Tuesday, December 1, 2009

नुस्ता स.दे.

"एखाद्या अनोळखी माणसाला मी दिलेलं गाणं गुणगुणताना ऐकणं यापेक्षा इतर कशानही मला जास्त आनंद होत नाही. एकदा कलकत्त्या पासून सुमारे २० मैल लांबच्या एका तलावात, एकदा मी गळ टाकून बसलो होतो. मासे पकडत बसणे हा माझा एक छंद आहे. त्यादिवशी माझं नशीब चांगलं नव्हतं.. कारण दिवसभर बसून एकही मासा मिळाला नाही. निराश होऊन मी निघणार एवढ्यात एका १० वर्षाच्या पोराने तलावात सूर मारला.. आणि तो 'तदबीरसे बिगडी हुई तकदीर बना ले' हे माझं बाझी तलं गाणं गाऊ लागला. त्याला याची कल्पनाही नसणार की हे गाणं देणारा माणूस पलिकडच्या तीरावर गळ टाकून बसलाय! तो माझ्या आयुष्यातला मला मिळालेला सगळ्यात मोठा मासा आहे.

असंच एकदा मी बांद्रा स्टेशनवर मालाडला जाण्यासाठी उभा होतो. जवळंच काही कामगार कुदळ फावड्यांच्या हालचालींच्या ठेक्यावर माझं शबनम चित्रपटातलं गाणं गात होते. ते ऐकता ऐकता मी इतका गुंग झालो की ती लोकल कधी आली अन् गेली ते मला कळलंच नाही."

हे खुद्द सचिनदेव बर्मन याचं भाष्य आहे! काही लोक त्याला एसडी बर्मन म्हणतात तर काही दादा बर्मन.. माझ्या लेखी तो 'नुस्ता सदे' आहे.. कारण त्याचं गाणं आवडलं की मी फक्त 'वाss! नुस्ता सदे!' एवढंच म्हणू शकतो.

पिया तोसे नैना लागे रे (गाईड), तेरे नैना तलाश (तलाश), सुन मेरे बंधू रे (बंदिनी), दिवाना मस्ताना हुआ दिल (बंबईका बाबू), जाने वो कैसे लोग थे जिनके (प्यासा), वक्तने किया क्या हँसी सितम (कागजके फूल), फुलोंकी रंगसे दिलकी कलमसे (प्रेमपुजारी), हम बेखुदीमें तुमको पुकारे (काला पानी), जलते हैं जिसके लिए (सुजाता), छोड दो आँचल जमाना क्या कहेगा (पेईंग गेस्ट)... अशी कितीतरी त्याची गाणी.. यातलं एक जरी ऐकलं तरी दिवसभर ते मनात घोळत रहातं.. मधेच एखादा संगीताचा तुकडा आठवतो नाहीतर एखादी ओळ आणि नकळत दाद दिली जाते.. 'वाss! नुस्ता सदे!'

लोकांच्या तोंडात पटकन बसणारी अविस्मरणीय गाणी बनवायला त्याला कसं काय जमायचं यामागे एक किस्सा आहे. १९४४ साली शशधर मुखर्जीच्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी सदे कलकत्त्याहून मुंबईला आला. रोज दुपारी जेवणानंतर मुखर्जीच्या खोलीत पेटी नेऊन नवीन रचना ऐकवणे हा त्याचा कार्यक्रम होता. मुखर्जी धुन ऐकता ऐकता डोळे मिटायचा आणि थोड्या वेळाने चक्क घोरायला लागायचा. त्याचं घोरणं हे गाणं न आवडल्याचा संकेत होता. हे प्रकरण २ महिने चाललं. मग मात्र सदेच्या सहनशक्तीचा अंत व्हायची वेळ आली.. रोज मुखर्जीला अंगाईगीत गाऊन झोपवण्यासाठी आपण मुंबईला आलो आहोत काय? असा विचार घोळू लागला.. शेवटी, या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून सदे एक दिवस त्याच्या खोलीत पेटी घेऊन गाऊ लागला.. नेहमीप्रमाणे त्यानं डोळे मिटले.. आता काय? त्या घोरण्याच्या कातिल सुरांची वाट पहायची, गाशा गुंडाळायचा आणि घरी जायचं.. अचानक मुखर्जीनं डोळे उघडले आणि म्हणाला 'तू हे गाण रेकॉर्ड करून घे. सगळ्या वादकांना बोलव आणि रेकॉर्ड कर." सदेला कळेना की इतक्या सगळ्या गाण्यातून त्यानं हेच गाणं का निवडलं? त्याचं उत्तर त्याला त्याच रात्री मिळालं.. रेकॉर्डिंग संपवून बाहेर येताना सदेनं डोअरकीपरला तेच गाणं गुणगुणताना ऐकलं.. तो नुसता गुणगुणत नव्हता तर बरोबर म्हणत होता. गाणं सर्वस्पर्शी असलं पाहीजे.. ऐकणारा उभ्या भारतात कुठेही रहाणारा असला तरी त्याला ते गाणं भावलं पाहीजे.. हे सगळं स्वतःच्या शैलीशी तडजोड न करता करायचं या मुखर्जीच्या कानमंत्रामुळेच सदेनं पुढची ३० वर्ष हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली.

सोप्पी पण कर्णमधुर चाल.. आम जनतेला आपलिशी वाटेल अशी, तरीही बाळबोध नाही.. जोडीला कमितकमी वाद्यांची समर्पक साथ.. गाण्यातले भाव आणि वातावरण उंचावणारी.. लोकसंगीताचा भरपूर वापर.. हे सदेच्या शैलीचं व्यवच्छेदक लक्षण.

गमतीची गोष्ट अशी आहे की, सदे बंगालमधे गायक म्हणून प्रसिध्द आहे तर बंगालबाहेर संगीतकार म्हणून. सदेनं फार कमी गाणी हिंदी चित्रपटात गायली.. 'माझं गाणं चित्रपटात कुणाच्याही तोंडी असता कामा नये' अशी त्याची एक अट असायची.. त्याचा आवाज कुणालाही साजेसा नव्हता हे एक कारण असेल कदाचित!.. पण सदेचं गाणं बॅकग्राउंडला असलं तर चित्रपटात मस्त वातावरण निर्मिती करून जातं. आठवा गाईडमधलं 'वहाँ कौन है तेरा'. सदेचा आवाज फार चांगला आहे असं काही मी म्हणणार नाही.. मलाही त्याचा आवाज सुरुवातीला आवडत नसे.. त्याचा आवाज बिअरसारखा आहे.. प्रथम कडू लागल्यामुळे नकोशी वाटते.. नंतर पिऊन पिऊन चटक लागते आणि नशा चढते. त्याचं गाणं आतून येतं.. पाण्याच्या प्रवाहाला असते तशी ओढ आहे त्याच्या आवाजात.. 'मेरे साजन है उस पार' मधे किती आर्जवी होतो त्याचा स्वर!

त्याच्या गाण्याच्या शैलीला भटियाली ढंग म्हणतात.. भटियाली म्हणजे बंगालचं कोळीगीत.. गाताना कुठे थोडासा कंप, कुठे एखादा तुटक सूर तर कुठे थोडासा चिरका आवाज हे भटियाली ढंगाचं वैशिष्ट्य! 'सफल होगी तेरी आराधना' हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.. सुरुवातीच्या 'बनेगी आशा एक दिन तेरी ये निराशा' या ओळीतला 'आशा' शब्द कसा म्हंटलाय ते ऐका. ही शैली त्यानं फकीर, बैरागी, पीर, भिकारी किंवा घरातले नोकर अशासारख्यांची अनेक गाणी ऐकून आत्मसात केली. त्यांची गाणी ऐकूनच तो बहुश्रुत झाला असं म्हणायला पाहीजे. 'इतकी वर्ष मी गाणी दिली तरी तो लोकगीतांचा साठा अजून संपलेला नाही' असं एकदा सदे म्हणाला होता.

सदेची काही बंगाली गाणी मला इथे सापडली: - 'सदेनं गायलेली बंगाली गाणी.' यातली काही गाणी नंतर हिंदीत आली. ती मूळ गाणी ऐकताना सदेची स्वतःची खास शैली जाणवते.. भाषा समजत नसली तरी मी ती परत परत ऐकून 'वाss! नुस्ता सदे!' करत राहीलो.

१. बार्ने गंधे छंदे - फुलोंकी रंगसे दिलकी कलमसे (किशोर, प्रेम पुजारी)
२. मानो दिलोना बधु - जाने क्या तूने कही (गीतादत्त, प्यासा)
३. घुम भुलेशी - हम बेखुदीमें तुमको (रफी, काला पानी)
४. कांदिबोना फागुन गेले - अबके ना सावन बरसे (लता, किनारा) हे पंचमने दिलेलं गाणं.

त्याचा जन्म (१ ऑक्टोबर १९०६) जरी त्रिपुरेच्या एका राजघराण्यात झाला होता तरी त्याच्या वडिलांनी त्याच्या सामान्य लोकांबरोबरच्या मैत्रीला कधीच आक्षेप घेतला नाही. वडिलांच्या सतार वादनामुळे त्याला संगीताची गोडी लागली ती कायमचीच! १९२४ मधे बीए झाल्यावर एमए करायच्या ऐवजी त्यानं संगीताचं शिक्षण घेणं सुरू केलं. के. सी. डे (मन्ना डे चे काका) सारख्या काही बड्या लोकांकडे तो शिकला. १९३० साली वडील गेल्यावर सदेचा फार मोठा आधार गेला. तो स्वतः उत्तम तबला आणि बासरी वाजवायचा. त्याच्या बहुतेक गाण्यात बासरी कुठेतरी हजेरी लावून जाते त्याच हे एक कारण असेल. १९३२ साली त्याची पहिली गाण्याची रेकॉर्ड बंगालमधे तुफान लोकप्रिय झाली. १९३८ साली मीरा नावाच्या गायिकेशी त्याचा विवाह झाला आणि १९३९ मधे राहुलदेव उर्फ पंचम चा जन्म झाला. मीरा राजघराण्यातील नसल्याने लग्नाला घरून खूप विरोध झाला. शिवाय राजघराण्याच्या लौकिकाला त्याच्या पेशामुळे बट्टा लागतो असा आरोप सतत व्हायचा. या सगळ्याचं पर्यवसान घराण्याचे संबंध तोडण्यात झालं. आज हे राजघराण सदेमुळं ओळखलं जातं.

१९४४ पर्यंत त्याची अनेक बंगाली गाणी गाजली. त्यानंतर त्यानं मुंबईत पाऊल ठेवलं. सुरुवातीच्या दोन तीन चित्रपटातली गाणी चांगली झाली तरी लोकांच्या मनात म्हणावा तेव्हढा तो ठसला नव्हता. याच कारणामुळे त्यानं कलकत्त्याला परत जायचा निर्णय घेतला. अशोककुमारने 'मशाल चित्रपटाला संगीत दे आणि मग काहीही कर' अशी गळ घातल्यावर त्यानं थोडं थांबायचं ठरवलं. मशालला अभूतपूर्व यश मिळालं आणि त्यानंतर त्याच्या मृत्युपर्यंत (३१ ऑक्टोबर १९७५) त्यानं अनेक अविस्मरणीय हिंदी गाणी दिली.

एक राजपुत्र असूनही त्याचं वागणं बोलणं अगदी साधं होतं.. त्यात माज किंवा ऐट नव्हती.. धोतर कुडता आणि अंगावर एक शाल असा साधा वेष असायचा.. कुडत्याला असलेली सोन्याची बटणं हीच त्यातल्या त्यात राजघराण्याची खूण! कधी हट्टीपणा करणारा तर कधी लहान मुलासारखा वागणारा सदे कायम संगीतात बुडालेला असायचा. बरीच गाणी त्याला मासे पकडताना नाहीतर चालत फिरताना सुचलेली आहेत. त्याचं संगीत त्यामुळेच इतकं उत्स्फुर्त वाटतं. गाणं चांगलं झालं की खूष होऊन गायकाला किंवा गायिकेला तो त्याचं खास पान बक्षीस म्हणून द्यायचा.

कुठल्या गायकाचा आवाज कुठल्या गाण्याला चांगला वाटेल याबद्दल त्याचे स्वतःचे आडाखे होते.. पडद्यावर कुठला हिरो ते गाणार आहे ही बाब त्याच्या दृष्टीने दुय्यम असायची.. म्हणूनच देव आनंदला किशोर, रफी किंवा हेमंतकुमार यांनी आवाज दिला आहे.. तसंच अमिताभलाही रफी, किशोर आणि मनहर यांचा आवाज अभिमान मधे आहे. गाण्यात वाद्यांपेक्षा तो गायकाचा आवाज आणि गाणं कसं गायला पाहीजे यावर जास्त भर द्यायचा. 'छोड दो आँचल' मधला 'हाs' किंवा 'रात अकेली है' मधली कुजबुजत्या स्वरात होणारी सुरुवात हा खास सदे टच.

देव आनंदचं नवकेतन सदेशिवाय दुसर्‍या कुणालाही संगीतकार म्हणून घेत नसे. सदे आजारी होता म्हणून देव आनंदनं गाईड काही महीने पुढे ढकलला.. इतरानी बराच पाठपुरावा केला तरीही. आणि सदेनंही उत्कृष्ठ संगीत देऊन त्याचा विश्वास सार्थ ठरवला.. पण दुर्देवाने गाईडला संगीताचं फिल्मफेअर नाही मिळालं. आनंदबंधू आणि सदे चांगलं संगीत होण्यासाठी किती झगडायचे याचा एक किस्सा आहे.. गाईडसाठी रफीचं एक गाणं रेकॉर्ड झालं.. गाणं ऐकल्यावर देव आणि गोल्डी यांना ते मुळीच आवडलं नाही.. त्यानी सदेला फोन करून तसं सांगीतलं.. सदेनं तेच गाणं त्या प्रसंगाला योग्य आहे म्हणून फोन ठेऊन दिला.. अर्ध्या तासाने सदेनं फोन करून सांगीतलं की "तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे. मी उद्या सकाळी येतो आणि नवीन धुन ऐकवतो." सकाळी सदेनं येऊन 'दिन ढल जाए' ची धुन ऐकवताच दोघे खूष झाले. ताबडतोब शैलेंद्रला बोलावलं आणि त्यानं ५ मिनिटात त्या गाण्याचा मुखडा लिहीला. आधी चाल मग गीत ही प्रथा सदेनंच सुरू केली. ती फक्त प्यासासाठी मोडली कारण त्यात शब्दांना जास्त महत्व आहे हे त्याला मनोमन पटलं म्हणून.सदे वर्षाला ४/५ चित्रपटापेक्षा जास्त काम क्वचितच अंगावर घ्यायचा.. तेही चित्रपटाची कथा ऐकल्यावर आपण याला न्याय देऊ शकू असं सदेला वाटलं तर! 'हरे रामा हरे कृष्णा चित्रपटाचं संगीत मला जमणार नाही, त्यापेक्षा पंचम चांगलं संगीत देईल' असं सदेनं देव आनंदला निक्षून सांगीतलं. तरीही देवने 'ठीक आहे, पंचमला संगीत देऊ दे. पण तू मुख्य संगीतकार रहा' अशी तडजोड सुचवली. त्यालाही सदेनं ठाम नकार दिल्यावर देवचा नाईलाज झाला. पण जेवढं काम सदे अंगावर घ्यायचा ते मात्र मन लावून करायचा.. गाईड च्या चित्रीकरणासाठी सगळे जयपूरला जायची वेळ झाली तरी सदेचं गाणं तयार नव्हतं.. 'तू माझ्यावर विश्वास ठेव. मी असं गाणं पाठवेन जे सगळ्या जगाच्या लक्षात राहील.' असं सदेनं देवला पटवलं. थोड्याच दिवसानंतर त्यानं 'आज फिर जीनेकी तमन्ना है' पाठवलं. या गोष्टीची पुन्हा एकदा पुनरावृत्ती झाली त्यावेळेला चित्रपट होता 'ज्युवेल थीफ' आणि गाणं होतं 'होठोंपे ऐसी बात'!

गाण्यातल्या तालवाद्याला एखाद्या तंतुवाद्याची साथ देऊन तालाचा नाद वाढवायचा ही एक सदेची खासियत! 'सुन मेरे बंधु', 'मेरी दुनिया है माँ (तलाश)' यात तालवाद्या बरोबर एक तंतुवाद्य सतत वाजलेलं ऐकू येईल. कधी गाण्याची चाल त्यातल्या तालाबरोबर अशी मस्त झुलते की त्याबरोबर आपण पण झुलायला लागतो.. 'खायी है रे हमने कसम (तलाश)', 'खोया खोया चाँद' मधील कडव्याची चाल, 'दीवाना मस्ताना हुआ दिल' मधील कडव्याची चाल, 'मोरा गोरा अंग लैले', 'तेरे नैना तलाश', 'फुलोंकी रंगसे', 'लिखा है तेरी आँखोमे' अशी काही उदाहरणं आहेत त्याची.

सदेच्या बहुतेक गाण्यात थोडीच वाद्य वाजतात पण उत्तम वातावरण निर्मिती करतात. 'दिल पुकारे' चं सुरुवातीचं संगीत आपल्याला घरातून उचलून थेट डोंगरदर्‍यात घेऊन जातं. गाईड मधलं 'पिया तोसे' हा त्याला अपवाद म्हणावा लागेल. खमाज मधे बांधलेल्या या गाण्यात विविध प्रकारची वाद्य कुठेही कर्कशपणा न जाणवता अचूक परिणाम साधलाय. हे गाणं तब्बल ८ मिनीटाचं आहे.. पण सीडीवर विकत मिळणारं गाणं निम्मच आहे.. 'मूळ ८ मिनिटांचं गाणं.'

सदे गेल्यावर किशोरने एक खास रेडिओ प्रोग्रॅम करून त्याला श्रध्दांजली वाहिली. त्यात त्याच्या काही गमती जमती सांगीतल्या त्याची नक्कल करत.. ते किस्से मी मुद्दामच या लेखात लिहीले नाहीत. ते किशोरच्या तोंडून ऐकण्यातच जास्त मजा आहे.. त्याच्या प्रोग्रॅमचा काही भाग इथे ऐकायला मिळेल:- 'किशोरची श्रध्दांजली.'

दाद असो वा श्रध्दांजली मी फक्त 'वाss! नुस्ता सदे!' पेक्षा जास्त काही बोलू शकत नाही.

-- समाप्त --

(टीपः या लेखासाठी स्मिता गद्रे पटवर्धन यांची बहुमोल मदत झाली आहे.)

4 comments:

Anonymous said...

I am afraid you have sounded rather like a fanboy in your post, and that is fine within reasonable limit but you have gone to the extent that you have tried to pass off commonplace things as being special to S D Burman.

> आधी चाल मग गीत ही प्रथा सदेनंच सुरू केली.
>
The assertion is neither true nor is it a virtue. Why should not a musician be able to compose tunes to a song written to suit the situation in a film? C Ramchandra has somewhere asserted that he always insisted on having the lyrics written first. That is not a virtue either, but it does suggest that the practice of 'forcing' a composer to compose the tune first was, far from being pioneered by S D Burman, was not uncommon in the film industry.

Playwright Kakasaheb Khadilkar had had tunes of some songs in मानापमान conveyed to him first, and then he wrote words to suit the tune. Please refer to the famous Alurkar release of Vasantrao Deshpande talking on Natyasangeet to Va Pu Kale.


> सदे वर्षाला ४/५ चित्रपटापेक्षा जास्त काम क्वचितच अंगावर घ्यायचा.
>----
And this is something worth mentioning? Please check how many films R C Boral or Master Krishnarao or Anil Biswas or Khemchand Prakash or Salil Chowdhury or Ghulam Mohammed handled per year. Hardly any composer worth discussing has ever composed music for more than 3-4 films per year. You might find Shankar-Jaikishan composing dozens of songs, ranging from ordinary to terrible, in a short span. But S-J are not considered a model for a sincere composer. And when they did compose good music (up to, say, 1955) their assignments were always smallish in number.


- dn

Mugdha said...

ya duniyet parat dusra S.D. hone shakya nahi !
i will be forever greatful to my baba jyani lahanpanapasun amhala S.d. especially Dev anand chi gani aikvli...his fav combination ani mazehi .. Thanks for posting this post..."din dhal jaye" aikaychi tallaf ali ahe...lagech purn karte :)

भानस said...

मला तुमचा मेल आयडी मिळेल का?:)
धन्यवाद.

भानस said...

टॆगलेय रे तुला....:)