Posts

Showing posts from 2024

एक 'नोट'वर्दी अनुभव

 "त्या नोटा बाद झाल्यात आता!".. अद्वैतनं, माझ्या भाचीच्या नवर्‍यानं, मी माझ्या पाकीटातले पैसे मोजताना पाहून सुनावलं. कोव्हिडमुळे यावेळी तब्बल 4 वर्षानंतर भारत भेटीला आलो होतो. खूप पूर्वीपासून, जेव्हा एटीम नव्हते तेव्हापासून, भारतातून परत जाताना थोडे फार भारतीय चलन घेऊन जायची सवय लागली होती. कारण, परत भारतात आल्यावर विमानतळावरून घरी जाण्यासाठी ते कामाला यायचं. त्या सवयीचा दणका असा अचानक बसला. "कुठल्या नोटा बाद झाल्या?".. नोटा पण आता फलंदाजांसारख्या बाद व्हायला लागल्या की काय या शंकेला प्रयत्नपूर्वक बाद करून मी संभ्रमित चेहर्‍यानं पृच्छा केली.  "अहो त्या 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या आहेत मागच्या वर्षी.".. त्यानं खुलासा केल्यावर वेगाने चाललेल्या बसने अचानक ब्रेक मारल्यासारखा धक्का मला बसला. आयला, दर वेळेला काय हे नोटा बाद करण्याचं झंझट? मागच्या वेळेला  भारतातून परत जायच्या वेळेला 500 रुपयाच्या नोटा बाद केल्याच्या बातमीनं मला विमानतळावर सरकारी  हिसका दाखवला होता. सरकार आयटी कंपन्यांसारखं नोटांच्या नवीन आवृत्त्या काढून मागच्या बाद करायला शिकलं की का...

वय की आकडा - एक प्रौढ चिंतन

 काही लोक 'वय काय? नुसता एक आकडा तर आहे' असं एखाद्या तत्वज्ञान्याचा आव आणून म्हणतात.. किंबहुना, असं म्हणायची एक फॅशनच झाली आहे. याच लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या की त्यांचा आकडा वाढल्याची जाणीव अस्वस्थ करून जाते. लग्न जमवायच्या वेळेला या तर आकड्याला अअसामान्य महत्व येतं. वयाला एक आकडा म्हणणं म्हणजे सजीवाला एक हाडाचा सापळा किंवा अणुंचा ढिगारा म्हणण्याइतकं अरसिकपणाचं आहे. वय एक आकडा असला तरी तो आपल्याला लावता येत नाही. खरं म्हटलं तर वयाला एका आकड्यापेक्षा इतरही काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहेत. वय एक प्रवाही आकडा आहे. एकदा जन्म घेण्याचा नळ सुटला की वयाचा प्रवाह सुरू होतो. हा प्रवाह डायोड मधून जाणार्‍या विद्युतप्रवाहा प्रमाणे फक्त एकाच दिशेने जाऊ शकतो.. त्याला मागे जाणं माहिती नाही आणि निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने पुढे पण जाता येत नाही. प्रवाहाला अनेक अडथळे येतात पण त्याचा वेग कधीही कमी होत नाही. कुठेही विचार करीत थांबायला त्याला वेळ नसतो. कुठल्याही भोवर्‍यात सापडून गोल गोल फिरणं त्याच्या नशिबात नसतं. इतर प्रवाह याला येऊन मिळत नाहीत किंवा हा दुसर्‍या प्रवाहाला मिळत नाही...

माझा लेखन प्रपंच!

 माझे वडील सरकारी B.Ed. कॉलेजचे प्राचार्य असल्यामुळे दर एक-दोन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे महाराष्ट्रातील काही खेडेगाव-वजा-शहरात माझं बालपण जास्त गेलं. मी बारा भानगडी केलेल्या नसल्या तरी बारा गावचं पाणी जरूर प्यालेला माणूस आहे! पुण्याच्या बाहेरच्या शाळा विशेषत: मराठवाड्यातल्या प्रचंड विनोदी होत्या. मराठवाडा तेव्हा मागासलेला होता त्यामुळे त्यांचा दर्जा पुण्यातल्या शाळांच्या खूप खाली आणि अभ्यासक्रम सुद्धा एक वर्ष अलिकडचा होता. नववी मधे पुण्यातल्या शाळेत आल्यावर मला समजलं की मला कुठल्याच विषयातलं काहीच समजत नाही आहे. पुण्यात आठवीतच संस्कृत विषय सुरू झाला होता आणि रामरक्षेतल्या थोड्या फार श्लोकांपलीकडे काही माहीत नव्हतं. गणितात सगळे प्रमेय व रायडर्स नामक अगम्य भाषा बोलायचे. आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा मी खचलो. मला कुठलीच शाळा कधीच न आवडायला ते एक कारण झालं. कुठल्याही विषयाची गोडी लागली नाही, मराठीची देखील! माझा एक नंबरचा शत्रू म्हणजे कुठल्याही भाषेचं व्याकरण! 'हत्ती मेला आहे'.. व्याकरणाने चालवून दाखवा सारखे प्रश्न डोक्यात तिडिक आणायचे. निबंध झेपले नाहीत. त्यामुळे मला कुठल्याही भ...