ही तशी जुन्या काळातली गोष्ट आहे. कुणास ठाऊक कसा पण मला संगीताशी झटापट करायचा झटका आला. माझ्या आयुष्यात स्वर कमी आणि व्यंजनं जास्त असल्यामुळे असेल कदाचित! तर मी गिटार शिकायचा घनघोर निर्णय घेतला. छे! छे! पोरगी पटवायला म्हणून नाही हो! तेंव्हा माझं लग्न झालेलं होतं आणि एक ८ महिन्याचा मुलगा पण होता. आता तुम्ही जाणुनबुजून व्यंजनांचा आणि लग्नाचा संबंध लावायला गेलात तर माझी व्यंजनं आणखी वाढवाल! असं म्हणा की माझं सर्जनशील मन कुठेतरी व्यक्त होण्याची धडपड करत होतं आणि ते मला स्वस्थ बसू देत नव्हतं!
आता गिटारच का शिकायचं ठरवलं? श्या! इतक्या चांगल्या वाद्याचं नाव त्या सतत तुंबलेल्या, घाण वास मारणार्या, डासांचं नंदनवन असलेल्या थिजलेल्या काळ्याशार पाण्यातून बुडबुडे फुटणार्या नाला सदृश वस्तूशी जुळणारं का बरं आहे? नावात काय आहे म्हंटलं तरी मधुबालाला अक्काबाई म्हंटल्यावर ते लोभस रूप डोळ्यासमोर येणार आहे का? त्रिवार नाही. पण ते असो. कारण मोठ्या लोकांनी म्हणून ठेवलेल्या गोष्टी, कुठलाही वाद न घालता, जशाच्या तशा स्विकारायच्या असतात अशी आपली संस्कृती सांगते. तर गिटार शिकायचं खरं कारण म्हणजे पिक्चर मधले हिरो! ते एकतर पियानो तरी वाजवताना दाखवितात नाहीतर गिटार तरी! आठवा ते पियानोच्या त्रिकोणातून घेतलेले हिरो आणि हिरॉईनचे शॉट्स! पण पियानो मला परवडला नसता आणि परवडला तरी एक बेडरूमच्या तुटपुंज्या घरात तो 'पियानो कम, डायनिंग टेबल जादा' झाला असता. शिवाय, तो काखोटीला मारून कुठे पिकनिकला वगैरे नेऊन भाव खाणं कसं शक्य होतं? मग राहिलं फक्त गिटार! आणि गिटार वाजवता वाजवता काय काय मस्त मस्त स्टायली मारता येतात राव! तरीही परत एकदा पोरी पटवणे हा गिटार शिकण्या मागचा उद्देश नव्हता हे नम्रपणे नमूद करू इच्छितो!
एकदा ते शिकायचं जाहीर केल्यावर मित्रांनी किती टिंगल केली ते सांगायला नकोच. 'तू लहानपणी रडलास की गंजलेल्या टमरेलावर दगड घासल्यासारखा आवाज यायचा म्हणे' इथून सुरुवात झाली इतकंच सांगतो. मनात म्हणायचो, एकदा मी स्टेजवर दिसायला लागलो की हेच टोळभैरव चिमण माझाच कसा जिवलग मित्र आहे याचं रसभरीत वर्णन करतील.
झालं, मग एक क्लास लावला! आठवड्यातून ३ दिवस, सकाळी ऑफिसला जायच्या आधी तासभर तारा खाजवायच्या. क्लासमधे खूप गिटारं ठेवलेली होती त्यामुळे अपफ्रंट इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न नव्हता. मास्तरनी कसं, कुठे आणि काय खाजवायचं ते दाखवलं आणि म्हणाला आता या नोट्स वाजव. नोट्स वाजव? हायला! नोट्स वाजवायच्या पण असतात? तेव्हा मला फक्त नोट्स घ्यायच्या असतात नाहीतर कॉपी करायच्या असतात इतकंच माहिती! मराठीतलं शिक्षण अचानक मान खाली घालायला लावतं, ते असं.
दुसरी एक अस्वस्थ जाणीव अशी झाली की संगीत शिक्षण हे नेहमीच्या शाळा/कॉलेजातल्या शिक्षणापेक्षा फार वेगळं आहे. तिथे घोकंपट्टी आणि कॉप्या मारून तरून जाता येतं. इथं तसं नाही, इथं आपणच मरायचं तेव्हा स्वर्ग दिसणार!
पहिले काही दिवस नुसते उजव्या व डाव्या हातांनी, एकाच वेळी, दोन वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नात गेले. हा प्रकार आपल्या चुकांचं खापर दुसर्यांवर फोडण्याइतकं सोप्पं असतं तर काय हो? एकाच वेळी, डाव्या हाताने वर्तुळ व उजव्या हाताने चौकोन काढता येतो का पहा बरं जरा! डाव्या हाताच्या एकेका बोटाने एका तारेच्या एकेका फ्रेटवर दाबायचं आणि उजव्या हाताने नेमकी तीच तार छेडायची. दाबलेल्या तारेवरचा दाब कमी झाला तर ती तार गळा घोटल्यासारखी कोकलते. कर्मकठीण काम हो! तसंच करंगळीने, ते सुद्धा डाव्या हाताच्या, काही दाबता येतं का? कान खाजविण्याव्यतिरिक्त करंगळीचा काही उपयोग नाही हे माझं स्पष्ट मत आहे. आणि सगळ्यात शेवटी, एक तार दाबताना, मनावर कुठलाही दबाव न ठेवता, इतर कुठल्याही तारेला कशाचाही स्पर्श देखील होऊ द्यायचा नाही. कुणालाही स्पर्श न करता लोकलच्या आत बाहेर जाता येतं का? एकंदरित गिटार छेडणं हे पोरींना छेडण्याइतकं सोप्पं नाही!
मात्र, काही शब्दांच्या उगमाबद्दलचा साक्षात्कार असा या शिक्षणाचा वेगळाच एक फायदा झाला! 'ब्लिडिंग एज' म्हणजे बोटांना भूकंपात जमिनीला पडतात तसे चर पडून रक्तबंबाळ होणं. 'गायनी कळा' म्हणजे भेग पडलेल्या बोटाने तार दाबल्यावर ज्या जीवघेण्या कळा येतात त्या! 'तारांबळ' म्हणजे अशी तारवाद्य शिकताना जे काही होतं ते.
तार छेडण्यासाठी उजव्या हातात एक छोटा त्रिकोणी प्लेक्ट्रम धरून पाहिजे त्या तारेला झापड मारायची असते. तो प्लेक्ट्रम बोटातून कधी संधी निसटल्यासारखा निसटायचा, तर कधी इतका वर सरकायचा की प्लेक्ट्रम ऐवजी बोटंच तारेवर घासायची. नाहीतर कधी तो गोल फिरून बोटांमधे गुडुप व्हायचा. पहिल्या आणि शेवटच्या तारेला झापडणं त्यातल्या त्यात सोप्पं, पण मधल्याच एखाद्या तारेला झापडणं ते सुद्धा शेजारच्या तारेला न दुखावता म्हणजे खरी तारेवरची कसरत आहे. पाण्यात पडलं की पोहता येत तसं गिटारच्या तारांवर बोटं दाबली की गिटार येत नाही.. बोटं तरी कापतात नाही तर तारा तरी तुटतात.
२/३ महिन्यानंतर माझी फारशी प्रगती दिसेना म्हंटल्यावर मास्तरने घरी पण प्रॅक्टिस करायला हवी म्हणत एक गिटार अक्षरशः गळ्यात मारलं. गिटार सुरात कसं लावायचं ते पण सांगितलं. त्यासाठी सूर ओळखता यायला लागतो महाराजा! सूर फार लांब राहीले, मला तर पटकन माणसं पण ओळखता येत नाहीत. मागे एकदा एक संगीत शिक्षक माझ्याकडे आले होते. मुलांना वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सूर कसे ऐकू येतात हे शिकविण्यासाठी त्यांना ऑसिलोस्कोपवर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे सूर तयार करून ते कॅसेटवर रेकॉर्ड करून हवे होते. ते मी रेकॉर्ड केले आणि मग कॅसेट वाजवली. मला तर सगळे सूर सारखेच वाटले. पण ते म्हणाले सूर वेगवेगळे आहेत, आम्ही संगीतातले आहोत, आमचे कान तयार असतात. तेव्हापासून कानाला जो खडा लागला आहे तो कायमचाच!
तरी चिवटपणे मी ट्युनिंग करीत राहीलो, पण तार पिळून सूर वर न्यायचा की ढिली करून खाली आणायचा ते कळायचंच नाही. परिणामी तारा जास्त पिळल्या जाऊन तुटायच्या! माझ्या मित्रांनी खडूसपणे 'काय, कसं चाललंय गिटार?' असं विचारलंच तर त्यावर माझ्या बायकोचं, सरिताचं, उत्तर ठरलेलं होतं.. 'नुसता तोडतोय तो!'. माझ्या ट्युनिंगच्या अत्याचारामुळे गिटार मधून जे काही चित्रविचित्र आवाज यायचे ते फक्त माझ्या मुलाला, गोट्यालाच आवडायचे. त्याला गिटार म्हणजे त्याच्यासाठी आणून ठेवलेलं एक खेळणं वाटायचं. त्याला सतत काहीतरी आपटायला आवडायचं म्हणून सरिताने त्याला एक वाटी दिली होती. ती तो डाव्या हाताने जमिनीवर जोरजोरात आपटायचा. बहुतेक लहान पोरं सुरवातीला डावखुरी का असतात कोण जाणे! वाटी जमिनीवर आपटण्यापेक्षा गिटारवर आपटली तर जास्त मजेशीर आवाज येतात हे एकदा त्याच्या तल्लख डोक्यात घुसल्यावर तो गिटारला मोक्ष देऊनच थांबला. इतरांना मात्र ते त्याच्या उज्वल सांगितिक भरारीचे पाळण्यातले पाय वाटले.
पण मी हट्ट सोडला नाही. नवीन गिटार आणलं, हे गिटार मात्र मी गोट्याच्या हाती लागू नये म्हणून लॉफ्टवर ठेवत असे. शिवाय कुणीतरी सांगितलं म्हणून ट्युनिंगची एक शिट्टी पण आणली. पण माझ्या शिट्ट्या ऐकून सरिताच्या कुकरची शिट्टी उडाली.. 'अरे, तुला काही लाज? सरळ रस्त्यावरच्या मुलींना बघून शिट्ट्या मारतोयस ते?'. शेवट पर्यंत मी ट्युनिंगच्या नावाखाली पोरींना शिट्ट्या मारतोय हा तिचा समज मी काही दूर करू शकलो नाही.
माझ्या गिटार शिक्षणाचा प्रवास असा कोकाकोला सारखा झाला.. सुरुवातीला रेग्युलर कोक, मग डाएट आणि शेवटी झीरो होत होत अशी त्याची प्रगती (की अधोगती?) होत होत ते लयास गेलं.
एक दिवस अत्याचार सहन न होऊन माझ्या गिटारने लॉफ्टवरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. त्या दिवशी गिटारी अमावास्या होती म्हणतात!
-- समाप्त --

11 comments:
खूप दिवसांनी… पण एकदम मस्त
>>माझ्या ट्युनिंगच्या अत्याचारामुळे गिटार मधून जे काही चित्रविचित्र आवाज यायचे ते फक्त माझ्या मुलाला, गोट्यालाच आवडायचे :D :D
धन्यवाद धनु! हो फारा दिवसांनी लिहायला मुहूर्त सापडला :)
मस्त
भारी लिहिलंय
निखिल धन्यवाद!
सर कृपया सारखा सारखा लिहित जा।
मी बिचारा दररोज तुमचा ब्लॉग खोलतो पण हाती निराशा मिलते।
असे होने चांगले नाही नाही तर office मधे येइल मी ।
Pls update
धन्यवाद चंदू! हो, फारा दिवसांनी लिहायला मुहूर्त सापडला :)
mi dekhil baryach divsanpasun vaat pahili.
nehmi pramanech mast ahe ha lekh
adhun madhun darshan dya asasch :D :D
दर्शन द्यायचा प्रयत्न जरूर करणार अक्षय! आत्तापर्यंतच लिहीलेलं वाचल्याबद्दल धन्यवाद!
http://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5231780568818136532
Hi tumchich pustake ahet kay?
हो अक्षय! ती माझीच पुस्तके आहेत :)
मस्त लिहिलंय....माझ्या ट्युनिंगच्या अत्याचारामुळे गिटार मधून जे काही चित्रविचित्र आवाज यायचे ते फक्त माझ्या मुलाला, गोट्यालाच आवडायचे :D :D... माझ्या गिटार शिक्षणाचा प्रवास असा कोकाकोला सारखा झाला.. सुरुवातीला रेग्युलर कोक, मग डाएट आणि शेवटी झीरो होत होत अशी त्याची प्रगती (की अधोगती?) होत होत ते लयास गेलं.... :D :D काय एक एक उपमा(रव्याचा नाही) आहेत!!
Post a Comment