Saturday, July 4, 2009

रिसेशन - एक काथ्याकूट

(टीपः या लेखातील पात्रे 'ठरविले अनंते' या लेखातून उचलली आहेत. तो लेख माझाच असल्यामुळे लेखकाची पूर्वपरवानगी घेण्याची गरज वाटली नाही. किंबहुना, लोकांनी तो लेख वाचावा या निर्मळ हेतुनेच हा प्रपंच केला आहे.)

"अरे चिमण्या, आजकाल सगळं ग्लोबल झालंय. तिकडे खुट्ट झालं की इकडे पटापट दारं लावतात. तिकडे माशी शिंकली की इकडे लोकं सर्दीची औषधं घेतात. इकडच्या बिळात अल कायदा सरपटला तर तिकडचे लोक काठ्या घेऊन मारायला निघतात. इतकंच काय, साधं वॉर्मिंग पण ग्लोबल झालंय तर!".. 'रिसेशन ग्लोबल आहे की नाही' या माझ्या भाबड्या प्रश्नावर दिल्यानं आख्यान लावलं होतं. आमची साप्ताहिक सभा भरली होती. मी, सरिता, दिल्या आणि कल्पना एवढेच उपस्थित होते.. मक्या आणि माया अजून उगवले नव्हते. मला अजूनही कल्पनाच्या डोळ्यांकडे पहायचं डेरिंग होत नाही. काहीतरी बोलायचं म्हणून मी दिल्याला चावी मारली होती अन् माझ्या कर्माची फळं भोगत होतो. कल्पना तन्मयतेनं दिल्याचं बोलणं ऐकत होती.. दिल्याच्या गाढ्या नॉलेजवरचा विश्वास उडण्या एवढे दिवस त्यांच्या लग्नाला झाले नव्हते, त्याचं हे लक्षण. सरिता सुध्दा मन लावून त्याचं बोलणं ऐकत होती. लग्न मुरल्यानंतर, नवर्‍यापेक्षा त्याचे मित्रच जास्त समंजस आणि हुशार आहेत, असं बायकांना वाटायला लागतं, त्याचं हे लक्षण.

दिल्या: "आता हेच बघ ना. तिकडच्या मार्केटनं राम म्हंटल्यावर इकडच्या मार्केटनं लक्ष्मण म्हंटलं. अरे, माझा धंदा सुध्दा २ टक्क्यावर आला तर!"

"दो टकेके आदमीका धंदा कितना होगा?".. दिल्याच्या मागून आवाज आला. दिल्यानं वैतागून बघितलं.. मक्याची नाट्यमय एंट्री झाली. त्याच्या मागून मायाने प्रवेश घेताच 'अय्या! किती छान ड्रेस आहे. कुठे घेतलास?" असले ठराविक बायकी चित्कार झाले. एकमेकींच्या कपड्यांचं नेहमीचं कौतुक चालू असताना आम्ही मक्याची दारु ऑर्डर करण्याचं महत्वाचं काम उरकलं.

मक्या: "यार! ट्रिपला जाऊ या कुठेतरी. लेट्स चिलाउट फॉ सम टाईम." जरा कुठे स्थिरस्थावर होतोय तोच मक्याचा अमेरिकन भडिमार सुरु झाला. पण त्याच्याकडून आलेली ट्रिपची मागणी चांगलीच अनपेक्षित होती. कारण आत्तापर्यंत कधीही त्याला आमच्या बरोबर ट्रिपला यायला जमलं नव्हतं.. आज काय क्लायंटचा कॉल, उद्या प्रोजेक्टची डेडलाईन तर परवा अमेरिकेची वारी असल्या नाना शेंड्या त्यानं आम्हाला लावल्या होत्या. त्यामुळे हे असलं प्रपोजल म्हणजे मुंग्या आणि मेरु पर्वत यातली बाब होती.

मी: "मक्या! तुला क्लायंटची भाजी आणणं किंवा त्याच्या पोरांना शाळेत सोडणं यातलं एकही काम कसं नाहीये रे? तुला ट्रिप कशी काय सुचतेय?"

मक्या: "अरे बाबांनो! आयॅम फायर्ड! माझी नोकरी गेली. काल माझा शेवटचा दिवस होता". हे म्हणताच वातावरण थोडं तंग झालं. ते लक्षात येताच तो पुढे म्हणाला - "ट्रिपच्या निमित्ताने आमचा तिसरा हनीमून तरी होईल". यावर मायाने लगेच भुवया उंचावत यक्ष प्रश्न केला - "म्हंजे? दुसरा कधी झाला?".

"नशीब! मला वाटलं तू म्हणतेयस 'पहिला कधी झाला?'" सरिताच्या खडूस बोलण्यावर मायाची आणि तिची टाळाटाळी (म्हणजे टाळ्यांची देवाण घेवाण) झाली.

मी: "अरे! काय चाल्लंय काय? दिल्याचा धंदा बसला. तुझी नोकरी गेली. आता माझी कधी जातेय एवढंच बघायचं".

मक्या: "तुझी कसली जातेय? तुझी जिव्हाळ्याची बँक आहे. माझ्या क्लायंटची दिवाळ्याची होती. इट वेंट डाऊन द ड्रेन.. सो वेंट द क्लायंट. तो गेल्यावर माझी गरज संपली आणि कंपनीनं मला नारळ, पुष्पगुच्छ देऊन सांगितलं 'या आता!'".. क्लायंट गेला तरी मक्याचं अमेरिकन काही डाऊन द ड्रेन जाण्याची चिन्हं नव्हती.

दिल्या: "मला कळत नाहीये की तुझी गरज नाही हे कळायला त्यांना इतकी वर्ष का लागली?".. दिल्यानं २ टक्क्याचा सूड उगवला.

कल्पना: "दिलीप! अरे तू काहीही काय बोलतोस?" कल्पनाच्या चेहर्‍यावर 'ह्या दिल्याला कुठे न्यायची सोय नाही' असे भाव होते.. तिला अजून आमच्या अतिरेकी खडूस पणाची सवय झाली नव्हती.. मायानं तिच्या कानात कुजबुज करून 'सगळं ठीकठाक आहे' असं समजावलं असावं.. कारण तिच्या चेहर्‍यावर परत 'दिल्या ग्रेट आहे' असे भाव उगवले.

सरिता: "चला बरं झालं. मायाला डबा द्यायला नको आता. बाय द वे, तू त्याला डब्यात रोज काय द्यायचीस?"

मक्या: "धम्मक लाडू". मायानं त्याच्या डोक्यावर एक टप्पल दिली त्यामुळे तोंडाकडे जात असलेल्या बिअरच्या ग्लासावर त्याचे दात आपटले. परिणामी त्याच्या शर्टानं बिअरचा घोट घेतला.

मी: "शाब्बास! म्हंजे नोकरी गेली म्हणून तू ट्रिपा काढणार! चलन फुगवटा जास्त झालाय वाटतं?" .. आमच्या भाषेत खिशात जास्त पैसे असण्याला चलन फुगवटा होणे म्हणतात.

मक्या: "छे! छे! उलट चलन दुखवटा आहे. सगळी गुंतवणूक सपाट झालीये.. लाखाचे बारा हजार झाले म्हणतात तसं.. थँक्स टू दिल्या!".

दिल्या: "ए भाऊ! माझा काही दोष नाही हां! संपूर्ण मार्केट झोपलं त्याला मी काय करणार?".. नेमकं दुखर्‍या भागावर बोट ठेवल्यामुळे दिल्या पिसाळला.

मी: "तरी मी तुला सांगत होतो.. बँकेत पैसे ठेव म्हणून.. पण तुला जास्त हाव सुटली"

सरिता: "त्यापेक्षा तू ४-५ वर्षांपूर्वी दुकान घेऊन मायाला दवाखाना तरी काढून द्यायला पाहीजे होतास. म्हंजे आत्तापर्यंत तिचा चांगला जम बसला असता"

मक्या: "जम कसला बसला असता? धंदा बसला असता. अगं! तिचं एकही औषधं मला लागू पडत नाही, मग इतरांची काय कथा?"

माया: "माझी औषधं फक्त माणसांसाठी असतात". मक्याला घरचा आहेर मिळाला.

दिल्या: "दवाखाना नसता चालला तर अंडी तरी विकायला ठेवता आली असती."

मक्या: "काहीही काय? अंडी काय विकायची? मला नाही कुणाची अंडी पिल्ली बाहेर काढायला आवडत."

दिल्या: "तुला अंडी विकणं एवढं कमीपणाचं वाटत असेल तर एक आयडिया आहे. एक पाटी लावायची - 'येथे अंडी मिळतील'. खालती दुसरी पाटी लावायची - 'अंडी संपली आहेत' आणि खाली पेपर वाचत बसायचं."

कल्पना: "दिलीप, तू असले सल्ले देतोस लोकांना? आणि तरी तुझ्याकडे लोक येतात?" कल्पनाने चिंताग्रस्त चेहर्‍यानं विचारलं. दिल्याच्या ज्ञानाबद्दल तिच्या मनात अनेक शंकांची जळमटं निर्माण झाल्यासारखं वाटलं.

मक्या: "येतात म्हणण्यापेक्षा यायचे म्हंटलं तर ते जास्त संयुक्तिक ठरेल"

दिल्या: "अंडी विकण्याचं काही झंझट नाही ना पण! ते फक्त निमित्त! शिवाय प्रॉपर्टीचे भाव काही न करता आपोआप वाढतातच" कल्पनाला परत आपल्या नवर्‍याबद्दल थोडा आदर वाटायला लागला, पण एकूण परिस्थिती आणि त्यावरील चर्चा तिला अयोग्य वाटत होती.

कल्पना: "इथं त्याची नोकरी गेलीय, त्याची काळजी करायची सोडून तुम्ही त्याची टिंगल करताय. तुम्हाला काही लाज लज्जा शरम आहे की नाही? उलट्या काळजाचे आहात अगदी!".

मी: "उलट्या काळजाचे असलो तरी आम्हाला काळीज नक्की आहे. तेव्हा काळजीचे कारण नाही. राहिली नोकरीची बाब.. ती त्याला मिळेलच. आत्तापर्यंत २५ वेळा तरी नोकरी बदलली असेल त्यानं. दर वेळेला विचारलं की वेगळ्याच कंपनीचं नाव सांगायचा तो."

मक्या: "आता रिसेशन मधे कुठली नोकरी मिळणारेय लवकर? शिवाय माझं वयही झालंय जास्त"

दिल्या: "अगं पण आम्ही विनोद करून त्याच्या मनावरचा ताण हलका करायचं बघतोय" दिल्याची सारवासारवी.

मक्या: "माझ्या मनाला फक्त मायाच ताण देऊ शकते". अजून एका टपलीने शर्टाला घोट मिळाला. "आज बिअर माझ्या नशिबात दिसत नाहीये. मगापासून माझ्या घशाची आणि बिअरची गाठभेट काही होत नाहीये".

दिल्या: "मक्या पण तू धीर सोडू नकोस. पॉझिटिव्ह रहा. माझंच बघ ना. धंदा कमी झाला म्हणून मी आता पुस्तक लिहायला घेतलंय".

मी: "हरे राम! मित्राला पडत्या काळात आर्थिक मदत म्हणून ते आम्हाला आता विकत घ्यायला लागणार!"

माया: "अरे वा! नाव काय पुस्तकाचं?"

मी: "शेअरबाजारात कसे पडावे?". योग्य परिणामासाठी मी पडण्याचा अभिनय केला.

दिल्या: "अजून ठरवलं नाहीये. प्रकाशक पण शोधला नाहीये अजून"

मक्या: "मी छापतो तुझं पुस्तक"

मी: "धन्य आहे तुझी! डायरेक्ट रद्दी छापणारा पहिला प्रकाशक म्हणून इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद होईल तुझी"

मक्या: "माझी आयडिया अशी आहे. एक दुकान घेऊन वर पाटी लावायची 'माया प्रकाशन' आणि दिल्याचं पुस्तक विकायला ठेवायचं. पुस्तक फारसं खपणार नाहीच म्हणून दुकानाच्या मागे रद्दीच दुकान उघडायचं.. 'माया रद्दी डेपो'. पुस्तकं खपेनाशी झाली की हळुहळू मागे नेऊन रद्दीत काढायची"

सरिता: "ए! तू त्यापेक्षा कॉलेजात शिकवत का नाहीस? तुला एवढा अनुभव आहे आणि त्यांना चांगले शिक्षक मिळत नाहीत. तेवढंच पोरांच कल्याण होईल"

मक्या: "काय डोंबल शिकवणार? आणि पोरांना कुठं शिकायचं असतं? माझ्या सहकार्‍याचा अनुभव सांगतो. त्याला शिकवण्याची फार खाज होती म्हणून एका कॉलेजात शिकवायला गेला. एक आठवडा शिकवल्यावर त्यानं एक महत्वाचा होमवर्क दिला. तो केल्याशिवाय पुढंच समजलंच नसतं म्हणून त्यानं वर्गात सांगितलं की होमवर्क केल्याशिवाय पुढंच शिकवणार नाही. एवढं सांगूनही, त्यापुढचे काही आठवडे कुणीच होमवर्क केलं नाही, म्हणून त्यानं शेवटी कॉलेजला रामराम ठोकला, तो कायमचाच"

मी: "दिल्या! बघं. होमवर्क बद्दल कोण बोलतंय? यावर मला मक्याचा किस्सा सांगायलाच पाहीजे. शाळेत असताना आम्हाला एक निबंध लिहून आणायला सांगितला होता. मी आणि दिल्यानं लिहीला होता. मक्यानं नव्हता लिहीला. मास्तरनं प्रत्येकाला आपापला निबंध वाचून दाखवायला सांगितला. मी पहिल्या बाकावर बसायचो आणि मक्या न् दिल्या शेजारी शेजारी, शेवटच्या बाकावर. दिल्याचाच निबंध परत लगेच वाचला असता तर मास्तरला कळलं असतं म्हणून माझा वाचून झाल्यावर मक्यानं माझी वही मागून घेतली मास्तरच्या नकळत. त्याचा नंबर आल्यावर धडाधडा वाचायला सुरुवात केली. मास्तरला काहीच कळलं नाही. पण पोरं फिदीफिदी हसायला लागली म्हणून मास्तरनं 'काय हसताय?' म्हणून विचारलं. कुणीतरी चुगली केली आणि मक्याला फटके बसले"

मक्या: "मी विसरलो होतो. पण बर्‍याच जणांनी लिहीला होता ना? तेव्हा तुमचे कुठलेही उपाय मला मंजूर नाहीत. मी आता काही दिवस लॉटर्‍या लावायचा विचार करतोय"

दिल्या: "लॉटरी ही अशी गोष्ट आहे की जी आपण सोडून सगळ्यांना लागते. यावर मला 'काटा रुते कुणाला' चं एक विडंबन माहिती आहे".

पैसा मिळे कुणाला, आक्रंदतात कोणी
मज लॉटरी न लागे, हा दैवयोग आहे

सांगु कशी कुणाला कळ आतल्या जिवाची
चिरदाह चणचणीचा मज शाप हाच आहे

पैसा कमवु पहातो रुजतो अनर्थ तेथे
हे वेड लॉटरीचे विपरीत होत आहे

हा खेळ वंचना की काहीच आकळेना
तिकिटे ही साचवूनि मी रिक्तहस्त आहे

गडगडाटी हास्याने साप्ताहिक सभेची सांगता झाली.


-- समाप्त --

5 comments:

सर्किट said...

:-)) masta zali tumchi sabha.

एक पाटी लावायची - 'येथे अंडी मिळतील'. खालती दुसरी पाटी लावायची - 'अंडी संपली आहेत' आणि खाली पेपर वाचत बसायचं.

he layy bhaarii ahe. :-D

Yawning Dog said...

haa haa haa, direct raddi chhapnara prakashak !

Mastach ahe.

भानस said...

नेहमीप्रमाणे लेख चांगला झालाय...पण आज तितका खुसखूशीत...धमाल...:(. अर्थात तरीही तुमचे लिखाण आवडतेच त्याप्रमाणे हाही आवडला.

Sonal said...

कसं सुचतं हो तुम्हाला असं? पोस्ट एकदम मस्त झालीय!!

संकेत आपटे said...

नेहमीप्रमाणेच... मस्त