Wednesday, December 15, 2010

पेशाचे भोग

'कंप्युटर विचारलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे देतो' असं मास्तरने सांगितल्यावर एका नवशिक्याने, निरागसपणे, 'पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन क्वीन किती वाजता सुटते?' असा सोप्पा प्रश्न कंप्युटरला टाकला. त्यावर कंप्युटरने एरर! एरर! असा, दाराच्या फटीत शेपटी चिणल्यासारखा, जीवघेणा आक्रोश केल्यावर तो नवशिक्या त्याच्या विरुद्ध फतवा निघाल्यासारखा टरकला. त्यावर त्या मास्तरने, 'कंप्युटर मधे आपणच आधी माहिती भरायची असते, मग कंप्युटर तीच माहिती आपल्याला परत देतो' अशी सारवासारवी केली. कसली सॉलीड गेम टाकली की नाही? जी माहिती आपल्याला आधी पासूनच आहे ती प्रथम कंप्युटर मधे भरायची, नंतर तीच, प्रश्न विचारून काढून घ्यायची?

कितीही चमत्कारिक वाटली तरी आवळा देऊन आवळाच काढायची कला मला जमलीच! कारण पूर्वी कॉलेजमधे प्रॅक्टिकल्स न करता फक्त बरोब्बर उत्तरं देणारीच ऑब्झर्व्हेशन्स जर्नल मधे लिहायची चालुगिरी! त्यानंतर मात्र माझं घोडं अल्गोरिदम नामक दलदलीत जे फसलंय ते अजून पर्यंत!

कंप्युटर नवसाला पावावा म्हणून अल्गोरिदम नामक र्‍हिदम कोणत्याही ड्रमवर वाजवला जात नाही.. हे सुरवातीलाच मुद्दाम सांगतोय, नंतर तक्रार चालणार नाही! तर, अल्गोरिदम म्हणजे एखादी कृती कशी करायची याबद्दल कंप्युटरला दिलेल्या सविस्तर सूचना! आपल्या मते त्या कितीही सविस्तर आणि बिनचूक असल्या तरी कंप्युटर एखाद्या मोलकरणी प्रमाणे घालायचा तो घोळ घालतोच! कुणाला नुसती रेसिपी वाचून पहील्या फटक्यात उत्तम पदार्थ करायला जमलंय का कधी? तसंच!

अल्गोरिदमची भानगड कळण्यासाठी असं समजा की कंप्युटर एका फूटपाथवर आहे आणि त्याला पायी रस्ता कसा क्रॉस करायचा आहे. तर काय काय सूचना द्याल? थोडं सामान्यज्ञान वापरलं तर प्रथम झेब्रा क्रॉसिंग शोधायला सांगता येईल, नंतर आधी उजवीकडे मग डावीकडे गाडी नाही ना याची खात्री करून मग रस्ता क्रॉस करायला सांगता येईल. प्रथम दर्शनी या सूचना पुरेशा वाटतात पण या सूचना देऊन कंप्युटरला समजा टिळक रोडच्या फूटपाथवर उभा केला तर त्याला गंज चढेल पण तो रस्ता क्रॉस करू शकण्याची खात्री नाही. का? कारण पहिलीच सूचना! झेब्रा क्रॉसिंग शोधा! पुण्यात ते सापडण्यासाठी अस्तित्वात असलं पाहीजे ना? असलंच तर दिसलं पाहीजे. पुण्यामधे सिग्नल लागल्यावर झेब्रा क्रॉसिंगवर गाडी नाही उभी केली तर आपल्याला पुढे जाऊच देणार नाहीत असं समजतात.

समजा, क्रॉसिंग दिसलं तरी पुढे लफडा आहेच! उजवीकडे बघितल्यावर एखादी पार्क केलेली गाडी दिसली तर कंप्युटर 'युगे अठ्ठावीस फुटपाथ वरी उभा' राहील. त्यासाठी ती सूचना 'स्वतःच्या दिशेने येणारी गाडी दिसली तर ती जाई पर्यंत उभे रहा' अशी बदलायला पाहीजे. हा अल्गोरिदम घालून कंप्युटरला अमेरिकेत रस्ता क्रॉस करायला लावला तर तो कदाचित पलिकडच्या फूटपाथ ऐवजी स्वर्गात सापडेल कारण तिकडे गाड्या रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवतात. त्यामुळे तिकडे आधी डावीकडे आणि नंतर उजवीकडे बघायला लागेल. अशा प्रकारे, प्रत्येक सूचना कुठे आणि कधी चालेल याचा कंटाळा येई पर्यंत उहापोह करून अल्गोरिदम लिहीला तरच डोक्याचा भावी ताप कमी होतो. हुश्श!

हे सगळं मी तुम्हाला माझ्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून सांगत नाहीये.. वेल! म्हणजे, ते अगदीच खोटं नाहीये.. म्हंटलं तर झालाय, म्हंटलं तर नाही! त्याचं काय आहे, कंप्युटरला अल्गोरिदम भरवायचं माझं रोजचंच काम आहे. म्हणूनच प्रत्येक सूचनेला काय काय विघ्न येतील याचाच येता जाता विचार माझ्या डोक्यात सतत चालतो. ती कशी आणि कुठे झोपेल हे सारखं बघायचं.. असंभाव्य किंवा अतर्क्य गोष्टी घडतील असं गृहीत धरून!

त्या सवयीचा इतका गुलाम झालोय मी की साध्या साध्या कामांमधे देखील कीस काढतो अगदी! बायकोने नुसतं पोराला शाळेत सोडायला सांगितलं तरी माझ्या डोक्यात असंख्य विचारभुंगे भुणभुणायला लागतात.. ट्रॅफिक किती असेल?.. दुसरा रस्ता आहे का जायला?.. वेळेवर पोचणार का?.. पोरगा तयार होणार का लवकर?.. स्कूटर न्यावी की कार?.. पेट्रोल आहे का?.. पेट्रोल भरायची वेळ आली तर वेळ गाठणार का?.. पाऊस आला तर?.. वेळेवर पोचलो नाही तर काय करायचं?.. मला ऑफिसला पोचायला किती उशीर होईल?.. ऑफिसात आज काय करायचंय सकाळी?.. तंद्रीमधे पोराला ऑफिसलाच घेऊन गेलो तर?

असो. साधारण कल्पना आली ना तुम्हाला? इथंच ते प्रकरण थांबत नाही, तर त्या विचार भोवर्‍यात मी पूर्ण गुरफटतो. बायकोकडे तोंड अर्धवट उघडं टाकून पहात रहातो पण प्रत्यक्षात शून्यात पहात असतो. त्यामुळे पुढच्या सूचना न्युट्रिनो सारख्या कुठेही न अडखळता डोक्याच्या आरपार सरळ निघून जातात. त्या पुढच्या नाट्याचे यशस्वी प्रयोग घराघरातून सतत होत असतात त्यामुळे ते इथे सांगत बसत नाही.

मला वाटतं की हे पेशाचे भोग फक्त माझ्याच नशिबी असावेत. कारण, इतर लोकांना त्यांच्या पेशाचा घरगुती आयुष्यात उपद्रव झालेला मी तरी ऐकलेला नाही. उदा.. ट्रॅफिक पोलीस.. त्याच्या बायकोने जर 'स्वयंपाक करायला जाते' म्हणून घराच्या बाहेरचा रस्ता धरला तर तो जोरजोरात शिट्टी मारून तिला 'बाजूला' घेईल का? किंवा वीजमंडळातल्या कारकुनाच्या बायकोने त्याला विजेचं बिल भरायला सांगितलं तर तो तिला दुसर्‍या टेबलावर जा म्हणेल का? वाण्याला घरात कागदाचा तुकडा दिसला तर तो समोर दिसेल ती वस्तू त्यात गुंडाळून मोकळा होईल का? एखादा वकील, त्याला गावाहून परत येण्यास जास्त दिवस लागणार असतील तर असं पत्र बायकोला लिहीताना पाहीलं आहे का ?..

My Dear Shubha(Mrs. Shubha Vinayak Dange, Aged 34, resident of 234/56, Vakratunda Co-op Soc, Sadashiv Peth, Tilak Road, Pune 411004. Hereinafter referred to as 'Darling'.)

I, (Mr. Vinayak Shreedhar Dange, Aged 35, resident of 234/56, Vakratunda Co-op Soc, Sadashiv Peth, Tilak Road, Pune 411004. Hereinafter referred to as 'I'.), came to Delhi for official work on Monday the 28th of Oct. 2010, and whereas, the work was delayed because of the act of God, and whereas, I am not able to get train and plane tickets, and whereas, it is not clear when I can leave from here, I am not sure when I can be home.


______ (स्वाक्षरी)
(Mr. Vinayak Shreedhar Dange) Dated: 5 Nov 2010


Witness: _______ (Mr. Jayram Ramram Taliram, Aged 43, resident of 8502/41, Aarakshan road, Connaught place, New Delhi- 110092.)
Dated: 5 Nov 2010

कॉल सेंटर मधे काम करणार्‍या एखाद्या बाईला, घरी, तिच्या नवर्‍याचा फोन आला तर तिनं त्याला.. तुमची जन्मतारीख काय?.. तुमच्या आईचं लग्नापूर्वीच नाव काय?.. तुमचा पत्ता काय? इ. इ. प्रश्न विचारून हैराण केलेलं कुणी ऐकलं आहे काय? एखादा वेटर, घरी बायकोने खाण्यासंबंधी काहीही विचारलं तर 'इडली, वडा, डोसा, उत्तप्पा, कांदा उत्तप्पा, टोमॅटो आमलेट....' अशी सरबत्ती करेल काय? शाळा मास्तराने घरी बायकोला अंगठे धरून उभं रहाण्याची शिक्षा दिल्याचं ऐकलं आहे काय? घराच्या दाराची घंटा वाजल्यावर बस ड्रायव्हरला कधी गिअर टाकण्याची हालचाल करताना पाहीलं आहे काय? गारुड्याला बायकोसमोर पुंगी वाजवताना पाहीलंत का? रिकाम्या न्हाव्याला उगीचच कात्रीचा चुकचुकाट करीत बसलेला पाहीलाय का कुणी?

नाही ना? तेच तर मी म्हणतोय की इतर लोकांचं जिणं त्यांच्या पेशाच्या प्रदूषणापासून मुक्त आहे. तुम्हाला एखादी केस माहिती असलीच तर ती मी एक्सेप्शन प्रुव्हस द रूल म्हणून सोडून देईन. तुमचे केस जातील पण माझ्या सारखी केस नाही मिळणार! मला कंप्युटरनं झपाटलंय! कंप्युटरचं प्रोग्रॅमिंग करता करता त्यानंच माझं डोकं फॉर्मॅट करून तिथं चक्क नवीन ओएस टाकली आहे. आता तर, कुठलीही काम करण्याआधी मी नुसतं काय बोंबलेल याचा विचार करून थांबत नाही तर त्या प्रसंगी मार्ग कसा काढता येईल त्याचंही चर्वितचर्वण करायला लागलोय! इतका सगळा सखोल विचार केला तरी ते काम बोंबलायचं थांबत नाहीच शेवटी! फरक इतकाच की बोंबलण्याचं कारण आधी विचार न केलेल्या पैकी असतं. तरीही विक्रमादित्याचा आदर्श ठेवून, तेच काम पुढच्या वेळेस करायच्या वेळेला बोंबलण्याच्या नवीन कारणाचाही समावेश करायला जातो. याचा परिणाम फक्त अख्ख्या फॅमिलीची डोकी तापवण्यात होतो.. आणि माझंही!

उदाहरणार्थ, मंडईतून भाजी आणण्याची साधी गोष्ट! आयुष्यात पहिल्यांदा मी भाजी आणायला निघालो तेव्हा तुफान डोकं चालवल्यावर मला आणायच्या भाज्यांची यादी करायचं सुचलं. ती यादी एखाद्या कवितेच्या रसग्रहणासारखी लांबलचक झाली. पण प्रत्येक भाजी किती किलो घ्यायची हे न लिहील्यामुळे संजीवनी न शोधू शकणार्‍या हताश हनुमानाप्रमाणे घरी द्रोणागिरी एवढ्या भाज्या आल्या. त्याचं वेगळं रामायण झालं आणि माझे गाल, मारुती प्रमाणे, पुढचे बरेच दिवस फुगलेले राहीले. पुढच्या वेळेस यादीत सगळं नीट लिहून घेऊन गेलो पण माठ नामक भाजी ऐवजी पाण्याचा माठ नेण्याचा माठपणा केला. कुणा लेकाला माहिती माठ हे भाजीचं पण नाव असतं ते?

पुढच्या वेळेस गेलो तेव्हा मी भाजीवाल्यासमोर आणि माठ कसा ओळखायचा हा यक्ष प्रश्न माझ्यासमोर एकदमच उभे ठाकले. भाजी विकण्याची गरज त्याला जास्त आहे त्यामुळे तो योग्य ती भाजी देण्याचं काम चोख करेल असं समजून निर्धास्तपणे मी त्याला माठ मागितला. पुष्कळशा टोपल्या आजुबाजूला पसरून बर्‍याच आत मध्यभागी तो कोळ्यासारखा बसलेला होता. उत्तरादाखल त्यानं फक्त एक टोपली माझ्याकडे फेकली. एका यकश्चित भाजीवाल्या समोर माठ नावाखाली मायाळू घेऊन स्वतःचं हसं करून घ्यायचं नव्हतं मला! शिवाय, त्यानं भर मंडईत माझं शैक्षणिक वस्त्रहरण केलं असतं तर ते केव्हढ्याला गेलं असतं? मग माझी प्रतिष्ठा जपण्यासाठी माठ सोडून तिथून ताठ मानेने सटकलो. पण घरी बायकोशी गाठ होती.. हो, लग्नापासून बांधलेली! तिच्या लाथाळ्या खाल्ल्या. पुरुष हा क्षणकालाचा पती आणि अनंत काळाचा फुटबॉल असतो, हे मूलभूत ज्ञान मला तेव्हा झालं! शाळा कॉलेजात आई बाप, मोठी भावंड, मास्तर, नातेवाईक.. तारुण्यात बॉस, बायको, पोरंबाळं.. म्हातारपणी पोरांच्या बायका इ. इ. सगळे पुरुषांवर यथेच्छ पाय धुवून घेतात. नाही म्हणायला फक्त शैशवातच काय ते थोडं फार कोडकौतुक होतं पुरुषांच! म्हणूनच प्रौढत्वी निज शैशवास जपायला सांगतात की काय न कळे!

कधी सांगितलेली भाजी मंडईत नसणे तर कधी अधपाव म्हणजे नेमके किती असा प्रश्न पडणे अशा नवनवीन समस्या उद्भवणं काही थांबत नाही आणि त्या वेळेला मख्खपणे काम जमत नाही हे पण सांगता येत नाही! घोर कुचंबणा! कंप्युटरचं माणसापेक्षा बरं असतं. कुठेही तो अडकला की एरर फेकून हात झटकून रिकामा होतो. आठवा, मायक्रोसॉफ्टचे 'जनरल प्रोटेक्शन फेल्युअर' हे तीन अगम्य शब्द! ते स्क्रीनवर नाचले की एक्सप्रेस वे वरून भरधाव जाता जाता अचानक समोर मोठ्ठं विवर दिसल्यावर जसं फेफरं येईल तसं येतं. विचार करा, ओबामाची सुरक्षा व्यवस्था मायक्रोसॉफ्टकडे असताना त्याच्यावर हल्ला झाला तर ते 'जनरल प्रोटेक्शन फेल्युअर' ही भीषण एरर देऊन त्यातून अंग काढू शकतील का? असा सुलभ ऑप्शन माणसांना नसतो.

तरीही मी विचार करायचा थांबत नाही. मला ते व्यसन लागलंय. हेच बघाना, एकाने मला याच वेडावर लेख लिहायला सांगितलं तर लगेच.. कादंबरी लिहावी की साधा लेख?.. लिखाण टाकताना मधेच सर्व्हर झोपला तर?.. लोकांना अश्लील वाटला तर?.. हा लेख दुसर्‍या कुठल्या लेखाची कॉपी वाटला तर?.. .. .. .. .. ..

====== समाप्त ======

14 comments:

हेरंब said...

हा हा हा.. कसला भन्नाट जब्बरदस्त झालाय लेख !! वाक्यावाक्याला हसलो आणि लगेच प्रतिक्रिया टायपायला बसलो... पण मग काय लिहायचं..? किती मोठी प्रतिक्रिया द्यायची..? किंवा मग किती लहान प्रतिक्रिया द्यायची..? प्रतिक्रिया ब्लॉगरला आवडेल का..? अप्रुव्ह होईल का..? असे अनेक र्‍हिदम मेंदूच्या ड्रमवर वाजायला लागल्याने देत नाहीये प्रतिक्रिया ;)

Saee said...

Khup masta. Navra ani footbaal bhayankar awadla. :)

मंदार जोशी said...

>>पुरुष हा क्षणकालाचा पती आणि अनंत काळाचा फुटबॉल असतो

>>Hereinafter referred to as 'Darling'.)

सकाळी सकाळी धम्माल वाचन. आता दिवस चांगला जाणार. :)

Satya said...

दादा लेख केवळ अप्रतिम...
लेखाताल्या अनेक कोट्या तर लेखाला एका मस्त उंचीवर नेउन सोडातायत...
इतरांच्या नशिबी हे भोग आलेले नाहीयेत हे सिद्ध करण्यासाठी तू दिलेली उदाहरणे एकदम फक्कड़... :)
general protection failure वरून अशीच अजून एक महाभयानक segmentation fault नावाची error आठवली... आणि पायाखालचा platform आपल जमीन सरकली.... :)

लिना said...

भन्नाट

आदित्य चंद्रशेखर said...

एकदम खरंय, हसून हसून पुरेवाट झाली.मी पण एक कोडतोड्याच(programmer) आहे. त्यामुळी मला पण असा छोट्या छोट्या गोष्टींचा सगळ्या बाजूने विचार करायची सवय लागली आहे. पण खरंच कधीकधी असं वाटतं की असा विचार जनरल गोष्टींमधे करत करत आपण आपला मेंदू उगाच शिणवतो.. कोड तोडत असतांना ते ठीक आहे! शेवटी काय, तर occupational hazard! :)

Maithili said...

हा हा हा...सही....
पहिल्यांदाच आले इथे... फुल ऑन फन आहे हा ब्लॉग.... :-) :-D

संकेत आपटे said...

कसलं भारी लिहिलं आहे... हसून हसून खाली पडायची वेळ आली... मस्त एकदम. :-)

Anonymous said...

Sahich... Mast lekh jamla ahe...

Satish said...

Too.. means 3.. 4 good..

भानस said...

केवळ अशक्य... अक्षरश: हसून हसून पुरेवाट झाली. शाळा मास्तरची बायको नव्हे तोच अंगठा धरून उभा दिसू लागला मला... :D, मलाही हेरंबसारखा मोह होतोय पण... माझी प्रतिक्रिया तू उडवशील तेव्हां मी लेखच पुन्हा वाचते आणि पोटधरून हसते. एकतर स्वत: हे असं वेडं व्हायचं आणि दुसर्‍यांनाही आपल्या कळपात खेचायचं. :))

अवांतर: शेवटी तुला ’ माठ ’ सापडला का नाही?

स्मिता पटवर्धन said...

mast lihilayas chiman, dhammal aali

swarada said...

mast lihilay.
lekhan shaili apratim aahe tumachi

Hemant said...

bhannat ..