Tuesday, July 13, 2010

क्लोज एन्काउंटर्स ऑफ द चायनीज काईन्ड

आपल्या ऑफिसात कामाला नसलेल्या, आपल्या शेजारी रहात नसलेल्या, आपल्याला रोजच्या बसमधे न भेटणार्‍या, आपल्या मुलाच्या मित्राचा बाप नसलेल्या, म्हणजे थोडक्यात आपल्याला कुठेही न भेटणार्‍या आपल्या सारख्याच सामान्य चिन्याशी आपली रोज भेट होण्याची किती शक्यता आहे? माझ्या मते, प्रियांका चोप्रा माझी हिरॉईन होण्याची जेव्हढी शक्यता आहे तेव्हढीच.. पण तरीही ती शक्यता माझ्या बाबतीत वास्तवात आली.. एका चिन्याच्या भेटीचा योग रोज आला.

तेव्हा मी रोज ५० मैल लांब असलेल्या गावातून ऑक्सफर्डला गाडी हाकत यायचो. पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे डोळ्यात येणारे पाणी (त्याऐवजी पेट्रोल आलं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटायचं) आणि डिव्हायडरने प्रत्यक्ष भेटून दाखवलेलं झोपेचं खोबरं या विघ्नांना शरण जाऊन मी एका कार शेअर साईटला साकडं घातलं.. कंप्युटर पाण्यात ठेवला.. आणि थोड्याच दिवसात.. म्हणजे तब्बल एका वर्षा नंतर एका चिन्याने साद दिली.

आम्ही प्राथमिक चर्चा करायला प्रथम भेटलो.. पहिलं हाय हॅलो झाल्यावर मी त्याला त्याचा नेहमीचा रस्ता जाणून घेण्यासाठी विचारलं "हाऊ डू यू गो टू ऑक्सफर्ड?".
तो: "हाऊ व्हॉट?" कॅसेट चुकून जास्त वेगाने वाजवली तर जसा आवाज येतो तसा आल्यासारखा त्याचा चेहरा झाला होता.
मी: "विच वे यू गो?"
तो: "विच व्हॉट?" परत मख्ख चेहरा आणि मिचमिचे डोळे अजून बारीक.. मी इतका कर्णबंबाळ बोलतो का?
मी : "व्हॉटिज युवर युज्वल रूट?"
तो: "युवs व्हॉट?" त्याच्या चेहर्‍यावर काही समजल्याचे भाव नव्हते.. त्याच्या व्हॉटच्या मार्‍यापुढे माझ्या इंग्रजीने मान टाकली आणि मी हतबुद्ध झालो.

थोडा वेळ नुसतंच एकमेकांकडे शून्य नजरेने बघितलं.. अचानक मला त्याचा इंपीडन्स मिस्मॅच होतोय असा साक्षात्कार झाला.. मी नेहमीच्या वेगाने इंग्रजी बोललो की वाक्यातला जेमतेम दुसरा तिसरा शब्द कानातून आत मेंदूपर्यंत जाऊन रजिस्टर होऊन त्याचा अर्थ लागेपर्यंत वाक्यच संपत.. मग उशीरा मंगल कार्यालयात गेल्यामुळे बँडवाल्यांच्या पंक्तीला बसायला लागल्यासारखा त्याचा चेहरा होतो.. आणि वाक्यातला एखादा समजलेला शब्द घेऊन, त्याला 'व्हॉट' जोडून, तो मला प्रतिप्रश्न करतो. मला हे कळायला इतका वेळ लागण्याचं काही कारण नव्हतं खरं, कारण माझंही ब्रिटीशांशी बोलताना अगदी अस्सच होतं.

रस्ता प्रकरण मिटवून आम्ही एकमेकांना कुठं भेटायचं आणि कुठं सोडायचं यावर व्हॉटाघाटी सुरू केल्या.
नकाशातल्या एका रस्त्यावर बोट ठेऊन तो म्हणाला "आय सेंड यू हिअs".. त्या ठिकाणातलं तो मला काय पाठवणार आहे ते कळेना. 'सेंड व्हॉट' म्हणायची प्रचंड उर्मी त्याला राग येईल म्हणून दाबली. पण माझी मूक संमती आहे असं त्याला वाटायचं म्हणून मी प्रचलित मार्ग स्विकारून म्हंटलं - "सॉरी?"
तो: "आय सेंड यू हिअs इन ऑक्सफर्ड अँड यू सेंड मी हिअs".. आता नकाशातल्या दोन ठिकाणांवरून बोट फिरलं.. एक माझ्या ऑफिसजवळचं होतं आणि एक त्याच्या. त्याला सेंडणं म्हणजे सोडणं म्हणायचं होतं.

मग आमची सेंडायच्या जागांवर चर्चा झाली. एक जागा "नो एनी पाsकिंग" म्हणून गेली.. 'नो एनी' हा त्याचा आवडता वाक्प्रचार होता.. 'एकही अमुक टमुक नाहीये' याला तो 'नो एनी अमुक टमुक' म्हणायचा.. 'नो एनी बस फॉs लंडन', 'नो एनी रेस्टॉरंट' असं. दुसरी एक जागा तिथं खूप ट्रॅफिक असतं ("कार्स आs टू मच") म्हणून फेटाळली गेली. तिसरी जागा 'पीपल स्पिडिन ड्रायव्हिन' म्हणजे लोक त्या रस्त्यावर खूप स्पिडिंग करतात म्हणून बोंबलली. शेवटी एकदाच्या सेंडायच्या आणि उचलायच्या जागा ठरल्या.

का कुणास ठाऊक पण जाता जाता त्यानं मला लायसन्स मागून उचकवला.. माझ्याकडे बघून या फाटक्याकडे गाडी सोडा पण लायसन्स तरी असेल की नाही असं वाटलं बहुतेक त्याला.. किंवा मी कुणाचीही मदत न घेता गाडी चालवू शकतो यावर अविश्वास. पण इतक्या नवसासायासाने गावलेला शेअरोत्सुक इसम सहजासहजी घालवण्यात काही 'अर्थ' नव्हता म्हणून मी पडतं घेऊन त्याला लायसन्स दाखवलं.. नंतर उगीचच त्याचं लायसन्स मागून, भारतीय असलो तरी उगीच पडती भूमिका घेणार नाही, हे बाणेदारपणे दाखवून दिलं.. कुठे माझ्यासारखा सह्यगिरीतला वनराज आणि कुठे तो ग्रेट वॉलच्या फटीतला किरकोळ कोळी? कार शेअर करण्यापूर्वी घ्यायची काळजी या संबंधी त्या साईटवर काही सूचना आहेत त्याच तो पाळत होता असं त्यानं नंतर आमची गट्टी जमल्यावर सांगीतलं.

गोरापान, मिचमिचे डोळे, चौकोनी फ्रेमचा चष्मा, बुटका, हसरा चेहरा आणि नीट कापलेले पण सरळ वळणाशिवाय इतर कुठल्याही वळणाला न जुमानणारे केस असं साधारण रंगरूप होतं त्याचं. पहिल्या काही दिवसात आमचं चांगलं जमलं आणि एकमेकांशी जमेल तसं बोलायला सुरुवात झाली. तो बेजिंग जवळच्या कुठल्याशा शहरातून आलेला होता.. त्यानं चीनमधेच एन्व्हायरनमेंटल इंजिनिअरिंग मधे पीएचडी केलेली होती.. प्रेमविवाह झालेला होता.. बायको त्याच्याच वर्गातली होती.. त्याला शाळेत जाणारा एक मुलगा होता. इकडे येऊन ७/८ वर्ष झालेली होती.. इकडे आल्यावर त्याच्या बायकोने इंजिनिअरिंग मधे मास्टर्स करून नोकरी घेतली होती. त्याच्या बायकोला स्वयंपाक येत नव्हता. डॅननं तिला शिकवला पण अजूनही तिला तितकासा चांगला जमत नाही म्हणून तो स्वतःच करायचा.

त्याचं नाव डॅन होतं. त्याचं खरं नाव झँग चँग असलं काही तरी झांजेच्या आवाजासदृश होतं. चिन्यांना त्यांच्या नावांची परदेशी लोकांनी केलेली चिरफाड अजिबात चालत नसावी.. कारण बहुतेक चिनी इकडे इंग्रजी नाव घेतात.. कुठल्याही गैरचिन्याला चिनी नावांचा उच्चारकल्लोळ करणं सहज शक्य आहे.. कारण चिनी भाषेत प्रत्येक शब्द ४ वेगवेगळ्या प्रकारे उच्चारता येतो आणि प्रत्येक उच्चाराचा अर्थ वेगळा होतो.. हो.. आपल्या भाषेत भावनांच्या छटा दाखवायला आपण शब्दाच्या उच्चाराला उतार चढाव देतो.. पण चीनी भाषेत उतार चढावाचे चक्क वेगवेगळे अर्थ होतात.

तर, पहिला उच्चार आपण कुठल्याही शब्दाचा करू तसा सरळ करायचा.. म्हणजे सुरात कुठलाही चढ-उतार न करता. शब्द वरच्या सुरात चालू करून खाली आणला की होतो दुसरा उच्चार. शब्द वरच्या सुरात चालू करून, खाली आणून परत वर नेला की तिसरा उच्चार. चौथ्या उच्चारासाठी शब्द खालच्या सुरात चालू करून वर न्यायचा. 'माझं नाव चिमण आहे' याचं चिनी भाषांतर 'व्हादं मिंझ जियाव चिमण' असं आहे पण उच्चारताना व्हादं चा तिसरा उच्चार, मिंझ चा दुसरा, जियाव आणि चिमण चा पहिला उच्चार करायचा.. यापेक्षा वेगळे उच्चार स्वतःच्या जबाबदारीवर करावेत.. वेगळे केले तर 'चिमण वनवासात गेला होता' असा पण अर्थ निघू शकेल!

चिनी भाषेत शब्द मुळाक्षरांपासून बनत नाहीत.. शब्द हेच एक मुळाक्षर असते. शाळेत त्याना 'ऐसी अक्षरे मेळवीन' न शिकविता 'ऐसे शब्द मेळवीन' असं शिकवितात. त्यामुळे परकीय भाषेतील शब्द चिनी भाषेत लिहायचा म्हणजे एक मोठ्ठा द्राविडी प्राणायाम! त्या शब्दाच्या उच्चाराच्या तुकड्यांच्या साधारण जवळचे चिनी भाषेतले शब्द एकमेकांना जोडायचे. भाषेच्या लिपीत मुळाक्षरं नसणं याचा किती फायदा किंवा तोटा आहे हे पहायचं असेल तर घटकाभर असं समजा की मराठीत मुळाक्षरं नाहीत, फक्त शब्द आहेत... तर कम्युनिटी चं 'कमी-नीति', मोबाईल चं 'मोर-बाईल' किंवा कस्टमर चं 'कस-टर-मर' अशी अभद्र रूपं होतील... तसंच टेलिफोन, क्वीन अशासारख्या शब्दांच तर पूर्ण भजं होईल. हा अर्थातच माझा अंदाज आहे.. प्रत्यक्षात चिनी भाषेत अगदी अस्संच होतं की नाही मला माहीत नाही.

मला असं कळालं की चिनी भाषेत 'र' च्या फार जवळचा शब्द नसल्यामुळे त्यांना त्याचा उच्चार नीट करता येत नाही.. त्याचा उच्चार थ्रु सारखा वाटतो. त्यात 'र'ची पूर्ण बाराखडी म्हणायला सांगीतली तर फेफरं येईल.. यामुळेच चिनी माणूस महाराष्ट्रात गुरं वळायला योग्य नाही कारण तो 'हल्या थिर्रर्रर्र' म्हणूच शकणार नाही. या अशा कारणांमुळेच चिनी लोकांच्या इंग्रजी उच्चारावर फार मर्यादा येत असाव्यात. चिनी लोक is चा उच्चार 'इ' आणि 'ज' लांबवून करतात... ईsजs.. त्यामुळे कानाला थोडी इजा होते. तसंच 'just' चं जsस्टs, 'pick me up' चा पिक्कs मी अपs, बिगचा उच्चार बिग्गs! पण बाल्कनी चा बाल्खली मात्र चांगलाच गोंधळात टाकतो!

एकदा त्यानं मला विचारलं 'यू हॅव सां?'.. 'सां व्हॉट?' मी विचारलं.. आता मी निर्ढावलेला व्हॉटसरू झालो होतो.. पण डोक्यात 'सांवर सांवर रे, उंच उंच झुला' नांदत होतं. शेवटी बर्‍याच मारामारी नंतर तो 'तुला मुलगा आहे का?' असं विचारत होता हे समजलं.

मीही माझ्या परीने त्याला बुचकळ्यात टाकायचं काम करायचो, नाही असं नाही.. शेवटी सह्यगिरीतला वनराज कमी पडेल का कुठे? त्याला एकदा म्हंटलं 'हॅव यू सीन धिस पिक्चर, कॅसीनो रॉयाल?'.. लगेच प्रश्न आला 'व्हेअs?'.. आता मी बुचकळलो.. मला 'सीन व्हॉट?' किंवा तत्सम प्रश्नाची अपेक्षा होती.. या बहाद्दराचा असा व्हॉट चुकलेला नवरा कसा झाला?.. 'व्हेअर हॉट? इन द थिएटर! इट्स न्यू जेम्स बॉन्ड पिक्चर' माझ्या उत्तरामुळे त्याची ट्यूब लागली... 'ओ! यू मीन मूव्ही" म्हणून तो फिदीफिदी हसला... मराठीतले असे नेहमीचे शब्दप्रयोग कधी मान खाली घालायला लावतील काही सांगता येत नाही बघा.

पूर्वी चिनी भाषेतलं लिखाण वरून खाली आणि उजवीकडून डावीकडे करायचे. गंमत म्हणून मी 'रंग ओला आहे.. विश्वास नसल्यास हात लावून बघा' हे दोन ओळीत लिहीलं तर ते प्राचीन शिलालेखाचे तुकडे शेजारी शेजारी ठेवल्या प्रमाणे दिसलं.
ब वू त स स स वि आ ओ रं
घा न ला हा ल्या न श्वा हे ला ग

हिंमत असेल तर सरळ वाचून अर्थ लावून दाखवा! अशा लिहीण्यानं मानेला नको इतका व्यायाम होतो हे बहुधा त्यांच्या लक्षात आलं असावं कारण आता ते आपल्यासारखंच लिहायला लागले आहेत. असे काही तोटे असले तरी काही बाबतीत चिनी भाषा समृद्ध आहे.. वेगवेगळ्या नात्यांना असलेल्या शब्दांच्या बाबतीत इंग्रजी भाषेला फारच मर्यादा आहेत.. काका असो वा मामा इंग्रजीत तो अंकल असतो, काकू आणि मावशी यांना एकत्रितपणे आँट खाली दडपतात. चिनी भाषेत मात्र काकाला दोन शब्द आहेत.. बापापेक्षा लहान भावाला एक आणि मोठ्याला दुसरा. अशीच श्रीमंती इतर नात्यांच्या बाबतीत सुद्धा आहे. पूर्वी एका चिन्यानं मला सांगीतलं होतं की चिनी भाषेत बापाला 'टो' म्हणतात. आपल्या पायाच्या अंगठ्याकडे बोट दाखवून 'धिसिज नॉट माय टो!' असा विनोद पण तो नेहमी करायचा. ते आठवून मी त्याला विचारलं 'तुमच्यात बापाला 'टो' म्हणतात ना?'. त्यावर त्यानं मला "छे छे! कुणी सांगीतलं तुला? बापाला 'बा' म्हणतात".. काही काही लोकांना आपलं तोकडं ज्ञान पाजळायची किती खाज असते ना? मग ओशाळं हसत मी विचार करू लागलो की मराठीतला 'बाबा' शब्द ऐकला तर ते 'दोन बाप' असा अर्थ काढतील काय?

गर्दी टाळायला पहाटे लवकर अर्धवट झोपेतून निघायची माझी प्रथा आम्ही चालू ठेवली.. झोप उडवायला हिंदी गाणी लावून मी मोठमोठ्यांदा ओरडत जात असे.. डॅनच्या एंट्रीमुळे मन तसं करायला धजावत नव्हतं.. न जाणो, उगाच रात्री गुरासारखा 'बचाव! बचाव!' असं ओरडत उठायचा!.. त्यामुळे कुठे तरी अस्वस्थ वाटत होतं.. पण पहिल्या २/३ दिवसात माझी भीड चेपली आणि माझ्या ड्रायव्हरकीच्या दिवशी बिनधास्तपणे हिंदी गाणी लावायला लागलो.. ओरडायचो नाही, नुसती गुणगुणायचो.. त्यानंही प्रथम ती लक्षपूर्वक ऐकण्याचं नाटक करून आवडल्याचं सांगीतलं.. गाण्यांचे अर्थही विचारले. काही दिवसांनी त्याचंही धैर्य वाढलं आणि त्यानं हळूच 'मी झोपू शकतो का?' असं विचारलं.. मनात म्हंटलं 'बिच्चारा! सुसंस्कृतपणा दाखवण्यापोटी स्वतःची झोप किती मारत होता?'.. पण वरकरणी आनंदाने हो म्हंटल कारण आता त्याला अर्थ सांगावा लागणार नव्हता.. अहो, गाण्यांचे भाषांतर इंग्रजीत करणं महाकर्मकठीण प्रकरण आहे.. बघा, 'तेरे मेरे सपने अब एक रंग हैं' चं भाषांतर 'युवर ड्रीम्स अँड माय ड्रीम्स नाऊ हॅव वन कलर'.. किंवा 'वो चुप रहे तो मेरे दिलके दाग जलते हैं' चं भाषांतर 'इफ ही इज सायलेंट देन माय हार्टस् स्कार्स बर्न'.. छे! छे! भीषण आहे हो.. आपल्या इंग्रजीची लक्तरं निघतात अगदी! जास्त उदाहरणं देत नाही, यू गॉट द पॉईन्ट!

'तेरे मेरे' चं भाषांतर केल्यावर मला प्रश्न पडला की याचा नक्की अर्थ काय होतो? म्हणजे, एकाच रंगाच्या ड्रीममधे काय इतकं रोमँटिक असेल? एक तर एकच रंग असला तर ड्रीम मधलं काय दिसणार? एकाच रंगाच्या फळ्याकडे पाहील्यावर काय दिसेल? एक रंग फक्त! ते काय रोमँटिक असेल का? मला तरी प्रेमात पडल्यावर इस्टमनकलर स्वप्न दिसणं जास्त रोमँटिक वाटतंय!

भाषेचे कितीही अडथळे आले तरी आमची एकमेकांशी चालू झालेली भंकस कधीही थांबली नाही, उलटी ती वाढतंच गेली. माझ्याशी इंग्रजीतून बोलल्यामुळे त्याला फायदा होतो असं तो म्हणायचा.. नुसतं म्हणायचा नाही तर माझे आभार पण मानायचा. त्याच्या इंग्रजीबद्दल त्याला मुळीच आत्मविश्वास नव्हता. तो शाळेपासून इंग्रजी शिकला होता तरीही! पण बोलण्याचा सराव कधी झाला नाही.. म्हणजे माझ्यासारखंच.. फरक इतकाच की माझं कॉलेजपासून पुढंच शिक्षण इंग्रजीतून झालं आणि त्याचं नाही.. आणि नोकरीत सतत इंग्रजी वापरावं लागलं त्यामुळे, कदाचित, माझं इंग्रजी त्याच्यापेक्षा बरं होतं. त्याला ४ ओळींची इंग्रजी मेल लिहायला अर्धा तास लागतो असं तो म्हणायचा.. कारण, अर्थ व वाक्यरचना या गोष्टी तो पुन:पुन्हा तपासून पहायचा. लोक त्याला इंग्रजीवरून हसतील अशी भीति नेहमी वाटायची. या न्यूनगंडामुळे तो फक्त चिनी लोकांतच मिसळायचा. बाकीच्यांशी फक्त औपचारिक बोलण्यापर्यंतच मजल. त्याची बायको जेव्हा शिकत होती तेव्हा त्यानं त्याच्या क्षेत्रातलं काम मिळवायचा आटोकाट प्रयत्न केला होता पण मिळाला नाही. त्याचही कारण त्याच्यामते इंग्रजी हेच होतं. मग त्यानं मॅकडोनाल्डसारख्या दुकानातल्या कामांवर समाधान मानलं.

असंच एकदा त्याला अचानक काही तरी आठवलं......
डॅनः 'तुमच्या सिनेमात खूप गाणी असतात ना?'
मी: 'हो! बेदम गाणी असतात.'
डॅनः 'खूप पूर्वी मी एक हिंदी सिनेमा पाहिला होता चीनमधे'
मी: 'आँ! काय म्हणतोस काय? कुठला?'.. मी अक्षरशः उडालोच.. पाकीस्तान, आखाती देश किंवा रशिया असल्या देशांमधे हिंदी पिक्चर बघतात ते माहिती होतं.. पण चीनमधे?.. शक्यच नाही.. यानं नक्की दुसर्‍याच कुठल्या तरी भाषेतला पाहीला असणार.
डॅनः 'त्याचं नाव रेंजर'
मी: 'रेंजर? या नावाचा कुठलाच सिनेमा नाहीये'
डॅनः 'आय नो! मी त्या नावाचं भाषांतर सांगतोय तुला'.. बोंबला! मेंदुला सर्व प्रकारचे ताण देऊनही मला रेंजर कुठल्या हिंदी पिक्चरचं नाव असेल काही सांगता येईना. मी हार पत्करली.
मी: 'काही सुधरत नाहीये रे!'
डॅनः 'त्यातल्या हिरॉईनचं सिनेमातलं नाव लीडा होतं'.. लीडा? येडा आहे का हा? असली नावं कधी असतात का भारतात?
मी: 'अरे बाबा! असली नावं आमच्यात नसतात.'
डॅनः 'भटक्या माणूस असतो.. जिप्सीं सारखा.. त्यातलं एक गाणं असं होतं'.. असं म्हणून तो काही तरी गुणगुणला.. शब्द नाही नुसती चाल.. माझ्या पार डोक्यावरून गेलं.
मी: 'मला नाही कळत आहे. जिप्सी? ओ! कारवाँ होतं का नाव?'
डॅनः 'मला नाही सांगता येणार!'.. मग त्यानं संध्याकाळी परत जाताना गुगललेली काही पानं हातात ठेवली.. ती आवारा पिक्चरबद्दल होती. त्यात नर्गिसचं नाव रिटा आहे. हा लीडा काय म्हणत होता कोण जाणे!
मी: 'हम्म्म्म! ही स्टोरी घरदार नसलेल्या एका बेकार गुंड माणसाची आहे. तू जिप्सी काय म्हणत होतास?'
डॅनः 'आवारा म्हणजे भटक्या ना? म्हणून मी रेंजर्स किंवा जिप्सी म्हणत होतो!'
मी: 'नाही. तो घरदार नसलेला असतो.. होमलेस'
डॅनः 'ओ होमलेस! मग आवाराचं चिनी भाषांतर बरोबर केलं होतं.. लिउ लाँग त्झ! म्हणजे होमलेस. त्याचं काय आहे. इथल्या रेंजर्स नावाच्या फुटबॉल क्लबला पण चिनी भाषेत लिउ लाँग त्झ म्हणतात!'

चिनी लोकांची इंग्रजी भाषांतरं हा टिंगलीचा एक स्वतंत्र विषय आहे. त्याबद्दल गुगल रद्दी डेपोत बरंच काही सापडेल. तरीही रहावत नाही म्हणून ही काही उदाहरणं... विमानतळावरच्या इमर्जन्सी एक्झिट दारावर -- 'नो एंट्री ऑन पीस टाईम'; बंद असलेल्या हॉटेलवर -- 'द हॉटेल इज नॉट ओपन बिकॉज इटिज क्लोज्ड'; रेल्वे पोलीस केंद्रात लिहीलेली सूचना -- 'इफ यू आर स्टोलन, कॉल द पोलीस अ‍ॅट वन्स'; रस्त्यावर निसरडं आहे हे सांगायला -- 'स्लिप केअरफुली!'; सावधान पाण्यात पडाल -- 'टेक केअर टू फॉल इन्टू द वॉटर'; सुस्वागतम -- 'वेलकम फॉर कमिंग'.

एकदा भारतीय क्रिकेट टीम इंग्लंडच्या दौर्‍यावर आली आणि मी गाडीमधे त्याला न जुमानता कॉमेंट्री ऐकायला सुरुवात केली. परिणामी त्याला क्रिकेट कसा खेळतात याची उत्सुकता लागली. मी घरी जाऊन विचार करायला लागलो की याला हा खेळ कसा समजावून द्यावा? तेसुध्दा इंग्रजीत? शेवटी गुगलच्या माळ्यावर हे एक अशक्य वर्णन हाती मिळालं....

You have two sides, one out in the field and one in. Each man that's in the side, that's in, goes out, and when he's out, he comes in and the next man goes in until he's out. When they are all out, the side that's out comes in and the side that has been in goes out and tries to get those coming in, out. Sometimes you get men still in and not out.

When a man goes out to go in, the men who are out try to get him out, and when he is out he goes in and the next man in goes out and goes in. There are two men called umpires who stay all out all the time and they decide when the men who are in are out. When both sides have been in and all the men have out, and both sides have been out twice after all the men have been in, including those who are not out, that is the end of the game!

मी त्याला हे वाचून दाखवलं आणि त्याच्याकडे हसत हसत पाहीलं.. मला जोरदार हास्याची अपेक्षा होती.. पण त्यानं म्हशीसारख्या बधीर चेहर्‍यानं तो कातिल प्रश्न टाकला... 'आउट व्हॉट?'. सुंदरी समोर शायनिंग करायला जावं आणि पाय घसरून शेणात पडावं असं झालं. त्याला त्यातला विनोद समजावून सांगणं माझ्या इंग्रजी कक्षेच्या बाहेरचं होतं.

तो मला वेळोवेळी चीनची कशी वेगवान प्रगती चालली आहे सांगायचा. किती झपाट्याने ते नवीन रस्ते रेल्वे लाईन्स टाकतात ते ऐकून मला हेवा वाटायचा. त्यांच सरकार लागणार्‍या जमिनीचा ताबा इतक्या पटकन कसं काय घेतं हा प्रश्न मला पडल्यावर तो म्हणाला की सर्व जमिनी सरकारच्याच मालकीच्या असतात. चिनी माणसानं घर घेतलं तरी खालची जमीन ही सरकारच्याच मालकीची असते. त्यामुळे जर ती जागा रस्त्यात जाणार असेल तर सरकार त्याला दुसरीकडे घर देतं आणि लागणारी जागा काढून घेतं. त्यावर वाटाघाटी, चर्चा, मोर्चे किंवा न्यायालयीन दावे असल्या काही भानगडींना वाव नाही. कुणी प्रयत्न केल्यास सरकारी वरवंटा फिरतो. सर्वच बाबतीत हीच परिस्थिती! कुठल्याही अधिकार्‍याला 'का' प्रश्न विचारायचा नाही ही लहानपणापासूनची शिकवण! त्यामुळे शाळेत मास्तरलाही फारशा शंका विचारायची पध्दत नाही.

असंच एकदा इंग्लंडमधल्या एका सरकारी खात्याने गैरव्यवहार केल्याबद्दल न्यायालयाने त्या खात्याला दंड ठोठावला. त्यावर मी सहज त्याला म्हणालो की हा दंड ते खाते शेवटी आपण भरलेल्या टॅक्स मधूनच भरणार मग त्याला काय अर्थ राहीला? तो दंड जबाबदार अधिकार्‍यांच्या पगारातून कापून घेतला पाहीजे. अशी सगळी माझी टुरटुर त्यानं लक्षपूर्वक ऐकून घेतली मग एकदम म्हणाला की 'असा जो तुम्ही लोक विचार करू शकता ना, तो आम्ही करूच शकत नाही. कारण आम्हाला तशी सवयच नसते. आम्हाला गपगुमान सरकार सांगेल ते ऐकायची सवय आहे.' तत्क्षणी मला जाणवलं की मी स्वतंत्र देशात जन्मलो आहे ते किती मोलाचं आहे. त्याचं मोल पैशात करता येणार नाही. हुकुमशाहीत लोकांची पध्दतशीर वैचारिक नसबंदी होत असेल तर ती प्रगती काय कामाची? स्वतंत्र विचार करण्यालाच बंदी असेल तर माणूस म्हणवून घेण्याचा काय फायदा? हे जाणवल्यावर मात्र मला चीनचा हेवा वाटेनासा झाला.

====== समाप्त======