Monday, January 24, 2011

सरकार राज

सरकारी कार्यालयाचे अनंत झटके खाल्ल्यामुळे कार्यालय या शब्दाची कार्य + आलय अशी फोड कुणा गाढवानं केली हा प्रश्न मक्या मला नेहमी विचारतो. त्याच्या मते त्याची फोड खरी 'कार्य जिथे लयास जाते ते ठिकाण' अशी सार्थ व्हायला हवी होती.. शाळांमधलं शिक्षण कालबाह्य आहे ते असं! मक्याचं आणि सरकारी कार्यालयांचं काहीतरी वाकडं आहे हे मात्र नक्की! त्यानं सरकारी कार्यालयाच्या जितक्या वार्‍या केल्या तितक्या पंढरीच्या केल्या असत्या तर प्रत्यक्ष विठोबा 'कर कटेवरी' अवस्थेत त्याच्या घरात येऊन खाटेवर उभा राहीला असता. संत महात्म्यांना कधी सरकारचा बडगा बघायला मिळाला नसावा नाही तर त्यांनी 'जन्म मरणाचे फेरे परवडले पण सरकारी हापिसाचे नको!' असा टाहो फोडला असता.

लग्नानंतरचे झटके खायच्या आधी मक्याला आणि त्याच्या होणार्‍या बायकोला (मायाला) रजिस्टर्ड लग्न करण्याचा झटका आला. वास्तविक, त्यांचं लग्न हे दोन्हीकडचं पहीलं आणि शेवटचं होतं तरीही ते दोघे 'काहीतरी नवेच करा' या मानसिकतेचे बळी असल्यामुळे त्यांच्या हट्टापायी कुणाचंच काहीही चाललं नाही! मग काय? मी आणि मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसात लग्नाआधी बर्‍यापैकी लवकर हजर झालो.. रजिस्टर्ड लग्नासाठी किमान एक महिन्याची नोटीस द्यावी लागते हे समजलं होतो म्हणून. आजुबाजुच्या परिसराची आणि त्या हापिसाची एकूण दैन्यावस्था पाहिल्यावर आम्हाला झोपडपट्टी निर्मूलन केंद्रापाशी आलो की काय असं वाटलं! सरकारी हापिसं अशा निवडक गलिच्छ आणि बकाल भागातच का असावीत बरे? बहुधा, तसा नियमच असावा.. कारण, त्यामुळे त्यांना कागदोपत्री लोकाभिमुख की काय ते व्हायला जमत असेल!

एकाच हापिसात मॅरेज रजिस्ट्रेशन आणि जमिनींचे व्यवहार यांची कामं होतात असं समजलं.. दोन्ही कामं करणारा कर्मचारी वर्गही एकच! मॅरेज सर्टिफिकेट ऐवजी मक्याला चुकून ७/१२ चा उतारा दिला तर काय करायचं ही शंका चाटून गेली मात्र! हापिसाच्या भिंती 'सख्या चला बागांमधी रंग खेळू चला' या गाण्याच्या शूटिंगसाठी वापरल्या सारख्या ठायी ठायी पानाच्या पिचकार्‍यांनी रंगलेल्या होत्या! हापिसात शिरल्यावर नजरेला प्रथम फक्त फायलींचे ढिगारेच ढिगारे दिसले. प्रकाश अंधुक होता कारण खिडक्यांसमोरही फायलीच.. अंधुक प्रकाशामुळे ट्युबा लावलेल्या.. सगळ्या धुळीने माखलेल्या.. त्यातल्या काही बंद तर काही कोंबडी सारख्या पक् पक् पकाक करणार्‍या.. सर्वदूर कोळ्यांची जाळी! एका कोपर्‍यात पाण्याचा माठ! वरती लयीत घ्रंs घ्रंs आवाज करणारे पण हवा न सोडणारे काळवंडलेले पंखे! फायलींनी अर्धी अधिक व्यापलेली कळकट टेबलं! खुर्च्यांवर मळकट उशा टाकलेल्या.. काही खुर्च्या डुगुडुगू नयेत म्हणून फायलींनीच लेव्हल केलेली.. बहुतेक फायली मळकट आणि तिथल्या कारकुंड्यांसारख्याच तट्ट फुगून कचर्‍याच्या डब्यासारख्या वाहणार्‍या!

अंधारात नीट निरीक्षण केल्यावर ढिगार्‍यांच्या मागे लपून बसलेले कारकून दिसले. सगळ्यांचेच चेहरे जवळचं कुणीतरी खपल्यासारखे सूतकी होते! 'एक टेबल झेलू बाई, दोन टेबलं झेलू' असा भोंडला खेळत शेवटी एका कारकूनापाशी उभे ठाकलो तेव्हा त्यांचा लंच टाईम झाला. आम्ही किती वेळेबरहुकूम काम करतो हे कर्मचारी दिवसातून फक्त दोनच वेळी दाखवतात.. एकदा लंच टाईमला आणि दुसर्‍यांदा हापिस सुटायच्या वेळेला! तासाभराने आम्ही परत उगवलो तेव्हा, कुत्रं जसं आपलीच शेपटी पकडण्याचा निष्फळ प्रयत्न करून आपण किती बिझी आहोत असं भासवत असतं तसाच हा पण कार्यमग्न होता! काही वेळाने त्याला शेपटी शिवाय अजूनही काहीतरी काम आहे याची जाणीव झाली. त्याच्याशी झटापट केल्यावर समजलं की नोटीस द्यायचे फॉर्म संपले आहेत आणि ते एक आठवड्यांनी येणार आहेत.

दोन तीन आठवडे गेले तरी फॉर्म्सच दुर्भिक्ष संपेना.. या हापिसातले लोक दोन लग्नेच्छुक लोकांची ताटातूट करणारे व्हिलन अकस्मात होताहेत की काय अशी परिस्थिती व्हायला लागलेली!.. मग चाचरत चाचरत त्याला चहा प्यायचं गाजर दाखवलं.. तर पठ्ठ्या लगेच तयार झाला. चहा पिता पिता मी त्याच्या विविध अडचणीतून कामं करण्याच्या वृत्तीची उगाचच प्रशंसा केल्यावर गडी खुलला! मग त्याची 'मी किती थोर! मी कशी पटापट कामं उरकतो!' टाईप भंकस ऐकून घेताना आता तो दुर्लभ फॉर्म जादूने उपलब्ध होणार याची मला खात्रीच झाली! हळूच त्याला मक्याचं लग्न कसं जवळ आलं आहे याची अडचण सांगितली. त्यावर त्याने 'खरच फॉर्म संपले आहेत हो' असं सांगून आमच्या गनिमी काव्याचं शिरकाण केलं. फॉर्म विना मक्याचा आधुनिक रामदास कसा होणार आहे त्याचं सविस्तर वर्णन केल्यावर त्यानं आमची दया येऊन एक उपाय सुचवला! त्याच्या हापिसात एक फॉर्म फ्रेम करून ठेवला होता! का कुणास ठाऊक! कदाचित त्याला हौतात्म्य प्राप्त झालं असावं.. पण हार घातलेला दिसत नव्हता! त्यानं आम्हाला फॉर्म म्हणून त्या फ्रेमची झेरॉक्स वापरायला सांगितलं!

आनंदाने 'तो' फॉर्म घेरी नेऊन मक्याने भरला आणि आपली सही ठोकून मायाकडे सहीसाठी कुरीयर केला.. कारण ती दुसर्‍या गावची होती. ३/४ दिवसांनी सही झालेला फॉर्म घेऊन आम्ही परत त्याच हापिसात त्याच कारकुना समोर उभे राहीलो! फॉर्म बघितल्यावर तो खेकसला.. 'हे काय? इथे कोण सह्या करणार?'. नीट बघितलं तर फॉर्मच्या समासातल्या २/३ जागा तो दाखवत होता.. जिथे सह्या पाहीजेत असं फॉर्मवर कुठेही लिहीलेलं नव्हतं.. आणि कितीही रिडिंग बिट्विन द लाइन्स केलं असतं तरी कळालं नसतं! त्या ठिकाणी मक्याच्या आणि मायाच्या सह्या हव्या होत्या! परत कुरीयर आणि ३/४ दिवसांची निश्चिंती! हा मक्या मॅरेज रजिस्ट्रेशन हापिसाचे जितके फेरे घालतोय तितके लग्नात घातले तर त्याला पुढच्या ७ जन्मात परत लग्नाला म्हणून उभं रहावं लागणार नाही असं मला वाटून गेलं!

एकदाचा तो सह्याबंबाळ फॉर्म त्या कारकुनाच्या पसंतीस उतरला आणि आम्हाला हुश्श होतंय न होतंय तोच त्यानं आम्हाला तो फॉर्म घेऊन त्याच्या साहेबाकडे जायला सांगितलं. साहेब म्हणजे लग्न नोंदणी आणि जमिन व्यवहार नोंदणीचा रजिस्ट्रार! त्याला भेटून लग्नाचं आमंत्रण द्यायचं असतं लग्न नोंदणीची कायदेशीर बाजू संभाळण्यासाठी! साहेबाच्या हापिसात साहेब टेबलावर आणि पुढच्या खुर्च्यांवर बरीच रिकामटेकडी मंडळी पारावर बसल्यासारखी गप्पा हाणीत बसलेली होती. साहेब फॉर्म हातात घेताच म्हणाला - 'हां! कुठं आहे जमीन?'. मक्या चांगलाच पिसाळला, पण करतो काय? रजिस्टर लग्न करून आपण कसे पुढारलेले आहोत हे दाखवायचं होतं ना! त्यानं तो लग्नाच्या रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे हे म्हंटल्यावर साहेब तो फॉर्म बघितल्यासारखा करून म्हणाला - 'आत्ताच त्या वेळेचं काही सांगता येत नाही.. अजून जवळपास सव्वा महिना आहे लग्नाला! तुम्ही मला रजिस्ट्रेशनला बोलावण्यासाठी एक अर्ज करा! आणि लग्नाच्या २ दिवस आधी या! तेव्हा मी सांगेन!". तेव्हा हा म्हसोबा काय सांगणार? जमणार नाही यायला म्हणून? या पेपर पुशर मंडळींना आपल्याला सतत प्रेशर कुकर मधे ठेवण्यात एक अलौकिक आनंद मिळतो.

मक्याला अर्ज लिहीण्यासाठी कागद हवा होता. कारकुनाकडे मागितला तर सरकारी हापिसात तो देण्याची प्रथा नाही असं ठणकावण्यात आलं. शेवटी झेरॉक्सच्या दुकानातून विकत आणला. वेष असावा बावळा परंतु अंतरी नाना कळा याची जिवंत उदाहरणं म्हणजे हे कारकून! त्यांच्या अंगातली एक कळ आहे ती कुठल्याही कामाला ना! ना! करण्याची.. मात्र ती आपल्याला नाना कळा देऊन जाते! घाईघाईने अर्ज खरडून साहेबाच्या हातात कोंबला.. तो वाचून तो हसत म्हणाला - 'भारी आहात तुम्ही! त्या दिवशीच्या जाण्या-येण्याचा खर्च देऊ असं पण लिहा त्यात!'. आहे की नाही मजा? आता लग्नाला बोलावल्यावर त्याला जेवायला पण घालणारच ना? पण त्याचा जीव जाण्या-येण्याच्या खर्चात अडकला होता! ती ओळ टाकून त्याला फॉर्म देताना मक्यानं धाडस करून त्याला विचारलं की दोन दिवस आधी भेटल्यावर तो काय गुपित सांगणार आहे ते! त्यावर तो म्हणाला की मला तेव्हा तुम्हाला सांगता येईल मला कुठून पिकप करायचं ते!

शेवटी, लग्नाच्या दोन दिवस अगोदरची एक फेरी आणि लग्नानंतरच्या सर्टिफिकेट घेण्यासाठीच्या ३ फेर्‍या घातल्यावर आम्हाला मोक्ष मिळाला. लग्नाचं ओरिजिनल सर्टिफिकेट म्हणून 'त्या' झेरॉक्स केलेल्या फॉर्मचीच झेरॉक्स मिळाली. त्या काळात असं वाटत होतं की राजा केळकर संग्रहालयातून एक तलवार चोरून आणावी आणि तिचं पाणी यांना पाजावं, म्हणजे त्यांच्या घोड्यांना आपण पाण्यात दिसायला लागू!

या अनुभवानंतर लगेचच मक्यानं एक सिद्धांत मांडला - सरकारी कामं पहिल्या फटक्यात होत नाही. करॉलरी, ज्यांचं काम पहिल्या फटक्यात होतं ते सरकारी ऑफिसातलं नसतं. लग्नानंतर थोड्याच दिवसात त्याला अजून एक सिद्धांत मांडण्याची वेळ आली-- नवरा बायकोच्या आवडी निवडी कधीही जुळत नाहीत. करॉलरी, ज्यांच्या आवडी निवडी जुळतात ते एकमेकांचे नवरा बायको नसतात.

====== समाप्त ======