Monday, July 29, 2024

एक 'नोट'वर्दी अनुभव

 "त्या नोटा बाद झाल्यात आता!".. अद्वैतनं, माझ्या भाचीच्या नवर्‍यानं, मी माझ्या पाकीटातले पैसे मोजताना पाहून सुनावलं. कोव्हिडमुळे यावेळी तब्बल 4 वर्षानंतर भारत भेटीला आलो होतो. खूप पूर्वीपासून, जेव्हा एटीम नव्हते तेव्हापासून, भारतातून परत जाताना थोडे फार भारतीय चलन घेऊन जायची सवय लागली होती. कारण, परत भारतात आल्यावर विमानतळावरून घरी जाण्यासाठी ते कामाला यायचं. त्या सवयीचा दणका असा अचानक बसला.

"कुठल्या नोटा बाद झाल्या?".. नोटा पण आता फलंदाजांसारख्या बाद व्हायला लागल्या की काय या शंकेला प्रयत्नपूर्वक बाद करून मी संभ्रमित चेहर्‍यानं पृच्छा केली. 

"अहो त्या 2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या आहेत मागच्या वर्षी.".. त्यानं खुलासा केल्यावर वेगाने चाललेल्या बसने अचानक ब्रेक मारल्यासारखा धक्का मला बसला. आयला, दर वेळेला काय हे नोटा बाद करण्याचं झंझट? मागच्या वेळेला  भारतातून परत जायच्या वेळेला 500 रुपयाच्या नोटा बाद केल्याच्या बातमीनं मला विमानतळावर सरकारी  हिसका दाखवला होता. सरकार आयटी कंपन्यांसारखं नोटांच्या नवीन आवृत्त्या काढून मागच्या बाद करायला शिकलं की काय? 

"मग आता काय करायचं?".. मी हताश पणे त्याला विचारलं. 

"किती नोटा आहेत?"   

"एक!".. मी काळजीच्या सुरात म्हणालो कारण माझ्या डोक्यात आता काय करावं हेच विचार जास्त घोळत होते.

"एक काय? पेटी?".. माझ्याकडे भरपूर काळा पैसा असल्यासारखं त्यानं एकदम गंभीरपणे कुजबुजत्या स्वरात विचारलं.

"आयला, तू मला गॅंगस्टर वगैरे समजतोस की काय? पेटी नाही, एक नोट आहे रे बाबा".. काकुळतीच्या स्वरात त्याला सांगितल्यावर तो अमरीश पुरीसारखा खदाखदा हसला.

"तुम्हाला 2000 रुपडे म्हणजे किस झाडकी पत्ती.. दान केले समजा".. आयटीतली लोकं ऐटीत रहातात असा सर्वसाधारण समज आहे. त्यातून परदेशी रहाणारा असेल तर बघायलाच नको. शिवाय आजच्या पिढीला पैशाची काही किंमत वाटत नाही. आमच्या वेळेला एका रुपयात सुद्धा बरच काही मिळायचं. एकदा 500 रुपयाच्या नोटा घालवल्यावर माझ्यातला कोकणस्थ आता 2000 रुपये कसे घालवू देईल? 

"अरे प्रश्न पैशाचा नाही तत्वाचा आहे".. मनातले विचार कुणाला कळू द्यायचे नसतील तर खुशाल तत्वावर बोट ठेवावे हे मी जुन्या काळी शिकलो होतो. 

झालं, आता माहिती काढायला पाहीजे. लोकांना विचारलं तर 'एखादा एजंट शोध' पासून 'आता कुठेही नोटा बदलून मिळणार नाहीत' पर्यंत काहीही सल्ले मिळाले असते. शिवाय, आणखी अमरीश पुरी निर्माण झाले असते ते वेगळच! मग काय, फोन उघडला व गुगल  केलं! Without mobile I am immobile! तर 2000 रू. च्या नोटा बॅंकेत काही काळापर्यंत बदलून देत होते पण आता फक्त रिझर्व बॅंकेतूनच बदलून मिळतात. रिझर्व बॅंकेतल्या 19 शाखांपैकी कुठल्याही शाखेकडे पोस्टाने नोटा पाठवता येतात. त्यासाठी एक फॉर्म भरायचा. त्यात तुमचं नाव, गाव, पत्ता आणि तुमच्या बॅंकेतल्या खात्याची माहिती द्यायची. त्यात खाते धारकाचं नाव, खाते क्रमांक, कुठल्या प्रकारचं खातं आहे ते, बॅंकचं नाव, ज्या शाखेत खातं आहे त्या शाखेचं नाव व पत्ता आणि IFSC कोड इत्यादी माहिती भरायची. तसंच, 2000 रुपयाच्या ज्या नोटा पाठवणार आहात त्यांची माहिती भरायची. ती अशी -  किती नोटा पाठवताय, प्रत्येक नोटेचा सिरीयल नंबर आणि एकूण रक्कम किती ते. अर्थातच, या फॉर्मला तुम्ही भारतीय नागरिक आहात हे सिद्ध करण्यासाठी यापैकी एक जोडायचं: आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेंस, पॅन कार्ड, पासपोर्ट, सरकारी विभागाने दिलेले आयडी कार्ड. शिवाय, तुमच्या खात्याची माहिती सिद्ध करायला खात्याच्या पासबुकातलं खात्याची माहिती असलेलं पान किंवा खात्याची माहिती असलेलं स्टेटमेंट जोडायचं. या सगळ्याच्या दोन प्रती करायच्या. एका पाकीटात 2000 च्या नोटा व जोडलेल्या पुराव्या सकट फॉर्म घालायचा आणि पाकीटावर RBI च्या ज्या शाखेला तुम्हाला पाठवायचं आहे त्याचा पत्ता लिहायचा. हुश्श! इतक्या सगळ्या माहितीत ती दुसरी प्रत कशाला आहे याचा उल्लेखच नव्हता. 

इतक्या सगळ्या माहितीनं दडपून न जाता मी नेटानं व नेटची मदत घेत घेत माझ्याकडच्या पुराव्यांच्या प्रती जमवल्या. तसंच मला हेही बघायचं होतं की आपल्या पोस्ट खात्यात किती सुधारणा झाली आहे ते. अद्वैतकडून एक पाकीट घेऊन त्यावर मुंबईच्या रिझर्व बॅंकेचा पत्ता खरडला. फॉर्म पोस्टात घेऊन तिथेच भरायचा असं ठरवून पोस्टात गेलो. फक्त, तिथे फॉर्म नसतो तो रिझर्व बॅंकेच्या साईटवर मिळेल हे ऐकून एक हात हलवीत परत आलो, दुसर्‍या हातात कागदपत्रं होती. रिझर्व बॅंकेची  साईट हा असा काही चक्रव्यूह आहे की साक्षात अभिमनन्यू खुद्द अर्जुनासोबत गेला तरी दोघांना भेदता येणार नाही. तिथे माझ्यासारख्या 15 पेक्षा जास्त वर्ष वेगवेगळ्या वेबसाईटी करण्यात घालवलेल्या माणसाची काय कथा? तासभर घालवून पण तो फॉर्म नाहीच मिळाला. शेवटी परत गुगलला शरण गेल्यावर अवघ्या 5 सेकंदात मी फॉर्म भरायला बसलो होतो. 

दोन फॉर्म भरून नवीन उत्साहाने मी पोस्टात गेलो. तिथल्या बाईनं मला भारतातला पत्ता लिहायला सांगितला. त्यासाठी मला नवीन फॉर्म भरायला नाही लावले याला सुधारणा म्हणायला हरकत नाही. मी माझा इंग्लंडचा लिहीला होता. का ते सांगितलं नाही पण उदार मनाने त्याच पत्त्याच्या बाजुच्या समासात लिहिण्याची परवानगी दिली. दोन्ही फॉर्म वर ते केल्यावर तिनं माझ्या पाकीटावर नजर टाकली. मी फक्त 2000 रुपयाच्या एका नोटेसाठी इतका उपदव्याप करतोय ते पाहून तिनं माझ्याकडे चमत्कारिक नजरेनं पाहीलं. आणि हे कसलं पाकीट आणलं हो? जरा चांगलं आतून कापडाचं अस्तर लावलेलं घेऊन या असं ठणकावलं. बाहेर पडून एका स्टेशनरीच्या दुकानात 20 रुपडे देऊन ते मिळवलं, त्यावर पत्ता खरडून नव्या जोमाने परत पोस्टात आलो. माझं पाकीट रजिस्टर्ड पोस्टाने जाणार होतं त्याची पोचपावती ते माझ्या भारतातल्या पत्त्यावर पाठवणार होते. त्यासाठी भारतातला पत्ता हवा होता तर! त्या बाईनं फॉर्म व त्याची प्रत यावर तिची सही ठोकली व शिक्के मारले. एक प्रत जोडलेल्या पुराव्यासकट मला दिली आणि दुसर्‍या प्रतीचं रहस्य मला उलगडलं! पाकीट 2000 रुपयासाठी इंश्युअर केलं. सगळे मिळून   सुमारे 170 रुपयाच्या आसपास पैसे भरून मी एव्हरेस्ट सर केल्याच्या आनंदात ताठ मानेने बाहेर  पडलो. एकूण दोन दिवस व इतर खर्च धरून सुमारे 200 रू घालवल्यावर तब्बल तीन आठवड्याने मला माझ्या खात्यात पैसे आलेले दिसले. 

त्यानंतर मी जवळपास 10 दिवस भारतात होतो पण पोचपावती अद्वैत कडे आली नाही. जायच्या दोन दिवस आधी माझा एक जुना मित्र भेटला. तो 90 च्या सुमारास इंग्लंडमधे रहात होता. बोलता बोलता त्यानं मला त्याच्याकडच्या जुन्या 50 आणि 10 पौंडाच्या नोटा बदलायला दिल्या. एकूण 360 पौंड! ते ऐकल्यावर माझ्या मनात आकाशवाणीवर दुखवट्याच्या वेळेला ज्या प्रकारचं संगीत लावतात ते सुरू झालं. तरी मी ते काम स्विकारलं. त्याच्या 50 पौंडाच्या नोटा 96 च्या आसपास बाद झाल्या आहेत हे समजल्यावर दुखवटा संगीतानं जोरदार टॅहॅं केलं. पण नोटा बॅंकेत बदलता येतात हे वाचून मोठ्या धीराने माझ्या शाखेत गेलो. इतक्या जुन्या नोटा तुमच्याकडे कशा आल्या? असले काही बाही प्रश्न मला विचारतील अशा विचारांनी माझ्या डोक्यात उच्छाद मांडला होता. पण काय आश्चर्य! बॅंकेतल्या बाईने छान हसून किती पैसे आहेत ते विचारलं. मी तो आकडा सांगून तिच्याकडे नोटा सुपूर्द केल्या. तिनं ते मोजले व माझं डेबिट कार्ड वापरून माझ्या खात्यात जमा केले. मी लगेच बॅंकेचं अ‍ॅप वापरून पैसे जमा झाल्याची खात्री केली. सर्व कामाला एकूण दोन मिनिटं लागली. हे फारच अविश्वसनीय वाटलं म्हणून घरी आल्यावर परत एकदा पैसे जमा झाल्याची खात्री केली. इथे हे नमूद करायला पाहीजे की इकडे ही पैसे पोस्टातर्फे बॅंक ऑफ इंग्लंडकडे पाठवता येतात. त्यासाठी पण एक फॉर्म व पुरावे लागतात. पण इतक्या जुन्या काळी बाद झालेल्या नोटा देखील बॅंकेत घेतल्या जातात म्हंटल्यावर कुणीही त्यांच्या जवळच्या शाखेतच जाईल असं मला वाटतं. 

=== समाप्त === 

Saturday, July 20, 2024

वय की आकडा - एक प्रौढ चिंतन

 काही लोक 'वय काय? नुसता एक आकडा तर आहे' असं एखाद्या तत्वज्ञान्याचा आव आणून म्हणतात.. किंबहुना, असं म्हणायची एक फॅशनच झाली आहे. याच लोकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्या की त्यांचा आकडा वाढल्याची जाणीव अस्वस्थ करून जाते. लग्न जमवायच्या वेळेला या तर आकड्याला अअसामान्य महत्व येतं. वयाला एक आकडा म्हणणं म्हणजे सजीवाला एक हाडाचा सापळा किंवा अणुंचा ढिगारा म्हणण्याइतकं अरसिकपणाचं आहे. वय एक आकडा असला तरी तो आपल्याला लावता येत नाही. खरं म्हटलं तर वयाला एका आकड्यापेक्षा इतरही काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म आहेत.

वय एक प्रवाही आकडा आहे. एकदा जन्म घेण्याचा नळ सुटला की वयाचा प्रवाह सुरू होतो. हा प्रवाह डायोड मधून जाणार्‍या विद्युतप्रवाहा प्रमाणे फक्त एकाच दिशेने जाऊ शकतो.. त्याला मागे जाणं माहिती नाही आणि निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने पुढे पण जाता येत नाही. प्रवाहाला अनेक अडथळे येतात पण त्याचा वेग कधीही कमी होत नाही. कुठेही विचार करीत थांबायला त्याला वेळ नसतो. कुठल्याही भोवर्‍यात सापडून गोल गोल फिरणं त्याच्या नशिबात नसतं. इतर प्रवाह याला येऊन मिळत नाहीत किंवा हा दुसर्‍या प्रवाहाला मिळत नाही. एखाद्या उंच कड्यावरून कधीही धबधब्यासारखा कोसळत नाही. साठीशांत किंवा सहस्रचंद्रदर्शन शांत असल्या कुठल्याही शांतिवनात न रमणारा हा प्रवाह फक्त भगवंतरावांनी मृत्युचा कंट्रोल ऑल्टर डिलीट मारला की खंडतो. असा प्रवाह जो हातमागाच्या धोट्यासारखा काळाच्या कपड्यातून मार्ग काढत काढत त्यावर अनुभव आणि आठवणी याचं सुंदर भरतकाम करून जातो, तो नुसता आकडा कसा असेल? 

वय ही काहीही न करता वाढणार्‍या काही मोजक्या गोष्टीतील एक गोष्ट आहे.. काँग्रेस गवत, केस व नखं या आणखी काही! वयाचे चेंडुसारखे टप्पे देखील असतात. प्रत्येक टप्प्याचं किंवा वयोगटाचं वागणं व बोलणं ढोबळमानाने सारखं असतं. लहान मुलं निरागस असतात, त्यांना संभाळणं हा जितका आनंददायी व मजेशीर अनुभव असतो तितकाच तो सहनशीलतेचा अंत बघणारा  व कष्टप्रद असतो. त्यांना सदोदित आपलं लक्ष वेधून घ्यायचं असतं. मुलं स्वकेंद्री, अहंकारी, हट्टी, उत्साही, चंचल, अस्वस्थ व सतत प्रश्नांची सरबत्ती करणारी असतात. आहेत ते नियम मोडून मर्यादा ओलांडायचा बंडखोरपणा करणे, चिडचिड करणे, मित्रमैत्रिणींशी तासनतास बोलणे पण घरी तुटक वागणे असं तरुण वर्गाचं सर्वसाधारण वागणं असतं. लवकर काहीही न आठवणे, वेगवेगळे अवयव दुखणे, सतत कुठली न कुठली औषधं घेणे, विसरभोळेपणा, ऐकायला कमी येणे व चिडचिड करणे ही म्हातार्‍यांची वैशिष्ट्ये! त्यामुळेच बहुतेक आयुष्यात 'वय होण्याला' फार महत्व दिलं जातं! प्रत्येक गोष्ट करण्यासाठी 'वय व्हावं' लागतं, जरी क्षणोक्षणी 'वय होत'च असलं तरीही! 

बहुतेक वेळा इतर लोक आपल्याला वयाची जाणीव करून देतात.  "शेंबुड पुसायची अक्कल नाही आणि म्हणे माझं लग्न करा!, "एव्हढा मोठ्ठा घोडा झालाय तरी काही मदत करेल तर शप्पथ!", "अर्धी लाकडं गेली मसणात तरी हे असं वागणं?" किंवा "म्हातारचळ लागलाय मेल्याला" असल्या शेलक्या टोमण्यांनी वेळोवेळी वयाची जाणीव जाणीवपूर्वक करून दिली जाते. आपली चालू आहे ती नोकरी वा काम नको असतं तसं वयाचं पण आहे.. सध्या चालू आहे ते वय बहुतेकांना नकोच असतं. त्यासाठी काही लोकं वय लपविण्याचा आटोकाट प्रयत्न करतात.. या लोकांमुळे एज डिफाइंग क्रिम, कलपं व बोटॉक्स सारख्या वय झाकण्याच्या गोष्टी विकणारे मोठे उद्योग अस्तित्वात आले आहेत. पण कधी कधी पांढरे केस कलपातून डोकं बाहेर काढून एखाद्याचं उखळ पांढरं करू शकतात.

"Age is an issue of mind over matter. If you don't mind, it doesn't matter" असं मार्क ट्वेन म्हणून गेला आहे. पण हे शहाणपण वय वाढल्याशिवाय येत नाही. 

आणि एकदा ते आलं की हे समजतं की आपलं आयुष्य चालतं एखाद्या ड्रायव्हरलेस कारसारखं ! कुठे जायचं ते माहिती असतंच, कसं जायचं ते निघायच्या वेळेला भगवंतरावांनी प्रोग्रॅम केलेलं असतं. आपल्या हातात काहीच नसतं.

तेव्हा सिट बॅक, रिलॅक्स अँड एन्जॉय द राईड!!!

== समाप्त == 

Monday, March 4, 2024

माझा लेखन प्रपंच!

 माझे वडील सरकारी B.Ed. कॉलेजचे प्राचार्य असल्यामुळे दर एक-दोन वर्षांनी बदली व्हायची. त्यामुळे महाराष्ट्रातील काही खेडेगाव-वजा-शहरात माझं बालपण जास्त गेलं. मी बारा भानगडी केलेल्या नसल्या तरी बारा गावचं पाणी जरूर प्यालेला माणूस आहे! पुण्याच्या बाहेरच्या शाळा विशेषत: मराठवाड्यातल्या प्रचंड विनोदी होत्या. मराठवाडा तेव्हा मागासलेला होता त्यामुळे त्यांचा दर्जा पुण्यातल्या शाळांच्या खूप खाली आणि अभ्यासक्रम सुद्धा एक वर्ष अलिकडचा होता. नववी मधे पुण्यातल्या शाळेत आल्यावर मला समजलं की मला कुठल्याच विषयातलं काहीच समजत नाही आहे. पुण्यात आठवीतच संस्कृत विषय सुरू झाला होता आणि रामरक्षेतल्या थोड्या फार श्लोकांपलीकडे काही माहीत नव्हतं. गणितात सगळे प्रमेय व रायडर्स नामक अगम्य भाषा बोलायचे. आयुष्यात तेव्हा पहिल्यांदा मी खचलो. मला कुठलीच शाळा कधीच न आवडायला ते एक कारण झालं. कुठल्याही विषयाची गोडी लागली नाही, मराठीची देखील! माझा एक नंबरचा शत्रू म्हणजे कुठल्याही भाषेचं व्याकरण! 'हत्ती मेला आहे'.. व्याकरणाने चालवून दाखवा सारखे प्रश्न डोक्यात तिडिक आणायचे. निबंध झेपले नाहीत. त्यामुळे मला कुठल्याही भाषेतलं प्राविण्य नाही.. अगदी मराठीतलं सुद्धा! 

नेटवर इतर लेखकांचे ओघवत्या मराठीतील लेख किंवा त्यांची शब्दसंपत्ती बघतो तेव्हा मला त्यांचं फार कौतुक वाटतं आणि माझ्यातलं वैगुण्य जाणवतं. कमी प्राविण्यामुळे लेख लिहायला मला खूप वेळ लागतो.. बर्‍याच वेळेला शब्द आठवत नाहीत, शब्दाचा अर्थ माहीत नसतो किंवा योग्य शब्द माहीत नसतो. काही वाचकांनी मला 'तुमची भाषा सोपी नी सुटसुटीत असते. उगीच भयंकर जड शब्द, ड्रॅमॅटीक नसते. मला वाचायला सोपी वाटते' अशी प्रतिक्रिया दिली होती. त्याचं खरं कारण हे आहे की मी जड भाषेत लिहूच शकत नाही. मराठी शब्द सुचला नाही म्हणून बेधडक इंग्रजी शब्द वापरून पुढे जायला मला आवडत नाही. मला जे म्हणायचंय त्याला मराठीत नेमका शब्द/वाक्प्रचार शोधून देखील नाही मिळाला तरच मी नाईलाजास्तव इंग्रजी शब्द घालतो. पण मराठीतील नेहमीच्या वापरातले टेबल वगैरे सारखे इंग्रजी शब्द मी जसेच्या तसे वापरतो. तसंच जर कधी कथेतल्या पात्राची गरज असेल तर सरसकट इंग्रजी श्ब्द/वाक्य वापरतो. वैज्ञानिक विषयांवर लिहीताना इंग्रजी शब्दांना बर्‍याच वेळेला पर्याय नसतो.

माझ्या लहानपणी घरात रेडिओ नव्हता, तर टिव्ही भारतात पोचलेलाच नव्हता. माझं वय आत्ता 67 आहे त्यावरून तो काळ किती जुना होता याची कल्पना येईल. खेळाची साधनं कमीच होती. माझा जास्त वेळ उनाडक्या करण्यात नाही तर इतर मुलांबरोबर खेळण्यात जायचा. तरीही वेळ उरायचाच कारण आजच्या काळासारखी रोज कुठल्या न कुठल्या क्लासला जायची पद्धत नव्हती. तो वेळ मी पुस्तकं खाण्यात घालवत असे. मला वडिलांच्या कॉलेजच्या ग्रंथालयातली अनेक पुस्तके वाचायला मिळाली. लहान मुलांसाठी लिहीलेली जादुचा पोपट, फास्टर फेणे किंवा चांदोबा पासून त्या वयात न झेपणारी चि. वि. जोशी, पु. ल., अत्रे किंवा द. मा. मिरासदार यांची पुस्तके पण खाल्ली. पुढे कॉलेजात गेल्यावर इंग्रजी पुस्तकेही खाल्ली. या सगळ्या वाचनाचा माझ्यावर काही तरी परीणाम कळत नकळत झाला असणार, विशेषत: पुलंनी लिहीलेल्या व्यक्तिचित्रणांचा! कारण, कॉलेजच्या पहिल्या वर्षात (1972-73) नोटिस बोर्डावर वार्षिकासाठी  लेख पाठवा हे वाचल्यावर झपाटून जाऊन मी एक व्यक्तिचित्र लिहीलं. त्यात माझ्या एका मित्राच्या आयुष्यातल्या आणि थोड्या काल्पनिक गमती होत्या. ते कॉलेजच्या वार्षिकात छापून आलं. काही मित्रांना आवडलं. ते लिखाण सहजपणे घडलं. मला काही प्रयास करावे लागले नाहीत. म्हणूनच बहुतेक मला त्याचं काही विशेष वाटलं नाही, अजूनही वाटत नाही. 

कॉलेजच्या दुसर्‍या वर्षानंतर माझ्या वर्गातली हुशार मुलं इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला निघून गेली. सुमार बुद्धिमत्तेमुळे मला मार्क कमी पडले व कुठेच प्रवेश मिळाला नाही. मग मी धोपटमार्गा सोडू नकोस हे म्हणत B.Sc. करायचं ठरवलं. आमच्या बिल्डिंगमधला एक मित्र वर्ध्याला डॉक्टरकी करायला गेला. कधी झटका आला तर मी त्याला पत्र लिहीत असे. त्यात आमच्या बरोबर खेळणार्‍या मुलांचं सध्या काय चाललंय यावर विनोद असायचे. एकदा तो सुट्टीला घरी आला असताना मला म्हणाला की तुझी पत्रं फार छान विनोदी असतात. माझी फार करमणूक होते. माझीच नाही तर माझ्या रूम पार्टनरची पण! तो म्हणतो की..  हा कोण तुझा मित्र? काय मस्त पत्रं लिहीतो! ते ऐकल्यावर मला  फार गार गार वाटलं. 

कॉलेजच्या तिसर्‍या वर्षात माझी ज्ञानप्रबोधिनी मधून आलेल्या राजीव बसर्गेकरशी मैत्री झाली. भरपूर मार्क पडलेले असूनही इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला न गेलेला माझ्या माहितीतला हा पहिला माणूस! तो हुशार तर होताच शिवाय हरहुन्नरी देखील! मला त्याचा आदर वाटायचा! त्याचा ज्ञानप्रबोधिनीतील मित्र अरविंद परांजपे याचीही मैत्री झाली. तो तबला छान वाजवायचा, अजूनही वाजवतो. संगिताची चांगली जाण असलेला माझ्या माहितीतला हा पहिला माणूस! तेव्हा बाबासाहेब पुरंदरे आमच्याच बिल्डिंगमधे रहात असत. त्यांचा मुलगा अमृत माझ्याच वयाचा! आमच्याच कॉलेजात होता. शिवापूरहून रोज कॉलेजला येजा करणारा उमेश देशपांडे, राजीव, अरविंद, अमृत आणि मी चांगले घट्ट मित्र झालो. अजूनही आहोत. त्याच वर्षात कॉलेजने एक एकांकिका स्पर्धा आयोजित केली. ती कॉलेजमधल्याच वेगवेगळ्या वर्षातल्या आणि शाखेतल्या विद्यार्थ्यांपुरती मर्यादित होती. प्रथम राजीवने त्यात भाग घ्यायची कल्पना मांडली. म्हणून आम्ही स्त्री पात्र नसलेल्या एकांकिका शोधायला लागलो. त्या काळात कॉलेजातली मुलं मुली एकमेकांशी फारशी बोलत नसत. नाटकात एकत्र काम करणं तर खूप पुढची गोष्ट! 

आम्हाला हवी तशी एकांकिका न मिळाल्यामुळे राजीवने 'आपणच एक लिहू या' असं सहजपणे म्हंटल्यावर मी वासलेला ऑं मला अजून आठवतोय. कुणाला साधं लेखन कशाशी खातात हे देखील माहीत नाही त्यात हा नाटक लिहायचं म्हणतो म्हंटल्यावर ते साहजिकच होतं. त्याच्याही पुढे त्याचा वगनाट्य लिहण्याचा आग्रह होता. तो सोडता इतरांना साधं नाटक आणि वगनाट्य यातला फरक देखील माहीत नव्हता. मग त्याने वगनाट्यातल्या गण, गवळण व वग या भागांबद्दल सांगितलं. पण गवळण करायला मुली पाहिजेत, त्या कुठून आणणार? यावर खल करता करता गवळणींच्या जागी गवळी आणायचं ठरलं. आदल्या वर्षी कॉलेजच्या एका वर्गाची सहल लोणावळ्याला लोकलने गेली असता पोरांच्या व काही गवळ्यांच्या बाचाबाचीच पर्यवसान गवळ्यांनी पोरांना बदडण्यात झालं होतं. आम्ही त्या पार्श्वभूमीचा वापर केला. राजीवनेच सगळं लिखाण केलं. नंतर मी फक्त त्यात काही विनोद घुसडले. 

हे वगनाट्य कसं झालं आहे याची चाचणी घेण्यासाठी राजीवने त्याचं वाचन आमच्याच वर्गातल्या काही मुलांसमोर केलं. त्यातल्या कुणालाही ते न आवडल्यामुळे आमचे चेहरे चांगलेच पडले. तरी स्पर्धेत एकांकिका करण्याबद्दल एकमत होतं. अरविंदने संगीत दिलं शिवाय ढोलकी वाजविण्याचं महत्वाचं कामही केलं. एकांकिकेत एक मित्राला राजाचं काम दिलं, उमेश कोतवाल तर मी प्रधान झालो. स्पर्धेत आमच्या एकांकिकेची सुरुवात झाल्यावर थोड्या वेळाने राजा व प्रधान रंगमंचावर असताना कोतवाल एंट्री घेतो. उमेशने त्या एंट्रीलाच इतका हशा पिकवला की मला रंगमंचावर हसू आवरेना. जबरदस्त अभिनयामुळे उमेशने परिक्षकांसकट सगळे प्रेक्षक खिशात घातले आणि आम्हाला पहिलं पारितोषिक मिळालं. तालमी करताना लोकांना ते इतकं विनोदी वाटेल किंवा आम्हाला पहिलं बक्षीस मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं! त्याचं सगळं श्रेय अर्थातच फक्त राजीव आणि उमेशला! आचार्य अत्रेंनी देखील अशा प्रकारचा अनुभव आल्याचं लिहीलं आहे. त्यांच्या एका विनोदी नाटकाची (मला वाटतं साष्टांग नमस्कार) रंगीत तालीम बघताना त्यांना व बघणार्‍यांना मुळीच हसू आलं नाही. नंतर त्यांनी फक्त एक दोन प्रयोग पुण्यात करून नंतर बाहेरगावी जायचा सल्ला दिला. पण प्रत्यक्ष पूर्ण भरलेल्या नाट्यगृहात जेव्हा ते सुरू झालं तेव्हा पहिल्या प्रवेशापासून शेवट पर्यंत लोक खो खो हसत होते. अत्रेंनी त्याचं कारण मूठभर लोकांच मन आणि समुदायाचं मन (crowd mind) याच्यातल्या फरकाला दिलं आहे.

एकांकिकेच्या लिखाणात माझं योगदान फारसं नसलं तरी मला एक चांगला अनुभव मिळाला व असं काही लिहीता येतं असा एक विश्वासही! पुढच्या वर्षी आम्ही दोघांनी अजून एक एकांकिका लिहीली पण तेव्हा पारितोषिक मिळालं नाही. या अनुभवाच्या जोरावर मी नंतर विद्यापीठातही गॅदरिंगला एकांकिका लिहील्या. विद्यापीठात असताना उमेशने एक वगनाट्य लिहून पुरुषोत्तम करंडकात दिग्दर्शनाचं पहिलं बक्षिस पटकावलं. तिथेच जब्बारने त्याला पाहिलं आणि तीन पैशाच्या तमाशात काम दिलं. तो हवालदाराचं व विष्णूचं काम करीत असे. विष्णूचा एक संवाद 'थांबा रे! अंधार करा मला अंतर्धान पाऊ द्या!' हमखास हशा मिळवायचा. 

पदार्थविज्ञान विषयात M.Sc. केल्या नंतर मला कॉलेजात प्राध्यापकाच्या नोकरी शिवाय इतर फारसे पर्याय नव्हते. M.Sc. नंतर एका कॉलेजातील एक प्राध्यापिका बाळंतपणाच्या रजेवर गेल्या म्हणून त्यांच्या जागी तीन महिन्यासाठी माझी निवड झाली. त्या नंतर कॉलेज मला कायमची नोकरी द्यायला तयार होतं पण मला त्या तीन महिन्यातच त्या नोकरीचा पुरेसा कंटाळा आला. म्हणून मी विद्यापीठात संशोधन करायचा एक अयशस्वी प्रयत्न केला. संशोधन करायच्या ऐवजी मी जास्त वेळ कॅरम खेळण्यातच घालवत असे. पण संशोधनच्या निमित्ताने मला कंप्युटर (विद्यापीठातला ICL नामक मेनफ्रेम) चांगला वापरता यायला लागला. त्या वापरामुळे माझ्याकडे कंप्युटरच्या पाठकोर्‍या कागदाची प्रचंड रद्दी असायची. कधी तरी फार ऊर्मी आली तर मी त्यावर काही खरडत असे. पण ते कुणालाच कधी दाखवलं नाही. 

संशोधनाच्या निमित्ताने माझं जयकर ग्रंथालयात नेहमी जाणं येणं असे. तिथले काही कर्मचारी कधी कधी जरासे खडूसपणे बोलायचे. तसंच तिथे एखादं पुस्तक शोधणं एक दिव्य होतं, निदान मला तरी तसं वाटायचं. मग त्यावरती एक विनोदी लेख लिहीला. एकदा पदार्थविज्ञान विभागात एक सिंपोझियम झालं. ते तीन दिवस चालू होतं. त्यात देशातले बरेच संशोधक आलेले होते. त्याचं व्यवस्थापन करताना बर्‍याच गमती जमती झाल्या. त्या आणि आलेल्या संशोधकांच्या तर्‍हा व तर्‍हेवाईकपणा यावर एक लेख लिहीला. त्यात मी कॅरमचं सिंपोझियमचं व्यवस्थापन आणि कॅरमच्या विविध बाबींवर  प्रकाश टाकणारी भाषणं यावर विनोद केले होते. 

त्या सुमारास माझी बहीण विद्यापीठात मराठी मधे M.A. करत होती. डॉ अनिल अवचट विद्यापीठात काही संशोधनाच्या निमित्ताने रोज येत असत. कशी कुणास ठाऊक पण बहीणीची अवचटांबरोबर चांगली दोस्ती झाली. अवचटांना लेख/पुस्तके लिहायला कागदांची गरज असे. त्यामुळे तिने माझी आणि त्यांची ही ओळख करून दिली. आणि मी त्यांचा अधिकृत रद्दी पुरवठादार झालो. अवचट बर्‍याच वेळा आमच्या घरी येत असत. मी बहुतेक वेळा घरी रात्री उशीरा येत असल्यामुळे माझी आणि त्यांची फार वेळा भेट झाली नाही. एकदा ते घरी आले असताना बहीणीने माझा जयकर वरचा लेख वाचायला दिला. माझ्यामते तिला मी लेख लिहीतो हेच माहीत नसण्यामुळे तिने ते वाचले असण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण खरी परिस्थिती अर्थातच वेगळी होती. आश्चर्य म्हणजे त्यांना तो चक्क आवडला आणि त्यांनी तो मला न विचारता परस्पर मोहिनी अंकाला देऊनही टाकला. बहीणीने हे नंतर मला सांगितलं. मला फारच आनंद झाला अर्थात त्यातला जास्त तो अवचटांना आवडल्याचा होता. यथावकाश तो छापून आला आणि मला त्या अंकाची प्रत देखील मिळाली. त्या नंतर ते एकदा घरी आले असताना त्यानी स्वत:हून मी आणखी काही लिहीलंय का असं बहीणीला विचारलं. त्यावर तिने तो कॅरम सिंपोझियमचा लेख वाचायला दिला. त्यांना तो आवडला आणि त्यांनी तो ही मोहिनीत छापून आणला. इतकंच नाही तर त्यांनी स्वत:हून माझे काही मिळमिळीत शब्द बदलून चपखल शब्द घातले. या बद्दल मी त्यांचा अतिशय ऋणी आहे. कुठला मोठा माणूस असं एखाद्या सामान्य मुलाच्या किरकोळ लेखांसाठी करेल? मी काही ते लेख स्वत:हून कुठल्या मासिकाकडे पाठवले नसते कारण माझ्या मते ते दोन्ही काही अवचटांसारख्या लेखकाचे लक्ष वेधण्याच्या लायकीचे नव्हते. अजूनही मला असं वाटतं की ते लेखांच्या दर्जा पेक्षा केवळ अवचटांनी सांगितलं म्हणून छापून आले असणार! 

माझ्या संशोधना दरम्यान सगळ्या मित्रांची  लग्नं झाली आणि मला वेळ कसा घालवावा हा प्रश्न पडला. त्याच सुमारास अमृतची भेट झाली. त्याने 'पुरंदरे प्रकाशन' या नावाने पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय नुकताच चालू केला होता आणि वडिलांची पुस्तके पुन:प्रकाशित करायचा सपाटा लावला होता. तो बराच उद्योगी माणूस आहे, तेव्हा तो त्याचा दुसरा का तिसरा उद्योग होता. बोलता बोलता त्यानं इंग्रजीतील 'How And Why?' या लहान मुलांसाठी वैज्ञानिक विषयांवर (पॉप्युलर सायन्स) लिहीलेल्या पुस्तकांचा उल्लेख केला. त्या धर्तीवर एक मराठीतून मालिका करण्याच्या त्याच्या मानसाबद्दल सांगितलं. एका विषयावरचे प्रश्न लेखकाने स्वत:च उपस्थित करायचे आणि उत्तरंही त्यानेच द्यायची असं त्या पुस्तकांचं स्वरूप होतं. त्याकाळी  कंप्युटर नवीन होता व बर्‍याच लोकांना त्याबद्दल कुतुहल होतं म्हणून पहिलं पुस्तक त्यावर लिहायला त्यानं मला सांगितलं. 

यथावकाश बर्‍याच इंग्रजी पुस्तकांची मदत घेऊन मी 'गणकयंत्र' हे पुस्तक लिहीलं. अमृतने पुरंदरे प्रकाशनातर्फे पदार्थविज्ञान विभागाचे तेव्हाचे विभागप्रमुख डॉ. भिडे यांच्या हस्ते ते प्रसिद्ध केलं. ते नुसते पुस्तकाबद्दल नाही तर माझ्याबद्दल देखील चांगलं बोलले, पण जाता जाता मिश्किलपणे माझ्या कॅरम प्रेमाचा उल्लेख करून! खुद्द बाबासाहेबांनी देखील एक भाषण केलं. मला भाषण करायची सवय नसल्यामुळे आणि आपणच आपल्या पुस्तकाबद्दल काय बोलायचं हे न सुचल्यामुळे आधीच अमृतला मी बोलणार नाही हे सांगितलं होतं. त्यानही आग्रह धरला नाही पण त्याच्या भाषणात 'मी भाषण करणार नाही, पाहिजे तर अजून एक पुस्तक लिहून देईन' असं मी त्याला कबूल केल्याचं बेधडकपणे जाहीर केलं. कुणाचीही स्तुती करणं हे महापाप या महाराष्ट्रीय बाण्याला जागून माझ्या मित्रांनी 'एका गणंगाने संगणकावर लिहीलेले पुस्तक' किंवा 'कुठल्या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केलास रे?' असं प्रेमळ, खास पुणेरी खडूस कौतुक केलं. हे पुस्तक माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त खपलं. 

मी पदार्थविज्ञानाचा विद्यार्थी असल्यामुळे अणू जिव्हाळ्याचा विषय होताच तसंच सामान्य लोकांना अणूत इलेक्ट्रॉन, प्रोटॉन व न्युट्रॉन या पलिकडे काही आहे हे तेव्हा तरी माहीत नव्हतं म्हणून पुढचं पुस्तक अणूवर लिहीलं. पुरंदरे प्रकाशनातर्फे तेही प्रकाशित झालं. तिसरं पुस्तक सूक्ष्मदर्शक यंत्रांवर लिहायचा विचार होता. त्यासाठी मी बरीच माहिती पण जमा केली होती. पण अचानक मला असं वाटलं की आधीच उपलब्ध असणारी माहिती वेगळ्या भाषेत व वेगळ्या स्वरूपात परत लिहीण्यात काही गंमत नाही. त्यात माझं काय कौशल्य किंवा वेगळेपण? हे काम कुणीही करू शकेल. आणि मी अमृतला सांगून ते काम थांबवलं. सुदैवाने, तो मला लहानपणापासून ओळखत असल्यामुळे आमच्या मैत्रीत काहीही फरक पडला नाही. अणू वर लिहायला सुरुवात करायच्या आधी केसरीने मला त्यांच्या रवीवारच्या पुरवणीत संगणकावर लेख लिहायची विनंती केली होती. आनंदाने मी काही आठवडे ते लिहीले, पण नंतर त्याचाही कंटाळा आल्यामुळे बंद केले. बहुतेक सकाळ मधे पण माझे एक दोन लेख प्रसिद्ध झाले असावेत, पण नक्की आठवत नाही. 

शेवटचं लिखाण 88/89 साली झालं असावं त्यानंतर बरीच वर्ष खंड पडला. लग्न, संसार, काम व प्रदेशवार्‍या यात कधी वेळच मिळाला नाही. त्यानंतर मी 2006 साली इंग्लंडमधे आलो. इथे मला कामाचा फार ताण किंवा दबाव नसल्यामुळे मला जास्त वेळ मिळू लागला. एव्हाना कंप्युटरवर मराठी टायपिंग उपलब्ध झालेलं होतं. तरी सुद्धा लिहीण्याचं काही डोक्यात नव्हतं. सुरुवातीला मी जगभरची वर्तमानपत्र नेटवर वाचण्यात वेळ घालवत असे. त्याचा कंटाळा आल्यावर काही तरी शोधता शोधता मला मायबोलीची साईट सापडली. स्वत:चा ब्लॉग देखील मराठी भाषेत एक पैसा पण न खर्च करता लिहीता येतो हा शोधही याच काळातला! शिवाय कुठल्याही प्रकाशकाकडे न पाठवता आपला लेख तत्काळ प्रसिद्ध करण्याच्या अभूतपूर्व सोयीचं मला जास्त आकर्षण वाटलं, अजूनही आहे. काही दिवस लोकांचे लेख वाचण्यात घालवले मग मला लिहायची ऊर्मी आली. कंप्युटरवर काम केल्याचा परिणाम म्हणा किंवा पूर्वीचं लेखन हरवल्याचा सल म्हणा मी लेख मायबोली व ब्लॉगवर एकाच वेळी टाकायला लागलो. कारण, कुठलंही एक स्थळ बंद पडलं तरीही माझं लेखन दुसर्‍या स्थळावर मिळू शकेल म्हणून! मला माझ्या लिखाणाची मित्रांमधे व नातेवाईकांमधे जाहिरात करायची नव्हती. तसंच चुकून त्यांनी कुठे माझा लेख वाचलाच तर तो मी लिहीला आहे असं त्यांना समजू नये म्हणून मी सुरुवातीला 'चिमण गोखले' या टोपण नावाने लिखाण करू लागलो. 

मी पहिला लेख 2008 साली प्रसिद्ध केला. आत्तापर्यंत साठच्या वर लेख पाडले आहेत. अजूनही अधून मधून काही तरी पाडत असतो. खूप लोकांनी मला लेखन आवडल्याचं आवर्जून सांगितलंय. तसंच काही लोकांनी काही लेख न आवडल्याचं मनमोकळेपणे सांगितलं आहे. काही जणांनी माझ्या लेखांच्या लिंका त्यांच्या मित्रमैत्रिणींना पाठवल्याचं सांगून वरती त्यांची काय प्रतिक्रिया आली ते पण सांगितलं. मी या सर्वांचा खूप आभारी आहे व मला सर्व प्रतिक्रियांचा आदर आहे. माझे लेख सर्व लोकांना आवडणं शक्य नाही याची मला पूर्ण जाणीव पण आहे. त्याच बरोबर लोकांनी माझे लेख वाचल्याचा प्रचंड आनंद पण आहे. जसजसे जास्त लोक माझ्याशी खाजगीत संपर्क करू लागले तसं मला माझा बनावट अवतार संभाळणं अवघड होऊ लागलं. शेवटी एकदा मी दोन्ही साईटवर माझं खरं नाव लावलं. माझ्या काही मित्रांना पण सांगितलं. तरी अजूनही लेखात माझा उल्लेख चिमण असाच करतो. बर्‍याच लोकांनी मला हे कळवलं आहे की जेव्हा त्यांचा मूड ठीक नसतो किंवा मन ठिकाणावर नसते तेव्हा ते मन उल्हसित करण्यासाठी आवर्जून माझे लेख वाचतात. या आणि अशा प्रकारच्या प्रतिक्रिया वाचून किती धन्य वाटतं ते प्रभावीपणे सांगण्याइतकं लेखन कौशल्य दुर्दैवाने माझ्याकडे नाही. या सगळ्यांना मी इतकंच सांगू इच्छितो की जेव्हा मला उदास वाटत असतं, मूड बरोबर नसतो किंवा केवळ नवीन लिहायची स्फुर्ती हवी असते तेव्हा मी माझ्या लेखांवरच्या प्रतिक्रिया वाचतो. मग माझं डोकं रेस सुरू व्हायच्या आधी मोटारीं करतात तसं घूंsss घूंsss  करायला लागतं. 

पुष्कळ लोक मला विचारतात की अमुक तमुक सुचले कसे? खरं सांगायचं तर मलाही कधी कधी हाच प्रश्न पडतो. कधी मी माझाच एखादा लेख वाचायला घेतला तर काही कोट्या/विनोद मला हाच विचार करायला लावतात. त्यावर विचार केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की हे जास्त 'Getting into the zone' बद्दल आहे. पहिल्या नाटकाच्या तालमींच्या वेळी आम्हाला असं जाणवलं होतं की बर्‍याच वेळेला उमेश संवाद बोलताना अडखळतो किंवा विसरतो. मग आम्ही त्याला संवाद पाठ कर रे बाबा, चांगले.. हा संवाद अशा पद्धतीने म्हणालास तर बरा वाटेल असे काही बाही सल्ले आमच्या परीने द्यायचो. त्या सगळ्या वर त्याचं एकच उत्तर असायचं.. तुम्ही काळजी करू नका. एकदा 'मोशन' मधे आलो की सगळं व्यवस्थित करतो बघा! आणि तसंच झालं. मलाही ते आता पटायला लागलंय. एकदा लिहायच्या 'मोशन' मधे गेलो की काही अफलातून कोट्या/विनोद सहज सुचून जातात. 

आत्तापर्यंत दोन पुस्तके आणि काही लेख पाडले असले तरी मी मला लेखक समजत नाही. माझा युक्तिवाद असा आहे की जसं गल्ली क्रिकेट खेळणार्‍याला क्रिकेटपटू म्हणत नाहीत तसंच ज्याचे लेख थोड्या लोकांनीच वाचले आहेत त्याला लेखक म्हणता येत नाही. पण लोकांनी एखाद्याला लेखक म्हणणे न म्हणणे सर्वस्वी त्यांच्या मनावर आहे. त्यामुळे ते मला लेखक म्हणत असतील तर माझी तक्रार नाही. शेवटी, माझ्या मनात मी मला काय समजतो ते महत्वाचं!

आत्तापर्यंतचं माझं लिखाण व्यक्तिचित्रणं (वादळ, नुस्ता स.दे., सोबती, क्लोज एन्काऊंटर्स ऑफ द चाईनीज काईंड इ.), एखाद्या घडलेल्या घटनेवर आधारित संपूर्ण काल्पनिक कथा (वाघोभरारी, सप्राईझ, तेथे पाहिजे जातीचे मालिका इ.), ऐतिहासिक विषय (ऑपरेशन मिन्समीट, महाराजाची विहीर इ.), वैज्ञानिक विषय (अवकाश वेध, एक खगोलशास्त्रीय दुर्मीळ घटना इ.), इंग्लंड मधील निवासवर्णनं (ऑक्सफर्डचा फेरफटका, इंग्लंडमधील भत्ताचारी लोक इ.), फार्सिकल कथा (एका मुलीचं रहस्य, प्रेमा तुझा गंज कसा इ.) अशा प्रकारात झालं आहे. काही सांगण्यासारखे अनुभव आले असतील तरच मला प्रवासवर्णन करावेसे वाटते. कारण, हल्ली कुठल्याही प्रेक्षणीय स्थळाची माहिती नेटवर उपलब्ध असते, तीच परत आपल्या भाषेत सांगण्यात मला मजा वाटत नाही. नवीन चित्रपट मी सहसा पहायला जात नसल्यामुळे चित्रपट परीक्षण कधी केले नाही. अधून मधून मला एखादी रहस्य कथा लिहावसं वाटतं. कदाचित लिहीनही एखादी! पण माझा कल खुसखुशीत नर्म विनोदी लिखाणाकडे जास्त असतो. 

मी आत्तापर्यंत का लिहीलं याची दोन कारणं आहेत. एक म्हणजे लोकांना काही तरी नवीन माहिती देण्याचा उद्देश! म्हणून मी भारतात सहसा न दिसणार्‍या किंवा अनुभवास न येणार्‍या गोष्टींबद्दल लिहीतो. मग ती एखादी ऐतिहासिक गोष्ट असेल, महत्वाची घटना/व्यक्ती असेल, वा वैज्ञानिक दृष्ट्या नवलाईची वस्तू असेल. दुसरं कारण, लोकांची करमणूक! यात मी आम जनतेवर लादल्या सततच्या भडिमारातील विसंगती शोधून त्यावर काही मार्मिक लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. बर्‍याचदा मी मला आलेले अनुभव विनोदी पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला आहे. काही वेळा भविष्यात काय होऊ शकेल ते माझ्या परीने लिहीलं आहे. कधी माझं मन एखादी असंभाव्य गोष्ट घडली तर काय होईल या विचाराने भरकटतं, मग त्याचीच एक कथा होते. काही तरी पाहून, वाचून, किंवा ऐकून माझ्या मनात एक विचारचक्र सुरू होतं. कधी कधी ते चार पाच दिवस सलग चालू असतं. त्यामुळे बर्‍याचवेळेला माझ्या झोपेचं खोबरं पण झालेलं आहे. जेव्हा मला ते चक्र एखाद्या लेखाचा ऐवज आहे असं वाटतं तेव्हा मला ते लिहून काढायची सण्णक येते.

धन्यवाद!


Thursday, December 7, 2023

फुकटचे सल्ले!

शाळा कॉलेजात असताना अनेकांनी येता-जाता मला "सरळ" वळण लावण्याच्या नावाखाली केलेल्या फुकटच्या उपदेशांनी माझं पित्तं फार खवळायचं! कधी (म्हणजे बर्‍याचवेळेला) मी मारलेल्या बंडला उघडकीस आल्या तर 'खोटं बोलू नकोस, खोटं बोलल्यानं पाप लागतं'. कधी रविवारी सकाळी जरा उशीरा पर्यंत लोळलो तर लगेच 'उठा आता, नुस्ते लोळत पडू नका. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान, संपत्ती आरोग्य लाभे! समजलेत काय चिमणराव?' अशी हजामत! असलं काही सतत ऐकल्यावर कुठल्याही कुणाचंही डोकं फिरेल, मग माझ्यासारख्या टीनेजराची काय कथा? बरं, याबद्दल कुणाकडे तणतण केली तर 'तू मोठ्यांचा आदर करायला पाहिजेस, त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागायला शिकलं पाहिजेस' हे वरती! 

 पण जसजसं माझं वय वाढत गेलं आणि आयुष्य अनेक अनुभवांनी समृद्ध होत गेलं तसतसं त्यातलं बरचसं तितकंस बरोबर नव्हतं हेही लक्षात आलं. आणि आता वयाची साठी ओलांडल्यावर कुठल्याही मोठ्या माणसाची तमा न बाळगता मी इतकं नक्की म्हणू शकतो की .. कधीही खोटं न बोललेली व्यक्ती अस्तित्वात नाही. थोडं फार खोटं बोलल्याशिवाय या जगात कुणीही कसं काय जगू शकेल? प्रत्येकावर काहीना काही कारणामुळे खोटं बोलण्याचा प्रसंग येतोच येतो. कधी तिर्‍हाईतांसमोर आपल्या खर्‍या भावना व्यक्त न करण्यासाठी म्हणा, कधी आपला मूर्खपणा उघडकीस येऊ नये म्हणून, कधी दुसर्‍याचं मन राखण्यासाठी तर कधी कायद्यातील पळवाटांचा फायदा करून घेण्यासाठी म्हणा प्रत्येक माणूस खोटं बोलून चुकलेला आहे. आयला, मराठी भाषा जरा गमतीदारचआहे.. इथे खोटं बोलल्यामुळे माणूस चुकला असं मला म्हणायचं नाही आहे. आयर्लंड सारखा देश कंपन्यांना कमी टॅक्स लावतो म्हणून कंपन्या त्या देशामधे आपलं मुख्य कार्यालय आहेअसं कागदोपत्री दाखवतात. स्टॅंप ड्युटी कमी पडावी म्हणून घराची किंमत कमी दाखविणे आणि उरलेली रक्कम रोकडा देणे हे तर सर्रास चालते. कायदा तिथे पळवाट! 

असंही म्हणता येत नाही की पूर्वी माणसं अजिबात खोटं बोलत नव्हती व हल्लीच्या काळातच बोलायला लागली आहेत. कारण या गोष्टीला महाभारतापासून 'नरो वा कुंजरो वा' सारखी उदाहरणं आहेत. अश्वत्थामा हा द्रोणाचार्याचा पुत्र, ज्याच्यावर त्यांचे अतिशय प्रेम होते. अवन्तिराजाच्या हत्तीचे नाव देखील अश्वत्थामा होते, ज्याला भीमाने युद्धात मारले. श्रीकृष्णाने सांगितले की, 'द्रोणाचार्याना सांगा, अश्वत्थामा मारला गेला.' भीमाने सांगितलेली पुत्र निधनाची बातमी ऐकून द्रोणाचार्य दु:खी झाले. परंतु खात्री करण्यासाठी त्यांनी युधिष्ठिराला विचारले. कारण युधिष्ठिर हा कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलणारा होता. द्रोणाचार्यांचा भीमावर विश्वास नव्हता हे एक वेळ समजून घेता येईल पण त्यांचा खुद्द श्रीकृष्णावर देखील विश्वास नव्हता हे खूप सूचक आहे. त्यामुळे, महाभारताच्या काळात देखील लोक धादांत खोटं बोलत होते असा सहज निष्कर्ष काढता येईल. द्रोणाचार्याचा विश्वास होता तो फक्त युधिष्ठिरावर! पण सत्यवचनी युधिष्ठिराने देखील त्यांना 'नरो वा कुंजरो वा' म्हणून गंडवलं. हे पूर्ण सत्य किंवा पूर्ण असत्य याच्या सीमारेषेवरचं असं काहीसं तो बोलला, आणि Rest is Mahabharat! 

 मला मात्र या उदाहरणावरून एकच गोष्ट लक्षात आली ती म्हणजे आपलं महाभारताच्या काळापासून फेक न्युज पसरवण्यावर प्रभुत्व होतं. फेक न्युज तंत्राचा वापर करून पांडवांनी द्रोणाचार्यांचा बळी घेतला आणि युद्ध जिंकलं. आता लागलेले बरेचसे शोध आमच्या वेदात मधे लिहून ठेवलेले होते असं म्हणणार्‍यांनी या गोष्टीची सुद्धा टिमकी वाजवायला हरकत नाही. पुढे ब्रिटिशांनी बर्‍याच बनावट बातम्या पसरवून दुसरं महायुद्ध जिंकलं, त्याबद्दल ते अजूनही स्वत:ची पाठ थोपटून घेतात. याच ब्रिटिशांनी 2022 मधे बोरीस जॉन्सन या त्यांच्या पंतप्रधानाला खोटं बोलल्याबद्दल डच्चू दिला. या त्यांच्या वागण्यात काही सुसंगती दिसते का? तर नाही. उलट, आमच्याकडे महाभारताच्या काळापासून खोटं बोलणं सर्वमान्य आहे. आमच्याकडच्या मंत्र्यांनी कितीही बंडला मारल्या तरी ते परत परत निवडून येतात हा त्याचा पुरावा आहे. 

तुम्हाला कधी कुणाचे नोकरीच्या अर्जा बरोबर पाठवलेले CV वाचावे लागले आहेत की नाही हे मला माहीत नाही. पण मला अनेक CV ( दुर्देवाने ) वाचावे लागले आहेत. कुठल्याही CV चा धनी नेहमी प्रचंड कष्ट करणारा, सर्व कौशल्यांमधे पारंगत, सर्वांशी मिळून मिसळून रहाणारा, सर्वांना नेहमी मदत करणारा, प्रश्नांना सामोरा जाणारा आणि ते सुटेपर्यंत त्यांचा पाठपुरावा करणारा असा सर्वगुणसंपन्न उमेदवार असतो. असे हजारात एक दोन उमेदवार असतील तर एक वेळ ठीक आहे. पण सगळे? असे खरच सगळे असते तर कंपन्यांचं प्रचंड भलं झालं असतं आणि भारताचं नाव सगळ्या क्षेत्रात उज्वल झालं असतं, नाही का? पण "माझं सगळ्यांशी जमत नाही, मला इंग्रजी संभाषण चांगलं जमत नाही, माझ्या कामात चूक काढली तर माझं डोकं फिरतं, मला पटकन राग येतो" , असं सगळं खर सांगितल्यावर नोकरी मिळणार नाही हेही तितकंच खरं आहे. 

आता लग्नाला बरीच वर्ष झाल्यामुळे मी इतकं नक्की म्हणेन की बायकोला कमी बंडला मारा. मी मार्क ट्वेनशी या बाबतीत सहमत आहे. तो म्हणाल्याप्रमाणे 'जर तुम्ही तिला खरं सांगितलं तर तुम्हाला काहीही लक्षात ठेवायची गरज नाही'. कारण, बायका एक वेळ महत्वाच्या गोष्टी विसरतील पण कोण, कधी व काय म्हणालं होतं ते आजन्मी विसरणार नाहीत! त्यामुळे, कधीना कधी मारलेल्या बंडलेशी विसंगत काही तरी बरळून आपणच आपलं पितळ उघडं पाडू शकतो. 

"मोठ्यांच्या सल्ल्यानुसार वागा" हा अजून एक फुकटचा सल्ला! बहुतेक वेळेला हा सल्ला मोठ्या (वयाने) माणसांकडूनच मिळतो. केवळ मोठ्या माणसानं सांगितलं म्हणून काही तरी करायचं याला कोणतेही तर्कशुद्ध कारण नाही. बहुतेक वेळेला मोठ्यांचं विचारचक्र घड्याळाच्या काट्यासारखं एकाच कक्षेत फिरत असतं. त्या कक्षेबाहेरचा विचार कुणी मांडला तर त्याला प्रचंड विरोध होतो हे ऐतिहासिक सत्य आहे. ही शिकवण कुठल्याही माणसाला सखोल विचार करण्यापासून परावृत्त करणारी आहे. अ‍ॅरिस्टॉटलच्या तत्वज्ञानाचं फारसं कुणी सखोल विश्लेषण न केल्यामुळे विज्ञानाची प्रगती बरीच वर्ष खुंटली. नंतरच्या शास्त्रज्ञांनी त्याच्या बाहेरचा विचार केल्यामुळे केवळ सर्व शास्त्रं पुढे गेली. गॅलेलिओने चर्च मधल्या तथाकथित ज्ञानी लोकांचं ऐकलं असतं तर त्यानं त्याचं संशोधन प्रसिद्धच केलं नसतं. किंवा आईन्स्टाईनने न्युटनचं संशोधन हे ब्रह्मवाक्य मानलं असतं तर जनरल रिलेटिव्हिटीचा शोध त्यानं लावला नसता. केट विंस्लेटच्या नाट्यशाळेतल्या शिक्षकाने तिला त्यावेळेला सांगितलं की "तू जरा स्थूल असल्यामुळे तुला मुख्य भूमिका मिळणार नाहीत, दुय्यम भूमिकांवर समाधान मानायला लागेल". हे तिनं तिला मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराच्या भाषणात सांगितलं. या उलट मी "सुसंगत तर्कशुद्ध संतुलित विचार करायला शिका" असा सल्ला देईन. 

कॉपी करू नका... हा सल्ला परिक्षेच्या संदर्भात ठीक आहे. पण तो सगळ्याच बाबतीत लागू होत नाही. उदा. झेरॉक्स कंपनी! ही कंपनी फक्त कॉपी करून जगते. कॉपी न करण्याचं व्रत जर जपानी लोकांनी आचरणात आणलं असतं तर टोयोटा सारख्या कंपन्या अस्तित्वात आल्याच नसत्या. अर्थात ते नुसते कॉपी करून थांबले नाहीत तर ते कॉपीत सतत सुधारणा करीत राहीले. आणि त्यामुळेच ती जगातील आघाडीची कंपनी झाली. याच्या उलट अ‍ॅंब्यॅसेडर गाडी बाजारात आणणारी हिंदुस्थान मोटर्स कंपनी! ही गाडी ऑक्सफर्ड मधे बनणार्‍या मॉरिसची कॉपी होती. हे मॉडेल बरीच वर्ष बाजारात होतं पण त्यात त्यांनी फारशा सुधारणा नाही केल्या आणि त्या गाडीचा खप कमी कमी होत गेला. बरेच गायक इतर गायकांची कॉपी करून पुढे आले. नंतर त्यांनी स्वत:ची शैली विकसित केली. किशोरकुमार सुरुवातीला सैगलची कॉपी करायचा. कारण सैगलचा त्याच्यावर खूप प्रभाव होता. त्याला त्याच्यासारखं गावं असं वाटायचं आणि जाणता अजाणता तो त्याची कॉपी करायला लागला. एके काळी त्यानं कॉपी केली म्हणून त्याच्या गाण्यांचा दर्जा मुळीच कमी होत नाही. 

कधी कधी माझ्या डोक्यात असा विचार करतो की समजा मला बॅक टू द फ्युचर मधला डॉ. एमेट ब्रॉऊन भेटला आणि मला माझ्या शाळेतल्या काळात घेऊन गेला तर मी माझ्या शाळकरी मला काय सांगेन? मला दिली गेलेली शिकवण आणि आलेले अनुभव यातली तफावत नक्कीच स्पष्ट करून देईन. अडचण एव्हडीचआहे की माझा एकंदरीत लक्ष केंद्रित करण्याचा काल बघता मी ते सगळं ऐकायची मुळीच शक्यता नाही.

 == समाप्त ==

Thursday, March 17, 2022

शॅकल्टनची अफाट साहस कथा

शॅकल्टनचे हरवलेले एंड्युरंस जहाज 107 वर्षानंतर सापडले (चित्र-5) ही नुकतीच आलेली बातमी वाचली आणि माझ्या मनात घर करून राहिलेल्या त्याच्या अचाट साहसकथेला परत उजाळा मिळाला. सुमारे 40/45 वर्षांपूर्वी रीडर्स डायजेस्ट मधे ती वाचली होती तेव्हापासून अर्नेस्ट शॅकल्टन हे नाव आणि त्याचं साहस माझ्या कायमचं लक्षात राहिलं आहे. तसं पाहिलं तर अनेक साहसवीरांनी केलेल्या अनेक मोहिमांसारखीच त्याची पण एक मोहीम! अनेक संकटं, धोके व साहसांनी भरलेली!आणि ती यशस्वी पण नाही झाली. मग असं काय विशेष होतं त्यात? ते जाणण्यासाठी त्या मोहिमेची नीट माहिती सांगितली पाहिजे मग मला त्यातलं काय नक्की भावलं ते सांगता येईल. तो काळ दोन्ही धृवांवर प्रथम कोण पाय ठेवतो या जीवघेण्या स्पर्धेचा होता. त्यासाठी अनेक देशांच्या मोहिमा झाल्या. शॅकल्टनने रॉबर्ट स्कॉटच्या दक्षिण धृवाच्या शोध मोहिमेत (1901-04) भाग घेतला होता. ती त्याची पहिली मोहीम, पण त्याला ती प्रकृतीने साथ न दिल्यामुळे अर्धवट सोडावी लागली. स्कॉट दक्षिणेला 82 अंशापर्यंत जाण्यात यशस्वी झाला. त्यानंतर शॅकल्टनने केलेल्या मोहिमेत ((1907-09) तो 88 अंशापर्यंत पोचला, दक्षिण धृवापासून केवळ 180 किमी! या विक्रमामुळे त्याला 'सर' ही पदवी दिली गेली. शेवटी नॉर्वेच्या आमुंडसेनने (हे नाव खूप बंगाली वाटते ना?) 1911 मधे दक्षिण धृव पादाक्रांत करून स्पर्धा जिंकली. मग शॅकल्टनने अंटार्क्टिका बर्फावरून ओलांडायची मोहीम ((1914-17) आखली. शॅकल्टनच्या महत्वाकांक्षी मोहिमेची आखणी अशी होती: मोहिमेत दोन गट आणि दोन जहाजं असणार होती. वेडेल समुद्र गटातील माणसं एंड्युरंस जहाजातून वाहसेल बे भागापर्यंत येणार होती. तिथे 14 जण उतरणार होती, त्यातले शॅकल्टन धरून 6 जण 69 कुत्र्यांसकट जवळपास 2900 किमी प्रवास करून अंटार्क्टिकाच्या दुसर्‍या टोकाला रॉस समुद्राकडे जाणार होते. दुसर्‍या गटातली माणसं अरोरा जहाजावरून रॉस समुद्राकडे जाणार होती. तिथे उतरून ते बिअर्डमोर हिमनदीवर तळ उभारून दुसर्‍या गटाची वाट पहाणार होते. या मोहिमेचा नकाशा चित्र-1 मधे आहे. मोहिमेचा नकाशा
चित्र-1: मोहिमेचा नकाशा

असल्या धाडशी आणि अति खर्चिक मोहिमा करायच्या कल्पना या लोकांना कशा सुचतात व त्यांना पैसे देणार्‍यांना त्यातून काय मिळायची अपेक्षा असते असे प्रश्न माझ्या मध्यमवर्गीय भारतीय मनाला नेहमी पडतात. पण ते इकडे कुणाला पडत नाहीत हे आत्तापर्यंत झालेल्या व अजूनही चालू असलेल्या मोहिमांवरून अगदी उघड आहे. यासाठी एकूण 50,000 पाऊंड (त्या काळातले) लागतील असा अंदाज होता. शॅकल्टनला सरकारकडून 10,000 मिळाले, उरलेले त्याने सधन व्यापार्‍यांकडून जमवले. या मोहिमेसाठी माणसं मिळवण्यासाठी शॅकल्टनने खालील जाहिरात दिली असं ऐकिवात आहे, पण त्या जाहिरातीचा काही पुरावा उपलब्ध नाही. "माणसं हवीत: अत्यंत धोकादायक मोहिमेसाठी, कमी पगार, अतिप्रचंड थंडी, पूर्ण अंधाराचे लांब महिने, कायमची संकटं, परतीच्या प्रवासाच्या यशाची खात्री नाही. यश मिळाले तर मात्र कीर्ती व सन्मान ! -- सर अर्नेस्ट शॅकल्टन" अशा आत्मघातकी मोहिमेत भाग घेण्याचा वेडेपणा कोण करेल? पण हाही प्रश्न इकडे पडत नाही कुणाला! शॅकल्टनकडे या मोहिमेसाठी 5000 लोकांनी अर्ज केला, त्यातला एका अर्ज तीन मुलींनी मिळून केला होता. शॅकल्टनला कामातल्या कौशल्याइतकंच स्वभाव, चारित्र्य व प्रवृत्ती महत्वाची होती म्हणून तो मुलाखतीत तर्‍हेवाईक प्रश्न विचारायचा.. रेगिनाल्ड जेम्स या पदार्थवैज्ञानिकाला तुला गाता येतं का असं त्यानं विचारलं. विल्यम बेकवेल व त्याचा मित्र पर्सी ब्लॅकबरो या दोघांनी पण अर्ज केले होते. पण त्यातल्या फक्त विल्यमला घेतल्यामुळे पर्सी कुणाच्याही नकळत एंड्युरंस जहाजावर घुसला. केवढी ती हौस! प्रत्येक गटासाठी 28 अशी एकूण 56 माणसं झाली, पर्सी धरून! मोहिमेची सुरुवात व्हायच्या काही दिवस आधी पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. तेव्हा शॅकल्टनने बरेच महिने खपून उभारलेली मोहीम गुंडाळून जमवलेली माणसं जहाजांसकट सरकारला युद्धासाठी देऊ केली. पण त्यावेळचा फर्स्ट लॉर्ड ऑफ अ‍ॅडमिराल्टी, विन्स्टन चर्चिलने उदार मनाने त्याला मोहिम पुढे नेण्याची परवानगी दिली. अशारितीने शेवटी एंड्युरंस जहाज प्लिमथ बंदरातून 8 ऑगस्ट 1914 रोजी निघाले. 5 नोव्हेंबरला दक्षिण जॉर्जिया येथील ग्रिटविकन या देवमाशांच्या शिकार केंद्रात पोचल्यावर, बर्फ कमी होण्यासाठी, तिथे एक महिनाभर मुक्काम केला. तरीही त्याला भरपूर बर्फ लागल्यामुळे प्रवास अगदी संथ व जिकीरीचा होऊ लागला. जितके ते दक्षिणेला सरकत होते तितकी बर्फाची स्थिती गंभीर होत होती. शेवटी, 18 जानेवारी 1915 ला एंड्युरंस जहाज बर्फात चहूबाजुंनी अडकले. बर्फ फोडून जहाज सोडविण्याचा प्रयत्न फोल झाला. काहीच करता येत नसल्यामुळे अगतिकपणे सगळे जहाजावर उन्हाळ्याची वाट पहात राहीले व जहाज बर्फाबरोबर हळूहळू उत्तरेला सरकत राहीले. बर्फाच्या असह्य दाबामुळे शेवटी जहाजाची स्थिती नाजुक झाली. एंड्युरंसची स्थिती काय झाली होती ते चित्र-2 मधे दिसेल. 27 ऑक्टोबरला पाणी आत झिरपायला लागल्यावर मात्र शॅकल्टनने जहाज सोडायचा निर्णय घेतला. सर्व सामान बर्फावर हलवले गेले तेव्हा तापमान -26 °C होते. 21 नोव्हेंबरला एंड्युरंस बुडाले. एंड्युरंसची स्थिती
चित्र-2: एंड्युरंसची स्थिती

एंड्युरंसच्या अंतानंतर मात्र शॅकल्टनने रॉस समुद्राकडे जाणं रद्द करून माणसं मृत्युपासून वाचविण्यावर लक्ष केंद्रित करायचं ठरविलं. त्याच्या माहितीप्रमाणे उत्तरेला काही बेटांवर त्यांना खाद्यपदार्थाचे साठे मिळण्याची शक्यता होती. पॉलेट बेट, स्नो हिल बेट व रॉबर्टसन बेट ही ती बेटं होती जिथे पूर्वी झालेल्या मोहिमांच्या आणीबाणी साठी केलेले साठे ठेवले गेले होते. यातल्या एका बेटावर पोचल्यानंतर ग्रॅहॅम लॅंड ओलांडून पुढे विल्हेमिना बे ठिकाणच्या देवमाशांच्या शिकार केंद्रात जायचं असं ठरवलं. तिथून त्यांना पुढील प्रवासासाठी मदत मिळाली असती. त्यांच्या आकडेमोडीप्रमाणे एंड्युरंस सोडलेल्या जागेपासून पॉलेट बेट 557 किमी अंतरावर तर स्नो हिल बेट 500 किमी वर होते. तिथून विल्हेमिना बे पुढे अजून 190 किमी लांब होता. दोन लाईफबोटी स्लेजवर टाकून 30 ऑक्टोबरला त्यांनी कूच केलं. पण थोडा देखील बर्फाचा पृष्ठभाग सपाट नसल्याकारणाने प्रवास अत्यंत कष्टाचा व मंदगतीने झाला. तीन दिवसात जेमतेम 3 किमीच अंतर कापले गेल्यामुळे चालत जाण्याची कल्पना रद्द केली गेली. त्या ऐवजी त्यांनी त्या हिमनगावर तळ ठोकला आणि हिमनगाच्या गतीने हळूहळू सरकत राहीले. 17 मार्च 1916 ला ते पॉलेट बेटाच्या अक्षांशावर पण 97 किमी पूर्वेला होते. पण लाईफबोटीतून मधले हिमनग चुकवत चुकवत तिथे पोचायला फारच वेळ लागला असता म्हणून ते हिमनगाबरोबर जात राहीले. पॉलेट बेट मागे पडल्यामुळे त्यांचं पुढचं लक्ष्य होतं एलेफंट बेट किंवा क्लॅरेंस बेट! पण या दोन्ही बेटांकडे देवमाश्यांच्या शिकारी बोटी जात नसल्यामुळे शॅकल्टनला तिकडे जाण्यात रस नव्हता. त्या ऐवजी त्याला साउथ शेटलंड बेटांकडे जायचं होतं. पण त्याच्या हातात फारसं काही नव्हतं. 8 एप्रिलला त्या हिमनगाचे दोन तुकडे झाल्यावर पुढील प्रवास लाईफबोटीतून करण्याचा निर्णय घेतला. 9 एप्रिलला बोटी पाण्यात घातल्या पण त्या बर्फाच्या छोट्या मोठ्या तुकड्यांनी सतत घेरलेल्या राहिल्या. शेवटी 15 एप्रिलला अथक प्रयत्नानंतर ते कसेबसे एलेफंट बेटावर पोचले. जिथे ते पोचले तो किनारा फारसा सुरक्षित न वाटल्यामुळे त्यांनी त्यांचा तळ 11 किमी पश्चिमेला हलवला. शॅकल्टनच्या गटाचा एकूण प्रवास कसा कसा झाला त्याचा नकाशा चित्र-3 मधे दिसेल. प्रवासाचा नकाश
चित्र-3: प्रवासाचा नकाशा

गटातल्या बर्‍याच जणांच्या खालावलेल्या प्रकृतीमुळे शॅकल्टनने त्या सगळ्यांना घेऊन मदत मिळू शकेल अशा दुसर्‍या जवळच्या बेटावर जायचा बेत रद्द केला. त्या ऐवजी फक्त काही लोकांना घेऊन पूर्वेकडे 1100 किमी असलेल्या दक्षिण जॉर्जिया, जिथे ते येताना थांबले होते तिथे, जाऊन मदत मिळवायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी एका लाईफबोटीची डागडुजी करून ती त्या लांबच्या प्रवासाला शक्य तितकी टिकेल अशी सुधारली. शॅकल्टन धरून 6 जणांनी 24 एप्रिलला कूच केलं. बरोबर फक्त महिनाभर पुरेल इतकीच सामग्री होती. कधी वल्ही मारत तर कधी वार्‍याची मदत घेत बर्फाइतकं थंडगार पाणी सतत अंगावर घेत घेत एकदाचे ते दक्षिण जॉर्जियाच्या किंग हाकोन बे इथे 10 मे रोजी टेकले. दुर्देवाने हे ठिकाण त्यांना जिथं जायचं होतं, ग्रिटविकन, त्याच्या बरोबर विरुद्ध टोकाला स्ट्रॉमनेस बे मधे होतं. आता त्यांच्या पुढे दोनच पर्याय होते. एक म्हणजे, परत बोटीत बसून बेटाला वळसा घालून तिकडे जायचं व दुसरा म्हणजे, पायी मधले डोंगर पार करून पलिकडे जायचं. त्यांच्यातल्या दोघांची खालावलेली प्रकृती व बोटीची एकूण दुर्दशा पाहून शॅकल्टनने चालत जायचा निर्णय घेतला. 19 मेला पहाटे 2 वाजता शॅकल्टनने वोर्सली व क्रीन या दोघांना बरोबर घेऊन प्रयाण केलं. बाकीचे तिघे तिथेच थांबले. प्रवासाला जाण्याआधी बर्फात पाय घसरू नयेत म्हणून त्यांनी त्यांच्या बुटाच्या तळव्यांना स्क्रू बसवले. दुसर्‍या दिवशी संध्याकाळ पर्यंत ते 3000 फूट उंच डोंगरावर आले. रात्र जवळ येऊ लागल्यावर तापमान झपाझप खाली जायला लागलं व दाट धुक्यामुळे काहीही दिसेना झालं. त्यांना लवकरात लवकर त्या डोंगराच्या पायथ्याशी जाणं भाग होतं नाही तर ते नक्की गारठून मेले असते. प्रथम त्यांनी डोंगर उतारावर पायर्‍या खणत खाली उतरायचा प्रयत्न केला पण लवकरच त्यातला फोलपणा शॅकल्टनच्या लक्षात आला. चित्र-4 मधे डाव्या बाजुला किंग हाकोन बे व उजवीकडे स्ट्रॉमनेस बे दिसतील. शॅकल्टन वोर्सली व क्रीन यांचा ट्रेक
चित्र-4: शॅकल्टन वोर्सली व क्रीन यांचा ट्रेक

यापुढे जे त्याने ठरवलं व केलं त्याबद्दल मला त्याचं कौतुक वाटतं तसंच प्रचंड आदर पण! त्यांनी त्यांच्या जवळच्या दोरखंडाची गुंडाळी करून तीन छोट्या बैठकी बनवल्या. सगळ्यात पुढच्या बैठकीवर शॅकल्टन बसला, त्याच्या मागे वोर्सली व त्याच्या मागे क्रीन. वोर्सलीचे पाय शॅकल्टनच्या कमरेभोवती तसंच क्रीनचे वोर्सलीच्या कमरेभोवती होते. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता त्या तिघांनी त्या दाट धुक्याने भरलेल्या अंधारी उतारावरून झोकून दिले. पुढे काय वाढुन ठेवलंय याची तमा न बाळगता! कदाचित ते एखाद्या कड्यावरून खोल दरीत कोसळून मेलेही असते. कदाचित मधल्या एखाद्या मोठ्या दगडावर आपटले असते व हातपाय मोडुन तिथेच खितपत पडले असते. प्रचंड वेगाने खाली घसरत जाऊन ते सुरक्षितपणे पायथ्याशी पोचल्यावर त्यांनी आनंदाने हस्तांदोलन केले. नंतर शॅकल्टन इतकंच म्हणाला 'अशी गोष्ट नेहमी करणं फारसं योग्य नाही'. सगळे प्रचंड दमले होते तरी त्यापुढे अथक प्रवास करत करत एकूण 36 तासात त्यांनी जवळपास 40 किमी अंतर कापून शिकार केंद्रात पाय ठेवला. तेव्हा त्यांना 18 महिन्यात प्रथमच इतर माणसांचं दर्शन झालं व आवाज ऐकायला मिळाले. पुढे फारसा वेळ न घालवता त्यांनी बेटाच्या दुसर्‍या टोकाला अडकलेल्या तीन माणसांची सुटका 21 मे च्या संध्याकाळ पर्यंत केली. एलेफंट बेटावर अडकलेल्यांची सुटका करायला मात्र वेळ लागला. खराब हवामान, खवळलेला समुद्र व समुद्रातला बर्फअशा कारणांनी त्यांचे पहिले 3 प्रयत्न फोल ठरले. शेवटी, 30 ऑगस्टला त्यांच्या चौथ्या प्रयत्नाला यश येऊन इतरांची सुटका झाली. या सफरीत 28 पैकी एकही माणूस दगावला नाही ही विशेष नमूद करण्याची गोष्ट आहे. शॅकल्टन, वोर्सली व क्रीन यांच्या 36 तासांच्या खडतर प्रवासाची पुनरावृत्ती 100 वर्षानंतर केली गेली. त्याचा एक व्हिडिओही बनवला. तो शेवटचे 36 इथे बघता येईल. नुकतेच सापडलेले एंड्युरंस
चित्र-5: नुकतेच सापडलेले एंड्युरंस

तळटीप: या लेखातील सर्व चित्रे नेटवरून साभार!
संदर्भ/क्रेडिट्स :-
--------
1) https://en.wikipedia.org/wiki/Ernest_Shackleton
2> https://en.wikipedia.org/wiki/Imperial_Trans-Antarctic_Expedition
3> https://www.history.com/news/shackleton-endurance-survival?cmpid=email-hist-inside-history-2022-0309-03092022&om_rid=&~campaign=hist-inside-history-2022-0309 : इथे शॅकल्टनच्या फोटोग्राफरचे मूळ फोटो बघता येतील.
4> https://www.britannica.com/biography/Ernest-Henry-Shackleton : प्रवासाचा नकाशा

-- समाप्त --

Friday, October 16, 2020

महाराजाची विहीर

इंग्लंड मधील काही भू-प्रदेशांना उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्यानं नटलेले भू-प्रदेश ( Area of Oustanding Natural Beauty) असा दर्जा इथल्या सरकारने दिलेला आहे. ऑक्सफर्डच्या जवळ असे दोन भू-प्रदेश आहेत.. कॉट्सवोल्ड आणि चिल्टर्न! छोटे छोटे हिरवेगार डोंगर, हिरव्या रंगाच्या विविध छटांची झाडं, मधेच वहाणारी एखादी नदी आणि रमणीय शेतं या नेहमीच्याच गोष्टी विविध बाजुंनी वेगवेगळ्या कोनांमधून इतक्या विलोभनीय दिसतात की तिथून हलावसं वाटत नाही. दोन्ही प्रदेशात बरीच छोटी छोटी सुंदर गावं वसलेली आहेत. मी त्यातल्याच चिल्टर्न भागातील हेंली-ऑन-थेम्स या थेम्स नदीवर वसलेल्या गावाला भेट द्यायला जायचं ठरवलं. ऑक्सफर्ड पासून हे केवळ 25 मैलांवर ( 40 किमी) असल्यामुळे जायला फार वेळ लागणार नव्हता. मार्गी लागल्यावर हेंली गावाच्या अलिकडे रस्त्यातील एका पाटीने लक्ष वेधलं (चित्र-1 पहा). रस्त्यावरची पाटी
चित्र-1: रस्त्यावरची पाटी

तपकिरी रंगाच्या पाटीवर 'Maharajah's Well' असं वाचल्यावर मी नक्की चुकीचं वाचलं याची मला खात्रीच होती. इकडे प्रेक्षणीय स्थळांच्या पाट्या तपकिरी रंगाच्या करण्याची पद्धत असल्यामुळे बघू या तरी हे एक काय आहे ते असा विचार करून मी पटकन गाडी तिकडे वळवली व स्टोक रो या गावात ठेपलो. तिथे जे काही पाहीलं आणि वाचलं ते सगळंच कल्पनेच्या पलिकडलं आणि आत्तापर्यंतच्या माझ्या समजुतीला तडा देणारं निघालं. नंतर मी त्या बद्दल नेट वरतीही वाचलं त्याचा सारांश पुढे देतो आहे. बनारसचे महाराज श्री ईश्वरी प्रसाद नारायण सिंग (1822-1889) व त्या वेळचा अ‍ॅक्टिंग गव्हर्नर जनरल एडवर्ड रीड यांची चांगली मैत्री होती (चित्र-2 पहा). हा काळ साधारणपणे 1857 च्या नंतरचा आहे. दोघांच्या बर्‍याच वेळा गप्पाटप्पा चालायच्या. रीडने तेव्हा राजाच्या नागरिकांसाठी एक विहीर बांधली होती. तो चिल्टर्न भागातल्या इप्सडेन गावात 1806 साली जन्माला आला. नंतर 1828 साली भारतात आल्यावर वेगवेगळ्या हुद्यांवर काम करत करत 1860 मधे, तब्बल 32 वर्षं भारतात घालवल्यावर, निवृत्त होऊन परत इप्सडेन मधे येऊन रहायला लागला. भारतात तो स्थानिक लोकांशी मिळून मिसळून रहायचा व त्याने भारतीय भाषातील प्राविण्याबद्दल सुवर्णपदक पण मिळवलं होतं. भारतीय लोकांना त्याच्याबद्दल आपुलकी वाटण्याचं हे सुद्धा कारण असू शकेल. तो लहानपणी स्टोक रो गावाजवळ चेरी गोळा करायला यायचा. इप्सडेन पासून स्टोक रो फार लांब नाही.. सुमारे 4 मैल (6 किमी) अंतर आहे. चिल्टर्नच्या या भागात उन्हाळ्यात नेहमी पाण्याची टंचाई असे त्या काळी! थेम्स नदी जरी या भागातून वहात असली तरी ती दररोज पुरेसं पाणी सहजपणे आणण्याइतकी जवळ नव्हती. एकदा तो चेरी आणायला आलेला असताना त्याला एक बाई तिच्या लहान मुलाला त्यानं घरातलं शेवटचं पाणी पिऊन संपवलं म्हणून मारताना दिसली. त्यानं मधे पडायचा प्रयत्न केल्यावर त्या बाईने त्याला पण बदडायची धमकी दिली. ही गोष्ट त्याने एकदा राजाला सांगितल्यावर राजानं त्यांच्या मैत्रीखातर व रीडने राजाला केलेल्या मदतीची परतफेड म्हणून स्वखर्चानं त्या भागात विहीर बांधायचं ठरवलं. महाराज श्री ईश्वरी प्रसाद नारायण सिंग
चित्र-2: महाराज श्री ईश्वरी प्रसाद नारायण सिंग

स्टोक रो गावातली ही विहीर बांधायला 14 महिने लागले व ती मे 1864 मधे खुली झाली. 368 फूट खोल व 4 फुट व्यासाची ही विहीर बांधायला तेव्हा 353 पौंड 13 शिलिंग व 7 डाईम खर्च आला. विहिरीवरचा रहाट व त्या वरील सुंदर घुमट बांधायला आणखी 39 पौंड व 10 शिलिंग लागले. चित्र 3, 4 व 5 मधे विहीर, रहाट व बाजूचा परिसर दिसेल. रहाटावरचा हत्ती 1870 मधे बसवला. नुसती विहीर बांधून राजा थांबला नाही तर त्यानं विहीरीची देखभाल करणार्‍या माणसाला रहाण्यासाठी एक घर पण बांधलं (चित्र 6). विहिरीजवळील चार एकर चेरीची बागही राजाने घेऊन विहिरीच्या परिसरात समाविष्ट केली. महाराजाची विहीर व परिसर
चित्र-3: महाराजाची विहीर व परिसर

महाराजाची विहीर
चित्र-4: महाराजाची विहीर

रहाट व त्यावरील सोनेरी हत्ती
चित्र-5: रहाट व त्यावरील सोनेरी हत्ती

विहीर रक्षकाचं घर
चित्र-6: विहीर रक्षकाचं घर

विहीरीची माहिती
चित्र-7: विहीरीची माहिती

विहीरीचा विश्वस्त म्हणून रीडने त्याच्या उतारवयापर्यंत काम पाहीलं. या विहीरीचा वापर नागरिकांनी अगदी दुसर्‍या महायुद्धापर्यंत केला. 1961 मधे राजाच्या वंशजांने एलिझाबेथ राणीला विहीरीची प्रतिकृती भेट दिली. त्या नंतर तिची डागडुजी करून 1964 साली विहीरीची शताब्दी देखील साजरी केली. त्या साठी राणीचा नवरा प्रिंस फिलिप व राजाचे प्रतिनिधित्व करणारे काही जण हजर होते. त्या वेळी एका कलशातून आणलेलं गंगेचं पाणी विहीरीच्या पाण्यात मिसळलं गेलं. चार्लस व डायानाच्या1981 सालच्या विवाहाची स्मृतीचिन्हं विहीरीच्या पायात त्याच साली बसवली गेली. या विहीरीची अधुन मधून डागडुजी करून ती आणि परिसर स्वच्छ व नीटनेटका ठेवला जातो. 2014 साली या विहीरीला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त एक समारंभ पण झाला. या विहीरीला आता ग्रेड-2 लिस्टेड बिल्डिंगचा दर्जा प्राप्त झाला आहे. 

या विहीरीने श्रीमंत भारतीय आणि राजे यांच्यात एक नवीनच पायंडा पाडला. त्यातून इंग्लंडमधे अजून काही विहिरी ( त्यातली एक इप्सडेन मधे पण झाली) तसंच लंडन मधे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. एक पिण्याच्या पाण्याची टाकी सर कोवास्जी जहांगीर(त्याचं रेडी मनी हे टोपणनाव होतं) या एका श्रीमंत पारशाने लंडनच्या रिजंट नामक प्रसिद्ध बागेत बांधली. इथे त्याची माहिती व चित्र पाहू शकता. अशी या विहिरीची कहाणी दोन कारणांमुळे अनोखी वाटते! एक म्हणजे, आपल्याला नेहमी परदेशी लोकांनी भारतात दानधर्म केल्याच्या कहाण्या ऐकायला मिळतात. मग भारतीयांनी परदेशात इतक्या जुन्या काळी ते सुद्धा देश पारतंत्र्यात असताना केलेले दानधर्म परिकथाच म्हणायला पाहीजे! दुसरं कारण म्हणजे इंग्रजी महासत्तेला चिल्टर्न या लंडन जवळच्या भागातल्या पाण्याच्या दुर्भिक्षाबद्दल नक्कीच माहिती असली पाहीजे आणि त्यांनी त्या बद्दल काहीही केलं नाही. विहीर बांधायचा खर्च सरकारला सहज परवडण्यासारखा होता. इंग्रजांचं राज्य भारतावर होतं तरीही त्यांना एका राजाकडून दान स्विकारताना काही अपमान किंवा मानहानी वगैरे वाटली नाही. तसंच नंतर हा इतिहास दडपण्याचा प्रयत्न पण झाले नाहीत. उलट, ही विहीर पर्यटकांचं आकर्षण होण्यासाठी सर्व काही केलं गेलं. 

तळटीप: या लेखातील सर्व चित्रे नेटवरून साभार! 

-- समाप्त --

Monday, March 30, 2020

आधुनिक कुटुंब!

बीबीसी वर आलेला हा एक सत्य घटनांवर आधारित लेख आहे. भविष्यात काय प्रकारची कुटुंब व्यवस्था असू शकेल याची थोडी कल्पना या लेखामुळे येते. युके बाहेर कदाचित तो न दिसण्याची शक्यता आहे म्हणून त्याचा सारांश इथे देतोय.

ही कहाणी जेसिका शेअर नामक अमेरिकेतील मिडवेस्ट भागात रहाणार्‍या एका स्त्रीची आहे. तिचे दुसर्‍या एका स्त्री बरोबर लेस्बियन संबंध असताना त्या दोघिंनी मुलं होऊ देण्याचा निर्णय घेतला. त्याही पुढे जाऊन दोघींनी 4 मुलं होऊ देण्याचं ठरवलं व त्यांची नावं काय असतील तेही ठरवलं. लेखात दुसर्‍या स्त्रीचं नाव दिलेलं नसल्यामुळे आपण तिला रिटा म्हणू. कृत्रिम गर्भधारणेसाठी कुणाचं तरी वीर्य मिळवणं गरजेचं होतं. रिटानं तिच्या बहिणीच्या नवर्‍याचं नाव सुचवलं. जेसिका तेव्हा विद्यापीठात शिकत होती. शिकता शिकता तिने 'गे व लेस्बियन यांचे कायदेशीर हक्क' अशा एका विषयाचाही अभ्यास केला. त्यातून तिला असं समजलं की वीर्य कुणाचं आहे हे माहिती असेल तर त्याचा पुढे त्रास होऊ शकतो. जर पुढे मागे जन्मदात्या स्त्रीचं निधन झालं तर मुलांचा ताबा त्या माणसाकडे जाऊ शकतो. असे निर्णय पूर्वी न्यायालयात झालेले आहेत. तसं झालं तर मुलांना एका अनोळखी माणसाबरोबर रहावं लागतं आणि ते जेसिकाला पटलं नाही. कर्मधर्म संयोगाने तिला एका स्पर्म बॅंकेची माहिती मिळाली जिथे वीर्य देण्यापूर्वी पुरुषांना एक करार करावा लागतो ज्यामुळे त्यांना आयुष्यात कधीही त्यांच्यामुळे झालेल्या मुलांचा ताबा मागता येत नाही.

जेसिका तेव्हा घरी बसून डॉक्टरेटसाठी प्रबंध लिहीण्याचं काम करीत असल्यामुळे पहिलं मूल तिनं जन्माला घालायचं ठरलं. त्या आधी त्या दोघींचं लग्न होऊन रिटा जेसिकाची कायदेशीर पत्नी झाली होती. (दोन पुरुषांचं किंवा दोन स्त्रियांचं लग्न झालं तर त्यातला (त्यातली) एक नवरा आणि दुसरा (दुसरी) बायको असते हे काय गौडबंगाल आहे हे ते मला अजून समजलेलं नाही.) वीर्यदान करणार्‍या पुरुषांचे फोटो किंवा नावगाव पत्ता इ. माहिती ग्राहकांना न देण्याचं धोरण त्या स्पर्म बॅंकेचं होतं. पण वजन, उंची, केसांचा रंग, शिक्षण, इतर आवडीनिवडी तसंच त्यांचं आत्तापर्यंतच आरोग्य अशी बाकी माहिती उपलब्ध होती. शेवटी रिटाच्या गुणविशेषाशी मिळत्या जुळत्या माणसाचं वीर्य मागवायचं ठरलं. तो माणूस साहित्यातला पदवीधर होता आणि लेखन, संगीत व टॅक्सी चालक असे त्याचे व्यवसाय असल्याचं लिहीलेलं होतं. कालांतराने, काही असफल प्रयत्नानंतर जेसिकेला गर्भ राहीला आणि यथावकाश 2005 साली अ‍ॅलिसचा जन्म झाला. ह हा प्रयोग त्या दोघींना इतका आवडला की त्यांनी तेच वीर्य परत मागवलं आणि आणखी दीड वर्षांनी रिटानं एका मुलीला जन्म दिला. तिला आपण जेनी म्हणू.

दोन्ही मुलींमधे काही गोष्टींच्या बाबतीत साम्य होतं. दोघी जास्त उंच होत्या, दोघींकडे भरपूर शब्दसंपत्ती होती आणि दोघिंची नाकं छोटी होती. अ‍ॅलिस 3 वर्षांची असताना रिटानं काहीही कारण न देता नातं तोडलं. जेसिकानं पुढील काही वर्ष दोघिंचा संभाळ केला पण अ‍ॅलिस 10 वर्षांची असताना रिटानं संपूर्ण संबंध तोडले आणि जेनीला जेसिकाकडे पाठवणंही बंद केलं. रिटा कडच्या नातेवाईकांनी म्हणजे आजी आजोबा, काका मामा आदी लोकांनी तर दोन वर्ष आधीपासूनच अ‍ॅलिसशी संबंध तोडले होते. अ‍ॅलिस दु:खी झाली. वयाच्या 11व्या वर्षी तिला तिच्या जेनेटिक हेरिटेज बद्दल कुतुहल निर्माण झालं आणि तिनं स्वत:ची डीएनए परीक्षा केली. त्याच्या निकालात तिचा डीएनए 50% अ‍ॅरन लॉंग या माणसाच्या डीएनएशी मिळत होता आणि 25% डीएनए ब्राईस गॅलो नावाच्या मुलाशी मिळत होता असं समजलं. म्हणजे अ‍ॅरन बाप असणार आणि ब्राईस सावत्र भाऊ असणार.

जेसिकाने अ‍ॅरन लॉंगचा नेटवर शोध घेतला. तिथे ढिगाने अ‍ॅरन लॉंग सापडले. मग हा अ‍ॅरन लॉंग त्यातला कुठला यावर तिनं संशोधन करायला सुरुवात केली. वीर्य मिळवायच्या वेळी मिळालेल्या माणसाच्या माहितीवरून तिला एक अ‍ॅरन लॉंग सापडला. तो सिअ‍ॅटल मधे रहात होता आणि लेखन व संगीत यातला व्यावसायिक होता. जेसिकानं अ‍ॅरनशी सोशल मिडियावर संपर्क केला आणि त्यानंही तातडीनं उत्तर दिलं. अ‍ॅरन पूर्वी जेसिकाच्याच गावात काही वर्ष रहात होता असं तिला समजलं. अगणित वेळा मॉलमधे हा माणूस आपल्या जवळून गेला असेल असं जेसिकाला वाटून गेलं.

दरम्यान जेसिकाला ब्राईसशी संपर्क करण्यात पण यश आलं. तो तेव्हा नुकताच पदवीधर झाला होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे अ‍ॅरनपासून झालेल्या 6 मुलांच्या पालकांशी त्याचा संपर्क झालेला होता. जेसिका व रिटाच्या दोन मुली धरून ती संख्या आता 8 वर गेली होती. त्यातल्या एका 19 वर्षाच्या मॅडी नावाच्या सावत्र बहिणीशी त्याचं बोलणं पण झालं होतं. त्या दोघांनी सिअ‍ॅटलला जाऊन अ‍ॅरनला भेटायचं ठरवलेलं होतं.

अ‍ॅरनने एक जंगी पार्टी आयोजित केली. पार्टीला त्याचे जुने मित्रमैत्रिणी, जुन्या गर्लफ्रेंड, त्यांचे नवीन पार्टनर व मुलं इ. सर्व होते. तिथे ब्राईस, मॅडी व अ‍ॅलिस यांची मैत्री झाली. हळूहळू जेसिका व अ‍ॅरन यांच्या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं आणि जेसिका सिअ‍ॅटलला त्याच्या घरी रहायला गेली. काही दिवसांनी मॅडी पण रहायला आली.

असे किती सावत्र बहीणभाऊ अ‍ॅलिसला असतील? अ‍ॅरनच्या अंदाजाप्रमाणे 67 तरी असावेत. कितीही असले तरी डोकं चक्रावून टाकणारं आधुनिक कुटुंब आहे हे नक्की!

(तळटीप: अ‍ॅरनच्या या प्रचंड मोठ्या कुटुंबावर 'Forty dollars a pop' नामक एक डॉक्युमेंटरी आहे. मी अजून ती पाहिलेली नाही. )

-- समाप्त --