Thursday, January 19, 2012

अचानक सापडलेला संगीतकार..

टिव्हीवर लागलेला क्लिंट ईस्टवूड आणि शर्ले मॅक्लेनचा 'टू म्युल्स फॉर सिस्टर सेरा' पहात असताना माझं लक्ष एका गोष्टीनं वेधून घेतलं. शर्लेनं नाही हो.. त्यातल्या टायटल म्युझिकनं!

सुरवातीला एक क्लॅरनेट किंवा फ्लूट एक शांत धुन वाजवून थोडंस गूढ वातावरण निर्माण करतं. मग एक तंतुवाद्य साधी सरळ सोप्पी सुरावट चालू करतं.. कापूस पिंजताना जसे आवाज होतात साधारणपणे तसे सूर ऐकू येतात.. हाच त्या पूर्ण संगीताचा पाया! मग इतर चित्रविचित्र आवाज करणारी वाद्य हजेरी लावतात. तंतुवाद्याच्या पार्श्वभूमीवर परत क्लॅरनेट किंवा फ्लूट आणखी सुंदर सुरावटी फेकतं आणि एक अवीट गोडीचं, परत परत ऐकावसं वाटणारं असाधारण संगीत ऐकायला मिळतं!

ते इथे ऐका

ते ऐकल्यावर माझं पूर्ण पिक्चर मधलं लक्ष उडालं. परत तेच म्युझिक कधी येतंय त्याचीच वाट आतुरतेने माझे कान बघत राहीले. नशीबाने ते म्युझिक पिक्चर भर अधून मधून ऐकायला मिळालं.

खर तर मला संगीतातलं खालच्या 'सा' पासून वरच्या 'सा' पर्यंतच काहीही कळत नाही. संगीतातली माझी गती 'सा'धारणच! मला हिमेश रेशमिया पासून कुमार गंधर्वांपर्यंत सगळे सारखेच! संगीतात कुणी 'गल्ली चुकला' तरी मला तो हमरस्त्यावरूनच चालला आहे असंच वाटतं. सवाई गंधर्वला जाण्यात माझा अंतस्थ हेतु वेगळाच असायचा! अशा संगीत बधीर माणसाचं केवळ संगीतानं लक्ष वेधणार्‍या संगीतकारावर संशोधन करणं अपरिहार्य होतं.. त्यातून एक महत्वाचा शोध लागला.. तो म्हणजे संगीतकार एनिओ मोरिकोने! निदान मी तरी हे नाव कधी ऐकलेलं नव्हतं. त्या उत्खननात मिळालेली ही माहीती....

१९२८ साली रोममधे जन्मलेला एनिओ मोरिकोने ट्रम्पेट वाजवायला शिकला होता. सुरवातीचं त्याचं संगीत फारसं गाजलं नाही. तरीही सर्जिओ लिऑनने 'ए फिस्ट फुल ऑफ डॉलर्स' या वेस्टर्न पिक्चरचं संगीत दिक्दर्शन त्याच्याकडे सोपवलं. त्यातल्या चित्रविचित्र वाद्यांची सरमिसळ करत केलेल्या अविस्मरणीय सुरावटींमुळे तो प्रचंड लोकप्रिय झाला. इथेही सुरवात फक्त गिटारच्या धुनने होते आणि हळूहळू इतर वाद्यांची जोड मिळत एक सांगितिक भूलभुलैय्या बनतो. त्या नंतर लिऑनच्या बहुतेक पिक्चर्सना त्यानंच संगीत दिलं. नवकेतन - एसडी बर्मनसारखी लिऑनची आणि त्याची जोडी जमली.

याच माणसानं 'फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर' व 'द गुड द बॅड द अग्ली' सारख्या चित्रपटांचं संगीत दिलं होतं हे वाचून मला तर जुना मित्र अचानक भेटल्याचा सुखद धक्का बसला कारण कॉलेजात असल्यापासून त्या संगीतानं माझ्या मनावर एक ठसा निर्माण केला होता. माझ्याच काय पण शोलेचं टायटल म्युझिक ऐकलंत तर आरडीच्या मनात पण त्यानं घर केलं होतं हे जाणवेल.

जरी त्याचं नाव बहुतांशी वेस्टर्न चित्रपटांच्या संगीताशी जोडलं जातं तरीही त्यानं कॉमेडी, हॉरर, रोमँटिक, थ्रिलर्स असल्या सर्व प्रकारच्या सुमारे ४०० चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. त्याला काही चित्रपट संगीतासाठी ऑस्कर नॉमिनेशन्स मिळाली होती पण बक्षीस कधीही मिळालं नाही. पण त्याची प्रचंड लोकप्रियता आणि नेहमीच्या पठडीतलं नसणारं व अशक्य सुरावटींनी मढलेल्या संगीतानं जगाचा कर्णवेध करण्याचं सामर्थ्य याचा आदर म्हणून २००७ साली क्लिंट ईस्टवूडच्या हस्ते सन्माननीय ऑस्कर देण्यात आलं.

जुन्या वेस्टर्न सिनेमांचं, वैविध्यपूर्ण, मला फार आवडणारं, म्युझिक एनिओ मोरिकोनेनं दिलं होतं हे आता मी मात्र कधीच विसरणार नाही!

ए फिस्ट फुल ऑफ डॉलर्स --

फॉर अ फ्यु डॉलर्स मोअर -- यातलं गिटार ऐकताना अंगावर काटा आला.

द गुड द बॅड द अग्ली -- यातलं एक मिनीट १८ सेकंदानं येणारं ट्रम्पेट जबरी आहे.

शोलेचं टायटल म्युझिक --

वन्स अपॉन अ टाईम इन अमेरिका: डेबोराज थीम -- अप्रतिम आहे.. ऐकताना समुद्राच्या लाटांवर तरंगत असल्यासारखं वाटलं मला!

मॅलेना चित्रपटाचं संगीत -- http://www.youtube.com/watch?v=dzJxHw4JF10 (या सुंदर संगीताला २००१चं ऑस्कर नॉमिनेशन होतं)

द मिशन -- १९८६चं ऑस्कर नॉमिनेशन. यातून ए आर रेहमानला प्रेरणा मिळाली असावी असं वाटून जातं.



वन्स अपॉन अ टाईम इन द वेस्टः मॅन विथ हार्मोनिका -- यातला माउथऑर्गन प्रचंड गूढ वातावरण निर्माण करतो.



-- समाप्त --

Sunday, January 8, 2012

वैद्यकीय चाचणीचा बकरा

'तुला मधुमेह झाला आहे' असं डॉक्टरनं वरकरणी चिंताक्रांत चेहरा करून मला सांगितलं तेव्हा मी त्याच्या समोर खुर्चीत बसलो होतो. किंवा डॉक्टर माझ्या समोरच्या खुर्चीत बसला होता असं म्हंटलं तरी ते वावगं ठरणार नाही. तेव्हा मधुमेहासारखा उच्चभ्रूंची मक्तेदारी असलेला रोग झाल्याबद्दल मला सूक्ष्म अभिमान वाटला होता.. कुणाला कशाचा अभिमान वाटेल काही सांगता येत नाही.. पूर्वी पुलंनी हिंदुजा हॉस्पिटल मधे असताना 'गर्वसे कहो हम हिंदुजामें हैं!' असं म्हंटलं होतं म्हणे!

'साखरेचं खाणार त्याला देव देणार' हे लहानपणापासून खूप वेळा ऐकलं होतं पण देव नक्की काय देणार ते ज्ञान डॉक्टरच्या समोरच्या खुर्चीत मिळालं.. बुद्धाला बोधीवृक्षाखाली मिळालं होतं, मला खुर्चीवर मिळालं इतकाच काय तो फरक! पण म्हणून मला मिळालेलं ज्ञान कमअस्सल नव्हतं.

सगळ्याच नव्या आणि ताज्या गोष्टींप्रमाणे मधुमेहाचं देखील सुरुवातीला मला अप्रूप आणि कौतुक होतं.. आणि रोजचा बराचसा वेळ त्याबद्दल उलटसुलट वाचण्यात व ऐकण्यात जायचा.. मधुमेहींनी 'मधु मागसी माझ्या सख्या परि मधु घटचि रिकामे' सारखी गाणी गुणगुणायची नसतात हे ही तेव्हाचच! त्याच काळात, ज्यांचा मधुमेह योग्य पथ्याने किंवा नुसत्या गोळ्या घेऊन आटोक्यात रहातो अशा लोकांना एका नवीन किटोन युक्त पेयाने फायदा होऊ शकेल की नाही या चाचपणीसाठी काही बकरे हवे आहेत असा हाकारा झाला.. मी त्याला ओ दिली. स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसर्‍यासाठी जगलास तरच जगलास असल्या उदात्त विचारांचं ओझं बालपणापासून लादलेलं होतं.. ते कमी करण्याची संधी अनायासे चालून आल्यामुळे आपल्याकडून नाही तरी निदान आपल्या शरीराकडून जगाचं कल्याण घडावं म्हणून मी संताची विभूति व्हायचं ठरवलं.

संशोधक डॉक्टर बाईशी झालेल्या प्राथमिक चर्चेप्रमाणे दोन टेस्ट होणार होत्या. पहिली ३-४ तास चालणार होती तर दुसरी दोन तास. ऑफिसमधला नेटवर टीपी करायचा अमूल्य वेळ का दवडावा म्हणून मी संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर टेस्ट घेण्याची विनंती केली. हो, मग? गरज त्यांना होती.. मला नाही.

४:३० ला ऑफिस सुटल्यानंतर घरी जाऊन काहीतरी पोटात ढकलून तिकडे जायचा माझा प्लॅन होता. पण त्या डॉ बाईने त्यात खोडा घातला.. टेस्टच्या आधी ६ तास काहीच खायचं प्यायचं नाही म्हणून ठणकावलं. ऑफिसात काम नसलं तरी भूक लागतेच हो! भुकेचं जाऊ द्या एक वेळ पण काही प्यायचं पण नाही हे अघोरी होतं. यावर मी कुरकुर व्यक्त केल्यावर, मी चाचणीलाच येणार नाही अशी भीति वाटल्यामुळे कदाचित, मोठ्या उदार मनाने मला फक्त पाणी प्यायची परवानगी मिळाली. ठरलेल्या वेळी मी तिथे पोचलो. पोटाने बांग द्यायला सुरुवात केलीच होती. प्रथम दोन कन्सेन्ट फॉर्म भरण्याचं काम झालं. त्यात मी माझा डेटा त्यांना वापरू देण्यापासून ते माझे फोटो (शरीराचे आतले) प्रसिद्ध करू देण्यापर्यंतच्या सर्व भानगडींना संमती मागितली होती.

'तुम्ही पांढर्‍या उंदरांकडून पण असले फॉर्म भरून घेता का?'.. पोटावरचा भुकेचा ताण आणि उगीचच आलेला वातावरणातला ताण सैल करायला एक विनोद टाकला.. मॉडर्न लोक त्याला फ्लर्टिंग म्हणतात.. मी वातावरण खेळकर करणं म्हणतो.. पण तो तिच्या डोक्यावरून गेला. विनोद हा सर्दाळलेल्या फटाक्यासारखा असतो.. वाजला तर वाजतो नाहीतर नुसती वात जळून ढिस्स होतो.

'तुझी जन्मतारीख काय आहे?'

'२३ एप्रिल १९५७'.. हे ऐकल्यावर तिनं २३ एप्रिल १९७५ का लिहावं? इथे मी टक्कल पडून 'केस सेन्सिटिव्ह' झालोय आणि हिला मी २० वर्षांनी तरूण दिसलो की काय?

'ऑक्सफर्डात येऊन किती दिवस झाले?'.. माझं वजन, उंची, स्मोकिंग व ड्रिंकिंग हॅबिट्स वरचे प्रश्न चालू असताना मधेच आलेल्या या प्रश्नाचा चाचणीशी काय संबंध असेल बरं?

'झाली २ वर्ष!'

'हम्म! म्हणजे माझ्या पेक्षा जास्तच!'

'हो का? आधी कुठे होतीस तू?'.. आपोआप तोंडातून बाहेर पडलं.. तिकडे माझं अंतर्मन वाजलं.. 'असेल दुसर्‍या कुठल्या गावातली, तुला कशाला हव्या आहेत नसत्या पंचायती?'

'ऑस्ट्रेलिया! माझ्या अ‍ॅक्सेंटवरनं समजलं नाही तुला?'.. हे सपशेल अनपेक्षित होतं.

'नाही! उलट तुझं बोलणं मला समजतंय! आमच्या ऑफिसातल्या ऑस्ट्रेलियन माणसाचं मला जेमतेम ६०% समजतं!'

'तुला अजून काही प्रश्न आहेत का?' या शेवटच्या तिच्या प्रश्नावर 'उपाशी पोटी करायचे अत्याचार.. आपलं.. चाचण्या आधी करून घ्या म्हणजे मला काहीतरी खाता येईल' असं म्हणावसं वाटलं.

त्यानंतर तिनं मला शर्ट काढायला सांगितला. आँ? शर्ट काढायचा कन्सेन्ट मी कधी दिला होता? पण जगाच्या कल्याणाचा ध्यास घेतलेला माणूस मी! मुकाट्याने शर्ट काढून तिनं दिलेला एक गाऊन चढवला. त्याचे बंद बांधल्यावर शर्टाची बटणं चुकीच्या काजात घातल्यासारखं दिसायला लागलं. ते बंद नक्की काय बंद करण्यासाठी होते कोण जाणे. डोक्यात 'हे बंध रेशमाचे' च्या विडंबनाची पहिली लाईन बनली.. 'हे बंद गाउनाचे'! माझी पिशवी, शर्ट व जॅकेट एका लॉकरमधे टाकून तिनं किल्ली तिच्याकडे ठेवली. चुकून तिनं ती किल्ली हरवली तर काय होईल या भीषण विचाराने शहारा आला.

मग तिनं माझं रक्त काढण्याची तयारी केली. दंडाला एक पट्टा करकचून बांधल्यावर तिच्या लक्षात आलं की माझ्या हाताखाली काही आधार नाहीये. कुठुनशी एक उशी आणून तिनं माझ्या मांडीवर ठेवली. एकंदरीत तिच्या हालचालींवरून ती त्यात फारशी कुशल नसावी असं मानायला जागा होती. तिनेही रक्त काढता काढता ते बाहेर सांडून त्याला पुष्टी दिली. उशीनं पण थोडं रक्त प्राशन केलं. बचकभर रक्त काढून झाल्यावर तिनं उलटीकडून सलाईन अंगात भरलं. मी पूर्वी बाटलीतली व्हिस्की कमी झाल्याचं बाबांना कळू नये म्हणून तितकंच पाणी भरून ठेवायचो तसं काहीसं वाटलं मला! माझं रक्त त्या दाभणातच गोठू नये हे कारण जरी तिनं सांगितलं तरी ते मला फारसं पटलं नाही. रक्त काढून झाल्यावर ते खुपसलेलं दाभण काढून टाकतात असा माझा अनुभव होता पण ही बया ते तसंच ठेवून जवळच्या टेबलाचे सर्व ड्रावर्स उघडून उसक-मासक करू लागली. थोड्या वेळाने तिने एका चिकटपट्टीने ते दाभण माझ्या हाताला चिकटवलं. म्हणजे सगळं संपेपर्यंत ते दाभण माझ्याशी नको इतकी सलगी करणार होतं! ती मला आता व्यायामाची सायकल मारायला लावणार होती. तेव्हा त्याच दाभणातून दर ३ मिनिटाला माझं रक्त खेचणार होती. इतकं सगळं झाल्यावर तिनं ती उशी कचर्‍याच्या डब्यात टाकलेली पाहून माझ्या कोकणस्थी मनानं विलंबित आक्रोश केला.

सायकल मारण्याचं ठिकाण बरच लांब निघालं! वेगवेगळ्या जिन्यातून आणि कॉरिडॉरातून, घसरणारा गाऊन बंद ओढून ओढून सावरत, वस्त्रहरणाच्या वेळचे द्रौपदीचे भाव तोंडावर बाळगत, लोकांच्या नजरा चुकवित माझी वरात तिच्या मागून मुकाटपणे चालली होती. एकदाचं ते सायकल सेंटर आलं. तिथे अजून एक डॉ बसलेला होता. तिथं मला कुशीवर झोपवलं आणि इसीजीसाठी छातीवर लीड्स चिकटवली. तिथलं अल्ट्रासाउंड मशीन वापरून हृदयाचे फोटो काढायचे होते. पण ते मशीन काही सुरू होईना. दोघांचे चेहरे चिंताक्रांत झाले. मी आपलं 'नको तेव्हा हवी ती गोष्ट नेमकी बंद पडते' असा दिलासा द्यायचा प्रयत्न केला.

'खरंय, पण हे मशीन कधी बंद पडलं नव्हतं!'.. तिनं टिप्पणी केली! काय पण लॉजिक? असं विधान हृदय बंद पडलेल्या माणसाला पाहून केलं असतं का तिनं?

'There's always a first time for everything'.. माझा वाढता दिलासा आणि तिचं एक स्मित! अरे वा! हिला हसता पण येतं की!

'जाऊ दे! आपण दुसर्‍या खोलीतलं मशीन वापरू' तिनं आशा सोडली. छातीवर चिकटवलेली लीड्स उपटल्यावर परत माझी वरात लज्जा झाकत तिच्या मागून दुसर्‍या खोलीत गेली. दार उघडून आत पहाताच अपेक्षित गोष्ट न दिसल्यामुळे, ती मला तिथेच थांबायला सांगून कुठे तरी नष्ट झाली. मी एका हातात दरवाजा आणि दुसर्‍या हाताने गाऊन गच्च धरून उभा राहीलो होतो. तिर्‍हाईताला विचारमग्न अवस्थेतला एखादा रोमन मंत्री भासलो असतो. गेलेली मिनिटं युगांसारखी भासली.. त्यावर मला गुलजारचा 'कभी जिंदगी पलोमें गुजर जाती है तो कभी जिंदगी भर एक पल भी नहीं गुजरता' हा डायलॉग विनाकारण आठवला. अचानक तिथे तो दुसरा डॉ आला आणि मला परत जुन्याच ठिकाणी घेऊन गेला. तिथलं मशीन आता सुरू झालं होतं. मी सापडत नाहीये म्हंटल्यावर ती पण जुन्या ठिकाणी अजून एक मशीन ढकलत ढकलत घेऊन आली.

'आँ! मशीन सुरू झालं? काय केलंस तू?'.. ती.

'एक लाथ घातली'.. तो.

तिनं आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहीलं.. परत मला विनोद करायची सण्णक आली. मी खुणेनेच तिला 'मला नाही, मशिनला लाथ घातली' असं सुचवलं आणि वर म्हंटलं.. 'मी मगाशीच ते करायला सांगणार होतो'.. हा विनोद वाजला मात्र!

परत मला कुशीवर झोपवलं आणि इसीजीसाठी छातीवर लीड्स चिकटवली. मग माझ्या छातीला एक प्रोब लावून तिनं बर्‍याच वेळा हलवला.. शेवटी मी न राहवून हळूच विचारलं 'काय? हृदय सापडतं नाहीये का?'. हा विनोद ढिस्स झाला.. तिने शक्य त्या सर्व बाजूंनी हृदयाकडे बघते आहे असं सांगीतलं. हृदयाची चित्रं काढण्याचं काम बराच वेळ चालू होतं. मला काही दिसत नव्हतं कारण माझी पाठ मशीनकडे होती. मधून मधून बोगद्यातनं चाललेल्या आगगाडीसारखा आवाज यायचा तो माझ्या चेकाळलेल्या हृदयाचा असावा. अखेर तिनं मला हृदयाची चित्रं दाखवली. स्वतःचं धडधडणारं हृदय प्रत्यक्षात पहायची माझी पहिलीच वेळ होती ती!

'चला! म्हणजे मी हार्टलेस नाही हे सिद्ध झालं तर!'

'कोण म्हणतं तुला हार्टलेस?'.. एकंदर आवेषावरून कधीही ती पदर खोचून माझ्या बाजूने भांडायला उभी राहील असं वाटलं.

'सगळेच! माझे मित्र व मैत्रिणी!'

'हम्म्म! हृदयाची एक भिंत थोडी जाड वाटते आहे! तुला कधी हार्ट अ‍ॅटॅक आला होता का?'.. अचानक तिनं चिंता व्यक्त केली.

'हो! कॉलेजात खूप वेळा!'.. अजून एक ढिस्स विनोद!

नंतर मी तिला 'किटोन नामक पेय तिथंच बनवलं आहे का?' असं विचारलं. ती म्हणाली की किटोन हे औषध नसून ते शरिरातच तयार होणारं एक द्रव्य आहे. जेव्हा मेंदूला ऊर्जा मिळेनाशी होते म्हणजे जेव्हा आपण सलग १-२ दिवस उपाशी असतो तेव्हा मेंदूकडून शरीराला किटोन बनवण्याची ऑर्डर सुटते. मेंदू त्यातून आवश्यक ती ऊर्जा मिळवतो. मग मला ते भयाण चवीचं पेय पाजण्यात आलं. ते द्यायच्या आधी तशी वॉर्निंग तिनं मला दिली होती.. फिनेल, चुन्याची निवळी, काँग्रेस गवताचा रस, कोरफडीचा रस असल्या विविध रंगाच्या आणि चवीच्या गोष्टी एकत्र केल्यासारखं वाटलं.. पिताना वेडावाकडा चेहरा झालेला पाहून मला तिने एक ग्लास पाणी पण पाजलं. मग मला सायकल मारायला बसवलं. माझ्या तोंडावर मास्क बसवला. मी किती ऑक्सिजन घेतोय आणि किती कार्बन-डाय-ऑक्साईड सोडतोय ते मोजणार होते. आजुबाजुनी हवा आत येऊ नये म्हणून मास्क चेहर्‍यावर घट्ट बसविण्यात आला.

'कसं वाटतंय?'.. फार घट्ट झाला नाहीये ना त्याची चाचपणी करण्यासाठी तिनं विचारलं.

'अ‍ॅस्ट्रोनॉट सारखं'.. मी.

माझं पेडल मारणं चालू झालं. दर ३ मिनिटांनी ते सायकलचं लोड वाढवणार होते. त्यामुळे दर ३ मिनिटांनी सायकल मारायला जड होत जाणार होती. तेव्हाच रक्त पण घेणार होते. पहिल्या ३ मिनिटानंतर लोड वाढवलं आणि रक्त काढायला लागले तर त्या दाभणातून अजिबात रक्त येईना. इकडं दाब, तिकडं दाब, हँडलवरचा हात काढायला लाव असं सगळं करून देखील काहीच रक्त येईना.

'तू माझं सगळं रक्त मगाशी संपवलंस!'.. मी तक्रारीच्या सुरात तिला जरा खिजवलं. शेवटी अथक प्रयत्नानंतर कुठून तरी थोडं रक्त आलं. तो पर्यंत बरीच ३ मिनिटं होऊन गेली होती. मी पेडल मारतच होतो. ते दोघे एकमेकांकडे बघून हसले. मला वाटलं मलाच हसले. म्हणून मी तिच्याकडे पाहीलं. तर ती म्हणाली 'काय पण दाभण लावलंय? असं हेटाळणीच्या सुरात तो म्हणतोय मला'.

शेवटी पाय दुखायला लागले म्हणून आणि थोडा दम पण लागला म्हणून मी सुमारे १८-१९ मिनिटानंतर एकूण ९ कि.मी प्रवास झाल्यावर सायकल मारणं थांबवलं. अधून मधून ते 'यू आर डुईंग व्हेरी वेल!' असं सारखं प्रोत्साहन देत होते. ते तसं सगळ्यांनाच देत असणार म्हणा! शेवटी त्यांनी मला मी किती ऑक्सीजन वापरला नि किती कार्बन-डाय-ऑक्साईड सोडला त्याचे आलेख दाखवले. गंमत म्हणजे मी वापरलेल्या ऑक्सीजन मधला बराचसा शरीरातल्या स्नायूतून आला होता. स्नायूत पण ऑक्सीजन साचविलेला असतो हे मला नवीन होतं. विरळ हवेच्या ठिकाणी तो कसा वापरता येईल हा प्रश्न मला चाटून गेला.

टेस्ट संपली होती. सगळी चिकटवलेली लीड्स उपटून झाल्यावर गाऊन कवटाळून हिंडत हिंडत आम्ही सुरुवातीच्या जागेवर परत आलो. पुढच्या टेस्टच्या आधी मी तिला विचारून माझ्या पिशवीतून आणलेलं थोडं खाऊन घेतलं. आता मला पँट काढायला सांगितलं. हरे राम! प्रकरण गंभीर वळण घ्यायला लागलं होतं! परत एकदा 'जगाच्या कल्याणातून' मोटिवेशन घेऊन मी तयार झालो. मला आता एमआरआय स्कॅन साठी झोपविण्यात आलं. परत छातीला चिकटपट्ट्या लावल्या आणि वर काहीतरी जड ठेवलं. त्रास व्हायला लागला तर त्यांना सांगण्यासाठी माझ्या हातात एक बटण दिलं.

'या हेडफोन मधून ही तुला तिच्या लव्हली व्हॉईस मधे सूचना देईल'.. त्या डॉ ने माझ्या कानाला एक हेडफोन लावता लावता सांगितलं. मला त्याच्या खडूसपणाचं हसू आलं.

'तू का हसतो आहेस? माझा ऑस्ट्रेलियन अ‍ॅक्सेंट आवडत नाही का तुला?' तिनं लगेच विचारलं. खडूसपणाला योग्य इंग्रजी शब्द न सुचल्यामुळे मी उत्तर टाळलं. हेडफोनात बॅकग्राउंडला एक टेनर आणि एक गायिका इटालियन भाषेत एक ऑपेरा किंचाळत होते. सगळा जामानिमा झाल्यावर मला एका बोगद्यात ढकलण्यात आलं. बराच वेळ काहीच झालं नाही. परत मला बाहेर काढण्यात आलं. छातीला नवीन लीड्स लावली तरी त्यांना सिग्नल मिळत नव्हता. मधेच सिग्नल मिळतोय असं वाटल्यावर आत ढकलण्यात यायचं पण लगेच सिग्नल गेला म्हणून बाहेर काढलं जायचं.

'माझं हृदय हरवलं आहे का?'.. मगाशी चांगलं धडधडताना याचि देही याचि डोळा पाहिलेलं माझं हृदय आता का सिग्नल देत नाहीये ते मला कळेना.

'तसं नाही. हे ब्लू टूथ काम करत नाहीये.'. शेवटी बर्‍याच टूथांची ट्रायल झाल्यावर एका टुथाला माझं हृदय आवडलं. त्यानंतर बराच वेळ श्वास घे, श्वास धरून ठेव आणि श्वास सोड अशा सूचना पाळायच्या आणि श्वास धरल्यावर चमत्कारिक आवाज ऐकायचे इतकंच काम मला होतं. शेवटी एकदाचं ते संपल्यावर मला माझ्या लिव्हरची आणि हृदयाची चित्रं दाखवली आणि वरती ती टेस्ट करायला बाहेर १५०० पौंड खर्च होतो हे ही ऐकवलं.

सगळं संपल्यावर तिनं खसाखस त्या चिकटपट्ट्या खेचायला सुरुवात केली. त्या बरोबर माझे चिकटलेले केस उपटल्यामुळे होणार्‍या प्रचंड वेदना मी दातओठ खाऊन सहन करत होतो. ते पाहून तो डॉ तिला म्हणाला 'जरा हळू! हे काय वॅक्स वर्क वाटलं का तुला?'

दुसर्‍या टेस्टला जरी २ तास लागणार सांगितलं होतं तरी परत मागच्याच सर्व टेस्ट झाल्या. फक्त या वेळेला वेगळं द्रव्य पाजण्यात आलं आणि कुठलंही उपकरण बंद पडलं नाही म्हणून 'जगाचं कल्याण मिशन' तीन तासात आटोपलं.

-- समाप्त --