहेल! तो निर्णय मी घेऊ शकत नाही". आयला, यानं तर माझ्या नावातल्या 'के'ला सायलेंसर लावून नरकात पाठवला.
"मग कोण घेऊ शकतं?"
"तुम्हाला कस्टमर सर्व्हिसला जायला लागेल."
"आँ? मग मी आत्ता आहे कुठे?"
"सर! तुम्ही अकाउंट्सला आहात", त्या गधडीनं मला बॉसच्या ऐवजी अकाउंट्सच्या तोंडी दिला होता तर.
"अरे बाबा! मी त्या बाईला तिच्या बॉसकडे पाठव म्हणून सांगीतलं होतं. मला तिकडे पाठवशील का प्लीज?" आवाजात शक्य तितका गोडवा आणून मी साकडं घातलं.
"हो सर! मी पोचवतो तिकडे", आणखी कुठे कुठे पोचवणार आहेत कुणास ठाऊक, नरकात पोचवून तर झालं आहेच.

ढॅणटॅढॅण "गुडमॉर्निंग. मा नेमिज्रायन, हौकॅना हेल्प्यूs?". गुन्हेगाराची नेहमीची चौकशी झाली. प्रथम त्याला मी कुठल्या विभागात आलोय ते विचारलं.
"सर्व्हिस डिपार्टमेंट मि. गोखले. मी आपल्याला काय मदत करु शकतो?", त्या हलकटानं मला चांगलाच पोचवलाय की.. याला टेलिकम्युट म्हणतात की टेलिफिरक्या? असो. 'माझ्या डोक्याचं सर्व्हिसिंग करायचंय' हे म्हणायची ऊर्मी दाबली. माझं नाव बरोब्बर उच्चारल्यामुळे मला बरं वाटलं होतं, हे नक्की.
"अरे पण मला कस्टमर सर्व्हिसला पाठवायला सांगीतलं होतं. तू तरी मला तिकडे पाठवशील का प्लीssज?" माझा सूर चांगलाच आर्त झाला असणार, कारण मला घरघर लागल्यासारखं वाटलं.
"हो सर! त्याआधी तुम्हाला एक सांगायचंय. इंजिनिअर तुमच्या घराकडे जायला निघालाय. अर्ध्या तासात तो पोचेल. तुम्ही त्याआधी घरी जाऊ शकाल का प्लीssज?", हा मला खरंच विनंती करतोय की नक्कल?
"थॅक्यू! बाय!" मी फोन आदळला आणि ऑफिसमधून धावत पळत घरी आलो. फोन हलवण्याचं एक य:कश्चित प्रकरण बघता बघता चांगलंच वातुळ झालं होतं. त्यात दोन-तीनशे पौंडानं माझा चलनफुगवटा कमी होणार याचं प्रचंड दु:ख! बीटीच्या धनुष्यातून इंजिनिअरचा बाण, मी प्रत्यंचा सोडली नव्हती तरी, सुटला होता.. माझ्या खिशाला तो केवढं भोक पाडतोय ते जड अंतःकरणाने बघण्याशिवाय मी काहीही करु शकत नव्हतो.

इंजिनिअरनं बीटीची लाईन जिथपर्यंत येते तो घराचा भाग शोधला. तिथं नुसता प्लॅस्टिकचा ठोकळा होता, त्याला सॉकेटच नव्हतं. ते त्यानं बसवलं, तरीही फोन चालू होईना. तो घालवत असलेल्या प्रत्येक मिन्टागणिक माझा खिसा पौंडापौंडाने हलका होत होता. नंतर तो खांबावर चढला आणि तिथं काहीतरी खुडबुड करायला लागला. त्याला त्या खांबालाच लटकवून, खालून मिरच्यांची धुरी द्यायची तीव्र इच्छा मला झाली.. महत्प्रयासानं ती दाबली. तो परत आला. त्यानंतर मात्र फोन चालू झाला नि लगेच मी त्याला कटवला. त्यानंतरची बिलं मी श्वास रोखून, धडधडत्या छातीनं उघडत होतो, पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, बीटीने आजतागायत कसलेच पैसे मला लावलेले नाहीत. उलट काही दिवस फोन बंद राहिल्यामुळे काही पौंड मला क्रेडिट केले. हे कसं झालं असेल? चांगला प्रश्न आहे, ज्याचं उत्तर मला मुळीच जाणून घ्यायचं नाहीये. तुम्ही उत्तर शोधायचा प्रयत्न केल्यास तुमच्या डोक्याची १०० शकलं होऊन तुमच्याच पायाशी लोळू लागतील.

बीटीचा किल्ला फत्ते झाला असला तरी अजून एओएलचा गड सर करणं बाकी होतं. सर्व धीर एकवटून फोन लावला. विविध पर्याय व रँटॅटॅ रँटॅटॅ "तुमचा कॉल आम्हाला महत्वाचा आहे, सध्या आमची सर्व माणसं कामात गढलेली आहेत, कृपया प्रतीक्षा करा", या चक्रव्यूहातून एका अदृश्य बाईपाशी येऊन ठेपलो. नाव, गाव, पत्ता, जन्मतारीख, 'डाव्या पायाला बोटं किती?' असली टुकार, निरर्थक वळणं घेत घेत गाडी स्टेशनला आली.
"२० वर्किंग दिवस लागतील", तिनं विजयोन्मादानं निकाल दिला.
"काय? २०? कसं काय? माझा फोन नंबर तर तोच आहे"
"म्हणून तर जास्त वेळ लागेल. नंबर बदलला असता तर कमी वेळ लागला असता". मला कळत नाही म्हणून काहीही बंडला मारायच्या काय?
"बरं! ठीक आहे. तू मला काही पर्याय ठेवला नाहीयेस"
"तसं साधारणपणे १५ दिवसाच्या आत होतं, पण आम्ही नेहमी जास्त सांगतो". आहे की नाही चालुगिरी?

दर आठवड्याला नेट सुरु झालं की नाही ते नेमाने बघत होतो. ३ आठवड्यांनी धीर सुटला. परत चक्रव्युहात प्रवेश केला.
"तुमची ऑर्डर नाहीये", त्या बाईनं माझ्या पायाखालचं कार्पेट काढून घेतलं.
"नाहीये म्हणजे काय? गेली कुठे?"
"सॉरी सर! मला माहीत नाही"
"माझं अकाउंट? ते तरी आहे का?"
"नो सर! ते बंद झालंय ९ फेबला"
"आँ! बंद झालं? असं कसं बंद झालं. आणि बंद झाल्यावरसुध्दा तुम्ही माझ्याकडून पुढच्या महिन्याचे पैसे कसे घेतले?"
"सॉरी सर! मला माहीत नाही. तुम्हाला हवं असेल तर मी परत ऑर्डर घालीन बापडी"
"हो. घाल. पण यापुढे २० दिवस लागणार?"
"नाही. नाही. यावेळेला आम्ही १० दिवसात करू"
"ठीक आहे. पण त्या ऑर्डरचा नंबर मला दे". हे म्हणजे दुधानं तोंड पोळलं की....
"ओके! हा नंबर घ्या, ७८७६४५२३". मी मुकाटपणे लिहून घेतला आणि आणखी काही दिवसांच्या नेट वनवासाची मानसिक तयारी केली.

दोन आठवड्यांनी परिस्थितीत ढिम्मसुध्दा फरक पडला नव्हता. माझ्याकडून अजून एका महिन्याचे पैसे मात्र निर्लज्जपणे काढून घेतले होते. आज लढायच्या तयारीनंच फोन फिरवला. बीटीच्या कारकुंड्यांनी 'गोखले' हा शब्द किती प्रकारे चालवता येतो याचे धडे दिलेच होते, त्यात एओएलच्या कारकुंड्यांनी घातलेल्या मौलिक भरीकडे दुर्लक्ष करीत मी कडाडलो.
"माझं ब्रॉडबँड अजून सुरु झालं नाहीये. माझा ऑर्डर नंबर ७८७६४५२३ आहे"
"सॉरी सर! असा नंबर अस्तित्वात नाही". आता नुसतं कार्पेट नाही तर आख्खी जमीन माझ्या पायाखालून काढून घेतली.
"असा कसा नाहीये? मी स्वतः मुद्दाम त्या बाईकडून नंबर मागून घेतला होता"
"सॉरी सर! इथं कुठलीही ऑर्डर दिसत नाहीये. पाहिजे तर मी नवीन ऑर्डर टाकते". अरे! ह्यांची सिस्टम आहे का ब्लॅकहोल? घातलेल्या ऑर्डरी गायब होतात म्हणजे भुताटकीच झाली म्हणायची! रागानं लालबुंद व्हायच्या ऐवजी एकदम काहीतरी आठवून मी शांत झालो. माझ्यासारख्याच कुण्या एका भंपक प्रोग्रॅमरने शेण खाल्लेलं असणार, दुसरं काय? मनाशी हसून मी त्या व्यवसायबंधूला उदार मनाने माफ केलं.. पण आज सोक्षमोक्ष लावायचाच होता.. युध्द पुढे सुरु झालं.
"हे पहा! तू नवीन ऑर्डर काही टाकू नकोस. त्यापेक्षा मला तुझ्या बॉसकडे पाठव"
"सर! मला इथून पाठवता येणार नाही, तुम्ही फोन ठेवा आणि हा दुसरा नंबर फिरवा"
"हो. मी फिरवतो. पण तिथं परत १७६० पर्याय देतील त्यातला कुठला घेऊ ते सांग"
"कस्टमर सर्व्हिसकडे जा, सर! ऑलराईट?" तिनं हसत हसत सांगीतलं. याला म्हणतात सर्व्हिस विथ अ स्माईल!

कस्टमर सर्व्हिसकडे गेल्यावर एक बारक्या भेटला. त्यानंही परत तेच तुणतुण लावलं. त्याची मदत होणार नाही हे मला माहिती होतंच. मी त्याला बॉसकडे पाठवायला सांगीतलं. थोडा वेळ रँटॅटॅ झाल्यावर एक जण अवतरला.
"माझं नाव चिंतामण गोखले, पत्ता अमुक अमुक, जन्मतारीख अमुक अमुक, तू काय करतोस ते सांग", मी तिरसटपणे त्याच्यावर डाफरलो.
"सर! तुमचा अकाउंट नंबर राहिला". हा गृहस्थ म्हणजे स्थितप्रज्ञ कसा असावा याचं उत्तम उदाहरण!
"१२३४५५६७८९", मी अजून तिरसटपणा केला.
"सर! सर! एवढा मोठ्ठा नंबर नसतो"
"दहा, अकरा, बारा, तेरा", माझा पारा १००च्यावर गेला होता.
"सर! सर! तुमची काहीतरी चूक होतेय! एवढा मोठ्ठा नंबर नसतो आमच्यात"
"माहिती आहे मला. मी राग शांत करण्यासाठी १ ते १०० आकडे म्हणत होतो. माझा नंबर गेला खड्ड्यात! तू काय करतोस ते सांग", मी गुरगुरलो.
"सर! मी फर्स्ट लेव्हल सपोर्टला आहे". मघाच्या गाढवानं मला बॉसकडे पाठवायच्या ऐवजी दुसर्‍या एका बारक्याकडे पाठवला होता. माझ्या सर्व खंग्री शिव्याशापांना ते सगळे पुरून उरले होते. वर माझ्याशी उंदीरमांजराचा खेळ पण खेळत होते. शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये तसंच शहाण्या माणसानं कॉल सेंटरचे फोन फिरवू नये असंही म्हणायला पाहीजे. पण कलियुगात, कॉल सेंटर नुसत्या पाचवीलाच नाही तर पहिलीपासून सर्व इयत्तांना पुजलेलं आहे. हे कंपन्यांनी सामान्य माणसाची पध्दतशीर गळचेपी करण्यासाठी काढलेलं एक षडयंत्र आहे.
"मला तुझ्याशी बोलायंच नाही, तू बॉसकडे पाठव"

यावेळेला मात्र बॉसकडेच गेलो.. मलाही आश्चर्याचा धक्का बसला. सर्व परिस्थिती ऐकल्यावर तो म्हणाला, "सॉरी सर! सध्या ग्राहकांच्या खूप तक्रारी आहेत ऑर्डर्स गायब होण्याबद्दल. आता मी परत एक ऑर्डर काढतो"
"अरे भाऊ! जर ऑर्डर गायब होतायत तर तू काढून तरी काय उपयोग?", मी म्हंटलं. नक्की कुणाच्या डोक्यावर परिणाम झालाय? माझ्या की त्याच्या?
"नाही सर! मी लेखी ऑर्डर काढणारेय"
"ठीक आहे. मला ऑर्डर नंबर मेल कर अमुक अमुक पत्त्यावर. आणि माझ्याकडून उगीचच पैसे घेताहात ते परत करणार असं पण त्यात लिही"
"काळजी करु नका, सर! मी मेल पाठवतो"
"आता मी किती दिवस हरी हरी करु?"
"फक्त दोन आठवडे, सर!"

दोन आठवड्यांनी नेट सुरु झालं आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. चला! आता परत घर हलवे पर्यंत, म्हणजे दोन-एक वर्ष तरी काळजी नाही. काही महिन्यांनी माझ्या बॉसने माझी दुसर्‍या गावी बदली झाल्याची कटु बातमी दिली आणि मला ब्रह्मांड आठवलं.. मनात म्हंटलं 'ओ नो! नॉट अगेन!"

-- समाप्त --

8 comments:

सर्किट said...

अगदी खरंय! फोन, इण्टरनेट, मोबाईल चे सर्व्हिस प्रोव्हायडर्स, एअरलाईन्स, टीव्ही चॅनल्स देणारे सगळे चोर किती मनस्ताप देतात. आणि लोकांना वाटतं लेकाचा फ़ॉरिनला मजा करतोये. मग वाटतं, आपण ह्या मनस्तापांना तोंड देत, त्यात वेळ घालवतच दिवस महिने घालवतो, आणि फ़ॉरिनला रहात असल्याचा उपभोग घेण्याचं कायम राहून जातं.

सही लिहीलंय पोस्ट!

bhaanasa said...

अगदी अगदी. इतका मेला त्रास. हे म्युझिक एकून तर आजकाल मला कधीही ते कानात वाजायला लागते. छान लिहीलेत. खूप दिवसांनी इतकी हसले.

Aniket Samudra said...

खुप्पच छान, हसुन हसुन वाट लागली. "माझ्या सारख्या प्रोग्रमर ने शेण खाल्ले.." या वाक्याला तर मी अगदी जोर-जोरात हसलो, आजुबाजुची लोकं बघायला लागली ना माझ्याकडे!!

असो, खरंच मज्जा आली.

AL said...

tell me about it,its the same every where! ATT SUCKS! any ways he mala indian sarkari office sarkhe vatatt. Hya table la nahi tikade ja, tikade nahi dusrya sahiba kade ja! Awesome man,

Sonal said...

yet another bhannat post!

Aparna said...

हा..हा.. ह.ह.पु.वा... :)

Anonymous said...

आजच सापडला हा ब्लॉग... जबरदस्त लिहीता तुम्ही... तुमच्या आरेसेस ऍटम फीड्स माझ्या ब्लॉगवर सबस्क्राईब करून ठेवल्यात...
अशक्य विनोदी लिहीता तुम्ही...

पुलेशु

संकेत आपटे said...

नेहमीसारखीच हीही पोस्ट भारी. आजचा दिवस मी एवढा हसलो आहे जेवढा मागच्या पूर्ण आठवड्यात हसलो नसेन...