Thursday, March 10, 2011

अभिनय.. एक खाणे

पूर्वी पुण्यातल्या रूपाली/वैशाली हॉटेलात तुरळक गर्दी असायची. कधीही गेलं तरी बसायला नक्की जागा मिळायची.. शिवाय एका कॉफीवर बराच वेळ शिळोप्याच्या गप्पा ठोकता यायच्या! काही नाही घेतलं तरी वेटर हाकलायला यायचे नाहीत.. त्या मागे बहुतेक हॉटेल अगदीच रिकाम रिकाम वाटू नये हा उद्देश असावा.. 'कामाशिवाय जास्त वेळ बसू नये' छाप पाट्या पण नव्हत्या. वेटरांनाही आमच्याशी गप्पा मारायला वेळ असायचा. हल्ली आत घुसायला पण रांग असते. थोडा वेळ जरी काही न घेता कुणी बसलेलं दिसलं तरी वेटर लगेच येऊन नम्रपणे 'काय आणू?' विचारतात.. चाणाक्ष लोकांना ती 'टळा आता' ची गर्भित सूचना आहे हे लगेच समजतं!

त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर नेहमी प्रमाणे शीण घालवायला मी रूपालीत धडकलो. एका टेबलावर राम्या शून्यात नजर लावून नुसताच बसला होता. राम्या म्हणजे आमच्यातला सखाराम गटणे. रोज तो तिथे एकच कॉफी घेऊन तासन तास पुस्तकं वाचत बसायचा. पुस्तक बिन राम्या म्हणजे जल बिन मछली, नांगी बिन विंचू, आयाळा बिन सिंह, सोंडे बिन हत्ती.. नाही.. ओसामा बिन लादेन नाही!

'काय राम्या? आज पुस्तक नाही? असं कसं झालं? मुंग्यानी मेरु पर्वत तर गिळला नाही ना?'.. त्याला शून्यातून बाहेर काढायचा मी एक नौटंकी प्रयत्न केला. शेजारी घुटमळणार्‍या वेटरला, रघूला, काय सण्णक आली कुणास ठाऊक! 'आज जरा हे वाचा'.. असं म्हणून त्यानं एक मेन्यू कार्ड राम्या समोर टाकलं. माझ्या घश्याच्या बाटलीतून शँपेन सारखं हसू उफाळलं.. इडली, डोसा व उत्तप्प्याच्या पलीकडे फारशी शब्द संपत्ती नसलेल्या माणसाकडून असा मस्त विनोद म्हणजे पोपटाच्या तोंडून पुलं ऐकण्यासारखं हो! खूष होऊन टाळी देताना त्याच्याकडे पाहीलं तर त्याला नवीनच चष्मा लागल्याचं दिसलं.
'आयला रघू! तुला चष्मा लागला? छान दिसतोय हं पण!'

'आता मला पण छान दिसतो'.. रघू त्याच्या नेहमीच्या उडपी ढंगाने बोलला.. त्याचा फॉर्म बघून त्याला ताबडतोब कॉफी आणायला पिटाळला.

दरम्यान, इगोच्या पार्श्वभागावर लाथ बसल्यामुळे राम्यानं शून्यातून बाहेर यायच्या ऐवजी रुपालीतून बाहेर पडणे पसंत केले.. मीही कॉफी ढोसून बाहेर आलो तो दिल्या घाईघाईत येताना दिसला... माझ्याकडे बघून एकदम म्हणाला 'पर्फेक्ट!'.. या पूर्वी दिल्यानं माझ्याकडे बघून 'पर्फेक्ट!' म्हंटलं होतं तेव्हा माझ्या पलिकडे एक रेखाचं मोठ्ठं पोस्टर होतं. या खेपेला पानाची टपरी आणि आत कळकट पानवाला होता! आयला! याला या पानवाल्यात आरस्पानी सौंदर्य दिसतंय की काय? मी खलास!
'अरे, पानवाल्यात काय पर्फेक्ट? तुला काय तो साडी नेसून बसल्यासारखा दिसतोय?'

'अरे तू! तूच! हे अंगावरचे बिनइस्त्रीचे कपडे, खांद्याला शबनम, खोल गेलेले डोळे, अर्धवट दाढीचे खुंट वाढलेले! वा! एकदम पर्फेक्ट!'.. हा नक्की टिंगल करतोय की स्तुती? त्याच्या मनातलं काळबेरं समजून न घेता बोलणं हे ट्रॅम्पोलिनवर क्रिकेट खेळण्यासारखं झालं असतं म्हणून रक्षात्मक पवित्रा घेतला!

'चल आत! आपण कॉफी घेऊ म्हणजे उतरेल तुझी!'.. आत जाऊन रघूला ऑर्डर सोडली... 'हं! आता बोल!'

'अरे, इथे फर्ग्युसन कॉलेजात आज एका टिव्ही सिरीयलचं शूटिंग चाललंय. मी तिथून चाललो होतो. त्याचा डायरेक्टर माझ्या चांगल्याच ओळखीचा निघाला. त्याला एका पत्रकाराची आवश्यकता आहे. त्याच्या एका पात्राने टांग मारली वाटतं त्याला! मला म्हणाला एखादा पकडून आण! तू एकंदरीत या शबनम बॅगेमुळे फिट्ट बसशील त्यात!'.. चला, म्हणजे दिल्याला भलतच काहीतरी चढलं होतं तर! पण केवळ माझ्या शबनम पिशवी मुळे मी एका भूमिकेत फिट्ट बसणार? माझ्या अभिनय कौशल्यामुळे नाही? हे तर माझ्याकडे बॅट आहे म्हणून मला क्रिकेट खेळायला बोलावल्यासारखं झालं. आता माझ्याही इगोच्या पार्श्वभागावर लाथ बसली. पण असं सरळ कसं म्हणणार?

'अरे! काहीही काय? उद्या तू मला भरतनाट्यम् करायला सांगशील!'

'नाही! भरतनाट्यम् मधे तू शोभणार नाहीस. एकतर तू असा खिडुक! नाचताना एक गिरकी मारलीस तर चमनचिडीसारखा हवेत उडून जाशील.'.. यॉर्कर टाकायला जावं आणि फुलटॉस पडावा तसं झालं मला!

'कोण डायरेक्टर?'

'सुहास देशपांडे!'... मनात विचार आला.. हा कोण सुहास देशपांडे? कधी नाव ऐकलेलं नाही. बहुतेक माझ्यासारखाच फर्स्ट टायमर दिसतोय. असल्या माणसाकडे काम करायचं? आपली काही लेव्हल आहे की नाही?

'हम्म्म! कधी नाव ऐकलं नाही रे हे! बरं, काय आहे कथानक?'

'मला माहीत नाही'

'कोण कोण आहेत?'.. संभाषण चालू रहावं म्हणून मी उगीचच काहीतरी पचकत होतो.. पोलिसानं पकडलं तर तो सरळ मला लाच द्या असं थोडंच म्हणतो.. कामाला कुठे? पगार किती मिळतो? असले मोडलेल्या नियमाशी दूरान्वयानेही संबंधित नसलेले प्रश्न तो विचारतो.. खरं तर, 'तुला अभिनय जमतो' या अर्थाचं काहीही तो एकदा जरी म्हणाला असता तरी मी भोपळ्यासारखा टुणुक टुणुक उड्या मारत गेलो असतो. पण लक्षात कोण घेतो?

'मोहन आगाशे, शेखर कपूर आणि काही सटरफटर! च्यायला, तू स्वत:ला अमिताभ वगैरे समजतोयस काय? लागला आपला... स्क्रिप्ट काय, हिरो कोण आहे, हिरॉईन कोण असले प्रश्न विचारायला! गप चल!'.. दिल्याला एक सुसंवाद म्हणून काही साधता येत नाही!

'पण असं कसं शूटिंगला जायचं? ते काय पिक्चरला जाण्याइतकं सोप्पं आहे काय?
मला नक्की काय करायचंय ते पण माहीत नाही. मला जमणार नाही ते! मी असं ऐनवेळेला कधी केलेलं नाही काम!'

'काय बोलतोस राव? तूच गेला होतास ना आपल्या कॉलेजच्या एकांकिका स्पर्धेत ऐनवेळेला!'.. अरे! हो की! मी ते साफ विसरलो होतो.. पण आत मधे कुठे तरी सुखावलो.. त्याला ते आठवलं म्हणून.

त्या स्पर्धेत आमच्या एकांकिकेच्या आधी दुसर्‍या एकाची एकांकिका होती.. जवळ जवळ एकपात्रीच होती.. युद्धकाळात एका जर्मन माणसाच्या आश्रयाला आलेल्या एका ज्यू वर काही तरी होतं.. त्यातला ज्यू 'तो' होता आणि जर्मन माणसाला एक किरकोळ प्रवेश होता.. तो जर्मन येऊन त्याला थोडा ब्रेड आणून देतो, काहीतरी डायलॉग मारतो आणि परत जातो, असा तो प्रवेश! त्याचं जर्मन पात्र ऐनवेळेला आलंच नाही.. त्यानं ते माझ्या गळ्यात घातलं.. काकुळतीला येऊन म्हणाला - 'या बुडत्याला तूच एक काडीचा आधार आहेस!'.. म्हणजे मी काडी! पण मी तयार झालो. मग थोडं फार जर्मन दिसण्यासाठी एकाचा शर्ट आणि दुसर्‍याचे बूट चढवले.. हो, कोल्हापूरी चप्पल घातलेला जर्मन बघितल्यावर बूट फेकून मारले असते लोकांनी!.. स्टेजवरून त्यानं खूण केल्यावर मी एंट्री घेतली.. तिथे अंधार होता.. मी खिशात हात घालून अंधारातून हळूहळू चालत असताना एक स्पॉटलाईट पण तेजाळत गेला.. आणि मी स्पष्ट होत गेलो.. माझी एंट्री लोकांना का आवडली कुणास ठाऊक!.. पण नुसता टाळ्यांचा कडकडाट झाला.. आता ब्रेड आणि डायलॉग टाकायचा की झालं.. पण ब्रेड कुठाय? मी घाईघाईत ब्रेडच न्यायचा विसरलो होतो.. तरी प्रसंगावधान राखून, खिशातून हात काढून ब्रेड द्यायची नुसती अ‍ॅक्शन केली आणि डायलॉग टाकला.. 'आज एव्हढाच ब्रेड! खा आणि मर भिकारड्या!'.. माझ्या आवेशामु़ळे तो हडबडला आणि पुढचे डायलॉगच विसरला.. त्यानं ब्रेड खायच्या ऐवजी मीच त्याला खाल्ला असं लोक म्हणतात.

'कॉलेजात चालतं रे काहीही! टिव्हीवर कसं चालेल असं?'.. मी जरा जास्त गूळ लावून मिळतोय का ते बघत होतो.

'उलटं, काही चुकलं तर तिथं रिटेक घेता येतात.'

सगळे मुद्दे खोडल्यामुळे मी वरकरणी नाखुषीने त्या हॉलवर गेलो. खरच तिथं शूटिंग चाललेलं होतं. ती २ भागांची मालिका होती, पूर्ण हिंदीतून पण जास्त मराठी नट नट्या घेऊन! एका कोपर्‍यात खुद्द शेखर कपूर कुणाबरोबर तरी चकाट्या पिटत बसला होता. दुसरीकडे मोहन आगाशे आणि इतर एका शॉटच्या डायलॉगची प्रॅक्टीस करत बसले होते. त्यांच मराठी ढंगाचं हिंदी ऐकताना मला हसू फुटत होतं.. पण सगळेच गंभीरपणे घेत होते.. त्यांच्यात एकमेकांच्या समोर टिंगल करायची पद्धत नसल्यामुळे असेल!.. मग मी पण भिंतीला टांगलेल्या चित्रासारखा निश्चल झालो.

आगाशे आणि शेखर कपूर दोघेही एकेका कंपनीचे मालक असतात. आगाशेची कंपनी पैशाचं बळ वापरून घशात घालायचा शेखर कपूरचा प्लॅन असतो. शेअरहोल्डरच्या मिटिंगमधे आगाशेला बरेच जण छळतात त्यामुळे तो शेवटी फार चिडलेला आहे असं त्या शॉट मधे होतं. रिहर्सल संपून ४/५ टेक नंतर तो शॉट ओके झाला. शेवटी, डायरेक्टर आगाशेला म्हणाला 'डॉक्टरसाहेब, आपले डोळे दाखवा न जरा!'.. मग आगाशेच्या कमी जास्त चिडलेल्या डोळ्यांचे शॉट झाले.

या सगळ्या भानगडीत बराच वेळ चालला होता. रुपालीतून बाहेर पडून जवळ जवळ पाच एक तास होऊन गेले होते तरी माझ्या शॉटचा पत्ता नव्हता. बाहेर पडून घरी फोन करून येण्या इतका वेळ पण डायरेक्टर देत नव्हता. उशीराचं कारण 'शूटिंगला गेलो होतो' असं सांगितलं असतं तर बाबांनी मलाच शूट केला असता. प्रत्येक उभरत्या तार्‍याच्या नशिबी अवहेलना आणि टिंगल असल्यामुळे मी शांत राहीलो. शेवटी एकदाचा तो ऐतिहासिक शॉट आला... आज एक नवीन तारा उदयास येणार होता.

शॉट शेखर कपूरच्या पत्रकार परिषदेचा होता.. डायरेक्टरने बर्‍याच लोकांना पत्रकार पकडून आणायला सांगीतलं होतं असं लक्षात आलं. त्या परिषदेतले सर्वच पत्रकार माझ्यासारखेच उभरते कलाकार होते. शेखर कपूरच्या एका उत्तरा नंतर पत्रकार म्हणून मला फक्त एक डायलॉग टाकायचा होता.. 'आप क्या कुछ नहीं कर सकते, मेहतासाब?'

शॉट सुरू झाला.. सगळे नवशिके इकडे तिकडे बघत होते. डायरेक्टर ओरडला.. इकडे तिकडे बघू नका. शेखर कडे बघा, मधे मधे 'समजलं' अशा अर्थाने डोकं हलवून नोट्स लिहील्याचं अ‍ॅक्टिंग करा. दुसरा शॉट.. शेखर कपूरचं 'ते' उत्तर संपत आलं त्याच वेळेला एक स्पॉटलाईट माझ्या थोबाडाकडे वळू लागला.. मी देहभान विसरलो.. माझी तंद्री लागली.. मी हळूहळू चालत होतो.. थोड्याच वेळात प्रखर प्रकाशाने माझं सर्वांग उजळून निघालं आणि.. 'आज एव्हढाच ब्रेड! खा आणि मर भिकारड्या!'.. काही समजायच्या आत हा डायलॉग पडला.. कसा कुणास ठाऊक! माझ्या आवेशाने या वेळेला शेखर कपूर हडबडला आणि डायलॉग विसरला. डायरेक्टरने जोरदार 'कट' 'कट' केली.. नंतर येऊन माझ्या डोळ्यात वेडाची झाक वगैरे दिसत नाही ना ते पाहून गेला. मी भयंकर ओशाळलो.. मला बघून मृत्यू पण ओशाळला असता. मला स्वतःची प्रचंड लाज वाटली आणि खूप दडपण आलं.

त्या दडपणाखाली, तिसरा शॉट मी शेखरला मेहतासाब म्हणायच्या ऐवजी कपूरसाब म्हणून घालवला. आणि चौथ्या शॉटमधे माझा डायलॉग भलत्याच ठिकाणी पॉझ घेऊन टाकला, असा.. 'आप क्या?'.. पॉझ.. 'कुछ नहीं कर सकते, मेहतासाब!'.. झालं.. त्या वेळेला तो डायरेक्टर 'कट' 'कट' ओरडायच्या ऐवजी माझ्याकडे बघून 'हल' 'कट' असं ओरडला हे मी शपथेवर सांगू शकतो. त्याच्या नशीबानं पाचवा शॉट ओके झाला आणि सगळ्यांनाच हायसं वाटलं.

१४ मार्चला माझा अद्वितीय अभिनय टीव्हीवर झळकणार असल्याचं तमाम आप्तेष्टांना आणि हितचिंतकांना कळवलं. तो दिवस आणि ती वेळ येईपर्यंत प्रचंड उत्कंठा लागून राहिलेली होती. अखेर, टीव्हीवर ते प्रकरण झळकलं.. कधी नव्हे ते मन लावून पाहीलं.. पण माझा पार्ट त्यात आलाच नाही.. नंतर दिल्याकडून असं समजलं की मी शेखर कपूरला खाल्ला म्हणून एडिटरने मलाच खाल्ला. घनघोर निराशा!.. त्या नंतर मी परत कुठल्याही शूटिंग मधे भाग घ्यायचा नाही असा निश्चय केला. सुदैवाने कुणी विचारायला पण आलं नाही.. आणि तारा उगवायच्या आधीच त्याचा नि:पात झाला.

माझ्यामुळे उगीचच एक भिकार प्रोग्रॅम बघायला लागल्याबद्दल बर्‍याच जणांच्या शिव्या मी खाल्ल्या. पण काही हितचिंतकांनी 'आयला! काय काम केलंस लेका तू! मस्तच! केवळ ग्रेट! काय बेअरिंग संभाळलं होतस! खल्लास! तुझं भवितव्य उज्वल आहे' इ. इ. सांगून मात्र मलाच खाल्ला!

(टीप :- काही नाव खरी असली तरी सर्व प्रसंग बनावट आहेत. )

====== समाप्त ======